'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी

Submitted by अतुल. on 16 March, 2015 - 17:28

काही काही योगायोग विलक्षण असतात. एखादे गाणे ऐकावे आणि काही काळातच त्या गाण्यातल्या अर्थाची घटना खऱ्या आयुष्यात घडलेली ऐकायला मिळाली कि मन स्तिमित होते. परवा सहज लताजींनी गायलेले 'सामना' मधले "सख्या रे घायाळ मी हरिणी" ऐकत होतो. हे गाणे विलक्षण आहे. किंबहुना सामना चित्रपटच विलक्षण आहे. माझ्या जन्माच्या आधीचा चित्रपट. पण माझे भाग्य असे कि कसल्याश्या फेस्टिवल वगैरेच्या निमित्ताने पुण्यात अलका थियेटरच्या मोठ्या पडद्यावर मला हा चित्रपट एकदा पाहायला मिळाला होता. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा चित्रपट थिएटरला पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. खरेच. एकच शब्द "अप्रतिम". केवळ अप्रतिम. दिग्दर्शक प्रभावी असेल, कलाकार मुरलेले असतील, संगीत कसदार असेल आणि गाणाऱ्या लतादीदी असतील तर ती कलाकृती अत्युच्च दर्जाची व्हायला कलर, डॉल्बी, डिजीटल, एचडी किंवा तत्सम अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नसते हे 'सामना' चित्रपट दाखवून देतो. "समस्त व्याघ्रमंडळी सुखी असोत" म्हणत मिश्किलपणे सरपंचाच्या भयाण वाड्यात सहजगत्या प्रवेश करणारे डॉ. लागू आणि "साहेब, ह्या देशात लोकांना एकवेळचं अन्न खायला मिळत नाही. पण तुम्ही घ्या" म्हणून आलेल्या व्ही.आय.पी. पाहुण्याचा पाहुणचार करणारे 'सरपंच' निळू फुले. ह्या दोन दिग्गजांनी केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना तीन तास खुर्चीला खिळवून ठेवण्याची किमया साधली आहे. चित्रपट पाहून थियेटर बाहेर आल्यावर "पडद्यावर कलर नव्हते, संगीत डिजीटल नव्हते, शुटींग परदेशातलं नव्हतं, गाण्यात डान्स नव्हता, खायला पोपकोर्न नव्हते" असली कसलीही खुळचट बाजारू गोष्ट मनात येत नाही. मनात भरून राहतो तो फक्त आणि फक्त चित्रपट. भरून राहतो तो निळू फुलेंचा करारी सरपंच, भरून राहतो तो डॉ. लागूंचा "मारुती कांबळे"चा शोध, आणि भरून राहते ती काळीज चिरत जाणारी लतादीदींची गाण्यातली आर्त साद... "हा महाल कसला, रान झाडी ही दाट. अंधार रातीचा, कुठं दिसना वाट"

असे आशयघन चित्रपट आणि अशी इंटेन्स गाणी आता होणार नाहीत. कारण तो काळ तसा होता. आजचा काळ वेगळा आहे. असा काहीबाही मी विचार करत होतो. तितक्यात पेपरमधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. "सिडनी मध्ये भारतीय महिलेची हत्या". कुतूहलापोटी बातमी वाचली. आजकाल खून, बलात्कार, दरोडे, हाणामाऱ्या अगदी रोजचे झाले आहे. पण ही बातमी वाचली आणि मन अक्षरशः थरारून गेले. वेगवेगळे स्त्रोत धुंडाळून बातमीच्या मिळेल त्या डीटेल्स भराभरा मनात साठवत गेलो. आणि ज्या परिस्थितीत ज्या प्रकारे ज्या वेळी ज्या वातावरणात ही घटना घडली होती तिची कल्पना करुन अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.

