इयत्ता ७ वी तुकडी ब - भाग २

Submitted by संतोष वाटपाडे on 9 April, 2015 - 00:31

सकाळचे अकरा साडे अकरा झाले असतील अंदाजे. त्या मोठ्या खडकाच्या बाजूला सोबत पांघरण्यासाठी आणलेली पोती आम्ही अंथरली आणि पडलो. पावसाची आता भुरभुर दिसत होती पण अंगाला लागत नव्हती. वर्गातल्या गप्पा रंगात आल्या होत्या. "कोणती प्वार काय म्हंती कोणती काय म्हंती" वगैरे वगैरे. आमच्या गुळव्याच्या पिंट्या म्हणजे अगदी बोलण्यात हुशार. कुणाची नस कशी पकडायची हे त्याला चांगले माहित. गोप्याची अशी खेचायला सुरुवात केली की सोय नाही. अख्ख्या डोंगरात हासण्याचा आवाज घुमत होता.
पण असे लोळून चालणार नव्हते. अजून कढीपत्ता तोडायचा होता. पोत्याच्या घड्या करुन बेलाची गोणी नीट ठेवून आम्ही कढीपत्ता शोधायला निघालो. वास यायचा पण नेमका कुठून हे कळत नव्हते. एकमेकांना फ़सवत हसवत आम्ही करवंदाच्या रानात घुसलो होतो. हे रान म्हणजे जाळी होती करवंदाची जिचा थांग काढणे मुश्किल होते. आत घुसल्यावर दिशा चुकली तर चार दिवस मधेच फ़िरत रहावे लागेल अशी दाट जाळी होती. विशेष म्हणजे या जाळीत फ़क्त गुडघ्यावर रांगत जावे लागायचे. एक एक करुन सगळेआत शिरले. कढीपत्त्याची झाडे आता समोरच दिसायला लागली होती. आपल्याला शहरात ही झाडे अगदी छोटी वाढलेली दिसतात. पण इथली झाडे मात्र चांगली मनगटासारखी मजबूत होती. ज्याला जे झाड सापडेल त्याने ते ओरबाडून मोडून माघार घ्यायला सुरुवात केली कारण जास्त ओझे घेऊन बाहेर निघणे जमणार नव्हते. गुडघ्यावर जसे आत आलो तसेच रांगत रांगत आम्ही जाळीतून बाहेर आलो. खिशातल्या सुतळीच्या तोड्याने प्रत्येकाने आपापली मोळी बांधून आम्ही खडकाजवळ आलो. सगळे सामान गोळा करुन आता गावाकडे परतायचे होते.
बारा वाजले असतील कदाचित. घड्याळ नव्हतेच ना कुणाकडे. ढग आता डोंगराच्या शेंडीकडे गेले होते. बर्‍यापैकी ऊजेडही पडला होता. डोंगरावरून खालचा नजारा खरोखर पाहण्यासारखा होता. दूरदूरपर्यंत हिरवळ पसरलेली. चौकोनी आकाराची तांबडी शेते इतकी आकर्षक वाटत होती कि त्या आकारांमध्ये आम्हाला मोटारी ट्रक जीभडे टेक्टर चॉकलेट असे वेगवेगळे आकार दिसत होते. काही ठिकाणी ढग विरळ होऊन ऊन्हाची किरणे हिरवळीवर पसरलेली दिसत होती. जणू सुर्य ढगांचा पडदा बाजूला करुन खाली डोकावून बघतोय. सागाच्या झाडाच्या बर्‍यापैकी सरळ असलेल्या ओल्या काठ्या हातात घेऊन आम्ही आल्या मार्गाने खाली उतरायला सुरुवात केली. काही वेळापुर्वीच पाऊस पडून गेलेला होता त्यामुळे पाय घसरत होते. जर ब्रेक नाही लागला तर खैर नाही बरंका. अगदी सांभाळून उतरावे लागत होते. डोक्यावर बेलाची गोणी ,खांद्यावर कढीपत्त्याची मोळी ,काखेत पिशवी, एका हातात सागाची काठी आणि दुसर्‍या हातात पोते असा काहीसा अवतार होता प्रत्येकाचा.
