अनाथ

Submitted by मोहना on 1 April, 2015 - 19:27

"मग टाकायचं होतं अनाथ आश्रमात. कुणी सांगितलं होतं आम्हाला सांभाळा म्हणून?" नखाइतकी असल्यापासून सांभाळलेल्या आपल्या पुतण्यांकडे बयोकाकू डोळ्यातलं पाणी जिरवीत पहात राहिल्या. बापू हातातल्या काठीवर जोर देत थरथरत तोल सावरीत उभे राहिले,
"बास झालं. फार बोललात. कुणी सांगितलं म्हणून नाही सांभाळलं तुम्हाला. सांभाळायला काय तुम्ही कुत्री, मांजरं आहात? आमचीच मुलं मानलं आम्ही तुम्हाला. माझं ठीक आहे. माझ्या भावाचीच मुलं तुम्ही. लहान होता दोघंही तुमची आई गेली तेव्हा. तुमच्या काकूने केलं नसतं तर कुणी काही म्हटलं नसतं. आधीच घरातली तोंडं काय कमी होती? पण तिने मनाचा मोठेपणा दाखवला. त्याचे चांगले पांग फेडता आहात डोळ्यांदेखत."
निमा बापूंचं बोलणं खाली मान घालून ऐकत होती. सुहास मात्र तारवटलेल्या डोळ्यांनी आव्हान दिल्यासारखा बापूंकडे पाहत होता. बयोकाकूना बापूंना शांत करुन खुर्चीवर नीट बसवावं, थरथरणारी काठी बाजूला ठेवून आधार द्यावा असं वाटत होतं; पण त्या खिळल्यासारख्या जागीच उभ्या राहिल्या. सुहासच्या क्रुद्ध चेहर्‍याकडे पहात राहिल्या. निमाचा मुकाटपणा त्यांना असह्य झाला. कधी हरवली चेहर्‍यावरची निरागसता, कोवळे भाव या मुलांच्या चेहर्‍यावरचे? आत्ता आत्ता तर वाढत होती हाताखाली. निमा, सुहास घरी आले तो दिवस तसाच्या तसा त्यांना आजही आठवत होता.

माधवीच्या बाळंतपणासाठी म्हणून बयोकाकू बुरंबीला येऊन राहिल्या होत्या. घरचं खटलं दोन मोठ्या मुलींवर टाकून श्रीकर - माधवीच्या गरजेला धावल्या होत्या त्या. नांदतं घर. मुलं, सासू सासरे, आला गेला. बयोकाकूंना निवांतपणा फार क्वचित मिळायचा. घराच्या मागच्या बाजूला भली मोठी चाळ होती. तिथेच दोन खोल्यांमध्ये त्यांचे आई वडील रहात होते. येता जाता पडवीत झुलत्या खुर्चीवर बसलेले वडील दिसले की धावपळीतही डोळे निमायचे. सकाळच्या कामाचा धबडगा आटपला की थोडावेळ तिकडे जाऊन बसायचा बयोकाकूंचा नित्यक्रम. आईच्या हातचा चहा घेत तिघं निवांत गप्पा मारायचे. थोडावेळ तिथे टेकलं की बयोकाकू ताज्यातवान्या होऊन पुन्हा कामाला लागत. भरल्या घरात त्या रमून गेल्या होत्या. कधी कुठल्या कामाचं ओझं त्यांना वाटलं नाही. सतत चेहर्‍यावर एक शांत भाव. फार बोलका स्वभाव नव्हता पण कुणाच्याही अडल्या नडल्याला धावून जायची तयारी. श्रीकर, त्यांचा धाकटा दीर बुंरबीच्या शाळेत शिक्षक होता. देवरुखहून जाऊन येऊन करणार्‍या श्रीकरला बयोकाकूनीच त्याचं लग्न झाल्यावर बुंरबीत संसार थाटायचा आग्रह केला. माधवीला स्वतंत्र संसाराचा आनंद घेता यायला हवा असं त्यांना मनापासून वाटत होतं. देवरुख, बुरंबी अंतर ते किती. ये जा चालूच राहिली. माधवी पण काकूंना धरुन होती. निमा आणि सुहासच्या जन्मानंतर तर सतत काही ना कारणाने बुरंबीला जाणं होई, नाहीतर ती सारीच देवरुखला येत. माधवीला तिसर्‍यांदा दिवस गेले आणि त्या उत्साहाने माधवीच्या मदतीसाठी धावल्या. कर्तेपण घेऊन सर्वांचं करायची हौस बयोकाकूना, त्यात तसं दुसरं होतं कोण पुढाकार घेऊन करणारं म्हणूनही. बाळंतपण झालं की आठ पंधरा दिवसांनी देवरुखला परतायचं असं ठरवून त्या बुरंबीला आल्या.

बयोकाकू येऊन चार पाच दिवस झाले आणि माधवी घराजवळच्या दवाखान्यात दाखल झाली. श्रीकरही शाळेतून आल्याआल्या मुलांना घेऊन पोचला तिथे. त्या घरी जाऊन स्वयंपाक करुन, माधवीसाठी डबा घेऊन आल्या आणि मुलांना घेऊन परत घरी गेल्या. श्रीकर थांबला. सकाळी मुलं शाळेत गेल्या गेल्या त्या घाईघाईने दवाखान्याच्या दिशेने वळल्या. श्रीकर उतरलेल्या चेहर्‍याने बसला होता. एकटाच.
"किती वेळ? कशी आहे माधवी?"
श्रीकरने डोळ्यातलं पाणी आतल्या आत अडवण्याचा प्रयत्न केला.
"कठीण आहे म्हणाले. अडली आहे. देवरुखहून डॉक्टर आले आहेत रात्रीच."
"शस्त्रक्रिया?"
"हो, नेलं आहे आत आत्ताच." दोघंही एकमेकांची नजर चुकवत बसून राहिले. एक एक क्षण म्हणजे युग वाटत असतानाच कधीतरी डॉक्टर समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहर्‍याकडे लक्ष जाताच श्रीकरच्या हृदयाचा ठोका चुकला.
"कशी आहे माधवी? बाळ?"
"तुम्ही बसा इथे जरा." डॉक्टरांनी श्रीकरला जबरदस्तीने बसवून बयोकाकूंना बाजूला घेतलं.
"बाळ आणि त्या. नाही वाचवता आलं दोघांनाही..." पुढे डॉक्टर काय बोलले त्यातलं अक्षरही त्यांना कळलं नाही. कानापर्यंत काही पोचतच नव्हतं. नाही वाचल्या त्या एवढंच कानावर आदळत राहिलं त्यांच्या. श्रीकरच्या पुढे जाऊन त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी पदर तोंडात कोंबला.

