सापळा

Submitted by प्रकु on 8 April, 2015 - 16:37

मित्रांनो, हि कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अर्थात नावं, गावं बदलली आहेत. जागा, नाव, पद कशाशीही काही सार्धम्य आढळ्यास केवळ योगायोग समजावा हि विनंती.
........................

होस्टेलच्या मेसमध्ये प्रकाश रात्रीच जेवण करत बसला होता. आजूबाजूला मित्र होते खरे, पण प्रकाशच मन कॅम्पस प्लेसमेंट, जॉब, आभ्यास इत्यादीमध्येच फिरत होतं. तेवढ्यात त्याला त्याच्या भाऊजींचा फोन आला. त्यांचा त्याला खर कधी फोन येत नसे. ताईच अधून मधून ते नसताना दुपारी फोन करीत असे. त्यामुळे ‘भाऊजींच काय काम असेल बुवा.?’ असा विचार करतच त्याने फोन उचलला,

“हा नमस्ते भाऊजी.”

“ह नमस्ते नमस्ते. काय प्रकाश.? कसा आहेस.? पुण्यातच आहेस का.?”

“हो हो भाऊजी, मजेत. हो मी पुण्यातच्चे.”

“माझं जरा काम होत तुझ्याकडे. करशील ना.?”

“अहो म्हणजे काय भाऊजी, नक्कीच करेल. बोला ना काय काम होत तुमचं.?”

“अरे काही नाही ते आपल्या छकुली चा जन्म पुण्यात झाला होता ना, तर त्या वेळी तीच बर्थ सर्टिफिकेट घ्यायचं राहून गेलं. पाच वर्षाची झाली आता. तुझी ताई म्हणतेय कधीची ते घेऊन या घेऊन या म्हणून, पण माझं येणच नाही होत बघ पुण्याला. शेवटी आज हि म्हणे आपला प्रकाश आहे त्याला तरी सांगा. आणून देईल तो घरी. म्हणून म्हणल पहाव तुला विचारून,”

“हो हो भाऊजी. मी घेतो ते, तुमी काई काळजी करू नका. फक्त ते कुठून आणायचं तेवढ सांगा. घरी आणून देईल मी.” प्रकाश अदबीने बोलला. त्याला खर तर फार आभ्यास करायचा होता. पण भाऊजी! त्यांना नाही कस म्हणणार.

“बर मग तू अस कर, महापालिकेच्या ऑफिसात जाऊन चौकशी कर. तिथेच कुठेतरी मिळत म्हणे ते,” भाऊजी म्हणाले.

“होय भाऊजी. उद्याच जातो. बाकी काय म्हणताय भाऊजी,” इति प्रकाश.

“काई नाही ब्वा विशेष काई नाही. घे तुझ्या ताईशी बोल,” म्हणून त्यांनी फोन ताईकडे दिला.

ताईची खुशाली वगेरे विचारून प्रकाशने पटकन फोन ठेवला. तसेही तिकडे भाऊजी तिच्या समोर असताना फार काय बोलणार. नाहीतर ताईने नक्की विचारलं असत ‘अभ्यास वगेरे करायचाय का रे.? आहे ना वेळ नक्की. आधी अभ्यास महत्वाचा बघ.’
त्याला जायचं जाम जीवावर आल होत खरं, पण जाव तर लागणारच होत. आता आभ्यासाच्या टाईम टेबल मध्ये कसे कसे बदल करावे, उद्याचा वेळ कुठे कव्हर करावा असे विचार करत तो रूममध्ये आला. ‘सकाळी सकाळी पटकन जाऊन येऊ, अन दुपार्पर्येंत परत आभ्यासाला बसू’ असे ठरवून तो आभ्यासाला बसला.

हा प्रकाश म्हणजे पुण्याच्या एका इंजिनीरिंग कॉलेज मध्ये चौथ्या वर्षाला शिकणारा सामान्य विद्यार्थी होता. मुळचा तो लातूर जिल्ह्यातील कुठल्याशा गावचा. शेतकरी बापाने अट्टहासाने त्याला शिकायला पुण्याला पाठवलेले. प्रकाश पण मेहनती होता. बापाने केलेल्या अमाप कष्टाची जाणीव त्याला होती. कसेही करून आपल्याला चांगली नोकरी लागलीच पाहिजे हि गोष्ट कायम त्याच्या डोक्यात असे. चांगली नोकरी म्हणजे चांगले मार्क हे समीकरणही त्याच्या मनात पक्के होते. त्यामुळे कसेही करून चांगले मार्क पाडणे हे कॉलेज मध्ये असतानाचे त्याचे एक आणि एकमेव ध्येय असे. अर्थात कसेही करून म्हणजे परीक्षेत कॉपी वगेरे करून नव्हे, कारण त्याला पकडले जाण्याची प्रचंड भीती वाटत असे. ‘कोणीच पाहणार नाही, करा कॉपी’ अशी हमी मिळाली असती तर मात्र सगळ्यात जास्त कॉपी त्यानेच केली असती हे नक्की.

सर्व व्यवस्थांना तो मनापासून घाबरत असे. उदा. एकदा असे झाले, एक सर त्यांच्या पूर्ण वर्गावर कसल्याशा कारणाने प्रचंड चिडले, चिडून त्यांनी अतिशय मोठी, एका दिवसात करणे केवळ अशक्य अशी असाईनमेंट दिली, वर उद्याच्या उद्या करून न आणल्यास कोणालाही परीक्षेला बसू देणार नाही अशी धमकीसुद्धा दिली. इंजिनीरिंग कॉलेजची मुल ती, अशा धमक्या बिनधास्त पणे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. कधीकधी तर ऐकत सुद्धा नाहीत. पण प्रकाशच मात्र तसं नव्हत. त्याच्या डोक्यात लगेच विचारांची मालिका आली. ‘बापरे! आता असाईनमेंट नाही म्हणजे परीक्षा नाही, म्हणजे आपण फेल होणार. बेकलोग लागला म्हणजे झाल. कंपन्या आपल्याला इंटरव्हीवला सुद्धा बसू नाही देणार.’ या विचाराने त्याला धडकीच भरली. तडक होस्टेल वर येऊन त्याने असाईनमेंट लिहायला घेतली. त्या दिवशीचे जेवणसुद्धा त्याने स्कीप केले. रात्रभर बसून लिहित राहिला, पण अपेक्षेप्रमाणे ती पूर्ण झालीच नाही. आता सरांसमोर कसे जाणार म्हणून त्याने त्या दिवशी कॉलेजला दांडी मारली आणि रूमवरच बसून लिहित राहिला. संध्याकाळी दवाखान्यात जाऊन तिथे काम करणाऱ्या त्याच्या एका गाववाल्या मार्फत त्याने नकली प्रिस्क्रिप्शनसुद्धा तयार करून घेतले. पुन्हा रात्रभर बसून कशीबशी ती असाईनमेंट पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी असाईनमेंट आणि प्रिस्क्रिप्शन घेऊनच तो कॉलेजला गेला. अशा गोष्टी (प्रिस्क्रिप्शन इ.) करणे योग्य कि अयोग्य असे प्रश्न फारसे त्याच्या मनात येत नसत. आले तरी तो ते लगेच विचार झटकून टाकत असे. ‘आपल काम होतंय ना. बास! जास्त विचार नाही करायचा’ असा त्याचा सिंपल फंडा होता.

