मी आणि कुमार सप्तर्षी

Submitted by नितीनचंद्र on 27 April, 2015 - 04:31

कुमार सप्तर्षींचा आणि माझा अनेक वर्षांचा परिचय आहे असे नाही. माझ्या आयुष्यात त्यांना मी दोन वेळा भेटलो. प्रसंग अत्यंत खाजगी. सुरवातीला जी त्यांच्या विषयीची जळमटे मनात होती ती या दोन भेटीत अगदी पुसली गेली. फार वेळा भेट झाली असती तर माझे परिवर्तन झाले असते इतके लोभस व्यक्तीमत्व डॉ कुमार सप्तर्षी आहेत यात शंका नाही.

कुमार सप्तर्षींना आणि त्याच बरोबर कै. मधु लिमये यांना जनता पक्ष फोडणारे समजले जाते. त्याकाळात या दोघांविषयी वर्तमान पेपरात वाचले होते. मी फक्त १५-१६ वर्षांचा होतो.

१९७५ ते १९७७ काळात काही भुमिगत संघ कार्यकर्ते गुपचुप वडीलांना भेटत आणि त्यामुळे वडील पक्के काँग्रेसविरोधी आहेत हे समजले होते. पण ते नेमके कोणत्या विचाराचे आहेत हे मात्र समजत नव्हते. समाजवादी आणि संघ या दोन्ही विचारांचे त्यांना मित्र होते.

जनता पक्षाचे सरकार आले आणि पुण्यात बहुदा युवा जनता पक्षाचे अधिवेशन सुरु होते. यात दुहेरी निष्ठा नावाचे प्रकरण सुरु झाले. जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघाचे सदस्यत्व सोडावे. इ. विचार त्यावेळेचे आमदार कुमार सप्तर्षी यांनी पुण्याच्या अधिवेशनात आणले. याबाबतच्या पुस्तीका सुध्दा त्यांनी विक्रीला ठेवल्या होत्या.

या अधिवेशनात बराच गोंधळ होऊन त्यांची ही भुमिका पुढे कै मधु लिमये यांनी केंद्रीय कार्यकारीणीत लाऊन घरली. आधीच इंदीरा गांधीच्या अटकेने बदनाम झालेले केंद्र सरकार या वादाने दुबळे झाले. पुढे याचे पर्यवसान जनता पक्षाच्या फुटीत होऊन केंद्रातले सरकार अल्पायुषी ठरले.

आमच्या घरी त्यावेळी दै तरुण भारत येत असे. यात प्रा. शरद वाघ आजचे दै. सकाळ मधले ढांग ढिंग सदर चालवतात तसे विनोदी सदर चालवायचे.

त्या सदरात त्यांनी एक कविता लिहली होती ती आजही स्मरते.

पक्षफुटीचे सोने लुटुनी
कुमार परतोनी आला ( कुमार म्हणजे डॉ. कुमार सप्तर्षी)
बहीण शांती आनंदाने ( शांती नाईक नावाच्या एक महिला शिवाजीनगर पुणे मधुन आमदार झाल्या होत्या )
आनंदाने ओवाळी मग त्याला

त्या नंतरच्या निवडणुकात नवनिर्वाचीत भाजपच्या स्टेजवरुन खास टोले कुमार सप्तर्षींना पडले. पुण्यात हे टोले लगावण्यात डॉ. प्रतिभा लोखंडे अग्रेसर होत्या.

योगायोगाने कुमारांच्या घरच्या लग्नात मी आणि माझा शेजारी मुलीच्या बाजुचे नातेवाईक होतो. त्यांनी अण्णा जोशी आणि योगायोगाने पुण्यात उपलब्ध असल्यामुळे आजच्या लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लग्नाला बोलावले होते. मुलीच्या बाजुने आमच्या परिचीत डॉ प्रतिभा लोखंडे होत्या. जेवायला एकत्रच बसल्यावर डॉ प्रतिभा लोखंडे यांनी विषय काढला. तुम्ही बहुतेक संधी घेऊन मला फटकारणार असे वाटले होते ?

यावर डॉ कुमारांनी तो विषय हसण्यावारी नेला. त्यांच्यावर टीका करणारी भाजपची मंडळी समोर असताना गप्पा मात्र आपुलकीच्या होत्या. कुठेही द्वेष , मत्सर याला थारा नव्हता.