"नमस्कार करा रे. आई आता नाही यायची परत. देवाकडे गेली ती." निमा आणि सुहासला कुणीतरी नमस्कार करायला घेऊन गेलं. घरी आलेल्या नातेवाईकांमध्ये सुहास, निमा गांगरुन गेले होते. कुणी काही सांगतील तसं दोघं करत होते. नमस्कार करुन परत त्यांच्या कुशीत शिरलेल्या निमाच्या केसावरुन हात फिरवताना त्यांचा जीव गलबलला. बाजूला पदर घट्ट धरुन बसलेल्या सुहासने केविलवाण्या चेहर्‍याने विचारलं,
"आम्हाला नाही का गं जाता येणार देवाकडे?"
"असं बोलू नये रे बाळा." डबडबलेले डोळे पुसत त्या म्हणाल्या.
"पण आई परत नसेल येणार तर कशी भेटणार. जावंच लागेल ना आम्हाला देवाकडे?" निमाने चिमुकल्या हातानी त्यांचे डोळे पुसत विचारलं.
"हे बघ राजा, आई नसली म्हणून काय झालं. मी आहे, तुमचे काका आहेत." निमा आणि सुहास काही न समजल्यासारखे बयोकाकूंकडे पहात राहिले. पाच आणि सात वर्षाचे लहानगे जीव अगदी पोरके होऊन गेले होते. दोघांना कुशीत घेत बयोकाकू बराचवेळ त्यांची समजूत घालत राहिल्या.

माधवी गेल्यावर श्रीकरच्या आयुष्यातला रस अचानक संपल्यासारखं झालं. शाळेत शिकवायचं आणि घरी येऊन बसायचं. मुलांवरचं लक्ष उडालंच त्याचं. शाळेतून आलं की अंगणात तास न तास येरझार्‍या घालत राहायचं. शरीर थकलं की टेकायचं खुर्चीवर, वाटलं तर वरण, भाताचा कुकर लावायचा. भाजी कशीबशी शिजलेली, तांदळात दगड, आमटी कचकचीत. श्रीकरने शिजवलेलं अर्ध कच्चं अन्न सुहास, निमा चिवडत रहायची तास न तास. मग श्रीकरची चिडचिड, मुलं रडायला लागली, रुसुन बसली की वैतागलेल्या श्रीकरच्या हातचा फटका दोघांनाही मिळायचा. लगेच दोघं आईकडे जायचं आहे म्हणून हट्टाला पेटायची. असं झालं की आपल्या वागण्यामुळे हे चालू आहे या विचाराने श्रीकरच्या मनाला अपराधीपणा घेरायचा. रविवारी देवरुखला जाऊ, काकूच्या हातचं छान जेवा, बापू गोष्ट सांगतील असं काही ना बाही सांगून श्रीकर स्वत:ला दोष देत दोघांना मनवत राही. सुट्टी लागली की बापू आणि बयोकाकू आग्रह करकरुन देवरुखला घेऊन जात होतेच मुलांना, श्रीकरलाही. आता त्यात रविवारही आला. दरवेळी बापू, बयोकाकू श्रीकरसमोर पुन्हा लग्न करण्याचा विषय काढत, जोर धरत. पण त्याचा ठाम नकार होता. विषयाला तोंड फुटलं की श्रीकर हताश होऊन म्हणायचा,
"वहिनी, लाभला असता संसार तर माधवी अशी गेलीच नसती. आता नका भरीला घालू."
"अरे पण पोरांचं काय? धड वेणीफणी पण होत नाही निमाची. खायचे प्यायचे हाल. इथे आणतोस तर दुष्काळातून उठून आल्यासारखी वाटतात."
"त्यासाठी पुन्हा लग्न?"
"असं नाही. पण तू तरी किती दिवस एकटा राहणार. आणि वाढत्या वयाच्या मुलांना वळण लावायला बाईमाणूस पाहिजे रे घरात."
"हं. बघू. म्हणजे आता कठीण पडतं आहे सारं हे खरं आहे. पण सवय झाली की लागेल सगळं मार्गी."
"सहा महिने झाले श्रीकर. तुझं लक्ष नाही कशात. सुहास मोठेपणानं निमाला सांभाळतो पण तो सुद्धा लहानच आहे."
"एखादी बाई पहातो आहे दिवसभर रहाणारी मिळाली तर. ती मिळेपर्यंत असंच चालू राहणार वहिनी."
"पैसे टाकून प्रेम नाही रे मिळत. हक्काचं माणूस आण. सगळं सुरळीत होईल." श्रीकर नुसता मान डोलवायचा. बयोकाकूनी वर्षभर त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकर दाद देत नव्हता, हळूहळू पण निश्चितपणे तो बदलत चालला होता. यातून मार्ग कसा काढावा ते बापू आणि बयोकाकूना कळत नव्हतं तेवढ्यात नवीनच व्यापात त्याने स्वत:ला गुंतवलं. मातृमंदिरमध्ये, देवरुखच्या सेवाभावी संस्थेत तो जायला लागला. शनिवारी शाळा सुटली की मुलांना देवरुखला बापू, बयोकाकूंच्या ताब्यात सोपवायचं आणि रात्री झोपायच्या वेळेला घरी परतायचं, पुन्हा रविवार तिकडे काढून संध्याकाळी मुलांना घेऊन बुरंबीला. मुलांची फरफट, त्यांच्या मनाचा विचार काहीही त्याच्या आसपास फिरकत नव्हतं. बापू आणि बयोकाकूंनी अखेर निमा, सुहासची जबाबदारी स्वीकारायचा निर्णय घेतला.
"आता राहू दे मुलांना आमच्याकडेच." मुलं आजूबाजूला नसल्याची खात्री करुन शेवटी त्यांनी श्रीकर देवरुखला आला तेव्हा त्याच्या कानावर घातलं.
काही क्षण श्रीकर नुसताच त्यांच्याकडे पाहत राहिला.
"नको. आधीच तुमच्यावर किती जबाबदार्‍या. त्यात दोघांची भर."
"लहान तर आहेत. कुणीतरी लक्ष देऊन करायला हवं रे बाबा त्यांचं." बयोकाकू आता श्रीकर मुलांना न ठेवण्याचा हट्ट धरुन बसणार की काय म्हणून धास्तावल्या. तेवढ्यात श्रीकर म्हणाला.
"मी अगदी एकटा पडेन वहिनी. घर खायला उठतं माधवीशिवाय. मुलं गेली की संपलंच."
"एकटा पडायला असतोस कुठे घरी तू श्रीकर? आणि असतोस तेव्हा असून नसल्यासारखाच." बापूंच्या बोलण्यावर श्रीकरने नुसताच हुंकार भरला.
"एवढ्या जणाचं करते आहेच नं त्यात आणि दोघं. आणि तुझ्या एकटं पडण्यापेक्षा मुलं एकटी पडत चालली आहेत ते लक्षात येतंय का तुझ्या? दोन दिवस इथे, पाच दिवस बुरंबी. मुळं रुजतच नाहीयेत धड त्यांची. तू पण इथेच येऊन राहा. सगळं मार्गी लागेल."