पोटर्‍यांवर काटेरी झाडांनी ओरबाडल्याच्या खुणा रक्ताळल्या होत्या मात्र पायाखालून सापासारखे सळसळत जाणारे इवलेसे पाण्याचे झरे,तळपायांना स्पर्श करणाला लोण्यासारखा मऊ चिखल यांच्या सहवासात परतीचा प्रवास अगदी रमतगमत चालला होता. खुप मोठा तीर मारल्याचा आव होता प्रत्येकाचा. किती पुडे बांधायचे कुणाकुणाला विकायचे, किती पैसे येतील, त्या पैशाचे काय करायचे ही शेखचिल्लीची गणितं मनातल्या मनात चालू होती. ए साही सखुं किती रे....हमखास विचारला जाणार प्रश्न यावेळी रंजनने विचारला. सुभ्या गणितात हुशार. सगळे पाढे पाठ भाऊचे. अक्षर तर विचारायला नको. अगदी कोरीव सुंदर...साही सखुं बेचाळीस म्हणे!! हाहाहा.... सुभ्याला जे चिडवायचे सुरुवात केली सर्वांनी ते अगदी त्याला रडवेपर्यंत. घोडे तयार होतेच भाऊच्या तोंडात. एकएकाला लागला शिव्या घालायला. फ़िदीफ़िदी हसत आम्ही ओहोळाजवळ पोहोचलो. हीच ती नदी जिच्या पात्रातून आम्ही इथपर्यंत आलो होतो. जाताना एम के उशिर सरांच्या मळ्याजवळून जायचा प्लॅन होता. भयंकर शिस्तबद्ध आणि काठीने बडवणारे आमचे मराठीचे शिक्षक.
नदीत उतरून आम्ही बचाक बचाक पाणी उडवित निघालो होतो. पाणी जास्तीत जास्त वर कसे उडेल याचा प्रयत्न केल्याशिवाय कुणी कसे बरे राहील!! सागाची काठी टेकत टेकत पाण्यातून मार्ग काढत आमची कंपू पुढे चालली होती. रस्ता बदलावा लागणार होता. पाझर तलावावरून जायचे होते आम्हाला. आमच्या अरूण रकिबेचे घरही याच रस्त्यावर होते. नदी सोडून आम्ही शेतांच्या मार्गाने कच्च्या रस्त्यावर आलो. काही ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरचा चिखल अगदी पिठल्यासारखा पातळ झालेला होता. पायाला खालून गुदगुल्या व्हायच्या अशा चिखलातुन चालताना. रस्त्याच्या कडेला शेतात जो काही भाजीपाला होता त्यातून आम्ही खायला काही न काही शोधत होतो. सागाची काठी मुद्दाम एखाद्याच्या मागून टोचायची आणि साळसूद चेहरा करुन इकडेतिकडे पहायचे. अशा गमतीजमती चालू होत्या. पाझरतलाव दिसू लागला होता. आता तो खुप छोटा वाटतो पण त्याकाळी खुप विशाल दिसायचा. नितळगार शांत पाणी आजूबाजूला वाकलेली हिरवीगार झाडे आणि पाण्यावर सूर मारणार्‍या पाणकोंबड्या सगळे कसे खुप सुंदर दिसत होते. ऊनही आता मोकळे पडले होते. चालून चालून अंगाला घाम यायला लागला होता. अशावेळी विशाल सरोवर दिसल्यावर कुणाचा मोह होणार नाही त्या सरोवरात डुबकी मारायचा !
आम्ही तर अगदी भुताळ्यासारखे धावत गेलो तलावाजवळ. एकमताने अंघुळी करायचे ठरले होते तरी गोपी जंगम पिंट्या जंगम ऐन वेळी नाही म्हणून पडले. आम्ही आमचे सामान खाली खडकावर ठेवून. शर्ट काढले. खाकी पॅंट काढून चालणार नव्हते. आता पुन्हा सांगतो आमच्या काळी बनियान ’’वगैरे वगैर” गोष्टी नव्हत्या. गुडघ्याएवढ्या पाण्यात खोटंखोटं पोहून धक्काबुक्की करुन आम्ही आमची जंगी आंघोळ साजरी केली. खाकी चड्डी तर ओली झाली गड्याओ आता एम के उशिर सरांच्या मळ्याजवळून जायचे कसे?? ओली चड्डी पाहिली तर उद्या वर्गात उभं करुन पक्कं हाणतील. या भितीने आम्ही नुसते शर्ट घालून खाकी चड्डी पिळून सागाच्या काठीवर टांगली. निघालो पुढच्या प्रवासाला. इयत्ता सातवीची पोरं आम्ही. अगदी अजाण होतो. (अजूनही आहोत !!) खाकी चड्डी वाळायला हवी, येणार्‍याजाणार्‍याने आपल्याला बघायलाही नको यासाठी जपत लपत चाललो होतो. मधे दोन चार ओहोळ लागले होते त्यात चिखलाने बरबटलेले पाय धुवून नितळ पाणी पिऊन पुढे जात होतो. उशिर सरांचा मळा दिसायला लागला. त्यांच्या घराभोवती मोठमोठी झाडे होती ती दुरुनही दिसायची. अर्धवट ओल्या चड्ड्या घालून आम्ही "गुणी विद्यार्थी" चाहूल घेत घेत पुढे सरकलो..........क्रमशः
dhodap killa.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान....
मला वाटले की नदीतून परत जाताना पाण्याचा लोंढा वगैरे येतोय की काय....
पाझरतलावात डुंबताना कोणी गटांगळ्या खाणार की काय.... असो.
पुढेचे येऊद्यात.