पुण्याचे (गायब असलेले ) सायकल ट्रॅक -

Submitted by किरण कुमार on 18 April, 2015 - 03:00

पुण्याचे (गायब असलेले ) सायकल ट्रॅक -

पुणे हे पुर्वीपासून सायकलचे शहर म्हणून ओळखले जाते, आजही कामासाठी, छंद म्हणून आणि व्यायामाच्या निमित्ताने पुण्यातील सायकलस्वारांची संख्या वाढत आहे ,जे पर्यावरणासाठी एक चांगले पाऊल आहे. हा लेख पुण्यात अस्तित्वात असलेल्या सायकल ट्रॅकची दयनीय अवस्था आणि गैरवापर याबाबत सांगणारा आहे.

सन २००८-०९ या आर्थिक वर्षात पुणे महानगरपालिकेला राष्ट्रकूल स्पर्धेच्या निमित्ताने एकूण शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून काही निधी उपलब्ध झाला, जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहर पुननिर्माण अभियान Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission म्हणजेच (JnNURM) या योजने अंतर्गत देशातील विविध शहरे विकसनाचे काम हाती घेण्यात आले त्यात पुणे शहर ही सामाविष्ट होते. या योजनेअंतर्गत शरातील प्रमुख रस्ते, नद्या, वाहतूक, झोपडपट्टी इ बाबत समस्या सोडविण्यासाठी कार्यक्रम आखले गेले. पुणे शहरातील मुख्य रस्ते म्हणजे कर्वे रस्ता,पौड रस्ता,सिंहगड रस्ता, कात्रज हडपसर रस्ता, नगर रस्ता, विद्यापीठ, बाणेर रस्ता या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस साधारण २ ते २.५० मी रुंदीचा फूटपाथ व तेवढाच सायकल ट्रॅक करण्याचे काम करण्यात आले. तसेही यापुर्वी पुण्यातील फूटपाथची अवस्था फार चांगली नव्हती पण ठिकठिकाणी खचलेले पेव्हर ब्लॉक, चेंबरची उघडी झाकणे आणि बाजूच्या टप-या ,व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हे कमी होईल अशा अपेक्षेने पुणेकर आणि सायकल ट्रॅक होत असल्याने सायकलस्वार सुखावले होते.

त्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर आज जर तुम्ही सायकल घेवून बाहेर पडलात तर "कुठे आहे सायकल ट्रॅक ?" हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सायकल ट्रॅक सोडून रस्त्यावरुन सायकल चालविणे पसंत कराल ही प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, का फसला हा सायकल ट्रॅक प्रयोग याची कारणीमिमांसा करण्याची गरज इथल्या अधिका-यांना आणि लोकप्रतिनिधींना वाटली नाही. सायकल ट्रॅक पुणेकरांच्या नजरेतून बहुतेक ठिकाणी सपशेल नापास झाला , माझ्या मते फसलेल्या सायकल ट्रॅकमागे जे कारणे आहेत ती मांडतो आहे
( टीप : पुढे दिलेली कारणे हे माझे व्ययक्तिक मत आहे, ती सर्वांना मान्य असतीलच असे नाही, कदाचित तुमच्या परिसातील सायकल ट्रॅक चांगला आणि वापरण्यासारखा असेल तर प्रतिसादात जरुर कळवावे त्याबाबत मी प्रशासनाचे अभिनंदन करेल. )

१) सायकल चालविण्यासाठी आवश्यक रस्ता हा स्मूथ ( धक्केविरहीत) असणे आवश्यक आहे त्यासाठी कॉंक्रीट किंवा डांबरीं पृष्ठभाग असायला हवा होता, सध्या बहुतेक सायकल ट्रॅक हे इंटरलॉकींग पेव्हर ब्लॉक मध्ये तयार करण्यात आलेले आहेत त्यातही भरमसाठ खड्डे आहेत , त्यावर चालविताना पडण्याची भिती वाटणे सहाजिक आहे.

