त्या फुलांच्या गंधकोषी....सांग तू आहेस का?

Submitted by अत्रुप्त आत्मा on 8 April, 2015 - 10:06

काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्‍या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि!
(मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे? ते नंतर पाहू!)
===================================================================

त्या फुलांच्या गंधकोशी, सांग तू आहेस का?
हे भगवंता.., आंम्ही मानवांनी..अज्ञानातून ज्ञानाच्या कक्षेकडे जाताना, तुला मारलेली..ही पहिली हाक आहे.. गंधासारखी एक गोष्ट ही नेमकी हरेक फुलाप्रमाणे बदलत जाते,परंतू त्या तिथे ..त्याची असण्याची पद्धति तीच रहाते..म्हणजे आशय एक आणि शब्द फक्त वेगळा,अशी काहिशी काव्यात्म स्वरुपाची ही स्थिती..या फुलांच्या ठाई निर्माण कुणी केली??? तर ही त्या निसर्गाची एक जीवनक्रीया. म्हणुन हे परमेश्वरा..माझे भाबडे मन तुला तिथे शोधते आहे.

त्या प्रकाशि तारकांच्या,ओतिसि तु तेज का?
इश्वरा...मी हे सुवर्ण वा रौप्यकांतिमय गोलक हज्जारो वर्षापासून अवकाशात पहात आलो..त्यांची दीप्ती ,प्रकाश सर्व काहि मनाला वेड लावते! आणि ब्रम्हांडांच्या पसार्‍यात, हे गोलक अजुनंही तगून आहेत..इतकेच नाही..तर त्यांची कांति नित्य नूतन वाटावी असे ते लखलखतात..मग हे तेज तुझ्याच या अनंताच्या पसार्‍यातले त्यांना लाभलेले एक दान आहे,असे आंम्ही समजावे का? हे अज्ञाता..! सांग मला...? या तेजाचा दाता तूच तर नाहिस???

त्या नभाच्या नीलरंगी हो‍उनीया गीत का?
भगवंता.., हे न कळणारे अथांग..विस्तीर्ण..अफाट..अद्भूत..,असे आकाश ज्याच्याकडे केवळ दृष्टी वळली तरी मला त्यात सामावून जावेसे वाटते.. नव्हे..ते माझेच वाटते! .. ते नीलरंगी आहे..परंतू त्याची एकंही छटा ,इहलोकिच्या कोणत्याही कृत्रिमात पकडता येत नाही..जे केवळ शब्दांनी व्यक्तवता येते..असे ते जे आहे...आणि तसेच ते आकलनंही होते..ही किमया तूच त्याच्याशी एकरूप अथवा समरूप होऊन ..गीत होऊन.. आमच्या पर्यंत पोहोचवित तर नाहीस ना?

गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का?
वायूचा देहास घडणारा स्पर्श..हे तर तुझे भौतिक रूप झाले. पण मला ते तुझेच बोल वाटतात...तू त्या वायूलाच माध्यम करून स्वररूप होऊन माझ्या कानांपर्यंत मनापर्यंत तर पोहोचायचा प्रयत्न करित नाहीस ना? जे काळायला माझे मन तुजविषयी प्रथमतः अनुकुल नसते...म्हणून तर..तू ही किमया,घडवित नाहीस ना?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
आंम्ही माणसे इहलोकी जिवंत आहोत्,हे सृष्टीचे दातृत्व आंम्ही मान्य करतो..परंतु आंम्ही नक्की जगतो कसे? कुणासाठी? आणि का म्हणून? आमची सहजीवनाची..समुहजीवनाची-ही नक्की कुठची प्रेरणा??? जिवंत असण्यातला आणि जगण्यातला हाच काय तो मूलभूत फरक!? जो आमच्या अंतरी ..प्राण नामाच्या तत्वानी.. कामना रूपात व्यक्त होत असतो!..तो तूच तर नाहिस ना?....आमच्या अंतरीचा प्राण! आंम्हाला जगविणारा आमचा जीव!

वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?
ज्या विषयी आंम्हाला आकर्षणंही वाटतं,आणि ज्यापासून भयंही आहे..असे तूझे रूप..मग ते समुद्ररूपी येवो अगर तुझ्या कुठल्याही चमत्कृतीचा तो आविष्कार असो...तो घोर आहे.त्याविषयी बुद्धी..,शोध करून थकते.परंतू उत्तर न मिळवावे..तर जगण्याच्या मार्गात येणारे जे 'वादळ'.. ते हेच तर नाहि ना? तुझ्या रूपातले आणखिन एक..?असा प्रश्न आंम्हाला पाडते,आणि सारे काहि अगम्य होते..म्हणजे हे ही पुन्हा तूच!

जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?
कृपा...! , - भगवंता...,ज्यानी निश्चित पणे फलाची प्राप्ती होते..असे तुझे हे कृपा-स्वरूप्..तुझे परिमाणच का म्हणू नये आंम्ही? हे तुझे कृपा-रूप..त्या धरतीवर बरसणार्‍या मेघांप्रमाणे केवल फलप्राप्तीसाठीच तर तयार झालेले नाही ना? खरेच!!!.., इहलोकिच्या आमच्या या जीवनावर..,जगण्यासाठी आवश्यक अश्या सर्व फलांची प्राप्ती होण्याकरिता तू,आमच्याकडे..त्या कृपेचा मेघच होऊन येतो आहेस! (तुला नमन असो..)

आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
ती वीज असेल पंचमहाभूतांपैकि! ती तर तिची स्थिती-झाली..पण तू तिला घेऊन ज्या रूपात अवतरतोस ..त्या तुझ्या-गति नुसार, असे काहि चैतन्यमय..अद्भूत..विस्मयकारक .ज्याला पहाता क्षणी स्तब्ध व्हावे...काहि क्षण थबकावे..भ्यावेही!..असे ते तुझे, आसमंतातून लखलखत जमिनीवर येणारे-रूप आहे, हे आंम्ही आता ओळखले आहे...निश्चित!-ते तुझेच रूप आहे..(पण खरेच!..,आहे का???)

जीवनी संजीवनी तू ,माउलीचे दूध का?
आंम्हाला निसर्गाचे अपत्य म्हणून ..,मनुष्याच्या मुलाचा जो जन्म मिळतो..ती 'घटना' म्हणजे आमुची प्रथम माऊलि..आणि त्यातून आमच्यामधे ही...,निसर्गाशी लढत झुंजत जगण्याची जी प्रेरणा मिळते..ते आमचे खरे स्तन्य! ..दूध! म्हणून ती अवस्थारूपमाऊली जर जीवन असेल..तर हे प्रेरणारूप दूध... ही आमची संजिवनी आहे,,आणि संजिवनी सहजंप्राप्य नाही..म्हणुन ती तू आहेस!

कष्टणा-या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?
जीवन जगण्यापासून आणि ते जगण्याकरिता ,आंम्ही सरेच कष्टतो.. पण आमच्यापैकि काहि असेही आहेत..कि ज्यांना या कष्टाचा परतावा म्हणूनंही पुन्हा उपेक्षा अथवा दु:ख्ख वाट्याला येते.म्हणून..., तसे जे खरेच कष्टं'तात..त्यांच्या डोळ्यात तर तू कारुणेनी वा झरणार्‍या दु:ख्खाच्या रूपानी प्रकट होत नाहिस ना? आणि तो तूच असला पाहिजेस..!!! कारण त्याशिवाय... आंम्हाला हे सर्व जाणवले तरी असते का रे!?

