योगवर्गातील योगाभ्यास, एक निरीक्षण - १

Submitted by अतुल ठाकुर on 5 April, 2015 - 05:45

free-vector-yoga-poses-stylized-clip-art_111371_Yoga_Poses_Stylized_clip_art_hight.png

अलिकडे नुसतं योगाभ्यास करतो म्हणुन भागत नाही. पॉवर योगा, बिक्रम योगा असे निरनिराळे प्रकार निघालेत. प्रत्येकजण आवडीनुसार आपापला सराव करत असतात. यालेखात मात्र ज्याला सर्वसाधारणपणे पारंपरिक योग म्हणातात त्याचंच विवेचन आहे. यात आसने, प्राणायाम हे शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी शिकवले जातात. योगाच्या अध्यात्मिक बाजुला येथे स्पर्श केलेला नाही याचं एकमेव कारण हे कि मला स्वतःला त्याचा अनुभव नाही. विषयाला स्पर्श करताना एक म्हणावेसे वाटते कि आजही आजार नसताना योगाकडे वळणार्‍यांची संख्या फारशी नसते. वय वाढु लागल्यावर काही दुखणी सुरु होतात. त्यावर औषधांचा एकतर उपयोग होत नाही किंवा तात्पुरता उपयोग होतो. काहीवेळा दुखणी ही मनोकायिक असतात. म्हणजे शारिरीक दुखण्याचे मुळ मनाच्या आजारात असते. काहीवेळा दुखणे हे निव्वळ मानसिक असते. अशावेळी बरेचदा योगाभ्यासाचा सल्ला दिला जातो. अशातर्‍हेने दुखण्यामुळे योग सुरु केल्यावर उपयोग झाला तर आवड निर्माण होते. मग काहीजण नियमितपणे योगाभ्यास करु लागतात. काही मध्येच सोडतात. काही अधुनमधुन येत राहतात. योगवर्गात नियमित येणार्‍यांची संख्या बर्‍यापैकी असते. पण एकुण योगवर्ग जर पाहिला तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यानंतर गृहिणी, त्यानंतर तरुणी, त्यानंतर प्रौढ पुरुष असा क्रम असतो. तरुण मुले क्वचितच दिसतील. आणि दिसलीच तर काही समस्या असते म्हणुनच दिसतील. हे सर्वसाधारण निरिक्षण आहे. काही ठिकाणी फक्त स्त्रीयांची बॅच असते. काही ठिकाणी स्त्रीपुरुष एकत्र योगाभ्यास करीत असतात. बर्‍याच ठिकाणी स्त्रीया आणि पुरुष एकत्र योगाभ्यास करीत असले तरीही स्त्रीया एकिकडे आणि पुरुष एकिकडे अशी विभागणी असते. स्त्रीयांसाठी वेगळ्या स्त्री शिक्षिका असतात. योग आणि योग शिकण्याच्या अनेक पद्धती, अनेक प्रवृत्तींची माणसे, त्यांच्या विविध समस्या, त्यांची मतमतांतरे आणि योगाच्या अनुषंगाने त्यांनी आपापल्या समस्यांची सोडवणुन करण्यासाठी चालवलेले प्रयत्न यामुळे पारंपरिक योग शिकवणारे योगवर्ग हे एक अगदी वेगळं जग आहे. त्याबद्दल काही निरिक्षणे नोंदवण्याचा प्रयत्न या लेखात करण्याचा मानस आहे.

