माझी समाजसेवा (???)

Submitted by सुमुक्ता on 10 April, 2015 - 06:38

या जगात अनेक गरीब, रोगाने ग्रासलेले, मानसिक अथवा शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करणारे, संकटग्रस्त, असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्यासारख्या धडधाकट माणसांच्या मदतीची आणि आधाराची गरज आहे. प्राणीसंवर्धन आणि निसर्गसंवर्धन हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो हे लहानपणापासूनच मनावर बिंबविलेले असल्यामुळे खूप वेळा मनाची तगमग होते की आपण समाजातील वंचितांसाठी काहीही करत नाही (किंवा तगमग होते असे दाखवावे लागते!). भारत देश सोडून बाहेर आल्यानंतर पहिले की इथे रस्त्यावर, दुकानात अनेक ठिकाणी चॅरिटी बॉक्स ठेवलेले असतात. बऱ्याच वेळा खूप हौशी लोक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना चॅरिटी करायचे आवाहन करतात आणि निधी उभा करतात. ही संकल्पना मला सुरुवातीला खूप आवडली. त्यामुळे अनेक वेळा चॅरिटी बॉक्स मध्ये पैसे टाकणे. माझ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांना चॅरिटी साठी निधी उभा करायला आर्थिक मदत करणे मी चालू केले. अनेक समाजसेवी संस्थांना मी दर महिना एक ठराविक निधी देत असते. आपण काही करत नाही पण इतर लोक करत आहेत तर आपण मदत करायला हवी ह्या भावनेने मी आर्थिक मदत करत होते. आणि काहीतरी केले ह्यात स्वतःचे समाधान मानून घेत होते. हळूहळू ही सवय अंगवळणी पडली. दुकानातून खरेदी केली की उरलेले सुट्टे पैसे तिथे ठेवलेल्या चॅरिटी बॉक्स मध्ये टाकून मी मोकळी व्हायला लागले.

पण कुठेतरी वाटायला लागले की आपण दिलेला निधी गरजूंपर्यंत पोहोचतो की नाही? तो कसा वापरला जातो? किती गरजूंचे आयुष्य अशा निधीमुळे थोडेतरी बदलते? आपण दिलेला निधी वापरून केले जाणारे संशोधन नक्की काय आहे? त्या संशोधनामुळे थोडीफार का होईना, अगदी मंदगतीने का होईना प्रगती होते आहे का? हे प्रश्न पडायचे कारण म्हणजे गेल्या वर्षी गाजलेला आइस बकेट चॅलेंज. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी ह्या चॅलेंज मध्ये भाग घेतला आणि लक्षावधी डॉलर्स चा निधी गोळा झाला. अर्थात पाण्याचा अपव्यय किती झाला ह्याची काही मोजदादच नाही. कुठेतरी माझ्या वाचनात आले कि गोळा झालेल्या निधीपैकी केवळ ७% निधी मूळ उद्देशासाठी वापरण्यात आला. उरलेला निधी म्हणे "कारभार चालविण्यासाठी" खर्च झाला. खरेखोटे मला माहित नाही पण मग माझ्या लक्षात आले की आत्ता पर्यंत मी फारसे खोलात न शिरता अशा संस्थांना मदत करत आहे. ह्या संस्था मूळ उद्देशासाठी किती खर्च करतात आणि किती निधी असा "कारभार चालविण्यासाठी" खर्च करतात ह्याची कोणतीच माहिती माझ्याकडे नाही. निधी दिल्यानंतर त्याचा विनियोग कसा होतो हेसुद्धा मी तपासत नाही. कितीतरी संस्था खरोखर समाजोपयोगी काम करतही असतील पण मी त्यामध्ये वैयक्तिक रस घेत नाही. मग मी समाजोपयोगी कार्यासाठी आर्थिक मदत देते हे मला खरंच आत्मविश्वासानी म्हणता येईल का?