साधारणपणे तीन वर्षापूर्वी "ती" नोकरीच्या निमित्ताने भारतातून तिकडे गेली होती. घरदार कुटुंबाला सोडून इतक्या दुरवर दीर्घकाळ राहणे हा अतिशय वेदनादायक अनुभव असतो. पण कर्तव्याची जबाबदाऱ्यांची जाणीव ठेऊन भावनेला मुरड घालून आयुष्यात काही गोष्टी कराव्याच लागतात. काही काळ कुटुंबाच्या विरहाचाच फक्त प्रश्न असतो. आणि आजकाल अनेकजण असे करतातही. तिनेही तेच केले होते. नवऱ्याला आणि आपल्या सहा वर्षाच्या मुलीला सोडून ती दूर सातासमुद्रापार सिडनीला आली होती. दिवसभर खूप हेक्टीक काम असायचे. संध्याकाळी मन शिणून जायचे. पण काहीही झाले तरी भारतात असलेल्या आपल्या पतीशी आणि लाडक्या लहानगीशी ती अगदी दररोज संध्याकाळी न चुकता फोनवर बोलत असे. कारण तीच तिचे सर्वस्व होते. तिच्या भविष्यासाठीच ती इतक्या दुरवर सर्वांना सोडून इतकी वर्षे राहिली होती. पण आता मात्र ती थकली होती. कुटुंबापासून अजून जास्त काळ लांब राहणे आता तिला आता शक्य नव्हते. तसे तिने अनेकदा आपल्या नवऱ्याला फोनवर बोलून दाखविलेही होते. पण आता फक्त काही काळच राहिला होता. पुढच्याच महिन्यात ती कायमसाठी भारतात परतणार होती. नवरा आणि मुलीबरोबर नेहमी नेहमीसाठी ती राहणार होती. त्यासाठी तिने सगळी जय्यत तयारीही केली होती. चिमुकलीसाठी कपडे आणि खेळण्यांची मोठाली थैलीच तिने भरून तयार ठेवली होती. इतका प्रदीर्घ काळ बाहेर काढल्यावर कुटुंबासमवेत राहण्यासाठी ती खूप आसुसलेली होती. अधीर झाली होती. आतुरतेने सिडनी मधील शेवटचे दिवस सरण्याचीच वाट पाहत होती.

सात मार्च दोन हजार पंधराचा दिवस उजाडला. शनिवार होता. खरेतर हा सुट्टीचा दिवस. पण कामाचा ताण इतका कि आजसुद्धा काही अपॉइंटमेंट्स होत्या. महत्वाच्या होत्या. त्या आजच करणे भाग होते. पाहता पाहता तिचा अख्खा दिवस त्यात गेला. संध्याकाळ उलटून रात्र पडली. थकून भागून तिने घरी जाण्यासाठी ट्रेन पकडली. सिडनी पासून पंचवीसेक किलोमीटर दूर असलेल्या वेस्टमिड भागात ती जिथे आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती तिथून जवळ असलेल्या ट्रेन स्टेशनवर जेंव्हा ती उतरली तेंव्हा रात्रीचे चक्क नऊ वाजून गेले होते. स्टेशनवर कसलीच वर्दळ नव्हती. सिडनी शहरापासून थोडी दूर असलेली ही स्टेशन्स रात्रीच्या वेळी सामसूम असतात. ट्रेन असेपुरती थोडी गजबज. पुन्हा शुकशुकाट. आजूबाजूला माणूसकानूस दिसत नाही. दूरदूरवर निरव शांतता. रस्त्यावरच्या एखाददुसऱ्या गाड्यांचेच काय ते अधूनमधून आवाज. इथून केवळ एक दिड किलोमीटरवर तिचे घर. झपाझप पावले टाकत ती स्टेशन बाहेर आली. दरम्यानच्या काळात दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे भारतात नवऱ्याशी फोनवर बोलणे सुरु होते. मुख्य रस्त्याच्या पदपथावरून काही काळ चालल्यावर तिला आता डावीकडे वळायचे होते. तिथून पार्क शेजारून जाणाऱ्या छोट्या पायवाटेने तिचे घर लगेचच येणार होते. मोठे मैदान आणि पार्क यांच्या मधून गेलेली साधारणपणे एक किलोमीटरभर लांबीची ही पायवाट तशी तिच्या रोजच्या सवयीची. पण रात्री अपरात्री ती सुनसान असायची. चिटपाखरूही फिरकत नसे. भयाण वाटायची. म्हणूनच भुरट्या गुंडपुंड प्रवृत्तींचाही तिथे वावर होता. तिच्या मैत्रिणीने देखील तिला त्या वाटेवरून रात्री न येण्याबाबत पूर्वी एकदा दोनदा बजावले होते. पण फोनवर नवरयाबरोबर बोलायच्या नादात वेळकाळाचे भान न राहता केवळ नेहमीच्या सवयीप्रमाणे तिची पावले त्या वाटेवर आपसूक वळली. फोन वर बोलताना तशीही ती मनाने भारतातच असायची. मायदेशी परत येण्याच्या कल्पनेने ती किती उतावळी झाली आहे किती आनंदून गेली आहे हे ती नवऱ्याला सांगत होती. आपल्या चिमुकलीची प्रेमाने चौकशी करत होती.

