१०० विचार-मौक्तिके - अमेरिकेतील नाटकवाल्यांसाठी

Submitted by वाट्टेल ते on 12 March, 2015 - 16:29

१. नाटकाच्या पहिल्या (आणि अखेरच्या) प्रयोगाच्या सुमारे ३० दिवस आधी नाटकाची संहिता शोधण्यास लागावे.
२. नाटकाच्या ८ पेक्षा अधिक तालमी करू नयेत त्यामुळे कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयावर बंधने येतात.
३. नाटकात किमान एक अत्यंत बावळट आणि अजागळ स्त्री पात्र आवश्यक आहे.
४. नाटकात किमान एक अत्यंत खाष्ट आणि लबाड स्त्री पात्र आवश्यक आहे.
५. नाटकात स्त्री व पुरुष पात्रांची संख्या ४ : १ अशी असावी.
६. नाटक घराच्या दिवाणखान्यात आणि दिवाणखान्यातच घडते.
७. नाटकात किमान एकदा चहा (खोटा) किंवा खाणे (खरे) stage वर येणे बंधनकारक आहे.
८. नाटकातील वाफाळता चहा, पात्रांनी पाण्यासारखा एका घोटात प्यावा.
९ . नाटक हे सत्यनारायणाच्या भक्तिभावाने करण्याची गोष्ट आहे त्यामुळे नवरा बायकोच्या भूमिका खऱ्या आयुष्यातील नवरा-बायको यांनीच कराव्या.
१०. सर्व स्त्रीपात्रांनी भरजरी कपडे घालावे व भरपूर रंग फासावा जेणेकरून प्रेक्षकांना दृष्टीसुख लाभेल.
११. घरात वावरणाऱ्या पुरुष पात्राचा पोशाख 'गुढग्याखाली लोंबणारा झब्बा' असाच असावा.
१२. 'नाटकात कोणत्याही पात्राने प्रेक्षकांना क्षणभरही पाठ दाखवणे हा अक्ष्यम्य गुन्हा आहे ' या एकाच गोष्टीवर जगात दुमत संभवत नाही.
१३. पात्राने stage वरून, प्रेक्षकांतील आपल्या ओळखीच्या माणसाला हात करणे व क्वचित त्याच्याशी hi - hello करण्याने नाट्यरसाचा भंग होत नाही तर प्रेक्षकांशी जवळीक साधली जाते.
१४. नाटकात (चुकून) प्रेमप्रसंग असल्यास पात्रांनी एकमेकांपासून सुमारे ४ फूट लांब उभे रहावे.
१५. नाटकात फोनवरील संभाषण असणे बंधनकारक आहे.
१६. तालमी दरवेळी वेगळ्या जागी कराव्यात . प्रयोगाचा दिवस वगळता पात्रांनी आपले पाय एरवी stage ला लागणार नाहीत याची काळजी घ्यावी.
१७. stage वर, नेपथ्यातील पोकळी भरून काढण्यासाठी fake plants ठेवावीत व घराला बागेचे स्वरूप द्यावे.
१८. stage वर २ हून अधिक पात्रे असल्यास त्यांनी आगगाडीचे डबे असतात तसे एका रेषेत उभे रहावे.
१९. ३० मिनिटाच्या नाटकानंतर १७ मिनिटांचा पात्रपरिचय, कौतुक- आभार प्रदर्शन समारंभ असावा.
२०. stage वरील पात्रांनी एकमेकांशी बोलताना एक डोळा ज्याच्याशी बोलतो त्याकडे व दुसरा डोळा प्रेक्षकांकडे ठेवावा.
२१. ५ लोकांनी ८ पात्रांचे संवाद कधी चालत, उभे राहत किंवा कधी बसून वाचणे यास तालीम असे म्हणतात.
२२. आधीचे पात्र बोलताना चुकले तर प्रसंगावधान दाखवून नाटक सावरू नये. ज्याची चूक त्याच्या पदरात तिथल्यातिथे टाकावी.
२३. stage हे नाटक करण्याची नव्हे तर लिहीण्याची जागा आहे असे समजून मनाचे संवाद म्हणावेत.
२४. ३० मिनिटांच्या नाटकाला 'एकांकिका' असे म्हणतात.
२५. stage वर जे घडत असते त्याला 'एक धमाल विनोदी एकांकिका' असे म्हणतात.
२६. stage वरची 'एक धमाल विनोदी एकांकिका' पडद्यामागे 'एक गहन शोकांतिका' असते.
२७ . नाटक बसवण्याचे ठरवल्यावर ते सादर करेपर्यन्त जे काही घडते ते प्रत्यक्ष नाटकापेक्षा जास्त नाटयपूर्ण असते.
२८. गावाकडे मृत व्यक्तीच्या नावाने तेराव्याचे गावभोजन घालतात त्याप्रमाणे नाटक उरकल्यावर एक potluck घालावे.
२९. तालमीत, कोणत्याही अस्सल नाटकवाल्याप्रमाणे आपणच केलेल्या जुन्या नाटकांच्या गोष्टी चघळत रहाव्या.
३०. ३ खुर्च्यांवर एखादी चादर पसरली की नाटकातला सोफा होतो.
३१. सगळीच्या सगळी पात्रे एखाद्या तालमींसाठी उपस्थित आहेत अशी नामुष्कीची अवस्था येऊ देऊ नये.
