मुंबई लोकल ट्रेन मधले फेरीवाले

Submitted by मधुरा मकरंद on 7 April, 2015 - 02:20

गेली २२-२३ वर्ष बोरीवली चर्चगेट असा लोकल ट्रेनचा प्रवास करत आहे. बहुतेक वेळा सकाळ संध्याकाळ ठरलेल्या लोकल ट्रेनचा आणि ठरलेल्या डब्यातूनच प्रवास. त्यामुळे बऱ्याच ओळखी झाल्या. सहप्रवासी मैत्रिणी मिळाल्या. ठरलेल्या वेळेत फलाटावर असताना नेहमीचे पुरुष प्रवासीही तोंडदेखले ओळखीचे झाले. कधी कुणीतरी दुसरीकडे ... बँकेत... ऑफिसात भेटले देखील! स्टेशनं देखील ओळखीची व्हायला लागली. काही स्टेशनांचे वास सवयीचे झाले. प्रवासाचा वेळ घड्याळ न बघता कळू लागला.

तसेच सवयीचे झाले ते लोकल ट्रेनच्या डब्यात वस्तू विकायला येणारे फेरीवाले!! हेअर-पिनपासून चपलांपर्यंत, कपड्यांपासून पुस्तकांपर्यंत, फळा-फुलांपासून भाज्यांपर्यंत, घरगुती वस्तूंपासून सिझनल वस्तुंपर्यंत काय नाही विकत? सकाळी सात साडेसात पासून रात्री उशिरपर्यंत यांचा वावर. माझा बहुतेक प्रवास लेडीज डब्यातून झाल्यामुळे स्त्री-फेरीवाल्या जास्त परिचयाच्या झाल्या. काहीजणी त्यांच्याकडच्या मालामुळे लक्षात राहिल्या, काहीजणी त्यांच्या स्वभावामुळे लक्षात राहिल्या तर काहीजणी त्यांच्या बोलण्याच्या लकबीमुळे लक्षात राहिल्या. स्वत: जगण्याची धडपड करताना, संसार करताना, मुले-बाळे सांभाळताना... "फेरीवाली" हा कष्टप्रद मार्ग निवडणाऱ्या या मैत्रिणी...

"ए, मुलींनो ... चला पटपट ... चला पटपट उड्या मारा... " असे म्हणतच डब्यात चढणारी पन्नाशीच्या आसपासची "माया". नेपाळी चेहऱ्याची पण छान मराठी बोलणारी. ती विकायला आणते हाफ प्यांट, टिशर्ट, थ्री फोर्थ, कुडते, लेगींस, पटियाला सेट, रुमाल... वेग-वेगळ्या वयोगटाचे. तिच्याकडचे कपडे एकदम छान, टिकाऊ, रंग न जाणारे. पण किमतीच्या बाबतीत कधीच घासाघीस नाही. ती सांगेल तोच भाव. बोलण्यात मिठास पण गळेपडूपणा नाही. नवीन गीऱ्हांईकाने शंका काढली तर "तिला विचार मायाचा माल कसा आहे. पंधरा वर्ष झाली माझ्या कडून घेते" अशी आपलीच साक्ष काढेल. वसईला दुकान आहे म्हणते. "तिकडे ये, खूप व्हेरायटी आहे पण जास्त पैशाला देईन" , असे सांगत कपडे विकते. आता माया थोडी थकली आहे. मोठमोठी ओझी घेऊन आणि वसई चर्चगेट प्रवास करून कमरेला पट्टा लागला आहे. पण उत्साह मात्र कमी नाही. "चला ग.... उड्या मारा पटापट .."

कानातले, बांगड्या, तरतऱ्हेच्या हेअर-पिन, नेकलेस सेट घेऊन येणारी "यलम्मा". नियमितपणे माझ्या बरोबर कांदिवलीला चढणारी. नवनवीन फॅशनचा माल आणणारी... सदा हसतमुख. माझ्या गाडीतल्या पार्टीचा एक भाग झालेली.
एकदा लक्षात आले कि यलम्मा पोटुशी आहे....
"काय ग? कितवा?"
"सहावा.."
"पाहिल्यांदाच?" (यांच्या नशिबी मूलपण संपण्या आधीच आईपण येते)
"नाही तिसरा.. पहिली दोन मुली."
"मग परत कशाला?"
"मुलगा पाहिजे ना... घरवाला ऐकत नाही"
"बघ आता मुलगा नाही झाला आणि परत राहिलीस तर सगळ्यांना सांगेन हिच्याकडून काही घेऊ नका." (मी उगाचच दम भरला)
मग काही ती परत परत दिसली नाही. कानातले, बांगड्या घेऊन सकाळी साडेसातला येणारी ती पहिलीच फेरीवाली म्हणून सगळ्यांनाच तिची आठवण येत होती. वर्ष-दोन वर्षे झाली, पण यलम्मा आली नाही. तिच्या सारख्या ईतर बायकांकडे चौकशी केली. कुणी म्हणाले ती गावाला गेली, कुणी म्हणाले ती आता येत नाही.
जवळ जवळ अडिच वर्षांनी यलम्मा दिसली.... सकाळीच .. कांदिवली स्टेशनला. माझी गाडी यायला वेळ होता. यलम्मा जवळ गेले तर तिला रडूच फुटले. थोडी शांत झाल्यावर म्हणाली, "मुलगा झाला. वर्षाचा झाला. पण घराबाहेर खेळताना गरम पाण्याने भाजला. दवापाणी नीट झाले नाही. त्यातच गेला...." मी एकदम सुन्नं.. काहीच सुचेना. उगाच अपराधी वाटायला लागले. तिला थोडा धीर दिला. बरोबर तिची आठवीत शिकणारी मुलगी होती. "शाळेला सुटी आहे म्हणून येते. पण मी तिला शिकवणार" असा यलम्माचा निर्धार होता.
या गोष्टीला देखील वर्ष झाले. यलम्माचे येणे कमी झाले पण तिची आठवण कायमच आहे.