देवरुखच्या शाळेत नाव घातलं आणि निमा, सुहास बयोकाकू, बापूंकडे कायमचे मुक्कामाला आले. इथे आणताना कुणी त्यांना विचारलं नव्हतं. देवरुखचं घर आवडत असलं तरी शाळा बुरंबीची होती. सुहासचे मित्र, निमाच्या मैत्रिणी, दोघांचं ते भावविश्व अचानक संपलं. फरक जाणवला की नाही हे त्याचं त्यांना कळण्याचं वय नव्हतंच. निमाचं आतल्या आत मिटून जाणं, सुहासची शाळेतली भांडणं, दंगा, मस्ती; झालेला बदल त्यांच्या पचनी पडत नाही हेच सिद्ध करत होता. श्रीकरलाही बुंरबीतला एकटेपणा असह्य होत चालला होता. देवरुखलाच राहिलो तर मुलं आपल्या आधारानेच मोठी होतील या विचाराने शेवटी त्यानेही देवरुखमध्ये बदली करुन घेतली, बुरंबी कायमचं सोडलं. घर एक राहिलं पण निमा, सुहास श्रीकरपेक्षा बापू, बयोकाकूंनाच चिकटले. बापूंच्या चार मुलांमध्ये हळुहळू रमायला लागले. श्रीकर अधिकच तटस्थ होत गेला. घरात असून नसल्यासारखा. क्वचित त्याचं निमा, सुहासबद्दलचं प्रेम उफाळून यायचं. मग घरातल्या सर्वांसाठी तो लिमलेटच्या गोळ्या, बिस्किटं असं काही ना काही घेऊन यायचा. प्रेमाने सर्वांना वाटायचा. संध्याकाळी व्हरांड्यात बसून गोष्टी सांगायचा. सुहास हक्काने त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. निमा अनिमिष नजरेने आपल्या बाबांना न्याहाळत राहायची. तिला जवळ घेऊन तिच्या केसावरुन श्रीकर हात फिरवत रहायचा. बयोकाकू त्या तिघांच्या नकळत आजूबाजूला रेंगाळणार्‍या त्यांच्या मुलांना आत बोलवून घेत.
"मिळू दे वडिलांचा सहवास. कधीतरी येतो तुमचा काका त्यांच्या वाट्याला असा."
"पण आम्हाला पण गोष्ट ऐकू दे ना काका सांगतोय ती."
"सांगेन रे मी नंतर. आता रमली आहेत ती तिघं एकमेकांच्या सहवासात ती रमू देत." इतकं संभाषण होईपर्यंत निमा, सुहास उठून आत येत.
"अरे काय झालं? गोष्ट सांगत होते ना बाबा तुम्हाला?"
"संपलीऽऽऽ. पळा आता म्हणाले बाबा."
सगळं क्षणिक. बयोकाकूना वाईट वाटायचं. माधवीच्या मृत्यूने इतकं बदलून टाकलं आहे की असाच होता श्रीकर आणि कुणाला कळलंच नाही कधी? मुलं मोठी होत होती. सुहास नकळत बापूंकडे ओढला जात होता. त्यांच्या जवळ राहिलं की त्याला बरं वाटायचं. सुरक्षित वाटायचं. आग्रही हक्क प्रस्थापित करायला पहायचा तो बापूंवर. वावर सतत बापूंच्या आसपास. ते बाहेर निघाले की सुहास पायात चप्पल सरकवून तयार. बापू आरामखुर्चीत वर्तमानपत्र हातात घेऊन बसले की सुहासची अभ्यासाचं पुस्तक घेऊन बाजूला बसकण ठरलेली. बापू देखील प्रेमाने चौकशी करत, कौतुक करत. कधीकधी बयोकाकूना वाटे स्वत:च्या मुलांकडे लक्ष देत नसतील इतकं सुहासला जपतात ते. मुलांचीही नाराजी या ना त्या मार्गे बाहेर पडे. धाकटा माधव भडक डोक्याचा. तो पटकन काहीतरी सुहासला बोलून मोकळा होई. बापू रागावत. मुलांचा सगळा त्रागा बयोकाकूंसमोर निघे. काहीतरी बोलून बयोकाकू वेळ मारुन नेत. निमा, सुहास नसताना बयोकाकू चौघांना एकत्र बसवत, समजूत घालत. आईविना वाढणारी, वडील असून नसल्यासारखे, अशी मुलं आपल्या छायेत मोठी होतायत तेव्हा आपण नाहीतर कोण समजून घेणार त्या दोघांना हे त्या पोटतिडीकेने सांगत. बाकी तिघं समंजसपणे सुहासकडे सहानुभूतीचं झुकणारं माप स्वीकारत. पण माधवचं तसं नव्हतं. माधवच्या प्रश्नांना, नाराजीला, शंकाना कसं उत्तर द्यायचं ते बयोकाकूना सुचत नसे. त्याचे प्रश्न, शंका त्यांच्याही मनात घर करुन राहत, सुहास मुद्दामच बापूंचा पिच्छा सोडत नाही, सगळ्यांना त्रास देतो जाणूनबुजून, निमा कामं टाळते घरातली असं काही बाही माधव त्यांना सांगे, त्याच दृष्टीकोनातून सुहास, निमाचं वागणं त्या पारखत राहत. आणि मग उगाचच त्यांना ओशाळं वाटे. नकळत आपली मुलं आणि निमा, सुहास असा दुजाभाव करतो आहोत असं वाटायला लागे. मग निमा, सुहासचे ठरवून पुरविल्यासारखे त्या लाड पुरवत, स्वयंपाकात मुद्दाम त्यांच्या आवडीचं काहीतरी होई. माधव अशावेळेस दोन दोन दिवस हुप्प होऊन बसे.

