खिडकीतून भेटलेले आनंद मोडक

Submitted by झंप्या दामले on 21 March, 2015 - 18:01

कवी सुधीर मोघे यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त १६ मार्चला होणाऱ्या कार्यक्रमाची जाहिरात पाहिली आणि त्यांच्या इतकीच प्रकर्षाने आठवण आली त्यांचे सुहृद आणि ‘एक झोका...’ या अतिसुंदर गीताला तितकेच मधुर संगीत देणारे संगीतकार आनंद मोडक यांची. खूप दिवस मनात असलेल्या आनंद मोडक यांच्या आठवणी सांगाव्याश्या वाटत आहेत म्हणून हा शब्दप्रपंच !!

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या बहुतांश आवडीच्या गोष्टी या सुरुवातीला कुठल्याही लेबलशिवाय असतात. म्हणजे अमक्या प्रकारचा पदार्थ, अमक्या प्रकारचे कपडे वगैरे हे आधी आपल्याला नुसतेच आवडायला लागतात पण नंतर त्या आवडत्या गोष्टींमध्ये काहीतरी सामना धागा गवसतो आणि मग आपण त्या धाग्याला धरून कुतूहलाने पुढे शोध घ्यायला सुरुवात करतो. संगीतकार किंवा गायकाचे बहुतांश वेळेस असेच होते. आनंद मोडकांच्या बाबतीत माझे असेच झाले. आधी काही गाणी आवडत गेली. मग लक्षात आले की ‘अरे ! ही तर आनंद मोडक यांची गाणी’. मग लक्ष देऊन त्यांचे नाव शोधायला लागलो. कळत गेले की ९० च्या दशकातल्या (प्रामुख्याने नव्वदीचा उत्तरार्धातल्या) मराठी चित्रपटांमधल्या अंधःकारामध्ये काही थोडके कवडसे होते त्यातला एक कवडसा म्हणजे आनंद मोडक.

त्यांच्याबदल एकुणातच माहिती फार कमी होती. कधी पडद्यावरदेखील दिसायचे नाहीत. त्यांच्या सुंदर चालींमधून भेटत राहायचे तेवढेच. छोटे शब्द किती मोठे असू शकतात आणि साधी चाल किती साजिरी असू शकते ते कळायचे ‘एक झोका....’ गाण्यामधून ! चालीलाही सुगंध असतो हे जाणवायचे ‘जाई जुईचा गंध मातीला...’ मधून. हळूहळू मिळतील तश्या CDs, गाणी जमवत गेलो. मुक्ता, सरकारनामा, जुन्या कवयित्रींच्या रचनांवर त्यांनी सदर केलेल्या कार्यक्रमाची ‘शेवंतीचे बन’ पासून ते अलीकडच्या समांतर, मसाला पर्यंत... इकडे तिकडे मिळणाऱ्या माहितीचे कण टिपत राहिलो. मग कधीतरी काहीतरी ‘Trivia’ गवसल्याचा आनंद मिळायचा. उदा. ए. आर. रेहमान पासून ते कोक स्टुडीओपर्यंत हजेरी लावणारा clinton cerejo आनंद मोडकांकडे १५-२० वर्षापूर्वीच गायलाय – मुक्ता मधल्या आफ्रिकन तरुणाच्या तोंडून ! अजय अतुल कोणीही नव्हते तेव्हापासून त्यांना त्यांची क्षमता माहिती होती. विशेषतः गायक म्हणून अजयच्या गळ्याच्या क्षमतेचा त्यांनी आवर्जून उपयोग करून घेतला आहे. तो त्यांच्याकडे फार पूर्वीपासून गात आलाय – अगदी १५-२० वर्षापूर्वीच्या ‘राजू’ पासून ते कालपरवाच्या ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ पर्यंत....

