सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..तालुक्याच्या गावी पदवी पर्यंतचा शिक्षणाचा टप्पा अंतिम पर्वात आला होता . पदवी परीक्षा काही दिवसांवर आली होती . महाविद्यालयास कायमचे सोडून जाण्याचे दिवस अगदी जवळ आले होते.
आसपासचे अस्सल ग्रामीण वातावरण, पदवीनंतर स्वतःच्या शेतीवाडी कडे वळणारा मोठा विद्यार्थी वर्ग असलेला, आमचा वाणिज्य शाखेचा तो वर्ग होता . पण त्यातही कलागुण, भाव भावना यांची जपणूक करणारा शिक्षक वर्ग होता, त्यांच्या कृपेने आमचा निरोप समारंभ नक्की झाला होता.
त्या अखेच्या दिवशी आमच्या वर्गातील एका सुरेल गळा लाभलेल्या मित्राने आमच्या कार्यक्रमास साजेसे एक भावगीत सादर केले, त्या गीताचे शब्द होते ...
वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले
गेले, ते दिन गेले !
त्या दिवशी त्या गाण्यानी मला इतके अंतर्मुख केले कि ,ते स्वर आणि ते सूर मी पुढे कधीच विसरू शकलो नाही.माझी आणि श्रीनिवास खळे ( खळे काकांची ) यांची हीच पहिली ओळख. आणि त्यानंतर माझी आणि खळे काकांची मैत्री दृढ झाली ती त्यानंतर आजतागायत
अगदी काका आपल्यातून जावून सुद्धा, माझी आणि खळे काकांची मैत्री तशीच टिकून आहे.कारण हि मैत्री निर्गुणी निर्मोही अशी आहे.
अहो आमची मैत्री म्हणजे जगाला सांगण्यासाठी किंवा फोटो, सत्कार या प्रकारातील नव्हतीच, मुळातच ती मैत्री म्हणजे कलाकार आणि रसिक यांच्यातील मैत्र होते. हे मैत्र म्हणजे नात्याचा वीण जो सुरांनी गुंफलेला एक घट्ट पीळ आहे. आणि त्यामुळेच तो त्यांच्या जाण्याने पण संपलेला नाही.
खरेतर खळे यांनी दिलेली प्रत्येक रचना, त्या गीतातील शब्द सामर्थ्य, सुरांच्या संगतीने अनेक पटीने सहजतेने वाढविते. आणि मग ते गीत प्रत्येक रसिकास अगदी आपलेच वाटू लागते.आणि हा आपलेपणा देणाऱ्या संगीतकारास मी माझा मित्र मानले ते त्यांच्यावरील अपरंपार भक्तीतून.
आज 30 एप्रिल श्रीनिवास विनायक खळे या संगीतकाराची जयंती. खळे काका आपल्यात नाहीत त्याला आता चार वर्षे झाली .पण त्यांच्या संगीत रचनेने त्यांना दिलेले अमरत्व हे त्यांच्या संगीत सुरातील अमृताच्या गोडीत दडलेले आहे. मला खळे हे सहानभूतीने शब्दांना सूर देणारे संगीतकार आहेत असे नेहमीच वाटते
या ठिकाणी मी वापरलेला सहानभूती हा शब्द सह + अनुभूती या अर्थाने म्हणजेच आपल्या मनातील अनुभूती सह स्वरांना सूर देणारा संगीतकार म्हणून मी त्यांच्या रचनांकडे पाहतो.त्यांच्या रचनांमधील भक्ती गीते आणि भाव गीते ऐकतांना नेहमीच मला असे वाटते कि, त्यांच्या प्रत्येक भक्ती गीतात भाव आहे आणि प्रत्येक भाव गीतात भक्ती आहे.
प्रेम भाव हा प्रत्येक मानवी मनाचा ठाव घेणारे एक न उलगडलेले कोडे आहे. प्रियकर आणि प्रेयसी यांच्या भाव भावना शब्द बद्ध करणाऱ्या अनेक रचना आज मराठीत आहेतच, पण त्या रचनेला जर खळे टच मिळाला तर शब्दा मागचे भाव वेगळाच भाव खावून जातात.
