पैसोबा पुराण

Submitted by निमिष_सोनार on 29 April, 2015 - 01:31

माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण-
माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने!
पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्‍या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने!
पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!

Group content visibility: 
Public - accessible to all site users