योगाभ्यास करणार्‍यांना त्यातल्या काही ठळक परंपरांची कल्पना असेलच असे नाही. आणि परंपरांमधला फरकही काहीवेळा फार सुक्ष्म असतो. कैवल्यधाम परंपरेतुन म्हणजे स्वामी कुवलयानंद यांच्याकडून आलेला जो वारसा आहे त्यात आसने करताना श्वास सामान्य ठेवला जातो. तर योग इन्स्टीट्युट कडुन म्हणजे स्वामी योगेंद्र यांच्या परंपरेत शरीर खाली आणताना श्वास सोडणे, वर नेताना श्वास घेणे यावर कटाक्ष असतो. अय्यंगार यांच्याकडे आसने करताना काही बाह्य साधनांचा आधार घेतला जातो असे दिसते. विवेकानंद केंद्राकडून शिकवल्या जाणार्‍या प्राणायामात अभ्यंतर कुंभक म्हणजे आत श्वास रोखणे हे केले जात नाही. रामदेव यांच्याकडे आसने, प्राणायामाबरोबरच सुक्ष्म व्यायाम म्हणुन अ‍ॅक्युप्रेशरचाही अभ्यास केला जातो. माणसांचे यातल्या कशाकडेही लक्ष नसते. आणि तसे असण्याची गरजदेखिल नसते. माणसे दुखण्याने बेजार झालेली असतात. आणि त्यातुन त्यांना आराम हवा असतो. अशावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग शिक्षकापासुन काहीही लपवु नये. काही आसने काही दुखण्यांमध्ये टाळायची असतात. वानगीदाखल सांगायचं तर रक्तदाबाच्या विकारात पुढे वाकण्याची पश्चिमोत्तानासनासारखी किंवा डोके खाली पाय वर असा आकृतीबंध असलेली विपरीतकरणीसारखी आसने टाळली जातात. योगशिक्षकापासुन काही लपवल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. योगविद्या निकेतन सारख्या संस्थांमध्ये योगोपचारात अनुभवी अशी माणसे सल्ला देण्यासाठी नेमलेली असतात. त्यांच्याकडे डॉक्टरांचे रिपोर्ट्स घेऊन गेल्यास ती माणसे कुठली आसने करावी याबाबत सल्ला देऊ शकतात. त्यांच्याकडे निरनिराळ्या आसनांचा चार्ट असतो. त्यावर ते खुणा करुन देतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगाभ्यास सुरु केल्यास कुठलाही बारीकसारीक त्रास झाल्यास तोदेखिल योगशिक्षकापासुन लपवु नये. ते तसेच रेटुन नेल्यास त्यामुळे नवीनच दुखणे सुरु होण्याची शक्यता असते.

योगाभ्यासाच्या बाबतीत स्पर्धात्मकता टाळणे अतिशय आवश्यक असते. ही बाब काहींना कठिण वाटण्याची शक्यता आहे कारण आपला स्वभाव स्पर्धेच्या जगात रुळलेला आहे. इर्षेने एखादी गोष्ट करुन दाखवणे आणि लोकांची वाहवा मिळवणे हे अनेकांना आवडते. मात्र हे योगाच्याबाबतीत केल्यास त्याचे उलट परिणाम मिळु शकतात. क्षमतेपेक्षा स्नायु जास्त ताणल्यास त्याचा त्रास होऊ शकतो आणि तो बरा व्हायला वेळ लागु शकतो. त्यामुळे एखाद्याचं अंग लवचिक असेल आणि ती व्यक्ती "परफेक्ट" आसन करीत असेल तर ते पाहावे, मात्र आसने करताना आपल्याला जे झेपेल तेच करावे. समोरच्याचे अनुसरण कधीही करु नये. येथे उदाहरण द्यायचं म्हटलं तर पश्चिमोत्तानासनाचे देता येईल. बसलेल्या स्थितीत दोन्ही पाय समोर सरळ ठेऊन ते एकत्र जुळवले जातात आणि आदर्श स्थितीत हाताने पायाचे अंगठे पकडायचे असतात आणि डोके गुडघ्याला लावायचे असते. यात कुणाशीतरी स्पर्धा करुन स्वतःवर जोरजबरदस्ती करण्यात अर्थ नसतो. काहींचे पोट पुढे येत असल्याने ती माणसे ते पोट कमी होई पर्यंत फार पुढे वाकु शकत नाहीत. अशावेळी कुणाचे तरी आसन पाहुन तसे करता न आल्यास निराशा वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जितके हात पुढे नेऊ शकु आणि डोके पुढे करु शकु ती आणि तीच आपल्यासाठी आदर्श स्थिती आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. पुढे हळुहळु प्रगती होईल असा आशावाद मनात ठेवावा. मात्र आपल्या क्षमतेबाहेर जाऊन कुणाचेही अनुकरण योगवर्गात करु नये. योगाभ्यासाच्या बाबतीत गुरुवर्य निंबाळकरांनी एकदा फार सुरेख सांगीतलं होतं. ते म्हणाले होते योग हा टेलरमेड हवा रेडीमेड असु नये. त्यामुळे एकाच ठिकाणी एकत्र बसुन, एकच शिक्षक शिकवत असुन एकाच वयाच्या दोन व्यक्तींचा योग हा पूर्णपणे वेगळा असुन शकतो, कारण त्यांच्या शरीराची क्षमता, त्यांना असलेल्या समस्या, त्यांच्या गरजा या वेगळ्या असतात.

