शीळे अन्न खाणे

Submitted by एबी.... on 1 April, 2015 - 14:08

खूप दिवसांपासून हा प्रश्न आहे डोक्यात.....
अमेरिकेत आल्यापासून शिळं (की शीळं) बरेचदा खाल्ले जाते. विशेषतः नवर्याचा दुपारचा डबा... रात्री भाजी बनवून ठेवते, सकाळी पोळ्या बनवून, कधी पोळ्यासुद्धा रात्रीच. नवरा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खातो.

बरे नाही ना असे नेहेमी करणे?
इथे बरेच वेटरन्स आहेत (बराच काळ अमेरिकेत किंवा भारताबाहेर रहाण्याचा अनुभव असण्याच्या अर्थाने).
म्हणून विचारतेय,
क्रूपया मते, माहिती (शास्त्रीय द्रूष्ट्या किती बरोबर किती चूक), तुमच्या टिप्स/ट्रीक्स शेअर कराल का?

लेकीचा डबा ताजा असतो, क्वचितच आदल्या रात्रीचा पदार्थ फार आवडता असल्यास देते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या भारतीय 'कंडिशनिंग' चा परिणाम म्हणून आपल्याला आदल्या दिवशीचे किंवा अगोदर करून ठेवलेले अन्न शिळे वाटते. कदाचित हे हवामानामुळे, भाज्या - फळे - धान्ये यांच्या मुबलकतेमुळे असावे. पण जगभरातील विविध खाद्यसंस्कृती पाहिल्यात तर रोजच्या आहारात काही प्रमाणांत अन्न शिळेच असते. आंबवलेले पदार्थ, टिकाऊ पदार्थ, खास प्रक्रिया केलेले पदार्थ रोजच्या आहारात असतात. शक्य असल्यास त्यांच्या जोडीला ताजी फळे, सलाड्स्, सूप्स असतात. कितीतरी प्रांतांमध्ये कडाक्याच्या थंडीत किंवा रूक्ष तापमानामुळे, जमीनीच्या कमतरतेमुळे फारसे अन्नधान्य पिकत नाही. मागवलेला भाजीपाला,धान्य वगैरे सतत उपलब्ध असतेच किंवा सर्वांना परवडतेच असे नाही. तरी ही कुटुंबे साठवणीच्या अन्नपदार्थांवर आपले भरणपोषण करतात. त्यांच्या आहाराला सांप्रत भाषेत संतुलित म्हणता येईल का, हे माहीत नाही. परंतु हे लोक भरपूर जगतात व त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहातात.
त्यामुळे अन्नाचे 'शिळेपण' हे सापेक्ष आहे हे निश्चित!

ब्राह्मणेतर व्यक्तींच्या हातचं अन्नभक्षण केल्यास प्रायश्चित घ्यावे का, या विषयावर शंभर वर्षांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये झालेली चर्चा वाचत होतो. त्या चर्चेत लोकमान्य टिळकांनी 'शिळं अन्न खाल्ल्यास प्रायश्चित घ्यावं' असं हिंदूंच्या काही ग्रंथांत लिहिलं असल्याचं सांगितलं आहे. काही दाखलेही दिले आहेत.

अकु +१

एक तर्क : त्याकाळी अन्न टिकवण्यासाठी / साठवण्यासाठी सोयी नव्हत्या. आणि उष्ण दमट हवामान. त्यामुळे अन्न लवकर खराब होत होते.. त्यामुळे असेल.