मालवणी मसाला, लोणची, पापड, कुळीथ पीठ, आंबोशी... असा दर्जेदार कोकणी मेवा घेऊन येणारया मावशी अशाच लक्षात राहिल्या आहेत. बोरीवली-अंधेरी प्रवासात संध्याकाळी येतात. सामान उचलून, ऐन गर्दीच्या वेळी येण्याची कमालीची उर्जा... पण स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष. गळ्याला पट्टा लागला आहे. जगण्याची धडपड......

खणखणीत आवाजात मेंदी विकणारी देखील नेहमीचीच. "लाल मेहंदीsss, काळी मेहंदीsss, आवंलाsss पावडर, शिककाईssss पावडर" त्यात पुन्हा प्रकार-- मेंदी पावडर, भिजवलेली मेंदी, मेंदीचे कोन झालस तर शॉवर कप, मेंदी लावायचे ब्रश. स्वत:च्या आंबाड्यावर एक मेंदीचा कोन खोचून चढल्यापासूनच आपल्या मालाची जाहिरात करत येते.

"चेतन भगत लो, संजीव कपूर लो.... लो लो सिर्फ पचास रुपए में..." असे म्हणत बालपण हरवलेला छोटू! स्वत:च्या निम्म्या उंचीची पुस्तक हाताच्या गुंफाणीवर गळ्यापर्यंत धरून येतो. त्याला कदाचित अक्षर ओळखही नसेल, पण सगळी पुस्तके तोंडपाठ... अगदी लेखकाच्या नावासकट!!!! एकदा त्याच्याकडे पु.लं.च "पुरचुंडी" होते, मला परत परत सांगत होता "नया है... आज ही आया है ... लो ना ... लो ना...."
दोन्ही पायाने अधू असलेला, बसूनच सरकत सरकत येणारा एक विक्रेता साथी. पास कव्हर, प्लास्टिक कव्हर अशा वस्तू घेऊन येतो. "पास बुक रख्खो, राशन कार्ड रख्खो, पासपोर्ट रख्खो" " पॅन कार्ड रख्खो, लाईसेन्स रख्खो, आय कार्ड रख्खो..." अशी त्याची जाहिरात आणि "रख्खो" तल्या "ख्खो" एक टिपिकल जोर. पुन्हा एकदा दिसते ती जगण्याची धडपड......

दुसऱ्यांची दु:ख, कष्ट पाहिले कि आपले फारच लहान वाटायला लागतात.

काही फेरीवाल्या लक्षात राहतात त्या त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे. प्रत्येकीची बोलण्याची वेगळी लकब...
"ईटली ले ...पोहा ले.... उपमा ले....." "बाकरवडी ले.. संकरपाले ले ...", सकाळी सकाळीच नाश्त्याचे पदार्थ घेऊन येणारी. स्वस्त आणि मस्त.

"ए कोणाला मालवणी मसाला हवा आहे का? गोडा मसाला... हळद... तिखट हवे आहे का? कोणाला ताजा खर्वस हवा आहे का?", असे पदार्थ गाडीत विकून नोकरी करणारी ही मैत्रीण. हिची स्वत:ची जाहिरात चालू असताना मध्ये मध्ये तिच्याशी बोललेले तिला चालत नाही. तिची लिंक तुटते.

"गोल नाडे, चपटे नाडे .. दहाला दोन दहाला दोन", नाडी बंडल विकायला येणारी बाई

"शेंssssगदाणा राजगिरा चिक्कीssssss आम पापsssssड आंबा वडीsssss", चिक्की, लाडू, आंबा वडी घेऊन एकदम हेल काढत ओरडणारया आजी.