अशातच एके दिवशी कळले की ते फेसबुक वर आहेत. मग लगेच त्यांना add केले. हेतू हाच की त्यांच्या कडून जास्तीत जास्त माहिती मिळवावी. कुतूहल खूप होते, प्रश्न खूप होते ... संवाद साधायची इच्छा होती. बऱ्याचदा ते छान छान गाणी शेअर करायचे. जुन्या हिंदी गाण्यापासून अगदी Papon च्या कोक स्टुडिओ मधल्या कालपरवाच्या गाण्यापर्यंत. एवढेच काय ABBA या इंग्लिश band सह अनेक इंग्रजी गाणी ते आवर्जून शेअर करायचे. काहीतरी विचारले की कधीतरी त्याला प्रतिसाद यायचा.

अशातलाच एक दिवस माझ्यासाठी कायमचाच संस्मरणीय बनला आहे. सहज म्हणून केलेल्या फेसबुक वरच्या pingला त्यांचे उत्तर आले आणि मग मी त्यांच्याशी भरपूर रंगत गेल्या. त्यांच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध असल्याचे मी त्यांना म्हणालो त्यवर त्यांच्याकडून कळले की एका नव्याने येऊ घातलेल्या TV channel वर त्यांच्या गप्पांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्यातून माझे बरेचसे कुतूहल शमेल. माझी उत्सुकता वाढायला लागली. आणि मग गप्पा मारता मारता मी माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे वळलो – ते म्हणजे अजय-अतुल !! त्यांचे मोडक आनंद मोडक यांच्याशी खूप जुने संबंध. त्यांचा प्रवास, संघर्ष मोडक यांनी जवळून पाहिलेला होता. अजय अतुलच्या प्रवासाबद्दल ते फारच खूष होते. नुकताच 'अग्निपथ' प्रदर्शित झाला होता आणि त्यातल्या ‘शाह का ऋतबा” या कव्वालीवर ते निहायत खूष होते. “काय सुंदर गाणे केले आहे दोघांनी” म्हणाले. माझ्यासाठी तर तो क्षण शब्दातीत होता. जीवापाड आवडणाऱ्या एका संगीतकार जोडीबद्दल अतिशय आवडणारा दुसरा संगीतकार भरभरून दिलखुलासपणे बोलतोय याहून सुखाचा सुंदर क्षण दुसरा कोणता असू शकतो ! माझा २६ जानेवारी २०१३ अगदीच सार्थक झाला होता !!