आणि आज सुहासने असं टोक गाठावं? टाकायचं होतं अनाथ आश्रमात म्हणून मोकळं व्हावं? त्याला निमाने मूक संमती दर्शवावी? बयोकाकू सुहासकडे विझल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. निमा बयोकाकूंकडेच पाहत होती. तिलाही वाटलं, पुढे व्हावं आणि काकूच्या डोळ्यातलं अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या हातांनी निपटून टाकावं, लहानपणी चुलीवर रटरटता भात उपसताना चेहरा लाल लाल व्हायचा काकूचा तेव्हा ती पटकन पुढे होऊन त्यांच्या चेहर्‍यावर आपला कोवळा हात फिरवायची. काकूच्या चेहर्‍यावर हसू उमटायचं, थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. करावं तसं? नकळत ती उठली पण सुहासने टाकलेल्या कटाक्षाने तिला थांबवलं. अस्वस्थ चुळबूळ करत ती तशीच बसून राहिली.

गेली कितीतरी वर्ष निमा ऑस्ट्रेलियात होती. सुहास मुंबईत. देवरुखचं घर वडिलोपार्जित. सुट्टीत गेलं की काकू मनापासून स्वागत करायची. निमा मुंबईत आली की सुहास आणि ती बापूंना, काकूला भेटून जायचे. पण हल्ली माधव फार उत्साहाने स्वागत करत नाही हे दोघांच्याही लक्षात यायला लागलं होतं. निमा मागच्यावेळेला आली तेव्हा तर फार तुटक तुटक वागला तो. देवरुखहून मुंबईकडे परत जाताना मग बोलण्यात तोच विषय राहिला.
"किती तुसड्यासारखं वागला माधव." परतीच्या मार्गावर लागल्या लागल्या निमा म्हणाली.
"बाबा अचानक गेले ना त्यानंतर वागणं बदललं आहे त्याचं. दाखवून देतो दरवेळेस आपला काही संबंध राहिला नाही आता म्हणून."
"काहीतरीच सुहास. बाबांचा ताप उलटला, काविळीवर गेला आणि त्यातच ते गेले त्याला झाली की आठ वर्ष. त्याचं वागणं बदललं आहे ते येत्या तीन चार वर्षात."
"तुझ्या खेपा होत नाहीत इकडे त्यामुळे समजत नाही तुला. मी कामानिमित्त येतो या भागात तेव्हा बापूंना भेटायला चक्कर टाकतो . तू काकूभोवती, मी बापूंसमवेत असंच होतं ना इथे होतो तेव्हा. पण माधवच्या वागण्यावरुन वाटतं परकेच होतो आपण. उपरे."
"सुहास..."
"खरंच, त्याच्या मनात अढी आहे आपल्याबद्दल, त्याच्या भावंडांबद्दलही. त्याचं नुकसान होतं आहे देवरुखमध्ये राहून असं वाटतं त्याला. बापूंना दोष देत असतो नेहमी. त्यांच्यामुळे इथेच राहावं लागलं म्हणतो."
"पण इथे राहून नुकसान कसलं झालं? चांगली शेती आहे, स्वत:ची खानावळ आहे." निमाला समजत नव्हतं.
"शेती सामायिक. येऊन जाऊन नंतर हक्क मागणार सगळे म्हणून फार लक्ष घालत नाही तो. खानावळ उत्तम चालली आहे. त्याचं सोड गं. पण बापू, बयोकाकूंनी केलं आपलं हे खरं असलं तरी त्या ओझ्याखाली किती दिवस राहयचं? माधवच्या बोलण्याला प्रत्युत्तर द्यायला हवं आता आपण. आजचं वागणं पाहिलंसच तू."
"हं. यावेळेला आधी बोलायलासुद्धा तयार नाही आणि नंतर बोलला ते अकल्पनीयच होतं." नेहमीप्रमाणे तिने यावेळीही शाळेतल्या दिवसांची आठवण काढली पण दरवेळेला हसून मान डोलावणार्‍या माधवच्या स्वरात यावेळेला कडवटपणा भरलेला होता,
"प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो भूतकाळाकडे बघताना. आणि जुने दिवस त्रासदायक असतील तर विसरलेलेच बरे."
"त्रासदायक कसले रे? उलट मजा होती. आपलं नदीवरचं तास न तास डुंबणं, शाळेत जाता जाता खाल्लेले चणे, फुटाणे, टिवल्या बावल्या करत तिखटमीठ लावून खाल्लेल्या कैर्‍या. सगळं जसंच्या तसं आठवतंय. विसरलास तू?"
"छे, आठवतंय सगळं. बापूंच्या सतत मागे मागे असायचा सुहास आणि तू आईचा पदर पकडून. श्रीकरकाका उंडारत बसायचा. समाजसेवा म्हणे. सगळी जबाबदारी आमच्या बापूंवर. अस्सा राग यायचा."
"माधव..." बापू एकदम ओरडले.
"ओरडू नका बापू. खरं ते सांगतोय. फालतू आठवणी जागवत बसलेयत." निमाचा चेहरा खाडकन उतरला. सुहास उठून बाहेर चालता झाला.
"माधव, इतका द्वेष करतोस तू आमचा? खरंच तुला राग यायचा आमचा?" निमाचा विश्वासच बसत नव्हता. निमाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन त्याने बापूंकडे पाहिलं.
"चुकलंच माझं. खरं बोलायचं म्हणजे पाप आहे या घरात. बसा तोंडदेखलं कौतुक करत." माधवच्या आवाजातल्या उर्मटपणाने सगळ्यांनीच एकमेकांच्या नजरा टाळल्या. माधव उठून गेला. बाहेर येरझार्‍या मारणारा सुहास अस्वस्थपणे येऊन निमाच्या बाजूला बसला. निमा, सुहास दोघांनाही कानकोंड्यासारखं झालं. काकूंनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला,
"लक्ष नको देऊस. सध्या डोकं ठिकाणावर नाही म्हणून वागतोय असा." दोघंही कसेनुसे हसले पण तिथे राहण्यातला उत्साह संपलाच त्या दोघांचा. मुळात कुठला विषय कुठे नेला होता माधवने. शाळेच्या, बालपणाच्या आठवणी निमाने अगदी सहज काढल्या आणि नेहमी हसून मान डोलावणार्‍या माधवने आज त्याला वेगळंच वळण दिलं. सुहासने माधवशी बोलून कोंडी फोडायचं ठरवलं. असं आडून आडून बोलण्यापेक्षा एकदा काय मनात असेल ते बोलून मोकळा हो म्हणून सांगणार होता तो माधवला. पण तो घरात टिकतच नव्हता. कशीबशी रात्र काढून दुसर्‍या दिवशी दोघं मुंबईला निघाले. तेव्हाही माधव तिथे नव्हता. बापूंनी खांद्यावर थोपटलं, काकूंनी माधवचं वागणं विसरुन जा, पुन्हा या लवकर असं आवर्जून सांगितलं तरी दोघांनाही ते सगळं वरवरचं वाटत होतं. परतीच्या प्रवासात याच प्रसंगाची उजळणी आणि माधवच्या वागण्याचा उहापोह दोघं करत राहिले. चुळबुळ करत मान खाली घालून बसलेल्या निमाला तो प्रसंग जसाच्या तसा आत्ताही आठवत राहिला. त्यावेळपासून मनात असलेला राग इतक्या प्रखरपणे सुहासच्या मनातून बाहेर पडला असेल का ? एकदम अनाथ आश्रमात का नाही टाकलंत असं कसं म्हणाला बापू आणि बयोकाकूंना? अस्वस्थ चुळबुळ करत तिचं मन अजून धागे जोडण्याचाच प्रयत्न करत होतं.

