समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र

Submitted by स्वीट टॉकर on 10 March, 2015 - 06:17

माझी सुट्टी संपून बोटीवर परत जायची वेळ जवळ येत चालली होती. तेव्हां मुलीला (पुनवला) तिच्या ट्रेनिंगमधून अनपेक्षितपणे पंधरा दिवसाची सुट्टी मिळाली. पत्नीचा (शुभदाचा)स्वतःचा व्यवसाय असल्यानं तिचं वेळापत्रक तिच्याच हातात होतं. शांत ठिकाणी एखादा आठवडा मजेत एकत्र घालवावा असं ठरवून एका लोकप्रिय कंपनीच्या ‘कोस्टल कर्नाटक’ च्या कन्डक्टेड टूरमध्ये सामील झालो. सगळे मिळून चाळीस जण असू.

अशा कन्डक्टेड टूर्सबद्दल थोडसं. याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. कोणी म्हणतं शाळेच्या ट्रिपप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तुम्हाला पळवत पळवत आहे नाही ते सगळं दाखवतात. दमछाक होते, तर कोणी म्हणतं इतकं बघायला असताना मधेच एक पूर्ण दिवस शॉपिंगसाठी फुकट घालवतात. यात काही तथ्य असो वा नसो, एक गोष्ट मात्र निश्चित. आपल्यासारखेच लोक आपल्या बरोबर असतात, कोणालाही काम नसतं आणि वेळेचं बंधनही. आपला स्वभाव बोलका असेल तर उत्तम ओळखी होतात. गप्पांना ऊत येतो. ट्रिप संपवून परत येतो तोपर्यंत ताजेतवाने झालेलो असतो.

पावसाळा नुकताच संपला होता. चोहीकडे गर्द हिरवंगार. जणु धरतीमातेने हिरवा शालू ल्याला होता वगैरे वगैरे. मात्र ही गोष्ट तिकडच्या सृष्टिसौंदर्याबद्दलची नाही. आम्हाला तिथे आलेल्या एका अनुभवाची आहे.

ठिकाणाचं नाव मुरडेश्वर. इथे समुद्रातली जागा रिक्लेम करून एक शंकराची महाकाय मूर्ती (सव्वाशे फूट उंच), समोरच गोपुर (दोनशे फूट उंच) आणि या दोनच्या मध्ये महाभारतातील देखावे बनवले आहेत. त्यामुळे सुरेख पर्यटनस्थळ झालं आहे. मागे समुद्र असल्यामुळे शंकराच्या पार्श्वभूमीत फक्त निळंशार आकाश असतं. मूर्ती फारच अफलातून impressive दिसते. (गूगल मॅप्स मध्ये ‘मुरडेश्वर टेंपल' टाकलं की छान बघायला मिळतं. सॅटलाइट इमेज मध्ये शंकराच्या मूर्तीच्या बरोब्बर उत्तरेला समुद्रकिनारी जी लांब इमारत दिसते ते आमचं गेस्ट हाऊस.)

रोज जरी हवा थंड असली तरी त्या दिवशी मात्र दिवसभर भयानक उकडत होतं. वारा औषधालाही नव्हता. रात्री जेवणखाण आटपल्यावर समुद्रकिनारीच कट्टा जमला. होताहोता बारा वाजले. उद्याकरता देखील काही गप्पा शिल्लक ठेवल्या पाहिजेत असा ठराव करून आपापल्या खोल्यांकडे पांगलो.

आमचं बसकं गेस्ट हाऊसदेखील रीक्लेम केलेल्या जागेत. इमारतीला लागूनच समुद्र. लाटांच्या आवाजाचं पार्श्वसंगीत सदासर्वकाळ चालू. कल्पनातीत सुरेख वातावरण. नवं कोरं गेस्ट हाउस बांधून झालं होतं पण छोटीमोठी कामं राहिली होती. गेस्ट हाऊसची रचना अगदी साधी. एकमेकाला लागून आठ-दहा खोल्या सरळसोट पूर्व पश्चिम रेषेंत. उत्त्तरेकडे लांबच लांब व्हरांडा. पायर्‍या चढून आलं की या व्हरांड्यावर पूर्वेच्या टोकानी प्रवेश व्हायचा. त्यालगतच्या खोलीला पहिली खोली म्हणूया. पश्चिम टोकाची शेवटची खोली. तिथे हा व्हरांडा संपत नव्हता. नकाशात दाखवल्याप्रमाणे तो दोनदा डावीकडे वळला होता. या लांबलचक व्हरांड्याला मोठा, मधल्याला मधला आणि शेवटच्याला छोटा व्हरांडा म्हणूया. छोटा व्हरांडा अगदीच कुणकुडा. सहा फूट बाय पाच फूट. शेवटची खोली आमची होती. म्हणजे आमच्या खोलीला तीन व्हरांडे. मात्र खाजगी एकही नाही.

