पनीर धनियावाले

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 16 March, 2015 - 08:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर - १५० ग्रॅम
कांदा बारीक चिरून - १
टोमॅटो चिरून - १

गरम मसाला
धणेपूड
काळी मिरी दाणे - २
दालचिनीचा छोटा तुकडा
जिरे
हळद
तिखट
हिरव्या मिरचीचा ठेचा / १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
आमचूर पावडर (ऐच्छिक)

तेल व मीठ

पनीर मॅरिनेट करण्यासाठी -

दही - ३ टेबलस्पून
कोथिंबीर, मिरची, जिरे, आले व मीठ यांची चटणी
थोडासा गरम मसाला

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम कोथिंबिरीची चटणी करून घ्यावी. घरात आयती चटणी फ्रीजमध्ये दडवलेली असेल तर त्यावर डल्ला मारावा. परंतु चटणी जेवढी ताजी तेवढा स्वाद खुलणार! पनीरचे बारीक तुकडे करावेत. दही फेटून त्यात कोथिंबीर चटणी, गरम मसाला, किंचित मीठ व पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित मिसळावेत. किमान १५ मिनिटे तरी झाकून ठेवावे.

नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. काळी मिरी दाणे व दालचिनी घालून जिरे, हळद, तिखट, मिरची ठेचा घालून परतावे. कांदा घालून गुलाबी सोनेरी रंगावर परतावा. टोमॅटो फोडी घालून त्यावर धणेपूड, थोडा गरम मसाला घालून टोमॅटो शिजेपर्यंत परतावे. पनीरचे तुकडे व त्यासोबतचे दही घालून नीट मिसळावे. चव पाहून मीठ घालावे. फार शिजवू नये. पुरेसा आंबटपणा वाटत नसेल तर चिमूटभर आमचूर पावडर भुरभुरावी. एक वाफ आणून गरमागरम सर्व्ह करावे. वरून कोथिंबीर शिवरणे ऐच्छिक.

IMG_20150316_170835.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. पनीर भुर्जीचेच हे किंचित वेगळे व्हर्शन आहे. पण चवीत फरक म्हणून छान वाटते. कोथिंबिरीचा किंचित कडसर स्वाद वेगळा वाटतो.
२. कोथिंबीर चटणी ऐवजी पुदिना चटणी वापरल्यास पनीर पुदिनावाले तयार होईल. पण मग गरम मसाला जरा बेताने घालावा लागेल.
३. यात तुम्ही आवडीनुसार वाफवलेले स्वीट कॉर्न, मोड आलेले मूग वगैरे वापरू शकता.
४. पाककृतीच्या वेळेत कोथिंबीर चटणी करायला लागणारा वेळ व मॅरिनेशनचा वेळ गृहित धरलेला नाही.

माहितीचा स्रोत: 
चवीत बदल हवा म्हणून केलेला प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users