मूर्त तू मानव्य का रे,बालकांचे हास्य का?
तुला एका ठराविक कल्पनेत कोंडता यावं अगर वर्णिता यावं असं तुझं(मूर्त) स्वरूप आहे का रे?, का त्याही बाहेर तू केवळ मानवतेच्या रूपात आहेस? की हे सारे नाहिच मुळी...!, अन तू फक्त ..जन्मापासून फक्त काहि कालावधी जाइपर्यंत..जे आंम्ही तुझे एक निरागसतेचे समरूप म्हणून जगतो... ते केवळ बाल्य आणि त्याचे प्रकटीकरणरूपं असलेलं..- जे हास्य आहे.. ते बालकांचे निरागस हास्य तू आहेस का? .. असायलाच हवसं! आणि तुला याविरुद्ध तक्रार करता येणारंही नाही..कारण जर तू या रुपातून वजा झालास,तर आंम्ही तुज विषयी अधिक काय कल्पायचे??? सांग बरं!

या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?
किती तुझी रूपे वर्णावी..? किती विशदावी? किती कोड्यात पडून पहावी? तू नाहिस अशी पूर्ण खात्री पटली..तरिही...तुझ्या शोधाची भूक शमूच नये... या आमच्या..जीवन जगविणार्‍या प्रेरणाबीजाकडे...म्हणजेच- न संपणार्‍या कुतुहला कडे पाहून, तरी सांग आता.... "या इथे अन त्या तिथे रे सांग तू आहेस का?"
////////////////////////////////////////\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

गीतः-सूर्यकांत खांडेकर __/\__/\__/\__
आणि ज्यांच्या संगीतंगायकी शिवाय, हे गीत माझ्या(सारख्या)पर्यंत पोहोचूच शकले नसते,
त्या पं.हृदयनाथ मंगेशकर. यांस _-/\-_

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=ZV8SkrmwFX0

------------------------------------------------------------------------------------
हे या गीताचे फक्त बिंब झाले...प्रतिबिंब..आता पुन्हा....असेच केंव्हातरी!
जेंव्हा मला ते पूर्ण छळेल.....तेंव्हाच! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेखन.. तशी याची चाल सोपी नाही तरी प्रत्येक ओळ त्या चालीवरच वाचावी लागते, एवढे जबरदस्त गारुड आहे या गीताचे.

परागशास्त्री दिवेकरांस बालके गाम्याचा आदरपूर्वक प्रणाम.

हृद्गत अतिशय हृद्य शब्दांत उतरलं आहे. Happy

आपला नम्र,
-गामा पैलवान

पराग....

~ या क्षणी माझ्या आनंदाला दोन पाकळ्या आहेत. एकतर तुमची जितकी देखणी आपुलकीची भाषा तितकीच ती प्रासादिक उतरली आहे. दुसरी बाजू म्हणजे मानवी नयनाला आजअखेर प्रत्यक्ष स्वरुपात न दिसलेल्या परमेश्वराला त्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्नार्थक रुपाची आवाहन मालिका काव्यात गुंफ़णारे कवी डॉ. सूर्यकांत खांडेकर हे माझ्या खूप परिचयाचे होते. गुरुजीच होते आमच्या कॉलेज जीवनातील वर्गबंधूंचे. माझे घर त्यांच्या "सावली" या घरापासून अगदी पाच मिनिटांच्या रस्त्यावर.

"सांग तू आहेस का ?" हृदयनाथांनी खूप जवळची मानलेली ही आणि आशाताईंच्या आवाजातील "सहज सख्या...." या दोन रचना आकाशवाणीच्या सांगली केन्द्रावरील "आपली आवड" कार्यक्रमात सातत्याने प्रसारित व्हायच्या. खांडेकरांच्या मुखातून "गंधकोषी" विषयी त्या आवाहना (आवाहन हे त्यानी वापरलेली संज्ञा होय...) बाबत ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. त्या अनुषंगाने मी आज तुमच्या लिखाणाकडे पाहिले आणि कवी आणि तुम्ही यांच्या मनी असलेले विचार नेमके तेच आहेत हे सांगताना मला विशेष आनंद होतोय.

