कोल्हापूर-पुणे

Submitted by पराग१२२६३ on 14 March, 2015 - 02:29

कोयनेतून प्रवास
आज कोल्हापूर पुण्यादरम्यान काही फास्ट पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण शुक्रवारी ते पर्याय उपलब्ध नसल्याने कोयनेला पसंती दिली. तसे पाहिले तर या प्रवासासाठी पूर्वी कोयना ही माझी पहिली पसंती असे. कारण सगळा दिवसाचा प्रवास आणि पूर्वी या गाडीला तशी गर्दी कमी होती. त्यावेळी कोयना पुणे-कोल्हापूर प्रवास पूर्ण करण्यासाठी ९ तास ३५ मिनिटे घेत असे. त्यातही ती बऱ्याचदा लेट होत असे. पण गेल्या सात-आठ वर्षांत या मार्गावर इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग यंत्रणा बसविल्यामुळे या मार्गाची क्षमता वाढलेली आहे. परिणामी कोयनेचाही वेग वाढून प्रवासाचा कालावधी साडेसात तासांवर आला आहे.
आज (१३ मार्च २०१५) कोल्हापूरहून कोयना पकडण्यासाठी सकाळी जरा लवकरच स्टेशनवर पोहचलो. नेहमीप्रमाणे पहिल्या फलाटावर कोयना उभी होतीच. पण तिचा कार्यअश्व (इंजिन) स्वीच-ऑफ असला तरी चालकांची केबीनमध्ये तयारी सुरू असल्याचे दिसत होते. या प्रवासासाठी आदल्याच दिवशी आरक्षण केले होते. अजून परीक्षा संपलेल्या नसल्याने आरक्षण बरेच शिल्लक होते.
माझ्या आरक्षित जागेवर गेलो, तर एक आजोबा आपल्या लहान नातवंडांना घेऊन माझ्या जागेवर बसले होते. मी त्यांना माझे आरक्षण असल्याचे सांगितल्यावर त्यांनी मला माझी जागा लगेच दिली आणि पलीकडे जाऊन बसले. जाताजाता हेही सांगितले की, आमी मिरजंपर्यंतच जाणार आहे. मग माझ्याशी थोड्या गप्पाही त्यांनी मारल्या. नातवंडांनी मात्र थोड्या वेळाने माझी खिडकीची जागा मला आपणहून देऊन टाकली. पण तिकडे आजी-आजोबांच्या जवळ गेल्यावर दोन्ही नातवंडांच्यात कोणती खिडकी कोणाला यावरून भांडणे सुरू झाली होती. याच्या आता हळूहळू गर्दी वाढू लागली होती. रोजचे अप-डाऊन करणाऱ्यांच्या सोयीसाठी कोयनेला कोल्हापूर-सांगली दरम्यान सगळेच्या सगळे थांबे दिलेले आहेत. त्यामुळे ही गाडी अप दिशेने सांगलीपर्यंत पॅसेंजर म्हणून गणली जाते आणि भाडेही पॅसेंजरचेच असते. दरम्यान, इकडे पासवाल्यांचीही आमच्या डब्यात जागेच्या शोधात ये-जा सुरू झाली होती. जे पासधारक नव्हते, त्यांची खिडकीची जागा कशी मिळेल यासाठी धडपड सुरू झाली होती. त्यातही लहान मुले बरोबर असलेल्यांची गडबड जरा जास्तच चालली होती. आमच्या कोयनेत असे वातावरण असताना पुण्याच्या डब्ल्यूडीपी-४डी बरोबर ७.२० वाजता १७४११ महालक्ष्मी एक्सप्रेसचे दोन क्रमांकाच्या फलाटावर आगमन झाले होते, तर पलीकडे तीन क्रमांकावर ११३०४ कोल्हापूर-हैदराबाद एक्सप्रेसच्या प्रस्थानाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. ही ११०५१ सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेसच असते.
