एवढी घाई नको...

Submitted by संतोष वाटपाडे on 25 March, 2015 - 04:42

एकदा घागर तुझी या पायरीवर हिंदळू दे
पायरी पाहून ओली उंबरा जळतो जळू दे....

फ़क्त देठानेच काटे का गुलाबा बाळगावे
काळजातील दुःख वरच्या पाकळ्यांनाही कळू दे....

एकतर गंधात तुझिया देह माझा दरवळू दे
दे दुरावा अन्यथा.. मग श्वास सारे तळमळू दे..

का ढिला करतेस अंबाडा इरादा काय आहे
एवढी घाई नको... तो सूर्य आधी मावळू दे...

गे नको मज स्पर्श देहाचे प्रिये भेटीत सारे
श्वास ओठांवर तुझा एकेक अलगद ओघळू दे...

मी लिहिन प्रेमात गजला ग्रंथ कविता लेखसुद्धा
पण तुझ्या डोळ्यात तसले प्रेमतर मज आढळू दे...

यायला वारीत यंदा विठ्ठला जमणार नाही
तूच ये शेतात माझ्या अन तुझे दर्शन मिळू दे...
-- संतोष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ़क्त देठानेच काटे का गुलाबा बाळगावे
काळजातील दुःख वरच्या पाकळ्यांनाही कळू दे.... जबरी आहे.

उंब-याचा गुंगवतोय शेर, जो अर्थ लागला तो भन्नाट आहे.

कसली भारी आहे गझल.
व्वा वाटपांडे !

यायला वारीत यंदा विठ्ठला जमणार नाही
तूच ये शेतात माझ्या अन तुझे दर्शन मिळू दे...

सिग्नेचर शेर.

यायला वारीत यंदा विठ्ठला जमणार नाही
तूच ये शेतात माझ्या अन तुझे दर्शन मिळू दे...>>>>..
............ संतोषजी, एका हाडाच्या भक्ताचेच असे निर्भीड, नि:संकोच पण तितकेच भाबडे मनोगत असू शकते.(विठ्ठला , तुला गरज असेल तर जा रे बाबा शेतात !)....मक्ता आवडला . ....... बाळ पाटील

धन्यवाद मित्रांनो.....मान्यवरांनो ... _/\_

गुलाब काट्यांचा शेर मस्त आहे. ''श्वास ओठांवर तुझा एकेक अलगद ओघळू दे'.. व्वाह.... काय मिसरा आहे ! ! !

विठ्ठलाचा शेर कडक ! ! !

त्यावरून माझा एक शेर आठवला :

पीक डुलताना दिसो शेतात माझ्या
तेच पंढरपूर माझे, तीच वारी

असो. गझल आवडली, संतोषजी ! ! !

यायला वारीत यंदा विठ्ठला जमणार नाही
तूच ये शेतात माझ्या अन तुझे दर्शन मिळू दे... फारच सुंदर

एक प्रयत्न माझा...

पदर सांभाळून असते नार तिथली नेहमी
आला प्रसंगच वेगळा तर नरांची नजर ढळू दे

यायला वारीत यंदा विठ्ठला जमणार नाही
तूच ये शेतात माझ्या अन तुझे दर्शन मिळू दे...<<< शेर आवडला