बळी, गुन्हेगार, रक्षक आणि इतर

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 8 March, 2015 - 03:30

निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या वक्तव्याचा समावेश असलेला लघुपट 'इंडियाज डॉटर' बीबीसी तर्फे प्रसारित झाला आणि देशभरात मोठी खळबळ माजली. त्याच्या वक्तव्यामुळे भारताची मान खाली गेली वगैरे असेही मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होऊ लागले. मुकेश सिंहचे "रात्री अपरात्री निर्जन स्थळी बाहेर पडणारी स्त्री बलात्कारपात्र आहे" हे मत त्याचे वैयक्तिक मत आहे. त्याचे हे मत व्यक्त झाल्याने भारतातील १३० कोटी जनतेची मान खाली कशी जाऊ शकते? यावर अनेकांनी असाही युक्तिवाद केला की मुकेश सिंहचे मत ही बहुसंख्य भारतीय पुरुषांची मानसिकता आहे. अनेक पुरुषही असेच महिला रात्र बेरात्र बाहेर फिरल्याने, त्यांच्या तोकड्या कपड्यांमुळे त्यांच्यावर बलात्कार होतात असे आक्षेप घेतात त्यामुळे त्या तमाम पुरुषांना आणि आरोपी मुकेश सिंह याला एकाच तराजूत तोलले गेले. हे असे तोलणाऱ्यांनी मूलभूत फरक लक्षातच घेतलेला दिसत नाही.

कुठलाही गुन्हा घडतो तेव्हा त्या अनुषंगाने आपण व्यक्तिंची चार प्रकारच्या घटकांमध्ये वर्गवारी करू शकतो.
बळीः- ज्या व्यक्तीसोबत गुन्हा घडला आहे व त्यामुळे तिचे काही नुकसान झाले आहे.
गुन्हेगार:- ज्या व्यक्तीने स्वतःच्या फायद्याकरिता किंवा फायदा नसतानाही विकृत विचारसरणीमुळे बळीचे नुकसान घडवून आणले आहे.
रक्षकः- ज्या व्यक्तीने गुन्हेगाराला गुन्हा घडविण्यापासून आणि बळीला नुकसान होण्यापासून रोखले आहे किंवा तसा प्रयत्न केला आहे.
इतरः- या मध्ये उरलेले सर्व येतात. ते गुन्हा घडतानाचे मूक साक्षीदार असू शकतील. तिथे उपस्थित नसणारे बळीच्या नात्यातले / मित्रपरिवारातले किंवा तसे नसतानाही पण बळीविषयी कळकळ असणारे, किंवा या सर्वांशी काहीच संबंध नसणारे इतर त्रयस्थ नागरिक हे सर्व या चौथ्या घटकात येतात.

आता काही काळ बलात्कार हा गुन्हा बाजूला ठेवू. इतर कुठल्याही दुसऱ्या गुन्ह्याचा विचार करू, जसे की चोरी.

एका व्यक्तीच्या स्कूटरच्या डिकीतून एक लाख रुपये चोरी झालेत. आता या प्रकरणात चोर हा गुन्हेगार. ज्याच्या डिकीतून रक्कम चोरी झाली ती व्यक्ती बळी. ती व्यक्ती पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेली म्हणजे पोलीस झाले रक्षक आणि उरलेल्या इतरांमध्ये त्या व्यक्तीचे काही हितचिंतक - जसे की त्या व्यक्तीचे सहकारी, नातेवाईक, मित्र इत्यादी. याशिवाय इतर त्रयस्थ म्हणून आपण ही बातमी वर्तमानपत्रात वाचणारे वाचक यांना धरूयात. आता सर्वांच्या या घटनेवर प्रतिक्रिया काय असतील ते बघूयात.

इतर त्रयस्थ वाचक वगैरे मंडळी मनात किंवा उघड एकमेकांशी म्हणतील - "काय माणूस आहे? स्कूटरच्या डिकीत एवढी रक्कम ठेवून स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी केलीच कशी काय? " गंमत म्हणजे साधारण याच आशयाचे वक्तव्य त्या व्यक्तीशी त्याचे नातेवाईक, सहकारी, मित्र आणि अगदी तक्रार नोंदवून घेणारे पोलिस देखील करतील.

समजा घटनेतला चोर सापडला तर तोही असेच सांगेल की "स्कूटर बाहेर रस्त्यावर उभी होती. डिकीचे झाकण फारच सहज उघडता आले आणि आतली रक्कम पाहून मला मोह झाला व मी चोरी केली. तशी बँकेतली सुरक्षित रक्कम सहजासहजी लुटायचे माझे धाडस होणार नाही पण हे कृत्य फारच सोपे व सहजसाध्य होते म्हणून मी केले. "

तसे पाहता बँकेतली सुरक्षित म्हणविल्या जाणाऱ्या अभेद्य तिजोरीतली रक्कम देखील लुटली जातेच पण म्हणून स्कूटरमध्ये एक लाखाची रक्कम ठेवणाऱ्याचे समर्थन कसे होऊ शकेल. तसेच बँकेतली रक्कम चोरणाऱ्याला निश्चितच शिक्षा जास्त होणार कारण त्याच्या गुन्ह्यात बळजबरीने तोडफोड (रॉबरी विथ फोर्सफूल हाऊसब्रेकिंग) झालेली असेल. याउलट स्कूटरच्या डिकीतून रक्कम घेऊन पसार होणारा भुरटा चोर समजला जाईल.

आता बलात्काराच्या घटनेत काय होते तर रक्षक जे सर्व वेळी सर्व ठिकाणी संरक्षण देऊ शकत नाहीत, इतर जण ज्यांना बळीविषयी आस्था आहे असे सारे जण बळीला काळजी घ्यायला सांगतात. बळी स्वतः ज्या ठिकाणी एकटी स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे तिला तिथे त्यावेळी एकटीला जाऊ नको असे सुचवितात. घटनेतला गुन्हेगार पकडला जातो तेव्हा तोही असेच म्हणतो की त्या ठिकाणी त्या वेळी बळी मला सहज उपलब्ध होती म्हणून मी गुन्हा केला. तसे पाहता बिहार, उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी घरात घुसून महिलांवर खुलेआम अत्याचार करणारे, तेवढी ताकद असणारे गुन्हेगार आहेतच की पण दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी जिथे निवासी क्षेत्र बऱ्याच अंशी सुरक्षित आहे अशा शहरांत निर्जन स्थळी अवेळी एकट्या दुकट्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशा गुन्हेगारांची मात्र त्या महिलेला घरात घुसून त्रास देण्याची क्षमता नक्कीच नसते.