चालता चालता बोलता बोलता काही क्षण कसे गेले तिला कळलेही नाही. अंगाला रात्रीच्या वेळची बोचरी थंडी जाणवत होती. वाऱ्याने आजूबाजूच्या गर्द झाडीत पानांची सळसळ व्हायची. बाकी सगळं वातावरण स्तब्ध. आणि अचानक तिला पाठीमागून कोणाचीतरी चाहूल लागली. इतर कोणीतरी पांथस्थ असेल म्हणून तिने सुरवातीला दुर्लक्ष केले. पण "त्या" व्यक्तीची चाल काही ठीक नाही हे तिच्या अंत:चक्षूना जाणवले. तशी ती चपापली. सतर्क झाली. नकळत कानोसा घेऊ लागली. आणि काही वेळातच ती मागून येणारी व्यक्ती अन्य कोणी पांथस्थ नसून आपलाच पाठलाग करत आहे हे तिच्या लक्षात आले. आता दूरदूरवर तिथे आजूबाजूला वस्ती नव्हती. त्या छोटेखानी वाटेवर गर्द झाडी. विजेच्या दिव्यांचे खांब लांब लांब अंतरावर लावलेले. एका बाजूला विशाल मैदान. दुसरीकडे मोठ्ठे पार्क. आणि सभोवार गडद अंधार. ती थरारली. पावले भरभर पडू लागली. लांडग्याने सावजावर पाळत ठेवावी तशा नजरेने पाहत मागची ती व्यक्ती तिच्या अजून जवळ येऊ पाहत होती. दूर अंतरावर असलेल्या पथदिव्याच्या अंधुक प्रकाशात तिला त्याचा भेसूर चेहरा दिसला. आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. घशाला कोरड पडली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या नवऱ्याला तिने फोन वर सांगितले, "माझा कोणीतरी पाठलाग करतंय. मला भीती वाटतीये." अचानक कापरे भरलेला तिचा आवाज ऐकूनच तिचा नवरा हादरला. परिस्थिती जाणून घेण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. काहीतरी अघटीत घडणार आहे याची पाल नकळत त्याच्या मनात चुकचुकली. त्याने जादा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धीर देत राहिला. "मी घरापासून तशी जवळ आली आहे. पण मला खूप भीती वाटतीये रे. काय करू" आता मात्र ती रडवेली झाली. जीव कासावीस झाला होता. नियती पण किती विचित्र. आपली प्रिय पत्नी जीवघेण्या संकटात आहे हे सगळे काही त्याला समजत होते. पण पण तो काहीच करू शकत नव्हता. तिने आता भीतीने जोरजोरात चालायला सुरवात केली. ह्रिदयाची धडधड जोरात वाढली होती. पावले अडखळली. मदतीची तिची आर्त याचना फोनमधून त्याच्या कानावर पडली. आणि त्याच्या पायातले त्राण संपले. तो फक्त वेड्यासारखा तिला हाका मारत राहिला. तिचा आर्त आवाज असहायपणे ऐकत राहिला. एव्हाना त्या नराधमाने तिला गाठले होते. एका झेपेत तिला पकडून तिचा रस्ता अडवून तो भेसूर नजरेने तिच्याकडे रोखून पाहत उभा राहिला. नजर अतिथंड पण जीवघेणी. हिंस्र श्वापदालाही लाजवेल इतके क्रौर्य आणि निष्ठूरपणा त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवत होता. बघता बघता मानसिक तोल ढळल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले आणि विमनस्क हसल्या सारखे करत त्याने धारदार सुरा काढला.