श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले कि प्रेम गीते हि केवळ दोघांचीच उरतात.त्यांचे स्वरूप हे जणू एकांत गीते असे होते. युगल गीतात एकाच कडव्यातील पहिल्या दोन ओळी एकाने आणि तिसरी ओळ एकाने म्हणत जणू हे विश्वच फक्त दोघांचे आहे असे वातावरण त्यांचे संगीत निर्माण करते. प्रियकर आपल्या प्रेयसीस आर्ततेने म्हणतो -
हात तुझा हातातुन धुंद ही हवा ....
त्यावर उत्तर देत प्रेयसी म्हणते -
रोजचाच चंद्र आज भासतो नवा...
मग या भारल्या वातावरणात प्रेयसी भानावर येत आपल्या प्रियकरास विचारते, आज जरी हे सर्व तुला धुंद नवे नवे आणि हवे हवे असे वाटत आहे तरी जर आपण दुरावलो भेटी गाठी अशक्य झाल्या तर तेंव्हा-
तू जिथे कुठे असशील
स्वप्नांत मला दिसशील
तुज कळेल पण हे का रे ?
विसरशील तू सारे
प्रेयसीची हि मनातील अनामिक भीती किंवा वास्तव परिस्थितीतील दुरावा जेंव्हा वरील शब्दात येतो, तेंव्हा प्रियकर जे काही घडलेय ते एकाच बाजूने नाही, आज निर्माण झालेला दुरावा आणि हि परिस्थिती आपल्यातील अंतर यावर तो म्हणतो -
तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?
हा जो शब्दातील सल आहे तो खळे यांनी त्याच्या संगीतातून नेमका आत पोहचवला आहे.
श्रीनिवास खळे यांच्या संगीत रचना या गायक गायिका यांना गाण्यासाठी अवघड असतात, त्यामुळे खळे यांच्या कडे गाणे म्हणजे कठीण परीक्षा पास होणे असे मानले जात असे. याबबत त्यांना विचारले असता ते म्हणत कि त्या रचना हि शब्दांची गरज आहे. आणि योग्य संगीत रचने शिवाय गीतातील भाव रसिकांपर्यंत पोचणार कसे ?
त्यांनी संगीतबध्द केलेली भक्ती गीते तर इतक्या अवीट गोडीची आहेत कि त्यावर काय बोलावे. या संगीत रत्नाने विश्वरत्न संत तुकाराम यांच्या रचना संगीत बद्ध करताना, त्या दोन भारतरत्नांकडून गाऊन घेतल्या.
'अभंग तुक्याचे ' यासाठी लता मंगेशकर आणि 'अभंगवाणी ' यासाठी पंडित भीमसेन जोशी या दिग्गजांचा आवाज त्यांनी संगीतबद्ध केला .याशिवाय या दोघांना एकत्रित गायला लावून ' राम श्याम गुण गान ' साठी त्यांनी संगीत दिले.
त्यांनी संगीत दिलेल्या,
पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातील - 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥'
आणि ,लताजींच्या आवाजातील - 'सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ '
या दोन रचना अशा आहेत कि त्यातील स्वरांची आर्तता सुरांमुळे इतक्या पराकोटीला जाऊन पोहचते कि , विठुरायाचे ते रूप पाहण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आला तरी त्यात नवल नाही
श्रीनिवास खळे यांच्या वाट्याला उमेदवारीच्या काळात कलाकारांच्या वाट्याला येणारे भोग त्यांच्याही वाट्यास आले. बडोदा सोडून नशीब अजमावण्यासाठी मायानगरीचा रस्ता धरला.
ओळखी ओळखीतून राहण्याची तात्पुरती व्यवस्था, नवीन म्हणून होणारी उपेक्षा , यासारख्या अडचणी त्यातून आलेले नैराश्य, यामुळे काही काळ ते इतके हतबल झाले होते कि स्वतःची हार्मोनियम विकून परतीचा रस्ता धरावा असा निर्णय पण घेतला होता.