guesthouse layout doc.doc (30.5 KB)

व्हरांड्यासहित सर्वत्र उत्तम प्रतीच्या फिक्या बदामी टाइल्स. हल्ली घराघरांत खूपच लोकप्रिय झालेल्या. ओल्या झाल्या की मात्र भयंकर घसरड्या.

खोलीत आलो तर सगळ्या भिंती, जमीन, गाद्या एखाद्या भट्टीत ठेवल्यासारख्या गरमागरम झाल्या होत्या. एअर कंडिशनर लावण्यासाठी मालकानं आयताकृती भोकं करून ठेवलेली होती. पण अजून ए.सी. लावले नसल्याकारणानं प्लायवुड मारून बंद केलेली. हॉटेलमधल्या गाद्या म्हणजे वजनदार गादोबाच असतात. दिवसभराची उष्णता त्यांनी साठवून ठेवली होती ती आमच्या सर्वांगाला पोटीस सारखा शेक देण्यासाठीच ! पंखा गरागरा गरम वारा ढकलंत होता. प्लायवुड वाकुल्या दाखवंत होतं. आमची चिडचिड व्हायला लागली.

आम्ही तिघांनीही व्हरांड्यात झोपायचं ठरवलं. जो काही थोडा वारा होता तो समुद्राकडून येत होता. त्यामुळे मोठ्या आणि मधल्या व्हरांड्यात काहीच लागत नव्हता. छोट्या व्हरांड्यात नावापुरता का होईना, होता तरी. बर्यापैकी अंगमेहनत करून दोन गादोबा छोट्या व्हरांड्यात ओढत ओढत आणून टाकले. व्हरांड्याच्या अडीच फूट उंचीच्या भिंतीमुळे गादीवर वारा लागत नव्हता. मग एका पलंगपोसाला नाड्या आणि गाठी मारून शीड बनवलं आणि होता नव्हता तो वारा खाली वळवला. छोट्या व्हरांड्यात ह्या दोघी आणि मधल्या व्हरांड्यात मी असे आडवे झालो. दहा मिनिटात बरं वाटलं. वाराही बरा वाहायला लागला होता. चिडचिड पूर्ण नाहिशी झाली.

डोळा लागतो न लागतो तोच शुभदानी रिपोर्ट केलं. “पाऊस सुरू झाला रे !” पाऊस म्हणजे काय, नुसते शिंतोडे होते. मी झोपेचं सोंग घेतलं. त्या दोघींचं डोकं समुद्राकडे होतं, पाय खोलीकडे. त्यांनी फक्त झोपण्याची दिशा बदलली. डोकं खोलीकडे केलं, पायावर पांघरूण घेतलं. गाद्या पांघरुणं ओली झाली तरी उद्या वाळतील असा विचार करून झोपल्या.

वारा वाढलाच होता. आता पावसाची सर आली. दोघी धडपडतच उठल्या. आता माझं झोपेचं सोंग चालू ठेवण्यात काहीच हशील नव्हता. तिघांचा एक झटपट परिसंवाद झाला. आमच्यातला कोणीही एकदा सांगून ऐकणार्‍यातला नसल्यामुळे खोलीच्या आत जाऊन झोपावं हा विचार मनाला शिवला देखील नाही.

भराभरा छोट्या व्हरांड्यातल्या गाद्या ओढत, ढकलत मधल्या व्हरांड्यात आणल्या. पाऊस जरी वाढला तरी कुठेपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेऊन व्यवस्थित घातल्या आणि आडवे झालो. विजा चांगल्याच चमकायला लागल्या होत्या. आम्हाला पडल्यापडल्या या गोपुराचे वरचे दोन मजले दिसत होते. चंद्र ढगांनी पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे गुडुप अंधार होता. मात्र वीज चमकली की गोपुर दिवसासारखं लख्खं दिसायचं आणि क्षणार्धात नाहिसं व्हायचं.