प्रत्येक व्यक्तीकरिता काही क्षेत्र हे निश्चित सुरक्षित क्षेत्र (सेफ झोन) असते. या क्षेत्राच्या बाहेर त्या व्यक्तिची सुरक्षितता अनिश्चित असते. तेव्हा अशा असुरक्षित क्षेत्रात (अनसेफ झोन) जाऊ नये असा सल्ला देणारे हितचिंतक हे तो सल्ला काळजीच्या पोटी देतात तर बळी त्या क्षेत्रात सापडला म्हणून मी गुन्हा केला असे म्हणणारे गुन्हेगार हे स्वतःच्या बचावाच्या जाणिवेतून किंवा त्यांच्यात तेव्हा गुन्हा करण्याची इच्छा कशी झाली त्याचे स्पष्टीकरण देतेवेळी सांगतात पण या दोन्हींच्या उद्देशातला फरक कुणी समजून घेतच नाही.

आता पुन्हा स्कूटरच्या डिकीतून लाख रुपयांच्या चोरीचे उदाहरण पाहू. रक्षक व इतरांनी चोरी होण्याचे कारण हे रक्कम चोरास सहजसाध्य होती असे सांगितले. चोराने देखील हेच सांगितले. मग चोर, रक्षक व इतर एकाच मानसिकतेचे झालेत का? बळीने इतरांना असे सांगावे का तुम्ही मला का सांगताय की मी रक्कम सहजसाध्य ठिकाणी ठेवू नये. माझी स्कूटर आहे, माझी रक्कम आहे. मला डिकीत ठेवायचे स्वातंत्र्य का नाही? त्यापेक्षा तुम्ही चोरावर संस्कार करा की त्याने दुसऱ्याच्या वस्तुला हात लावू नये. बळीने असे विधान केले तर ते किती हास्यास्पद ठरेल नाही का या घटनेमध्ये?

मग बलात्काराच्या घटनेमध्ये रक्षक व इतर जण जेव्हा आपुलकीपोटी महिलेला सांगतात की बाई तू रात्री बेरात्री एकटीदुकटी फिरू नको. तर ती बळी ठरलेली किंवा संभाव्य बळी ठरू शकणारी इतर कोणतीही महिला लगेचच रक्षक व इतरेजनांनाही त्या गुन्हेगाराच्याच मानसिकतेचे ठरविते. तुम्ही माझी काळजी करण्यापेक्षा, मला रात्री बेरात्री फिरण्याचे, आवडीचा पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य नाकारण्यापेक्षा त्या गुन्हेगाराला संस्कार द्या असे सांगते.

स्कूटरच्या डिकीतून रक्कम चोरी होण्याच्या प्रकरणात बळी हे मान्य करतो की रक्षक व इतरेजन हे आपल्याला सल्ला आपल्या आपुलकी पोटी देत आहेत. ते व गुन्हेगार एका बाजूला नसून व ते आपल्या बाजूला आहेत व गुन्हेगार विरुद्ध बाजूला आहे. फक्त प्रत्येकच ठिकाणी आपल्याला इतरांकडून संरक्षण मिळणे अशक्य आहे तेव्हा तिथे आपली आपणच काळजी घ्यायची आहे व जिथे ते शक्य नसेल ते क्षेत्र टाळायचे आहे.

बलात्काराच्या घटनेमध्ये मात्र बळी फक्त महिलाच पडू शकतात आणि गुन्हेगार फक्त पुरूषच असू शकतात म्हणून त्या घटनेकडे एका बाजूला बळी + रक्षक + इतरेजन आणि विरुद्ध बाजूला गुन्हेगार असे सारासार न पाहता सरळ सरसकटीकरण करून एका बाजूला स्त्री (बळी व संभाव्य बळी) व विरुद्ध बाजूला पुरूष (गुन्हेगार व संभाव्य गुन्हेगार) इतक्या बेजबाबदारपणे पाहिले जाते. स्त्रीला आपुलकीपोटी सल्ले देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला संभाव्य गुन्हेगार समजले जाते. आम्हाला आपुलकी दाखविण्याऐवजी गुन्हेगार पुरुषच आहे म्हणजे तुमच्याच गटातला आहे तेव्हा त्याला संस्कार द्या असे सांगणाऱ्या महिलांना हा फरक ज्यादिवशी समजेल की सर्व पुरुष एकाच गटातले नसतात त्या दिवसापासून वेगळा महिला दिन करायची गरज पडणार नाही असे वाटते.

ता. क. :- बलात्कारासंबंधाने स्त्रियांच्या पोशाखाविषयी अभिप्राय व्यक्त करणाऱ्या पुरुषांना महिलांच्या संघटीत रोषास बळी पडावे लागले परंतु याच स्त्रियांना हे ठाऊक नाही काय की सिंधूताई सपकाळ या एका नामवंत महिलेनेच "आजच्या मुली असा पोशाख घालतील तर बलात्कार होणार नाहीत तर काय चमत्कार होतील काय? मी या वयातही अशा प्रकारे लुगडे नेसते की माझी टाच देखील दिसत नाही" असे वक्तव्य एकदा नव्हे तर अनेकदा व तेही जाहीररीत्या केले आहे.

बलात्काराला विरोध झाला नसता तर आम्ही तिचा खून केला नसता, तिने शांतपणे बलात्कार होऊ द्यायला हवा होता. या मुकेश सिंहच्या वक्तव्याने तर आगीत तेल ओतले गेले. प्रत्यक्षात हे प्रकरण झाल्यावर काहीच दिवसांत नेमके असेच वक्तव्य महिला शास्त्रज्ञ डॉ अनिता शुक्ला यांनी देखील केले होते तेव्हा त्यांच्यावर देखील टीका झाली होती. कायदा सुव्यवस्था व व्यक्तिस्वातंत्र्याकरिता ज्याचे जगात आदराने नाव घेतले जाते अशा अमेरिका ह्या देशांतही तुम्हाला शिकागोसारख्या शहरांत एखाद्या विशिष्ट वर्णाच्या गुन्हेगाराने अडविले तर आपल्या जवळील रक्कम, मौल्यवान वस्तू विनाप्रतिकार त्याच्या हवाली करा. प्राणापेक्षा मौल्यवान काहीच नाही तेव्हा काहीशा किंमतीच्या वस्तूकरिता आपला जीव गमावू नका असा सल्ला आणि तोही तिथल्या पोलिसांकडून आजच्या काळातही दिला जातो. या सल्ल्याविषयी कधी कुणी हरकत घेतल्याचे अथवा असा सल्ला देणारे गुन्हेगारांच्याच मानसिकतेचे असल्याचा आरोप केल्याचे ऐकिवात नाही.

