स्पृहा

Submitted by नितीनचंद्र on 8 April, 2015 - 02:50

तो क्षणच मोठा खतरनाक होता. अस वाटल की मागुन येणारा ट्रकवाला बेभान झालाय. आपण उजवीकडे वळायचा इंडिकेटर दिलाय याच्याकडे त्याच लक्ष नाही. एखादाच क्षण बास झाला त्याला मला फुटबॉल सारख उडवायला. अ‍ॅक्टीवा सारखी दुचाकी मला कितीस संरक्षण देणार ? त्यात माझी मस्ती . मी हेलमेट घालत नाही. अगदी हायवे वर सुध्दा.

चमत्कार झाला शेवटच्या क्षणाला ट्रकवाल्याच्या लक्षात आले आणि त्याने शिताफीने मला चुकवले. त्या रस्त्यावर त्या क्षणाला आमची दोन वहाने होती म्हणुन त्याला दिशाबदलताना दुसर्‍या वहानाला ठोकर द्यावी लागली नाही. पुढच्या क्षणाला आम्ही आमच्या रस्त्याला लागलो होतो.

मी स्कुटर बाजुला घेतली. थांबवली आणि पाठीवरच्या सॅक मधली पाण्याची बाटली काढुन दोन घोट पाणी प्यायलो. अजुन उर धपापत होता. काही क्षण बेहोशीत गेले. जगण आणि मरण याच्या वळणावरुन, मी नाही त्या ट्रक वाल्याने माझा जगण्याच्या दिशेला जाण्याचा रस्ता मोकळा केला होता. मी भानावर आलो आणि पुढे चालु लागलो.

मनात विचार येत होते. समजा मेलोच असतो तर कुणाला फरक पडला असता ? माझी आई कि माझी बायको ?

आई आणि बायको नक्की एकमेकींना धरुन राहिल्या असत्या. माझ्यात आणि बायकोत अनेक वेळा एक जण मागे रहाणार याच्यावर चर्चा झाली आहे. आम्ही दोघे हे ओळखुन आहोत. पन्नासाव्या वर्षी मरायला तयार आहोत असे नाही पण मुलीच लग्न केल त्याच्या आठवड्याभरात आम्ही काही प्लॅनींगला लागलो आहोत.

फार पसारा वाढवायचा नाही. आपल्यामागे मुलीला फार त्रास न होता जे काही शिल्लक आहे ते मिळायला हव. काही वर्षांनी रहाता फ्लॅट सुध्दा तिच्या नावावर करायचा, प्रत्येक खात्याला जॉइंट अकाउंट करायच इत्यादी.

यासर्व पुढील काही वर्षांनी करायच्या आणि संपवायच्या योजना आहेत. पण आज संपलो असतो तर कुणाला जास्त फरक पडला असता ?

माझी आई फारच प्रॅक्टिकल जगते. ती फारशी कुणाच्यात गुंतलेली नाही. ती एकदा बायकोला विचारेल. आपल्याला जगायला त्याने काही शिल्लक ठेवले असेल ना ? आपले भागेल ना ? तिच्या जगण्याच्या कल्पना आयुष्यभर सोप्या आहेत. कधी कधी सांगते मला. विमानात बसायच तेव्हढ राहिलय. मी पुढे ढकलत असतो,

बायको सुध्दा काही काळाने सावरेल. ती नोकरी करते आहे. तिला स्वतंत्र जग आहे. माझ काय ? मी मरायला तयार आहे का ? कशात माझा जीव तर नाहीना गुंतला.

जेव्हा जेव्हा स्पृहा जोशी दिसते तिच्या नावाच मला अपृप वाटत. काय मनात विचार करुन तिच्या वडीलांनी तीच नाव स्पृहा ठेवल असेल. संसारात असलेल्या माणसाला जनक राजासारख जगता येत ? सर्व भोगात असुन कशातच नाही अस ?

स्पृहा म्हणजे निस्पृह शब्दा मधुन आलय हे लक्षात येतय. जाणवतय माझा जीव माझ्या स्पृहात अडकलाय. लग्न करुन समोरच्या रस्त्यावर तर रहाते. सकाळी बायको तिला डबा देते आणि मी तिला बस स्टॉप वर सोडतो. नोकरी करायची जबरदस्त इच्छा आहे. पहाटे ६ वाजता बाहेर पडते ते रात्री ७ वाजता घरी येते. ६० किलोमीटर एका वेळेचा प्रवास करुन ०८.३० ला कंपनीत पोहचणे दिव्यच आहे. कंपनीची बस असली म्हणुन काय ?