त्या प्रसंगानंतर गेली दोन वर्ष सुहास तिला काही ना काही सांगत होता. माधवने घरामध्ये बदल केले. पैसे घेतले दुरुस्ती आणि बदलांसाठी सर्वांकडून सामायिक घर म्हणून. पण नियोजन काही नाही, दोन आत्यांची जमीन परस्पर विकून टाकली, विचारलं की तुमचा काय संबंध म्हणतो. हे आणि असं बरंच काही.
"अरे पण बापू, बयोकाकू काय म्हणतात?"
"नेहमीप्रमाणे बापू गप्प. काकू म्हणते मला नाही काही तो सांगत. निमा, काकूने केलं आपलं पण वाटते तितकी साधी नाही ती."
"म्हणजे?"
"मला नाही वाटत माधव स्वत:च्या जीवावर हे उद्योग करु शकेल. शक्यच नाही. पाठिंबा आहे त्याला काकूचा."
"काहीतरीच. किती गोड बोलून असते. आपण त्या दोघांकडेच मोठे झालो आहोत सुहास. विसरुन चालणार नाही."
"हो ना. म्हणून किती गप्प बसायचं? अगं शेवटी माधव तिचा मुलगा आहे. ती त्याला काय फायदा होणार तेच पाहणार ना."
"तो चुकीचं वागत असला तरी?"
"माधव पटवून देत असेल तिला. आणि आपण काकूकडे राहिलो तेव्हा फार समज तरी होती का? पाच वर्ष राहिलो. नंतर बाबांनी रत्नागिरीला खोलीच घेतली ना भाड्याने आपल्यासाठी. त्या पाच वर्षाचं किती ते भांडवल. सारखं आपलं त्यांनी केलं, त्यांनी केलं."
"सुहास, अरे असं कसं म्हणतोस? बाबाच सांगायचे ना आई गेल्यावर त्याचं संसारातलं लक्षच उडालं होतं. आपले हाल व्हायचे म्हणून काकूच बापूंच्या मागे लागली देवरुखलाच राहू दे सर्वांना म्हणून. बाबांकडून कधी एक दमडी घेतली नाही. इतकी माणसं आहेत घरी त्यात आणखी तिघं असं म्हणायचे कायम. कधी कुठला हिशोब ठेवला नाही आणि आता आपण व्यवहाराच्या पातळीवर उतरायचं?"
"बापू आणि काकूने केलं. पण माधव उतरला आहे ना व्यवहाराच्या पातळीवर. मग आपल्याला उतरायला नको. आणि वेळ पडली तर बापू आणि काकू माधवचाच फायदा पाहणार ना? दुसरं म्हणजे त्या पाच वर्षासाठी आपण काय आपलं आयुष्य वेचायचं? या ना त्या मार्गाने त्याची जाणीव ठेवून आपण सतत बापू, काकूसाठी करत असतोच काही ना काही?"
"नको रे, खाल्ल्या घरचे वासे मोजल्याचं पाप माथी येईल. आणि आपल्याला काय कमी आहे? सुखात आहोत आपण."
"तेच, तेच. उपकाराच्या ओझ्याखाली आंधळी झाली आहेस.."
"नाही रे. पण मुळात तू कशाला त्रास करुन घेतोस? आत्यांची जमीन गेली. बघतील त्या दोघी."
"ते आहेच, पण आपल्याशी तरी कुठे धड वागतो आहे माधव. एक दिवस आपलं जाणयेणं पण बंद होईल. बापू आणि काकू गेली की संपलंच समज सगळं. सगळं विकून मोकळा होईल तो माधव आणि आत्यांची जमीन गेली आता आपली जायची वाट बघत बसायची?" निमाला सुहासच्या ताडताड बोलण्यापुढे काही बोलणं सुचेना. तोच पुढे म्हणाला,
"आणि ती विभागली असली तरी सामायिकच आहे. कूळकायद्यात जायला नको ह्या विचाराने ती काका, आत्यांच्या नावावर केली होती आजोबांनी."
"सुहास, अरे आपण दोन वर्षांनी एकदा चक्कर मारणार. आपण भांडून काय मिळवणार?"
"तू पण तशीच. येशील तेव्हा घरही शिल्लक राहिलेलं नसेल. जमिनी तर सोडच. मग रडू नकोस सांगितलं नाही म्हणून." निमाने शेवटी यावर विचार करण्याचं, या वेळेला भारतात आलं की बापू, कांकूकडे हा विषय काढण्याचं मान्य केलं. आणि आज देवरुखला पोचल्या पोचल्या सुहासने एकदम विषयाला तोंड फोडलं.

