गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ८

Submitted by अत्रुप्त आत्मा on 23 March, 2015 - 04:02

मागिल भागः-
७) http://www.maayboli.com/node/53198 ...पुढे चालू
"यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ!
==========================================
याद्यांचं उत्तर रामायण संपलं. पण याद्या द्यायच्या म्हणजे गुरुजि लोकांनाच बहुशः त्यातल्या आज्ञार्थी अर्थानुसार वागावं लागतं. यजमान (हल्लीच्या भाषेत क्लायंटं.. ) याद्या न्यायला येण्याऐवजी फास्ट लाइफ स्टाइलच्या तडाख्यामुळे आंम्हासच विनवितात.. "गुरुजि यादी तुंम्हीच आणून देता का? प्ली...ज! "
प्लीज या शब्दाचा आतला अर्थ नो एस्क्यूज,असा असल्यामुळे आंम्हीही त्या नेऊन देतोच! आणी शेवटी तो शब्दही तेच बोलतो ना.. या..(आणी)..द्या! तस्मात दिल्याच पाहिजेत, जाता कुठं? Happy

हो... पण आज इथे जी काही यादी आंम्ही देणार आहोत, ती पूजेची यादी नसून गेली अनेक वर्ष मनात तयार झालेली यादिचीच पूजा आहे. तेंव्हा पूजा गोड मानून घ्यावी होssssss महाराजा!

ढिस्स्-क्लेमरः- यादीत शुद्ध-लेखनाच्या चुका झाल्या तर विनोद नोर्माण होतो,
म्हणूनच शुद्ध विनोदात ही यादी देत आहे!.ती धार्मिक मन बाजुला ठेऊन्,किंवा आजुबाजुला ठेऊन वाचावी,म्हणजे खरा आध्यात्किम आनंद मिळेल.
Wink

१)हळदः- "लागली" हा वाक्-प्रचार वेगळा! इथे मात्र देवालाच वहाण्यासाठी! असे म्हणण्याचा मोह होतो..पण म्हणवत नाही. का??? असं विचाराल तर ही हळद "लागते" त्याचेच शीन डोळ्यासमोर जास्त तरळतात. लग्नाआधी जी हळद खेळली जाते,त्याला मी हळदिची होळी असं म्हणतो,पण आमचा एक महान मित्र मांडवात जे काही चालतं त्यावरून त्याला एकाच उपमेनी अमर करतो- हळदीघाटची लढाई!

२) कुंकू:- ह्या नावाचा एक चित्रपट होता म्हणे पूर्वी. ह्यात नट किती ते माहित नाही,पण हे लावल्या शिवाय धार्मिक समारंभात बायका आजतागायत नटू शकलेल्या नाहीत,हे मात्र माहित आहे. अगदी कुंकवाच्या जागी टिकली येऊन टिकली तरी!

३)गुलालः- पैश्यासारखाच उधळला जातो,व तित्तकेच प्रदूषणही करतो.असा एक पदार्थ.

४)बुक्का:- स्वतःला कमीत कमी आणी दुसर्‍यांना जास्तीत जास्त लावायची चीज!

५)शेंदूरः- दूरान्वयानी पाहिलं,तर याला दगडाला फासून त्याचा देव करतात.आणी फासल्यानंतरंही एखादा 'दगडच' असला,तरी त्याला देव म्हणून 'धरतात.' श्रद्धा अंध असते,की हे अंधळे श्रद्धावंत असतात? हे यावरून पडताळून पहाण्यासारखं आहे.

६)अष्टगंधः- वास एकाच प्रकारचा येत असला,तरी याला अष्टगंध का म्हणत असावेत बंरं??? मला तर ह्या एकवासत्वामुळे याला अष्टगंध ऐवजी स्पष्टगंध असंच म्हणावसं वाटतं

७)उदबत्ती:- ही म्हणे हिंदू-मुस्लिम संस्कृतिची एकी झाली,तेंव्हा आपल्यात आली. बरोबर आहे,ही आपल्यात आली आणी एकी त्यांच्यात गेली.