प्रकाश दुसऱ्या दिवशी सकाळी दहालाच महानगरपालिकेत पोहोचला. “बर्थ सर्टिफिकेट कुठे मिळेल काका.?” त्याने एका शिपायाला विचारले. शिपायानेच त्याला हातानेच खूण करून बसण्यास सांगितले. त्याला वाटल तिथेच मिळते, साहेब आले नसतील. म्हणून तो बसून राहिला. तसाच एक तास गेला. ‘काय हे, इंटरव्हिव जवळ आलेत आणि माझा अभ्यासाचा वेळ वाया चाललाय.’ प्रकाशला अस्वस्थ वाटू लागलं. मनात त्याने चार शिव्या घातल्या त्या शिपायाला आणि महापालिकेच्या कारभाराला. शेवटी त्याने पुन्हा त्या शिपायाला विचारल,

“काका बघा ना हो, आलेत का साहेब. परीक्षा आहे माझी.? लवकर परत जायचय मला.”

“ह आत्ता बोला. ११ वाजले, आता कामाची वेळ सुरु झाली. काय काम आहे तुमच” शिपाई घड्याळात पाहत बोलला.

“बर्थ सर्टिफिकेट घ्यायचय काका. इथेच मिळेल ना.” प्रकाश म्हणाला.

“बर्थ सर्टिफिकेट.? ते पहा ते समोर जी इमारत आहे त्याच्या मागच्या इमारतीत जा. दुसऱ्या मजल्यावर चव्हाण साहेब बसतात त्यांना विचारा. तेच देतील.” शिपाई म्हणाला.

“ओके काका. थ्यांक्यू,” म्हणून पटकन प्रकाश त्या इमारतीकडे चालू लागला. ‘यडझव्या साला. आत्ता कामाची वेळ सुरु झाली म्हणे मादरचोद.’ प्रकाश चरफडत मनाशी म्हणाला. तेव्हा त्याला कुठे माहित होत अजून पुढे काय वाढून ठेवलंय. माहित असत तर हा शिपाई त्या मानाने किती चांगला आहे हे त्याला कळाल असत.
.....
“अं.. ते चव्हाण काका कुठे भेटतील. मला जरा एक बर्थ सर्टिफिकेट घ्यायचं होत,” तिथे पोहोचल्यावर त्याने अजून एका शिपायाला विचारले.

“चव्हाण साहेब का.? त्या समोरच्या केबिनकडे जा.” कपाटाने बनवलेल्या एका केबिन कडे बोट दाखवत शिपाई म्हणाला.

प्रकाश तिथे गेला तेव्हा ते साहेब काहीतरी फाईल चाळत होते. तो केबिनमध्ये जाऊन अदबीने त्यांच काम संपण्याची वाट पाहत उभा राहिला. दोन मिनिटांनी साहेबांनी मान न हलवता चष्म्याच्या वरून प्रकाशकडे नजर टाकली. प्रकाश काहीतरी बोलणार तितक्यात तेच ओरडले, “मारुती.... साहेबांना बसायला सांगा जरा. दिसत नाही का तुम्हाला किती वेळचे ताटकळत उभेत ते. रीटायरमेंटला आलात तुम्ही, पब्लिकला सर्विस द्यायला शिका आता तरी.”
शिपायाने “होय सर, सॉरी सर.” म्हणत प्रकाशला केबिनच्या बाहेरच्या बाजूला जाऊन बसायला सांगितले. हतबल प्रकाश शांतपणे अधूनमधुन घडाळ्याकडे पाहत बसून राहीला.

असाच अर्धा पाउण तास गेला. प्रकाश पुन्हा एकदा विचारयला जायचा विचार करीत होता तेवढ्यात साहेबांना काहीतरी फोन आला.
“नमस्कार माने साहेब. काय म्हणता.? बेत पक्का ना मग आजचा.?” फोनवर बोलता बोलता साहेब केबिनच्या बाहेर आले, “आम्हीतर एनीटाईम तयार आहोत साहेब. एक मिंट ह जरा,” अस म्हणून प्रकाशकडे पाहून ते थांबले न त्यांनी त्याला विचारले,

“काय नाव काय तुमच.?”

“प्रकाश सर. प्रकाश काथे.” प्रकाश गडबडीने उभा राहत म्हणाला.

“हम्म कुण्या गावचे.? वडील काय करतात.?”

“लातूर सर. शेतकरीयेत वडील.”

“बर गुड. काय काम काढलात इकडे.?”

“सर भाचीच बर्थ सर्टिफिकेट घ्यायचं होत सर,”

“बर. काय करता तुम्ही सध्या.?”

“सर इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला आहे मी.”

“हम्म. बसा आलोच जरा जाऊन.” अस म्हणून साहेब पुन्हा फोनेवर बोलत बाहेर निघून गेले, “हम्म बोला माने साहेब. हम्म परफेक्टाय एकदम, तेच म्हणणार होतो मी....”

मगाचा मारुती शिपाई परत प्रकाशकडे आला, “काय पाव्हन लातूरच म्हन कि तुम्ही. आत्ता साहेबाशी बोलल्लालता तेव्हा ऐकलं मी.”

“होय लातूरचा मी. तुम्हीपण तिकडचेच का.?” प्रकाशने उत्सुकतेने विचारले.

“हा मंग, उस्मानाबादेत शेती ए आपली तीस एकर. पन तुम्ही भाषा तर पार पुणेरी बोलल्लालात कि राव.” मारुती आपलेपणाने बोलत होता.

“ह आता चार वर्षापासून पुण्यातच्चे. त्यामुळे थोडा चेंज झालाय,” प्रकाश म्हणाला.
मग आडनाव, मुळ गाव, कोणत्या जातीचे इ.इ. विचारपूस गप्पा वगेरे झाल्या. मारुती नेमका प्रकाशच्याच जातीचा निघाला. “काही काम लागलं तर बिनदिक्कत सांगायच बरका, हितच असतो आपन, काय.?” अस प्रकाशला बजावून मारुती पुन्हा आपल्या कामाला गेला. प्रकाशला जरा बर वाटलं. ‘चला बर झाल एक आपल्या साईडचा आपला जातवाला माणूस मिळाला, काहीतरी तरी उपयोग होईल याचा’ म्हणत प्रकाश पुन्हा शांतपणे बसून राहिला.

पुन्हा पाउण एक तास गेला. प्रकाशला कळून चुकल होत आता काय आपल काम मधल्या सुट्टी नंतरच होणार. ‘पण बोलण्यावरून तर साहेब चांगलेच वाटत होते, फोन चालू असून त्यांनी आपली चौकशी तरी केली, होऊन जाईल काम आज काही नाही. आज रात्री जरा जास्तवेळ बसून आभ्यास कव्हर करून घेऊ’ असा विचार करत तो बसला होता तेवढ्यात साहेब आले येतायेताच त्यांनी प्रकाशला आत बोलावले,

“या प्रकाशराव, आत या... बसा. काय नाव काय तुमच.? प्रकाशच म्हणालात ना.?”