२) सायकल ट्रॅकची रुंदी ही सर्वत्र एकसारखी नाही, कधी कधी तर तो ट्रॅक मधेच गायब होतो.

३) या ट्रॅकवर दुचाकी स्वयंचलीत वाहनांना मज्जाव करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही.

४) सायकल ट्रॅकवर काही ठिकाणी जे स्टील बोलार्ड उभे केलेले आहेत त्यावरील रिफ्लेक्टीव्ह मटेरिअल गळून पडलेले आहेत ज्यामुळे रात्रीचे वेळी अपघाताची शक्यता वाढते.

५) सायकल ट्रॅकच्या खालूनच पावसाळी किंवा सर्विस पाईपलाईन टाकण्यात येते ज्याचे चेंबर कव्हर ट्रॅकवर असते, कव्हर तुटणे, ते चूकीच्या पधतीने बसविणे, चेंबर समतळीत नसणे हे सायकलस्वारांसाठी अपघाताचे निमंत्रणच आहे.

६) चायनिज गाड्या, टप-या , पथारीवाले, वॉशिंग सेंटर यांच्यासाठी सायकल ट्रॅक म्हणजे महानगरपालिकेने आपल्या व्यवसाय वाढण्यासाठी पुरविलेली अतिरिक्त जागा आहे असा भ्रम करुम घेतला आहे , सध्याकाळ झाली कि आपापले फोल्डींग टेबल मांडून सर्रास सायकल ट्रॅक अडविला जातो, अशी अतिक्रमणे काढण्यासाठी महानगरपालिका कारवाई करते खरी पण ती फारच अर्धवट, तातुरती असते.

७) प्रस्तावित भुयारी मार्ग, उड्डाणपूल बांधताना सर्वात पहिला बळी सायकल ट्रॅकचा दिला जातो... पर्यायी रस्ता म्हणून

८) दुचाकी आणि चारचाकी पार्कींग करण्यासाठी हा ट्रॅक वापरला जातो ज्याला विरोध होणे आवश्यक असते.

९) सायकल ट्रॅक तयार करायचे आणि त्यावरच लाईटचे पोल उभारायचे, छोटी झाडे लावून वीट बांधकामात आळे बनवायचे असे चूकीचे धोरण राबविणे.

१०) सायकल ट्रॅक आणि फूटपाथ हे एकमेकाला खेटून बनविले गेल्याने आणि एकाच पातळीत असल्याने चालणारे नागरिक सहज सायकल ट्रॅक वर येतात, त्यातही भाजीवाले फूटपाथवर बसल्यानंतर त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे सायकल ट्रॅकवरच उभे राहणार .

याउपर काही कारणे असतीलच, तुम्हाला माहिती असतील तर प्रतिसादात लिहा . मी स्वत: या बाबी प्रशासनाला कळवित आहे,चांगले सायकल ट्रॅक उपलब्ध होण्यासाठी आपण मिळूनच प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाला दोष न देता आपणही त्यात खारीचा वाटा उचला जसे सायकल ट्रॅकवर गाड्या पार्क न करणे, त्यावर एखादा दगड असेल तर तो उचलून बाजूला टाकणे, खचलेल्या चेंबर बाबत संबंधीत अधिका-यास कळविणे वगैरे .........

पुणे शहरातील सायकल ट्रॅकबाबत समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधीत भागांचे प्रशासन अधिका-यांचे संपर्क क्र व मेल आय डी मिळवून इथे पोस्ट करेन.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम पोस्ट...एकूण एक मुद्द्याशी सहमत....
मी ते पेव्हड ब्लॉक बघूनच तिथे सायकल चालवण्याचा विचार सोडून दिला. पण माझ्या भावाने प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात सपाटून आपटला आणि ढोपरं फोडून घेतली.

ज्याने कुणी हे ब्लॉक लावायची आयडीया केली असेल त्याला आणि त्याला अनुमोदन देणाऱ्याला शिक्षा म्हणून त्याच ट्रॅकवरून किमान आठवडाभर सायकल चालवायला लावली पाहिजे. मुर्ख लेकाचे....