"क.. कक.... क्काय.... काय... हवेय तुला? कक काय हवे ते घे. चीजवस्तू. पैसे. दागिने. प्प... पण प प्ली प्लीज. प्लीज. मारू नको. प्लीजजजजजज. मला मारू नको.", ती किंचाळली. ठेचकाळत पडली. कशीबशी सावरत उठून उभी राहिली. काही क्षणात हे सर्व काय घडले होते. तेवढ्यात मृत्यूची कराल दाढ होऊन उभ्या असलेल्या त्याचा हात सुऱ्यासहित वर गेला.

आणि जिवाच्या आकांताने ती फोनवर ओरडली, "डार्लिंग, मला भोसकले त्याने. भोसकले मला. वाचव."

आणि त्यानंतर काही क्षणातच तिची रक्त गोठवणारी गगनभेदी किंकाळी त्याला ऐकू आली.

त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. हाता पायाला घाम सुटला. अंगातले बळच निघून गेले. चक्कर येतेय कि काय असे वाटून बाजूच्या खांबाचा आधार त्याने घेतला. मूठ घट्ट आवळली. आणि होते नव्हते तेवढे त्राण घशात आणून तो ओरडला,

"प्रभा... प्रभा... प्रभा SSSSSS......"

मात्र त्याच्या हाकेला पलीकडून तिचा कसलाही प्रतिसाद आला नाही. त्याच्यापासून हज्जारो किलोमीटर अंतरावर दूर प्रदेशात पथदिव्याच्या मंद प्रकाशात रक्ताच्या थारोळ्यात तिचा देह निपचित पडला होता. सगळी धडपड थांबली होती. आता सगळे शांत झाले होते. परत जाण्याची स्वप्ने. आतुरता. अधीरपणा. सगळे सगळे सगळे, आता शांत शांत झाले होते.......

हा महाल कसला रानझाडी ही दाट
अंधार रातिचा, कुठं दिसंना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव
केलि कशी करणी ?
सख्या रे, घायाळ मी हरिणी

काजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी

गुपित उमटले चेहर्‍यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी

सख्या रे, घायाळ मी हरिणी. सख्या रे, घायाळ मी हरिणी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय दुर्दैवी घटना.... गेले आठ दहा दिवस खरतर चित्त थाऱ्या वर नाही... रात्री बेरात्री ती बातमी, ती क्लिप डोळ्यासमोर येते...
तिच्या आत्म्याला शान्ती मिळो असे तरी कसे म्हणनार?? तिच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करण्यावाचुन दूसरे काही सुचत नाही...
लेख वांचू शकले नाही..

अतुल छान लिहिलेय असे म्हणायची हिंम्मत होत नाहीये, म्हणणारही नाही..त्या गावात बरेच दिवस घालवलेत अन आताही जाणे येणे असते. त्या दिवशी जे झाले ते खरोखरच भयानक होते..आपल्या घराजवळ असे काही घडेल अशि कल्पनाही करवत नाही...

ती बातमी वाचल्यापासून चित्त थार्‍यावर नव्हते. Sad
सामना खूप लहान असतांना बघितला होता. तुम्ही छान लिहिले आहे. लेख अर्धाच वाचला. पुढचे वाचवले गेले नाही Sad

अईग्ग ही बातमी नव्हती आली वाचनात.. खरेच नाही वाचवल्या गेल्या शेवटच्या ओळी.. झरझर नजर फिरली.. असा प्रसंग डोळ्यासमोर उभा करणार्‍या या लेखनशैलीचे कौतुक तरी कसे करू..