"अगं निमा तू तरी थांबव ना सुहासला. कसा बोलतोय तो." बयोकाकूच्या शब्दांनी ती एकदम भानावर आली. ती विचारात गुंग असताना सुहास अजून बोलला की काय काहीतरी असं वाटून तिने सुहासकडे पाहिलं. रागाने लाल झालेला त्याचा चेहरा... स्वत:ला सावरुन धीर करुन ती म्हणाली,
"तो एकदम अनाथआश्रमात टाकायचंत असं म्हणाला ते चुकलंच त्याचं. पण काकू माधवच्या वागण्याला काही धरबंदच राहिलेला नाही. मागच्यावेळेस आले तेव्हाही काय वाट्टेल ते बोलला होता ते अजून विसरता आलेलं नाही. आता त्याला हे घर, जमीन सगळं विकून इमारत बांधायची आहे तर सर्वांनी एकत्र येऊन ठरवायला हवं. तुम्ही दोघांनीही आम्हाला गृहीत धरलंत. एक चार ओळीचं पत्र आलं माधवचं निर्णय सांगणारं, सही मागणारं. आत्या, काका सगळ्यांचा काय विचार आहे ते आम्हाला नको का कळायला?"
"पाहिजे ना. माधव बर्‍याच गोष्टी परस्पर करुन मोकळ्या होतो. पण तू येशील तेव्हाच शांतपणे बोलू,सगळं समजावून सांगू असं ठरवलं होतं आम्ही. पण तुम्ही दोघं आलात ते तलवारी उपसूनच. आणि सुहास काय रे हे? काय मिळवलंस असं बोलून तू? सगळ्या करण्यावर पाणी ओतलंस रे बाबा तू आज." बयोकाकूंनी तोंडात पदर कोंबला.
"आई, बास झालं रडणं. काय तारे तोडले सुहासने ते ऐकलं मी आतून. तरी मी तुम्हाला सांगत होतो. पण तुमचं सुहास, निमा वरचं प्रेम उफाळून येत असतं. तू आजारी होतीस तेव्हा आला का सुहास भेटायला? आईसारखी ना तू त्याला मग बायकोला का नाही पाठवलं काही दिवस आजारपणात तरी तुझ्या इथे मदतीला? इथे आला की येतो भेटायला त्याचं कोण कौतुक. तुम्ही त्याच्या फोनची वाट बघत असता. अख्ख्या खानदानाची खबरबात घेत असतो, तुम्ही सोडून सगळ्यांना फोन होतात याचे; पण आठवड्यातून एखादा फोन तुम्हाला करायला जमत नाही. आणि निमा, तुझी सख्खी आई असती तर केले असतेस ना फोन ऑस्ट्रेलियातूनसुद्धा? काही नाही गं, शेवटी अंतिम सत्य हेच आहे आई की प्रत्येकजण स्वत:चं कसं होईल हे बघत असतो. आहे त्या परिस्थितीत तग कशी धरता येईल ते अजमावत असतो. ते झालं की संपलं. या दोघांनी वेगळं काही केलं नाही. स्वार्थी नुसते. आश्रित ते आश्रित वर हा माज. अनाथ आश्रमात टाकायचं होतं म्हणे." माधव दाराच्या चौकटीत येऊन उभा राहिला ते तणतणतच. सुहासच्या कपाळावरची शीर लालबुंद झाली. निमाने बसल्या बसल्या त्याचा हात घट्ट धरुन ठेवला पण तो उठलाच. ताडताड पावलं टाकत माधवच्या समोर जाऊन उभा राहिला.
"माधव अती होतंय तुझं. ठीक आहे. इतकाच माज असेल नं तर राहा तसेच. माझी आणि निमाची सही नाही मिळणार तुम्हाला." दार अडवून उभ्या असलेल्या माधवचा हात बाजूला करत पाय आपटत सुहास आतल्या खोलीत शिरला. रागारागाने आपलं आवरुन तो दारात येऊन उभा राहिला.
"ऊठ निमा. निघू या इथून. संपला आपला ऋणानुबंध या जागेचा, माणसांचा. बापू, काकू पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जे केलंत आमच्यासाठी त्याबद्दल कृतज्ञताच राहील आमच्या दोघांच्याही मनात. पण त्या पाच वर्षांसाठी आमचं आयुष्य माधव विकत नाही घेऊ शकत. आमच्या परीने आम्हीही तुमच्यासाठी करत आलोय. रागाच्या भरात अनाथआश्रमात टाका म्हटलं. माधवचा राग तुमच्यावर असा काढायला नको होता मी. पण तरीही माझी खात्री आहे की तुमची त्याला फूस असणार किंवा तो त्याचं वागणंच कसं बरोबर आहे ते पटवून देत असणार. नाही तर गोष्टी या थराला न जात्या. आज माधव जे बोलला ना ते बरं नाही झालं." बापू आणि बयोकाकू काही बोलायच्या आत सुहास बाहेर जाऊन थांबला. निमाला हुंदका फुटला.
"येते मी." डोळ्यातले अश्रू पुसत ती नमस्कारासाठी वाकली. बयोकाकू काहीतरी पुटपुटल्या, बापूंनी सवयीने आशीर्वादाचा हात पाठीवरुन फिरवला.