पादचाऱ्यांचा मुद्दाही तसाच. एकदा ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे नाईलाजास्तव मी सायकल ट्रॅकवर सायकल नेली तर तिथे एक काकू निवांत फिरत फिरत चालल्या होत्या. मी त्यांना बाजूला व्हा म्हणले तर इतक्या जळजळीत नजरेने त्यांनी निषेध व्यक्त केला. आता काय अंगावर घालतो का सायकल. आम्ही काय चालायचे पण नाही का, या प्रश्नावर अहो काकू हा सायकलचा रस्ता आहे असा माझा दुबळा बचाव इतका तोकडा पडला की बास.

पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की पुण्यासारख्या शहरात जिथे तुम्हाला मुळातच रस्ते कमी पडतात तिथे सायकल ट्रॅकची चैन न परवडण्यासारखी आहे. आपल्याकडे गाड्यांना, लोकांना चालायला रस्ते नाहीत. सिंहगड रोडवर रात्री आठच्या सुमारास जो काही राडा होतो तो पाहता तिथे चारपदरी रस्ताही कमी पडेल असे वाटते. तिथे मोजक्या सायकलस्वारांसाठी वेगळा रस्ता करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.

त्यामुळे हे सगळे सायकल ट्रॅक आता पादचारी मार्ग म्हणून घोषीत करावेत आणि त्यावर कुठल्याही परिस्थितीत गाड्या जाणार नाहीत एवढे पहावे तरी भरपूर आहे.

सिंहगड रोडवर रात्री आठच्या सुमारास जो काही राडा होतो तो पाहता तिथे चारपदरी रस्ताही कमी पडेल असे वाटते. तिथे मोजक्या सायकलस्वारांसाठी वेगळा रस्ता करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.

त्यामुळे हे सगळे सायकल ट्रॅक आता पादचारी मार्ग म्हणून घोषीत करावेत आणि त्यावर कुठल्याही परिस्थितीत गाड्या जाणार नाहीत एवढे पहावे तरी भरपूर आहे. >>> +१११

यात अजून एक भर - रस्त्यावरचे पार्कींग बंद करणे.

रस्त्यावरचे पार्किंग बंद केले तर लोक गल्लीबोळात लावतील त्याने अजून वैताग होईल.

पुण्यातच काय किंवा अजून कुठल्या शहरात काय, लोकांना पार्किंग सोयस्कर ठिकाणी हवे असते. ते केलेत तर बाकी कुठलेही निर्णय मान्य केले जातात. लक्ष्मी रोड, जंगली महाराज रोड किंवा फर्गसनवरचे पार्किंग तसेच ठेऊन ते एकेरी केलेत. तिथले पार्किंग बंद करून ते रस्ते पुर्वीसारखे दुहेरी केले तर बघा किती दंगा होईल ते. मैलभर अंतरावर गाडी लाऊन चालत जाणे अजूनही लोकांच्या मानसिकतेमध्ये बसत नाही. आणि मग त्यातले लूपहोल्स शोधले जातात.

ते पण खरे आहे. पण पार्किंग करताना तरी जरा सेन्स वापरावा न, ते पण होत नाही.
सायकल ट्रकवरून गाडी नेणार्‍या माणसाचा धक्का लागल्यामुळे माझा एक मोबाईल हरवला आहे. जाउदे, अजून लिहीत बसले तर सिंहगड रोडचा ट्रफीक प्रोब्लेमवर बाफ वळेल, त्यामुळे ईथेच बास करते.

पुण्यासारख्या शहरात जिथे तुम्हाला मुळातच रस्ते कमी पडतात तिथे सायकल ट्रॅकची चैन न परवडण्यासारखी आहे.