पण या कठीण प्रसंगी त्यांना त्याच्या पत्नीने मानसिक बळ देत या निर्णयापासून परावृत्त केले.सौ खळे यांनी त्यावेळी दाखवलेल्या धैर्या मुळे संगीत क्षेत्राचे होणारे अपरिमित नुकसान टळले , त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र आजही त्यांचे ऋणी आहे.
त्यानंतर एका चित्रपटासाठी म्हणून तयार झालेली दोन गीते ऐनवेळी त्या चित्रपटाचा संगीत रचनाकार खळे यांच्या ऐवजी दुसराच कोणीतरी ठरल्याने त्या चित्रपटात घेतलीच नाहीत. पण ह्या दोन गीतांची रेकॉर्ड एच. एम . व्ही . कडून तयार करून घेण्याची समयसूचकता गदिमांनी दर्शवली.
गदिमांचा हा निर्णय हा खळे यांच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला . कारण या रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या रेकॉर्डवर गीते होती ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ ….
यावरील दोन गीतांपैकी एका तळ्यात होती मधील -
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक
या कडव्या प्रमाणे त्यांना स्वः प्रतिभेची जाण तेंव्हाच झाली होती. बाकी जगाला ती येण्यास बराच काळ जावा लागला. पुढे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले . त्यांच्या प्रमुख पुरस्कारांची यादी अशी आहे
सूर सिंगार पुरस्कार (इ.स. १९७०)
लता मंगेशकर पुरस्कार (इ.स. १९९३)
जीवन गौरव पुरस्कार (इ.स. २००६)
संगीत रत्न पुरस्कार (इ.स. २००७)
पद्मभूषण (इ.स. २०१०)
स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार
सुधीर फडके पुरस्कार,
बालगंधर्व पुरस्कार
स्वररत्न पुरस्कार
दत्ता डावजेकर पुरस्कार
अर्थात त्या पुरस्कारांमुळे खरे तर सन्मान पुरस्कारांचा झाला. यासर्व पुरस्कारानंतर इ.स. २०१० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
आपल्या स्वतः च्या या यशो मालिकेकडे पाहताना त्याची वृत्ती मात्र त्यांनीच स्वरबध्द केलेल्या -
'देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला ! ' या गीता प्रमाणे राहिली असेल असेच वाटते .
खळे यांनी प्रेम गीत , भाव गीत, भक्ती गीत , चित्रपट गीत या बरोबरच बाल गीत हा प्रकार देखील लीलया हाताळला . १९५२ साली 'गोरी गोरी पान' ने
सुरु झालेला हा प्रवास नंतर -
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?
एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला
गमाडि गंमत जमाडि जंमत, ये ग ये सांगते कानात
चांदोमामा, चांदोमामा ..... भागलास काय ?
नको ताई रुसू, कोपर्यात बसू
या सारख्या वैविध्य पूर्ण बालगीतांनी बहरतच राहिला.
स्वतः परिस्थितीशी झगडत ध्रुव ताऱ्याचे अढळ पद मिळवताना त्यांनी इतरांना पण नेहमीच ' दीपगृहा ' ची भूमिका घेत समर्थ मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे संगीत क्षेत्राला शंकर महादेवन सारखा चमकता तारा लाभला. जो खळे काकांचा शिष्य म्हणून नावारूपास आला .
अरुण दाते यांना मराठी भाव गीत गायनाची प्रथम संधी श्रीनिवास खळे यांनी दिली. मी मुळचा मराठी भाषिक नाही, त्यामुळे मराठी भावगीत हा प्रकार मला जमणार नाही, असे अरुण दाते यांचे मत श्रीनिवास खळे यांनी पूर्णतः चूक ठरवत त्यांना गायनाची संधी दिली .
या खळे यांच्या निर्णयामुळे गायन क्षेत्रात अरुण दाते हे नाव चमकले, आणि तेही शुक्राच्या ताऱ्या प्रमाणे . कारण अरुण दाते यांचे खळे यांनी संगीत बद्ध केलेले गीत होते …
'शुक्र तारा मंद वारा' हे होय.
