आई,
आता मी जे लिहिणार आहे, त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही.
थेटच लिहितो.
आई गं, मी आत्महत्या करतोय.
फक्त वाटलं की मी हे का करतोय हे तुला माहीत असायला हवं. आणि तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरंतर तेवढ्यासाठीच घरी आलो काल रात्री. नाहीतर कदाचित तेव्हाच –
शिवाय लिहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आणि अभिच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना.
काल सकाळी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पाहिलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉपीज, प्रेझेंटेशनच्या स्लाईड्स, काय काय होतं त्यात. गेले सहा महिने केलेल्या ढोरमेहनतीचे पुरावे. चांगल्या ग्रेड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम.
गर्दीचीच वेळ होती. ट्रेनमधे चढताना फूटबोर्डवरचा मधला बार असतो ना, त्याच्याभोवती माझ्या बॅगचा पट्टा अडकला. बारच्या एका बाजूला मी आणि दुसर्या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत शिरता येत नव्हतं आणि दुसर्या बाजूलाही एक जण त्या अडनिड्या बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोर्डवर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घट्ट धरलेला – असा तो जवळपास बाहेरच लोंबकळत होता. तो ओरडून ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडेन.
आणि आई, माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो सोडतो म्हणत म्हणत तो क्षण थोडा – थोडासाच - लांबवला. पण तेवढ्याने उशीर झाला गं. त्याचा पाय तेवढ्यात निसटला फूटबोर्डवरून. धपकन आवाज झाला. डब्यातल्या कलकलाटात त्याची किंकाळीसुद्धा विरून गेली. गाडीने प्लॅटफॉर्म नुकता सोडला होता नव्हता – खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा गाडीतले लोक म्हणायला लागले, कोई गिर गया लगता है बेचारा – ट्रेन मत रोको – लेट हो जायेगा – वो अब वापस थोडेही आयेगा! पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी लोकं ट्रेनमधून उड्या मारून कोंडाळं करून त्याचं ते छिन्नविच्छिन्न शरीर बघत उभी राहिली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. सुन्न झालो होतो.
जरा भानावर आल्यावर पहिला विचार मनात आला तो काय होता माहीत आहे? रिलीफचा होता आई! हे आपल्यामुळे झालं, हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा रिलीफ!
मग सुचलं हळहळणं वगैरे! ते ही किती? पाचेक मिनिटंच गेली असतील. मग कॉलेज, प्रेझेंटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो, एक कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्हे, जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.. इतकी अवजड बॅग – कशी हलणार होती त्या गर्दीत? त्या माणसाने तरी – म्हणजे गेला हे वाईट झालं – पण कशाला इतकं जिवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गर्दी आहे – होतातच या गोष्टी – आपली काळजी आपणच घेता यायला हवी होती त्याला! तू काय करणार?
असं स्वतःला समजावून, कॉफी पिऊन, पुढली ट्रेन पकडून कॉलेजला गेलो. सबमिशन्स झाली, प्रेझेंटेशन झालं, एक कँपस इन्टरव्ह्यूसुद्धा झाला. आणि चांगलाही झाला! आधी मनाशी म्हणत होतो, की कर्तव्य करतोय. आईने बाबांच्या मागे इतके कष्ट करून वाढवलं आपल्याला – आता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन मार्गी लागणं हे तिच्यासाठी तरी करायलाच हवं, नाही का? आत्ता ते बाकीचे विचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होवून गेलं. हे आणि असंच बरंच काही. एकेक कामं हातावेगळी करत मग हळूहळू गुंततही गेलो त्यात. इन्टरव्ह्यू झाल्यावर अम्या आणि दिलीपबरोबर हॉटेलमधे खातपीत टाईमपास केला, दुसर्या दिवशी पिक्चरला जायचं ठरवलं, रिझल्टनंतर सेलिब्रेट कसं करायचं त्यावर गहन चर्चा केली, कुठल्या कंपन्या सद्ध्या हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आहे, याचा अंदाज घेऊन झाला – हे सगळं करत असताना, आई, सकाळच्या प्रसंगाची मला आठवणसुद्धा नव्हती!!
स्टेशनवर आलो. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली पाहिली, आणि मग मात्र एकदम सगळा दिवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. दोन-तीन ट्रेन अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आता मी एकटा होतो. कुठे तोंड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं. मी असं कसं वागू शकतो? एक प्रेझेंटेशन आणि एक चालताबोलता माणूस – यात माझा प्रेफरन्स हा होता? इतक्या वेळात काही पश्चात्ताप, तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पहावं का – असलं काहीसुद्धा माझ्या मनाला शिवलंसुद्धा नाही? आणि शोधता आलं नसतंही कदाचित – पण निदान तशी इच्छा व्हावी की नाही? नाही झाली. दिवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसुद्धा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली, तशीच.
मी असा आहे? इतका स्वार्थी, इतका नीच आहे? माझ्या हातून एक जिताजागता माणूस मेल्यावरही मी ते विसरून खाऊपिऊ शकतो? माझ्या भविष्याचे – भविष्याचे सोड, सिनेमाचे प्लॅन आखू शकतो? मी कुणी पाहिलं नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो? याची टोचणी लागायलाही मला एक अक्खा दिवस जावा लागला? त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली? मी माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी जगायच्या लायकीचा आहे का?
नाही, प्लीज उत्तर देऊ नकोस. तुझ्या उत्तराला घाबरलो म्हणून काल रात्री हे काही बोललो नाही. तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.
मी अशी आत्महत्या करणं तुमचा विचार करता बरोबर आहे का? कदाचित नाही. ’तरी तुला अभि आहे’ असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फूटबोर्डवरून माझा पाय निसटला असता, तर हे चूक की बरोबर हा प्रश्न आला असता का?
हे असेच उलट सुलट विचार करत होतो रात्रभर. आणि जाणवलं की हा गिल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आहे. यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.
तुझ्या दुःखावर हे पत्र म्हणजे उत्तर नाही, हे मला कळतंय, आणि त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या प्रश्नांना दुसरं उत्तर सुचत नाही मला.
- अनिरुद्ध
१२ जानेवारी २००९
ऊत्कृष्ट...
ऊत्कृष्ट... एकदम "सुन्नाट" फ्लो आहे कथेचा आणि आम्च्या सारख्या ज्यांन्नी मुंबईत कामावर जातना कधी ना कधी हे क्षण अनुभवले आहेत त्यांन्ना त्यातली reality अगदी जवळून कळेल..
कथा भयंकर भावनाधिष्ठीत असल्याने अनिचा शेवटचा निर्णय योग्य का अयोग्य या तर्कवादास वाव रहात नाही. सुरुवातीलाच त्याने योग्य केले का अयोग्य या वादास वाव रहात नाही तसेच्...कारण तो एक क्षण अन त्या क्षणि केलेला विचार अन नंतर झालेली जाणीव हेच या कथेच शक्तीस्थान आहे. त्यामूळे ज्या शहरात मनुष्य मिनीटा मिनीटा चे आयुष्य तळहातावर घेवून जगत असतो तिथे ही कथा एक फ्लो म्हणूनच पहावी लागेल आणि कथेनंतरही तो फ्लो मनात शिल्लक रहातो यातच सर्व काही आलं.
पुन्हा एकदा, मस्त!
मुळात एका
मुळात एका व्यक्तीची ही कथा आहे.. अशी वागणारीही माणसे असतात... त्याने कसे वागायला हवे हे आपण ठरवू शकत नाहीत!

गंमत अशी की हा अनिरुद्ध खरा आहे (असूही शकतो) असेच मानून त्यावर विचार होतोय म्हणजे लेखकाचे लिखाण वास्तवात घेऊन आलेय!
सुंदर!
_________________________
-Impossible is often untried.
अतिशय
अतिशय परीणामकारक कथा... आणि अंतर्मुख करणारी..
स्वाती कथा
स्वाती
कथा आवडली... मानवी मनाची गुंतागुंत नेमकी मांडली आहेस कथेत... फार छान लेखन.
मस्तच!
मस्तच! एकतर एकदम सरळ्,साध्या सोप्या भाषेत फ्लो आहे. उगीच शब्दांच्या अलंकारीक जंजाळात अडकून नाही आहे आणि खूपच मेलोड्रामॅटीक नाही आहे.
सरळ, सच्या भावना नायकाच्या दिसतात जेव्हा त्याला खरोखर जाणीव नी टोचणी होते काय घडलय ह्याची. ते म्हणतात ना retrospection.
स्वाती.........
स्वाती......... नि:शब्द!
आफताब, बी आणि राज्यशी सहमत!
पण, योगचा प्रतिसादही पटतोय!
छान लिहिलय
छान लिहिलय आंबोळे मॅडम
आवडलं .. हटके .
कथा लिहिली छान पण वास्तवीकतेच्या फार दूर जाणारी वाटली. खरीखुरी जरी असली तरी अनिरुद्ध समंजस नाही वाटला. घरी आई आणि अभि असताना त्यांचे आपल्यानंतर काय होईल हा विचार केला नाही आणि वर आफताब म्हणतो तसे आत्महत्या हे प्रायश्चित नाही होऊ शकत. >> ही कथा आहे शेवटी.
ती छान झाली आहे ते पहा उगीच किस पाडत बसू नका .
सुरेख ...
सुरेख ...
>>> तू किंवा
>>> तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.
इथे त्याची टोचणी 'कळायला' लागली अन्
>>>आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.
हे खूप अंगावर आलं. प्रत्येक चांगल्या वर्तणुकीनंतर असं वाटणं कसे असेल असा विचार करायचा प्रयत्न केला...भीण्ण काळोखात एकटेच अधांतरी उभे आहोत असं काहीतरी वाटलं. हे विसरणार नाही.
***
भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी
फारच विचार
फारच विचार करायला लावणारी कथा आहे...... खरच अश्या परिस्थितीत मी कशी वागेन याच उत्तर मी देऊ शकते का ठामपणे???
स्वाती कथा
स्वाती कथा अप्रतिम आहे. सुन्न करुन सोडणारी आहे. नायकाने पहिले दखविलेला स्वार्थीपणा, आणि नंतरची त्याची होणारी घालमेल.. खरच अतिशय छान लिहिले आहे.
पण शेवट थोडा वेगळा असता तर?
स्वाती, ही
स्वाती, ही घालमेल नेमक्या शब्दांत इतक्या परिणामकारकरित्या मांडण्याची शैली जबरदस्त!
कथाही
कथाही (कवितेप्रमाणे) वाचकाला अनुभूती देत असते.. त्यातले प्रसंग, पात्र यांच्या जागी मी असतो तर कसा वागलो असतो हे प्रत्येक वाचक तपासून पहात असतो, म्हणूनच प्रत्येकाला कथेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आवडू शकतात. अनिरुद्धाने आत्महत्या केली- का केली? करायला हवी होती की नको?- या प्रकारच्या प्रतिक्रियाही (अपेक्षा नसतांना, गरज नसतांना) त्यामुळेच येतात. मलाही त्याने आत्मम्हत्या केली हे पटले नाही.
पण शेवटी ही कथा आहे आणि ती स्वातीने ज्या पद्धतीने लिहीली आहे- विषय, भाषा, संवाद, विचार व्यक्त करायची पद्धत, फ्लो, अगदी कथेची लांबीही- हे सगळंच मला अभ्यासपूर्ण वाटलं.
स्वाती, आधी एका वाक्यात अभिप्राय दिला होता, पण हे सगळंही लिहावसं वाटलं, म्हणून थोडे स्वातंत्र्य घेतले, hope you don't mind!
एक जुना
एक जुना चित्रपट आला होता..मीनाकुमारी आणि खन्नांचा राजेश्..दुश्मन..!