थोडी दुरुस्ती अशी.........
अगदीच मुख्य पेठा सोडल्या तर बहुसंख्य रस्ते पुरेसे रुंदीचे आहेत, पण अतिक्रमण, अवैधरित्या केलेले पार्कींग , विकासकामांच्या नावाखाली खोदलेले खड्डे, आणि चालकांची बेशिस्तपणे वाहन हाकण्याची प्रवृत्ती यामुळे रस्ते फार ,छोटे आहेत असे वाटत राहते. सिंहगड रोडची एकूण रुंदी ३० मी आहे, योग्य वाहतूक नियोजनाने हे प्रश्न सुटण्यासारखे आहेत . वाहनांची संख्या म्हणाल तर ती सार्वजनिक वाहतूक कोलमडल्यामुळे वाढलेली आहे.

रात्री एक ते चार----प्रिssssये पाहा राsssत्रीचा समय सरुनीsssहे गाणे पहाटे दुधाच्या (चितळे दुध )गाड्या दिसू लागल्यावर गावे,आणि साइकल घेऊन आपापल्या घरी परतावे.दुपारी ऊन फार असते.मला साइकल चालवण्याची आवड (उत्साह)सहावीपर्यंतच होती नंतर सुटली.मोठेपणी बागेसाठी गावाबाहेरून माती आणण्यासाठी भाड्याने तासावर घेउ लागलो(ओटोपेक्षा स्वस्त !!) मातीच्या पिशव्या लावल्या की जड व्हायचे म्हणून ढकलत आणायचो ,जाताना चालवत. परंतू माझ्या चेहय्राकडे पाहून तीस फुटांवरचे लोक अगोदरच रस्त्याच्या बाजूला व्हायचे म्हणून जातानाही ढकलत नेऊ लागलो.थोडक्यात सांगायचे तर हा पुण्याचा साइकल-ट्रॅक माझ्या कामाचा आहे.साइकल-चालवणाय्रांना माझ्याकडून शुभेच्छा,जर्मनीसारखा ट्रॅक होवो.

बी आर टी चे घोडे नाचविल्यामुळेही वाहतूक खोळंबा झाला. उपलब्ध पैसे वापरुन बस दुरुस्ती, बसच्या संख्येत वाढ असे उपक्रम फार कमी आणि महागडे बसस्टॉप उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. एकूणच पुण्याचे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी निव्वळ बोलघेवडे आहेत याचा प्रत्यय आला.

मूळातच सायकल ट्रॅक ही संकप्लना अत्यंत चूकीच्या पध्दतीने राबविली गेली. किकुने मांडलेल्या सर्वच मुद्यांशी सहमत आहे. सायकल ट्रॅक हा प्रयोग सरसकट सर्व रस्त्यावर राबविण्याऐवजी कमी गर्दीच्या व प्रशस्त रस्त्यावर रावबिला असता तर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता. उदा. पुणे विद्यापीठ ते औंध ब्रेमेन चौक किंवा पाषाण वावधन रस्ता असे रस्ते आहेत जिथे दोन्ही बाजूस दुकाने किंवा व्यावसायिक नाहीत सहाजिकच अतिक्रमणाचा प्रश्न येत नाही. विद्यापीठ रोडच्या सायकल ट्रॅकचा वापर मी केला आहे, तो डांबरी आहे. बाकी इतर ठिकाणी म्हणाल तर अरुंद रस्ते आणि वाहतुकीच्या खोळंब्याने सायकल ट्रॅक हा दुचाकीसाठी पर्यायी मार्ग ठरतो,

>>>> पुणे शहरातील मुख्य रस्ते म्हणजे कर्वे रस्ता,पौड रस्ता,सिंहगड रस्ता, कात्रज हडपसर रस्ता, नगर रस्ता, विद्यापीठ, बाणेर रस्ता या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस साधारण २ ते २.५० मी रुंदीचा फूटपाथ व तेवढाच सायकल ट्रॅक करण्याचे काम करण्यात आले <<<<

काय थापा मारताय राव! अफवा पसरवू नका.... नैतर तुम्हाला कॉन्ग्रेसद्वेष्टे ठरविले जाईल! Proud

>>> व्यायाम म्हणून असेल तर रात्री एक ते चार साइकल चालवा.बाकी कामाकरता आता इतिहासजमा. <<<<
रात्री? तेव्हा त्या भटक्या कुत्र्यांच्या टोळीच्या हल्ल्यापासून कसे वाचायचे?