प्रत्येक चर्चेला संघ विचारावर किमान एकदा जाहीर टीका करणारे कुमार वैयक्तीक जीवनात अनेक भाजप नेत्यांशी चांगले संबंध राखुन आहेत हे पाहुन कमालीचे आश्चर्य वाटले.

माझी आणि डॉ कुमार सप्तर्षींची भेट अजुन एक भेट साधारण आठ वर्षांपुर्वी झाली. निमित्त होते माझ्या मावसभावाच्या लग्नाचे. त्याची पत्नी डॉक्टर कुमार सप्तर्षींशींची मावसबहीण आहे. या निमीत्ताने डॉ सप्तर्षींना अजुन जवळुन भेटण्याचा योग आला. या लग्नात जेम तेम १५० लोक होते. आम्ही पुण्याहुन तर मावसभावाचे वर्‍हाड मुंबईहुन अहमदनगरला आलेले होते.

डॉक्टर साहेब दिसताच मी त्यांना अभिवादन केले आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. विषय होता सत्तेत सहभागी झाल्यावर भ्रष्ट होणार्‍या राजकीय नेत्यांचा. कुमार साहेब या विषयावर समरसुन बोलत होते. अनेक जेष्ठांशी झालेल्या चर्चेचा आढावा घेत कायम एक नविन कार्यकर्त्यांची फळी राजकारणात यावी यावर आग्रही होते.
"दुधाच दही बनल की त्याच पुन्हा दुध होत नाही. " हे त्या दिवसाच त्यांच महत्वाच वाक्य अजुनही लक्षात आहे.

प्रत्येक राजकीय संघटनेच्या मागे एक वैचारीक संघटना असावी का ? या प्रश्नावर दुजोरा देत ते म्हणाले की नक्कीच हवी. भ्रष्ट झालेले कार्यकर्ते बाजुला सारुन नविन कार्यकर्ते संघटनेला देता यावेत यावर ते आग्रही होते.

एक काळ आपल्या वाणीने लोकांना मंत्रमुग्ध करणारा. जनता पक्षावर वैचारिक वर्चस्व ठेवणारा नेता प्रत्यक्ष जीवनात मात्र अत्यंत साधा आणि खराखुरा समाजवादी असल्याने मला भावला.

त्यांच्या पुण्याच्या घरावर झालेला हल्ला ही कटु आठवण सुध्दा अत्यंत सहज शब्दात " हे घडतेच, आम्ही शाब्दीक विरोध करतो ते मात्र दगडफेक करतात. समाजात ही वैचारीक दरी जो पर्यंत लोकशाही पक्व होत नाही तोवर असणार " इतक्या मोजक्या शब्दात त्यांनी वर्णन केली. कुठेही कुठल्या संघटनेला व्यक्तीला यासाठी जबाबदार न धरता सार्वजनिक जीवनातले प्रसंग सहजतेने घेणारा नेता विरळाच.

नुकताच त्यांना डॉ पतंगराव कदमांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या निमीत्ताने कधी काळी झालेल्या गप्पांची ही आठवण.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख ..
प्रत्येक चर्चेला संघ विचारावर किमान एकदा जाहीर टीका करणारे कुमार वैयक्तीक जीवनात अनेक भाजप नेत्यांशी चांगले संबंध राखुन आहेत. >>>>>>......
यातच तर मोठ्यांचे मोठेपण आणि खुज्यांचे खुजेपण दिसून येते..

डॉ सप्तर्षी हे उत्तम समाजमानस जाणणारे कार्यकर्ते आहेत. अ‍ॅकॅडमिस्ट व अ‍ॅक्टीव्हिस्ट यांचा एक सुरेख संगम त्यांच्याकडे आहे. कोथरुड मधील गांधीभवन हे समाजाच्या प्रवाहात आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

नितीनचंद्र,

चांगला लेख आहे. प्रत्यक्षात ही माणसं वागायला अतिशय सद्वर्तनी, मनमिळाऊ असतात. पण वैचारिक भूमिका घ्यायची म्हंटलं की अंगात काय भूत संचारतं कोण जाणे. डावी चळवळ वैचारिकदृष्ट्या अत्यंत तकलादू पायावर उभी आहे हे सत्य मुळातून समजून घेतलं जात नाही! मग उरतो तो केवळ वैचारिक मुखवटा. तो फेकून दिलेला पाहायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