८)निरांजने व समया:- (वाती/तूप/तेलासह) कंसातली माहिती अधिक इष्ट. त्या कंसानी कृष्णाला मोठं केलं.या कंसानी जागा व्यापून ओळ मोठी केली इतकच! आंम्हास काय? प्रकाश पडला..की झालं!

९)जानवीजोडः- हे हल्लीच्या काळातलं पूजेचं इमरजन्सी लायसन! जानवीजोड ही एक अजोड सोय आहे. मुंज म्हणजे लर्निंग आणी सोडमुंज म्हणजे परमनंट!

१०)बदाम/खारका:- तुंम्हाला आणायला जमत नसतील,तर आंम्ही आणू. तह करायची आपली जुनी परंपरा आहे. Wink

११) सुपार्‍या:- वरीलप्रमाणेच ! शेवटी सुपारी कोण कुणाला देतो,यापेक्षा दिल्यानंतर ती 'वापरतो' की नाही? ते महत्वाचं.

१२)नारळः- आत पाणी असल्यास उत्तम.नसल्यास गोटाखोबरं तरी हाती लागावं.(ही अपेक्षा..!)
कुठकुठल्या श्रींचे काय फलं मिळेल? हे सांगता येत नाही आजकाल.

१३)कापुरः- हा काडी लावल्या लावल्या पेटतो. काहि माणसेही अशीच कापरासारखी पेटतात. मधली वितळण्याची क्रीया त्यांना ठाऊक नसते. हे आमचे संशेधन. कारण हे सं.शो. नावाचं धन माणसांनीच आंम्हाला दिलेलं आहे. तरी त्याला 'आमचं' म्हणणं हे कुणाचं संशोधन आहे? हे कळल्यास सांगावे.

१४)धान्यः- गहू/तांदूळ प्रत्येकी पावणेदोन किलो. अता पावणेदोन का? तर ते दोन हवे तसे पावणे,देव पावण्या इतकेच अवघड!
तरिही त्याचा हिशोब येणेप्रमाणे- धान्य पावणेदोन किलो+१२५ ग्रॅम खडे+१२५ ग्रॅम पोरकिडे=म्हण्जेच एकंदर दोन किलो.दाने दाने पे लिख्खा है,खानेवाले का नाम..(की पानेवाले का नाम? Wink ) सोइनुसार बदल कारावा.

१५)पात्रे:- तांब्या/ताम्हण/पळी/भांडे.. एकंदर चार पात्रे.
लेखकः-श्री.पा.टं.आसने..
दिग्दर्शकः-श्री.ता.टं.वाटलावे..
सहदिग्दर्शकः-श्री.पत्रावळी द्रोणे..
सूत्रधारः- श्री.चौरंगे..
गीतकारः-श्री.पे.न.यादिलिखे..
संगीतकारः-श्री.घं.टा.शंखेश्वर..
डान्सडायरेक्टरः-मास्टर शंकू तांडवे..
फाइट्सः-हणमंतराव गदाधरे..
चित्रपटाचे नावः- माणूस आणि धर्म!

१६)पंचामृतः- पंचावर सांडलं,तरी निरनिराळ्या प्रकारचे पाच डाग पाडू शकत नाही,इतका 'मृत' पदार्थ आहे हा..एकिचे तोटे याला समजाऊन सांगायला पाहिजेत कुणितरी.

१७)फुले(सर्व प्रकारची किंवा जातिंची):- यांच्यात जातिभेद करावा,असे आंम्हास वाटत नाही. कारण तो खरोखरच निसर्ग-निर्मित आहे.

१८)पत्री:- बेल(१०/१५पाने),तुळस/दूर्वा(प्रत्येकी दोन गड्ड्या) - अता गड्ड्या कित्तिही सांगितल्या,तरी सोडेपर्यंत सर्वांचे गुणधर्म एकच असतात.आणखि काय सांगू?