दर वर्षी मी ज्या संस्थांना आर्थिक मदत करते त्या सर्व संस्था आम्हाला नवीन वर्षाची शुभेच्छा पत्रे आणि कॅलेंडर्स पाठवीत असतात. त्याचबरोबर इतरही अनंत माहितीपत्रके घरी येतात. ह्या सर्वांची गुणवत्ता अतिशय उच्च प्रतीची असते. आधी कधी वाटले नव्हते पण आता वाटते आहे की ह्याची खरोखरच आवश्यकता आहे का? ह्या सगळ्यामध्ये उगीचच कागद खर्च होतो आणि पर्यावरणास नुकसान होते. ह्याचा विचार जर ह्या संस्था करत नसतील तर त्यांना समाजसेवी संस्था म्हणणे चूक ठरत नाही का? पोस्टाने माहितीपत्रके पाठविण्यापेक्षा ई-मेल सोपी नाही का? आणि त्याहीपेक्षा ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देणे सहज शक्य नाही का? शुभेच्छापत्रे आणि कॅलेंडर्सची खरच गरज असते का? अशा गोष्टी "कोणीतरी निधी देत आहे म्हणजे ते आपले ग्राहक आहेत आणि त्यांना खूष ठेवायला हवे" ह्या विचारसरणीमधून झालेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर निधी देणारे ग्राहक असतील तर ह्या संस्थांनी समाजसेवेच्या नावाखाली उघड उघड व्यापार आरंभला आहे असे म्हणणे अयोग्य ठरेल काय? खरोखर समाजसेवेचे उद्दिष्ट असेल तर जमलेल्या निधीचा असा अपव्यय करणे बरोबर नाही. आणि निधीचा असा अपव्यय करणाऱ्या संस्थांना मी निधी देणे हे सुद्धा बरोबर नाही.

ज्याप्रमाणे जमविलेला निधी कसा वापरला जातो हे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे निधी जमविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र, निषेध व्यक्त करण्यासाठी अथवा संदेश देण्यासाठी अवलंबला जाणारा मार्ग हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. पेरूची राजधानी लिमा येथे झालेल्या UN च्या पर्यावरणविषयक परिषदेत भाग घेणाऱ्यांना "संदेश" देण्याच्या निमित्ताने ग्रीन पीस संस्थेच्या स्वयंसेवकांनी Nazca Lines ह्या UNESCO च्या World Heritage Site चे अनन्वित नुकसान केले. आइस बकेट चॅलेंजचेही तेच. भारतासारख्या देशात जिथे पाण्याची कमी आहे तिथे अनके लोकांनी आइस बकेट चॅलेंज मध्ये भाग घेऊन पाण्याचा अपव्यय केला. समाजोपयोगी कार्य करताना इतर कोणते नुकसान तर होत नाही ना ह्याचे तारतम्य जसे समाजसेवी संस्थानी जसे ठेवायला हवे, तसेच ते ह्या संस्थांना मदत करण्याऱ्या लोकांनीही ठेवायला हवे.

खरेतर समाजसेवा करायची असेल तर पैशापेक्षा वेळ देणे अधिक महत्वाचे आहे. बाबा आमटे, डॉ प्रकाश आमटे, मेधा पाटकर , इत्यादींसारख्या अनेक लोकांनी आपले करियर, शिक्षण, खरेतर उभे आयुष्य गरजूंच्या मदतीसाठी दिले. तशी हिम्मत, तसा आत्मविश्वास आणि तसे समर्पण माझ्यामध्ये नक्कीच नाही. निधी देण्यासाठी समाजसेवी संस्थांची विश्वासार्हता तपासणे मला जमत नाही. मग समाजसेवेचे हे अवडंबर कशाला? फुटकळ काहीतरी करून आपण खूप मोठी सेवा किंवा त्याग करतो आहोत ह्या अविर्भावात वावरण्यात काय अर्थ आहे? म्हणून कमीत कमी मी काय करू शकते असा विचार केला तर जाणवले की माझ्या घराच्या परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा होईपर्यंत थांबायची काहीच गरज नाही. अनाथ प्राण्यांना चांगली घरे आणि हौशी पालक शोधून देणे, शेजारीपाजारी एकेकटे राहणाऱ्या वृद्धांना बाजारहाट करून देणे, परदेशात राहते तेव्हा येथे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना येथे सेटल होण्यास मदत करणे, पर्यावरण जपता येईल अशी जीवनशैली ठेवणे, रहदारीचे नियम पाळणे, ही आणि अशी कितीतरी कामे मला विनासायास करता येतील. आणि जमले तर ज्या संस्थांची विश्वासार्हता तपासणे मला शक्य आहे अशा संस्थांना आर्थिक मदतही करता येईल.

खूप मोठा बदल मी कदाचित घडवू शकणार नाही पण कोणाच्या तरी आयुष्यात एक सेकंद जरी मी आनंद निर्माण करू शकले तर ती समाजसेवाच नाही का? अगदी तिसरी चौथीत असताना आम्हाला समाजशास्त्र नावाचा एक विषय असायचा त्यात हेच शिकवले जायचे. वयानी आपण कितीही मोठे झालो तरी समाजशास्त्रातील छोटे छोटे धडे आजही लागू पडतात हे कळायला माझ्या आयुष्याची इतकी वर्षे गेली. पण वेळ अजूनही गेलेली नाही. माझ्या मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकण्यासाठी जिथे दिसेल तिथे चॅरिटी बॉक्स मध्ये पैसे टाकत सुटण्यापेक्षा ही छोटी छोटी कामे मनाला अधिक समाधान देतील असे वाटते आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मोठा बदल मी कदाचित घडवू शकणार नाही पण कोणाच्या तरी आयुष्यात एक सेकंद जरी मी आनंद निर्माण करू शकले तर ती समाजसेवाच नाही का?>>>>+१ काही प्रमाणात करतेही ...