============================================================================
पुरवणी स्पष्टीकरण लेखनः- सुरुवातीच्या काही प्रतिसादांना मी माझ्या प्रतिसादात्मक लेखनातून नेमके स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरीही असे निदर्शनास आले आहे की, पुन्हा नव्याने प्रतिसाद देणारे अनेक प्रतिसादक माझ्या लेखाखालील प्रतिसादांमधील स्पष्टीकरणास न वाचता पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यांवर आक्षेप घेत आहेत ज्या मुद्यांवर आधीच इतर प्रतिसादकांचे आक्षेप घेऊन झाले आहेत व मी त्याचे स्पष्टीकरण केले आहे. तरी नवीन वाचकांकरिता हे माझे प्रतिसादात असलेले स्पष्टीकरण इथे लेखातच समाविष्ट करीत आहे. अर्थात काही प्रतिसादक तर लेखही पूर्ण न वाचताच प्रतिसादांतून आक्षेप घेत आहेत, त्यांच्या समाधानाकरिता मी काहीच करू शकत नाही.
============================================================================

इथे तूलना पैसे आणि स्त्री अशी किंवा चोरी आणि बलात्कार अशी नसून कुठल्याही गुन्ह्यातील बळींचे होणारे नुकसान व त्यांचे तसे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना रक्षक व इतरेजनांनी दिलेला सल्ला अशी आहे. इतर गुन्ह्यांमध्ये रक्षक व इतरेजनांनी बळींना (अथवा संभाव्य बळींना) दिलेला खबरदारीचा सल्ला गांभीर्याने ऐकला जातो. बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये / गुन्हा होऊ नये म्हणून दिला जाणारा सल्ला रोषपात्र होतो इतकेच नव्हे तर सल्ला देणार्‍याची मानसिकता चूकीची असल्याचे सांगितले जाते.

<< चोरी करुच नये असे संस्कार करणे आणि घरात आपली आई, बहिण, वहिनी म्हणुन वावरत असलेल्या स्त्रीचा मान ठेवणे असे संस्कार करणे यात फरक आहे असे मला वाटते. आपल्या समाजात चोरी करु नये हा पाठ्यपुस्तकी धडा निदान नावाखातर दिला तरी जातो पण तुमच्या आई-बहिणीला थोडाफार मान द्या हे अजिबात सांगितले जात नाही. >>

ज्याविषयी लेख लिहीलाय तो मुद्दाच ध्यानात घेतलेला नाहीये. चोरी करू नका हे सर्वांना शिकविले जाते. काही जण ते पाळतात इतर काही पाळत नाही. जे पाळत नाहीत त्यांना आपण बदलू शकत नाही तर निदान त्यांच्यापासून सावध राह्यला हवे. असा सावधगिरीचा सल्ला देणारा चोरीचा साथीदार नक्कीच नसतो.

स्त्रियांना मान देण्याचेही पाठ्यपुस्तकांतून शिकविले जातेच की. निदान महाराष्ट्रात तरी इतिहासात प्रत्येकाला शिवाजी महाराजांचा कल्याण च्या सुभेदाराच्या सूनेला आई मानुन सन्मानाने परत पाठविण्याचा पाठ नक्कीच माहित आहे. तरीही सर्वजण हा पाठ ध्यानात ठेवत नाहीत. ज्यांची बलात्कार करायची प्रवृत्ती आहे ते तो करतात. त्यांच्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारे नक्कीच त्यांचे समर्थक नसतात हे समजून न घेतल्यास संभाव्य नुकसान कुणाचे हे पुन्हा वेगळे सांगण्याची गरज नाहीये.

माझ्या लेखावर पहिली प्रतिक्रिया देणारे श्री. प्रकाश घाटपांडे साहेब हे पुर्वी पोलिस दलात होते तेव्हा त्यांच्या मताला इथे मी विशेष महत्त्व देतो.

ता. क. :- काल दुपारी चार वाजता आम्ही सहा पुरुष व एक महिला माझ्या वाहनातून निगडीहून लवासास गेलो. जातेवेळी हिंजवडी मार्गे गेलो होतो. येताना लवासाहून निघण्यास रात्रीचे साडे अकरा वाजले. सव्वा बाराच्या सुमारास पिरंगुट येथे पोचलो असता मी पुन्हा हिंजवडी मार्गेच जाण्याचा आग्रह धरत होतो. परंतु इतर सर्वच्या सर्व जणांना रस्त्याने परतताना चहा पिण्याची तल्लफ आली होती व हिंजवडी मार्गाने कुठलेही हॉटेल उघडे नसल्याने त्यांना चांदणी चौक मार्गे यायचे होते. परंतु माझ्या माहितीप्रमाणे भूकुम / भूगाव परिसर फारसा सुरक्षित नसल्याने मला त्या मार्गे येणे प्रशस्त वाटत नव्हते. शेवटी सहा विरुद्ध एक अशा मतांनी माझा पराभव होत वाहन अखेर चांदणी चौक मार्गेच नेण्यास सुरुवात केली. वाटेत भूकुम व भूगाव च्या दरम्या एक चारचाकी वाहन व काही दुचाकी यांच्यात अपघात झाला असल्याने मोठ्या संख्येने दुचाकी स्वार तिथे जमा होऊन तेथून जाणार्‍या चारचाकी वाहनांची तोडफोड व प्रवाशांस मारहाण करीत होते. मी हे दुरून पाहिले परंतु मागे फिरणे अशक्य असल्याने चटकन वाहन रस्त्याच्या खाली मातीवर आणले तसेच रस्ता सोडून काही अंतर पार केले. त्या समाजकंटकांना अशा प्रकारे लांबूनच वळसा व दंडवत घालत आपली हिरोगिरी न दाखवता मी तिथून चक्क निसटलो. या घटनेत आमच्या सोबतच्या स्त्री प्रमाणेच आम्ही पुरुष मंडळी देखील मारहाणीचे बळी ठरू शकलो असतो. बळी न ठरण्याकरिता त्या क्षेत्राला टाळणे हेच उचित नव्हे का?