तिघंही खूष होतो. मनाला शांत करणारा लाटांचा आवाज, मंद वारा, झाडांची सळसळ, ऐकू येणारा पण आपल्याला ओला न करणारा पाऊस अशा साध्या साध्या गोष्टींचं अप्रूप वाटणं, तशीच आवड असलेले आपले कुटुंबीय आपल्या बरोबर असणं. आणि उद्या, परवा, तेरवा काहीही काम नसणं. अहाहा ! स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच !

गप्पा मारता मारता गाढ झोप लागली.

अचानक भन्नाट वारा सुटला. वेडावाकडा पाऊस सुया टोचाव्या तसा चेहर्‍यावर लागायला लागला. झाडांची सळसळ नाहिशी होऊन काडकाड फांद्या तुटल्याचे आवाज, विजेचा गडगडाट आणि लखलखाट !

आणखी एक गोष्ट झाली म्हणजे दिवे गेले. या बाबतीत महाराष्ट्र आणि कर्नाटक भाईभाई.

आमची एकच धांदल उडाली. आम्ही गाद्या अशा टाकल्या होत्या की आता खोलीचं दार उघडता येईना. भसाभसा गाद्या बाजूला ओढल्या. मिट्ट काळोखांत पावसाच्या मार्‍यात अनोळखी कुलुप तितक्याच अनोळखी किल्लीनी उघडण्याच्या धडपडीचा आनंद घेतल्याशिवाय समजायचा नाही.

गाद्या खोलीत ओढल्या. आमच्या खोलीच्या तिन्ही बाजूच्या खिडक्या उघड्या होत्या आणि आता धाडधाड आपटत होत्या. त्यातून बदाबदा पाणी आत येत होतं. वादळानी रौद्र स्वरूप धारण केलं होतं. बाहेर वारा गोळा करायला लावलेल्या पलंगपोसानी आपली दावणं तोडून कधीच टेक ऑफ घेतला होता. खिडकीत वाळत टाकलेले, आणि क्षणभरापूर्वी कुरकुरीत कोरडे असलेले कपडे ओलेचिंब झाले होते.

अशा क्षणार्धात येणार्‍या वादळाला ‘स्क्वॉल’ म्हणतात. ते जितकं अचानक येतं तितकंच अकस्मात नाहिसं देखील होतं. तसंच झालं. अचानक वारा पडला, पाऊसही अगदी कमी होऊन रिपरिपायला लागला. वीज चमकणं ही कमी झालं. आम्ही खोलीतच आडवे झालो. मात्र आता पंखा नव्हता! भयानक उकडायला लागलं. त्यात आता डासांनी कडाडून हल्ला चढवला. पांघरूण अंगावर सहन होत नव्हतं. मात्र दूर करायची छातीच होत नव्हती. मलेरिया अन् डेंगीचे अहेर नको होते.

ह्यात मुलगी पुनव डाराडूर झोपून गेली. तिच्या अंगावर पातळ पांघरलं. मी आणि शुभदा मात्र हाशहुश करत झोपेची वाट पहात पडलो होतो. डासांचं म्यूझिक सुरूच होतं.

शुभदानी प्रसंगाला योग्य एक कविता मला म्हणून दाखवली.

मच्छरने कहा इन्सान से, ना मारो हमे जान से
जंग छिड जाएगी, दुश्मनी बढ जाएगी,
अगर तुममें जुनून है, तो हमारी रगोंमें तुम्हारा ही खून है !

असे बळेबळेच काव्य शास्त्र विनोदेन दोन तास गेले. झोपेचं नाव नाही ! पहाटेचे चार वाजले. मी सहज दार उघडून बाहेर गेलो अन् लक्षात आलं की आतल्या अन् बाहेरच्या तापमानात जमीन अस्मानाचं अंतर आहे. उकाड्याचं नाव देखील नाही. मात्र जमिनीवर पाणीच पाणी! ‘आता काहीही झालं तरी बाहेरच झोपायचं’ असं आम्ही दोघांनी ठरवलं. खोलीतल्या दोन खुर्च्या बाहेर आणल्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे छोट्या वरांड्यात भिंतीला टेकून मांडल्या. त्यावर बसलो, जमिनीवर पाणी असल्यामुळे पाय वर घेतले, गुढगे छातीशी घेऊन मुटकुळं केलं, एक एक पलंगपोस अंगाभोवती गुंडाळले, फक्त श्वास घ्यायला नाकासमोर फट ठेवली, मनातल्या मनात डासांना मधलं बोट दाखवलं, भिंतीला डोकं टेकलं न टेकलं, क्षणात गाढ झोपलो ! अहाहा! बॅक टु स्वर्ग!