“होय सर प्रकाश”, प्रकाश आत येत म्हणाला.

“काय काम काढलत म्हणे, बर्थ सर्टिफिकेट.?”

“होय सर भाच्चीचा जन्म इथे पुण्यात झाला होता. तीच बर्थ सर्टिफिकेट घ्यायचं होत,”

“बरं.. हरकत नाही. करून घेऊ आपण काही काळजी करू नका. जन्मतारीख.?”

“थ्यांक्यू सर. सर ११ १२ २०१०.”

“२०१०.? म्हणजे पाच वर्षांपूर्वीचा जन्म ए.?”

“हो सर.”

“आहो काय तुम्ही प्रकाशभाऊ. तुमच्या सारख्या एज्युकेटेड लोकांनी वेळच्या वेळी करायला हवी हि कामं. आता पाच वर्षापूर्वीचे रेकॉर्ड्स काढायचे म्हणजे आमचाही वेळ जाणार अन तुमचाही.”

“होय साहेब ते चुकलच जरा त्या वेळी.... पण आत्ता होऊन जाईल ना.? परीक्षा ए जरा माझी साहेब, थोडं लवकर झाल तर बघा ना प्लीज.”

“वेळच्या वेळी कि काम लवकर होतात बघा प्रकाशसाहेब.. जाउद्या जे झाल ते झाल तुम्ही त्या क्लार्क कडे जा. तो तुम्हाला फाईल शोधून देईल ती घेऊन या मग माझ्याकडे, करू आपण लवकरच करू. काही काळजी करू नका,” अस म्हणत साहेबांनी क्लार्कला हाक मारली, “ओ जरा साहेबांना फाईल शोधायला मदत करा बरं. बघा शक्यतो लवकरात लवकर करा. परीक्षा ए म्हणे त्यांची.”

“ओके सर थ्यांक्यू. घेऊन येतो मी फाईल.” अस म्हणत प्रकाश क्लार्कच्या टेबलापाशी गेला.
.....
“नमस्कार साहेब.” प्रकाशने क्लार्कला आपण आल्याचे सांगितले.

“ह ह बसा. बोला काय जन्मतारीख सांगा. कुणाचा जन्मदाखला घ्यायचाय.?” इति क्लार्क.

“११ १२ २०१०. भाच्चीचाय साहेब.”

“२०१०.? म्हणजे पाच वर्षापूर्वी जन्म झालाय.? बरीच शोधशोध करावी लागेल. काय राव तेव्हाच्या तेव्हाच नाही का करून घ्यायचे हे कामं.?”

“राहील तेव्हा करायचं. काय करणार साहेब आता.”

“बर असुद्या बघू. तुम्ही अस करा आता एक वाजायलाच आलाच्चे. तुम्ही पण जाऊन जेवण करून या. शार्प दोनला या, आपण तातडीने तुमच काम करून टाकू.”

“पंधरा मिंट आहेत ना साहेब. आत्ता नाही होणार का बघा ना प्लीज.? परीक्षा होती जरा माझी उद्या. आभ्यास करायचा होता.” प्रकाश विनंतीच्या स्वरात म्हणाला.

“ते सगळ बरोबरे भाऊ. तो फाईल चा गठ्ठा पहिलात का? हजारेक फाईलीयेत त्या. पंधरा मिनटात त्यात कस शोधून होईल.? तुम्हीच सांगा.. या ना जेवण करून या, काय टेन्शन घेता तुम्ही. आजच्या दिवसात कसपन मोकळ करू तुम्हाला काही काळजी करू नका,” असे म्हणत क्लार्क डबा घेऊन उठला.

प्रकाशचा जीव मेटाकुटीला येत होता. ‘काय साले हरामखोर लोक आहेत’ अस मनात म्हणत तो नाईलाजाने बाहेर पडला. जेवण उरकून पावणेदोनलाच ऑफिसात येऊन तो क्लार्कची वाट पाहत बसला. दोन वाजले, सव्वादोन वाजले तरी क्लार्क काही येईना. प्रकाश जरा रडकुंडीला यायला लागला होता. अडीच वाजता शेवटी तो क्लार्क आला. प्रकाश लागलीच त्याच्या टेबलापाशी जाऊन उभा राहिला.

“ह साहेब आणा तुमचा कागद द्या. कोणत्या हॉस्पिटल मध्ये झालाय जन्म,” क्लार्क म्हणाला

‘कागद?’ प्रकाशला कळालेच नाही, “अरुंधती हॉस्पिटल सर, हिंजवडी” ‘कागद’ कडे दुर्लक्ष करत प्रकाश म्हणाला.

“बर ते लेटर द्या चला हॉस्पिटलच.” इति क्लार्क.

“कोणत लेटर सर.?”, प्रकाशच डोकच बधीर झाल.

“कोणत लेटर.? अहो हॉस्पिटलच पत्र लागत बर्थ सर्टिफिकेटला. इथे इथे अशा अशा वेळी यांचा जन्म झाला, यांच्या जन्माचा दाखला अमक्या कडे देण्यास आमची हरकत नाही वगेरे. आम्हाला कस कळणार ती तुमची भाचीये ते. काय साहेब तुम्ही. जा घेऊन या जा ते पटकन, त्याशिवाय काही व्हायच नाही” क्लार्क.

“व्हायचं नाही..? ओ साहेब अहो अस नका ना करू. अठ्रावीस किलोमीटर वरे ते हॉस्पिटल. मला माहितच नव्हतं साहेब नाहीतर आणलच असत मी. माझी उद्या परीक्षा साहेब बघा ना काही होतंय का. नाव, जन्मतारीख आईच नाव सगळ सांगतो मी. हवं तर मी मदत करतो शोधायला”, प्रकाश विनंती करत म्हणाला. ‘उद्याचा दिवसपण असाच वाया जाणार’ या विचाराने तो अस्वस्थ होत होता.

क्लार्क थंडपणे म्हणाला, “साहेssब. कसकाय बोलता राव तुम्ही अस मला समजत नाही. नियम तो नियम आहे आणि तो सर्वांसाठीये. तुमच्या सारख्या शिकलेल्या माणसाला हे सांगाव लागत म्हणजे नवलच्चे.”

“साहेब उद्या परीक्षाए माझी. प्लीज बघा ना काही होतंय का” प्रकाशने पुन्हा विनंती केली.

क्लार्कने संतापल्यासारखे प्रकाशकडे पाहिले आणि एकेरीवर येत म्हणाला, “भाऊ, सांगितलेले कळत का नाही तुला. डोक खराब नको करू निघ आता इथून. असेच कुठलेही काम होत नाहीत. सगळ रीतसर कराव लागत.”

‘सगळ’ हा शब्द उच्चारताना क्लार्कने पहिल्या दोन बोटावर घासलेला अंगठा प्रकाशच्या लक्षात आला. अर्थात प्रकाशला हे काही अनपेक्षित नव्हत. सरकारी कचेरीत जायचं म्हणल्यावर तो तशा तयारीनेच गेला होता.

“ठीके साहेब, माफ करा. कसकाय करायच त्याच मार्गदर्शन करा फक्त थोडं” प्रकाश म्हणाला.