शिर सलामत तो पगडी पचास हे पूर्वजांनी सांगितलेले सूत्र महत्त्वाचे. शिवाय माझा पूर्वीचा अनुभव देखील मला हेच सांगतो. १९९६ साली मी मुंबई पुणे रस्त्याच्या बाजून शिवाजीनगर रेल्वे स्थानकात शिरण्याकरिता तिथल्या बकाल वस्तीत असलेल्या एका जवळच्या मार्गातून पायी जात होतो. वेळ रात्री ९:१५ ची होती. अचानक दोन्ही बाजूंना पत्र्याची घरे असलेल्या त्या अरूंद मार्गात एका अस्ताव्यस्त केस व दाढी वाढलेल्या घाणेरड्या इसमाने माझ्यावर हल्ला केला. मी देखील त्याच्याशी पूर्ण ताकदीनिशी मारामारी केल्यावर तो पळून गेला, पण या गडबडीत माझा चष्मा तुटला. १९९६ साली तीनशे रुपयांचे नुकसान फार मोठे वाटत होते. म्हणून मी पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेलो. ते उलट मलाच म्हणाले, "एवढ्या रात्रीचे तुम्हाला तिथून जायची काय गरज होती? आम्ही कसं शोधणार त्याला? त्या वस्तीत तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे पन्नासएक जण तरी सापडतील. गर्दुल्ले असतात ते. नशीब समजा तुमचं जिवंत आहात आणि विशेष म्हणजे काही इजादेखील झाली नाहीये तुम्हाला. चष्म्याच्या नुकसानीचं काय घेऊन बसलात? डोळे फुटले नाहीत हीच त्याचे आभार मानण्यासारखी गोष्ट आहे." मी पुढे अनेकांना हे अन्यायकारक असल्याचे बोलून दाखविले. परंतु पोलिसांचा सल्ला व्यवहार्य असल्याचे मला अनेकांनी सांगितले. पुढे २००२ साली मी दिल्लीत गेलो असता पुरानी दिल्ली या भागात अनेक ठिकाणी सायंकाळी ७:०० नंतर दुकाने बंद होत असून त्यानंतर स्त्रिया तर सोडाच चांगल्या घरचे पुरुष देखील तिथे फिरकत नाहीत.

कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहेच, पण ती फक्त बलात्कार या गुन्ह्याकरिता नव्हे तर चोरी, खून, वाटमारी, दरोडेखोरी, बेदरकार वाहन चालविणे अशा सर्वच गुन्हेगारी कृत्यांकरिता. सर्वच जण बळी पडू शकतात. कायदा सुव्यवस्था सुधारायची तेव्हा सुधारेल त्याकरिता पाठपुरावा करणे हा वेगळा विषय आहे पण निदान तोपर्यंत आपण बळी पडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. मी तर हल्ली पिंपरी चिंचवड नवनगरातून रात्रीचा पायी शक्यतो फिरत नाही आणि फिरावे लागलेच तर अतिशय सावधगिरी बाळगतो कारण प्रत्येकच ठिकाणी चालण्याकरिता पदपथ नाहीत. आहेत तिथे अतिक्रमणे झालेली आणि रस्त्यावरून कितीही कडेने चालले तरी एखादे चारचाकी / दुचाकी वाहन आपल्याला बेदरकारपणे चिरडून जाणार नाहीच अशी खात्री देण्याजोगी परिस्थिती नाही. आता त्यांनी तसे वाहन चालवू नये याकरिता कारवाई करणे आपल्या हातात नाही. ज्यांच्या हातात आहे ते ती करीत नाही. आपण ती केली तर कायदा हातात घेतला म्हणून आपल्यालाच तुरुंगात जावे लागेल. दुर्घटना घडून गेल्यावर त्याला जबाबदार कोण आणि त्याला शासन काय व्हावे ह्या लांबच्या गोष्टी आधी आपल्यासोबत दुर्घटना घडू नये ही खबरदारी घेणे महत्त्वाचे.

**************************************************************************************************************************
इथे स्त्री विरुद्ध पुरुष असे समजणे हेच चूक आहे. इथे गुन्हेगार विरुद्ध बळी असा लढा आहे. गुन्हेगारांमध्ये पुरुषांचा भरणा असला तरी बळींमध्येही पुरुष असू शकतात हे समजून घ्या. निर्भयाच्या घटनेत तिच्या मित्रालाही अमानुष मारहाण झाली होती. तेव्हा कुठल्या पुरुषांच्या मनोवृत्तीतल्या बदलांविषयी आपण सुचवित आहात? पुरुषांमध्येच चांगले आणि वाईट असे दोन ढोबळ गट आहेत. चांगले असं काही करत नाहीत आणि जे वाईट आहेत, अशी कृत्ये करतात त्यांना बदलता येणार नाहीच. चांगल्यांनी आपण वाईटांच्या वाईट कृत्याला बळी पडू नये याविषयी खबरदारी घेणे हाच उपाय. (जोवर कायदा सुव्यवस्था सुधारत नाही निदान तोपर्यंत तरी)

*************************************************************************************************************************

मी २००४ साली अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या साकूर या गावी तीन महिने कामानिमित्त वास्तव्य केले. अल्पकाळाचा अतिथी असल्याने माझी सोय गावाबाहेर असलेल्या शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती. तिथून गावातल्या गावात कुठेही जायचे असले तरी एक, दीड किमी पेक्षा जास्त अंतर पार करावे लागत नसल्याने माझ्यापाशी कुठलेही वाहन देण्यात आले नव्हते. सर्वत्र पायीच संचार असे.

गावातले नव्वद टक्के लोक हे मांसाहार करणारे असल्याने बुधवारी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मांसाची विक्री होत असे. नंतर उरलेली घाण बाजार भरतो त्या आवारात फेकून देण्यात येत असे. सायंकाळी बाजार संपल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात (संख्येने सहज पन्नास एक तरी असायचे) भटकी कुत्री त्या उरलेल्या घाणीचा फडशा पाडण्याकरिता जमत व मग मध्यरात्रीपर्यंत त्यांचा धुमाकूळ चाले. गावातल्या कुणाला याचा फारसा त्रास नव्हता कारण त्यांना तिकडे फिरकण्याचे कारण नसायचे. मला मात्र त्याच रस्त्याने गावात जावे लागायचे त्यामुळे मला भयानक उपद्रव होत असे. ती कुत्री (त्यात काही पिसाळलेली देखील असावीत)अंगावर धावून येत. त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता मी एका माजी सैनिकाकडून छर्‍याची बंदूक मिळविण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु गावच्या लोकांचा विरोध होता. त्यांच्या मते ही कुत्री खंडोबाचा अवतार, त्यांना मारणे पाप उलट त्यांचे पोट भरावे म्हणून मुद्दामच तिथे मांसाचे तुकडे व हाडे टाकण्यात येत.