या गीताने अरुण दाते यांना मिळालेले यश मागे वळून पाहताना त्यांना याच गाण्यातील -
शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी याच ओळी आठवत असतील.
असा हा प्रतिभावंत संगीतकार , यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना, अल्प आजाराने २ सप्टेंबर २०११ रोजी आपल्यातून गेला. त्या अखेरच्या दिवसात देखील, आपल्या भावना ईश्वरास सांगताना, स्वतःची संगीत रचना वापरून,आपली मनोकामना त्याच्या चरणी मांडली असेल आणि त्यांच्या ओठी -
हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
हि संत तुकारामांची रचना आली असेल असेच वाटत राहते.
ज्या दिवशी त्यांच्या जाण्याची बातमी धडकली तेंव्हा एक रसिक आणि एक अनामिक मित्र म्हणून माझी भावना मात्र -
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे ? या त्यांच्याच एका संगीत रचने सारखीच झाली होती . त्यामुळे आता अधिक काय लिहणार ?
छान, लेख आवडला.
छान, लेख आवडला.
खूप छान. लेख आवडला..
खूप छान. लेख आवडला..
चांगला लेख. थोडक्यात घेतलेला
चांगला लेख. थोडक्यात घेतलेला आढावा आवडला. माझे नं. १ चे आवडते संगितकार.
मला नेहमी वाटतं, ज्ञानेश्वर माऊली उतारवयात खळेकाकांसारखे दिसले असते. मऊ हसणारे, स्निग्ध, अपरंपार शांतीचं तेज असलेले.
त्यांची गाणीही त्यांच्यासारखीच सौम्य, पण अंतरंगाचा ठाव लागू न देणारी. म्हणुन अवघडही. सहजासहजी पोचता न येणारी.
पडत धडपडत गाणी गायला सुरुवात केली होती ती त्यांच्याच गाण्यांनी, पहिलं पारितोषिकही केवळ त्यांचं अवघड गाणं निवडलं म्हणुन मिळालं नाहीतर गाणं म्हणताना तालात गेले होते, म्हणायला जमली नाहीत तरी निदान गुणगुणतानाही अपार आनंद, शांतता मिळते. गाणी ऐकताना एक आपुलकीची भावना मनात आकार घेते, त्यांच्याशी नाळ जुळल्यासारखी वाटते.
फारंच सुर्रेख लिहिलंय किंकरजी
फारंच सुर्रेख लिहिलंय किंकरजी ....
खळेकाकांसारख्या अद्वितीय संगीतकाराची अत्यंत सुरेल गाणी ऐकायला मिळणे हा या जन्मीचा मोठा भाग्ययोगच ...
त्यांनी मराठी रसिकांसाठी इतके भरभरुन दिलेले आहे की हे कधीही न फिटणारे असे स्वर-ऋण आहे असे वाटते...
खळेकाकांना प्रेमपूर्वक, साश्रुनयन आदरांजली ...
खळे काका समोर उभे राहिले
खळे काका समोर उभे राहिले जणू....
<< सई : मला नेहमी वाटतं, ज्ञानेश्वर माऊली उतारवयात खळेकाकांसारखे दिसले असते. मऊ हसणारे, स्निग्ध, अपरंपार शांतीचं तेज असलेले. >> अगदी खळे.... I mean खरे......
मधे दाद यांनी संत नामदेव
मधे दाद यांनी संत नामदेव यांच्या अभंगाबद्दल लिहले होते ज्याचे संगीत खळे काकांचे आहे.
http://www.maayboli.com/node/25457
मला आवडणारा हा अभंग आणि त्यावरचे दाद यांचे विवेचन
अत्यंत आवडते संगीतकार.. लेख
अत्यंत आवडते संगीतकार.. लेख मस्तच जमलाय.
आवडते संगीतकार उत्तम लेख.
आवडते संगीतकार
उत्तम लेख.
आवडला लेख. छान लिहिले आहे.
आवडला लेख. छान लिहिले आहे.
छान लेख. मलाही आवडतं त्यांचं
छान लेख. मलाही आवडतं त्यांचं संगीत.
