उत्तर

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 January, 2009 - 16:15

आई,

आता मी जे लिहिणार आहे, त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही.
थेटच लिहितो.

आई गं, मी आत्महत्या करतोय.

फक्त वाटलं की मी हे का करतोय हे तुला माहीत असायला हवं. आणि तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरंतर तेवढ्यासाठीच घरी आलो काल रात्री. नाहीतर कदाचित तेव्हाच –
शिवाय लिहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आणि अभिच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना.

काल सकाळी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पाहिलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉपीज, प्रेझेंटेशनच्या स्लाईड्स, काय काय होतं त्यात. गेले सहा महिने केलेल्या ढोरमेहनतीचे पुरावे. चांगल्या ग्रेड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम.

गर्दीचीच वेळ होती. ट्रेनमधे चढताना फूटबोर्डवरचा मधला बार असतो ना, त्याच्याभोवती माझ्या बॅगचा पट्टा अडकला. बारच्या एका बाजूला मी आणि दुसर्‍या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत शिरता येत नव्हतं आणि दुसर्‍या बाजूलाही एक जण त्या अडनिड्या बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोर्डवर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घट्ट धरलेला – असा तो जवळपास बाहेरच लोंबकळत होता. तो ओरडून ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडेन.

आणि आई, माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो सोडतो म्हणत म्हणत तो क्षण थोडा – थोडासाच - लांबवला. पण तेवढ्याने उशीर झाला गं. त्याचा पाय तेवढ्यात निसटला फूटबोर्डवरून. धपकन आवाज झाला. डब्यातल्या कलकलाटात त्याची किंकाळीसुद्धा विरून गेली. गाडीने प्लॅटफॉर्म नुकता सोडला होता नव्हता – खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा गाडीतले लोक म्हणायला लागले, कोई गिर गया लगता है बेचारा – ट्रेन मत रोको – लेट हो जायेगा – वो अब वापस थोडेही आयेगा! पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी लोकं ट्रेनमधून उड्या मारून कोंडाळं करून त्याचं ते छिन्नविच्छिन्न शरीर बघत उभी राहिली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. सुन्न झालो होतो.

जरा भानावर आल्यावर पहिला विचार मनात आला तो काय होता माहीत आहे? रिलीफचा होता आई! हे आपल्यामुळे झालं, हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा रिलीफ!

मग सुचलं हळहळणं वगैरे! ते ही किती? पाचेक मिनिटंच गेली असतील. मग कॉलेज, प्रेझेंटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो, एक कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्हे, जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.. इतकी अवजड बॅग – कशी हलणार होती त्या गर्दीत? त्या माणसाने तरी – म्हणजे गेला हे वाईट झालं – पण कशाला इतकं जिवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गर्दी आहे – होतातच या गोष्टी – आपली काळजी आपणच घेता यायला हवी होती त्याला! तू काय करणार?

असं स्वतःला समजावून, कॉफी पिऊन, पुढली ट्रेन पकडून कॉलेजला गेलो. सबमिशन्स झाली, प्रेझेंटेशन झालं, एक कँपस इन्टरव्ह्यूसुद्धा झाला. आणि चांगलाही झाला! आधी मनाशी म्हणत होतो, की कर्तव्य करतोय. आईने बाबांच्या मागे इतके कष्ट करून वाढवलं आपल्याला – आता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन मार्गी लागणं हे तिच्यासाठी तरी करायलाच हवं, नाही का? आत्ता ते बाकीचे विचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होवून गेलं. हे आणि असंच बरंच काही. एकेक कामं हातावेगळी करत मग हळूहळू गुंततही गेलो त्यात. इन्टरव्ह्यू झाल्यावर अम्या आणि दिलीपबरोबर हॉटेलमधे खातपीत टाईमपास केला, दुसर्‍या दिवशी पिक्चरला जायचं ठरवलं, रिझल्टनंतर सेलिब्रेट कसं करायचं त्यावर गहन चर्चा केली, कुठल्या कंपन्या सद्ध्या हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आहे, याचा अंदाज घेऊन झाला – हे सगळं करत असताना, आई, सकाळच्या प्रसंगाची मला आठवणसुद्धा नव्हती!!