कुत्र्यांना मारणे मला अशक्य असल्याने शेवटी मीच बुधवारी रात्री सायंकाळी ०७:०० नंतर बाहेर जाणे टाळायचो. विश्वास ठेवा कुत्र्यांना मारणे मला शक्य असते तर मी तेच केले असते परंतु केवळ तो पर्याय उपलब्ध नसल्यानेच स्वतःची काळजी म्हणून स्वतःला बंदिस्त करून घेणे मला सोयीस्कर वाटले.

सहसा हिंसक जनावरांना पिंजर्‍यात ठेवले जाते. परंतु कधी अशी वेळ येते की हिंसक जनावरे मुक्तपणे मोठ्या संख्येने तुटून पडतात. स्वतःचे रक्षण करण्याची पुरेशी क्षमता नसल्याने मग माणसेच एका रिकाम्या पिंजर्‍यात जाऊन बसतात आणि स्वतःला त्या हिंस्त्र जनावरांपासून सुरक्षित ठेवतात असे एका इंग्रजी चित्रपटात पाहिल्याचे आठवते.

बलात्कार व इतर कुठलेही गुन्हे करणारे हे गुन्हेगार या पिसाळलेल्या कुत्र्यांसारखे किंवा हिंस्त्र जनावरांसारखेच आहेत. त्यांना ठार मारण्याची अनुमती कायदा आपल्याला देत नाही (वर एका प्रतिसादकाने लिहीले आहेच की अरूणा शानबागचा अपराधी केवळ सात वर्षांची शिक्षा भोगून मोकाट फिरतोय. तो इतर महिलांकरिताही तितकाच धोकादायक आहे, पण आपण काही करू शकत नाही) व स्वतः कायदादेखील त्यांचा पुरेसा बंदोबस्त करू शकत नाही. शिवाय त्यांच्यापासून बचाव करणेही तितकेसे स्वस्त नाही (निर्भयाच्या नावाने खास महिलांकरिता काढलेले एक पिस्तुल साधारण लाख रुपयांच्या आसपास आहे. किती जणींना ते परवडू शकेल? असो).

तेव्हा आपल्या हातात जे पर्यायनिवडीचे मर्यादित स्वातंत्र्य त्यात काय करता येईल हे या लेखात लिहीले आहे. गुन्हेगाराने शहाणे व्हावे, सरकारने त्यांना वठणीवर आणावे वगैरे अपेक्षा आहेतच. पण त्या पूर्ण होतील असे मानणे भाबडेपणा आहे. आपणाला काय करता येईल तेवढेच आपण करू शकतो. इतरांच्या कृती आपल्या मर्जीनुसार आपण करवून घेऊ शकत नाही.

**************************************************************************************************************************
लेख व त्याखालील प्रतिसादात्मक लेखन यांमधून मी कुठेही स्त्रीची वस्तुबरोबर तूलना केलेली नाही. कुणाला तसे वाटत असल्यास तो त्या वाचकाचा निव्वळ गैरसमज आहे. मी गुन्हेगार / हल्लेखोराच्या मानसिकतेचे विश्लेषण करायचा प्रयत्न केलेला आहे. स्त्री / पुरुष यापैकी कुणाजवळही मौल्यवान चीजवस्तू असेल तर गुन्हेगार हल्ला करू शकतो. यावेळी त्यांच्यावर चीजवस्तूच्या गमावण्याबरोबरच जीवितहानीचा देखील धोका असतो. स्त्रीजवळ मौल्यवान चीजवस्तू नसतानादेखील गुन्हेगार हल्ला करू शकतो - कारण अर्थातच गुन्हेगाराला तिच्या शरीराचा तिच्या मर्जीविरुद्ध उपभोग घ्यायचा असतो. तेव्हा गुन्हेगार / हल्लेखोरापासून स्त्री व पुरुष दोघांनीही सावध राहण्याची गरज आहे. स्त्रियांनी थोडे अधिक प्रमाणात.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दरवेळी ही सावधगिरी ती व्यक्तीच बाळगेल असे नाही तर तिच्या वतीने इतर कोणीतरी. सहसा लहान मुलांच्या वतीने त्यांचे पालक, स्त्रियांच्या वतीने त्यांचे आईवडील, भाऊ अथवा पती. त्यामुळेच लहान मुलांसोबत दुर्घटना घडली तर समाज त्यांच्या पालकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवतो आणि स्त्रियांसोबत असे काही घडले तर त्यांच्या आईवडिलांवर, भावावर किंवा पतीवर. याच कारणास्तव स्त्रियांचे पालक, पती त्यांना संरक्षण पुरवितात, सोबत येतात जे काही स्त्रियांना पारतंत्र्य वाटते.

आता ही सावधगिरी तुमच्या वतीने एखादी व्यावसायिक संस्था देखील घेते. जसे की, प्रवासी मोठ्या विश्वासाने एखाद्या नामवंत टॅक्सी एजन्सीला फोन करून टॅक्सी बुक करतात तेव्हा त्या टॅक्सीचा चालक गैरवर्तन करणार नाही ही सावधगिरी प्रवाशाच्या वतीने घेणे हे त्या टॅक्सी एजन्सीचे काम असते. जर टॅक्सी एजन्सीने ते केले नाही तर त्यांच्यावर ठपका ठेवला जातो. उबेर टॅक्सी एजन्सीवर याच कारणाकरिता ठपका ठेवला गेला जेव्हा त्यांच्या एका चालकाने प्रवासी महिलेसोबत भयंकर वर्तन केले. या प्रकरणी वातावरण ढवळून निघावे इतका प्रचंड जनक्षोभ उसळला होता.

पण त्याच दरम्यान याच्या अगदी उलट झाले होते तेव्हा समाजाची संवेदनशीलता कुठे हरविली होती? जरा खाली दिलेल्या लिंकवरील बातमीकडे देखील लक्ष द्या.

http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/pune-murder-kiran-sona...

http://aplapune.com/defaultcontroller/detail/1485

किरण नारायण सोनवणे (वय २८, रा. दादाची वस्ती, लोहगांव) या चालकाने आपणांस चांगला व्यवसाय मिळण्याच्या आशेने ओला टॅक्सी एजन्सीत नाव नोंदविले. १४ डिसेंबर रोजी ओला कंपनीतून त्यास भाडे देखील मिळाले. प्रत्यक्षात या प्रवाशांनी त्याचा खून करून त्याची झायलो टॅक्सी पळविली.

