१० मे ... एक्काहत्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सौ.सुमित्रा आणि श्री.सीताराम गोडघाटे,या दांपत्याचे पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले. भविष्यात एखाद्या क्षेत्रात हे मुल हिऱ्याप्रमाणे चमकून उठेल याची पुसटशी कल्पना नसताना,त्यांनी त्याचे नाव 'माणिक' असे ठेवले. पुढे वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्यावर्षी हे झाकले माणिक,खरोखरच कोहिनूर हिऱ्या प्रमाणे चमकून उठले. 'संध्याकाळच्या कविता' या गूढ गंभीर काव्य रचनेतून ते जगासमोर आले.अर्थात इतक्या माहिती नंतर देखील आपल्या मनीचे गूढ नाही ना संपले.कारण ते जगासाठी ते माणिक सीताराम गोडघाटे या नावानी लिहिते झाले नाहीत. त्यांच्या कविता तरल,गूढ गंभीर आणि आडनावाप्रमाणे गोडघाटणीच्या असल्या तरी त्यांनी लिह्ण्याकरिता घेतलेले नाव आहे 'ग्रेस'. माणिक हे पाळण्यातील नाव असले तरी ते लिहिते झाले ग्रेस या पूर्णतः ग्रेसफुल शीर्षकाने .
ती गेली तेंव्हा रिमझिम, पाऊस निनादात होता... किंवा
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते... या रचनांनी आज मनामनात प्रतिभावंत म्हणून नोंदलेले कवी ग्रेस त्यांचा ७१वा वाढदिवस दिनांक दहा मे रोजी साजरा करीत आहेत.त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांना मानाचा मुजरा देत समस्त रसिकाच्या वतीने जीवेत शरद शतम! अशी ईश्वर चरणी प्रार्थना करीत मी त्यांना दीर्घायुष चिंतितो.
प्रकाश जळतो हळू हळू कि चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दुखः सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका..
या ओळीतून जिथे कवीस प्रकाशाच्या उजळण्याच्या जागी प्रकाशाचे जळणे दिसते. किंवा निबिड अरण्यातील अनेक पावसात भिजून ,हिरवा कच्च शेवाळलेला वृक्ष जणू मूकपणेच त्या रंगाचा स्वीकार करीत आहे. आणि नेणिवेच्या जाणीवेतून आयुष्याच्या क्षितिजावर सुख दुःखाकडे तटस्थतेने पाहणारा मेघ आपोआपच परका वाटू लागतो
या आणि अशा अनेक अर्थपूर्ण कविता देताना या कवीने गूढता,दुर्बोधता याकडे खऱ्या अर्थाने पाहण्यास शिकवले.कवीता समजणे आणि कविता उलगडणे यातील अन्तर जर तुम्हास कमी करता येणार असेल तरच तुम्ही ग्रेस समजून घेवू शकाल.अर्थात स्वतः कवी ग्रेस यांनी त्यांच्यावर बसलेल्या दुर्बोध कवितांचा जनक या शिक्याची कधीच पर्वा केली नाही. या उलट स्वतःमधील आणि कवितेतील गूढता आणि इतरांना वाटणारी दुर्बोधता जपताना त्यांनी भरभरून बोलत, त्यांच्या 'ती गेली तेंव्हा..'या सुप्रसिद्ध कवितेचे विश्लेषण अपुर्वतेने केले आहे त्यासाठी हि लींक आपण वेळ काढून जरूर ऐका-• ग्रेस - अ थॉटफूल पोएट - डॉक्युमेंटरी - ६० मिनीटे
http://www.youtube.com/watch?v=SDBaLQgPYvw
सदर फिल्मच्या शीर्षकात ग्रेस यांना विचारवंत कवी असे संबोधले आहे.पण त्यांच्या कविता वाचयला लागले कि, प्रतिभावान कवीच्या अंतर्मुख करणाऱ्या प्रगल्भ रचना असे त्यांच्या कवितेस संबोधावे वाटते.कविमन कविता साकारताना वेगवेगळ्या रचनांमधून स्वतःला उलगडून सांगत असते असे मानतात. पण खराखुरा प्रतिभावान कवी स्वानुभावापेक्षा भावानुभव नेहमीच प्रभावी पणे मांडत असतो. कवी ग्रेस म्हणजे या कलाविष्काराचे मूर्तिमंत उदाहरण आहे.त्यामुळेच ऐन तारुण्यात हा कवी 'संध्याकालीन' रचनांतून तरलतेने उलगडत जातो.दिवसाच्या विविध कालपर्वतील सर्वाधिक गूढ वेळ म्हणजे कातरवेळ-सायंकाळ आणि या कवीची सर्वाधिक आवडती वेळ हीच आहे त्यामुळे -
संध्याकाळच्या कविता -१९६७(कवितासंग्रह)
चंद्रमाधवीचे प्रदेश - १९७७(कवितासंग्रह)
सांध्यपर्वातील वैष्णवी - १९९५(कवितासंग्रह)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - २०००(ललित लेख संग्रह)
सांजभयाच्या साजणी -२००६ (कवितासंग्रह) यासारखे प्रमुख काव्य व लिखाण या गूढ अशा सांजवेळेशी निगडीत झाले आहे.
