गप्पा ३ - ईन्क्रिमेन्ट

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 April, 2015 - 16:05

एप्रिल आटोपत आला तरी हातात लेटर मिळायची चिन्हे दिसत नव्हती तेव्हाच अंदाज आलेला. यावेळी ईन्क्रीमेंटला नक्की कात्री लागणार.

आकडे जाहीर झाले. ए ग्रेडला १४ टक्के, बी ग्रेडला १२ टक्के आणि सी ग्रेडला ८ टक्के.. एवढा सोपा हिशोब होता. त्याखाली एक ‘डी’ ग्रेडही होता, पण तो क्वचितच कोणाला मिळायचा. ज्याला मिळाला त्याचे कंपनीतले दिवस भरले असे समजायचे. मला तो मिळण्याचा प्रश्नच नव्हता, पण वर्षभर एवढी(?) घासल्यानंतर ‘सी’ ग्रेड जरी मिळाला असता तरी मीच नोकरीला लाथ मारून बाहेर पडलो असतो. निदान मनोमन विचार तरी तसा केला होता. पण ‘बी’ ग्रेड आला. सोबत सांगण्यात आले की यंदा फारच कमी लोकांना ‘ए’ आणि ‘बी’ ग्रेड देण्यात आला आहे. लकी यू. कामावर खुश आहोत आपण तुझ्या.

पण अगदी माझ्या शेजारी बसणार्‍या मित्राला.. अंह, कलीगला, ए ग्रेड मिळाला, हे माझ्यापासून लपून राहिले नव्हते. बघितला तर फरक फक्त दोन च टक्यांचा.. पण त्या दोन टक्क्यांसाठी जीव तुटत होता. स्साला वर्षभरात त्याने असे काय जास्तीचे तीर मारले होते ते उमजायला मागत नव्हते. आणखी एक होता, तो ही जवळच बसायचा. माझ्यापेक्षा फक्त एक वर्ष सिनिअर. त्याचे प्रमोशन झाले होते. हक्क होता त्याचा, पण रुबाब असा दाखवत होता जणू माझ्यासारख्यांचा बॉस झाला होता. नशीब!, असे काही नव्हते. नाहीतर फार अवघड झाले असते. डिजाईन ईंजिनीअरचा सिनिअर डिजाईन ईंजिनीअर झाला होता. फक्त सिनिअर झाल्याची पोचपावती. बाकी काही विशेष हक्क अधिकार नाहीत. तरीही उगाचच उडत होता. त्याच्याशी हात मिळवणारे उगाचच मलाही डिवचून जात होते. काय मग, तुला नाही मिळाले प्रमोशन!? अरे माहितेय नाही मिळाले, तरीही उगाचच! काय अर्थय या प्रश्नाला? ज्याला मिळाले होते तो उद्याही तेच काम करणार होता जे आज करतोय. तर मग नाही मिळाले मला. त्यात काय एवढे. मिळेल पुढच्या वर्षी. नाहीतर निघून जाईन नोकरीला लाथ मारून..

पण ती तर सी ग्रेड मिळाल्यावर मारून जाणार होतो..

ठिकाय! पण साल्यांना लेटर सुद्धा फ्रायडेलाच द्यायचे होते. वीकेंड खराब झाला पुर्ण.. काय करणार होतो हे दोन दिवस. आत्मपरीक्षण?

घंटा आत्मपरीक्षण! पोहे घश्याखाली उतरत नव्हते. चहा मात्र दोनदा उतरला. तसा मग मीच खाली उतरलो. विचार केला नाक्यावर एक फेरफटका मारून यावा. सिगारेटच्या टपरीवर चार घटका थांबावे. जगातल्या सार्‍या चिंता आपल्या डोक्यावर ओढून काही चिंतातूर जीव तिथे फुंकत पडलेले असतात. त्यांना बघावे. स्वताच्या चिंता काय त्यापेक्षा मोठ्या नाही म्हणत हलके व्हावे. तर वाटेत ग्रीन पॅराडाईज अपार्टमेंट लागले. पार्किंगमध्ये इम्पोर्टेड गाड्या आणि सभोवतालच्या ‘थोड्याश्या’ मोकळ्या जागेत खेळणारी मुले. पायात बूट, अंगावर टी-शर्ट, डोक्यावरची टोपी. सारेच ब्रांण्डेड. हातात घड्याळ घालून क्रिकेट खेळणारी मुले. म्हटले, यांच्या बापाने रग्गड पैसा कमावलेला दिसतोय जे यांना कश्याची चिंता नसावी. आपला बाप नाही कमावू शकला तर आपण नोकरी करतोय.. नोकरीची आठवण झाली आणि पुन्हा ते दोन टक्के कमीचे इन्क्रीमेंट डोके भंजाळून गेले. त्याच आठवणीने जीव जाळण्यापेक्षा ते द्रुश्य नजरेआड करत पुढे सरकलो.