सुरक्षित अशा जागाच उरल्या नाहीत आता>>>>>>

@दिनेश - हे उगाचे भयंकरीकरण आहे. प्रत्येक शहरात थोड्या एकांड्या, गुन्हेगारांचा वावर असलेल्या जागा असतात. जनरली त्या सर्वांना माहीती असतात आणि सामान्य लोक त्याप्रमाणे काळजी घेत असतात. ह्या केस मधे सुद्धा इतरांनी वॉर्न केलेच होते.
सिडनी भारतातल्या कुठल्याही शहरांपेक्षा अनेक पटीनी सुरक्षीत शहर आहे. मी स्वता तिथे राहीलेलो असल्यामुळे त्या शहराबद्दल कोणाचा चुकीचा समज होऊ नये म्हणुन हे लिहीतोय.

तसेच ह्या लेखात पण घरदार सोडुन दुरवर रहाणे वगैरे लिहुन त्या स्त्रीला उगाचच बिचारी वगैरे केले आहे.

atuldpatil,

Sad

लेख चांगला आहे असं म्हणवत नाही!

आ.न.,
-गा.पै.

टीप : वेळीअवेळी वावरतांना लोकं टॅक्सी का बोलवत नाहीत! Angry

गा पै, फक्त साडेनऊ वाजले होते....
अडीच वर्षापुर्वी मेलबर्नमध्ये Jill Meagher नावाच्या स्त्रीवर अतिशय अमानुष हल्ला आणि बलात्कार करून तिचा खून करण्यात आला... ती तर तिच्या घरापासून फक्त काही ब्लॉक्स दूर होती....

ही वास्तवात घडलेली अतिशय भयानक आणि तितकीच दुर्दैवी घटना असल्याने मी प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद वगैरे म्हणणार नाही. लिहायची उर्मी झाली ती केवळ आणि केवळ चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी लिहिलेल्या मराठी गाण्यातील शब्दरचना या घटनेतील प्रसंगांना तंतोतंत लागू पडल्यामुळेच. सिडनी शहराविषयी गैरसमज पसरवणे हा तर मुळीच हेतू नाही. गुन्हेगारी थोड्याफार प्रमाणात सर्वच ठिकाणी असते. तसेच कोणत्याही घटनेमागे अनेक शक्यताही असतात. यातील गुन्हेगार व त्यामागील कारणांचा अजूनही शोध लागलेला नाही (हा लेख लिहीपर्यंत). या सर्वांचा विचार करुन लेखातून गुन्ह्याविषयी/शहराविषयी वा अन्य कोणाविषयीही कोणत्याही प्रकारचे निष्कर्ष निघू नयेत व प्रसंग जसा घडला असेल तसा मांडला जावा असा प्रयत्न केला आहे.

बाकी, चु.भू.दे.घे.
अतुल

>>>> @दिनेश - हे उगाचे भयंकरीकरण आहे. प्रत्येक शहरात थोड्या एकांड्या, गुन्हेगारांचा वावर असलेल्या जागा असतात. जनरली त्या सर्वांना माहीती असतात आणि सामान्य लोक त्याप्रमाणे काळजी घेत असतात. ह्या केस मधे सुद्धा इतरांनी वॉर्न केलेच होते. <<<<<<
जनरली माहित असतात, तर सामान्य माणसाने " तथाकथित सावधगिरी " घेण्यापुरत्याच माहित करुन घ्यायच्या का? मग त्या त्या देशाचे/शहराचे पोलिस/सैन्य/होमगार्ड इत्यादी व्यवस्था या "माहित असलेल्या जागी" वावरणार्‍या गुन्हेगारांचा बंदोबस्त का करू शकत नाहीत? की हे प्रश्न न पडता, सामान्य लोकांनी निव्वळ त्या परिसरात न जाण्याची काळजी घेऊन तो परिसर सर्रास गुन्हेगारांन्ना आंदण म्हणून द्यावा? अन असेच असेल, तर त्या त्या देशाच्या नागरिकांनी/पाहुण्यांनी त्या त्या देशाच्या संरक्षणव्यवस्थेवर कसा काय विश्वास ठेवावा?
तेव्हा टोचे भौ, हे उगाचचचे भयंकरीकरण नाहीये, अन भारतात तर अशा घटना सर्रास होतात म्हणुन गेन्ड्याची कातडी बनल्याप्रमाणे भासत असले तरी प्रत्यक्षात वेळ आली तर तुमचिही फे फे उडेल, व ही वरची चर्पटपंजरी कुठल्याकुठे भिरकावली जाइल. अहो पुणेमुंबै एक्स्प्रेस वे देखिल दरोडेखोरी/खूनखराब्यातून सूटला नाहीये, तो तर एकांडी जागा नाही ना?
उलट आश्चर्य याचे वाटते की हे "विकसित म्हणवणार्‍या" ऑस्ट्रेलियात होतय, ते देखिल सिडनीच्या उपनगरात. हे फारच भयंकरच आहे.

