स्वित्झर्लंड भाग ६ - युफ !

Submitted by kulu on 12 March, 2015 - 04:02

आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991

पहिल्यांदा जेव्हा भारतातुन स्वित्झर्लंडला गेलो तेव्हा विमानात स्विस एअर ने एक माहितीपट दाखवला होता. प्रचंड आवडला होता तो मला. त्यात युरोपातलं सगळ्यात उंचावरचं आणि कायम लोकवस्ती असलेलं एक गाव दाखवलं होतं. तर ते माझ्या डोक्यात असं फिट्ट झालं होतं की, मी मार्थाच्या पाठीमागे सारखे टुमणे लावले होते की मला त्या गावी जायचंय. मी स्वतःहुन उत्साह दाखवल्याने तिने डबल उत्साहाने प्लॅन बनवुन दिला. जागा लांब होती. पहाटे ६ ला घरातुन बाहेर पडलो.............. "युफ" च्या दिशेने!

आधी झुरीक पर्यंत ट्रेन, मग पुन्हा कुर पर्यंत रीजनल ट्रेन, तिथुन अन्डीर पर्यंत पोस्ट ऑटो आणि तिथुन युफ पर्यंत अल्पाईन पोस्ट ऑटो असा साडेचार तासांचा प्रवास! पण प्रवासाचा शीण म्हणुन जाणवतच नाही स्वित्झर्लंड मध्ये. आजुबाजुचा निसर्ग तुम्हाला फ्रेशच ठेवतो नेहमी! आणि एकुन प्रवासातदेखील किशोरीताई, कुमार गंधर्व, निखिलदा अशी माणसे बरोबर असली म्हणजे तर बोलायलाच नको!
कुर पासुन पुढे जे आल्प्स च्या कुशीत शिरलो ते पुन्हा माघारी येतानाच कुस सोडली. आपल्या हिमालयाला लगटुन जशा छोट्या पर्वतरांगा आहेत तसंच आल्प्सच्याही!

अंडीर ला पोहोचलो तेव्हा पावणे दहा वाजले होते. समोर दिसतंय ते अंडीर मधले एकमेव हॉटेल आणि त्याच्याच पार्कींग प्लेस मध्ये बसचा स्टॉप!

बसमध्ये आम्ही मोजुन १० जण! त्यात पण मी २५ च्या आतला एकटाच आणि उरलेले सर्व ६० च्यापुढचे (त्यांची वये पुढे बोलताना लक्ष्यात आली, मी लोकांना वये विचारीत फिरतो असा समज करुन घेऊ नये!) त्याना माझ्या येण्याचं फार कौतुक वाटत होतं. हल्ली तरुण मुलांना असं निसर्गसौंदर्य बघायला नको असतं, नुसतं दारु ढोसायला मित्रांबरोबर बार मध्ये जायला पहिजे वगैरे तक्रारी सुरु होत्या. पण ते जे बोलत होते त्यात अतिशयोक्ती खचितच नव्हती! तरुणांची गर्दी फार-फार तर स्कीईंगला वगैरे, पण बाकीच्या ठिकाणी सगळं म्हातार्‍यांचं पेव फुटलेलं असायचं!
युफला जायचा प्रवास भलताच रोमांचक ! अरुंद रस्ते, त्यात आमची महाकाय पोस्ट ऑटो! पण ड्रायव्हर्स भलतेच चतुर. खिंड वाटावी, जिथुन कार सुद्धा जाईल की नाही शंका यावी अशा ठिकाणाहुन हे ड्रायव्हर्स पोस्ट ऑटो मात्र अगदी अलगत नेत होते. अधी पण मी म्हटलंय आणि आता पण म्हणतो, की पोस्ट ऑटो सारखा सुखाचा प्रवास नाही!
ला पोहोचलो. २००० मीटर च्याही वर असलेल्या या गावाची लोकवस्ती अवघी २४. एखाद्या पाटलाच्या वाड्यावर देखील यापेक्षा जास्त माणसे असतात! पण त्या तेवढ्याशा गावासाठी रोज नियमित पब्लिक ट्रान्स्पोर्ट, त्यांचं वेगळं पोस्ट ऑफीस! त्या शेवटच्या स्टॉपला उतरणारे आम्ही चौघेच!

एवढ्या वर उंचीवर झाडं नव्हतीच. फक्त कुरण होतं!

हे तिथलं टिपिकल घर! घराला छप्पर म्हणुन आल्प्स मध्ये सापडणार्‍या चुन्याच्या फरशा! घर उबदार राहतात शिवाय बर्फाच्या ओझ्याने छप्पर कोसळण्याची भिती नाही!

हे फोटोत दिसतय तेव्हढंच ते युफ गाव!

त्या तेवढ्या गावाला पण स्वतःची युफगंगा होतीच!

आजुबाजुला पाहण्यासारखा निसर्ग विखुरलेला होता. खुप.