या गप्पांशिवाय मी आणखी एका गोष्टीसाठी त्यांच्या मागे लागलो होतो.... कध्धीपासूनच !! जेव्हापासून मी उरूस चित्रपटातले ‘सुगीचा सुटलाय अवखळ वारा’ हे गाणे ऐकले होते मी ठार पागल झालो होतो ... मधुर चालीची अप्रतिम लावणी आणि गायला आशाताई... विषयच संपला !!! मला काहीही करून ते गाणे हवे होते. तेच काय त्यातली सगळीच गाणी सुरेख होती (अजयचेसुद्धा एक गाणे होते) ...चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये म्युझिक रिलीज झाल्याची बातमी वाचल्याचेही आठवत होते. रेड एफ एम सुरु होण्याआधी ९३.५ वर एस एफ एम लागायचे तेव्ह्या त्यात लागणाऱ्या निवडक मराठी गाण्यांमध्ये ‘सुटलाय अवखळ वारा...’ ऐकल्याचे लख्ख आठवत होते. पण एवढे असूनही ते गाणे कुठेही उपलब्ध नव्हते. खुद्ध मोडक काकांचेही म्हणणे होते की ते गाणे रिलीज झालेले नाही पण मी त्यांना अधून मधून आठवण करून देत होतो. CD उपलब्ध कुठे आहे विचारून झाले. अगदी ‘उरूस’चे दिग्दर्शक शेखर नाईक यांनाही फेसबुक वर गाठायचा प्रयत्न केला. पण प्रतिसाद आला नाही. पुन्हा मोडककाकांना “तुमच्याकडे असेल तर प्लीज मला द्याल का” विचारले (एव्हाना मी त्यांना काका बनवून टाकले होते)... त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले “त्या गाण्याचे हक्क माझ्याकडे नाहीत. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होऊ शकत असल्याने मी तुला ती देऊ शकत नाही...” चित्रपटाचा निर्माता किंवा तसलेच काहीसे असणारा ‘बाबा शेख ‘ नावाच्या माणसाकडे हक्क असल्याचे सांगितले... माझी चिडचिड झाली. काय हरकत आहे द्यायला असे वाटले. ज्या चित्रपटाविषयीच फार कमी लोकांना माहिती आहे त्यातले एक रत्न बाहेर पडल्याने शेखबाबांचे काय नुकसान होईल खुदाच जाणे. पण न आल्याने उणीव मात्र राहील हे नक्की... पण त्याच वेळी मोडक काकांबद्दल कौतुकपण वाटले. जे गाणे बाहेर पडल्यामुळे झाला तर त्यांचा फायदाच होणार होता ते गाणे त्यांनी कायद्याचा मान राखून मला देण्याचे नाकारले. मला या गाण्यासोबतच ‘कळत न कळत’ची गाणी पण हवी होती.... अमोल पालेकरांच्या ‘धूसर’मधले अगदी कातर करणारे ‘एक सांज पक्षी...’ (गायक : स्वप्नील बांदोडकर) हे अमेझिंग गाणेसुद्धा हवे होते... गरीबाच्या मागण्या फारच वाढल्या होत्या. मग एके दिवशी त्यांनी मला सांगितले “अमोल पालेकर परदेश दौऱ्यावरून आल्यावर कदाचित म्युझिक रिलीज करतील”. मी आशा सोडली. चित्रपट ऑलरेडी रिलीज झाला होता. इतक्या उशिराने पालेकर जागे व्हायची शक्यता शून्य होती. पण मोडक काकांचे पुढचे म्हणणे असे होते “कळत न कळत रिलीज होऊन २० पेक्षा अधिक वर्षे झाल्यामुळे कॉपी राईटचा प्रश्न येणार नाही. मी तुला ती गाणी देऊ शकतो आणि माझ्याकडे आलास तर येऊन ‘उरूस’ ची गाणी ऐकू शकतोस.” वाः !! देव देतो दोन !!!. ‘उरूस’ची गाणी घेऊन जायला मिळाली नाहीत तरी किमान ७-८ वर्षांच्या gap नंतर पुन्हा ऐकायला मिळत आहेत – तेही त्यांच्या घरी जाऊन - हेही नसे थोडके. ते म्हणाले “आत्ता मी थोडा बिझी आहे पण पुढच्या महिन्यात – १० तारखे नंतर तू माझ्याकडे येऊ शकतोस”. ठरलंच तर !! बार उडणार !!

