खरी कविता..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 13 April, 2015 - 08:57

त्या खर्‍या कविता..म्हणुनी
शब्द कल्पना सांगत नाही.
येतील आज..? पुन्हा? .. का कधिही!(?)
अश्या कुठे त्या.. थांबत नाही.

बोलावुनी वा हाकारुनी त्या
ढुंकुन कधिही पहात नाही.
आणि घेतले टाळे लावुनी
येणे-असता.. रहात नाही.

बासरी ,पुंगी..नाद कसाही
निश्चित त्यांचे स्वरूप नाही.
किंवा स्वये त्या नाद-घेऊनी
येतील..त्याचे अप्रुप नाही.

वार्‍या समं ते शब्द वाहती
कवेत त्यांना घेता.. नाही.
कुठला परिसर ..माळं कोणता?
पडणे निश्चित..रुजणे नाही!!!

छंद..मुक्त वा बंध...कसेही!
काहि त्यांना सांधत नाही.
आशय जरं का असेल पक्का
कशानीच मगं वांधत नाही.

काव्याचा हा प्रांत असा की
शाश्वत त्याला ऋतूच नाही
ऋतुही शाश्वत होऊ पहाता
मगं काय उरते???...काव्यचं नाही!

हात जोडूनी नम्रत्वाला
झुकुनी देतो एकची ग्वाही.
करावया-जर कविता गेलो..
ती ही नाही..मि ही नाही!!!
===============
अतृप्त...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users