या वेगळ्या गरजांचा मुद्दा महत्त्वाचा असतो. कारण काही योगवर्गात प्रत्येकाला वेगळ्याने वैयक्तीक शिकवले जाते. क्वचित शवासनासारख्या आसनाची ग्रुप प्रॅक्टीस असते. बाकी वेळ प्रत्येकाने स्वतः चार्टमध्ये पाहुन ती आसने करावी अशी अपेक्षा असते. तर काही ठिकाणी फक्त ग्रुप प्रॅक्टीसच असते. वेगळ्याने स्वतःचा अभ्यास करता येत नाही. काही ठिकाणी ग्रुप प्रॅक्टीस आणि स्वतःचा सराव यात वेळ विभागलेली असते. काही ठिकाणी योगवर्गात विद्यार्थी पूर्णवेळ बसु शकतात तर काही ठिकाणी तासाभराच्या बॅचेस पाडलेल्या असतात. यामुळे सर्वठिकाणी आपला सराव कसा करावा हे आपल्याला ठरवता येईलच असे नाही. त्यातुन आपल्याला जर ग्रुप प्रॅक्टीसची सवय असेल तर स्वतःच स्वतःचा योगाभ्यास करणे कठिण जाते. या उलट स्वतःचा अभ्यास योगवर्गात एकट्याने करण्याची सवय असलेल्या व्यक्तींना ग्रुप प्रॅक्टीसमध्ये अ‍ॅडजस्ट होणं कठिण वाटतं. मात्र बहुतेकांना कष्ट घेण्याची इच्छा नसल्याने बहुतांश मंडळी ग्रुप प्रॅक्टीसमध्ये आनंदात असतात. स्वतःला फारसा विचार करावा लागत नाही. हात वर करा कि हात वर करायचे, खाली करा कि खाली करायचे. हे सोपं असलं तरी यामुळे सराव "टेलरमेड" होत नाही. पंचवीस जणाच्या ग्रुपला सर्वसाधारण आसने घ्यावी लागतात. कारण सर्वांची क्षमता कि कमीतकमी गृहीत धरावी लागते. त्यातुन त्यातल्या प्रत्येकाचे वय, त्यांना असलेल्या समस्या, त्यांनी करु नयेत अशी आसने, आसनात त्यांची थांबण्याची क्षमता ही सारखी असते असे नाही. त्यामुळे ग्रुप प्रॅक्टीस ही निव्वळ सोय आहे. एखाद्याने घरी जेवण नसताना फास्ट फुडवर भागवावे त्याप्रमाणे. समोर कुणीतरी वेळेच्या बंधनात आसने करुन घेत सुचना देत असताना, शांतपणे, क्रमबद्ध रितीने आपल्या हालचाली करीत श्वासावर लक्ष ठेऊन तो आसनाचा विशिष्ठ आकृतीबंध माणुस कसा साधणार? कदाचित ते शक्य असेलही पण ती पद्धत माझ्या पचनी कधीही पडलेली नाही. आणि त्यामुळे रोजच्या सरावासाठी योगशिक्षकावर अवलंबुन राहण्याची सवय लागते ती वेगळीच.