“कसकाय काय त्यात. बाहेर जा, हॉस्पिटलच पत्र एका खाकी लिफाफ्यामध्ये घालून आण. पळ जा पटकन. पंधरा मिनटात ये परत. मी तोवर फाईली काढायला लागतो” क्लार्क म्हणाला, लगेच त्याने मारुतीला बोलावून सांगितले
“साहेबांना सलीमची टपरी दाखवा जरा, चहा पिऊन येताय म्हणे ते.” पुन्हा तो प्रकाशकडे वळून हळू आवाजात म्हणाला, “जा चल. तिथे मिळेल तुला काय हवंय ते जा.”

प्रकाश उठला आणि मारुतीच्या मागे जाऊ लागला. ‘हरामखोर साले आले लायकीवर..... चला जाउद्या, काम तरी होऊन जाईल आजच्या आज हे काय कमिये. उद्या झपाटून आभ्यास करूया’ असा विचार करत प्रकाश खाली आला. मारुतीने त्याला सलीमची टपरी लांबूनच दाखवली.

आजूबाजूला कोणी नाही पाहून प्रकाशने मारुतीला विचारले, “मारुतीभौ किती टाकू.? दोनशे टाकू का.?”
मारुती इकडेतिकडे पाहत म्हणाला, “भिकारी समजलाव काय सायेबाला.? पाच टाक.”
“पाचशे.” ‘पाच हजार नाही ना’ ते पाहण्यासाठी प्रकाश म्हणाला.
“आणि लगोलग वरी येऊ नका लिफाफा घेऊन, औव.? साहेब जिन्यातच भेटत्यात तुम्हाला.” मारुती म्हणाला.
“ह ह ठीके” म्हणून प्रकाश टपरीकडे निघाला. ‘‘पाचशे’ वर तो काहीच बोलला नाही म्हणजे पाचशेच. चला ठीके. एवढे तर लागणारच.’

त्याने पटकन लिफाफा घेऊन टपरीमागे जाऊन त्यात पाचशे रुपये टाकले आणि लिफाफा घडी करून मागच्या खिशात ठेवला. ‘आता काय कराव पंधरा मिंट वाट पहावी का.? तो साहेब जिन्यात कधी येईल नक्की.? परत तो जिन्यात भेटला नाही तर लफड व्हायचं’ असा विचार करत असताना त्याची नजर सहज इमारतीच्या खिडकीकडे गेली. मारुती तिथेच उभा होता. त्याला स्वतःच्या प्रश्नाच उत्तर मिळाल ‘चला, म्हणजे आपण जाऊ तेव्हाच साहेब जिन्यातून येईल तर’ म्हणून तो इमारतीकडे निघाला.

जिना चढायला लागल्यावर त्याचा हात आपसूकच मागच्या खिशाजवळ गेला. एक मजला संपला, ऑफिस दुसऱ्याच मजल्यावर होत, त्याने चढण्याचा वेग जरा कमी केला. तोपर्येंत कोणीच आलेलं नव्हत. मग उरलेल्यातलाही अर्धा भाग चढून, तो शेवटचा अर्धा भाग चढण्याकरता वळाला. आतातर शंभर टक्के त्यांना यावच लागणार म्हणून लिफाफा काढून त्याने हातात घेतला. क्लार्क अपेक्षेप्रमाणे वरून पायऱ्या उतरू लागला, फटाफट पायऱ्या उतरत तो प्रकाश शेजारून निघूनसुद्धा गेला. तेसुद्धा लिफाफा न घेताच. प्रकाशला काही कळालेच नाही. तो तिथेच थबकून जोरजोरात पायऱ्या उतरणाऱ्या क्लार्क कडे पाहू लागला. तेवढ्यात छाक्ककन कोणीतरी त्याच्या हातातला लिफाफा पकडला. समोर पाहतो तर काय चव्हाण साहेब!

त्यांनी एकदम ओरडूनच विचारले “काय रे हे.? हरामखोर.?” त्यांनी लिफाफा उघडून पहिला. “लाच देतो हरामखोर. चल धडाच शिकवतो आज तुला चल” म्हणून गच्चीला धरून ते प्रकाशला आत घेऊन जाऊ लागले.

“रंगे हाथ पकडला बघा हरामखोराला. आज याच पोस्टमाटमच करू थांबा या भडव्याच. सगळ्यांना धडा मिळाला पाहिजे.” म्हणून साहेब प्रकाशला खेचत आतल्या भागात घेऊन जाऊ लागले. त्यांच्या मागोमाग सर्व कर्मचारी अंतर राखून येत होते.

प्रकाशला एव्हाना घटनेच गांभीर्य लक्षात आल होत. त्याला दरदरून घाम फुटला, तो गयावया करू लागला, “नका ना साएब, ओ ओ साएब थांबाना साहेब अस नका करू साएब. परत नाही करणार ना, ओ साएब माईची आन ना ओ सायेब परत नाही करणार ना अस. ओ साएब...” प्रकाश हात जोडत होता पण साहेब आज काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

“चल चल हात मागे घेऊन घुडघ्यावर बसं चल तिथे. मादरचोद नाटक करू नको” म्हणून त्याला फाडकन कानशिलात लाऊन साहेबांनी घुडघ्यावर बसवले, “डीपार्टमेंटच नाव खराब करतो साला!” म्हणून त्यांनी परत एक लगावली. प्रकाशचीतर मतीच गुंग झाली. सर्व कमर्चारी आजूबाजूला जमून पाहत होते.

साहेबांसह पाच सहा जण खुर्च्या ओढून घेऊन प्रकाशच्या चारी बाजूला गोल करून बसले, तो परत गयावया करू लागला, “साहेब हे काय करताय साहेब तुम्ही? जाऊद्या ना साहेब मला ओ. ओ साहेब. ओ ओ साहेब..... जाऊद्या नाsss” तो स्वतःवरच नियंत्रण सुटल्यागत जोरात ओरडला.

हे ऐकून साहेबांचा माथाच भडकला, “मादरचोssद. आधी स्वतः च्युतापा करतो वरून माझ्यावर ओरडतो.?” म्हणून साहेबांनी प्रकाशच्या खांद्यावरच लाथ मारली. प्रकाश कलंडून मागे पडणार तोच मागे बसलेल्या साहेबाने त्याला पुढे ढकलले. तो कसाबसा तोल सावरून बसला. खाली बघत देवाचा धावा करत निमुटपणे रडू लागला. तो एकदम हादरून गेला होता.

“बघा हा हरामखोर. लिफाफ्यामध्ये टाकून लाच देताना रंगेहात पकडलाय आज मी याला.” साहेब इतर पाच जणांना उद्देशून म्हणाले.

“काय रे.? चुतीया साला.?” एकेकजण तारस्वरात सुरु होऊ लागले होते, चारही बाजूंनी प्रश्नाची सरबत्ती सुरु झाली.

“इकडे बघ. इकडे बघ चल. रडलास तर मारच खाशील बेट्या. गपचूप विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे नाहीतर गांxxxx” समोर कर्मचारी सुद्धा असल्याच भान ठेवत त्यांनी स्वतःला आवरले.

