पाकळ्यांचा भार

Submitted by संतोष वाटपाडे on 19 March, 2015 - 00:22

कंप अजुनी दाटला देहात नाही
नेमकेपण का तुझ्या स्पर्शात नाही...

पाकळ्यांचा भार तू सावर गुलाबा
फार ताकद राहिली देठात नाही....

एकटा रोखू किती मी वादळाला
जोर पहिल्यासारखा पायात नाही...

रात्रभर चुरगाळतो घायाळ होतो
मोगर्‍याचा त्याग वाया जात नाही..

पेटला वणवा नको विझवूस आता
रोखणे त्याला तुझ्या हातात नाही..

मी पितो डोळ्यातुनी रम.. झिंगतोही
पण नशा ओठातली डोळ्यात नाही...

शोधले चंद्रा तुला अंधार करुनी
जा नभी जागा तुझी वस्त्रात नाही...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users