माझं एकंदर असं मत आहे की एखाद्या जागेशी, किंवा निसर्गशिल्पाशी रिलेटेड जेवढ्या लोककथा आपल्याकडे, विशेषतः अशिया मध्ये आहेत तेव्हढ्या त्या पश्चिमात्त्यांमध्ये नाहीत. एकदा मीना प्रभुंशी बोलताना पण त्यांचे देखिल हेच मत पडल्याचे याद आहे! आता हे समोरचे तीन डोंगर बघा, त्याना काही तरी कोरडी नावे आहेत , आपल्याकडे याच्याशी रीलेटेड काहीतरी झालंच असतो, शंकराने शाप देऊन शिळा झालेले तीन राक्षस, किंवा राजकुमारची वाट पाहत असलेल्या तीन सख्या, ब्रम्हदेवाची तीन तोंडे वगैरे!

या सगळ्यातुन मध्येच एकच पायवाट दिसली, मी लगेच त्या वाटेला माझे पाय लावले!

माझ्यानंतर चार अजुन पाय त्या वाटेला लागले!

कुठेही जा हे तिघे काही पाठ सोडत नव्हते.

\

आकाशात एखादा ढगाचा पुंजका वेड लावत होता!

हा बकरे-निवास........बकर्‍यांसाठी!

आणि ज्याप्रमाणे काही खडुस म्हातार्‍या सकाळी मॉर्निंग वॉकला जातो असे म्हणुन बाहेर पडतात आणि आणि स्वतःच्या अंगणतली फुले सोडुन दुसर्‍यांच्या झाडांची फुले ओरबाडतात, त्याप्रमाणे बकरे-निवासाच्या मालकीच्या कुरणावर चरणारी ही गाय!

युफगंगेला समांतर अशी पायवाट होती!

धोपट मार्गा सोडुन मी जरा वर आलो

वाटेत दिसलेले हे पफ फंगस. हे म्हणजे काय हे पहायचे असल्यास डेव्हिड्भाऊ अटेंबरो यांची सिक्रेट लाईफ ऑफ प्लॅन्ट्स पाहणे!

शांताबाईंची आठवण करुन देणारे हे गवतफुल!

हा संगमरवरासारखा दिसणारा क्षार स्फटिकाचा खडक!

मॉस आणि धोंडफुल

जोराची भुक लागली होती. युफगंगेच्या काठावर आलो. तिथेच एक मोठा खडक बघुन जेवायला बसलो!
फोटोत जिथे माझी बॅग दिसतेय तिथे!

हा युफगंगेचा पुल!

हा तिथे उंदरासारखा दिसणारा खडक मिळाला! जो मी तिथेच ठेऊन आलो!

युफगंगेने सगळ्या दगडांना चांगले "वळण" लावले आहे!

मग मात्र बराच वेळ तिथे बसुन राहिलो. शांत! शांततेचा आवाज फार मधुर असतो! बाहेरची शांतता आपोआपच मनात झिरपत जाते. मन निर्विकार! एकही तरंग मनाच्या पटलावर उमटत नव्हता! मनाचे शुद्धीकरण सुरु होते! कित्ती वेळ तसा बसुन होतो काय माहीत. ऊन सावलीचा खेळ चालुच होता.

कसला तरी आवाज आला म्हणुन वळुन बघितलं तर पोस्ट ऑटो आली होती न्यायला,
जायची ईच्छा नव्हती! युफने लळा लावला, कुणाला तरी पुन्हा येतो असं सांगायची ईच्छा होती. कुणाकुणाला सांगु. शेवटी या मिसेस बकरेंनाच निरोपाचे चार शब्द सांगितले!

जाता युफची कुरणं पुन्हा नजरेत भरुन घेतली

घरी पोहोचायला वेळ झाला. रात्री मार्थाने रोष्टी करुनच ठेवली होती. खाल्ली आणि युफ ची स्वप्ने डोळ्यात साठवत झोपी गेलो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते एकमेव असलेल हॉटेल पण किती मस्त आहे .. मेन्टेन केलेल एकदम..

क्षार स्फटिकाचा खडक .. अस वाटतय वितळण्याच्या मार्गावर असलेला बर्फ आहे कि काय ..

मॉस आणि धोंडफुल पन आवडल.. इकड छपाई न केलेल्या भिंतीवर जे दाट शेवाळ येत ना त्याचा थोरला भाऊ वाटतोय ते Happy

बकरे-निवासाच्या मालकीच्या कुरणावर चरणारी ही गाय! >> त्यात ते उन्ह-सावली चे शेड्स काय दिसताय .. क्लास

हि इथली कुरण इतकी खुरटी कशी राहतात ? ..हमेशा ट्रिम केलेली मशीन ने.. हा सर्व भागातील प्रचि पाहिल्यानंतर पडलेला एक भाबडा प्रश्न Uhoh

टीना, दाद, अरुंधती धन्यवाद Happy

हि इथली कुरण इतकी खुरटी कशी राहतात ? ..हमेशा ट्रिम केलेली मशीन ने.. हा सर्व भागातील प्रचि पाहिल्यानंतर पडलेला एक भाबडा प्रश्न अ ओ, आता काय करायचं>>>>>>>>>>> टीना हे गवत इतक्या हाय अल्टीट्युड ला उगवतं, अतिथंड प्रदेश आणि बाष्पाची कमी यामुळे हे गवत खुरटेच येते , ते ही उन्हाळ्यात. आणि सतत गायी चरत असल्याने लेव्हल सेम राहते! Happy

Pages