‘आता समोर आहे ते सहन करूया. आर्ध्या पाउण तासात सोडून देतील’ म्हणून प्रकाशने स्वतःला जरा धीर दिला आणि निमुटपणे ते सांगतील तस वागायचं ठरवल. रडायचं थांबून तो साहेबांकडे पाहू लागला.
“नाव.?”
“प्रकाश सर”
“पूर्ण” साहेब खेकसले.
“सर प्रकाश काथे.”
शेजारच्या साहेबाने पाड्डकन डोक्याच्या मागे मारले “बापाच नाव.?”
“एकनाथ”
“पूर्ण नाव.?”
“प्रकाश एकनाथ काथे.”
“काय करतो.?”
“इंजिनियरिंग”
फाडss बाजूने कानशिलात बसली, “बाप इंजिनियरिंगला ए तुझा.? भडव्या आम्हाला बनवतो.?” फाडss.
“नाही सर, नाही सर, सॉरी सर. मी, मी इंजिनियरिंगला ए सर. वडील शेती करतात.”
“तू काय करतो ते कोणी विचारलं.?” पाड्डss, मागच्याने डोक्यात मारली.
“नाही सर, सॉरी सर.”
“हम्म चल बोल आता काय करतो”
“अं.. कोण सर.?” पाड्डss, मला प्रश्न विचारणार भडव्या तू.
“बोल चल. तू काय करतो बोल.”
“नाही सर, सॉरी सर. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला ए सर मी.”
“साला एवढा शिकून असले धंदे करतो” एकाने गच्ची धरून विचारले.

“नाही सर. चूक झाली सर. उद्या परीक्षा होती सर त्यामुळे घाई होती जरा”

“ओहोहो ओके ओके. घाई होती काय तुला.? साहेबांना घाई होती बरका” फाटss. “हे शिकवलं तुझ्या भडव्या बापानी.?”

बापाचा असा उल्लेख ऐकून प्रकाशकडून राहावल नाही, “तुमच्या क्लार्क ने मला तस करायला लावल सर. माझ्या बापाच नाव कशाला मध्ये आणता” प्रकाश म्हणाला.

“साला स्वतः हरामखोरपणा करतो वरून आमच्या मानसाच नाव घेतो” फाटss “डीपार्टमेंट च नाव खराब करतो भेन्चोद!” फाटss फाटss. सगळ्यांनी चारही बाजूनी हात साफ करून घेतला.

“कोणी सांगितल तुला अस करायला.? नाव सांग त्याच चल. आणि पुरावा काये तुझ्याकडे.?”

“नाव नाही माहित सर” प्रकाश म्हणाला.

“साला हरामखोर नाव पण माहित नाही मग ऐकल कशाला तू त्याच.? भडव्या.” अस म्हणून एकाने बखोटीला धरून प्रकाशला उभ केलं आणि दाराकडे ढकलत म्हणाले “चल जा चल. दाखव कोण होतं तो हरामी. आण त्याला शोधून इकडे.”

प्रकाश धडपडत त्या क्लार्कच्या टेबलापाशी गेला. तिथे कोणीच नव्हते. परत येऊन त्याने आजूबाजूच्या लोकांमध्ये पहिले. नाही दिसला. त्याला समजून चुकले कि तो आता इथे मिळणारच नाहीये. ‘गेम खेळताएत साले’.
“नाही सर नाहीये इथे.” प्रकाश परत निमुटपणे जाऊन त्यांच्या मध्ये उभा राहिला.

“ह मग. नाहीये ना.? आमच्या डीपार्टमेंटचा माणूस अस हे करणारच नाही. कळाल का.?” साहेब म्हणाले.

“कोणी होत का आमच्या डीपार्टमेंटच यामध्ये.?” एकाने पुन्हा दरडावून विचारले.
“नाही सर.” इति प्रकाश.
“गुड. सगळ तू स्वतःच्या मनाने केल. बरोबर.?”
“.....”
“बरोबर का.?” दुसऱ्याने दरडावून हात उगारला.
“यस सर, यस सर” तो मार चुकवत प्रकाश पटकन म्हणाला.
“काय यस सर यस सर काय.?” परत एकाने विचारलं
“मी, मी मनाने केलं सर” प्रकाश हतबल होता.

मार एव्हाना बंद झाला होता. बसलेले साहेब लोक चारही बाजूंनी प्रकाशला झापत होते. काहीना काही बोलत होते. प्रकाशच्या भावना आता गोठल्या गेल्या होत्या. तरी ते बोलतच होते.

“तुला माहितीये तुझ्या सारख्या लोकांमुळे गव्हर्नमेंटच नाव किती खराब होतं ते.?”

“हो ना. कुठे गेल कि तुझ्या सारखे इंजिनियर लोकतर पहिले आमच्याकडे तुच्छतेने बघतात. कारण काय तर हे हरामखोर प्रायव्हेट मध्ये काम करतात. म्हणजे काय? तर घाम गाळून पैसे कमवतात. आणि आम्ही.? आम्ही म्हणजे दिवसभर बसून खुर्च्या उबवणार आणि वरून भष्टाचार करून लोकांचे पैसे खाणार अस वाटत ना तुम्हाला.?”
प्रकाश खाली बघत घालून हळूहळू मान हलवत होता. ‘न जाणो उत्तर नाही देत म्हणून परत मारायचे.’

“आरे त्या आण्णा हजारेने उपाशी राहून आंदोलन केल. माहितीये ना तुला.? पेपर वाचतो कि नाही.”

“यस सर” प्रकाश बारीक आवाजात म्हणाला.

“तुम्ही तरुण जर अस वागणार असाल तर काय उपयोग त्यांनी उपाशी राहण्याचा.?”

“हे ना साहेब असे नाही सुधारणार. पोलिसातच द्याव लागणारे याला” एकाने साहेबाला सुचवले.
प्रकाशने चमकून वर पाहिलं. त्याच्या छातीत चमकच भरली. तो काय त्याचा बाप पण अजून पोलीस ठाण्याची पायरी चढला नव्हता.

“नाही ते तर आपण रीतसर प्रोसेस करणारच्चे. कोर्टच याला काय द्यायचं ती शिक्षा देईल.” साहेब म्हणाले.
प्रकाश आता अजूनच घाबरला, त्याला काहीतरी करून हे थांबवण भाग होतं.
“सर, मी इंजिनियरिंग ला शेवटच्या वर्षालाय सर. अस नका ना करू प्लीज सर. माझं सगळ करीयर बरबाद होईल सर. पाया पडतो सर मी तुमच्या. एवड्या वेळेस सोडा सर. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही सर. प्लीज” तो विनवणी करू लागला.

“नाही नाही एकदा तुमच्या पिढीला धडा शिकवलाच पाहिजे. तुझी बातमी पेपरात छापून येईल तेव्हा समजेल तुम्हा लोकांना. त्याशिवाय नाही तुम्ही सुधरणार.” इति साहेब.

“सर पण मीच का सर. सर मी आईशप्पत पुन्हा आयुष्यात अस नाही करणार सर. प्लीज सर एवड्या वेळेस माफ करा सर. प्लीज सर. सर, सर प्लीज सर, ओ साएब सर सssर” साहेब फोन लावू लागले तसे प्रकाश खूळ लागल्यागत बोलू लागला.
तरी साहेबांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत पोलिसांना फोन लावलाच, “हेलो. पोलीस स्टेशन.?”