मी कोठेतरी वाचल्याचे स्मरते की आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून चार तासांपेक्षा जास्त काळापूर्वी बनवलेले अन्न शिळे समजावे, तसेच एकदा शिजवलेले अन्न पुन्हा गरम करून खाणेही टाळावे वगैरे - कदाचित त्या काळात, तापमानात व परिस्थितीत ते उचितही असेल. परंतु त्याच संस्कृतीत आंबील, कांजी, लोणची, पापड, मोरांबे, साखरांबे वगैरे अनंत 'टिकाऊ' अन्नप्रकारही आहेत व लोकांच्या आहाराचा एक भाग आहेत.
जगातील अनेक देशांत पोळ्या / ब्रेड / रोटी / नान किंवा तत्सम गहू - मैदा वगैरेंचे प्रकार घरी बनवतच नाहीत. गरजेप्रमाणे ते बाजारातून दैनंदिन तत्त्वावर किंवा आठवड्यासाठी आणले जातात. चीझचे अनेक प्रकार जितके 'शिळे' (आपल्या भाषेत) तितके त्यांचे मूल्य व महत्त्व वाढते. मद्याबाबतही तसेच म्हणता येईल. भारतात तूप जितके जुने तितके ते चांगले व औषधी मानतात, असेही कोठेतरी वाचले आहे. लोणी मात्र ताजे असावे असा आग्रह दिसतो.

* आणखी एक निरीक्षण म्हणजे सध्या(तरी) भारतातील शहरांमधील कष्टकरी समाज हा भारतातील सधन समाजापेक्षा तुलनेने अधिक प्रमाणात 'ताजे' अन्न खातो. घरी फ्रीज असतोच असे नाही, आणि फ्रीज असला तरी आठवड्याचा किंवा महिन्याचा किराणा, भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे रोजच्या रोज गरजेप्रमाणे तेल, मीठ, मिरच्या, भाजी, मसाले, धान्य खरेदी करून घरी नेऊन त्यांपासून बनवलेले अन्न खाणारे कितीतरी कष्टकरी लोक पाहाण्यात आहेत.

अकु, मला वाटतं 'आयुर्वेदात सांगितलं आहे' हे पालुपद अनेकदा अर्ध्यामुर्ध्या माहितीवर किंवा 'आउट ऑफ कॉन्टेक्स्ट' लक्षात राहिलेल्या बाबींवर आधारित असतं. (मागे त्या उष्ण-शीत पदार्थांवरून चर्चा झाली होती त्यात हा मुद्दा आला होता.)
म्हणजे उदा. 'उन्हाळ्यात दुधाचे पदार्थ चार तासांत शिळे होऊ लागतात' असं वाक्य असेल तर त्यातले पहिले दोन शब्द कानगोष्टींत हरवून गेले असं झालेलं असू शकतं.

मुळात या गाइडलाइन्स असतात, 'नियम' नव्हे, त्यातही त्याला हवामान, ऋतुमान, खाणार्‍याच्या आहारविहारांच्या सवयी, तात्कालिक प्रकृतीमान असे अनेक पॅरामीटर्स असतात.

आताच्या जमान्यात 'शिळं अन्न' हा कन्सेप्ट सापेक्ष याला +१
भारतातही बर्‍याच शहरांतून दोन्हीवेळेला चारीठाव स्वयंपाक करता येणं महामुश्कील आहेच. अश्यावेळेस आस्वपू, काहीवेळेस बाहेरून, कधी चपाती/ब्रेड बाहेरून हे पर्याय ओकेच! Happy

गोगा म्हणतात त्याप्रमाणे त्या काळी अन्न टिकवण्यासाठी / साठवण्यासाठी सोयी नव्हत्या. म्हणून उरलेल्या अन्नाची रात्रीच विल्हेवाट लावण्याची पद्धत होती. घरकाम करणारी गडीमाणसं, भिकारि वगैरेंना देऊन. तसंच घरी किंवा आसपास गुरं असतील तर त्यांना पण असं उरलंसुरलं देत असंत. त्यामुळे शिळवड उरतंच नसे. ( पण मग कधीतरी शिळं खायला मिळावं म्हणून शिळासप्तमी सारखे सण साजरे करत असावेत. ) अन्न कधीही टाकायचं नाही ह्या वचनाचा पगडा आपल्यात लहानपणापासून रुजवला गेल्यामुळे टाकवत नाही आणि रोजच्या रोज शिळवड खाववत नाही अश्या दुहेरी गोंधळात आपण पडतो.
मला तरी शिळ्यापेक्षा रात्री आणी दुसर्‍यादिवशीही तेच हे नको वाटते. मग मी ते एक दिवसाचे शिळे अजून एक दिवस शिळे करुन तिसर्‍या दिवशी खाते. Happy