या कवीस समजून घेणे हे एक आव्हानच ठरेल. आणि असे आव्हान पेलणे कठीण झाले कि, तथाकथित समीक्षक पटकन त्याच्यावर दुर्बोध हा शिक्का मारून रिकामे होतात. माझ्या दृष्टीने कवी ग्रेस हे दुर्बोध नसून एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे.त्यामुळे केवळ काव्य रचनेत नाही तर ललित लेखातून व्यक्त होणे असो किंवा एखाद्या पुस्तकाची अर्पण पत्रिका असो, त्यांच्या शीर्षकातच वाचकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद आहे.त्यामुळे -
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - -हत्तीच्या डोळ्यांतील पाणी निकराने मागे परतविणार्या एका मुंगीस...
मितवा : ...अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना.
वार्याने हलते रान : हे तुमचे तुम्हांलाच अर्पण करतोय... ...(स्वाक्षरीखाली ’अस्तपर्वाच्या प्रारंभकाळी’ असा सूचक उल्लेख)
यासारखी विचार मग्न वृत्ती फुलवणारी शीर्षके ललित संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते सहजतेने वापरतात.
नागपूरच्या दाहक हवेत वाढताना माणूस,उन्हाने करपला तरी वृतीने शीतल राहत असावा.त्यामुळेच कवी सुरेश भट काय किंवा कवी ग्रेस काय हे संध्याकाळच्या गुढते बरोबर त्यातील अनाकलनीय नजाकत टिपताना दिसतात.
सुफी काव्य प्रकार हा ग्रेस यांना मनापासून भावलेला काव्यप्रकार त्यांनी त्यावर मनपूर्वक प्रेम केले.आपण जर या सुफी काव्य प्रकारच्या उत्त्पती बाबतचे हे वाक्य वाचले -
The word ‘Sufi’ is derived from the Arabic word ’suf’ which means wool. Sufi songs resembles a path of devotion and love which leads to none other than God himself. A person can strives towards intimate knowledge or communion with God through listening to Sufi Songs. तर या मनस्वी वृत्तीच्या माणसाचे या काव्य प्रकारावर का प्रेम होते ते आपोआप स्पष्ट होते.
या कवीला संध्यासूक्तांचा यात्रिक असे संबोधतात. मला वाटते कि कातर वेळेस जेंव्हा दिवस संपून पूर्ण अंधार होण्यापूर्वी जी धूसर वेळ असते ना ती मन अगतिक करणारी भावविवश वेळ. ती वेळ हि सर्वाधिक आभासी वेळ. या वेळेवर या कवीने मनस्वी प्रेम केले म्हणूनच या श्रेष्ठ कवीच्या रचना म्हणजे अक्षरशः अभासातील भास वाटतात.कारण ओळी त्याच पण प्रत्येकासाठी भिन्न अनुभूती देणाऱ्या.किती म्हणून आणि काय काय घ्यायचे ....
म्हणूनच त्यांच्याच- ' ती गेली तेंव्हा ..'या प्रसिद्ध रचनेतील -
तशी सांजही आमुच्या दारी, येवून थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा, अर्थातून शब्द वगळता....
या ओळीवर थबकत मी शेवटी इतकेच म्हणतो कि-
मोत्यातून शोधण्या 'माणिक' मी रत्नपारखी झालो
शब्दात गवसता अर्थ मी अर्थ पारखा झालो ....
उत्तम लेख. शाळेत असताना काही
उत्तम लेख. शाळेत असताना काही कविता होत्या. लेख खुपच आवड्ला.
दु:खाचा महाकवी.. छान लिहीलय.
दु:खाचा महाकवी..
छान लिहीलय.
व्वा.. ग्रेट.. भारी लिहिलय..