चांगला धागा!
आम्ही म्हणजे ३१ मार्चच्या आत कुठेतरी काहीतरी डोनेशन भरून ३१ जुलैच्या आत त्या रिसीटकडे डोळे लावून बसणारे.
Happy

सुमुक्ता, एन जी ओ हा हल्ली मोठा बिझिनेस झालाय !

वैयक्तीक पातळीवर काही श्रमदान करता आले तरच समाधान मिळेल. मूकपणे, कुठलीही प्रसिद्धी न करताही
अनेक संस्था काम करत असतात. त्यांना मनुष्यबळाचीही गरज असते. अश्या संस्थांसाठी काम करायला मला आवडते / आवडेल.

सुमुक्ता, सगळा लेख पटला.

लोकल फुड बँकेला कॅन्ड फुड देणे हा एक पर्याय मला पैसे देण्यापेक्षा चांगला वाटतो. तसेच ज्या संस्था लहान मुलांसाठी वापरलेले अथवा नवीन कपडे, खेळणी आणि शालेय साहित्य जमा करतात त्यांना पण अशा वस्तू घेउन देणे. शालेय वर्षाच्या सुरूवातीला पब्लिक स्कूलमध्ये मुलामुलींसाठी संपूर्ण वर्षासाठी शालेय साहित्याचं पॅकेट देउ शकता. हायस्कुलमधल्या जरा मागे पडलेल्या मुलांना त्यांच्या विषयाचा अभ्यास करण्यात मदत करणे. त्यांना करीयर कौन्सेलिंग. हे सगळं ऑर्गनाइझ करणार्‍या संस्था असतात. त्यांच्याकडे नावनोंदणी केली की गरज असेल आणि आपण दिलेल्या उपलब्धतेच्या वेळांनुसार ते हाक देतात. असे बरेच मार्ग आहेत आपल्या पैशाचा आणि वेळेचा योग्य विनिमय करून गरजूंना मदत करण्याचे.

संयुक्तानं सुरू केलेला वार्षिक उपक्रम पण आहेच आर्थिक मदत करायची असल्यास.

गेल्याच आठवड्यात 'पेटा'तर्फे घरी पत्र आले. काहीतरी प्रश्नावली सदृश्य होते की तुम्ही (म्हणजे मी) तुमच्या भागात प्राण्यांवर काय काय प्रयोग केले जात आहेत मग या बद्दल जागृत आहात का? त्याची मला किती माहिती आहे, प्राण्यांवर केमिकल टेस्टिंग आणि बरेच काही प्रश्न होते जे अर्थात प्राणी हक्क यांच्याशी निगडित होते. पान पलटले तर देणगी देण्यासाठी कॉलम्स होते आणि सोबत १८ स्टिकर्स (??!) माझ्या नावाचे आणि आणखी ६-७ 'आय लव्ह पेटा'चे.

मी माझी माहिती वॉलंटियरिंग साठी दिलेली.

:अतिआश्चर्य चकित बाहुली:

≪वैयक्तीक पातळीवर काही श्रमदान करता आले तरच समाधान मिळेल. मूकपणे, कुठलीही प्रसिद्धी न करताही
अनेक संस्था काम करत असतात. त्यांना मनुष्यबळाचीही गरज असते.≫
+१

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!

वैयक्तीक पातळीवर काही श्रमदान करता आले तरच समाधान मिळेल. मूकपणे, कुठलीही प्रसिद्धी न करताही
अनेक संस्था काम करत असतात. त्यांना मनुष्यबळाचीही गरज असते.>> अशा संस्थांबद्द्ल महिती मिळाली तर आवडेल.

जर्बेरा तुम्ही दिलेल्या महितीचा हा गैरवापर नव्हे का??

एका अनाथाश्रमात मुलींसाठीच्या शिबीरात गेले होते. त्यांच्याशी गप्पा मारत होतो. श्राध्द, वादिला जेवण देतात तिथेच शिजवतात व भांडी ह्या मुलींना घासावी लागतात व कार्याच उरलेलं किंवा श्राध्द, वादि तयार जेवण देतात. दोन्ही प्रकार मुलींना नकोसे झाले तयार जेवणात पनीर खाऊन कंटाळा आला... भाजी भाकरी किंवा कारल्याची भाजी का नाही देत.. जे हवंय ते दिलं पाहिजे ना...

सुमुक्ता....