काय थापा मारताय राव! अफवा पसरवू नका.... नैतर तुम्हाला कॉन्ग्रेसद्वेष्टे ठरविले जाईल! Happy

ही माहिती मला माहिती अधिकाराखाली मिळालेली आहे, त्यात तथ्य आहे पण वर मांडलेल्या मुद्यामध्ये एवढी रुंदी सलग नसते, अतिक्रमण वगैरे आहेच.... तुम्हाला पाहिजे असेल तर हवे त्या रस्त्यावर किती लांबीचा सायकल ट्रॅक आहे याबाबत सविस्तर माहिती पुरविण्यात येईल. कालच्या सकाळमध्ये याबाबत एक लेख आलेला आहे ही लिंक घ्या .

http://epaper.esakal.com/Sakal/19Apr2015/Enlarge/PuneCity/Pune1Today/pag...

यानुसार पुण्यात १३२ किमीचे सायकल ट्रॅक आहेत .. आहात कुठे भाऊ .. ते ठिक नाहीत ही गोष्ट वेगळी.

६) चायनिज गाड्या, टप-या , पथारीवाले, वॉशिंग सेंटर यांच्यासाठी सायकल ट्रॅक म्हणजे महानगरपालिकेने आपल्या व्यवसाय वाढण्यासाठी पुरविलेली अतिरिक्त जागा आहे असा भ्रम करुम घेतला आहे , सध्याकाळ झाली कि आपापले फोल्डींग टेबल मांडून सर्रास सायकल ट्रॅक अडविला जातो, अशी अतिक्रमणे काढण्यासाठी महानगरपालिका कारवाई करते खरी पण ती फारच अर्धवट, तातुरती असते.>>> एक लाख अनुमोदने.

सिंहगड रोडवर रात्री आठच्या सुमारास जो काही राडा होतो तो पाहता तिथे चारपदरी रस्ताही कमी पडेल असे वाटते. तिथे मोजक्या सायकलस्वारांसाठी वेगळा रस्ता करणे प्रॅक्टिकली शक्य नाही.>>
राजाराम पुल सोडला की जी भाजीवाळी मंडळी बसतात ती थेट संतोष हॉलच्याच्या पुढे पर्यंत आहेत. गंमत अशी की रोज हप्ता दिल्यामुळे भाजीवाली माजात असतात व ती भाजी घ्यायला आलेल्या ग्राह़कांच्या गाड्या नो पार्कींग म्हणुन उचलल्या जातात. या लोकांना विस्थापीत करण्यासाठी दोन-तिन ठिकाणी मंडईची इमारत उभी आहे तिथे मात्र अजुन उद्घाटनच झालेले नाही. जुगार दारु पिण्याकरता मात्र सोय झाली आहे. फनटाईमच्या अलीकडे वाईनशॉपखालीच रस्त्यावर लोक दारु पित असतात.

पुण्यात सायकल चालवणे, यामुळे टळणारे प्रदुषण व वहानांच्या कोंडींच्या समस्या यावर उपाय असे विचार करुन जे कोणी सायकल स्वारासाठीचे रस्ते बनवले असतील असे वाटत नाही.

पुणेकर कधी काळी सायकलस्वारांचे होते, मग ते मोटरसायकल स्वारांचे झाले आता ते चौचाकी स्वारांचे हळु हळु होत आहे.

जसे पुरुषांनी घोतर घालणे किंवा स्त्रीयांनी नऊवारी , नथ असा पहेराव करणे जसे अशक्य आहे तसेच कधी काळी पुणेकर सायकलचे युग पुन्हा आणतील ही अपेक्षा व्यर्थ आहे.