व्वा.. ग्रेट.. भारी लिहिलय..
ग्रेसच्या कित्येक ओळी मनात रुतून बसल्यात...
वार्याने हलते रान अप्रतिम आहे.. किंबहुना हृदयनाथांनी चाली लावलेल्या सगळ्याच रचना काळजाचा ठाव घेत जातात. ग्रेस वाचला नव्हता, वाचनात यायला खूप वेळ होता अशा काळात म्हणजे मी अगदी ९-१० वर्षांची असल्यापासून ग्रेस-हृदयनाथ जोडीची निवडुंगची गाणी आणि महाश्वेताचं शीर्षक गीत 'भय इथले..' काळजातला सल बनलीयेत. त्यावेळी अर्थ उलगडायचं माहिती नव्हतंच पण सूरांची जादू अफाट होती. वार्याने हलते रान असो, घर थकलेले संन्यासी असो किंवा ती गेली तेव्हा असो.. न उमजणारं पण जाणवणारं दु:ख तेव्हापासूनचं. पुढे कॉलेजला गेल्यावरच ग्रेस वाचनात आले. त्यांना आपण वाचू शकत नाही फक्त भोगु शकतो..
इतक्या छान लेखाबद्दल अभिनंदन..!
हं! चांगला लेख! हे वाचून लगेच
हं! चांगला लेख! हे वाचून लगेच फोन केला त्यांना! 'आज'ही ते 'तसे'च होते.
-'बेफिकीर'!
"माणिक" वर लिहितानाही
"माणिक" वर लिहितानाही अक्षरांनाही तसाच मोलाचा मान देणे गरजेचे आहे हे निर्विवादपणे कथन करणारे उदाहरण म्हणजे श्री.किंकर यांचा हा लेख ! आज वयाच्या ७१ व्या वर्षीही तितक्याच तरलतेने काव्यावर लिहिणारे बोलणारे ग्रेस मराठी भाषेचे सर्वार्थाने माणिक आहेत. काव्य असो वा ललित लेखन त्यांच्या लेखनाला एक पूर्ण अर्थाकृतिबंध लाभला आहे, ज्याला तो समजला तो धन्य, ज्याला तो समजावा असे वाटते ते त्याच प्रयत्नात राहू इच्छितात हे ग्रेस यांच्या कवितेचे आगळे गमक. "मला ग्रेस पूर्ण कळला" असे खुद्द माणिक गोडघाटेही म्हणत नसतील इतके गूढ आणि मिथक स्वरूपाचे त्यांचे साहित्य आहे. ते रसिकमनाला गोंजारत नाही तसेच वाचकाचा अनुनयही करत नाहीत. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द संवादाचं साधन या अर्थान संस्कृतीच्या कुठल्याही घटकाशी वा जगाशी निगडित राहिलाच पाहिजे असे कवी कधीही म्हणत नाही. 'ग्रेस का आवडतात' याहीपेक्षा 'ग्रेस कशासाठी आवडतात' हे ज्यावेळी वाचक सांगू शकेल त्याचवेळी हा शब्दप्रभू काही प्रमाणात आपल्याशी सुखसंवाद साधू शकला असेच म्हणावे लागेल.
'शब्द' त्यांच्यावर फिदा आहेत, ते त्यांच्या अवतीभवती थुईथुई कारंज्यासम बागडतात आणि एका जादूच्या क्षणी ग्रेस विलक्षण मोहकपणे लिहून जातात :
"क्षितिजास समजले गाणे
तव देह स्वरांचे लेणे
तळहात मंद
तळपाय छंद;
जान्हवी घेत की वळणे..."
हे क्षितिजास समजणे लौकिकार्थाने कोणत्याही व्याख्येतील असो, वाचकाच्या दृष्टीने त्या शब्दाची प्रत्येक छटा स्वराचे लेणेच करून टाकतात ग्रेस. काही अंधूक सूचकता असलेल्या अनेकविध घटकांच्या एकत्रितपणा आपल्या मनावर असा काही परिणाम करून सोडतात की कोणत्या अर्थाची गूढता मला समजली किंवा समजली नाही याच विभ्रमात वाचक गुंगून जातो. जी कविता खरी कविता असली तरी ती कळण्याआधी 'जाणवली' पाहिजे असे समीक्षक मानतात. तसे जाणवण्यासाठी वाचकला जी यातायात करावी लागते तिचा सर्वांगसुंदर आनंद ग्रेस यांच्या कविततूनच मिळत राहील.