उबेर कंपनीच्या चालकाने महिला प्रवाशासोबत अपराध केला तर उबेर चा परवाना रद्द करण्यापर्यंतची वेळ आली आणि दुसरीकडे ओला च्या प्रवाशांनी चालकाचा खून करून त्याची टॅक्सी पळविली तरी समाजात काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. हा समाजाचा दुटप्पीपणा नव्हे काय? याचे कारण असे आहे की समाजाने काही गोष्टी ठरवून टाकल्या आहेत. स्त्री विरुद्ध पुरुष प्रकरणात स्त्रीच्याच बाजूने आंदोलन केले पाहिजे. प्रवासी विरुद्ध चालक प्रकरणात प्रवाशाच्याच बाजूने आंदोलन केले पाहिजे. स्त्री + प्रवासी असेल तर दुप्पट संवेदनशीलता दाखवायला हवी. पुरुष + चालक असेल तर अजिबात संवेदनशीलता दाखवायची गरज नाही. महिला प्रवासी बळी पडली तर हाय तोबा करणार्‍यांना पुरुष चालक बळी पडला त्याचे सोयरसूतक अजिबात नसते का? का हा सगळा असा प्रकार आहे की, पुरुषावर हल्ला करणारे पुरुषच होते आणि तुम्ही पुरुष - पुरुष आपापसांत बघून घ्या, आम्हाला काय त्याचे? बळीही तुम्हीच आणि गुन्हेगारही तुम्हीच तेव्हा आम्ही काय यात मध्ये पडणार?

अशी जर कुणाची मानसिकता असेल तर त्यांच्या माहितीकरिता पुण्यातील एक प्रकरण सांगतो. डॉ. महाजन नावाच्या एका सद्गृहस्थाची दोन महिलांनी अपहरण करून हत्या केली व त्याचे प्रेत तुकडे तुकडे करून कात्रजच्या घाटात टाकले व नंतर त्याच्या कुटुंबियांकडे खंडणी मागितली.

कालचीच एक बातमी अशी, दोन स्त्रियांनी दागिन्यांकरिता एका महिलेचा गळा आवळून खून केला.

तर लेखाचे तात्पर्य असे की,
गुन्हेगार पुरुष आणि बळी स्त्री,
गुन्हेगार पुरुष आणि बळी पुरुष,
गुन्हेगार स्त्री आणि बळी स्त्री,
किंवा
गुन्हेगार स्त्री आणि बळी पुरुष

यापैकी कुठलीही शक्यता असू शकते. इथे स्त्री विरुद्ध पुरुष अशी लढाई नसून चांगला विरुद्ध वाईट अशी लढाई आहे. प्रत्येकच वेळी जो कुणी संभाव्य बळी ठरण्याची शक्यता असते त्याने आवश्यक ती खबरदारी / सावधगिरी बाळगली पाहिजेच.

लेख लिहीताना -

  1. इंडियाज् डॉटर आणि महिलादिनाचा संदर्भ होता
  2. तसेच जेव्हा गुन्हेगार पुरुष आणि बळी स्त्री असते तेव्हाच कायदा सुव्यवस्थेवर आणि एकूणच समाजरचनेवर जोरदार टीका होते ह्या अनुभवाची पार्श्वभूमी होती.
  3. तूलनेने सामान्य पुरुष (इथे डॉ. दाभोळकर किंवा कॉ. पानसरे या प्रसिद्ध व्यक्तिंना तूर्तास बाजूला ठेवले आहे) बळी पडतात त्याप्रकरणी फारशी निदर्शने आणि समाजमन ढवळून निघाल्याचे दिसले नसल्याचा अनुभव आहे.

यामुळे बळी पडणार्‍या स्त्रियांना नजरेसमोर ठेवून काही त्यांच्या हिताच्या बाबी सुचविल्या होत्या. बळी पडू शकणार्‍या पुरुष मंडळींना देखील ही सावधगिरी घेणे अर्थातच लागू पडतेच (वर माझे स्वतःचे लवासाहून रात्री उशिराने परतीच्या प्रवासाचे व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे सायंकाळी घराबाहेर न पडण्याचे उदाहरण दिले आहेच). परंतु कुठेतरी फक्त महिलांचे स्वातंत्र्य संकुचित केल्याच्या थाटात काही आक्रमक प्रतिसाद आल्याने हे पुरवणी स्पष्टीकरण जोडावे लागले.

============================================================================
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दीपिका पदुकोणच्या माय चॉईस या व्हिडीओ विषयी:-

<< ईतरांचे विचार जाणून घ्यायलाही आवडतील, पण मत मांडायच्या आधी विडिओ जरूर बघा. >>

मी तो व्हिडीओ पाहिला. मला अर्धवट वाटला. तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्‍या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.

दीपिकाचं ठीक आहे. ती सेलिब्रिटी आहे. ती तोकडे कपडे घालून समाजात बिनधास्त वावरू शकते कारण ती तिच्या महागड्या वातानुकूलित वाहनात बसून बंद काचाआड प्रवास करणार आहे. तिच्या सोबत तिच्या संरक्षणाकरिता तिचा वाहनचालक, व्यवस्थापक आणि अंगरक्षक देखील असतील. तिला कसला त्रास होणार देखील नाही. परंतु तिचं अंधानुकरण करण्याच्या नादात सामान्य तरूणी तसे कपडे घालून, उपनगरी रेल्वेतून फिरतील. तेव्हा त्यांना समाजकंटकांकडून त्रास झाला तर त्या स्वतःचा बचाव कसा करणार? उंच टाचेच्या पादत्राणांमुळे तर पळता देखील येणार नाही. अशा वेळी काही गैरप्रकार घडला तर समाजाला दोष द्यावा का? म्हणजे जर त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर त्याचं समर्थन मी नक्कीच करत नाहीये. त्या महिलेशी त्यावेळी गैरवर्तन करणारा तो समाजकंटक दोषी आहेच पण त्या महिलेने त्या विशिष्ट समाजकंटकाविरोधात निश्चितच गुन्हा नोंदवावा आणि उचित कायदेशीर कारवाईची अपेक्षा करावी हे देखील रास्तच. परंतु संपूर्ण समाजाला दोष नक्कीच देऊ नये. आपल्या "चॉईस"चे परिणाम आपणच भोगावे लागतात, नव्हे ती आपली "रिस्पॉन्सिबिलिटी"च असते.

स्वातंत्र्याच्या हक्काच्या जाणीवेसोबतच जबाबदारीच्या कर्त्यव्याची जाणीव देखील असायलाच हवी.