लेख वाचला.महाभारतातील " शत्रुशी लढतांना आपण एकशे पाच , घरात मात्र शंभर आणि पाच " असे व्हावयास त्यावेळी हवे होते. कधी नव्हे ती काँग्रेस पार्टी , सत्तेबाहेर फेकली गेली होती, अशावेळी , अंतर्गत वाद उकरून काढून , काय मिळविले ह्या प्रश्नाचे उत्तर , किमान स्वतःशी तरी मिळविण्याचा प्रयत्न मधु लिमये वा कुमार सप्तर्षी यांनी केला असता , तर हाती भोपळा च आला असता , असे आम्हास अजुनही वाटते. जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी , संघाचे सदस्यत्व सोडावे , असा आग्रह धरणारे , हे काही मूळ जनता पक्षाचे नव्हतेच. तेही इकडून तिकडून ' आयात ' केलेले च होते ना ? मग संघाच्याच बाबतीत हा दुराग्रह का करण्यात आला , हेच अनाकलनीय आहे. जनता सरकार किमान पाच वर्षे टिकविले असते, तर पुन्हा सत्तेवर येण्याची काँग्रेसला संधी मिळणे नाही म्हटले तर जडच गेले असते.

जयंतजी,

जनता पक्ष हा आता इतिहास आहे. आजही संघा संबंधीचे डॉ कुमार सप्तर्षी यांचे विचार टोकाचे आहेत इतकच नव्हे तर संधी मिळेल तेव्हा त्यावर टोकाचे बोलायला ते सोडत नाहीत.

मध्यंतरी, डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉ पानसरे यांच्या हत्येच्या मागे संघ विचाराचे लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे दुरदर्शनच्या एका वाहिनीवरुन डॉक्टर कुमार सप्तर्षी बोलले होते.

हा मानवी स्वभाव जर सोडला तर लोकनेता कसा असावा याचा मात्र ते वस्तुपाठ आहेत. त्यांचा संघर्ष विचारांशी आहे. ते वैयक्तीक टीका करत नाहीत. दुसर्‍याला वैयक्तीक हीन लेखत नाहीत. हा संयम प्रत्येक समाजवादी नेता बहुतेक करुन पाळतो असे माझे मत आहे.

नितीनचंद्र,

>> मध्यंतरी, डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉ पानसरे यांच्या हत्येच्या मागे संघ विचाराचे लोक असण्याची शक्यता
>> नाकारता येत नाही असे दुरदर्शनच्या एका वाहिनीवरुन डॉक्टर कुमार सप्तर्षी बोलले होते.

केरळातला कॉम्रेड मणीने स्वत:च्याच कम्युनिस्ट पक्षातल्या शत्रूंच्या हत्या केल्याची कबुली दिली (वा बढाई मारली) आहे. मग सप्तर्षींनी कम्युनिस्ट पक्षाचं नाव का घेतलं नाही गोविंदरावांच्या हत्येसंदर्भात? हीच का ती त्यांची सुप्रसिद्ध वैचारिक लढाई? नेमक्या अशा वागण्यामुळे ते स्वत:ची विश्वासार्हता घालवून बसतात. वाईट वाटतं, पण नाईलाज आहे. Sad

आ.न.,
-गा.पै.

@ गापै व नितिनचंद्र ...
अनेकदा कुमारांना विविध चॅनेलवर चर्चेच्या संदर्भात पाहतो ऐकतो.
हसरा चेहरा हे त्यांचे वैशिष्ठ्य. परंतु काँग्रेसची बाजू लाऊन धरताना बरेचदा तिरपिट उडते. गांधीवाद त्यांना भावतो. य़ुक्रांद वगैरे विषय आले की ते फुलतात, खुलतात. सत्याग्रही मासिकाचा मी काही काळ नियमित वाचक होतो.
क्रांती दलाचे सध्या काय कार्य असते वाचायला आवडेल. अनेक वर्षांपुर्वीचे युवक आता म्हातारे झालेत म्हणून
युक्रांद म्हणायचे टाळतो.