ग्रेस यांची कोणतीही कविता 'निर्माण' होऊन चमकण्याचा एक क्षण असतो. त्यानी कविता लिहिली आणि (निदान त्यांच्यापुरता तरी) निर्मितीचा क्षण पूर्ण झाला. परंतु वाचकाच्या दृष्टीने 'पहिल्याच' वाचनात तो चमकण्याचा क्षण येईल (च) असे नाही, त्यासाठी ग्रेसची पारायणे करावी लागतात. पण या कृतीत त्याला आनंदाचे जे क्षण भेटतात ते बहुपेडी असतात आणि केव्हातरी त्याला त्या एरव्ही दुर्बोध वाटू शकणार्या कवितेतील मर्म जाणवते. ही ग्रेसच्या कवितेचे शक्तीस्थान. रसिकही 'मी ग्रेस किती वाचला' यापेक्षा 'मला ग्रेस किता समजला' या द्वंद्वातच रममाण होऊन जातो.
फार सुंदर आहे हा विषय आणि यावर वर झालेले लिखाण तसेच मी मुक्ता यांचा प्रतिसादही त्याच तोलाचा आहे.
ग्रेस याना दीर्घायुरारोग्य चिंतित असतानाच श्री.किंकर यांचे या समयोचित आणि तितक्याच देखण्या लेखाबद्दल अभिनंदन करणे अगत्याचे आहे.
प्रतीक.. आता तुम्हीच एक लेख
प्रतीक.. आता तुम्हीच एक लेख लिहायला घ्या.. म्हणजे घ्या च.. आग्रहाचं सांगणं..
रहावत नाहीये.. ही एक अशक्य
रहावत नाहीये.. ही एक अशक्य सुंदर कलाकृती आहे.. शब्द, सूर दोन्ही..
--------------------------------------------------------------
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे..
शब्द – ग्रेस
संगीत –श्रीधर फ़डके
-------------------------------------------------------------
यातले पण सूर असे एकामागोमाग एक काळजावर वार होत असल्यासारखे..
किंकर, अप्रतिम लेख. प्रतीक
किंकर, अप्रतिम लेख. प्रतीक देसाईंचा प्रतिसादही सुंदर.
संध्याकाळच्या कविता मध्ये आरंभी या ओळी आहेत, बहुधा त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात.
क्षितिज जसे दिसते
तशी म्हणावी गाणी
.....
.....
गाय जशी हंबरते
तसेच व्याकुळ व्हावे
....
त्यांच्या कविता वाचताना अगदी हीच भावना होते. क्षितिजासारखे सुंदर, हाती न येणारे विभ्रम आणि व्याकूळ करणारे शब्द.
तसेच त्यांच्याच हस्ताक्षरातली इन्ग्रिड बर्गमनच्या नावे अर्पणपत्रिका.
.
.
मुक्ता, प्रताधिकार भयास्तव
मुक्ता, प्रताधिकार भयास्तव पूर्ण ओळी लिहिल्या नव्हत्या
सगळेच सुंदर नी वाचनीय..
सगळेच सुंदर नी वाचनीय..
भरत.. ओह.. मग एडीट करु का
भरत.. ओह.. मग एडीट करु का माझे प्रतिसाद.. असं पण चालत नाही का?
मला हे माहिती नव्हतं..
भरत मयेकर यानी उल्लेखलेला
भरत मयेकर यानी उल्लेखलेला 'इन्ग्रिड बर्गमन' चा उल्लेख सुखावह आहे. कविता आणि इन्ग्रिड बर्गमन या दोन गोष्टी ग्रेस आणि जी.ए.कुलकर्णी या दोन शब्द-जादुगारांना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरल्या.
'इन्ग्रिड बर्गमन' ही समकालिन प्रतिमाच एक सुंदर आणि काव्यात्मक शिल्प असल्याने दोन्ही कविमनाच्या व्यक्तींना त्या धाग्याने गुंफवून टाकणे यात आश्चर्य नव्हते.
ग्रेस वाचलेले नाहीत... तरीही,
ग्रेस वाचलेले नाहीत... तरीही, वर मुक्ताने सांगितलेल्या कविता लहानपणापासून अगदी आत पोहोचल्या आहेत कायमच्या... माबोकर झाड याबद्दल अधिक छान बोलू शकेल..
अभिनंदन किंकर... छान लेख!
सुंदर लेख आणि तितक्याच सुंदर
सुंदर लेख आणि तितक्याच सुंदर प्रतिक्रिया..!