वेगळा रस्ता म्हणजे सिमेंट ओतुन भ्रष्टाचार आणि त्या रस्त्याचा गैरवापर दोन्ही आलेच. या पेक्षा आहे तो रस्ता कोणालाही राखीव न ठेवता मोठा करुन त्यावरुन सर्रास सायकल, दुचाकी आणि सर्वच वहानांची वहातुक करणे पुण्याचा राजकीय इतिहास, नोकरशहांचा निद्रिस्तपणा, आणि नागरिकांचा आरंभशुरपणा पहाता योग्य ठरेल.

आधीच त्या बी आर टी ने खेळ झालाय त्यात नव्याने याची भर नको.

दुचाकीवर आपण सगळी रिस्क घेऊन चालवतोच ना ? तीच रिस्क सायकल स्वारांना आहे असे मला वाटते. कधी काळी २ सायकली जाणार म्हणुन रस्त्याचा एक भाग राखीव ठेवणे माझ्या मते चुकीचे आहे.

>>> कधी काळी २ सायकली जाणार म्हणुन रस्त्याचा एक भाग राखीव ठेवणे माझ्या मते चुकीचे आहे. <<<<
या मताशी असहमत.
याच विचारसरणीतून, गेली असंख्य वर्षे, कधी काळी दोनचार स्त्रीया जाणार, तर त्यांना स्वच्छतागृह राखीव ठेवणे चूकीचे वाटल्याने , आजवर व आजही, सार्वजनिक स्थळी स्त्रीयांकरता नैसर्गिकविधीकरताही सुरक्षित/राखिव/स्वच्छ सोय नसते हे वास्तव.
या निलाजर्‍या वास्तवापुढे त्या तुलनेत "सायकलस्वारांकरता" वगैरे जागा करुन देणे म्हणजे दिवसाढवळ्या शेखचिल्लीची स्वप्ने बघण्यासारखे आहे.

कधीकाळी २ सायकली जाण्याची काळजी वाटते का? तर काही नाही, पेट्रोल १००/१२५ रुपये लिटर करा, चट्टदिशी निम्मे बाईकवाले सायकलवर येतील.
मी ८० रुपये लिटरलाच सायकलीवर आलो. Proud (मी अनुभूति व अनुभव याशिवाय एक अक्षरही खरडत/बोलत नाही हे परत परत सांगायला नकोच! Wink )

लिंबुजी,

आपला प्रतिसाद मिळाला. धन्यवाद ! आपल्याला आलेल्या अनुभुती आणि अनुभवाशी मी सहमत नाही.

सायकल रस्ता आणि स्त्रीयांसाठीची स्वच्छतागृहे यात काहीच साम्य नाही. हे दोन स्वतंत्र विषय आहेत असे मला वाटते.

कारणे

१) स्वच्छतागृहे अनिवार्य आहेत त्याला पर्याय नाही.
२) स्वच्छतागृहे अगदी १ किलोमीटरला एक असले तरी रस्त्याच्या बाजुला असेल आणि रहदारीला अडथळा निर्माण करणार नाही.

३) सायकल रस्ता ही माझ्यामते चैनीची बाब आहे. मी फार पर्यावरण वादी आहे असा आव आणणारे ( फार थोडे जे चर्चा करत नाहीत ) सोडता प्रत्यक्षात त्याचा वापर होत नाही. उदा. कात्रज ते स्वारगेट या भागात जो सायकल रस्ता होता तो आजही पहा. तासाला एक सुध्दा सायकल जात नाही.

४) सायकल रस्ता आणि बी आर टी मुळे कोंडी होत आहे.

सायकल चालवु नये अश्या मताचा मी नाही. मुद्दा राखीव रस्ते कसे अनावश्यक आहेत असा आहे.

मुळात नविन रस्ते करा हा मुद्दा नसुन आहेत ते\केलेले सायकल ट्रॅक हे जर सायकल चालवण्याकता उपयोगी नसतील तर काय करायचे हा आहे. तेच सायकलस्वार रस्त्यावरुन आल्याने कोंडेमधे आणखी भर पडते. स्वयंचलीत सायकल नसल्याने मुख्य रस्त्यापेक्षा वेगळा ट्रॅक असेल तर वाहतुक समस्या थोडी १% व प्रदुषण समस्त्या १-२% जरी कमी झाली तरी उपयोग होईल. त्या निमित्ताने अनधिकृत टपर्‍या पथारीचेही निर्मुलन होईल.