किंकर यांचा बर्याच दिवसांनी
किंकर यांचा बर्याच दिवसांनी आलेला लेख, आणि तो ही आवडत्या संगीत कारावरील, म्हणजे जणु दुग्ध-शर्करा योगच.
खुप सुंदर उतरला आहे लेख. खळेकाकांना मानाचा मुजरा.
श्रीनिवास खळ्यांसारख्या
श्रीनिवास खळ्यांसारख्या प्रतिभावान संगीतकाराबद्दल लिहून स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल आभार.
अरूण दात्यांकडून पहिले मराठी गाणे कसे मिळवले तो किस्साही गमतीदार आहे. अरूण दात्यांचे गझल गायन ऐकून श्रीनिवास खळ्यांनी त्यांना मराठी गाण्याबद्दल विचारले. मध्य प्रदेशात वाढल्यामुळे अरूण दात्यांना त्यांच्या मराठीबद्दल जरा न्यूनगंड होता. माझे उच्चार मराठी श्रोत्यांना आवडणार नाहीत अशी भीती होती त्यामुळे ते नको म्हणाले. खळ्यांनी त्यांच्या वडिलांकडे म्हणजे रामूभय्या दाते ह्यंच्याकडे वशिला लावला. रामूभय्या दाते हे एक बहुरंगी, रसिक, आतिथ्यशील व्यक्तीमत्त्व. पु. ल. देशपांडे यांचे तुझे आहे तुजपाशी ह्या नाटकातील मुख्य पात्र हे रामूभय्यांना बघून सुचले असे त्यांनीही सांगितले आहे. तर जेव्हा खळे रामूभय्यांकडे रदबदली करायला गेले तेव्हा त्यांनी सांगितले की काळजी करू नका, मी सांगतो त्याला. मग रामूभय्यांनी अरूण दात्यांना दम दिला. इतका मोठा संगीतकार आपणहून तुला विचारतो आहे आणि तू नाही काय म्हणतोयस? वगैरे वगैरे. आणि मग पुढचा इतिहास माहितच आहे.
अरूण दात्यांचे खरे नाव अरविंद आहे. पण घरी अरू म्हणत असल्यामुळे त्यांचे नाव अरूण असावे असा समज झाला आणि रेडियोवर त्यांचे नाव अरूण झाले आणि तेच रूढ झाले. ही देखील (बहुधा) खळ्यांचीच करामत!
जुनी मराठी वा हिंदी गाणी आजही ऐकली जातात. मात्र बर्याचदा निव्वळ त्या गाणार्या गायकाचे वा गायिकेचेच कौतुक होते. संगीतकार व गीतकार फार चर्चिले जात नाहीत. मला वाटते की गाणे यशस्वी होण्यामागे खरे तर संगीतकाराचे श्रेय जास्त महत्त्वाचे असते. एका प्रसिद्ध संगीतकाराचे असे मत होते की गायक कितीही थोर असला तरी संगीतकाराच्या दृष्टीने ते एक वाद्य आहे. खरी प्रतिभा संगीतकाराचीच.
अनेक दिग्गज गायक गायिकांकडून अविस्मरणीय गाणी गाऊन घेणार्या ह्या कलावंताला माझी आदरांजली.
लेख आवडला.
लेख आवडला.
मस्त लेख ! राजस सुकुमार
मस्त लेख ! राजस सुकुमार बद्दलची टिप्पणी एकदम चपखल आहे.
सुरेल लेख. सई, तुझा
सुरेल लेख.
सई, तुझा प्रतिसादही खूप आवडला.
छान आहे लेख .. श्रीनिवास
छान आहे लेख ..
श्रीनिवास खळ्यांच्या संगीतात नेहेमीच वेगळेपण जाणवत आलेलं आहे .. शंकर महादेवन त्यांचा शिष्य हे जेव्हा कळलं तेव्हा अजूनच छान वाटलं ..
शेंडेनक्षत्र अरूण दाते मला फारसे आवडत नाहीत पण किस्सा छान आहे ..