पोलीस स्टेशन शब्द ऐकल्यावर मात्र प्रकाश पुन्हा भानावर आला, “सsssर. मी मरून जाईल ना सर. एवड्या वेळी सोडून द्याना सर. लै पुण्य लागेलं सर तुम्हाला” अस म्हणून त्याने मोठ्याने रडत साहेबांचे पायच धरले. “बाजूला घ्या रे याला. बसवून पाणी द्या जरा.” साहेबांनी शिपायांना सांगितले.

शिपायांनी त्याला बाजूला नेऊन बसवले अन पाणी आणून दिले. आता त्याला पार गांगारल्यासारख झाल होतं. पाण्याचा एक घोट पिऊन शून्यात नजर ठेऊन तो तसाच बसला. साहेबांचे शेवटचे शब्द फक्त त्याच्या कानावर पडले, “हो हो एकदम रेडहेंड पकडलाय. पाकीट पण आहे. ..... . बर बर या दहा मिनटात या.”

सगळे पाहणारे हळू हळू पांगले. जो तो आपापल्या दिशेने निघून गेला. प्रकाश तिथेच बसून होता. त्याला ग्लानी आल्यासारखं झाल. चार पाच मिनटात पोलीस येताएत हे आठवून तो झटकन ध्यानावर आला आणि सावरून बसला. आता काय कराव याचा तो विचार करू लागला, ‘शीट यार! काय झंझट मध्ये अडकलो आज. शीट आता कोणाला फोन वगेरेपण करता येणार नाही, फोन करण्यासारखे सगळे बाबांच्या ओळखीचेत. त्यांना समजल तर काही खैरच नाही. काय कराव’ एवढा विचार करता करता पोलीस आलेच.

“या या इकडे या. ह मीच फोन केल्ता तुम्हाला.” साहेबांचा आवाज आला.
“ह काय हो साहेब काय झाल म्हणे.?” पोलिसांनी विचारलं.
साहेबांनी कस पकडल काय त्याची थोडक्यात स्टोरी सांगितली.
“बर बर, जातो घेऊन जरा आतली हवा खाल्ली कि होतात सरळ” म्हणून पोलीस प्रकाशकडे आला आणि हाताला धरून त्याला घेऊन जाऊ लागला. आता तिथेच जे काय व्हायच ते होईल, इथे बोलून तर उपयोग नाही हे त्याला कळाले होते. तो निमुटपणे पोलिसांसोबत गेला.

......
पोलिसांच्या गाडीत जाताना एक हवालदार त्याला म्हणाला,
“काय भाऊ. जेलची हवा खाल्लीये का कधी.”
“नाही”
“ओह फस्ट टाईम. गुड गुड.”
“....”
“साहेब म्हणत होते इंजिनियरिंगलाय म्हणे तुम्ही.”
“हो”
“रेकॉर्ड मध्ये एकदा नाव आल कि कठीण होऊन बसत बरका सगळ. बाहेरच्या देशात जाता येत नाही. कंपन्या नोकरी देत नाहीत. तुमच्या सारख्या शाहण्या माणसाने या झंझट मध्ये पडून नये अस आम्हाला वाटत बघा.”

त्याने नोकरीचा विषय काढून नकळत प्रकाशचा वीक पोइंट पकडला. प्रकाशला कळाल हे संभाषण कुठल्या दिशेने जाणारे. पण यावेळी तो अतिशय सावधपणे बोलणार होता,
“साहेब तेच रिक्वेस्ट केली मी त्यांना. पण काय उपयोग नाही झाला.”

दोन मिनिटांनी एक हवालदार एकदम प्रकाशच्या कानाजवळ येत बारीक आवजात बोलला, “बघा काही सेटिंग करायची तर करू शकतो आपण. इथूनच घरी जाता येईल तुम्हाला.”

प्रकाश दोन मिनिट काहीच बोल्ला नाही. त्याला पुन्हा त्या भानगडीत अडकायचं नव्हत.
पण पोलिस रेकॉर्ड्समध्ये नाव गेलं तर खरच मोठा प्रोब्लेम होणार होता. म्हणून त्याने हिंमत करून खुणेनेच विचारलं ‘किती?’.
हवालदाराने पाच बोट केली. “पाचशे.?” त्याने शेजारच्या हवालदाराच्या कानात विचारलं.
तो थोडावेळ काहीच बोलला नाही. नंतर हळूच म्हणाला, “लाइफ वाचवतोय भडव्या तुझ. भिकारी समजला काय आम्हाला.?”

‘म्हणजे पाच हजार! आत्ता अकाउंट मध्ये जेमतेम साडेपाच आहेत. आत्ता पाच गेले तर परत लगेच बाबांना पैसे टाकायला सांगाव लागेल. शीट यार. पण इथून सुटण पण तर इंपोरटन्ट ए. बघू काही घासागीस होतेय काय नाहीतर देऊन टाकू. काय करणार’ एवढे पैसे द्यायचा त्याचा काही जीव होईना. शेवटी पाच मिनिटाने तो नाईलाजाने हवालदाराला म्हणाला “एवडे नाहीयेत भाऊ, बघा जरा ...”
तेवढ्यात गाडी थांबलीच. पोलीस स्टेशन आल होतं. हवालदाराने काहीच न बोलता प्रकाशला आत नेऊन बसवल.

......
आर्ध्या पाउण तासाने त्याला सब-इन्स्पेक्टर समोर नेऊन बसवण्यात आल.
“काय केलस बाबा.?” सब-इन्स्पेक्टरने विचारले.
“ब्राईब केसे सर.” प्रकाशला घेऊन आलेल्या हवालदारने सांगितल.
“ब्राईब केसे. बरं. म्हणजे किती...? एक दिवस जेल आणि पाच हजार दंड होईल. ठीके करा FIR तयार करा आणि याला लॉकअप टाका.” सब-इन्स्पेक्टर म्हणाला.

प्रकाशला आता शेवटचा प्रयत्न करणार होता. तो हात जोडून सब-इन्स्पेक्टरला म्हणाला, “सर. स्टूडेंटे सर मी, लाइफ बरबाद होईल सर माझं. बघा सर काहीतरी. तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार सर. प्लीज. एवढी वेळ सोडून द्या सर. आई शप्पत पुन्हा अस नाही करणार सर.” तो कळवळून बोलत होता.

“अशा गोष्टी करण्याआधी विचार करायला पाहिजे भाऊ.... काय.? आता गयावया करण्यात काय अर्थ ए. त्यात तुम्हाला तर रेडहेंड पकडलंय म्हणे. अशा केस मध्ये काहीच करता येत नाही” सब-इन्स्पेक्टर म्हणाला.

“....” प्रकाश हरल्यागत खाली पाहत राहिला. काहीच न बोलता. ‘हे सगळ घरी कळू न देता एक दिवस काढून घ्यावा लागेल कि काय’ असा विचार त्याच्या मनात आला, तेवढ्यात सब-इन्स्पेक्टरने पुन्हा विचारले.