स्टेशनवर आलो. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली पाहिली, आणि मग मात्र एकदम सगळा दिवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. दोन-तीन ट्रेन अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आता मी एकटा होतो. कुठे तोंड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं. मी असं कसं वागू शकतो? एक प्रेझेंटेशन आणि एक चालताबोलता माणूस – यात माझा प्रेफरन्स हा होता? इतक्या वेळात काही पश्चात्ताप, तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पहावं का – असलं काहीसुद्धा माझ्या मनाला शिवलंसुद्धा नाही? आणि शोधता आलं नसतंही कदाचित – पण निदान तशी इच्छा व्हावी की नाही? नाही झाली. दिवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसुद्धा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली, तशीच.

मी असा आहे? इतका स्वार्थी, इतका नीच आहे? माझ्या हातून एक जिताजागता माणूस मेल्यावरही मी ते विसरून खाऊपिऊ शकतो? माझ्या भविष्याचे – भविष्याचे सोड, सिनेमाचे प्लॅन आखू शकतो? मी कुणी पाहिलं नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो? याची टोचणी लागायलाही मला एक अक्खा दिवस जावा लागला? त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली? मी माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी जगायच्या लायकीचा आहे का?

नाही, प्लीज उत्तर देऊ नकोस. तुझ्या उत्तराला घाबरलो म्हणून काल रात्री हे काही बोललो नाही. तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.

मी अशी आत्महत्या करणं तुमचा विचार करता बरोबर आहे का? कदाचित नाही. ’तरी तुला अभि आहे’ असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फूटबोर्डवरून माझा पाय निसटला असता, तर हे चूक की बरोबर हा प्रश्न आला असता का?

हे असेच उलट सुलट विचार करत होतो रात्रभर. आणि जाणवलं की हा गिल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आहे. यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.

तुझ्या दुःखावर हे पत्र म्हणजे उत्तर नाही, हे मला कळतंय, आणि त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या प्रश्नांना दुसरं उत्तर सुचत नाही मला.

- अनिरुद्ध
१२ जानेवारी २००९

गुलमोहर: 

कथा सुन्न करुन गेली.........................
खरच अंर्तमुख झलो...........

चांगली जमली आहे कथा

छान आहे !

तरि हा मार्ग नाहि स्वताला शिक्षा करन्याचा .

वैभव

स्वाती,
विवेचनही कथेइतक्याच ताकदीचे..
वपुंच्या 'हसरं दु:ख' ची आठवण झाली.

माणिक, गजाभाऊ,
या कथेच्या बाबतीत 'आईचं उत्तर' ही शक्यताच निर्माण होत नाही असं मला वाटतं. हे 'पत्र' नाही, ही suicide note आहे. हे पोस्टात टाकून तो मुलगा उत्तराची वाट पहात थांबणार नाहीये. आणि कुठलीच आई मुलाची suicide note वाचल्यावर 'पत्रोत्तर' लिहील असं मला वाटत नाही. तुमचं काय मत?

अभिप्रायांसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.

स्वाती, सहमत.
(माणिकची प्रतिक्रिया वाचल्यावर त्या बाजूने तुझ्या लेखणीतून एक 'स्नॅपशॉट' बघायची इच्छा झाली.)

स्वाती..

या कथेच्या बाबतीत 'आईचं उत्तर' ही शक्यताच निर्माण होत नाही असं मला वाटतं. हे 'पत्र' नाही, ही suicide note आहे. हे पोस्टात टाकून तो मुलगा उत्तराची वाट पहात थांबणार नाहीये.>> अगदी.. अगदी... पटलं!!