एकच फरक म्हणजे...."..कष्टणा-या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?..." इथे तुम्ही "त्यांच्या डोळ्यात तर तू करुणेनी वा झरणार्‍या दु:ख्खाच्या रूपानी प्रकट होत नाहिस ना?..." अशी छटा पाहिली आहे. सरांच्या नजरेत त्या बांधवांच्या डोळ्यातील स्वप्न होते. अंगमेहनत करणार्‍या शेतकरी वा कामगाराला नेहमी कारूण्याने वा दु:खाने पिचलेले बांधव असे कवी पाहात नसून त्याच्याही डोळ्यात काही स्वप्ने असतात....त्या स्वप्नांकडे तू पाहतो आहेस का रे हे शक्तीमाना ? असा भाव उमटतो. अर्थात मी आता या क्षणी सारे काही स्मरणशक्तीच्या आशेवर सांगत आहे. कदाचित तुमचाही भाव अचूक असू शकतो. शेवटी कवी जे लिहितो त्यातून प्रत्येकाने आपल्या मगदुरीप्रमाणे चिंतन करायचे असते हेही तितकेच सत्य.

कवी सूर्यकांत खांडेकर हयात नाहीत, असते तर मी स्वतःच त्याना तुमचे विचार वाचून दाखविले असते. असो. एका सुंदर आठवणीला तुमच्या लेखामुळे उजाळा मिळाला.

व्वाह व्वाह ! अशोकजी. खूप सुंदर आठवणी.

त्यांना प्रत्यक्ष पाहिलेला,अनुभवलेला माणूस माझे लेखन वाचतो... या इतका भाग्याचा ठेवा अन्य काय माझ्यासाठी? आज हे लेखन खरच सार्थकी लागल्याची भावना मनात दाटून येत आहे. . __/\__

सुंदर रसग्रहण अतृप्त.

चैतन्याच्या अमूर्त प्रतिमांमुळे कवीला जे प्रश्न पडलेत ते प्रत्येकाला कधी न कधी पडतातच..

पराग...धन्यवाद.

~ "त्या फुलांच्या गंधकोषी..." संदर्भात आणखीन एक विशेष सांगतो (कदाचित तुम्हाला आणि इथल्या अनेक सदस्यांना माहीतही असेल...) आणि ते म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या "भावसरगम" या कार्यक्रमाची सुरूवात नेहमी या गीतानेच करत असत. अनेक गाणी त्यानी बसविली भावसरगमसाठी...अनेक गाणी काढून टाकली...नवीन आणली...नवी जुनी या यादीत साहजिकच बदल होत गेले...तरीही "गंधकोषी" त्यानी कधीच बंद केले नाही.

मला वाटते एक प्रकारे ते स्वतःच या गीतातून ईश्वराकडे सातत्याने विचारणा करीत राहाणे पसंत करत असावेत.

अश्विनी के

@वाह! खूप सुरेख भावार्थ उतरवला आहे. बिंबाचे प्रतिबिंबही लवकरच उमटू दे >> हम्म्म..
---------------------------------------------------
दिनेश

@सुंदर लेखन.. तशी याची चाल सोपी नाही तरी प्रत्येक ओळ त्या चालीवरच वाचावी लागते, एवढे जबरदस्त गारुड आहे या गीताचे.>>> येस.. पण वैशिष्ठ्य म्हणजे हे प्रचंड गेय्य आहे. त्यामुळे भावार्थ सहजच मनात उतरु लागतो.
--------------------------------------------------------

बाळू पॅराजंपे

@चैतन्याच्या अमूर्त प्रतिमांमुळे कवीला जे प्रश्न पडलेत ते प्रत्येकाला कधी न कधी पडतातच..>> हम्म्म..माझ्यामते हे सर्व म्हणजे,मानवाच्या मूलभूत धर्मचिंतनाची सुरवात.
----------------------------------------------------------------