“वडील काय करतात.?”
“अं.. सर शेतकरी आहेत ते.”
“द्या फोन नंबर द्या त्यांचा. त्यांना पण माहिती पाहिजे पोरगा काय दिवे लावतोय इथे.”
या अचानक पडलेल्या बॉम्बने मात्र प्रकाश बिथरला, तो बाकी काहीही सहन करू शकत होता. हे नाही.
तो एकदम फर्मली म्हणाला, “आमच्या घरी फोन नाहीये सर.”
“बर मोबाईल नंबर दे वडलांचा”
“वडलांकडे मोबाईल नाहीये सर”
“हेहे ए बघारे... हा आपल्याला येडा समजून राहिला.” सब-इन्स्पेक्टर इतरांना उद्देशून म्हणाला.
“खरच नाहीये सर त्यांच्याकडे मोबाईल. त्यांना वापरता नाही येत” प्रकाश म्हणाला.

“भाऊ. हे बघ, जास्त नाटकं करू नको. भिकाऱ्याकडेपण मोबाईल असतो आता. बऱ्या बोलान विचारतोय तेवढ सांग. गांडीवर काठ्यांचे वळ उमटले कि लोकांना सगळ आठवत. उगाच पोलिसांशी वाकड्यात जाऊ नको. महागात पडेल.” सब-इन्स्पेक्टर हट्टालाच पेटला होता.

प्रकाश काहीही झाल तरी बापाचा नंबर देऊच शकत नव्हता. बापाला कळाल तर त्यांना जाम धक्का बसेल हे त्याला चांगलच ठाऊक होत, “खरच नाहीये सर. आता मी काय करू” प्रकाश परत आर्जवी स्वरात म्हणाला.

“तिच्यायला.! स्टूडेंटे म्हणून अजून शांततेत बोलतोय भाड्खाऊ. तू तर माजतच चाल्ला.” अस म्हणून सब-इन्स्पेक्टर हवालदाराला उद्देशून ओरडला, “झडती घे रे जरा याची. भाड्खाऊचा मोबाईल काढा खिशातून. बापाचा नंबर असेलच त्यात.”

“सर तुम्ही अस नाही करू शकत सर. घरी खूप प्रोब्लेम होईल सर माझ्या. प्लीज सर” म्हणून प्रकाशने खिशावर हात दाबून ठेवला.
“आरे पण तुझ्या बापाकडे मोबाईलच नाहीये ना.? मग घाबरतो कशाला” सब-इन्स्पेक्टर बोलत असतानाच हवालदार त्याचा मोबाईल काढून घ्यायचा प्रयत्न करू लागला.

प्रकाशने त्याला जोरदार विरोध करायला सुरुवात केली. त्याला एकट्याला काही तो ऐकेचना. म्हणून मग अजून दोन हवालदार आले. प्रकाश मात्र झपाटल्यासारखा त्यांना विरोध करत होता, त्यांच्या अंगावर ओरडत होता, मधेच सब-इन्स्पेक्टरला विनंती करत होता. त्यामुळे स्टेशन मधले वातावरण जरा तंग झाल.

“अरे अरे ए काय चाललय. सोडा त्याला,” दरवाज्यातून एक पोलीस अधिकारी धावत येत ओरडला आणि त्याने प्रकाशला सोडवल. त्याला पाहून सगळ्यांनी खटाखट सलाम ठोकले. तो संतापला होता. एका हवालदारची बखोटी धरून तो म्हणाला, “कारे भाड्या! माजलास जास्त. सामान्य पब्लिकवर हात उचलतो?” हवालदारची पार ततपप झाली.
लागलीच त्याने हवालदारला सोडून आपला मोर्चा सब-इन्स्पेक्टर कडे वळवला, “And you.? Stupid fellow. Is this way to behave.? Is this the way you treat people.? I know these must be your orders. You come to my cabin after some time.” स्टेशनमध्ये शांतता पसरली.

आलेले साहेब इन्स्पेक्टर होते. ते प्रकाशला आत घेऊन गेले. आत खुर्चीवर बसल्या बसल्या त्याला रडू कोसळले. आजच्या दिवसाने अक्षरशः त्याचा जीव घेतला होता. साहेबांनी त्याला पाणी दिले, त्याच्यासाठी खास चहा बिस्कीट मागवले. तो हळूहळू शांत झाला. तोपर्येंत साहेबांनी त्याच्यावरच्या आरोपांची तो इथे कसा आला त्याची हवालदाराकडून माहिती घेतली.

प्रकाश जरा शांत झालेला पाहून साहेब म्हणाले, “झाला का शांत.? अस घाबरायचं नाही एवढ... चल जाऊदे सकाळपासून काय काय झाल ते डिटेल मध्ये सांग आता.”

प्रकाशने सगळ जस्स च्या तस्स सांगायला सुरुवात केली. तो कशासाठी आला होता. त्याची स्वतःची background काय आहे. लंच पर्येंत त्याला कस थांबवल गेलं. नंतर हॉस्पिटलच लेटर, खाकी लिफाफा, जिन्यातल प्रकरण. त्यानंतर आतमध्ये काय झालं. पोलीस घ्यायला आले....,

तेवढ्यात इन्स्पेक्टरचा फोन वाजला, ते फोनवर बोलू लागले, “ह बोला चव्हाण साहेब. हम होतच आलय काही अडचण नाही.”

या इन्स्पेक्टर साहेबांचा दरारा आणि चांगुलपणा पाहून प्रकाश हरखून गेला होता. ‘आता बघा लेकांनो, इन्स्पेक्टरला नाव सांगून एकेकाची कशी लावतो आता तुमची,’ असा विचार करत त्याने लाच मागणाऱ्या हवालदारचे नाव आठवून ठेवले.

“नाही नाही, काही contacts वगेरे काही नाही. सोपी केसे एकदमच” इन्स्पेक्टरचा फोन चालूच होता.

असच पाहता पाहता प्रकाशच लक्ष साहेबांच्या नेमप्लेट कडे गेलं. विलास अ. माने. ‘व्वा मानेसाहेब’ तो मनात म्हणाला. त्याला अचानक काहीतरी क्लिक झाल्यासारखं झाल. ‘आत्ता इन्स्पेक्टरने फोनवर काय नाव घेतलं..? शीट’ प्रकाशला शंका आली. तेवढ्यात साहेबांचा फोन झाला होता. ते त्याला म्हणाले,
“हम्म मग पुढे.? पोलीस तुला न्यायला आले. पुढे.?”
“पुढे... काहीनाही सर, त्यांनी मला गाडीत बसवल आणि .... आणल इथे. बाकी काही नाही.” प्रकाश म्हणाला. मनातून त्याला कळाल होत आपण परत एका संकटातून वाचलोय ते.

इन्स्पेक्टर जरा विचार करून म्हणाले, “बर ठीके प्रकाश. ऐक आता मी तुला नीट समजावून सांगतो. आता प्रोब्लेम असाय कि तुझ्या नावाने ते केस टाकणार आहेत. त्यामुळे तू कितीही चांगला असलास तरी तुला मला direct सोडून देता येणार नाही. काय.? कारण त्यांनी उद्या जर मला काही विचारलं कि या केसच काय झाल तर मला उत्तर द्यावच लागेल. लक्षात येतय ना तुला.?”