१९)हारः- एक किंवा दोन..हे प्रमाण आंम्ही संतती नियमनावरून उचललेलं आहे. जास्त झाले,तर सुटे करून वापरावे.हे हारांच्या बाबतीत जमतं.. नै का???

२०)गुळः- २ ते ३ वाट्या.. किंवा ढेपा. (स्वेच्छेनुसार) याची ढेप असो,वा तुकडे.आजपर्यंत मुंगळेच-याला चिकटत आलेले आहेत. म्हणजे नक्की कसा चिकट अस्तो हो हा? कोकणी माणसासारखा? छे..छे.. अहो,कोकणी माणूस स्वतः चिकट असतो,पण चिकटणार्‍याला चिकटू देत नाही.पक्का हिशेबी असतो.

२१)साखरः- ही मारवाडी जातिची असावी.अशी आंम्हास एकतारी शंका आहे. तरिही हिला खाण्यात मुंगी सगळ्यात अग्रेसर! मुंग्या म्हणे स्वतःच्या कैकपट वजनाचा साखरेचा खडा वारुळी नेऊन जमवितात. माणसाला गोडव्याचा हेवा वाटतो,तर मुंग्यांना नुस्ताच हेवा न वाटता तो अनमोल ठेवा वाटतो.. असो!

२२)खोबरे वाट्या:-पुण्याच्या मार्केटयार्ड ज्येष्ठ व मंडईबाजारपेठ कनिष्ठ.. हे जसे भेद आपण मानतो,तश्याच ह्याही मिळतात.आवडीनुसार आणाव्या.

२३)वस्त्रः- हे सुद्धा हल्ली गुरुजिच आणतात.आणी गुरुजिंनी आणायला सांगितलं,की यजमान मांजरपाट आणून गुरुजिंची ताणतात.

२४)फळे:- अता धार्मिक कर्म कोणाला फळे? -तर..
जैशी अणावि फळे,तैसाची धर्म फळफळे।
उरलेले जाऊनी जळे,त्या वळचणीला॥१॥
होवो तयांसी सुबुद्धी,फळा कर्मी जडो प्रीती।
होय सत्कर्माची निश्चिती,आणखि काय सांगू॥२॥
फळाठाई ऐसा स्वभाव,कर्म तिथे मूळ भाव।
बाकि दिलेला ताव,वरंवरचा जाणावा॥३॥
ऐसी फळाची स्वल्प कहाणी,नव्हे ही मूळ गार्‍हाणी।
विषया-विषये अनुषंगाने,सहजची सांगितली॥४॥

२५)होमाचे इंधनः-गोवर्‍या व वखारितील लाकडे,आणि शुद्ध गाइचे..आपलं ते हे.. गाईचे शुद्ध तूप.

२६)होम कुंडः- पूर्वी होमासाठी विटांचे कुंड रचत असत,अता कुंडासाठी(म्हणजे त्याच्या आकारा नुसार) होमाची 'रचना' असते. Wink असो!

२७)काडेपेटी किंवा लायटरः- पहिल्या वस्तुचा गुणधर्म काड्या लावणे,दुसर्‍या वस्तूचा भडका उडविणे. आंम्हाला कोणतिही चालेल.आमचा उद्देश-दिवे लावणे! त्यामुळे चिंता नाही.

२८)विड्याची पाने:-पूर्वीचा पैजेचा विडा जाऊन,अता मानाचा विडा आला. तेंव्हा विडा उचलून पैजा जिंकायचे,अता विडे खाऊन पैजा जिंकण्यावर जास्ती भर!

२९)सुटे पैसे:- सुटे पैसे..हा पुजेतला अगदीच चिल्लर'प्रकार असावा.कारण बरेचदा गुरुजिलोक जेव्हढे यादित लिहितात,तेव्हढेही हे सुटत नाहीत! त्यामुळे बराच सुटा-घटक वाटतो हा.