पण वाटले तितके हे सहज घडणार नव्हते. दरम्यानच्या काळात माझ्या लग्नाचा बार आधी उडणार हे निश्चित झाले. साखरपुड्याची गडबड, मग खरेदीची गडबड या कारणांमुळे गाण्यांच्या प्रोग्रॅमला प्राधान्य कमीच मिळाले. त्यात बरेच दिवस लोटले. जरा गडबड आटोपल्यावर मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला. दोन तीनदा ... पण प्रतिसाद आला नाही. दरम्यानच्या काळात एक फार चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे त्यांचे ‘लोकरंग’ पुरवणी मधले सदर – ‘स्मरणस्वर’. त्यांनी मध्यंतरी सांगितलेला TV प्रोग्रॅम काही उगवला नव्हता पण या सदरामुळे त्यांच्याबद्दल बरेच काही कळू लागले. अगदी पुलंचे ‘तीन पैशाचा तमाशा’, तेंडुलकरांचे ‘घाशीराम’ यांच्यापासून ते खूप वेगळ्या धाटणीच्या नाटकांशी, संगीताशी जोडलेले राहिले. बेगम बर्वे, महानिर्वाण, पडघम सारख्या नाटकांमधून प्रयोगिकतेशी जुळलेले राहिले. तेव्हा लक्षात आले की हा प्रवासी मळलेल्या वाटेवरचा नाही. त्याची जुन्याशी नाळ जुळलेली आहे पण नव्याचे विलक्षण कौतुक आहे ! हा माणूस आपल्या सदरातून हिंदी चित्रपट संगीतातल्या सुवर्णकाळाच्या आठवणी ताज्या करत होता आणि त्याच ‘लोकरंग’ पुरवणीतल्या पाश्चिमात्य संगीताची ओळख करून देणाऱ्या आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ सदराला आवर्जून दाद देत होता. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत नोकरी करणारे मोडक नोकरी सांभाळून अतिशय मोजके पण वेधक संगीत देत राहिले. सर्वसामान्य माणूस साठीनंतर निगुतीने आयुष्य जगू पाहतो. पण मोडककाका मात्र सेवानिवृत्त होताच आपल्या आवडत्या उद्योगात प्रचंड बिझी झाले !! त्यांनी संगीत दिलेले चित्रपट डॅम्बिस, मसाला, म्हैस, जय शंकर इ. अगदी एका पाठोपाठ एक धडकू लागले.
आता मात्र त्यांची गाठ घेणे आवश्यक होते पण मुहूर्त लागत नव्हता. तशातच कवी श्री. सुधीर मोघे गेल्याची बातमी आली. मोडककाका नक्कीच आतून हलले असणार. त्यांची मागे थांबण्याची फारशी तयारी नसावी. अक्षरशः २ महिन्यातच – २३ मे २०१४ ला ती अशुभ आली. आदल्या दिवशीचे रवींद्र साठेंसोबतचे ध्वनिमुद्रण आणि त्या दिवशीचा चंद्रकांत काळेंसोबतचा प्रस्तावित जाहीर कार्यक्रम यामधल्या काळात आनंद मोडक रंगल्या मैफलीतून निघून गेले... सुह्र्द सुधीर मोघेंना भेटायला !! सुन्न व्हायला झाले. ‘सुगीचा अवखळ वारा...’ मिळवण्याची - किमानपक्षी पुन्हा ऐकण्याची - आता सुतराम शक्यता उरली नव्हती. भविष्यात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या सुंदर चालींशी भेट होण्याची शक्यता कोमेजून गेली होती. chat window मधून भेटणारे, 'स्मरण-स्वर'च्या छोट्या खिडकीतून दिसणारे आनंद मोडक प्रत्यक्षात भेटण्यापूर्वीच पलीकडूनच निघून गेले होते.... पुरवणी मधल्या सदरातून केलेले लिखाण ताजे असतानाच सुधीर मोघेसुद्धा असेच निघून गेले होते आणि जगदीश खेबुडकरतर सदर चालू असतानाच भरल्या ताटावरूनच उठून गेले होते. आपण कितीही योजना आखत बसलो तरी ‘तो’ येऊन रांगोळी कधी फिस्कटून टाकेल याचा नेम नसतो हेच खरे ......

कट टू - ४-५ महिन्यानंतरचा एक शनिवार
‘रमा-माधव’ बघायला ‘प्रभात’ला गेलो होतो.... देखण्या चित्रचौकटी लक्ष वेधून घेत होत्या आणि त्यातूनच काही अक्षरे पडद्यावर एकापाठोपाठ एक उमटली – अगदी अटळपणे ... गीत : सुधीर मोघे, संगीत : आनंद मोडक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंद मोडक हे आमच्या बाबांचे खास मित्र ! अकोल्याला कॉलेज ला ही एकत्र होते! पुढे ते पुण्याला स्थायिक झाले तरी पत्रव्यवहार अन नंतर फोन सुरु असायचे सतत!!! बाबा त्यांच्या खुप आठवणी सांगत असतात नेहमी

मोडकांचे संगीत फारसे ऐकलेले नाही. मात्र महानिर्वाण आणि महापूरमध्ये त्यांनी दिलेल्या संगीताबद्दल आईकडून फार ऐकले आहे. ही दोन नाटके आणि त्यातली गाणी/संगीत सगळेच भन्नाट होते म्हणे.

आट्यापाट्या खेळोनी नाना आला रे असे काहितरी एक गाणे बरेचदा मी ऐकले आहे या नाटकातील.

छान लिहिलं आहे.