३२. पार्श्वसंगीत किंवा काही खास नेपथ्य फक्त प्रयोगाच्या वेळेसच उपलब्ध करावे.
३३.पात्रांनी आपले संवाद, स्वगत म्हणत असल्यासारखे वा भाषण दिल्यासारखे mike च्या समोर येउन म्हणावेत.
३४. stage वर center table हे सर्वात मुख्य पात्र आहे. त्यावर माईक, चहाचे कप, मासिके इत्यादी ठेवता येते. सर्व घटना center table च्या भोवती घडतात.
३५ . center table मुळे पात्रांना फारसे फिरता येत नाही व माईकपासून पात्रे लांब जाण्याचा धोका टळतो.
३६. साधारण ३ वाक्ये उभ्या-उभ्या आणि ३ वाक्ये बसून बोलणे हा क्रम ठेवावा.
३७. नाटक कौटुंबिक असल्यास सासू - सून किंवा नवरा - बायको यांनी संवादांचे table - tennis खेळणे बंधनकारक आहे.
३८. नाटक फक्त कौटुंबिक असावे.
३९. नाटकाला दिग्दर्शक नसावा.
४०. जी मराठी मंडळाची कार्यकारिणी ( तुम्ही तिच्यात नसल्यास) नाटक करीत नाही ती टाकाऊ समजावी.
४१. नाटक जेवणानंतर सादर करावे.
४१ अ - रिकाम्या पोटी प्रेक्षकांना झोडपणे बरे नव्हे.
४१ ब - नाटक बघण्याची सक्ती करणे बरे नव्हे.
४२. १९८० - १९८५ नंतर लिहिलेले नाटक करण्यास अलिखित बंदी समजावी
४३. नाटकात stage वर संपूर्ण उजेड किंवा संपूर्ण काळोख अशा २ प्रकारचीच प्रकाशयोजना वापरावी.
४४. stage ला पडदा असण्याची व तो न अडकता उघडण्याची अल्पशी शक्यता गृहीत धरून आपापल्या जागा पडदा उघडण्यापूर्वी पकडण्यास हरकत नाही.
४५. नैसर्गिक अभिनय म्हणजे पात्राच्या नव्हे तर आपल्या स्वत:च्या नेहमीच्या शैलीत बोलणे.
४६. नाटकाची CD करून garage मध्ये अडीनडीला सहज सापडेल अशी अडगळीच्या खोक्यात पाठी ठेऊन द्यावी.
४७. नाटकाच्या script च्या साधारण पात्रसंख्या गुणिले ६, इतक्या प्रती संपूर्ण नाटक बसवण्याच्या काळात काढल्या जातात.
४८. ३० मिनिटाच्या नाटकात किमान २ वेळा कपडे ( stage वर नव्हे तर stage च्या पाठी) बदलण्याचे प्रसंग घालणे बंधनकारक आहे.
४९. जगातील कोणताही कौटुंबिक घोळ, गैरसमज आणि त्याची उकल ३० मिनीटांत होऊ शकते तस्मात ३० मिनिटांच्या आत नाटक संपणे बंधनकारक आहे.
५०. अर्धवट तालीम आणि सुमार संहिता घेऊन हौशी नाटके करण्यास काहीही हरकत नसावी. अनेक व्यावसायिक नाटकेही अशीच बेतलेली असतात.
५१ . अमेरिकेतील नाटकवाल्यांसाठी उरलेली ५० विचार- मौक्तिके वाचण्यासाठी तसेच अमेरिकेतील रहिवाश्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आमची खालील विषयांवरील विचार-मौक्तिके (मूल्य प्रत्येकी $9. 9 9 फक्त ) उपलब्ध आहेत. गरजूंनी त्यांचा लाभ अवश्य घ्यावा -
१. अमेरीकेतील खरेदी - सुगृहीणीसाठी
२. अमेरिकेत घर घेणे, बदलणे आणि घरातील दुरुस्ती - दाम्पत्यसुखासाठी
३. अमेरिकेतील स्वैपाक - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
४. अमेरिकेत मुलांचे व मुलींचे संवर्धन - सर्वांसाठी
५. अमेरिकेतील मराठी मंडळांचे कार्य - मराठी मंडळांसाठी
६. अमेरीकेतील हिंदू सण आणि रिवाज - सुगृहीणीसाठी व तिच्या नवऱ्यासाठी
७. अमेरिकेतील नाटके - नाटकवाल्यांसाठी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप , "देसी लोकही नाटक करताना इतके बेशिस्त आणि ढिसाळच का वागतात देशात असल्यासारखे?" - हे नाटका च्याच बाबतीत होतं असं नाहीये. कुठेही देसी लोकं एकत्र आले की त्याच पद्धतीनं वागतात. मला तर ती युनायटेड ची न्यूयॉर्क - मुंबई फ्लाईट, मुंबई जवळ यायला लागली, की गोरखपूर-दादर एक्स्प्रेस चा फील यायला लागतो. ते एअरलाईन वाले, आपल्याशी असं तुसड्यासारखं वागताना पाहून राग येतो, पण आपल्या लोकांचा निगरगट्ट वागणं पाहिलं की त्यांची बाजूही दिसायला लागते आणी कान-कोंडल्यासारखं होतं.