या संदर्भात मुंबईतील एका मॉडेलचं उदाहरण इथे आवर्जून मांडावंसं वाटतं. तिने एका पोलिस उच्चाधिकार्‍यासमवेत संबंध ठेवलेत. त्याच्यासोबत कुठल्याशा सदनिकेवर अनेकदा गेली. त्याच्याकडून भेटीदेखील स्वीकारल्या. नंतर त्यांचं बिनसल्यावर मात्र तिने त्या संपूर्ण समाजाला किंवा पोलिस दलाला देखील दोष न देता केवळ त्या विशिष्ट पोलिस उच्चाधिकार्‍याविरोधात गुन्हा नोंदविला, पुरावे सादर केले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. गैरप्रकारांना बळी पडणार्‍या स्त्रियांनी संपूर्ण समाजाला दोष देण्यापेक्षा अशा प्रकारे पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैत्रगंधा,

तुम्ही दिलेल्या लिंकमधील बातमीचा इथे काय संबंध? तिथे ऑस्ट्रेलियात भारतीयांवर वर्णद्वेषी हल्ले होतातच. तिथे जाण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करायला हवा की नको?

तिथलीच दीपक यांची प्रतिक्रिया वाचा:-

दिपक - सोमवार, 9 मार्च 2015 - 11:38 AM IST
परदेशात प्रोजेक्ट साठी गेल्यावर चांगला पैसा मिळतो मान्य आहे... पण आपला देश, आपले आई वडील कुटुंब हे त्याहूनही जास्त महत्वाचे नाही का? (आणि आता तर अशा घटनांवरून आपला जीव हे पण ह्या यादीमध्ये टाकावे वाटते)... मित्रांनो, इकडे पैसा बाहेरच्यापेक्षा कमी मिळतो पण आपल्याला आई वडिलांसोबत राहता येते, आपण जितके दिवस बाहेर जातो तितके आई वडिलांचे आयुष्य वाया घालवतो, त्यांना निवृत्ती नंतर काय हवे काय नको हे बघायचे सोडून त्यांना सोडून जातो, आपण त्यांना पैसा भरपूर पाठवतो पण ज्या गोष्टी कुटुंब सोबत असल्यावर त्यांना मिळतात त्या पैशाने नाही मिळू शकत... इकडे आपण कमी पैसा कमवू, थोडे छोटे घर घेऊ, थोडी छोटी गाडी घेऊ, थोडेसे कमी क्वालिटी चे कपडे घालू, पण... आपण सर्व इकडे कुटुंबासोबत खुश राहू... हे महत्वाचे नाही का?

419 जणांची या प्रतिक्रियेला पसंती असून

175 जणांनी या प्रतिक्रियेला नापसंती नोंदविली आहे.

दुसरी प्रतिक्रिया:-

वीर - सोमवार, 9 मार्च 2015 - 12:47 PM IST
अत्यंत वाईट बातमी. हि वेळ चर्चेची नाही. पण, एका गोष्टी चे नेहमीच मला एक आश्चर्य वाटत आहे. आपण कुठेही जातो, त्याचा फायदा आपल्याला व आपल्या कुटुंबाला होतो. पण जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते त्यावेळी आपण समाजाला, देशाला दुषणे देतो. असे का? जास्त फायदा जास्त धोका. नाही का? शिवाय पर ठिकाणी जास्त काळजी घेतली पाहिजे. अरे आपल्या शहरात सुद्धा आपण रात्री बेजबाबदार पणे भटकत नाही. एक गोष्ट ह्या बातमीत नाही आली ती अशी कि, हि दुर्दैवी स्त्री रात्री १० वाजता एका अंधाऱ्या पार्क मधून शोर्टकट ने जात होती. काय नडले होते? व्हायचे ते कुठेही होऊ शकते पण नशिबाची परीक्षा कशासाठी? का अट्टाहास?

88 जणांची या प्रतिक्रियेला पसंती असून

7 जणांनी या प्रतिक्रियेला नापसंती नोंदविली आहे.

अजून एक प्रतिक्रिया:-

महादेव - सोमवार, 9 मार्च 2015 - 12:06 PM IST
भारतीय लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. परदेशात सुद्धा काळोख पडल्या नंतर एकाकी रस्त्यातून जाऊ नये. खूप धोकादायक असते. मग ती अमेरिका असो कि इंग्लंड किंवा फ्रांस किंवा ऑस्ट्रेलिया. स्वताची काळजी स्वताच घ्यायची असते.

129 जणांची या प्रतिक्रियेला पसंती असून

3 जणांनी या प्रतिक्रियेला नापसंती नोंदविली आहे.

महादेव व वीर यांच्या प्रतिक्रियेचा सूर माझ्या लेखाशी मिळता जुळता आहे.

बलात्कार फक्त तोकडे कपडे घातलेल्या आणि नको त्यावेळी नको तिथे जाणा-या स्त्रीयांवरच होत नाहीयेत तर स्वतःच्या घरात बसलेल्या सहा महिन्याच्या मुलीपासुन ६० च्या वृद्धेवरही होताहेत. या बलात्का-यांना कोणती थिअरी लावणार? निर्भया रात्री बारा वाजता बसमध्ये चढली नव्हती तर देशाची राजधानी असलेल्या शहरात ती रात्री ८.३०-९ ला सोबत कोणीतरी असताना घरी जाण्याच्या उद्देशाने बसमध्ये चढली होती.

सिंधूताई सपकाळ यांच्या मताशी थोडेफार सहमत. ज्या समाजात कुठल्याही वयाच्या स्त्रीकडे फक्त वखवखलेल्या नजरेनेच पाहिले जाते तिथे निदान अंगभर कपडे घातलेले बरे. अर्थात हे अंगभर कपडेही तुमचे रक्षण करु शकणार नाही हे रोजच्या रोज सिद्ध होतेय. पण तरीही.>>>>+१००० स ह म त !!

भारतीय लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. परदेशात सुद्धा काळोख पडल्या नंतर एकाकी रस्त्यातून जाऊ नये. खूप धोकादायक असते. मग ती अमेरिका असो कि इंग्लंड किंवा फ्रांस किंवा ऑस्ट्रेलिया. स्वताची काळजी स्वताच घ्यायची असते. >>> स ह म त.

केवळ स्त्री किंवा लहान मुली नाही तर बलात्कार किंवा त्या हेतूने प्रेरित माणसाला एक कोवळा लहान मुलगा हि चालू शकतो, केवळ Gender matter करत नाही.