तासाला एक सुध्दा सायकल जात नाही.,
तोच तर मुद्दा आहे, सायकलवाले सायकल ट्रॅकवरुन जात नाहीत मुख्य कॅरेजवे मधून जातात. पुण्यात सायकलस्वारांचे प्रमाण चांगले आहे आणि ते वाढत आहे हे ही तितकेच खरे आहे. शनिवार रविवारी कधी सिंहगडाकडे चक्कर टाका ,सकाळी सकाळी १००-१५० तरी सायकलस्वार दिसतील. बाकी सायकलवरुन कामाला आणि शाळा कॉलेजला जाणारेही आहेतच त्यामुळे २ सायकली वगैरे म्हणणे चूकीचे. दुचाकीच्या तुलणेत सायकली नगण्या असतील एवढेच.

माझा मुळ मुद्दा असलेले सायकल ट्रॅक वापराबाबत आहे, आता जे सायकल ट्रॅक बांधले आहेत ते तर तोडून रस्ता वाढविणे कठिण आहे त्यापेक्षा आहे तेच व्यवस्थित केले तर किमान ज्या उद्देशासाठी ते बांधले गेले ते तर साध्य होईल.

http://www.punecorporation.org/informpdf/Road/USDG-FD-UploadingFile.pdf

ही फाईल पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत बेबेसाईटवर उपलब्ध आहे, (फाईल मोठी आहे पण सविस्तर माहिती आहे )त्यात पुण्यातील रस्त्याचे सध्याचे चित्र आणि भविष्यात करण्यात येणा-या उपाययोजना याबाबत लिहीले आहे. एक स्क्रीनशॉट टाकतो आहे.. थोडक्यात ज्या चूका आहेत त्या प्रशासनाला सुधारायच्या आहेत अशी आशा करायला हरकत नाही.

cycle track.JPG

मला वाटतं BRT चा रस्ता तसाही सध्या वापरात येत नाही. तर त्याचे रस्ता BRT ऐवजी MRT म्हणजे मोटार सायकल रॅपीड ट्रान्सिट म्हणून घोषीत करावा. त्यामुळे मुख्य रस्त्यावर त्यांचा त्रास जाणवणार नाही. हे मोटार सायकलस्वार महा भयानक असतात. त्यांचा त्रास कारवाले ते पायी चालणारे ह्या सर्वांना होतो.

ज्याने कुणी ब्लॉक रस्ता सायकलचा केला आहे, त्याला बहुदा पुण्यातून सायकल हद्दपार करायची आहे. ३० वगैरे सोडा १५ चाही स्पीड त्या रस्त्यावर डेंजरस ठरू शकतो.

पुण्यात कधी सायकलचे टार रोड होतील ही अपेक्षा अजिबातच राहीली नाही. भारतात सायकलला कार्बनचे दिवस कधी येवोत ते देवच जाणे.

सायकल घेऊन सायकल ट्रॅकने जाण्याचा मुर्खपणा एकदा केला होता. ढोपरे नाही फुटली, पण कळून चुकले की पुण्यातील सायकल ट्रॅक हे सायकलस्वारांसाठी नाहीत.

सायकल रस्ता ही माझ्यामते चैनीची बाब आहे. असहमत
अजूनही कामासाठी आणि शाळा कॉलेजात जाण्यासाठी सायकल वापरणारे खूप आहेत. सायकल ट्रॅक असावा कि नसावा याबाबत मतभेद असू शकतील पण सध्या जे ट्रॅक बनवून ठेवलेत त्याचे काय, एकतर ते व्यवस्थित आणि सुरक्षित असणे , तसेच त्याचा वापर होण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.