“यस सर, म्हणजे पण ते जेल......?” प्रकाश घाबरत घाबरत म्हणाला.

“नाही रे बाळ, तू ऐक तर पूर्ण.. तर मग तू अस कर. तो पाच हजार जो फाईन ए, तो तू भरून टाक आणि आरामात घरी जाऊन मस्त आराम कर आज. ओके? कारण तुझी background पाहता तुला जेल मध्ये वगेरे ठेवण माझ्याच मनाला पटणार नाही. काय.?”

“ओके सर... पण.... पाच हजाssर सर.?” प्रकाश बोलायचं म्हणून बोलला. त्याला माहित होत आता याचा काही उपयोग नाहीये.

“हे बघ प्रकाश. तू चूक केलीये हे तर तुला मान्यए कि नाही?”

“हो सर.”

“मग.? आपल्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावीच लागणार ना.? उलट तू चांगल्या घरातला वाटतोस म्हणून मी तुझी शिक्षा कमी करायचा प्रयत्न करतोय. बरोबर ना.?”

“होय सर. ...... सर पण ते केसच काय होईल आता.? रेकॉर्ड्सला ती केस आली तर माझ्या करीयरच खूप नुकसान होईल सर. बघा ना त्याच काहीतरी सर प्लीज.”

“Yes yes young man, I understand. मी तुझ्यासारख्या चांगल्या मुलाच नाव खराब होऊ देणार नाही हा माझा शब्द ए. आता एवढ्यातच काय ते समजून घे. ओके.? आणि जा आता, त्या काही फोर्मिलीटीज पूर्ण कर. पलीकडे ATM आहे, त्यातून पैसे काढून दंड भरून टाक आणि मोकळा हो एकदम. ओके.? खुश आता.?”

“ओके थ्यांक्यू सो मच सर. मी तुम्ही केलेली मदत कधीच विसरणार नाही सर” अस म्हणत प्रकाश उभा राहिला.

“Best of luck young man!” म्हणत इन्स्पेक्टरने त्याला एक कडक शेकहेंड केला.

बाहेर येऊन काहीतरी लिहिलेल्या एकदोन साध्या कागदावर प्रकाशच्या सह्या घेण्यात आल्या. त्याने काय आहे ते वाचायची सुद्धा तसदी घेतली नाही. सगळच नाटक चाललय हे त्याला कळायला लागलं होतं. शिवाय तो तरी कुठे ‘असली’ सही करत होता.

सगळ झाल्यावर एका हवालदारला त्याच्या सोबत ‘ATM दाखवायला’ म्हणून पाठवण्यात आल. त्याच्याकडेच पैसे द्यायला प्रकाशला आधीच सांगण्यात आल होत. पोलीस स्टेशनपासून जरा लांब असलेल्या एका ATM पाशी हवालदार थांबला. प्रकाश आत जाऊन पटकन पैसे काढून आला. ते हवालदारला देत त्याने जरा विचारू कि नको करत विचारले,
“साहेब... अं... ते.. दंडाची पावती.?”
“आरे ए भाऊ. आमच्या साहेबांच्या कृपेने भाहेर फिरतोय हे काही कमी झाल का तुला. पावती म्हणे. निघ चल” अस म्हणून हवालदार निघून गेला.

संध्याकाळचे आठ वाजले होते. प्रकाश तिथेच फुटपाथवर थोडा टेकला. थोड्या वेळ डोक शांत करून त्याने ताईला फोन केला,

“ह तायडे, छकुलीचे ते बर्थ सर्टिफिकेटच काम काही झाल नाही आज. लैच गर्दीये कामाची पुढच्या आठवड्यात या म्हणे, सांग भाऊजींना.”

ताईशी बोलण झाल्यावर त्याने बापाला फोन केला,

“हं बाबा. आज ते अचानक पाच हजार फी भरायचं सांगितल अहो, काय कि ते इंटरव्हिवसाठी काहीतरी ट्रेनिंग देणार ए म्हणे” बाप बिचारा ‘बर बर ठीके उद्या परवा जमवून टाकून ठेवतो अजून’ म्हणला, प्रकाशला मनापासून वाईट वाटलं.

आता सगळ्यांना सगळ सांगून झाल होतं. तो तसाच निवांत वारा खात बसला. ‘चला जे झाल ते झाल. गेलं ते आता. उद्यापासून सगळ विसरून जोरदार आभ्यासाला लागायचं. नोकरीतर लागलीच पाहिजे ना..’ असेच विचार करत करता मध्येच त्याला साहेबांच्या फोनवरचे संभाषण आठवत होते. त्याचे अर्थ समजून तो स्वतःवरच हसत होता.

“नमस्कार माने साहेब. काय म्हणता.? बेत पक्का ना मग आजचा.?”

“आम्हीतर एनीटाईम तयार आहोत साहेब. एक मिंट ह जरा,” अस म्हणून फोन चालू ठेऊन केले गेलेली आपली विचारपूस त्याला आठवली. आणि त्यानंतरचा चव्हाणचा डायलॉग,

“हम परफेक्ट ए एकदम, तेच म्हणणार होतो मी.”

‘हरामखोर चव्हाण.’
.......
“ह बोला चव्हाण साहेब. हम होतच आलय काही अडचण नाही.”

“नाही नाही, काही contacts वगेरे काही नाही. सोपी केसे एकदमच”

‘हरामखोर माने’

‘च्युतीये ए सगळे साले. चव्हाण, माने आणि मी. मी सगळ्यात मोठा च्युतीया, मानेसाहेबांचे उपकार डोक्यावर असलेला, महाच्युतीया!’ स्वतःशीच खिन्नपणे हसून प्रकाश उठला आणि होस्टेलची वाट धरून चालू लागला.

------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा ..
कितीतरी केसेस अश्याच विस्मरणात ढकलल्या जात असतील ! >> खरय हो !
मलाही काही घटना माहीत आहेत, पण लिहायचा धीर होणार नाही मला. >>> तुम्ही तर छानच लिहिता , काहीतरी हेराफेरी करून, मनाला त्रास न करता लिहिता आल तर बघा कि.. या गोष्टींची चर्चा झाली कि वाचणारे ऐकणारे थोडे सतर्क होऊ शकतात अस मला वाटत..

पिकेश भाऊ - किस्सा अगदी मस्त लिहिला आहे , आणि खर तर असे अनेक अनुभव येतात सरकारी कार्यालयामध्ये , पण ज्या तरुणांना अश्या सरकारी बाबुनी त्रास दिला आहे ना , त्या तरुण पिढीनेच शिक्षणाने यांच्या वरच्या खुर्चीवर बसून यांच्या प्रत्येक कृत्याचा बदल घेतला पाहिजे .

ध्यन्यवाद विशुभाऊ,
खरे आहे आपले..
मुख्य गोष्ट हि आहे कि असा प्रसंग घडायला या सरकारी बाबू इतकेच प्रोसिजर मधून सूट मिळावी म्हणून लाच द्यायला तयार होणारे सुद्धा जबाबदार आहेत.. या प्रसंगातील सरकारी बाबू जितके वाईट, तितकाच प्रशांतसुद्धा मूर्ख आहे असे मला वाटते..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

Pages