याचा अर्थ एकट्याने योगवर्गात अभ्यास करणे सोपे असते असा नाही. त्यात कष्ट घ्यावे लागतात. स्वतःला आसन प्राणायामाच्या पायर्‍या लक्षात ठेवाव्या लागतात. हे लोकांना त्रासदायक वाटते. स्वतःच्या शरीराची सुक्ष्म जाणीव वाढवावी लागते. आपल्याला काय हवंय. आपल्याला कसला त्रास होतोय. आपल्याला कशामुळे बरं वाटतंय. आपल्या शरीराचा कुठला भाग कडक आहे, कुठला लवचिक आहे याची उत्तरे शोधावी लागतात. फार काय आपल्याला किती वेळ योगाभ्यास करावा लागतो, आसनाची किती आवर्तने करावी लागतात, आपले आसन आपण किती वेळ धारण करु शकतो हे देखिल लक्षपूर्वक पाहावे लागते. योगाभ्यास करताना होणार्‍या चुकांच्या बाबतीत दक्ष रहावं लागतं. उदाहरणार्थ भुजंगासनात पोटावर झोपुन दोन्ही हाताचे तळवे छातीजवळ ठेवले जातात. आणि साप ज्याप्रमाणे फणा उचलतो त्याप्रमाणे कमरेच्या वरचे अंग वर उचलले जाते. अशावेळी नकळत पण बरीच मंडळी हमखास भुवया वर ताणतात. जे चुकीचे असते. त्यामुळे गरज नसताना चेहर्‍यावर ताण निर्माण होतो. हे सांगायला समोर शिक्षक असेलच असे नाही. कदाचित ग्रुपमध्ये सराव करताना शिक्षक भुवया शिथिल ठेवण्याची सुचना देईल. पण एकट्याने करताना हे आपल्याला लक्षात ठेवावे लागते. जर चुकीची सवय लागली तर ती दुर होणे पुन्हा अवघड जाते. म्हणुन ग्रुपमधला सराव आणि एकट्याने करायचा सराव यात आपण कुठे बसतो हे पाहावे लागते. यातल्या बर्‍याच गोष्टी आपल्या हातात देखिल नसतात. ज्या योगवर्गात जशी पद्धत असेल तसे आपल्याला करणे भाग पडते. त्यामुळे माणुस एखाद्या पद्धतीमध्ये आपोआपच ओढला जातो. तेथे निवड नसते. मात्र घरी योगाभ्यास करणे ही आदर्श गोष्ट असली तरी घरी अनेक व्यवधाने असतात. योगवर्गातील योगाचे वातवरण योग करण्यास उद्युक्त करते. तेथे घरुन उठुन जावे लागते त्यामुळे अभ्यासाला एक नियमितता येते. घरी कंटाळा केला जाण्याची शक्यता असते. शिवाय योगवर्गात मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. त्यांच्या बरोबर योग करण्यात एक उत्साह वाटतो. हे योगवर्गाला जाण्याचे फायदेदेखिल नजरेआड करता येत नाहीत. शिवाय शिक्षकाचे मार्गदर्शन असतेच.
(क्रमशः)

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chaan lekh. Pratyekala swatantrapaNe yog shikavsNaare guru paN asaayalaa havet. Tech tar durmiL aahet aataa.

माहितीपूर्ण लेख आवडला. योगाभ्यास या विषयावर वर्ग निरी़क्षणांच्च्या पलीकडे जाणारी प्रत्यक्ष माहिती वाचावयास आवडेल. पु. भा.प्र.

सर्वांचे आभार.

@प्रियाजी - प्रत्यक्ष माहिती लिहायला आवडली असती. पण वाचुन योग करु नये असं माझं मत आहे. खुप बारकावे असतात त्यात. ते समोर असलेला शिक्षकच सांगु शकतो.

माहितीपूर्ण छान लेख! "समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने
योगमेवाभ्यसेत प्राद्ना यथाशक्ती निरंतरम" अशी नागपूरचे जनार्दनस्वामीजींची प्रार्थना आहे. ह्यातला 'यथाशक्ती' हे खूप महत्वाचे! छान लेख मालिका होणारे... पुभाप्र