खरेदीचा फंडा

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 10 April, 2015 - 11:47

खरेदीचा फंडा

ग्राहक या शब्दाची सोपी सुटसुटीत व्याख्या "खरेदी करणारा तो ग्राहक" अशी करता येईल. ग्राहक म्हणून आपण वस्तूंप्रमाणेच वीज, टेलिफोन, बँक, विमा, वैद्यकीय अशा अनेक सेवाही खरेदी करत असतो. या पैकी प्रत्येक खरेदी हा एक लिखित किंवा अलिखित करार असतो.

आपण खरेदी का करतो? या प्रश्नाचे "आपल्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी" हे उत्तर चटकन येइल. परंतु खरेदीमुळे ग्राहकाला आनंद मिळतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. अगदी तुरळक ग्राहकांना खरेदीचे व्यसनही असू शकते. ग्राहकाच्या गरजा केवळ भौतिक नसतात तर भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक असे त्यात अनेक प्रकार असतात. उदा: प्रतिष्ठेचे चिन्ह म्हणून विशिष्ठ ब्रान्डचे वाहन, मुलांसाठी महागडी खेळणी, दागदागिने इ. ची खरेदी होते. चार लोकांकडे आहे म्हणून, आपल्या घरी फारसा उपयोग नसूनही microwave ओव्हन आणला जतो. कपडे, पर्सेस, पादत्राणे इ. च्या खरेदीमागे बहुदा "चार चौघात उठून दिसावे" ही प्रेरणा असते. जाहिरातदार, व्यापारी इ. नी या सर्वांचा अभ्यास केलेला असतो व त्याचा ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खुबीने उपयोग करतात. जाहिरातीचे चित्रण, शब्दरचना, दुकानातील/ mall मधील सजावट, वस्तूंची मांडणी वातावरण इ. ची ग्राहकांना आकर्षित करेल अशा पद्धतीने केली जाते.

खरेदी लहान असो की मोठी, दैनंदिन स्वरूपाची असो की नैमित्तिक, वस्तूची असो की सेवेची, ती करण्यापूर्वी काही पथ्ये पाळणे गरजेचे असते. त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्याला "ठेच लागणे" टाळता येते. त्याच बरोबर आपली खरेदी पर्यावरण, अर्थव्यवस्था, समाज, इ. च्या हिताची ठरते. कोड्यात पडलात ना? अस पहा, आपण पार्टी साठी वापरून फेकून द्यायच्या प्लास्टिकच्या बशा खरेदी केल्या तर वापरानंतर त्याची कचऱ्यात रवानगी होऊन पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार! आपण दर्जाबद्दल चोखंदळ न राहिल्यास देशातील उत्पादनाचा दर्जा सुमार राहून निर्यात व परिणामी परकीय चलनात घट होईल. आपल्या खरेदीचे इतके दूरगामी परिणाम होतात हे लक्षात घेतले तर "खरेदीचे फंडे" समजावून घेण्याचे महत्व निराळे सांगायलाच नको. प्रत्यक्षात खरेदी हे एक शास्त्र आहे. त्याप्रमाणे ती एक कलाही आहे हे खालील सुचनांवरून लक्षात येइल.

१) मोठ्या खरेदीला निघण्यापूर्वी खरेदी करायच्या वस्तूंची यादी करून घ्यावी. त्यामुळे अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळता येईल. तसेच कुटुंबातील किमान २/३ सदस्यांनी मिळून अशी खरेदी करावी. योग्य तेथे लहान मुलांनाही बरोबर न्यावे. त्यामुळे त्यांच्यावरही सावध खरेदीचा संस्कार होण्यास मदत होईल.

२) खरेदीची यादी करण्यापूर्वी सर्व कुटुंबियांनी काही प्रश्नांची उत्तरे शोधावीत. उदा. मला या वस्तू / सेवेची खरोखरीच गरज आहे का? या वस्तू / सेवेस पर्याय आहेत का? किंमत योग्य व मला परवडणारी आहे का? त्यासाठी पैशाची तरतूद (बचत किंवा हप्त्याने खरेदी करून) करणे शक्य आहे का? वस्तू / सेवा दर्जेदार आहे का?

३) वरील प्रश्नांची उत्तरे अनुकूल येऊन खरेदीचा निर्णय पक्का झाला की वस्तूंची किंमत, दर्जा, वजन, माप ई. गोष्टी तपासून वस्तूची निवड करावी. प्रसिद्ध brands च्या वस्तू खरेदी करणे सोयीचे असते. मात्र काही वेळा अप्रसिद्ध/नवे brands कमी किंमतीत व चांगल्या दर्जाचे असू शकतात याचाही विचार करावा.

४) वस्तूच्या दर्जाची हमी देणारी चिन्हे उदा. ISI (औद्योगिक उत्पादने), agmark (शेतमाल), hall mark (सोन्याचे दागिने), सिल्क मार्क (रेशमी कापड), FPO (फलोत्पादन) असणाऱ्या वस्तूंची निवड करावी.

५) आवेष्टित वस्तूंच्या वेष्टनावरील माहिती विशेषत: वस्तूंचे वजन-माप कमाल किरकोळ विक्रीची किंमत (M. R. P.) खाद्यपदार्थ व औषधांबाबत त्यातील घटक, वापरण्याची मुदत (expiry date), तक्रार करण्याचा पत्ता इ. वाचल्याशिवाय खरेदी करू नये.

६) M.R.P. पेक्षा जास्त किंमत (कोणत्याही कारणाने) आकारणे हा गुन्हा आहे. मात्र बाजारातील स्पर्धेमुळे त्यापेक्षा कमी किंमतीत वस्तू मिळू शकते, हे लक्षात घेऊन चार ठिकाणी चौकशी करून खरेदी करावी.

७) सहल कंपन्या, विमा, मोबाईल, गृहनिर्माण (flat) इ. सेवांबाबत करार करण्यापूर्वी त्यातील अटी समजावून घ्याव्यात. आपल्या सोयीच्या नसलेल्या अटी काही वेळा चर्चा करून बदलून घेणे शक्य असते.

८) सेल/ मोफत गोष्ट/जुने देऊन नवीन घ्या (exchange offer ) इ. योजनांमध्ये खरेदी करण्यापूर्वी ती खरोखरीच फायद्याची आहे का याचा विचार करावा.

९) आज काल इंटरनेटवरही खरेदी करता येते. याशिवाय दारावर येणारे फेरीवाले/विक्रेते, मेल order असे खरेदीचे अनेक पर्याय आहेत. त्याबाबत विशेष काळजी घ्यावी. या योजना नीट समजावून घ्याव्या.

१०) क्रेडीट कार्ड द्वारा खरेदी करण्याचे फायदे तोटे लक्षात घ्यावेत. कार्ड स्वत: समोर swipe केले जाईल याची काळजी घ्यावी.

११) सर्व तपशीलांसह खरेदीची पावती कटाक्षाने घ्यावी व ती जपून ठेवावी.

ललिता कुलकर्णी (मुंबई ग्राहक पंचायत)
pune.mgp@gmail.com
(सदर लेख मुंबई ग्राहक पंचायतीच्या ब्लॉगवर http://punemgp.blogspot.in वर पुर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users