बयोकाकूंना राहवलं नाही. त्या निरोप द्यायला गाडीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. बापू मात्र जागचे हलले नाहीत. सुहासने बयोकाकूंकडे न पाहता गाडीचं दार जोरात आपटून बंद केलं आणि गाडी वेगाने फाटकाच्या बाहेर काढली. उडालेला धुरळा खाली बसला तसं बयोकाकू वळल्या. माधवची दारातली आकृती केव्हाच नष्ट झाली होती. बापूंकडे नजर टाकत बयोकाकू समोरच्या दगडी कट्ट्यावर टेकल्या. गालावर ओघळलेले अश्रू पुसण्याचीही ताकद बयोकाकूंकडे उरली नव्हती. विचारांच्या नादात बापू झोका घेत राहिले. झोपाळ्याच्या कड्यांचा एका सुरातला कर्र, कर्र आवाज दोघांच्या मनावर चरे उमटवत राहिला. आसमंतात दाटू लागलेला काळोख दोघांच्याही गात्रांनी व्यापून टाकला. तुळशीवृंदावनासमोर दिवा लावायला हवा होता पण बयोकाकूना उठावंसं वाटत नव्हतं.
"काय चुकलं हो आपलं?" कातरस्वरात त्यांनी बापूंना विचारलं.
"म्हटलं तर काहीच नाही. म्हटलं तर बरंच काही." बापू गदगदलेल्या स्वरात म्हणाले.
"म्हणजे?"
"आपण निमा, सुहासला आपली मुलंच मानलं, पण ती आपली मुलं नव्हती गं."
"अहो, आपल्या पोटी नाही जन्मली पण प्रेम केलं आपण त्यांच्यावर मुलांइतकंच."
"केलं ना. काहीवेळेला तर आपल्या मुलांपेक्षा जास्त माया लाभली त्यांना. त्यांना उपरं वाटू नये याची काळजी घेत राहिलो. पण त्या दोघांच्या दृष्टीने ती सहानुभूती असावी. आपण आपलं कधी नव्हतंच ते आपलं मानत राहिलो. त्यांना आई वडिलांची माया देण्याची नशा आपली होती. आपल्या मनाची. कळलंच नाही आपल्याला की त्यात वहावून चाललो आहोत. वेळप्रसंगी आपली मुलं डावलली गेली आपल्या हातून, त्यांच्या मनाचा विचारही डोकावला नाही आपल्या मनात त्यावेळी. त्यांना कळत नव्हतं त्यामुळे शब्दात मांडू शकली नाहीत ती कधी. पण या ना त्या मार्गाने ती व्यक्त होत राहिली असणारच. आपल्याला मात्र समजलं नाही ते वेळच्यावेळी. आज कळतं आहे पण त्याला आता फार उशीर झाला...."
"अहो, काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का?"
"चांगलंच समजतंय. तू विचार कर. बघ तुलाही पटेल मी काय म्हणतो आहे ते."
"काहीही बोलताय. मला नाही असलं काही समजून घ्यायचं." असं बयोकाकू म्हणाल्या तरी बापू म्हणत होते त्याचं बीज रोवणारे साधे साधे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येत राहिले.
"हं, आठवतंय खरं. सुहास, माधव दोघंही पहिल्यापासून जरा आक्रमकच, कशावरुन तरी नेहमीप्रमाणे भांडले होते दोघं तो प्रसंग आठवतोय. तुम्ही माधवला ओरडलात, सुहासची बाजू घेतलीत. खरंतर त्या दोघाचंही ऐकून न घेता तुम्ही सुहासची बाजू घेतली होती त्या वेळेस. त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी सुहासशी आणि तुमच्याशी आठवडाभर असहकार पुकारला होता. कुणी बोलत नव्हतं. येतील ताळ्यावर म्हणून आपण सोडून दिलं. पण सगळ्या भावंडांनी एक होऊन आपल्या वागण्याला दर्शविलेला विरोध होता तो."
"आणि सुहास, निमाच्या आवडीचा म्हणून एखादा पदार्थ केलास की यामधलं कुणीतरी लगेच त्यांच्या आवडीचा पदार्थ करावास म्हणून हटून बसायचं."
"हो पण ते अगदी स्वाभाविक म्हणून फार महत्वाचं वाटलं नाही तेव्हा."
"खरं आहे. तेव्हा कधी कळलंच नाही. आणि सुहास, निमाही नकळत परिस्थितीचा फायदा घ्यायला शिकली असावीत. आई नाही म्हणून मिळणारी सहानुभूती, श्रीकरचं दुर्लक्ष यातून हळूहळू आपण करतो आहोत ते हक्काचं वाटायला लागलं पण तरीही त्यांच्या आईची, श्रीकरची जागा रिकामीच राहिली त्यांच्या मनात. आपण उपकारकर्तेच राहिलो त्यांच्या दृष्टीने."
"आणि आपल्या मुलांच्या दृष्टिने?" बयोकाकूंनी रडवेल्या स्वरात विचारलं.
"बाकी कुणी बोलत नाहीत. समजून घेतलं त्यांनी आपल्याला किंवा त्यांची वृत्तीच शांत असं म्हणायला हवं. पण सगळ्याची कसर भरुन काढली शेंडेफळाने. माधवने डोळ्यात अंजन घातलं." बयोकाकूंनी मान डोलवली. दोघं पुन्हा विचारात, सारं काही आठवण्याच्या ताणात, काळोखात बुडून गेले. मागच्या चाळीतून पसरणार्‍या मिणमिणत्या दिव्यांच्या अंधाराचा वेध घेत राहिले. कितीतरी वेळ.
"एक करता एक होऊन गेलं." बापू एका लयीत पायांनी रेटा देत झोका घेत होते तो थांबवून अस्वस्थपणे फेर्‍या मारायला लागले. एकाएकी त्यांच्या रागाचा पारा चढला. लटपटत, कशीबशी हातातली काठी सावरत उजवा हात रागारागाने हवेत उडवला त्यांनी. हाताबरोबर त्यांचा स्वरही उंचावला आणि एकदम चिरलाच.
"अनाथआश्रमात टाकायला हवं म्हणे. सुहास नव्हता कधी अनाथ. नव्हताच मुळी तो अनाथ कधी. पण आज दोन म्हातार्‍या जीवांना खर्‍या अर्थी अनाथ करुन टाकलंय त्याने. जोडीला ती निमा. सांगा तुमच्या लाडक्या पुतण्याला, चांगले पांग फेडलेस म्हणं उपकारकर्त्यांचे."
"अहो, काय बोलताय हे? बसा बरं तुम्ही आधी. नाहीतर असं करु आतच जाऊ. माधव, बापूंना हात दे रे बाबा जरा." दरवाज्याकडे पाहत त्या जोरात म्हणाल्या. हातानेच त्यांना थांबवत बापू बोलत राहिले.
"त्याच्या दृष्टीने आपण उपकारकर्तेच ना? मग काय चुकलं उपकारकर्ते म्हटलं तर? नाही करणार म्हणे सही. वर ऐकवतो आहे अनाथ आश्रमात टाकायला हवं होतंत म्हणून. आणि तो नालायक....माधव, आपलं जीणं हैराण करणार या दोघांच्या निर्णयामुळे. चांगलं चाललं आहे हो बापू आणि बयोकाकू. पुतण्याने अशी थप्पड दिली आणि आता मुलाकडून थपडावर थपडा खा, माधव म्हणणारच, पोटच्या पोरांसारखी माया दिलीत ना पण वेळ आल्यावर तुमच्या लाडक्या पुतण्यांनी सही करायला दिलाच नकार. बयो, अगं तुला कळतंय का, सगळी असून आपणच अनाथ झालो आहोत गं. अनाथ." हातातली काठी घट्ट आवळत, तोल सावरत बापूंच्या फेर्‍यांचा वेग वाढला. कपाळावरची शीर ताडताड उडायला लागली. बयोकाकू घाबरल्या.
"अहो, अहोऽऽ असं काय करता आहात. काय होतं आहे तुम्हाला? माधव, अरे गाढवा इतकी घसा ताणून ओरडतेय. बाहेर ये आधी. कुठे उलथला आहेस. बाहेर ये रे बाबा, लगेच." तोल गेलेल्या बापूंना सांभाळायला पुढे झालेल्या बयोकाकूंच्या मदतीची हाक काळोखाला फाडून वातावरण चिरत राहिली...

