भाकरीच्या टोपल्यावर

Submitted by संतोष वाटपाडे on 30 April, 2015 - 05:53

भाकरीच्या टोपल्यावर
लक्ष जाते पहुडल्यावर...

वेदना परतून गेली
आसवे वैतागल्यावर...

ती म्हणाली थांबतो का
पाय मागे घेतल्यावर...

दुःख खरपूस होत जाते
वास्तवाने भाजल्यावर...

थबकले आयुष्य माझे
मीच मांडी ठोकल्यावर..

चेहरा निश्चिंत दिसतो
देह शेवट झाकल्यावर..

ताकही फुंकून गिळले
मी दुधाने पोळल्यावर..

प्रेम म्हणजे जहर... कळले
नेत्र झाकुन प्यायल्यावर...

बदलते इतिहाससुद्धा
एक स्त्री संतापल्यावर..

काय देशिल जीवना तू
मी तुला सांभाळल्यावर....

देव सापडला मनातच
मंदिरे धुंडाळल्यावर..
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेम म्हणजे जहर... कळले
नेत्र झाकुन प्यायल्यावर...

अगदी वास्तव आहे आजकालच्या पिढीचे,,,,,
सुंदर कलाकृती... शब्दांची

nice