उदय ,मनीमोहर ,दिनेश
उदय ,मनीमोहर ,दिनेश ,AMIT,सुमुक्त्ता ,चिमण ,अतिवास ,शैलजा , धन्यवाद !
सई - संत ज्ञानेश्वर यांचा मोकळ्या केसांचा एक अप्रतिम फोटो असलेली एक दिनदर्शिका पहिली होती. ती व खळे काकांची उतारवयातील मोकळ्या केसांची प्रतिमा यांची तुलना आपले निरीक्षण सार्थ ठरवेल. प्रथम बक्षिसाचे गाणे कोणते होते ते आठवत असेल तर जरूर लिहा .
पुरंदरे शशांक - आपणास 'सूर ऋण म्हणायचे होते का ? आपली ' सूर ऋण ' हि संकल्पना खूपच भावली .
धनवन्ती - खर तर ती खळे यांच्या संगीताची ताकद आहे.
नितीनचंद्र - दाद यांचा लेख पण सुरेख आहे.
मुग्धानंद - शब्दांना न्याय देणारे संगीत देणारा आवडता कलाकार म्हणजे खळे काका . त्यामुळे सुचत गेले सह्जच.
shendenaxatra -अरुण दाते यांचे मन वळवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे साकडे घातले हा किस्सा माहिती नव्हता. सुंदर गाण्यात संगीताचे स्थान सर्वात वरचे हे मात्र खरे आहे.
असामी - राजस सुकुमार आणि सुंदर ते ध्यान या रचना शांत वेळी डोळे मिटून ऐकल्या तर आपण भान विसरून जातो .
सशल - शेंडेनक्षत्र बाबत काही सांगणार का ?
आपणा सर्वांचेच प्रतिसादा करिता मनपूर्वक आभार .
मी वर अरूण दातेंचा किस्सा
मी वर अरूण दातेंचा किस्सा ज्यांनीं लिहीला आहे त्यांनां संबोधून लिहीलं तसं ..
किंकर, खूप आवडला लेख.
किंकर,
खूप आवडला लेख. खळ्यांची गाणी म्हणजे कर्णपुटांत अमृतसिंचन.
कुठल्याश्या मराठी गाण्यांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात कोणीतरी 'नीज माझ्या नंदलाला' गायलं होतं. त्यावर शंकर महादेवन म्हणाले की आम्ही हल्लीचे संगीतकार इतकी उंच पातळी कधीच गाठू शकणार नाही. खरोखरच मोजके शब्द आणि मोजकीच वाद्यं वापरून दिलेली ती लाखमोलाची देणगी आहे.
आ.न.,
-गा.पै.
गा . पै . - श्रीनिवास खळे
गा . पै . - श्रीनिवास खळे यांची गीतातील शब्दांना न्याय चाली देत किमान वाद्ये वापरात संगीत मनाचा ठाव घेणारे देणे हि खासियत होती ,असे मला नेहमीच वाटते .
पुरंदरे शशांक - आपणास 'सूर ऋण
पुरंदरे शशांक - आपणास 'सूर ऋण म्हणायचे होते का ? आपली ' सूर ऋण ' हि संकल्पना खूपच भावली . >>>> येस्स - अग्दी नेमका शब्द ....
खरोखरच मोजके शब्द आणि मोजकीच वाद्यं वापरून दिलेली ती लाखमोलाची देणगी आहे. >>>>> +१००
लेख फारच आवडला. "सहानभूती हा
लेख फारच आवडला.
"सहानभूती हा शब्द सह + अनुभूती या अर्थाने म्हणजेच आपल्या मनातील अनुभूती सह स्वरांना सूर देणारा संगीतकार" >>>>>>> +१११११
"सौ खळे यांनी त्यावेळी दाखवलेल्या धैर्या मुळे संगीत क्षेत्राचे होणारे अपरिमित नुकसान टळले , त्यासाठी संपूर्ण संगीत क्षेत्र आजही त्यांचे ऋणी आहे.">>>>>>>> +१११११११
पुरंदरे शशांक आणि स्वीट टॉकर
पुरंदरे शशांक आणि स्वीट टॉकर - प्रतिक्रिये करिता धन्यवाद
सुरेख लेख, किंकर. श्रीनिवास
सुरेख लेख, किंकर. श्रीनिवास खळे ... अद्वितिय संगीतकार. संगीतकाराला शब्दं-सूर आणि लय ह्यांचं एकमेकांशी नातं.. त्यांचं नांदणं... त्याचा फुलोर हा.. आधी दृश्यमान व्हावा लागतो. मग ते त्या गीताच्या संगीतात घडतं.