एक तर्क : त्याकाळी अन्न टिकवण्यासाठी / साठवण्यासाठी सोयी नव्हत्या. आणि उष्ण दमट हवामान. त्यामुळे अन्न लवकर खराब होत होते.. त्यामुळे असेल.
<<
यापुढची गम्मत पहा.
दक्षिणेकडे जिथे अधिक उष्णता असते, व पदार्थ लवकर खराब होऊ लागतात, तिथे सरळ पीठ आंबवून बनवायच्याच पाककृती आहेत. उत्तरेकडे त्यामानाने हे कमी दिसेल. Happy

>> दक्षिणेकडे जिथे अधिक उष्णता असते, व पदार्थ लवकर खराब होऊ लागतात, तिथे सरळ पीठ आंबवून बनवायच्याच पाककृती आहेत.

हो.

शिवाय चार तास कधीपासून धरायचे असा फाटा फोडायचा मला मोह होतो आहे ते निराळंच. Proud

>>>>>पण जगभरातील विविध खाद्यसंस्कृती पाहिल्यात तर रोजच्या आहारात काही प्रमाणांत अन्न शिळेच असते. आंबवलेले पदार्थ, टिकाऊ पदार्थ, खास प्रक्रिया केलेले पदार्थ रोजच्या आहारात असतात. शक्य असल्यास त्यांच्या जोडीला ताजी फळे, सलाड्स्, सूप्स असतात. कितीतरी प्रांतांमध्ये कडाक्याच्या थंडीत किंवा रूक्ष तापमानामुळे, जमीनीच्या कमतरतेमुळे फारसे अन्नधान्य पिकत नाही. मागवलेला भाजीपाला,धान्य वगैरे सतत उपलब्ध असतेच किंवा सर्वांना परवडतेच असे नाही. तरी ही कुटुंबे साठवणीच्या अन्नपदार्थांवर आपले भरणपोषण करतात. त्यांच्या आहाराला सांप्रत भाषेत संतुलित म्हणता येईल का, हे माहीत नाही. परंतु हे लोक भरपूर जगतात व त्यांच्या तब्येतीही चांगल्या राहातात.<<<<<<<<

शिळं अन्न आणि खास टिकवण्याची प्रक्रीया केलेलं अन्न सारखच? ते कसं काय?

अरुंधती , तुमची शिळं अन्नाची वाख्या काय?

माझ्या पाहाण्यातली इथियोपियन, सुदानीज व केनयन मंडळी (भारतात शिकायला आलेले विद्यार्थी) इथे पुण्यात ताजे अन्नधान्य, भाज्या, मांस वगैरे उपलब्ध असतानाही त्यांच्या पारंपरिक प्रकारच्या आंबवलेल्या पदार्थांना खाणे पसंत करत असत. Happy

स्वाती, योकु Lol खरंय. शेतात कापणी झाल्यापासून किंवा गाईम्हशीची धार काढल्यापासूनचा वेळ धरला तर सगळे शिळेच शिळे!! Lol

शिळं अन्न आणि खास टिकवण्याची प्रक्रीया केलेलं अन्न सारखच? ते कसं काय?
<<
झंपीतै,

मुद्दा तोच चाल्लाय.

की समजा, चपात्या करून फ्रीजमधे ठेवल्या आहेत. (ही टिकवण्याची प्रक्रिया झाली.) त्या नंतर मावे मधे गरम करून खाल्ल्यात, तर बाय डेफिनिशन 'शिळ्या' होतील का?

अन मग शिळ्या भाकरी-पोळ्यांचा कुस्करा नुसताच तिखटमीठतेल घालून, किंवा दुधात, किंवा फोडणी घालून अनेक लोक खातात. किंवा भारतातही सकाळच्या चहाबरोबर कालची शिळी पोळी खाणारे लोक असंख्य आहेत, तर त्या 'शिळे' खाण्याने काही "हेल्थ प्रॉब्लेम्स" येतात का?