सर्व वाचक,प्रतिसादकांचे धन्यवाद. Happy __/\__

खूप सुरेख लेख, प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.
खरेतर मी मूळ लिखित शब्दाचा भोक्ता पण हे गाणे वा 'भय इथले संपत नाही'....किंवा अगदी ज्ञानेश्वरांच्या काही रचनांना पंडितजींनी लावलेली चाल आणि त्यामुळे वाढलेली लोकाभिमुखता पाहिली की स्वरांचे महत्त्वही कळते. अशा कविता व गीते चालीत बांधली गेली नसती तर खूप लोकांना त्यांचे अस्तित्व कळलेही नसते कदाचित!

@अशा कविता व गीते चालीत बांधली गेली नसती तर खूप लोकांना त्यांचे अस्तित्व कळलेही नसते कदाचित>>>> यहि तो! आपल्याकडील वाचनसंस्कृतीचे बाळ'कडू पहाता,हे जवळ जवळ हरेक बाबतीत खरे ठरावे.

अमेय...

"...अशा कविता व गीते चालीत बांधली गेली नसती तर खूप लोकांना त्यांचे अस्तित्व कळलेही नसते कदाचित!.." ~ अगदी अगदी योग्य लिहिले आहेस.

आपले नशीब थोर यासाठी की पंडित हृदयनाथ यांच्यासारख्यांनी ह्या कवींच्या कलाकृतीना चाली बांधून त्या समस्त रसिकांपुढे ठेवल्या, अन्यथा ग्रेस, महानोर, खानोलकर अशांच्या गद्य समजल्या जाणा-या रचना कधी सर्वसामान्यांच्या कानी पडण्याची सुतराम शक्यता नव्हती.

"घर थकलेले संन्यासी...." ग्रेसच्या या कवितेतील
पक्षांची घरटी होती ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे असतेच झर्‍याचे पाणी
.... ~ या ओळीत एरव्ही पाहिले तर एक विचारणा आहे, याला चाल काय लावायची ? पण ते पंडितांनी केले....त्यांच्या बुद्धीची ही कमाल.

तीच कथा महानोरांच्या "आम्ही ठाकर ठाकर..." याला दिलेली लोकसंगीताची चाल...सारे काही हवेहवेसे करून टाकले आहे यानी.

सुंदर लेख,चर्चा..
इथे या संदर्भात सावरकरांच्या कवितांचाही उल्लेख करावासा वाटतो.. त्याही हृदयनाथांमुळेच महाराष्ट्राच्या हृदयात घर करून राहिल्या एरवी भाषा, विचार, त्यामागचा आचार सगळं काही शुद्धतेची परिसीमा गाठणारं असूनही त्या एका विशिष्ट वर्तुळातच राहून गेल्या असत्या.

त्याही हृदयनाथांमुळेच महाराष्ट्राच्या हृदयात घर करून राहिल्या>>>>> अगदी अगदी.
शांता शेळके यांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे.की मंगेशकर फॅमिलीतील हृदयनाथ मंगेशकर हे अतिशय हुशार आणि सखोल वाचन असणारे आहेत.( शब्द वेगळे भावार्थ हाच.)

वा वा! किती सुरेख लिहील आहे!
माबोकर झाले याच सार्थक झाल.

अतृप्त जी... आपले लिखाण म्हणजे हीरा म्हणले तर अशोक जीं ची प्रतिक्रिया म्हणजे त्या हिर्‍याचे कोंदण.

वाह ...

वाह... . हे वाचेपर्यत माझ्यासाठी " गंधकोशी " एक अगम्य गीत होते. आता पुन्हा ऐकताना भावार्थ सुध्दा सोबत असेल.

पं. ह्रदयनाथांनी गाण्यासाठी किंवा संगीतरचनेसाठी अश्या अनेक रचनांची निवड केली आहे ज्या मीटरमधे नाहीत. चाल द्यायला आणि शब्दांचे भाव प्रकट करायला अवघड आहेत.