प्रत्यक्षात वेळ आली तर तुमचिही फे फे उडेल, व ही वरची चर्पटपंजरी कुठल्याकुठे भिरकावली जाइल. >>>>>>

फे फे उडेल ह्याची गॅरेंटी असल्या मुळे अश्या एकाड्या ठिकाणी जात नाही. उगाच नस्ती साहसे करण्याची गरज नाही.

प्रभाच्या बाबतीत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे.

<<उलट आश्चर्य याचे वाटते की हे "विकसित म्हणवणार्‍या" ऑस्ट्रेलियात होतय, ते देखिल सिडनीच्या उपनगरात. हे फारच भयंकरच आहे.>>
विकसित म्हणजे प्रत्येक दोन पावलांवर पोलीस का?

भयंकर नक्कीच आहे. पण तुम्हाला ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटतय त्याचंच मला आश्चर्य वाटतय. अनेक विकसित आणि अविकसित देशात अशा जागा आहेत. जिथे कदाचित दिवसा उजेडीही जाताना अत्यंत सावध्/सतर्क रहावं लगत असल.
प्रभा ज्या पायवाटेनं गेली त्या पायवाटेनं दिवसा अनेक माणसं ये-जा करतात. मात्रं तो पार्क अत्यंत सुनसान होतो रात्री. त्या पार्कमधे बेघर, व्यसनी लोक आडोशाच्या कमी उजेडाच्या ज्जागांचा उपयोग करतात.
वेळोवेळी पोलीस तिथे धाडीही घालतात. तात्पुरता बंदोबस्तं होतो पण कायमचा नाही.

प्रभा त्या भागात दोन-तीन वर्षं रहात होती. त्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माहीत नसेल तर मात्रं खरच कठीण आहे.

मी सिडनीत २३ वर्षं रहातेय. वेळी अवेळी मीही कामावरून, कार्यक्रमांवरून घरी आलेय. पण मीही त्या रस्त्याने काळोख्यावेळी जाण्याचं धाडस केलं नसतं. आणि मी त्या उपनगरात न राहून मला हे माहीत आहे.

पुन्हा सांगते. प्रभाच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडलीये. तिला त्या रस्त्याच्या कुख्यातीबद्दल माहीत नसणं हा इग्नोरन्स आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने नवीन शहरात गेल्यावर व्यवस्थित माहिती नसल्यास हे धोके टाळायला’च’ हवेत.
त्याचा देश विकसित म्हणवण्याशी काहीही संबंध नाही.

दिनेशदा, ह्या देशात अत्यंत कमी असुरक्षित जागा आहेत. आम्ही (मी) बंदुका घेऊन बाहेर पडत नाही.

हा लेख म्हणून अत्यंत प्रभावी, परिणामकारक झालाय ह्याबद्दल शंका नाही.

टोचा व दाद यांच्याशी सहमत.

<< . अनेक विकसित आणि अविकसित देशात अशा जागा आहेत. जिथे कदाचित दिवसा उजेडीही जाताना अत्यंत सावध्/सतर्क रहावं लगत असल.

तो पार्क अत्यंत सुनसान होतो रात्री. त्या पार्कमधे बेघर, व्यसनी लोक आडोशाच्या कमी उजेडाच्या ज्जागांचा उपयोग करतात.
वेळोवेळी पोलीस तिथे धाडीही घालतात. तात्पुरता बंदोबस्तं होतो पण कायमचा नाही.