बाबा.... मी काय निर्णय घेऊ हा प्रश्न अधुन मधुन तिला पडतच असतो. कधी उशीरा थांबते आणि माझा जीव टांगणीला लागतो. कॅब येते सोडायला पण एकटीच आहे का कॅब मधे का अजुन कुणी आहे ? एक ना दोन

एक दिवस दिसली नाही की मन बेचैन होत. कन्यादान केल्याने ती फिजीकली सासरी गेली इतकच. अस कस मी निस्पृह होऊ. मोकळ्या वेळी केवळ तिचीच काळजी.

लहानपणा पासुन ज्या जीवाला लहानाच मोठ नुसत होताना पाहिल नाही तर प्रत्येक कृतीत आपली गुंतवणुक होती. ती अशीच कशी संपेल ?

परवाचीच गोष्ट. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या फ्लाईटने दिल्लीला जायचे म्हणुन नंबरने लॉक होणारी बॅग तिने भरली. काही केल्या ती उघडेना. जावई दुपारच्या शिफ्टला गेलेला. तिच्या सासुला सुध्दा समजेना काय करावे ? मला फोन केला. मी तिला ते लॉक उघडुन दिले तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला.

दिल्लीला कॅब मधे बसलीस की कॅब चा नंबर मला एस एम एस कर. उतरली की रिच्ड सेफली असा एस एम एस कर. एक ना दोन . माझी काळजी संपत नाही आणि तीच आमच्यावर अवलंबुन असण.

कुण्या साधुचा म्हणे एका हरणाच्या पाडसात जीव गुंतला होता. मृत्यु नंतर त्याला समजल की आपण पुन्हा जन्माला येणार या हरणाच्या पाडसाच्या काळजी पोटी. ज्याने सर्वस्व त्यागले तो साधु एका हरणाच्या पाडसात आपला जीव गुंतवतो. मी तर पक्का संसारी . सोडायच काय त्याची लिस्ट फारच मोठी.

हम्म्म्म्म्म.. खरच अस घडल असत तर तिचीच काळजी बरोबर घेऊन मेलो असतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
अश्या पाशांतून जीव मोकळा होत नाही आणि खरंतर इतकं कुणाला आपल्याशी अडकवून ठेवू नये हे कळतं पण वळत नाही.

अगदी खरंय, याबाबतीत मी माझ्या सासर्‍याना फार मानते. सकाळी जाणवले की छातीत घरघर होतेय, संपलंय, सगळ्या इच्छा काढून घेतल्या नि जातो म्हणून चक्क झोपले ते गेलेच. तुम्हाला तर माहितीच आहे नितीनजी. आता थांबायचे हे समजायला खुपच प्रगल्भ मन हवे. आपण प्रयत्न करत रहायचे, न जाणो, जमेलही!

डी विनीताजी,

आपल्याला विश्वास वाटायला हवा की मुल कोणत्याही परिस्थीतीतुन मार्ग काढुन जगायला सक्षम आहेत. ही वेळ येण्याच मार्गदर्शन आपण मुलांना करायला हव अस आत्ता वाटतय.

नितीनचंद्र,

याबाबत एकंच करता येतं. ते म्हणजे स्वत: ईश्वरावर अवलंबून राहायला शिकायचं आणि आपल्या जवळच्यांनाही तसंच शिकवायचं. मात्र कसलीही अपेक्षा ठेवायची नाही. यालाच साधना करणं म्हणतात. तुमचा विश्वास आहे म्हणून सांगितलं. Happy

आ.न.,
-गा.पै.

लिहिलं छान आहे. आपल्या इतरांच्यात आणि इतरांच्या आपल्यात अडकलेल्या जीवासाठी हेल्मेट घालणे, सीट बेल्ट लावणे या साध्या गोष्टी आपण करूच शकतो. त्यानंतर हवं तर सबकुछ ईश्वर हवाले म्हणा.

छान.
माझी मुले बरीच मोठी झालीत. त्यांची मला गेल्या दहा पंधरा वर्षात काळजी वाटली नाही. म्हणून मला वाटत होते की मी आता व्यावहारिक जगात मन गुंतवत नाही, कसली काळजी नाही, वगैरे. खरे तर आता मी मेलो तर कुणाचेच काही अडणार नाही.

पण.. खोलवर कुठेतरी अजूनहि लग्न झालेल्या मुलीबद्दल काळजी वाटतेच!!
सुदैवाने मी पुनर्जन्माचा विचारच करत नाही. तेव्हढी तरी काळजी नाही मला.

Pages