"ए पलम लेsss" "किवी लेssss" "सिताफल लेssss", सिझन प्रमाणे फळं घेऊन येणारी

"गवार ले, भेंडी ले, गाजर ले, सिमला मिरची लेssss" ठराविक वजनाच्या भाज्या पिशव्यांमधे भरून विकणारी.

अजून कितीतरी आहेत. टोकाच्या स्वभावाच्या... पेहरावाताल्या......
कानातले, बांगड्या विकणारी स्व्च्छ निटनेटकी "बायाम्मा". तिच्या शुभ्र एकसारख्या दातांमुळे तिला टूथपेस्ट्च्या जाहिरातीत घ्यावेसे वाटेल. तर दुसरीकडे कधी काळी आंघोळ केली असेल असे वाटणारया, नेहमी मावा-तंबाखू खाणारया.... नकोच ते.
कुणी काहीही घेतले नाही तरी न चिडणारया.. आपल्या मालाचे कौतुक करणारया... एकीकडे .. तर कायम शिविगाळ करणारया दुसरीकडे.

पहाटे उठून घरचे करून, असतील तर तान्ही मुलं पोटावर बांधून या येतात. कधी माल संपतो (त्यांच्या भाषेत "गाडी लागली") कधी नाही. कधी पोलिस पकडतात.. कधी मार खावा लागतो. पुन्हा माल भरायला जायचे...आधीची उधारी चुकवायची... नवीन घ्यायची. घरी जायचे ते बहुदा दारू प्यायलेल्या नवऱ्याने मारण्यासाठीच.
पुन्हा दुसरा दिवस सुरु... "चला ग.... उड्या मारा पटापट .........."

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर वाचलेलं स्मरतंय की फडफडीत मासे सुद्धा विकायला असतात लोकल ट्रेन्स मधे आणि बायका/प्रवाशी ते विकत घेऊन घरी गेल्या-गेल्या रात्रीच्या जेवणासाठी घरच्यांना सर्प्राईज देतात..!!

छान लिहिलंय.
खूप चांगल्या टिकाऊ वस्तू विरार लोकल मध्येच मिळाल्या आहेत.
आता वस्तू मिळायला म्हणून लोकल प्रवास करावा वाटतो.
पुणे मुंबई प्रवासात कधीकधी चांगल्या वस्तू विकायला येतात.

बर्‍यापैकी चांगला पत्त्यांचा कॅट अजुनही १० रुपयांत फक्त लोकल / पॅसेंजर ट्रेन मध्येच विकायला आलेला दिसतो.

संध्याकाळच्या प्रवासात मासे सुद्धा विकले जातात. खरे आहे का हे..?>>>> संध्याकाळी नाही हो,दुपारी एखादी कोळीण घरी जात असेल तर ती उरलेले मासे विकताना एकदाच पाहिली आहे.

आजच मी लिहणार होते ह्यावर .....लेडीज स्पेशल मध्ये तर जत्रा असते ।।नवीन नवीन गोष्टी मिळतात पाहायला ...कल्याण वरून सकाळी सुटते त्यात एक काकू येतात कुर्ते घेऊन ....मग खाणं घेऊन किती तरी बायका चढतात ....स्वस्त आणि मस्त .....प्रवासात किती काम होतात ...खरेदी खाण ....ह्या बायकांना सलाम .....एवढे शाररिक कष्ट खेचतात

Gents मध्ये फेरीवाल्यांची विविधता नसते . हेडफोन , पॉकेट्स असेच दोन तीन प्रकारचे फेरीवाले येतात .अस पण खरेदी करणे हा पुरुषांचा प्रांत नाही त्या वर पूर्ण सत्ता स्त्री वर्गाची .त्या मुळे train मधील फेरीवाले हा पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय नाही

उत्तम जीवनानुभव !

बाकी तुमच्या या लिखाणातून तेच प्रखरतेने जाणवलं जे माझी पत्नी नेहमी म्हणते ..
हे जग स्त्रियांमुळे इतके रंगीबिरंगी , उत्साहपूर्ण , चैतन्यमय आहे... आणि जगातला निम्मा व्यापार स्त्रियांमुळेच चालतो !

<<हे जग स्त्रियांमुळे इतके रंगीबिरंगी , उत्साहपूर्ण , चैतन्यमय आहे... आणि जगातला निम्मा व्यापार स्त्रियांमुळेच चालतो !हे जग स्त्रियांमुळे इतके रंगीबिरंगी , उत्साहपूर्ण , चैतन्यमय आहे... आणि जगातला निम्मा व्यापार स्त्रियांमुळेच चालतो !>>
अतिशय सुंदर वाक्य - एक नवरा, २ मुलींचा बाप आणी आईचा मुलगा म्हणून मला त्यांचा माझ्या वरचा ईन्फ्लुयंस प्रकर्षाने जाणवला.

Pages