~ लेख जितका चांगला तितकाच त्यातून प्रसंगी निर्माण होणार्‍या प्रश्नांनाही तुम्ही व्यवस्थित मांडल्याने त्याचे रुप निव्वळ वाचनीय न राहता अशी नित्यनेमाने यथाशक्ती मदत करणार्‍यांनी विचार करायला लावणारी आहे हे तर उघडच आहे.

पण काही विशिष्ट पातळीपर्यंत आर्थिक मदत देता येण्यासारखी ज्याना आहे ते तर देत राहाणारच (त्यात काही चुकीचे आहे असेही नाही); पण निधी पेटीत रक्कम टाकणे, अनाथाश्रमातील मुलांमुलींना तसेच वृद्धाश्रमामधील इनमेट्सना जेवण देणे ह्या प्रकाराबद्दलही काही अडचणी येत असतात असेही दिसले आहे. काही ठिकाणी रोख पैसे न स्वीकारता एका वेळेचे जेवण देण्याबद्दल सुचविले जाते. कारण काही असो पण संचालकांना रोख पैसे अडचणीचे वाटतात की काय असे दिसत आहे....कदाचित शासकीय नियमावलीही असू शकते.

एके ठिकाणी तुम्ही लिहिले आहे..."निधी देण्यासाठी समाजसेवी संस्थांची विश्वासार्हता तपासणे मला जमत नाही." ~ असे अनेकांचे होत असते. वेळ नसतो, धावपळ जमत नाही, तपासण्याचा अधिकारही नसतो. केवळ निरिच्छ वृत्तीने जी काही शक्य असेल ती आर्थिक मदत करणे आणि विसरून जाणे हा एकच मार्ग माझ्यासारख्या सेवानिवृत्ताकडे शिल्लक असतो. त्यामुळे समाजसेवी संस्थांपेक्षाही मग मी आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या "स्मशानभूमी" कार्यालयात जाऊन मयतासाठी लागणार्‍या जळणासाठी/सरपणासाठी मदत म्हणून पावती करतो. महानगरपालिकेकडून लाकूड, शेणी, स्वच्छता, रक्षारक्षण आदी कामासाठी मयताच्या नातेवाईंकाना कोणतेही शुल्क आकारले जात नाही...सारे काही मोफत असते. हे उघडच दिसत असल्याने तिथे जमा होणार्‍या मदतीचा विनियोग योग्य कारणासाठीच केला जातो हे स्पष्ट होते, सबब अशा ठिकाणी मदत करताना मनी कसली खळखळ उमटत नाही.

जर्बेरा तुम्ही दिलेल्या महितीचा हा गैरवापर नव्हे का??>>

मला तुम्ही वगरे नका बोलू. मी ज्युनियर माबोकरिण आहे. Happy

माहितीचा गैरवापर तर आहेच. पण म्हणून १८ स्टिकर्स??? ते कागद पण अगदी गुलगुळीत, आणि हे असे दरवाज्यावर लावता येतील एवढे मोठे. वेस्ट यालाच म्हणतात ना??

आणि त्या प्रश्नवलीचा तरी कितीसा उपयोग होणार? ऑनलाइन सर्वे ची सोय असताना हे असे कागद वाया घालवायचे असतील तर अश्या संस्थांना काय म्हणावे?? मार्केटिंग च्या नावा खाली वेस्ट किती करावी याला काही बंधन नको??

यातून जो बोध् घ्यायचा होता तो मी घेतला Happy

अशा संस्थांबद्द्ल महिती मिळाली तर आवडेल.≫
माझ्या माहितीत IDA India ही एक संस्था आहे, हे फक्त पाळीव प्राण्यांसाठी मदत पुरावतात. मी गेल्या वर्षी एक लेख देखील लिहिलेला. माझ्या लेखनात सापडेल. तिथे त्यांना मदत करणाऱ्या (अर्थात प्राण्यांसाठी) लोकांची जास्त गरज आहे. मुख्य् ब्रांच अमेरिकेत आहे. यांची अम्ब्युलंस् बऱ्याचदा दिसते नव्या मुंबईत.

हल्लीच सज्जनगडावर जाऊन आलो. तिथेही ऑनलाइन निधी स्विकारतात. फक्त गडाच्या डागडुजी साठीच नाही तर तिथल्या पाठशाळेतल्या मुलांचा खर्च, अन्नदान, इ साठी सुद्धा देणगी देता येते.

पुन्हा एकदा सर्व प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!!

एन जी ओ हा हल्ली मोठा बिझिनेस झालाय >>> हे पटले.

माहितीचा गैरवापर तर आहेच. पण म्हणून १८ स्टिकर्स??? ते कागद पण अगदी गुलगुळीत, आणि हे असे दरवाज्यावर लावता येतील एवढे मोठे. वेस्ट यालाच म्हणतात ना?? >>>> हो वेस्ट तर आहेच!! कारण अर्धे लोक हे कागद कचर्‍यातच टाकतात!!