महालक्ष्मीतून प्रवासी पटापट उतरल्यावर थोड्याच वेळात शंटींग ड्युटीवर असलेल्या डल्ब्यूडीएम-३डी ने अतिशय तत्परतेने दोन क्रमांकावरून पिट लाईनवर नेले. कारण या गाडीला अकरा वाजेपर्यंत रेडी व्हायचे होते, १७४१६ हरिप्रिया एक्सप्रेस म्हणून. महालक्ष्मी पुढे गेल्यावर आपली वेळ झाल्यामुळे हैदराबाद एक्सप्रेसने एकदा जोरदार हॉर्न वाजवून कोल्हापुरातून प्रस्थान केले. ती गाडी ९५ टक्के मोकळीच असल्याचेही त्यावेळी लक्षात आले.
हैदराबाद गेल्यावर एक रेल्वेचा इलेक्ट्रीशियन माझ्या खिडकीजवळ येऊन मला म्हणाला की, जरा पंखा लावून बघा बरं. गाडी सुटण्याआधी त्याला परत एकदा पंख्यांची खात्री करून घ्यायची होती बहुतेक. कोयनेची वेळ झाल्यावर स्टेशन मास्तरने पुण्याहून सेक्शन कंट्रोलरकडून गाडीला सोडण्यासाठी परवानगी घेतली होती. दरम्यानच्या काळात ब्रेक पॉवर सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रांवर ड्रायव्हर आणि गार्डच्या नोंदी आणि स्वाक्षऱ्याही घेऊन झाल्या होत्या. आता कोयनेला सोडण्याची अंतिम तयारीही पूर्ण झाली होती. योग्यवेळी स्टेशन मास्तरने आपल्या केबीनमधील ब्लॉक इस्ट्रुमेंटच्या माध्यमातून दोन किलोमीटर पुढे असलेल्या गूळ मार्केटच्या स्टेशनमास्तरला इलेक्ट्रॉनिक संदेश (ट्रेन कमींग फ्रॉम) पाठविला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने ट्रेन गोईंग टू संदेश पाठविला आणि कोयनेला निघण्यासाठी स्टार्टर आणि ॲडव्हांस्ड स्टार्टर सिग्नल ऑफ होण्यातील शेवटचा टप्पा पूर्ण झाला. सिग्नल मिळाल्यावर आमच्या लोको पायलटने ह़र्न वाजवून त्याची सूचना गार्डला दिली. गार्डनेही ठीक ७.५५ वाजता हिरवा बावटा दाखविल्यावर कोयना सुटली. कृष्णराजपुरमचा डब्ल्यू.डी.पी.-४बी क्र. ४००१४ हे इंजिन आमच्या गाडीच्या अश्वाची भूमिका बजावत होता. गूळ मार्केट, वलिवडे, रुकडीनंतर हातकणंगल्यात आल्यावर काही क्षणांत तुडुंब भरलेल्या ५१४४१ सातारा कोल्हापूर पॅसेंजरचे क्रॉसिंग झाले. ही गाडी तुडुंब भरलेली असली तरी माझ्या जागेवरून शिफ्ट झालेल्या त्या लहान मुलांना मजा वाटत होती. त्याआधी रुकडीच्या अलीकडे पंचगंगेचा पूल थोड्या कमी वेगात पार केला होता. कारण या पुलावर बऱ्याच वर्षांपासून वेगमर्यादा लागू आहे. नदीच्या पात्रात चांगले पाणी होते, पण कोल्हापुरातील पाणीपुरवठ्यातील ऐतिहासिक नियोजनशून्यतेमुळे आमच्या घरी मात्र नेहमीप्रमाणेच पाणी येतच नाही आहे, हा अनुभवही मी माझ्या कोल्हापूरच्या वास्तव्यात घेतला.