पण तरीही मला जे म्हणायचं होतं ते अस कि जेंव्हा हे पत्र आईच्या हातात पडेल (मुलाच्या अनुत्तरीत प्रश्नांसकट) तेंव्हा ती मनातल्या मनात का होईना पण त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जरूर देत राहील.. किंबहूना ती हा विचार जास्त करेल की जर हे सगळं जे माझ्या मुलाने पत्रात लिहिलं, हेच जर त्याने समोर बसून सांगितलं असतं तर तीने कोणत्या प्रकारे अन कुठल्या शब्दात त्याला समजावलं असतं वा कश्या प्रकारे संवाद साधला असता जेणेकरून त्याचा माणूसकिवरचा विश्वासही अबाधित राहिला असता, अन मनातलं शल्यही क्षीण अथवा कमी झालं असतं.

अगदीच माझंच म्हणण सांगायच झाल तर... तर हा पत्रव्यवहार झालाच नाहीये आणि आईला फक्त हा प्रसंग समजलाय तर ती मुलाशी कसा संवाद साधेल हे 'तूझ्या' लेखणीतून अन 'त्या आईच्या' भूमिकेतून जे उतरेल ते वाचायचा मोह झाला. ते त्या पत्राचे उत्तर नसले तर नसू दे... पण भूमिका तरी मांडशील (फक्त ती पत्ररूपात असेल तर जास्त कनेक्टेड वाटेल अस मला वाटतं).. किमान मनस्थिती तरी... पण लिहिच. Happy

बाप रे..एकदम अंगावर येणारे लिहिले आहेत...अतिशय परिणामकारक.

फारच सुंदर स्वाती,
खरंच केवढे बारकावे शब्दात पकडता येतात तुला!
नेहमीप्रमाणे सा.न.

मनाला पटली नाही. लेखन चागले असुन काय उपयोग ?

लेखन चांगले आहे पण...
आत्महत्या नाही आवडत..
दुसरे बरेच विषय आहेत.

बस........no words......

खरच असे काही आपल्यामुळे घडलं ... तर असा विचार करु शकू का??

Sad

बरी आहे कथा. इतके प्रतिसाद बघून उत्सुकतेने वाचली. पण, माफ करा फार उच्च नाही वाटली.
कदाचित फार अपेक्षा ठेवून वाचल्यामुळे असेल. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.

स्वाती,

कथा मस्त आहे. वास्तवाला धरून आहे. कोण कुठल्या वेळी कसा विचार करेल ते सांगता येत नाही. आणि जर 'माझ्यामुळे त्याचा जीव गेला' अशी भावना तयार झाली तर आत्महत्या करणे शक्य आहे. मुख्य म्हणजे तू ते अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेस.

शरद
["तुझं मत कदाचित माझ्या मताविरुद्ध असेल; पण ते मांडण्याचा तुझा अधिकार मी प्राणपणाने जपेन." वोल्तेयर]

very good story.
छान होती गोष्ट.
आवडली मला.
फार sensetive दिसतेस तू.
मझासारखी अगदी नाजुक.
पण चुकून झालेल्या चुकीसाथी स्वताचा जिव देने हा पर्याय नहीं आवडला मला.
या २१ व्या शतकातही अशी मांस असतात अस वाट नाही मला.
पण लिखाण फार सुरेख आहे तुझ.
तुझे मन पूर्वक आभार.
आणि पुढील लिखणासाथी शुभेच्छा.

स्वाती- फुटबोर्डावरच्या क्षणार्धाचे कापरे क्षण असे डोळ्यासमोर आले की काय सांगू. आणि redemption ?

स्वाती - ही कथा छानच आहे - तुझ्या सर्व कविता, इतर काही लिहिलेले - लेख - कथा, नवीन काही कृपया टाक ना इथे मा बो वर.
धन्यवाद.

जबरदस्त!!!

अतिशय परीणामकारक कथा... मानवी मनाची गुंतागुंत नेमकी मांडली आहेस कथेत...

अंतर्मुख करणारी..... खरच अश्या परिस्थितीत मी कशी वागेन याच उत्तर मी देऊ शकते का ठामपणे???<<< +१

अतिशय प्रगल्भ लिखाण आहे आपलं. पुलेशु!!
>>तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.>> अंगावर सरसरुन काटा आला इथे.
प्रतिसादात मांडलेला, पन्ना यांचा अनुभवही जबरदस्त होता.

Pages