३०)अभिषेक(करण्याचे)पात्रः-अभिषेक संपेपर्यंत अस्खलित धार पाडणारे पात्रच अभिषेकाला पात्र असते.तस्मात तसेच पात्र म्या पात्राला अपेक्षित आहे.

३१)चौरंगः-चार खुरं असली तरी हा बर्‍याचदा अस्थिर बनतो.जमल्यास स्थिर'चौरंग द्यावा.पण हल्ली सरकार तरी कुठे स्थिरं आहे.त्याच्याशी जनता जमवून घेते.तसं आंम्ही जनतेशी जमवून घेऊ.. अरे..हाय काय आणि नाय का...य?

३२)पाट/आसने किंवा बैठका:-जिमिनीवर..बसताना आधार घ्यायला,यांचा आधार लागतो.तरी यांच्या शिवाय बसण्याला,आंम्ही निर्धार म्हणतो. असो!

३३)सोवळे किंवा स्वच्छ धुतलेले कपडे:-नाही निर्मळ जीवन।काय करीलं साबनं?॥ ही बहिणाबाईंची ओळ.या ओळिनी अनेकांचे अस्वच्छ वैचारिक घोळ(अगदी निरमा घालुन) घुतलेले आहेत.तरिही 'साबण' असं शुद्ध न लिहिता 'साबन' असं अशुद्ध लिहिलं..असं अजुनही काहि जणांना वाटतं.त्यांना नेमकं कश्यानी धुवावं? हा शुद्ध प्रश्न आंम्हाला तूर्तास पडलेला आहे.

३४)शंख आणि घंटा:-यापैकी शंख- हा काहि यजमान गुरुजिंच्या नावानी करतच असतात. पण तसाच गुरुजि यजमानांच्या नावानी करू शकत नाहीत.कारण तसा त्यांनी तो केला,तर हाति काय लागणार शेवटी??? घंटा(?????) सॉरी...सॉरी...तंटा..तंटा म्हणायचं होतं मला! (शंख आणि घंटा ही आपल्या संस्कृतितली कित्ती महत्वाची उपंकरणं आहेत नै??? :खो खो: )

३५)रांगोळी:-म्हणजे रांगेत पडणारी गोळी...पण,अरे??? हळद/कुंकवानंतर यायला हवि होती.म्हणजे रांगेत पडण्याचा स्वतःचाच गुणधर्म विसरली कि काय? असो..कधिकधी होते आत्म-विसंगती!

३६)सत्यनारायणाचा प्रसाद(शिरा):-उशिरात उशिरा पुजेआधी तयार ठेवावा. तरच याचा मूळ गुणधर्म कळून येइल.

३७)नैवेद्यः-अन्नाचा महानैवेद्य..कंसात(राइसप्लेट Wink ) प्रत्येक गोष्टीला सारखं कंसात घातल्या शिवाय कंस सुटत नाहीत. पूर्वी उल्लेखिल्या प्रमाणे कृष्णाने तो कंस कायमचा सोडविला.ते भाग्य आपल्या पदरी नाही. तरिही देव नैवेद्य खात असता,तर स्वार्थी माणसानी तो त्याच्या समोर ठेवलाच नसता.(फुकटचा! Wink ) हे आमचं मत..पण,एरवी आंम्ही आपल्याशीच सहमत...चालू लोकशाहीचा परिणाम! दुसरं काय?

३८)कणकेचे दिवे:-अता दिवे कसलेही असले,तरी ते लावले कसे जातात? हेच महत्वाचे.नायतर लहानपणी आपण ऐकलेलं असतच की..,"अत्ता बॅट हाती घेताय.परिक्षेत काय दिवे लावणार आहात?तिथे काय तेंडुलकर येणारे का उत्तरं सांगायला?" असं म्हणून त्याच बॅटनी आपल्या दिवट्याची कणिक तिंबलेले अनेक पालक(म्हणजे स्वयंघोषित मालक) असतात. त्यामुळे खरे कणकेचे दिवे--ते!!!,लहानपणी हवं तिथे प्रकाश पडू न दिले गेलेले.