दरम्यान आमच्या गाडीतही बरीच गर्दी झाली होती. रोज अप-डाऊन करणाऱ्यांपैकी काहींच्या आमच्या इथे उभ्या-उभ्याच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात भाजपवर जास्त त्यांचा जास्तच राग जाणविला. मजल-दरमजल करत मिरजेच्या होम सिग्नलला आलेली कोयना ५ मिनिटे तिथेच थांबली. परिणामी तिला आत आपल्या फलाट क्र. १ वर पोहचण्यासाठी आठ मिनिटे उशीर (९.१५) झाल्याचे मी माझ्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) इंटरनेटच्या मदतीने पाहिले. मिरजेत गाडीतील बरीच गर्दी कमी झाली. त्यावेळी यशवंतपूरला जाणारी एक विशेष एक्सप्रेस गाडी दोन क्रमांकावर उभी होती. आमची गाडी थांबल्यावर ती विशेष लगेच सुटली. मिरज म्हटल्यावर गाडीत एकदम इडली-वडा, चहा, वडापाववाल्यांचीही ये-जा सुरू झाली होती. मिरजेत अपेक्षित पाच मिनिटांचा थांबा घेतल्यावर कोयना पुढे निघाली. फलाटावरून बाहेर पडल्यावर मालगाड्यांच्या रिसेप्शन आणि डिस्पॅच यार्डाच्या शेजारून जाताना तेथील लगबग पाहायला मिळाली. जवळच्या ट्रीप लोको शेडमध्ये एकही इंजिन नसले, तरी ५७ बीसीएन वाघिणींच्या मालगाडीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुण्याचे एकटे डब्ल्यूडीजी-४ तिथे उभे होते आणि त्याला गाडीला जोडण्याची तयारी सुरू होती. त्याच्याच शेजारी उभ्या असलेली ४६ वाघिणींची कंटेनर मालगाडी पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी स्टार्टरची वाट पाहत उभी होती. त्या गाडीसाठी मात्र डब्ल्यूडीजी-३ ने अन्य एका डब्ल्यूडीजी-३ ची मदत घेतली होती. कारण डब्ल्यूडीजी-४ पेक्षा त्याची शक्ती कमी असते ना. या दोन गाड्याबरोबरच तेथे पेट्रोलच्या टँकर मालगाडीचे पुण्याच्या डब्ल्यूडीएम-२ च्या मदतीने मार्शलिंग सुरू झाले होते. असे करत आम्ही सांगलीच्या दिशेने पुढे गेलो.
आता दोन तिकीट तपासनीस येरझऱ्या घालू लागले होते. गेल्या वीस वर्षांमध्ये कोयनेत तपासनीस क्वचितच पाहिला होता. आज मात्र दोघे होते आणि पुण्यापर्यंत सारखे फेऱ्या मारताना दिसत होते. प्रवाशांच्या एकमेकांशी ओळखी काढून गप्पा सुरू झाल्या होत्या, तर काही जण आपल्याबरोबरच्या नातेवाईक मित्रमंडळींबरोबर गप्पा मारू लागले होते. माझे मात्र खिडकीबाहेर आणि रेल्वेशी संबंधित घडामोडींकडे लक्ष जास्त होते. सांगली शिरतानाच दिसले की, तिथे कृष्णराजपुरमचे डब्ल्यूडीपी-४ (क्र. ४०००४) २३ डब्यांच्या १६५०७ भगत की कोठी-बेंगळुरु सिटी एक्सप्रेसबरोबर आम्ही सांगलीत येण्याची वाट पाहत उभे होते. आम्ही मार्ग मोकळा केल्यावर ती गाडी निघाली आणि आम्हीही दोन मिनिटांत निघालो.
आता उनही चढू लागले होते. त्यामुळे सांगली आणि भिलवडीदरम्यान असलेल्या नांद्रे स्थानकाच्या जवळून वाहणाऱ्या येरळा नदीच्या दृश्याने गाडीतले सगळेच सुखावले. रेल्वे पुलाच्या शेजारीच असलेल्या बंधाऱ्यावरून फेसाळत पडणाऱ्या पाण्याच्या दृश्याने सर्वांनाच मस्त वाटले.
किर्लोस्करवाडीला आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे गोंदियाहून आलेली महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्याच्या डब्ल्यूडीजी-३ए सोबत आमची वाट पाहत उभी होतीच. आम्ही थांबल्यावर ती निघून गेली. यावेळी नियमित अप-डाऊन करत चहा, वडापाव, पाणी, बिस्कीटं विकणाऱ्यांची कोयना आणि महाराष्ट्रमध्ये अदलाबदल झाली. बाकी मजल दरमजल आणि मिरजेतील १० मिनिटांचा विलंब भरून काढत साताऱ्यात अगदी वेळेत पोहोचलो. याआधी कोरेगाव स्थानकाला लागून असलेल्या उंचावरील रेल्वेपूल आणि त्यापेक्षा बऱ्याच कमी उंचीवरील रस्त्याच्या पुलाने माझ्या बाजूच्या लहान मुलांना रोमांचित केले होते. साताऱ्यात तीन मिनिटे जास्त थांबावे लागले. कारण सातारा आणि त्याच्या पुढील जरंडेश्वर दरम्यानचा ब्लॉक सेक्शन १२१४८ निजामुद्दीन-कोल्हापूर एक्सप्रेसने बंद केला (व्यापला) होता. त्यामुळे ती गाडी साताऱ्यात आल्यावर लगेचच आम्ही पुढे निघालो. इथे एक गोष्ट जाणविली की, आज कोयनेपेक्षा निजामुद्दीन एक्सप्रेसमधून साताऱ्यात उतरलेल्यांची संख्या जास्त होती.