भारी लिहिलंय. सोफ्यामागच्या प्रॉम्प्टरबद्दल कोणी लिहिलं की नाही अजून? >>>> +१११११११११

आम्ही एक नाटक केलं होतं त्यात कोर्टाचा सीन होता. न्यायाधीश झालेल्या व्यक्तीचे संवाद पाठ नव्हते. आधी काम करणारा वेगळा होता पण तो नाटकाच्या दोन दिवस आधी अचानक आजारी पडला. तेव्हा या नव्या माणसाला कसाबसा तयार केला. न्यायाधीशाचे टेबल (high-rise desk, तीन बाजूंनी बंद) चांगलेच उंच होते आणि त्याला नाटकभर केवळ त्याच्यामागे बसूनच बोलायचे होते. मग एक प्रॉम्प्टर आम्ही त्याच टेबलाच्या मागे दडवला, एक छोटं स्टूल घेऊन तो तिथेच खाली बसला आणि जवळजवळ प्रत्येक संवादाच्या आधी तो प्रॉम्प्टर ती लाईन त्या न्यायाधीशाला सांगायचा आणि मग न्यायाधीशमहाराज ती बोलायचे Happy आमची ही ट्रिक कोणाच्याच लक्षात आली नाही आणि नाटक निर्विघ्नपणे पार पडले! फक्त दोन दिवसांत मस्त पाठांतर केल्याबद्दल नवीन न्यायाधीशाचं बरंच कौतुक लोक करत होते Happy Happy

"नाही तुलनेने बाकीच्या कार्यक्रमांच्यात व्यवस्था वगैरेंमधे शिस्त जाणवते." - तुलनेचा बेसच हा असेल, तर नक्कीच जाणवते Happy

generally speaking, I agree with you, though.

एका नाटकात हिरो पुढे आला की मी टेबलावरचा सुरा उचलून खुपसायला धावते असं होतं. मी टेबलाशी नसतानाच तो पुढे आला चुकून. काय करावं ते कळेना. मग मी म्हटलं.
"आहेस तिथेच थांब. हो मागे, मागे हो म्हटलं ना." तो घाबरुन मागे झाला. मग मी टेबलापाशी गेले आणि म्हटलं,
"हं बोल आता." मग तो पुन्हा पुढे धावत आला आणि मी सुरा खुपसला Happy

आमच्या एका रेकॉर्डेड स्किटमधे गोळी उडून माणूस मरायचा सीन होता. आमच्या माणसाला मरायची घाई झाली होती त्यामुळे तो आधीच मेला. मग गोळी 'वाजली' तेव्हा तो उठून उभा राह्यला आणि परत गोळी लागल्यासारखा अभिनय करून मरून पडला. कमी पडायला नको ना.. Proud

यातली दुसरी गंमत म्हणजे गोळी मारणारी मी होते. मी नुसती बंदूक रोखल्यावरच तो मेला. तर मी चकीत. आता हा मेलाच त्यामुळे आता ’वाजल्यावर’ गोळी मारण्यात काही अर्थ नाही म्हणून मी तिकडे वाजले तरी गोळी मारली नाही. इकडे याचा मृतावस्थेतून अचानक आठवल्यासारखं जिवंत होऊन गोळी खाऊन मरण्याचा अभिनय...
मैने तो गोली मारीही नही! Proud

सोफ्यामागच्या प्रॉम्प्टरबद्दल कोणी लिहिलं की नाही अजून? >>> मी लिहिलं आहे. त्याचे आवाज पहिल्या दोन रांगेत ऐकु जावेत असाच तो बाप्या / बाई असते.

विंगेतल्या प्रॉम्प्टरचं नटाला ऐकू न आल्याने त्याने स्टेजवरूनच विंगेत बघून 'आँ?' असे विचारल्याचे पाह्यलेत का कधी? >>> Lol

भन्नाट आहेत नंतरच्या अ‍ॅडिशन्स सुद्धा

पुलंच्या 'नाटक कसे बसवतात' ची आठवण झाली.

तसेच स्टेज व प्रेक्षक असे कन्वेन्शनल पद्धतीने सादर न करता इतर पद्धतीने करतात त्याबद्दलही असे वाचायल आवडेल Happy

Pages