>> आधी काही गाणी आवडत गेली. मग लक्षात आले की ‘अरे ! ही तर आनंद मोडक यांची गाणी’.
माझंही असंच झालं होतं.

लेख आवडला.
मोडककाकांना जाऊन आता वर्ष होईल हे खरं वाटत नाही.
अजूनही त्यांचा फेसबुकावरचा वावर आठवतो. Sad

मोडककाकांचं हे मनोगत तुम्हांला आवडेल - http://www.maayboli.com/node/3417

सुंदर.अगदी मनापासून लिहिलेय... अलिकडचे नाही पण तूम्ही ज्या नाटकांचा उल्लेख केलाय त्यातले त्यांचे संगीत ऐकले होते. अलिकडची गाणी पण आता ऐकेन.

छान लिहिलं आहेत. महाबँकेतल्या एका नात्यामुळे त्यांच्याशी माझीही वैयक्तिक म्हणावी अशी ओळख होती, अगदी मोडक काका म्हणायचो अशी. "कळत नकळत" मधले "मना तुझे मनोगत" हे त्यांनी संगीत दिलेलं माझं सर्वात आवडतं गाणं. सुदैवाने मला ते थेट मोडक काकांकडुन घेता आलं. "लपंडाव" चित्रपटातलं असच एक माझं आवडत गाणं त्यांनी मला मुळ साउंडट्रॅकवरून रेकॉर्ड करून दिलं. त्यात अगदी गाण्याच्या सुरुवातीला त्यांचे १ २ ३, १ २ ३ पण ऐ़ऊ येतात Happy
अनेक वर्षांपुर्वी त्यांनी पुणे आकाशवाणीसाठी एक रचना केली होती. संत रामदासांचा अभंग आहे तो. "सुरस मधुर वेणू, वाजवितो रुणु झुणु". माझ्या आठवणीप्रमाणे वीणा सहस्त्रबुद्ध्यांनी ते गायले होते. त्यात त्यांनी पाव्याचा जो काही सुरेख वापर केला आहे तो ऐकताना रोमांच उभे रहातात. त्या गाण्याच्या सुद्धा अतिशय कमी प्रति उपलब्ध आहेत. मला ते मोडक काकांकडेच ऐकायला मिळाले. अजुन कुठेही ते ऐकले नाही कि माझ्या माहितीतल्या कोणाला ते गाणे माहिती नाही. अशी त्यांनी घडवलेली अजुन किती रत्नं दडली आहेत देव जाणे.
अत्यंत गुणवान मनुष्याने अत्यंत साधे व सभ्य कसे असावे ह्याचे मोडककाका हे मी पहिलेले पहिले उदाहरण. जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो, त्यांच्या रचना ऐकल्या ते क्षण मनावर कायमचे कोरले गेले. महाराष्ट्र बँकेच्या साठी त्यांनी अनेक लोकगीतांना, समुहगीतांना चाली दिल्या. एस एम जोशी जेव्हा वारले तेव्हा त्यांच्यावर वसंत बापटांनी लिहिलेल्या कवितेला मोडक काकांनी चाल लावली होती. महाबँकेच्या टीमने ती तेव्हाचे पंतप्रधान व्ही पी सिंग ह्यांच्या समोर सादर केली होती. सलील चौधरीं हे मोडककाकांचे सर्चात आवडते संगीतकार.
गेल्या काही वर्षात फेसबूक द्वारे त्यांच्याशी थोडा संपर्क होता. मधे त्यांनी अमिताभ बच्चन ह्यांच्या वडिलांच्या (हरिवंशराय बच्चन) कवितांना चाल लावली आणि त्या निमित्तानी अमिताभ बरोबर एक फोटो पण फेसबूक वर शेअर केला होता. आणि मग एक दिवस अचानक ते गेल्याची बातमी आली. अक्षरशः सुन्न होऊन गेलो. त्याच सुमारास स्मिता तळवलकर पण गेल्या आणि मग पुढचे दोन तीन दिवस मी फक्त "चौकट राजा" ची गाणी परत परत ऐकत होतो.