ग्रेसांच्या कविता किती वाचल्या..समजल्या आहेत यापेक्षा ग्रेस माझ्यापर्यंत किती आणि कसे 'पोचले' आहेत याचा तुम्हा आम्हाला होणारा समान आनंद आज त्यांच्याच वाढदिवशी आपल्याला एकत्र बांधून आहे ही अशक्य सुंदर बाब!! ग्रेसांना दीर्घायुष्य लाभो!!
आनंदयात्री, 'ग्रेस' ह्या विषयावर लिहायची माझी क्षमता आणि व्यासंग दोन्ही नाही, पण त्यांच्या कवितांनी मला काय दिलं हे शब्दांकित करायला मला नक्कीच आवडेल.
किंकर, तुमचे खूप खूप अभिनंदन हा सुंदर लेख दिल्याबद्दल!!
सुरेख लेख!
सुरेख लेख!
चैत्रा,सांजसंध्या, भरत मयेकर
चैत्रा,सांजसंध्या, भरत मयेकर ,साधना, आनंदयात्री, झाड, स्वाती२,बेफिकीर,
आपणा सर्वांचे मनोमन आभार.
भरतजी, बेफिकीरजी आपल्या प्रतिसादाने मन भरून आले.
बेफिकीरजी सर्व रसिकांचे प्रतिनिधित्व करीत, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा ग्रेसजींच्या पर्यंत पोहचवल्यात,
त्यासाठी शतशः धन्यवाद!
मी मुक्ता आपल्या लेखनशैलीतील ताकदीने मला थोडेफार लिहते केले.
प्रतिसाद देताना आपले अंतर्मुख होणे मनास भावले.
प्रतिक देसाईजी आपण लेखापेक्षा अधिक सुंदर त्यावर प्रतिसाद देत सर्वच रसिकांची मने जिंकली आहेत.
'शब्द' त्यांच्यावर फिदा आहेत, ते त्यांच्या अवतीभवती थुईथुई कारंज्यासम बागडतात आणि एका जादूच्या क्षणी ग्रेस विलक्षण मोहकपणे लिहून जातात
हे आपले शब्दच प्रतिसादातील भारलेपण उलगडून सांगत आहेत.
मी मुक्ता यांनी म्हटल्या प्रमाणे आपणही आम्हास काही वाचनाभूतीचा आनंद देणे.
परत एकदा सर्वांचेच आभार!
बेफिकीरजी सर्व रसिकांचे
बेफिकीरजी सर्व रसिकांचे प्रतिनिधित्व करीत,
अहो पण त्यांना मराठी कविता आवडत नाहीत!! त्यांच्या मते मराठीत चांगल्या कविता नसतातच, म्हणून तर त्यांच्या रसिक मनाला उर्दू गझलांकडे वळावे लागले.
असो. कदाचित् त्यांनी मराठी कवितांचा अभ्यास केलाच नसावा. नाहीतर इतक्या काही वाईट नसतात मराठी कविता.
महाराष्ट्र टाइम्सच्या
महाराष्ट्र टाइम्सच्या यंदाच्या दिवाळी अंकात रामदास भटकळांचा तेजस्विनी हा १९६५ मधला लेख पुन्हा प्रकाशित केला गेला आहे. ग्रेसना आपला कवितासंग्रह इन्ग्रिड बर्गमनला अर्पण करायचा होता, त्यासाठी परवानगी (आणि तिची स्वाक्षरी असलेले छायाचित्र) मिळवण्यासाठी भटकळांनी घेतलेल्या इन्ग्रिडच्या भेटीचे वर्णन आहे.
श्री भरतजी महाराष्ट्र टाईम्स
श्री भरतजी
महाराष्ट्र टाईम्स सदर लेख मिळवून नक्की वाचेन. आपल्या सुचनेकरता धन्यवाद !
सुरेख लेख. आवडला धन्यवाद
सुरेख लेख. आवडला
धन्यवाद किंकर.
आरतीजी , अभिप्रयाकरिता
आरतीजी ,
अभिप्रयाकरिता मनपूर्वक धन्यवाद !
ग्रेस यांच्या साहित्यावर
ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित "साजणवेळा" या कार्यक्रमाचे रुपांतर मी बोलक्या पुस्तकात (audiobook) केले आहे. "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात हे बोलके पुस्तक अॅपल आयफोन तसेच आयपॅड स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
जरुर पहा...
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-1/id586514412?mt=8
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-2/id586568619?mt=8