तुमचं आपलं लग्गे विपक्ष का नारा असल्यासारखं दिसलं, म्हणून लिवलं Wink

स्वाती, योकु खरंय. शेतात कापणी झाल्यापासून किंवा गाईम्हशीची धार काढल्यापासूनचा वेळ धरला तर सगळे शिळेच शिळे!! >>>
म्हणुनच माझे आजी आजोबा, शेतातुन आलेला भाजीपाला व घरच्या गाईम्हशी चे दुध वापरायचे. गायीम्हशी मात्र कधी काळी कापलेला शिळा चारा खात असत. Happy
कालंतराने आई मुम्बईला आली. ती रोज मडंईत जाउन भाजी आणत असे आणि तबेल्यातुन दुघ, मग तबेला बंद झाल्यावर गोकुळचे दुध जे एक दोन दिवस आधी काढुन त्यावर प्रक्रीया केलेले असेल.
आता आम्ही २ आठवड्याची भाजी आनि दुध आणुन फ्रीज मध्ये टाकतो.

मागच्या २-३ पिढ्यामध्ये केवढा बदल झाला आहे.

आज जरा वेळ होता सकाळी म्हणून मागच्या आठवड्यात आणलेल्या अंड्याला, काल परवा आणलेल्या पावात बुडवून केलेला फ्रेंच टोस्ट मुलांना नाश्त्यासाठी देताना "ताजे कुणा म्हणू मी?" हा प्रश्न आलाच.
माझ्यापुरता मी काही व्याख्या बदलल्या आहेत. पण या विषयात कुणाचा अभ्यास असेल तर त्यांनी खरंच मार्गदर्शन करावं असं मलाही वाटतं. मग त्यातलं किती करू शकु निदान ते तरी कळेल.

एफ्डीए का कुठल्यातरी स्टँडर्डप्रमाणे शिजवल्यानंतर दोन तासांत फ्रीज केलं तर अन्न फ्रीजमध्ये ताजं राहतं असं काहीतरी आहे.इच्छुकांनी वाचा आणि आणखी प्रकाश टाका.

माझा नवरा घरापासून अगदी जवळ काम करतो त्यामुळे त्याचं लंच तो घरी येऊन करू शकतो. तो शक्यतो सॅलड किंवा वायटामिक्स स्मुदी करून खातो. अगदीच वेळ नसेल तेव्हा कॅफे पण त्यांच्याकडे बॉन अपेटाइट वाले सर्विस देतात आणि त्यांचे पर्याय चांगले वाटतात. मी पण काहीवेळा त्याच्याबरोबर तिथे पुर्वी घरून काम करत असे तेव्हा जेवलेय. सो ओव्हरऑल त्याची सोय बरी आहे.
याउलट आम्चं कॅफे मला फार कळकट वगैरे वाटतं. मला स्वतःला काही रेस्ट्रिक्शन्स आले आहेत त्यामुळे मी त्यांचं सॅलेड वगैरे घेण्यापेक्षा ग्रोसरी करताना काही ऑरगॅनिक सॅलड पॅकेट्स, फळं वगैरे घेऊन ऑफिसच्या फ्रीजमध्ये ठेऊन देते आणि लागेल तसं घेते. पोटभरीचा दुसरा कहीतरी आयटम बहुतेक वेळा रविवारी बनवला अस्तो पण मी दुपारी पोळी-भाजी खातेच असं नाही. फक्त कार्ब, प्रोटीन आणि फायबरचा पिरॅमिट सांभाळणं हे मी शक्य असेल तोवर पाळते. प्रोटीनसाठी कॉस्टकोच्या ऑरगॅनिक फ्रोजन एडमॉमीज बेस्ट आहेत. सिंगल सर्विंग पॅकेटस मावेमध्ये तीनेक मिनिटं गरम केली की झालं. you are forver lunching असं वाटतं पण काम करताना मला जमतं.
आता राहिला प्रश्न रात्रींचा. आधी मुलं अगदीच लहान होती तेव्हा संध्याकाळी एकाला तरी वेळ मिळायचा पण आता मोठा शाळेत जायला लागल्यापासून त्याच्याबरोबर अभ्यास इ.ला बसायचं की किचनपाशी उभं राहायचं यात पहिला पर्याय स्विकारला आहे.