पुढच्या कंपाऊंडमध्ये काम चालू होते. इथेही अशीच एक गगनचुंबी ईमारत माझा जीव जाळत उभी राहणार होती. पण तुर्तास तिथे कामगारांच्या पोरांचा दंगा चालू होता. म्हटले यांना बघावे. आपले बालपण किमान यापेक्षा तरी सुखकर गेलेले. ते आठवावे. म्हणून थोडावेळ तिथेच रेंगाळलो.

पाचपोच नसलेली जुनाट बॅट घेऊन खेळत होते. बॉल रबराचा होता की टेनिसचा ते देखील त्याच्या रंगावरून ओळखता येत नव्हते. स्टंपच्या जागी खोका उभा होता आणि दूरवरून धावत कोणीतरी गोलंदाजी करत होता. बॅटसमनने चेंडू टोलावला तसा तो वार्‍याशी स्पर्धा करत उंच उडू लागला. त्याखाली रखरखत्या उन्हात अनवाणी पायाने एक फिल्डर तो झेलायला मागे पळत सुटला. आणि मला मगासची पॉश सोसायटीतील मुले आठवली. जेमतेम अन अवघडलेल्या जागेत क्रिकेट खेळणारी. त्यांच्यापेक्षा स्साली ही जास्त खुश दिसत होती. आज मला सारी दुनियाच खुश दिसत होती. पानपट्टीवर देखील तीच गत. नेहमी आकाशाला नजर लावून धुराची वलये हवेत सोडणारे चिंतातूर जंतू आज मोबाईलवर खिदळत होते. मी माझा फोन काढला, तर ऑफिसच्या ग्रूपवर इन्क्रिमेटचीच चर्चा. नकोच ती, वैतागून पुन्हा आत ठेवला.

पुढे पार्कात फेरफटका मारण्यात काही हशील नव्हते. तिथे केवळ मौजमस्तीसाठीच आलेले दिसणार होते. परतीचा रस्ता धरला. कंपाऊंडमध्ये जेवणाची सुट्टी झाली होती. मगाशी खेळणार्‍या पोरांपैकी दोघेजण आपल्या आईबापाबरोबर बसले होते. घमेले कुदळ फावडे, आजूबाजुला अस्तव्यस्त आणि सभोवताली वार्‍याच्या झोतागणिक उडणारी धूळमाती. यातून एकमेकांना आडोसा देत चौघे गोलाकार बसले होते. मध्ये काही प्लास्टीकच्या पिशव्या आणि कागदाची पुडकी. त्यातच पाव चपाती, डाळ भात. कदाचित भाजीही असावी. एकच काला झाला होता. पुडक्याचा आणि त्यातील चपात्यांचा रंगही एकवटला होता. मगाशी माझ्या घशाखाली न उतरलेले पोहे, यापेक्षा कित्येक पटींनी देखणे होते..

पण छोट्याचे लक्ष कुठे होते जेवणावर. मध्येच उठला आणि पळत सुटला. अर्धा जीव तर सोडून आलेल्या खेळात अडकला होता. पाठोपाठ मोठाही हातातला पाव तोंडात कोंबत उठला. आईबापांनी शिव्या हासडल्या आणि आपले जेवण चालूच ठेवले. थोड्याच वेळात छोट्या परत आला. खेळाने पोट नाही भरत. त्याची आग विजवायला जेवणच लागते. कसेही असले तरीही..

तिथून मी निघालो. पुढच्या सोसायटीतील पोरे गायबली होती. एकदा पुन्हा पलटून कंपाऊंडमध्ये पाहिले. एक पाव उचलत छोट्याने पुन्हा पळ काढला होता. बहुधा आता त्याची बॅटींग होती. पोट कितपत भरले होते ठाऊक नाही, पण स्साला आता जास्त खुश दिसत होता.. आणि माझा मूड!, तो कदाचित अजून पालटला नव्हता. पण ठाऊक नाही, कश्याने तरी, सोमवारी ऑफिसला जायची ताकद आली होती.

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages