उत्तर

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 January, 2009 - 16:15

आई,

आता मी जे लिहिणार आहे, त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही.
थेटच लिहितो.

आई गं, मी आत्महत्या करतोय.

फक्त वाटलं की मी हे का करतोय हे तुला माहीत असायला हवं. आणि तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरंतर तेवढ्यासाठीच घरी आलो काल रात्री. नाहीतर कदाचित तेव्हाच –
शिवाय लिहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आणि अभिच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना.

काल सकाळी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पाहिलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉपीज, प्रेझेंटेशनच्या स्लाईड्स, काय काय होतं त्यात. गेले सहा महिने केलेल्या ढोरमेहनतीचे पुरावे. चांगल्या ग्रेड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम.

गर्दीचीच वेळ होती. ट्रेनमधे चढताना फूटबोर्डवरचा मधला बार असतो ना, त्याच्याभोवती माझ्या बॅगचा पट्टा अडकला. बारच्या एका बाजूला मी आणि दुसर्‍या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत शिरता येत नव्हतं आणि दुसर्‍या बाजूलाही एक जण त्या अडनिड्या बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोर्डवर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घट्ट धरलेला – असा तो जवळपास बाहेरच लोंबकळत होता. तो ओरडून ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडेन.

आणि आई, माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो सोडतो म्हणत म्हणत तो क्षण थोडा – थोडासाच - लांबवला. पण तेवढ्याने उशीर झाला गं. त्याचा पाय तेवढ्यात निसटला फूटबोर्डवरून. धपकन आवाज झाला. डब्यातल्या कलकलाटात त्याची किंकाळीसुद्धा विरून गेली. गाडीने प्लॅटफॉर्म नुकता सोडला होता नव्हता – खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा गाडीतले लोक म्हणायला लागले, कोई गिर गया लगता है बेचारा – ट्रेन मत रोको – लेट हो जायेगा – वो अब वापस थोडेही आयेगा! पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी लोकं ट्रेनमधून उड्या मारून कोंडाळं करून त्याचं ते छिन्नविच्छिन्न शरीर बघत उभी राहिली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. सुन्न झालो होतो.

जरा भानावर आल्यावर पहिला विचार मनात आला तो काय होता माहीत आहे? रिलीफचा होता आई! हे आपल्यामुळे झालं, हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा रिलीफ!

मग सुचलं हळहळणं वगैरे! ते ही किती? पाचेक मिनिटंच गेली असतील. मग कॉलेज, प्रेझेंटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो, एक कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्हे, जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.. इतकी अवजड बॅग – कशी हलणार होती त्या गर्दीत? त्या माणसाने तरी – म्हणजे गेला हे वाईट झालं – पण कशाला इतकं जिवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गर्दी आहे – होतातच या गोष्टी – आपली काळजी आपणच घेता यायला हवी होती त्याला! तू काय करणार?

असं स्वतःला समजावून, कॉफी पिऊन, पुढली ट्रेन पकडून कॉलेजला गेलो. सबमिशन्स झाली, प्रेझेंटेशन झालं, एक कँपस इन्टरव्ह्यूसुद्धा झाला. आणि चांगलाही झाला! आधी मनाशी म्हणत होतो, की कर्तव्य करतोय. आईने बाबांच्या मागे इतके कष्ट करून वाढवलं आपल्याला – आता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन मार्गी लागणं हे तिच्यासाठी तरी करायलाच हवं, नाही का? आत्ता ते बाकीचे विचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होवून गेलं. हे आणि असंच बरंच काही. एकेक कामं हातावेगळी करत मग हळूहळू गुंततही गेलो त्यात. इन्टरव्ह्यू झाल्यावर अम्या आणि दिलीपबरोबर हॉटेलमधे खातपीत टाईमपास केला, दुसर्‍या दिवशी पिक्चरला जायचं ठरवलं, रिझल्टनंतर सेलिब्रेट कसं करायचं त्यावर गहन चर्चा केली, कुठल्या कंपन्या सद्ध्या हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आहे, याचा अंदाज घेऊन झाला – हे सगळं करत असताना, आई, सकाळच्या प्रसंगाची मला आठवणसुद्धा नव्हती!!

स्टेशनवर आलो. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली पाहिली, आणि मग मात्र एकदम सगळा दिवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. दोन-तीन ट्रेन अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आता मी एकटा होतो. कुठे तोंड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं. मी असं कसं वागू शकतो? एक प्रेझेंटेशन आणि एक चालताबोलता माणूस – यात माझा प्रेफरन्स हा होता? इतक्या वेळात काही पश्चात्ताप, तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पहावं का – असलं काहीसुद्धा माझ्या मनाला शिवलंसुद्धा नाही? आणि शोधता आलं नसतंही कदाचित – पण निदान तशी इच्छा व्हावी की नाही? नाही झाली. दिवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसुद्धा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली, तशीच.

मी असा आहे? इतका स्वार्थी, इतका नीच आहे? माझ्या हातून एक जिताजागता माणूस मेल्यावरही मी ते विसरून खाऊपिऊ शकतो? माझ्या भविष्याचे – भविष्याचे सोड, सिनेमाचे प्लॅन आखू शकतो? मी कुणी पाहिलं नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो? याची टोचणी लागायलाही मला एक अक्खा दिवस जावा लागला? त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली? मी माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी जगायच्या लायकीचा आहे का?

नाही, प्लीज उत्तर देऊ नकोस. तुझ्या उत्तराला घाबरलो म्हणून काल रात्री हे काही बोललो नाही. तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.

मी अशी आत्महत्या करणं तुमचा विचार करता बरोबर आहे का? कदाचित नाही. ’तरी तुला अभि आहे’ असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फूटबोर्डवरून माझा पाय निसटला असता, तर हे चूक की बरोबर हा प्रश्न आला असता का?

हे असेच उलट सुलट विचार करत होतो रात्रभर. आणि जाणवलं की हा गिल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आहे. यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.

तुझ्या दुःखावर हे पत्र म्हणजे उत्तर नाही, हे मला कळतंय, आणि त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या प्रश्नांना दुसरं उत्तर सुचत नाही मला.

- अनिरुद्ध
१२ जानेवारी २००९

गुलमोहर: 

अभिप्रायासाठी सर्वांचे मनापासून आभार.

अनिरुद्धने आत्महत्येचा निर्णय घेणं योग्य की अयोग्य - याचा उहापोह झालेला वाचला. आणि माझं जे उत्तर असलं असतं ते गिरीराज, योग, साजिरा, अश्विनी इत्यादिंच्या उत्तरांमधे बर्‍याच अंशी already cover झालंय. तेव्हा त्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करत नाही. त्याऐवजी थोडीशी माझी ही कथा लिहिण्यामागची मनोभूमिका सांगते.

एकतर आपल्याला कारणं वा कृती योग्य वाटो / न वाटो, जगात आत्महत्या होतात ही fact आहे.
पुन्हा आत्महत्या योग्य की अयोग्य याचं उत्तर व्यक्तीगणिक, प्रसंगागणिक, काळागणिक, समाजागणिक निराळं असू शकतं. यात जिवाचा धोका पत्करून युद्धावर जाणारे सैनिक आले, हताश दरिद्री शेतकरी आले, इच्छामरण स्वीकारणारे वृद्ध वा आजारी लोक आले, अतिरेकी आत्मघातकी हल्लेकरी आले, समारंभपूर्वक हाराकिरी करणारे जपानी सामुराई आले, आणि 'ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे जीवितकार्य संपलं' असं म्हणून समाधी घेणारे संत ज्ञानेश्वरसुद्धा आले. त्यांनी इतक्या तरुण वयात समाधी घेण्याऐवजी जिवंत राहून समाजप्रबोधन आणि दीनदु:खितांचा उद्धार करण्याच्या कामी जीवन वाहणं 'योग्य' नव्हतं का? मग आपण आळंदीला नमस्कार करायला का जातो?
तेव्हा योग्यायोग्यता ही इतक्या सहजपणे ठरवण्याची गोष्ट नव्हे.

याचा अर्थ मला अनिरुद्ध भेटला तर मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही का? तर नक्कीच करेन.
ही कथा 'तरुणांनो, उठा आणि आत्महत्या करा' असा 'संदेश' देते का? - I hope not. Happy

पण जगातले सगळे सजीव जिथे आपला जीव वाचवायला अक्षरशः programmed असतात (आठवा : माकडिणीची गोष्ट), तिथे काही लोक त्या instinct च्या पूर्णपणे विरुद्ध का आणि कुठल्या मनःस्थितीत जात असतील ही विचार करण्यासारखी बाब नाही? मला वाटली.

माझं दुसरं fascination आहे ते माणसातल्या अपराधीपणाच्या भावनेबाबत. कुठलीही घटना ही स्वतः निर्मम असते, पण तिचा प्रत्येकाचा अनुभव आणि निष्कर्ष हे त्या घटनेत त्याचं अंतरंग मिसळल्यावरचं perception असतं. त्यामुळेच एखाद्या साध्या चुकीचा एखाद्याला प्रचंड guilt येऊ शकतो आणि एखादा माणूस खून पाडूनही निर्विकार राहू शकतो. दिवाळी अंकात दिलेली कथा लिहिताना हा विचार माझ्या मनात सुरू झाला होता. तो इथवर येऊन पोचला.

शेवटी हा एक snapshot आहे. This is what an object looked like, at a particular point of time from a particular angle in a certain light. आयुष्यात प्रत्येक क्षणी आपण sensibility आणि sensitivity यात balance साधत चालायचा प्रयत्न करत असतो. कधी हे पारडं जड होतं तर कधी ते. आणि कधी पुरताच तोल जातो - का, कसा याचं गणित कसं मांडणार?

असो. कथेपेक्षा विवेचन मोठं होईल आता. Happy

कथा तुम्हा सगळ्यांपर्यंत त्यातल्या said-unsaid कंगोर्‍यांसकट पोचली याचं समाधान वाटलं.
मला 'तुझ्या कथेने/कवितेने विचारांत पाडलं' हा अभिप्राय वाचला की खूप आनंद होतो. Happy

जाता जाता:
> पूनम, प्रांजळ प्रश्न/शंका उपस्थित करण्यासाठी 'स्वातंत्र्य घेतलं' म्हणायची काहीच गरज नाही. Public forum वर लेखन प्रकाशित केलं की प्रत्येक वाचकाला ते स्वातंत्र्य अध्याह्रतच आहे. Happy
> कुलदीप, तुम्ही लॉर्ड फॉकलंड असतात तरी माझं उत्तर बदललं नसतं. आणि अनिरुद्धचंही. Happy
> लक्ष्मीकांत, कथा संपली. Happy

पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

स्वाती, तुझा हा वरचा अभिप्राय कथेपेक्षा कैकपटीने जस्त चांगला आहे! त्यात एक खास तत्त्वज्ञान आहे. आत्महत्येबद्दलचे तुझे विचार त्यातून परखडपणे उतरतात. पुर्वी कधी या विषयावर असे विचार ऐकले नाहीत की वाचलेही नाहीत.

ही कथा 'तरुणांनो, उठा आणि आत्महत्या करा' असा 'संदेश' देते का? - I hope not. >> हो मला ही कथा अशीच वाटली कारण मी का आत्महत्या करतो आहे हे अनिरुद्ध फक्त सांगत जातो. त्याची परिणती काय होईल याचा विचार मात्र तो मांडत नाही.

असो तुझे उत्तर वाचून आता कथा पोचली.

स्वाती, 'हे' उत्तरसुद्धा मुखपृष्ठावर दिसले पाहिजे... 'उत्तरपक्ष' म्हणून. केवळ व्वा !

    ***
    भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी

    स्वाती प्रत्येक वाक्य वाचताना काटा आला गं. ... सुरुवातीपासूनच.
    ~~~~~~~~~

    वाह! सगळ्यात स्ट्रॉन्ग प्वाइन्ट मला वाटला तो म्हणजे कथेचा फॉर्म!! खूपदा लिहितांना कसे लिहावे हा मोठाच प्रश्न वाटतो. प्रथमपुरुषी निवेदनाने कथा इतकी परिणामकारक झाली आईला लिहिलेले पत्र यातून कथेला भावनातमक्दृष्ट्या वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेय्त!
    _________________________
    -Impossible is often untried.

    वर हे प्रोम्युसिक कशाबद्दल योगायोग आणि सॉरी म्हणत आहेत Happy

    कथा, कथेवरील प्रतिसाद व लेखिकेचे विवेचन.... अप्रतिम.
    एक संपुर्ण पटलेले सत्य हेच की प्राप्त परिस्थितीत काय करावं हा आपला निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो व तेव्हा आपल्या दृष्टीकोनातून तोच सुवर्णमध्य असतो. एक त्रयस्थ म्हणून एखाद्याच्या निर्णायाकडे पाहीलं तर तो पटतच असं नाही. कारण शेवटी या सगळ्या गोष्टींना कारणीभुत असते ती त्या व्यक्तीची मानसिक जडणघडण. एकाच परिस्थितीत अनेक व्यकी वेगवेगळा विचार करतात तो याचमुळेच. मी त्या जागी असतो तर..... हा जर-तरचा प्रश्नच निरर्थक ठरतो. कथानायकाच्या मनाची आंदोलने सुरेख रेखाटली आहेत.
    .........................................................................................................................

    http://kautukaachebol.blogspot.com/

    शेवटी हा एक snapshot आहे.>> होय खरय! तुम्ही लॉर्ड फॉकलंड असतात >> नाही मी लॉर्ड फॉकलंड असतो म्हणून मत बदलण्याचा प्रश्नच नाही लेखिकेच स्वातंत्र्य अबाधित रहिलच पाहिजे. गो ष्ट वाचून वाटल तस लिहिलं चु. भू. माफ करावी Happy

    कथेपेक्षा विवेचन मोठं होईल >> कस आहे हा सारांशच जास्त महत्वाचा! आणि आता जेंव्हा भुमिका स्पष्ट झाली आहे तेंव्हा नायकाच जीवन झुगारून देणच भावल! धन्यवाद.
    आणि एक तुम्ही नको कदचित मी लहान असेन तुमच्यापेक्षा!
    चु. भू. माफ करावी Happy

    सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना Happy

    कुलदीप, हे लॉर्ड फॉकलंड कोण आहेत, तीन तीन वेळा हे नाव ऐकले?

    हा चक्रव्युह सोडवलाच पाहिजे. नाहितर मग आपला अभिमन्यु झाला तर अति उत्तम आहे. या दोन्हिच्या मधे रहायच म्हणजे जिव॑त प्रेत म्हणुन फिरणे.

    रोज अनेक प्रस॑ग घडत असतात. परवाच॑ उदाहरण.. एका मुलिने बस अशी ओव्हरटेक केली कि क्शणासाठि मला वाटल॑ गेली ती आता. मला, तीला सा॑गु कि नको या द्विधा मनःस्तिथीत रहायच नव्हत॑ म्हणुन मी तीला गाठुन सा॑गितल ते॑व्हा तिला जाणीव झाली की काहितरी अघटित घडल असत.

    ही कथा आणि विवेचन वाचुन पुन्हा एकदा "जाणीव" ह्या शब्दातिल स॑वेदना जागी झाली.

    आभिन॑दन. अतिशय सुरेख कथा....!!!

    स्वाती... कथेचा फॉर्म इतका जबरी झालाय ना...... की सुरवात केल्यापासून संपेपर्यंत चैनच पडत नाही. ह्यातच तुझ्या लेखणीचं सामर्थ्य कळतं. शेवटी सुन्न झाले.

    कथेनंतरचं तुझं विवेचन तर इतकं सुरेख झालंय ना..... की खरंच आपण आत्महत्या करणा-या व्यक्तिला भ्याड म्हणून मोकळं होतो. पण त्यामागे खरंच इतक्या टोकाची हतबलता असू शकते ह्याचा आपण विचारही करु शकत नाही.

    खरंच तुझ्या सगळ्या कलाकृती प्रचंड विचार करायला लावतात. लिहित जा गं..... फार वाट बघायला लावतेस.

    व्वा स्वाती! खरच शब्द नाहीत.
    वेळोवेळी केलेला स्वताचा दांभिकपणा आठवला.

    मेघा

    शब्दच नाहीत प्रतिसाद द्यायला!! केवळ अप्रतिम!!

    केवळ अप्रतिम!!

    स्वाती, जबरदस्त. आणि तुझं नंतरचं विवेचनही...
    प्रतिक्रिया द्यायलाही काही सुचत नाहीये आत्ता.

    ..... पटेश. एकदम पटेश. नेहमीच प्रायश्चित्त वगैरे घडेलच असे नाही. ज्याला जे जसं सुचेल तसं तो करतो. नाहीतर आत्महत्या घडत्याच ना. बाप रे. सुन्न!

    स्वाती!! काय म्हणू तुला? तुझे विचार असे धार केलेल्या शस्त्राप्रमाणे.. ऍक्युरेट,थेट आणि लखलखीत ..
    तुझं विवेचन शब्दाशब्दातून मनापासून मेंदूपर्यंतच्या जाणीवा कापत गेलं.. ! भयाण वास्तव! बास.. बाकी काही नाही..
    ----------------------
    I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

    ए जबरी...!!! हे कस काय सुचल तुला? फुटबोर्डवरती लटकातानाचा जिवाचा अंकात आठवला... हुश्श....

    कथा तर आवडली होतीच, पण थॉट प्रोसेस?!? क्या बात है.. एखाद्या लिखाणामागे लेखक्/लेखिका असा आणि इतका डीप विचार करत असतील, तर आम्हा वाचकांसाठी पर्वणीच की! अप्रतिम!

    व्वा!!! काय जबरदस्त कथा आहे!! एका दमात वाचुन काढली आणी स्वतीचं विवेचन वाचुन झाल्यावर तर मी खरंच fan झाले, कथेचीही आणी स्वतीचीही:)

    *****************
    सुमेधा पुनकर Happy
    *****************

    स्वाती खुप छान लिहिले आहेस. मला हे फार आवदले.

    स्वाती खुप छान लिहिले आहेस. मला हे फार आवदले.

    स्वाती खुप छान लिहिले आहेस. मला हे फार आवदले.

    ह्म्म्म्म, विवेचन पटलं Happy
    आयला, आम्हाला एव्हढा विचार करणं जमतंच नाय Sad

    सही है!!! एकद्दम सही!!! कथा, नंतरचे विवेचन!!! बढिया!!!
    तुम लिखो, हम पढते है!

    अप्रतिम... स्वाती!!

    मला फक्त 'कथा संपली' हे पटलं नाही. Happy

    एका मुलाच्या जागी ठेवून लिहिलस पत्र पण अजून उत्कंठा आहे त्याची जे 'तू आईच्या ठिकाणी स्वतःला ठेवून जे उत्तर लिहिशील त्याची'... I hope you will write that also! Let it be another story.. another snapshot.. another angle.. whatever it may be but please write it! Happy

    अर्थात तूझं विवेचन सगळं कव्हर करतय पण तरिही एका २०-२२ वर्षाच्या मूलाला आई कशी समजावून सांगेल हे तूझ्याकडून (त्या भूमिकेतून) ऐकण्याचा मोह आवरत नाहिये ईतकच.

    लिहितेस ना?

    मानक्याची कल्पना आवडली, स्वाती. Happy

    मी सुध्दा एकदा असाच लटकत जात होतो. अंधेरीला फास्ट ट्रेन पकडली , हो नाही करता करता चढलो. कारण पुढे चर्नीरोडला त्याच ट्रेन मध्ये माझी बायको उतरणार होती लेडीज मधुन. ट्रेन सुटली आणी वेग घेताला. ऎक मन सांगत होते अत्ताच उडी मार वेळ गेली नाही आजुन पण नाही जमले. माझ्या पुढे एक जाड्या होता, मला वाटले आता माझा हात सुटणार अगदी बोटांवर धरले होते वरती आणी एवढ्यात तो जरा आत सरकला आणी मला सावरता आले. त्या वेळी जो पोटात गोळा आला तो आजही विचार केला की जाणवतो. पण ही गोष्ट मी बायकोला सांगीतली नाही , स्वाती आज आठ्वण झाली तुझ्या या गोष्टीमुळे.

    Pages