त्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माहीत नसेल तर मात्रं खरच कठीण आहे.

तिला त्या रस्त्याच्या कुख्यातीबद्दल माहीत नसणं हा इग्नोरन्स आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने नवीन शहरात गेल्यावर व्यवस्थित माहिती नसल्यास हे धोके टाळायला’च’ हवेत.
त्याचा देश विकसित म्हणवण्याशी काहीही संबंध नाही.

ह्या देशात अत्यंत कमी असुरक्षित जागा आहेत. आम्ही (मी) बंदुका घेऊन बाहेर पडत नाही. >>

साधारण याच आशयाचं मी देखील माझ्या http://www.maayboli.com/node/53002 या लेखात लिहीलंय. तिथेही एका प्रतिसादात या बातमीची लिंक दिली गेली होती.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=uDPAy

या बातमीतच खाली वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत ज्यांचा आशय दाद व टोचा यांच्या प्रतिसादांसारखाच आहे.

लिंबूभाऊ सहमत,

जर अश्या काही जागा धोकादायक आहेत हे सामान्य लोकांना ठाऊक असते तर मायबाप सरकार आणि पोलिसांनाही ठाऊक असतेच, ते का मग अतिरीक्त संरक्षण देऊ शकत नाही? गेला बाजार एक बोर्ड तरी लावतील का? की हि जागा संध्याकाळी ७ नंतर एकट्यादुकट्याने फिरायची नाही, तसे करताना कोणी आढळल्यास पुढे घडणार्‍या परीणामांना सरकार जबाबदार नाही वगैरे...

अर्थात संपुर्ण संरक्षण हे प्रॅक्टीकल नाहीये हे वास्तव आहेच.
पण बेसिकली एखादी जागा असुरक्षित म्हणून ठरवली जाते तेव्हाच ती आणखी आणखी असुरक्षित होत जाते कारण तेथील जाग, वर्दळ आणखी मंदावते. आणि अपप्रवृत्तीचे लोक हि जागा आपल्याला दिलेले आंदण आहे म्हणून तिथे येऊन आणखी चेकाळतात. बस्स एकदा एखाद्या जागेची हि इमेज मिटवून टाकण्यात यश मिळाले तरी मग पुढे फार अतिरीक्त संरक्षण तिथे पुरवायला नको..

क्षमा करा, लेख (वर दाद यांनी लिहिलेल्या कारणांसाठी) पटला तर नाहीच, पण एक स्त्री मृत्युमुखी पडली आणि तुम्हाला लेखात गाणीबिणी लिहायला सुचताहेत हे अजिबात आवडलं नाही. चीडच आली वाचताना.

अतिशय दुर्दैवी घटनेला पुन्हा ज्या प्रकारे रंगवून सांगितले आहे ते सुद्धा एका गाण्याच्या संदर्भाने ते वाचताना चिडचिड झाली.

दादला अनुमोदन.

स्वाती_आंबोळे व सिडरेला ला अनुमोदन.
झालेल्या दुर्दैवी घटनेच्या आधी "सामना" बद्दल चे लिखाण अतिशय अस्थानी आहे. त्याचप्रमाणे दिलेल्या गाण्याचा संदर्भ सुद्धा पटला नाही. सदर गाण्याचा चित्रपटातील प्रसंग व भावार्थ अतिशय वेगळा आहे. त्या गाण्याचा व मानसिक विक्रुती असलेल्या माणसाने केलेल्या खुनाचा संबंध लावणे चुकिचे वाटते.
गाण्याची नुसती शब्दरचना त्या प्रसंगाशी अनुरुप वाटली असली तरी >लिहायची उर्मी झाली ती केवळ आणि केवळ चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी लिहिलेल्या मराठी गाण्यातील शब्दरचना या घटनेतील प्रसंगांना तंतोतंत लागू पडल्यामुळेच>> हे नाही आवडलं. घडलेला प्रसंग खुप जास्त भयानक आहे. तर गाण्यात परिस्थितीला बळी पडलेल्या स्त्रीचे रुदन आहे.