अर्धा पाऊण तास झाला असेल. मी दचकून जागा झालो. जागा झालो म्हणण्यापेक्षा उडालोच! शुभदा जिवाच्या आकांतानी किंचाळली होती! जाग्रणानंतर जी झोप लागते त्यातून जर आपण ताडकन उठलो की थोडा वेळ भ्रमिष्ट व्हायला होतं. मी कुठे आहे? इथे काय करतोय? क्षणभर काहीच समजत नाही. तशी माझी अवस्था झाली. मात्र जाग येताच मला एका भयानक सत्याची जाणीव झाली अन् माझ्या पोटात भसकन् गोळाच आला! ज्या किंचाळीनी मी जागा झालो होतो ती अगदी जवळून आली होती. मात्र ती शुभदाची नव्हतीच!

आम्ही खांद्याला खांदा लावून बसलेलो होतो. शुभदानी माझं डावं मनगट तिच्या उजव्या हातानी इतकं घट्ट आवळलं होतं की मला दोरखंडानी बांधल्यासारखं वाटत होतं. दोघेही अनोळखी प्रदेशात संपूर्णपणे असुरक्षित अशा जागी झोपलो होतो. आता आपल्या अगदी जवळ काहीतरी अमानुष आहे, आणि या धोक्याची जाणीव शुभदाला देखील झाली आहे. काय असेल? चौफेर गुडुप्प अंधार आणि भयाण शांतता! तोंडाला कोरड पडली होती. छाती थाड थाड उडत होती. काही सेकंद असेच गेले. समोर चार फुटांवर कठडा होता. त्यापलीकडे झाडांची अत्यंत अस्पष्ट आउटलाइन दिसत होती.

अजून शुभदाच्या हाताची पकड तशीच कायम होती. मी डोकं न हलवता डोळे फाडफाडून चौफेर बघण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांना काही दिसंत नव्हतं पण मनाला मात्र नको नको ते दिसायला लागलं! झाडांची साधी सळसळ म्हणजे चित्रविचित्र हातवारे वाटायला लागले. आपण सगळे प्रकाशाची बाळं आहोत. अंधारात पूर्णपणे असहाय्य. आणि अज्ञात धोक्यासारखा दुसरा धोका नाही. आता काय होणार? हल्ला? कोणाचा? कशाचा? हिंस्र प्राण्याचा? याक्षणी तो अगदी जवळून आपल्याला न्याहाळतो आहे? अचानक आपल्या मानेत दात घुसणार? का नखं?

मग पुनवला कोण? ती सुरक्षित असेल ना? हो. मी स्वतःच कुलुप लावलं होतं.

हिंस्र प्राणी हल्ला करण्याआधी कधीच warning देत नाहीत. म्हणजे प्राणी नाही. भुतांवर माझा विश्वास नाही. मग काय असेल? गुन्हा घडला असेल? आता एकदम शांत कसं? Murder?

जिम कॉर्बेट (नरभक्षक वाघांचा शिकारी) हे माझं दैवत. जंगलातल्या किर्र अंधारात डोळे मिटून कानानी धोक्याची दिशा तुम्ही ओळखू शकता असं त्याचं म्हणणं. मी बळेबळेच डोळे बंद केले पण बंद ठेववेनात. भीतीमुळे logical विचार करणं शक्यच होत नव्हतं. मी जर हात लांब केला तर तिला स्पर्श होईल इतक्या जवळ एक दुष्टशक्ती आहे आणि ती माझ्याकडे टक लावून बघते आहे अशी मला खात्री होती.

मी अगदी सावकाश उजवा हात सरकवत सरकवत शुभदाच्या हातावर ठेवला आणि दाबला. तिचा हात थरथरत होता. तो हळुहळु रिलॅक्स झाला. माझंही टेन्शन जरा कमी झालं.