तशा प्रकारची शिक्षा किंवा प्रायश्चित्त जास्त योग्य ठरले असते असे नाही वाटत. आत्महत्या करणे ही सर्वात सोपी पळवाट झाली.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
नायकाने
नायकाने नेहेमीच आदर्श का वागावे? मुळात तो वागतो ते आदर्श, चुकीचे, बरोबर हे आपण कसे ठरवणार? अन प्रायश्चित्त म्हणून नायकाने काहीतरी समाजसेवा किंवा तसेच काहीतरी करण्याचे मनावर घेतले असते तर आपण 'पठडीतली कथा' म्हणालो असतो की..

त्याची मानसिकता हा एक प्रचंड मोठा कॅनव्हास आहे. हा रंगला तर ते लिखाणाचे यश म्हटले पाहिजे. ते रंग समजून घेतले तर नायकाची मानसिकता कळेल, निर्णयामागचा कार्यकारणभाव कळेल. पण मग पटेलच असेही नाही. अन त्याची आवश्यकताही नाही.
एखाद्या हलवून टाकणार्या प्रसंगामूळे तो कसा वागला, हे त्याच्या दृष्टीने त्याने जस्टिफाय केले. हे जस्टिफिकेशन इतके बळकट होते, की दुसर्या कुणाच्या सल्ल्याची किंवा निर्णय फिरवण्याची गरज त्याला भासली नाही. त्या निर्णयाप्रत पोचण्याच्या प्रवासाचा हा कॅनव्हास. मस्त रंगलेला..
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
एकदम वेगळी
एकदम वेगळी नि छान कथा...स्वाती, मस्तच लिहिलंस...
आत्महत्या
आत्महत्या कुणालाच पटत नाही. पण माणसे प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतात असे नाही. हा स्वातीचा नायक आहे. तो त्या क्षणी जसा वागेल असे तिला वाटले तसे तिने रेखाटले. कथेचं यश हे आहे की ही सत्यकथा आहे की काय असा भास पहिल्या ओळीपासून होत होता. त्या नायकाशी आपण आपल्या घरातली व्यक्ती असल्याप्रमाणे रिलेट करायला लागलो. आणि इतक्या उमद्या, उज्वल भविष्य असलेल्या आपल्या जवळच्या भासणार्या व्यक्तिने हे करायला नको होतं ही हळहळ आहे. यात चूक की बरोबर हा प्रश्नच नाही.
अप्रतिम..!! स
अप्रतिम..!!
सगळी आंदोलनं ठळक आणि इतकी नीट उतरलीयत की कथा सरळ सरळ मनाला भिडते.
खूपच परिणामकारक.
स्वाती, खूप दिवसांनी आलीस पण नेहमीप्रमाणे सगळ्यांना हलवलस..
खुपच विचार
खुपच विचार करायला लावलास. खरच त्या क्षणाला कीती जणाना ही भावना झाली असेल की हे आपल्यामुळे घडले. शेजारच्या किती जणाना वाटले असेल की आपण जर हात पुढे केला असता तर तो वाचला असता. मनाच्या सागरातले हे भोवरे कधी विरुन जातात तर कधी जिव घेतात. तसाच हा एक भोवरा. हा शेवट नाही आहे. कदाचित शेवटच्या क्षणी त्याला कोणी तरी भेटेल आणि 'कर्मण्ये ' चा अर्थ समजावुन सांगेल व हा भोवरा विरुन जाईल. कोणी सांगाव.
- अनिलभाई
भाई अन
भाई अन वैभव सारखेच मला वाटले! त्या मुलाची मानसिक स्थिती जबरदस्त रंगवलीयस!!
भाईंना
भाईंना अनुमोदन. विचार करायला लावणारी गोष्ट.
दोन पाने
दोन पाने सारखी नसतात, दोन मने सारखी नसतात....दोन भिन्न क्षणी एकाच मनाच्या स्थितीही सारख्या नसतात! म्हणूनच मनाची असंख्य आंदोलने या सारख्या कथांमधून पुढे येतात.....आणि विचार करायला लावतात!.....एका अशाच आंदोलनाचा वेध घेणारी ही कथा.....केवळ अप्रतिम!
स्वाती,
स्वाती, छान जमलीय... पण संपली की अजुन पुढे यायचीय ? समाप्त लिहिल नाहीयस म्हणुन विचारतोय.
सॉलिड!
सॉलिड! सगळीच मने खूप लिक्विड झाली वाचून.
कथेची पकड शेवटपर्यंत चांगली राहिलिय. कथा ही कथा, नायकाचा रोल, इ.इ. सर्व विचार करूनही वाटते कि, जी घटना हेतूपरत्वे झाली नाहीय, त्याचा गिल्ट न ठेवता, ती चूक होती हे मान्य; अजून शंभर मरणार्यांना सावरता येईल; गेलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्या कुटुंबाला माया देता येईल; प्रेमाने सारे जग जिंकता येते.
अर्थात असा शेवट केला तर ती एक टायपो होईल- सिरिअल नाहीतर सिनेमातल्यासाऱखी!
ही कथा वेगळी म्हणूनच सुन्न करून जाते-- एकातून दुसरी घटना- स्वतःला क्षमा न करणारी.
सुंदर.
खुप सुन्दर
खुप सुन्दर लिहिली आहे कथा..............
त्याने
त्याने केलेल्या चूकीची जाणिव तो सहज गत्या विसरू शकतो आणि विसरेलही ह्या भिती पोटी त्याने आत्महत्या केली. बरेचवेळा आपणही लहान सहान चूका करतो आणि नंतर सोयीस्कर रीत्या विसरून जातो. हे असे विसरणे म्हणजे माणूसकीचा मृत्यू आहे हेच ह्या कथेतून जाणावले.
ज ब र द स्त
ज ब र द स्त प्लॉ ट आहे! _/\_
पण>>>
आत्महत्या करून प्रश्न सुटणार का? माफ करा पण शेवट पटला नाही! हां आता मला पटायला मी काय लॉर्ड फॉकलंड नाही पण तरीही... तो काही तरी मदत करतो असं दाखवल असत तर?
सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना
प्रचंड
प्रचंड विचार करायला लावणारी कथा लिहीलीयेस स्वाती..
योग म्हणतोय ते खरयं.. मुंबईत प्रवास करणार्या लोकांना हे असले अनुभव सतत येतात. इतकं फास्ट लाईफ आहे की सामान्य माणसाच्या संवेदना वगैरे खुपच बोथट झालेल्या आहेत.
मी स्वता: एकदा असला गाढवपणा केलाय
दारात उभं राहुनच तर कायम प्रवास केलाय, मग तो ठाणे-मुलुंड असो की ठाणे- VT ..पण ठोसुन भरलेल्या ट्रेन मधे एकदा लटकत होते अन एका हाताने फक्त बार धरलेला. आतुन गर्दीचे प्रेशर सतत वाढत होते.. अन नेमक्या बार धरलेल्या हाताला घाम फुटत होता.. पकड ढीली होत होती, जाणवत होतं की काही खरं नाहीये आपलं अन त्याच क्षणी माझ्या मागे उभ्या असलेल्या बाईने मला कव्हर केलं. तिच्यामुळे वाचले मी!
उत्कृष्ट .
उत्कृष्ट . भयाण वाटतय नुसते वाचयतानाही ...... एकदम अंगावर आले....
एखाद्या
एखाद्या परिस्थीतीत कोणी काय निर्णय घ्यावा हे सांगणे जितके सोपे तितके त्या परिस्थीतीत असताना विशिष्ट निर्णय घेणे तितकेच कठीण म्हणुन कथा नायकाने घेतलेला निर्णय चुक कि बरोबर हे त्याच्या सारख्या परिस्थीतीत सापडल्याशिवाय कळणार नाही.
काही वेळा माणसे सद्विवेक बुद्धीवर ओझे घेउन नाही जगु शकत, कथा नायक हा त्या काही दुर्मिळ व्यक्तींपैकी एक..
स्वाती अतिशय सुरेख कथा..
Pages