ऋन्मेष, <<गेला बाजार एक बोर्ड तरी लावतील का? की हि जागा संध्याकाळी ७ नंतर एकट्यादुकट्याने फिरायची नाही, तसे करताना कोणी आढळल्यास पुढे घडणार्‍या परीणामांना सरकार जबाबदार नाही वगैरे...

अर्थात संपुर्ण संरक्षण हे प्रॅक्टीकल नाहीये हे वास्तव आहेच.
पण बेसिकली एखादी जागा असुरक्षित म्हणून ठरवली जाते तेव्हाच ती आणखी आणखी असुरक्षित होत जाते कारण तेथील जाग, वर्दळ आणखी मंदावते. आणि अपप्रवृत्तीचे लोक हि जागा आपल्याला दिलेले आंदण आहे म्हणून तिथे येऊन आणखी चेकाळतात. बस्स एकदा एखाद्या जागेची हि इमेज मिटवून टाकण्यात यश मिळाले तरी मग पुढे फार अतिरीक्त संरक्षण तिथे पुरवायला नको..>>

खरच सांगा, असा बोर्ड लावून ती जागा आंदण दिल्यासारखीच नाही का?. असा बोर्ड सरकार लावून हात झटकू शकतं का? अशा सरकारला मी टिकू देणार नाही. (मत देणार नाही).
अशा जागांना 'वेल लिट' करणे, तिथे सीसी टीव्ही कॅमेरे लावणे इत्यादी सूचना मी समजू शकते. मिळणारा टॅक्स कुठे कशा पद्धतीने वापरला जावा ह्याबद्दल स्थानिक, स्टेट आणि फेडरल शासनाच्या पॉलिसीज आहेत. आणि विविध माध्यमांतून (पिटिशन इ) आणि मतदानाद्वारे ह्यागोष्टीं सामान्य जनता घडवून आणू शकते.

तो पर्यंत नवख्या (??) ठिकाणी भलतं धाडस न करणं हेच सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य आहे.

>>प्रभा त्या भागात दोन-तीन वर्षं रहात होती. त्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माहीत नसेल तर मात्रं खरच कठीण आहे.<<
इथेच तर मेख आहे.. माणसाची 'सगळी' रूपे सर्वत्र आहेत, दुनियेचा कुठलाच भाग यातून सुटला नाहीय. ज्या ठिकाणी दिवसा हजारदा आपण फिरलोय, त्या जागेचे रात्रीचे रूप निराळेच आहे याकडे नकळत कानाडोळा होणे अंगावर आलेय. प्रभाला या गोष्टी माहीत नसाव्यात ही अशक्यप्राय गोष्ट आहे. प्रभाने त्यापूर्वीही रात्री ती वाट वापरली असणार. मित्र- हितचिंतकांनी तीला याची कल्पनापण नक्की दिली असणार. पण परत तेच, एकीकडे लांबचा वळसा अन दुसरीकडे चार-एक मिनीट अंतरावर असलेलं घर अन प्रत्यक्ष कधीही न पाहीलेला थोडासा (!) धोका. मात्र यावेळी नियतीचे फासे उलटे पडले.

चंबू, +१
मी लेख वाचू शकले नाही कारण असं काहीतरी वाचलं की दिवसभर ते विचार डोक्यात येत राहतात Sad अत्यंत दुर्दैवी घटना! पण रात्रीचं रस्त्याने चालताना कानात earplugs घालून गाणी ऐकत किंवा फोनवर गप्पा मारत मुळीच चालू नये. एकतर तुमचा awareness खूप कमी होतो कारण आजूबाजूचे आवाज/हालचाली तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि जर असं काही घडलं तर तुमचे reflexes पटकन काम करू शकत नाहीत कारण तुमचा मेंदू गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात गुंतलेला असतो. आजकाल GPS tracking apps असतात ज्याद्वारे तुमच्या location ची खबर दुसऱ्याला real time track करता येते.
झालं ते फार वाईट झालं पण तिने थोडा धोका पत्करला होता आणि दुर्दैवाने that took toll Sad I hope everyone involved (the local police, city authorities and citizens) will take prompt and appropriate action.

Pages