भीती जरा मागे सरकली आणि logical विचारांना संधी मिळाली. भित्यापाठी ब्रह्मराक्षस! बहुदा मीच झोपेत किंचाळलो असणार आणि त्यामुळे गांगरून शुभदानी माझा हात धरला असणार असा साधा तर्क केला. काही अघटित घडायचं असतं तर आत्तापर्यंत झालं असतं. आमचे दोघांचेही पाय अजून पोटाशीच होते. एकदा पुनवकडे नजर टाकावी असा विचार करून पाय खाली ठेवण्यासाठी थोडा पुढे झुकलो.

नेमक्या याच क्षणी वीज चमकली.

क्षणभर लख्ख उजेड पडला अन् मला जे दृष्य दिसलं त्यानी माझं रक्तच गोठलं! मी आणि शुभदा एकाच क्षणी किंचाळलो!

एक बाई आमच्या पायापाशी बसली होती! वर मान करून आमच्याकडे पहात! डोळ्यात बेसुमार भीती! तिचं तोंड उघडं, चेहरा ओलाचिंब. सर्वांग थरथरत होतं. दोन्ही हातांनी स्वतःचीच मान धरली होती.

पुन्हा अंधार! भन्नाट वेगानी प्रश्न डोक्यात सुरू झाले. ही बाई इथे का? वेडी तर नाही? तिला इतकी कशाची भीती? मनुष्य? का श्वापद? का एखादा भीषण गुन्हा तिनी घडताना पाहिला आहे? आता तिघांनाही धोका आहे का?

पुन्हा वीज चमकली. बाई उठण्याची धडपड करत होती. शुभदा पटकन् सावरली. बाईंसमोर बसली. दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले. शुभदानी त्यांच्या खांद्यावर हात ठेवताच त्यांच्या तोंडून चित्रविचित्र अमानुशष आवाज यायला लागले आणि त्या रांगत रांगत दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागल्या. शुभदानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “श्शऽऽऽ. बाई शांत व्हा. खोल श्वास घ्या बघू.”

बाईंनी खोल श्वास घेतला की नाही मला माहीत नाही. मी मात्र घेतला.

लक्षात आलं की त्या आमच्याच ग्रुपमधल्या बाई आहेत. त्यांना धाप लागली होती. त्यांच्याच खोलीत काही अभद्र घडलंय की काय? शुभदा त्यांना जितकं शांत करण्याचा प्रयत्न करत होती तितक्याच त्या आमच्यापासून दूर रांगायचा प्रयत्न करंत होत्या. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. त्या काहीतरी सांगतील ही अपेक्षा ठेवून वेळ दवडण्यात शहाणपणा नव्हता. तिघांमध्ये पुरुष मी एकटाच असल्यामुळे शहानिशा करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय शॉकमधून माझ्याआधी शुभदा सावरली होती. स्कोअर १-० होता.

मधल्या व्हरांड्यात काही नव्हतं. मोठ्या व्हरांड्यात काहीतरी अघटित बघायला मिळणार असं माझं मन मला सांगत होतं. दुष्टशक्ती तिथेच असणार. लपंडाव खेळताना डोकावतात तसं कोपर्‍यापलिकडे फक्त एक डोळा बाहेर काढून त्या व्हरांड्यात बघावं का? अगदी नाकासमोरच काहीतरी उभं असलं तर? का खसकन् डोकं बाहेर काढून पलिकडे काय आहे ते बघून सटकन् मागे व्हावं? कोपर्यापर्यंत गेलो. पण पुढे जाण्याआधी खोलीत पुनव व्यवस्थित आहे ना हे बघावं असा विचार करून चार पावलं मागे आलो आणि आमच्या खिडकीला नाक लावून आत बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. मग कुलुपाला हात लावून ते व्यवस्थित आहे ना याची खात्री केली. माझ्या अगम्य हालचाली पाहून शुभदा काळजीत. तिनी त्या बाईंना सोडलं आणि माझ्यामागोमाग येऊन शेजारी उभी राहिली. “काही दिसतंय का?” असं कुजबुजली. मी ही कुजबुजत काहीतरी उत्तर दिलं. यात अर्धएक मिनिट गेलं असेल. आणि पुन्हा दोघेही एकाच क्षणी उडालो!

आम्हाला काही दिसलं होतं म्हणून नव्हे, तर आमच्या दोघांच्या मध्ये ‘हूंऽऽऽ‘ असा आवाज आला होता! भसकन् मागे वळून बघतो तर शुभदापाठोपाठ त्या बाई देखील आमच्या मागे येऊन अगदी जवळ उभ्या होत्या. आमच्या दोन डोक्यांच्या मधून त्या आम्ही काय पाहतो आहोत ते बघत होत्या!