पूर्वप्रसिद्धी - माहेर मासिक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

good one

>> श्रीकर, अरे गाढवा इतकी घसा ताणून ओरडते आहे. बाहेर ये आधी. कुठे उलथला आहेस. बाहेर ये रे बाबा, लगेच." तोल गेलेल्या बापूंना सांभाळायला पुढे झालेल्या बयोकाकूंच्या मदतीची हाक काळोखाला फाडून वातावरण चिरत राहिली...

??

छान आहे कथा, खुप आवडली.

श्रीकर नावाने जरा घोळ घातलायं...

<<<< आणि आज देवरुखला पोचल्या पोचल्या श्रीकरने त्याच्या स्वभावाप्रमाणे एक घाव दोन तुकडे केले होते जिव्हारी लागतील अशा शब्दांनी.

हृदयस्पर्शी कथा. काही प्रसंगी तर खरचं डोळे पाणावले. खुपच आवडली कथा.

श्रीकर नावाने गडबड झालीय खरी. पण मी तिथे माधवच वाचलं त्यामुळे गोंधळायला झालं नाही मला तरी.

नावाचा गोंधळ सुधारला आहे. अजून कुठे असेल तर सांगा नक्की. प्रतिक्रियाबद्दल मनापासून धन्यवाद.
मित - खरं आहे. दोन्ही कथा साधारण एकाचवेळी लिहिल्या होत्या Happy

"अहो, काय बोलताय हे? बसा बरं तुम्ही आधी. नाहीतर असं करु आतच जाऊ. श्रीकरऽऽऽ अरे श्रीकर... बापूंना हात दे रे बाबा जरा." दरवाज्याकडे पाहत त्या जोरात म्हणाल्या. हातानेच त्यांना थांबवत बापू बोलत राहिले.>>>> मोहना, इथेही सुधारणा हवी आहे.

मंजूडी - धन्यवाद. केला बदल. माझ्या मनात श्रीकरने का ठाण मांडलं होतं कुणास ठाऊक :-). तुझ्या देवरुख डोळ्यासमोर आलं की नाही थोडं तरी?

छान आहे कथा.
देवरुखचे म्हणाल, तर तसे काही जाणवले नाही ( माझे देवरुखला नियमित जाणे होते. ) गावापेक्षा कथेतील माणसेच जास्त लक्षात राहतात.

दिनेश - मंजूडी नुसत्या देवरुख नावाने तिकडे पोचते म्हणून ते विचारलं आहे :-). कथेतलं घर देवरुखमधलं आहे (पानवलकरवाडा) पण ते घर माहित असेल तरच जाणवेल हे खरं.

मस्त जमल्येय. वाचून (प्रतिसाद नाही कथा Happy ) मला खरंच श्रीवर्धनच घर आठवलं. काल रात्री झोपण्यापूर्वी वाचली आणि लहानपणी कोकणात गेल्यावर काय काय करायचो याची सकाळ पर्यंत उजळणी झाली. सुहास/ माधव आपापली बाजू मांडतानाचे प्रसंग आणि शेवट तर खास.