साताऱ्यानंतर वाठारला आल्यावर मला वाटले की, इथे नेहमीप्रमाणे पुणे-कोल्हापूर पॅसेंजरचे क्रॉसिंग होईल. पण तसे झाले नाही. आता एक वाजत आल्यामुळे बऱ्याच जणांनी आपापल्याजवळचे डबे बाहेर काढून जेवायला सुरूवात केली. पण मला माझ्याजवळचा डबा खाण्याची इच्छा नाही झाली. आदर्कीचा घाट सुरू झाला आणि कोयनेने या प्रवासातील पहिला बोगदा ओलांडला आणि आदर्कीचा डिस्टंड सिग्नल ओलांडला. तो हिरवा होता याचा अर्थ आदर्कीला आम्ही थांबणार नव्हतो. आदर्की क्रॉस करताना कोयनेसाठी तिथे थांबवून ठेवलेली पुणे-कोल्हापूर पॅसेंजर दिसली. त्याच्या ड्रायव्हर-गार्डबरोबरच आदर्कीच्या पॉईंट्समनशी सिग्नल एक्सचेंज करून आम्ही आदर्कीच्या अप साईडला असलेल्या यू-टर्नवाल्या बोगद्यात प्रवेश केला. यानंतर थोड्या वेळाने लोणंदला आले. तिथे कोयना थोडी जास्तच थांबली आहे असे वाटत होते आणि मनातही विचार सुरू झाला निजामुद्दीन तर गेलेली आहे. मग आता कोणते क्रॉसिंगॽ मग म्हटले मालगाडी असणार, आणि होय पुढच्याच मिनिटाला कल्याणच्या निळ्या-पांढऱ्या रंगाच्या दोन डब्ल्यूडीएम-३डी इंजिनांची (असिस्टींग रिक्वायर्ड) बीसीएन वाघिणींची मालगाडी शेजारच्या रुळावरून धडाडत मिरजेच्या दिशेने निघून गेली.
पुढे निरा नदी ओलांडून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. आज निऱ्याच्या आधीच एक अंजिरवाला गाडीत येऊन गेला होता आणि त्याच्याकडून बऱ्याच जणांनी खरेदी केली होती, मी सोडून. मला नाही आवडत अंजिर हा प्रकार. त्यामुळे निऱ्यातल्या अंजिरवाल्यांकडून फारशी कोणी खरेदी केली नाही. पण आज निऱ्यात अंजिरवाल्यांची वर्दळ कमीच वाटली नेहमीपेक्षा. इथला पाच मिनिटांचा थांबा आटपून निघाल्यावर परत पुढच्या वाल्हा स्थानकाजवळ आल्यावर डिस्टन्ट सिग्नल डबल यलो दिसला. म्हटले आता कोणॽ गाडीचा वेगही कमी झाला होता. मग होम सिग्नल क्रॉस केल्यावर वाल्ह्याच्या फलाटावर विसावलो आणि तीनच मिनिटांनी इंजिनांच्या हृदयाचे ठोके इथपर्यंत ऐकू येऊ लागले. त्या आवाजावरूनच ओळखले ईएमडी इंजिन आहे. काहीच क्षणात पुन्हा एक बीसीएन वाघिणींची मालगाडी डब्ल्यूडीजी-४ इंजिनांसह (असिस्टींग रिक्वायर्ड) मिरजेच्या दिशेने निघून गेली. अशा मालगाड्या भारतीय रेल्वेवरून वाढलेल्या मालवाहतुकीचीच साक्ष देत होत्या. माझी ही निरीक्षणे सुरू असताना गाडीत मात्र जेवणानंतर आळसावलेले प्रवासी पेंगत काही जण चक्क आडवे झोपले होते.