गेल्या काही मिनिटात मी तीनदा दचकलो होतो! स्वतःचाच राग आला. मी मोठ्यानी “कोण आहे रे?” असं म्हणत लांब व्हरांड्यात पाउल टाकलं. कोणीच नव्हतं. प्रत्येक खोलीत डोकावत पुढे चालू लागलो. “फार पुढे जाऊ नको रे.” शुभदाचा काळजीग्रस्त स्वर. मला बरं वाटलं. व्हरांड्याच्या शेवटपर्यंत गेलो. खाली वाकून बघितलं. सामसूम. सायन्स फिक्शन चित्रपटांत असल्यासारखा भास झाला. वर्दळीची जागा. आमची येवढी ऍक्शन आणि आरडाओरडा चालला आहे, आणि आमच्या तिघांशिवाय काहीच हालचाल असू नये? त्या बाईंच्या खोलीकडे पाहिलं. बाहेरून कडी लावलेली होती.

परत आमच्या खोलीकडे आलो. बाई आता पूर्णपणे सावरल्या होत्या. त्यांनी हकीकत सांगितली. ती अशी.

“उकाडा अन् डासांमुळे मला अजिबात झोप येत नव्हती. हे मात्र डाराडूर! मी हैराण झाले. खोलीबाहेर आले. थोडा वेळ व्हरांड्यात उभी राहिले. त्या बाजूला वारा अजिबात नव्हता. म्हटलं जरा चालावं. मग लक्षांत आलं की व्हरांडा शेवटच्या खोलीनंतर समुद्राकडे वळतोय. माझं लहानपण कोकणातल्या खेड्यात गेलेलं. समुद्र मला फार आवडतो. अंधार, पाऊस आणि विजांची मला भीती वाटत नाही. वळल्यावर दिसलं की अजून पुढे जाणं शक्य आहे. तिथून समुद्राचा वारा आणि सौंदर्याची मजा घ्यावी. आरामात चालत हा व्हरांडा पार करून मी वळले तो काय!

माझ्याच वाटेत, दोन पांढरी भुतं ! अगदी चुपचाप माझीच वाट पाहात बसली होती !

माझी किंचाळी मी थांबवूच शकले नाही. पटकन् वळायचा प्रयत्न केला पण जमीन घसरडी. पाय घसरला ती भुतांपाशीच पोचले. सार्‍या शरिरातलं त्राणच नाहिसं झालं. मटकन् खाली बसले. डोळे घट्ट मिटून घेतले. भुतं मानेतून माणसाच्या शरिरात प्रवेश करतात हे मला माहीत आहे. दोन्ही हातानी मान घट्ट धरली. भुतांचे पाय उलटे असतात. यांना तर पायच नव्हते !

मरणाची भीती नव्हती. पण माझ्या शरिराचा ताबा घेऊन ही भुताटकी आमच्या कुटुंबात शिर..........? नको नको! असं होऊ देऊ नको देवा! देवा! देवा! मला रडू फुटलं! पण मी अजिबात आवाज होऊ दिला नाही.

अशी मी किती वेळ बसली होते मला माहित नाही. आता भुतं काय करत असतील? तिथेच असतील का माझ्या मागच्या बाजूस आली असतील? पटकन् खेळ संपेल का यातना होतील? टेन्शन असह्य झालं. हिम्मत करून मी डोळे उघडले आणि वीज चमकली. एक भूत माझ्याकडे वाकायला लागलं होतं. मी शेवटचा निकराचा प्रयत्न केला पळून जायचा. जेव्हां तुम्ही उठून माझे खांदे धरलेत तेव्हां तर माझी खात्रीच झाली की आता खेळ खलास! पुढचं तुम्हाला माहीतच आहे.”

त्यांच्या धीटपणाचं आम्हाला कौतुक वाटलं आणि आम्ही ते तोंड भरून केलं देखील. जरा कमी धीराची बाई असती तर हार्ट फेलच व्हायचं! मला कल्पनाच करवेना. जर तेव्हां वीज चमकली नसती तर मी पाय खाली ठेवला असता तो बाईंवर! त्यांचं माहीत नाही पण माझं हृदय नक्कीच थांबलं असतं! उफ्फ!

त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला आम्ही निघालो पण त्यांनी नाकारलं. निघताना म्हणाल्या, “एक विनंती आहे. हे जे झालं ते कुणाला सांगू नका.”