कालांतराने एखाद्या स्थापत्य काराची स्वतःची अशी छाप असावी तशी होऊ लागते.
माझ्यामते खळे ह्यांनी प्रत्य्क गाण्यासाठी इतका स्वतंत्र विचार केलाय की... कुठलही गाणं हे खळ्यांचं गाणं एव्हढ्यासाठी म्हणता येतं कारण... इतकं गाण्याचं स्वभावमान संगीत फक्तं तेच देऊ शकतात.
हे मला स्तिमित करतं.
लेखात आलेले गाणं ऐकणार्याच्या मनाच्या उअंबरठ्यावर नेऊन दार ठोठावणरे गुण-विशेष आहेतच...
पण गाण्यावर त्यांची छाप म्हणजे काय ते मला अजून ठरवता आलेलं नाहीये.. तरीही एखादं त्यांचं न ऐकलेलं गाणं ऐकलं तर ते 'त्यांचं' म्हणून ओळखू शकते..
कारण एकच.... त्या गाण्याला त्यांनी एक स्वतंत्रं व्यक्तित्वं बहाल केलेलं असतं... त्यांच्याच दुसर्या गाण्याची त्यावर इतकीही सावली नाही.
देव एकासारखं दुसरं माणूस बनवत नाही. खळेकाकांसारख्यांसाठी तर त्याने खास मेहनत घेतली. अन आपल्या सृजन कलेतलं दान त्यांच्या ओटीत टाकलं...
आपण सामान्यजन धन्यं... खळेकाकांनी त्यांच्यातलं देवत्वं असं जोपासलं.
इतक्या सुंदर लेखासाठी शतशः धन्यवाद, किंकर.
दाद - काय म्हणू प्रतिसादासाठी
दाद -
काय म्हणू प्रतिसादासाठी ? यापूर्वी सुमारे दोन वर्षांपुर्वी कवी ग्रेस यांच्या एकाह्त्तराव्या वाढदिवशी ' मराठी काव्यातील माणिक ' असा त्यांचा आदरभाव करणारा लेख - http://www.maayboli.com/node/25636 लिहला होता . त्यावर आलेल्या प्रतिक्रिया जशा उत्स्फूर्त होत्या त्यांची आठवण करणारी अशी आपली प्रतिक्रिया भावली .
'गानभूल' मधून आपण एकेक गाणे संपूर्ण लेखाचा सहज सुंदर विषय बनवू शकता, तिथे एका प्रतीभा संपन्न संगीतकारा विषयी प्रतिसाद काय स्वतंत्र परामर्श जरी आपणा कडून आला तरी तो नक्कीच आनंददायी असेल. खूपच आवडली आपली प्रतिक्रिया . धन्यवाद .
खळेसाहेबांवरचा लेख
खळेसाहेबांवरचा लेख आवडला.....मराठी सुगम संगीत-दिग्दर्शकांची परंपरा खूप मोठी आहे....त्यातलेच एक खळेसाहेब...माझ्या आवडत्या संगीतकारांपैकी एक.
मध्यंतरी मी माझ्या जालनिशीवर लिहिण्यासाठी माझ्याच काही आवडत्या मराठी संगीतकारांची माहिती जमवली होती...त्यात खळेसाहेबांचाही समावेश होताच...हा लेख वाचतांना पुन्हा त्या संगीतमय आठवणी जाग्या झाल्या...
धन्यवाद किंकरसाहेब!
प्रमोद देव - आपल्या संगीतमय
प्रमोद देव - आपल्या संगीतमय आठवणी आपणास आनंद देवून गेल्या खरच तीच तर ताकद आहे खळे यांच्या संगीतात . धन्यवाद !