आता मला जरा कॉफीचा मूड आला होता. मगाचपासून फेऱ्या मारणाऱ्या त्या तरुणाकडून मी कॉफी घेतल्यावर तो माझ्या शेजारीच बसून राहिला. जेजुरीत त्याला परतीची कोयना पकडायची होती. जेजुरीत आलो तेव्हा ११०२९ कोयना तेथे उभी होतीच. आता कोयनेचेही क्रॉसिंग झाल्यामुळे घोरपडीपर्यंत सुसाट जाऊ असे वाटले होते. कोल्हापुरातून निघाल्यापासून दिसणारी शेतं, तिथं उन्हातान्हात राबणारी माणसं, मेंढ्यांचे कळप आता हळूहळू दिसेनाशे होणार होते कारण पुढे उजाड भाग जास्त होता.
जेजुरीच्या पुढच्याच राजेवाडी स्थानकाचा होम सिग्नल पुन्हा यलो मिळाला. पुन्हा विचार आला आता कोणॽ तर काही क्षणातच जवळजवळ मोकळीच लोकमान्य टिळक (ट)-हुब्बळ्ळी एक्सप्रेस शेजारून क्रॉस झाली. १४.४० वाजता आंबाळे स्थानक क्रॉस करून या प्रवासातील दुसऱ्या घाट सेक्शनमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तेथे बीओबीआरएन वाघिणींची डिपार्टमेंटल ट्रेन आमच्यासाठी थांबवून ठेवल्याचेही पाहिले.
दरम्यानच्या काळात जेजुरीला आमच्या गाडीत एक भेळवाल्या बाई चढल्या होत्या. गाडी घाटातून जात असताना त्या आमच्या डब्यापर्यंत पोहचल्या. अशा भेळवाल्या बाईंना गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच पाहिले होते. आजपर्यंत सांगली-कराड-लोणंद या पट्ट्यात भेळवाले अनेक जण येत होते. पण त्या सगळ्यांच्यात या बाईंची भेळ बनविण्याची स्टाईल अगदी निराळी होती. अगदी बागेच्या बाहेर असलेल्या भेळेच्या गाडीसारखी. तोच भांड्यांचा खणखणाट आणि भेळ बनविण्याची तीच स्टाईल.
घाट ओलांडून शिंदवण्यात आलो तोच आम्हाला पुन्हा होम सिग्नल ऑन मिळाला, कारण पुण्याकडून आलेली बीआरएन आणि बोस्ट वाघिणींची मालगाडी आत शिरत होती. ही सर्व क्रॉसिंग पार करत आणि पूर्ण प्रवासादरम्यान जिथेजिथे रुळांच्या देखभालीचे काम चालू होते, तिथेतिथे वेगमर्यादा पाळत पुण्याजवळ फुरसुंगीपर्यंत आलो होतो. तिथे आमच्या गाडीचा वेग आणि समोरच्या गाडीतील अंतर नियमित करण्यासाठी आम्हाला दोन मिनिटे डिटेन करण्यात आले. पुढे सासवड रोडला पुण्याकडून आलेल्या मालगाडीची इंजिने दोन डब्ल्यूडीजी-३ए बॅक करून मालगाडीच्या दुसऱ्या बाजूला लावून शंटींगची तयारी केली जात होती. मात्र यामुळे मेन लाईन बंद राहिल्याने आत येत होती आणि कोयनेला पुन्हा होम सिग्नलला तीन मिनिटे खोळंबावे लागले. होम सिग्नल यलोच असल्याने आणि कोयनेला लूप लाईनवर जावे लागल्याने मला आधी वाटले होते की, इथे गाडी थांबणार आहे की काय. कारण माझ्या कोल्हापूर-पुणे मार्गावरील इतक्या वर्षांच्या प्रवासात माझी गाडी पहिल्यांदाच येथील लूप लाईनवर गेली होती. पण आम्ही ती मालगाडी ओलांडून घोरपडीकडे धडाडत गेलो.