३९)गणपतिचं चित्रः- वास्तूशांतिचेवेळी हे दरवाज्याच्या वर इतक्या उंचावर लावतात,की नजर जात नाही.आमच्या मते हे चित्र लावण्यापेक्षा दारावर व्ह्यू-फाईंडर नामक एक भोक असतं.त्या आपल्या फाईंडखाली एक आरसा कडेनी दोन मोठ्ठे कान,खाली सोंड,वर मुकुट असं त्रिकुट करून लावावा. म्हण्जे येणारी व्यक्ति श्री.संतोष विघ्ने..अश्या अण्णावाची असेल,तर स्वतःचच तोंड आरश्यात पाहिल,व आपला गणपति जाहला..असं म्हणून निघून जाइल.आणि हा आमचा नवा गणपति निर्विघ्नता सिद्धिसाठी नक्की यश देईल.

४०)तोरणः-पूर्वी हे घराला दरवाज्याची चौकट 'बसली' की लगेच बांधत.आता आख्खं घरं बांधून झालं की मगच बांधतात.काहि का असेना? काहि गोष्टिंना "अजुनही टिकून आहे" या अनुषंगानिच महत्व राहतं,हे तरी काय कमी आहे?

४१)काळी बाहुली:-माझ्या लहानपणापासून मी एकही बाहुली काळी पाहिलेली मला अठवत नाही.म्हणजे माझी नजर कोणता रंग पाहाते? हा आत्मसंशेधनाचा विषय झाला.इतरांच्या बाबतीत हे घडत नसावं.काहि जणं काळे गॉगल लाऊन बाहुल्या पहातात,आंम्ही उघड! इतकच. ही काळी बाहुली घराला नजर लागू नये म्हणून टांगतात.तसलाच काहिसा गुणधर्म आमच्यात आला.ती आमच्या नजरेला-अशी आलीच नाही.

४२)मुंडावळः- नवर्‍या मुलाच्या बाबतीत घोड्याच्या डोळ्यावरची झापड व ही झापड सारखीच! लग्नात ही झापड मुलाला काय म्हणते?-"बाब रे! अत्तापर्यंत आजुबाजुचं सृष्टीसौंदर्य पहात होतास,अता यापुढे बायको हे सौंदर्य..आणि बाकिची फक्त सृष्टी!!! "

४३)सूपः- हे सूप म्हणजे टोमॅटो सूप नव्हे.देवक ठेवायला हे सूप लागतं. कार्याचे शेवटी हे सूप वाजलं की कार्य संपलं असं समजतात.पण हा भ्रम आहे. कारण पुढे संसारात एकमेकांवर आग पाखडायला या सुपाचा चांगला उप-योग होतो,तेंव्हा हे सूप नंतर गुरुजिंच्या हाती सोपवू नये.

४४)अता दक्षिणा(म्हणजे लास्ट बट नॉट लिस्ट अशी ती,आणि या लिस्टमधे पुन्हा लास्ट'च आली अशिही तीच! आणि कुठेही 'आली-नाही' तरी कुण्णालाच चुकत नाही अशिही तीच! ) ती दक्षिणा:-पुरोहितांच्या(जुन्या)पिढीच्या हिशेबा'नुसार-"आपल्या दृष्टिनी अत्यंत महत्वाचा व यजमानंच्या दृष्टिनी अत्यंत दुर्लक्ष करण्याचा एकमेव पदार्थ!" अता नव्या पिढिच्या हिशेबा'प्रमाणे:- "इथे खरं म्हणजे प्रमाण..असं काहि अता उरलेलच नाही..हेच या मताचे स'प्रमाण!" अजून काय सांगू?

हुश्श्श्श्श्श्श्श्श्श...........!!! संपली एकदाची..ती यादी!

पण अशिही ती संपते का हो??? प्रत्येक चित्रपटाची समाप्तीची पाटी ही एक सोय असते... खरी सुरवात होते,ती त्यानंतरच!
म्हणूनच पुन्हा एकदा
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users