मी म्हटलं, “ताई, हा इतका यूनीक, भन्नाट थरारक अनुभव. आम्ही हा कोणालाही सांगणार नाही हे कसं शक्य आहे?”

“मग निदान माझं नाव सांगू नका.” त्या.

“येस. दॅट वुइ कॅन प्रॉमिस.” मी

दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेला आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या तोंडी आधल्या रात्रीच्या वादळाचाच विषय होता. मी अर्थातच आमचा अनुभव सांगितला. सगळ्यांना इतका रस की ब्रेकफास्ट संपल्याबरोबर सगळे आमच्या खोलीबाहेर पुन्हा जमले. एका काकांनी त्या बाईंचा रोल अदा करण्याची तयारी दाखवली. पुन्हा आम्ही पलंगपोस गुंडाळून बसलो आणि आणि रात्रीचं नाटक अभिनयासहित पेश केलं. जाम धमाल आली. पुढे दिवसभर हाच विषय!

आता त्या बाई कोण असतील याबद्दल तर्कवितर्क सुरू ! आम्हाला अर्थातच विचारलं पण आम्ही सांगणार नाही हे कळल्यावर मागे लागले नाहीत.

एका जोडप्यानी मात्र माझी पाठ सोडली नाही. जेवण झाल्यावर मी रिसेप्शनमध्ये पेपर चाळत बसलो होतो. दोघेही माझ्या जवळ आले.

“तुमचा आणि शुभदाताईंचा अनुभव टेरिफिक होता हं मात्र!” इथून सुरूवात झाली. होता होता –"चार दिवसांनी आपण विखुरणार, नंतर जरी वाटलं तरी भेट होणं कसं दुरापास्त आहे, आपल्या मध्ये इतक्या निर्भय बाई आहेत त्यांचं कौतुक आम्हा सार्यांनाच करायला कसं आवडेल, आपलं नाव कुणाला कळू नये असं जे त्या बाईंनी ठरवलं हा त्यांचा निर्णय कसा योग्य नाही" - वगैरे मुद्दे मांडून माझं मन त्यांनी वळवलं.

गुपित सांगताना आजूबाजूला कोणी नाही ना अशी आपण खात्री करून घेतो तशी मी घेतली. थोडा पुढे वाकलो. दोघेही माझ्या अगदी जवळ आले.

“कॅन यू कीप अ सीक्रेट?” मी.

“ऑफ कॉर्स!” श्रीयुत उत्तरले.

“शंकाच नाही.” श्रीमतींनी मराठीत दुजोरा दिला.

“सो कॅन आय् !”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं भन्नाट लिहिलय..>>>>>>>>११११११

अहो मि पण तीनदा दचकले खरच खुप भयानक वाटली..

मस्त !

Chhan lihilay. Malaa bhiti aivaji hasayla aale. Bahutek ati (bhiti) jhala ani hasu aala vala asnar Happy

किस्सा भयंकर आवडला.

विशेषतः

<< “कॅन यू कीप अ सीक्रेट?” मी.

“ऑफ कॉर्स!” श्रीयुत उत्तरले.

“शंकाच नाही.” श्रीमतींनी मराठीत दुजोरा दिला.

सो कॅन आय् !” >>

ही वाक्ये तर अगदी कमाल आहेत.

:हहगलो::हहगलो::हहगलो:
काय हो हे ....
आमच्यातला कोणीही एकदा सांगून ऐकणार्‍यातला नसल्यामुळे खोलीच्या आत जाऊन झोपावं हा विचार मनाला शिवला देखील नाही.>>>

मिट्ट काळोखांत पावसाच्या मार्‍यात अनोळखी कुलुप तितक्याच अनोळखी किल्लीनी उघडण्याच्या धडपडीचा आनंद घेतल्याशिवाय समजायचा नाही.>>>

मच्छरने कहा इन्सान से, ना मारो हमे जान से
जंग छिड जाएगी, दुश्मनी बढ जाएगी,
अगर तुममें जुनून है, तो हमारी रगोंमें तुम्हारा ही खून है ! >>>
अश्या वेळेला फालतू चिडचिड न करता आपला जोडीदार हि आपल्यासारखा परिस्थितीचा आनंद घेत असेल तर काय मजा येते . एकाहून एक पंचेस आहेत लेखात. आवड्या मेरे कु

Pages