विकेंंडला निदान पुढच्या दोन दिवसांसाठी च्या भाज्या करून ठेवते. पोळ्या शनि/रवि मध्ये पिक अप करते. पण मुलांसाठी एक-दोन लागतात त्या त्याच दिवशी बनवते. पीठ आधी मळून फ्रीजमधे ठेवलेलं असतं. शुक्रवारी संध्याकाळी जे काही बनवते त्यातलं शनि/रवि मध्ये एक वेळेला खायला मिळेल असं. विकेंडला बाहेर खाताना बरेचदा होल फुड्सला जातो म्हणजे हेल्दी पर्याय (ताजे पण असावेत) आणि ग्रोसरी एकदम होऊन जाते.
संध्याकाळी एक दोन वेळेला वन डीश मील पण हेल्दी पर्याय करायचा प्रयत्न असतो जसं किन्वा खिचडी, दलियाचा पुलाव्, विकत आणलेल्या होल्व्हीट तॉर्तियाच्या कसिडीयाज, ब्राउन राइस चिकन पुलाव किंवा सॅमन करी ही लवकर होते आणि ग्रीन्ससाठी सरळ उकडलेल्या भाज्या जसं ब्रोकोली, ग्रीन बीन्स वगैरे. मुलांना काही भारतीय भाज्या जसं भेंडी वगैरे प्रचंड आवडतत पण इं.ग्रो. फार जवळ आणि सोईची नाही आहे. त्यामुळे जेव्हा जाऊ तेव्हात्या आठवड्यासाठी फ्रेश पण बर्ञाच भाज्या फ्रोजन घ्यावा लागतात. हे सगळं ताजं किती आहे माहित नाही पण असं वाटतं की कॅन्समधल्या गोष्टी वापरून ताजं (?) करण्यापेक्शा किंवा मैदावाल्या गोष्टी घेण्यपेक्षा हे बरं असावं.

अजून काही प्रकार आठवले, केले गेले की लिहेन. Happy

अरुंधती
मी कोठेतरी वाचल्याचे स्मरते की आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून चार तासांपेक्षा जास्त काळापूर्वी बनवलेले अन्न शिळे समजावे, >>>>>>>> असे लोकसत्तामधील एका वैद्यानी लिहिलेले वाचले आहे.
अर्थात हे पाळणे कठीण आहे.तेव्हा जे शिळे अन्न पोटात जातेय ते चांगले आहे.

रुजुता दिवेकरच्या पुस्तकांतही दिलेलं असतं ताजं अन्न खा, शिळं खाऊ नका. रोज प्रत्येक मिलसाठी फ्रेश कुकींग करा वगैरे. आता तिचे क्लायंट करीना, अंबानी वगैरेंना ते शक्य आहे..पण मध्यमवर्गीयांना प्रॅक्टिकली शक्य नाहीये. जमेल तसं करायचं..

साहिल शहा, गोठा म्हणायचे आहे का तुम्हाला?

खुप विचार केला तर भंजळायला होतं... जमेल तेव्हा अन्न शिजवून गरम गरम खावं एव्हढच करू शकतो.

मंजुडी, Lol

मी कोठेतरी वाचल्याचे स्मरते की आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून चार तासांपेक्षा जास्त काळापूर्वी बनवलेले अन्न शिळे समजावे, तसेच एकदा शिजवलेले अन्न पुन्हा गरम करून खाणेही टाळावे वगैरे - >>>>>>>>>

गीतेमधे पण या अर्थाचा श्लोक आहे. संदर्भ आत्ता नाही देउ शकत. शोधावे लागेल.
तूर्तास......

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्
ऊच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्

अध्याय १७ श्लोक १०.

आज जरा वेळ होता सकाळी म्हणून मागच्या आठवड्यात आणलेल्या अंड्याला, काल परवा आणलेल्या पावात बुडवून केलेला फ्रेंच टोस्ट मुलांना नाश्त्यासाठी देताना "ताजे कुणा म्हणू मी?" >>

अंडं पावात कसं बुडवलं?
कमाल आहे.
Wink

Pages