आमचा डबा पुणे कोट्याचा असल्याने घोरपडीतून निघालो, तोपर्यंत पुण्याला उतरणाऱ्यांची तयारी जोरात सुरू झालेली होती. इथल्या डिझेल लोकोशेडच्या बाजूने जात असताना शेडच्या आतील निळ्या एलएचबी शताब्दी डब्याच्या एक झलकेने रोमांचित झालो. तिथून गेल्यावर त्रिकोणी चेहऱ्याचे विजयवाड्याचे निळेशार डब्ल्यूएजी-७ इंजिन आपल्या मालगाडीसोबत मुंबईच्या दिशेने स्टार्टरच्या प्रतीक्षेत उभे असलेले आणि त्याच्या पलीकडून ११०७८ झेलम पुण्याच्या डब्ल्यूडीपी-४डी सोबत पुण्यात शिरत असलेली दिसली. कोयना आणि झेलम एकमेकींशी एकाच दिशेने थोडेसे समांतर गेल्या, पण कोयनेचा रुट आधी सेट केल्यामुळे झेलमला मागे थांबावे लागले. कारण कोयना पाचवर आणि झेलम तीनवर जाणार होती. परिणामी त्यांचे मार्ग एकमेकींना छेदत होते.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमची कोयना एक्सप्रेस पुण्यात ५ मिनिटे आधी १५.३५ वाजता फलाट क्र. पाचवर थांबली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं रोमांचक प्रवास .
ते सिग्नल डबल येलो झाल्यावर 'आता कोण?' म्हणून माझाही श्वास रोखला गेला.

फुरसुंगी म्हटल्यावर कुठुनसा 'ट्टॉक' ऐकू येतो की काय असे कुतुहल जागे झाले.
Happy
एक शंका- इंजीनरुमातल्या इत्यंभूत घडामोडी म्हणजे 'गूळ मार्केट्च्या स्टेशनला संदेश पाठविला' इ. प्रवाश्यांना सतत कसं कळतं?

मी बऱ्याचदा सह्याद्री ने पुणे टू कोल्हापूर गेलो आहे रात्री १०.०० सुटली कि सकाळी शार्प ६ ला पोहचवते , पण रात्रीची वेळ असल्याने काहीच काळात नाही कुटून जाते आणि कशी जाते , आणि स्लीपर तिकीट असल्यामुळे तर मस्त रात्री ११ च्या दरम्यान झोपायचो ते सकाळी ५.३० च जाग यायची .

कोणत्याही स्टेशन मास्तरच्या केबीनच्या दाराच्या आसपास थांबल्यास सतत ब्लॉक इस्ट्रुमेनचे टिंगटिंग आवाज ऐकू येत असतात. त्यावरून ही संदेशांची देवाणघेवाण आपल्याही लक्षात घेता येते. आणि कोणतीही गाडी स्टेशनमध्ये येणे आणि तेथून जाणे त्याद्वारेच चाललेले असते.

लेख आवडला. यापूर्वीही आपला असाच एक लेख वाचला होता तोही आवडला होता. भारतीय रेल वेचे अगडबंब आणि गुंतागुंतीचे जाळे बर्‍यापैकी नियमित चालण्यामागे कसे एका अवाढव्य यंत्रणेचे अहोरात्र चालणारे काम आहे ते लक्षात येऊन या सर्व कर्मचार्‍यांबद्दल कृतज्ञता दाटून येते.

याआधी कोयनेवर लिहिले होते, पण बऱ्याच पूर्वी. त्यावेळच्या आणि आताच्या अनुभवांमध्ये काही फरक जाणविले म्हणून पुन्हा कोयनेच्या प्रवासाबद्दल लिहावे वाटले.

जबरी असतात लेख डिटेलिन्ग सहीत. Happy

आम्ही कोपु-पुणे बाइक आणि कारचे दिवाणे.
बाय रेल कधीच नाही गेलो.
कभी युही तनहाई में जाने का खयाल अच्छा है.
दिवसाच जमवेन. मला मजा येते. Happy

बा द वे, सोलापुर कोल्हापुर दिवसा प्रवास केलाय नवीन एक्सप्रेस ने. Happy
साइड बर्थ मुद्दाम घेतलेले.