निर्भयाच्या नावाने खास महिलांकरिता काढलेले एक पिस्तुल साधारण लाख रुपयांच्या आसपास आहे. किती जणींना ते परवडू शकेल? असो). >>>

नाही परवडू शकत सगळ्यांना ते पिस्तुल पण साधी मिरपूड, लाल तिखट परवडू शकतो. आम्हाला ऑफिस मध्ये सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग मध्ये या वस्तू व काही तत्सम पटकन उपयोगी पडू शकतील असे फंडे सांगितले होते. आणि मला आठवते हे लाल तिखटदि फंडे लहानपणी सुद्धा शाळेत वैगरे सांगितले जायचे.

कायदा सुव्यवस्था व व्यक्तिस्वातंत्र्याकरिता ज्याचे जगात आदराने नाव घेतले जाते अशा अमेरिका ह्या देशांतही तुम्हाला शिकागोसारख्या शहरांत एखाद्या विशिष्ट वर्णाच्या गुन्हेगाराने अडविले तर आपल्या जवळील रक्कम, मौल्यवान वस्तू विनाप्रतिकार त्याच्या हवाली करा. प्राणापेक्षा मौल्यवान काहीच नाही तेव्हा काहीशा किंमतीच्या वस्तूकरिता आपला जीव गमावू नका असा सल्ला आणि तोही तिथल्या पोलिसांकडून आजच्या काळातही दिला जातो. या सल्ल्याविषयी कधी कुणी हरकत घेतल्याचे अथवा असा सल्ला देणारे गुन्हेगारांच्याच मानसिकतेचे असल्याचा आरोप केल्याचे ऐकिवात नाही.>>>>>

चे सु गु सर, यातून आपल्याला काय म्हणायचे / सुचवायचे आहे ते मला बिलकुल कळले नाही. प्लीज जरा नीट एक्स्प्लेन कराल का ?

nagaland मध्ये एका बलात्कार्याला ४००० च्या जमावाने निर्दयपणे ठार मारले तसेच ह्यालाही मारायला पाहिजे.

लेख अजिबात आवडला नाही

त्यापेक्षा तुम्ही चोरावर संस्कार करा की त्याने दुसऱ्याच्या वस्तुला हात लावू नये. बळीने असे विधान केले तर ते किती हास्यास्पद ठरेल नाही का या घटनेमध्ये>>> अजिबात हास्यास्पद ठरणार नाही. ओरबाडता येतेय म्हणून ओरबाडायचे ही प्रवृत्तीच चुकीची आहे!!! मग ते चोरी, बलात्कार, किंवा इतर कोणताही गुन्हा असो लागू पडते.

कृपा करा आणि स्त्रियांची तुलना वस्तुंशी करु नका: फूल, हीरा, बर्फी, पैसे काहीच नको!!! आम्हीसुद्धा हाडामासाची माणसे आहोत. आम्हाला माणूस म्हणून जगु द्या!!!!

बलात्कार आणि खूनाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतरही मुकेश सिंग आणि इतर गुन्हेगारांना शिक्षा होत नाही हे कसले द्योतक आहे? त्यावर तुमच्या लेखात तुम्ही काही लिहिले आहे का??

इतर त्रयस्थ वाचक वगैरे मंडळी मनात किंवा उघड एकमेकांशी म्हणतील - "काय माणूस आहे? स्कूटरच्या डिकीत एवढी रक्कम ठेवून स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी केलीच कशी काय? " गंमत म्हणजे साधारण याच आशयाचे वक्तव्य त्या व्यक्तीशी त्याचे नातेवाईक, सहकारी, मित्र आणि अगदी तक्रार नोंदवून घेणारे पोलिस देखील करतील.

समजा घटनेतला चोर सापडला तर तोही असेच सांगेल की "स्कूटर बाहेर रस्त्यावर उभी होती. डिकीचे झाकण फारच सहज उघडता आले आणि आतली रक्कम पाहून मला मोह झाला व मी चोरी केली. तशी बँकेतली सुरक्षित रक्कम सहजासहजी लुटायचे माझे धाडस होणार नाही पण हे कृत्य फारच सोपे व सहजसाध्य होते म्हणून मी केले. " >>>

इथपर्यंत वाचू शकलो.

जिवंत हाडामासाच्या, भावना असलेल्या स्त्री ची तुलना डिकीतल्या पैशांशी केली जाणं हे झेपलंच नाही.
थोडा वेळ त्या मुलीच्या जागी आपली मुलगी, बहीण असती तर असा शब्दांचा डोलारा आपण उभा करू शकलो असतो का ?

माझ्या मते आपली संपत्ती, मौल्यवान वस्तू, दागदागिने हे सांभाळून ठेवता न येणे हा बावळटपणा झाला. पण स्त्रीचं शील हे निर्जीव रोख रक्कम, मौल्यवान वस्तू किंवा दागदागिने याप्रमाणे आहे का ?

ओढून ताणून जरी याचं उत्तर हो असं असेल ( अशक्य आहे खरंतर) तर मग पुन्हा ते सांभाळणाराच दोषी ठरवला गेला पाहीजे.

माझं बहुसंख्य स्त्रियांशी जमत नाही ( त्यांच्या स्वभावामुळं). पण याचा अर्थ असा नाही होत की जे चूक आहे त्याला बरोबर ठरवावं.

एकसारखे आक्षेप घेणार्‍या प्रत्येक प्रतिसादकाला स्वतंत्र प्रतिसाद देण्यापेक्षा लेखातच पुरवणी स्पष्टीकरण जोडले आहे.

प्रत्येक प्रतिसादकाला स्वतंत्र प्रतिसाद देण्यापेक्षा >>> त्याची गरज नसते. एकदा मुद्दा मांडल्यावर पुन्हा विरोधातलं मत खोडलंच पाहीजे हा आग्र्ह कशासाठी ?

<< एकदा मुद्दा मांडल्यावर पुन्हा विरोधातलं मत खोडलंच पाहीजे हा आग्र्ह कशासाठी ? >>

बाळू,

खोडणं आणि निराकरण करणं यात फरक आहे. माझ्या लिखाणातून वेगळाच अर्थ निघतो आहे असं प्रतिसादकाचं मत होत असेल किंवा एखादे वेळी त्याला माझ्याकडून अधिक स्पष्टीकरण हवं असेल तर ते देणं मी माझं कर्तव्य समजतो.

माझ्यामते समाज हाच मोठा गुन्हेगार आहे. तुम्ही वर दिलेली उदाहरणे पहा - एखाद्या माणसाचे १०लाख रुपये गी म्हणून कोणी त्याला वाळीत टाकत नाही, ना त्याची बायको त्याला सोडून देत, किंवा घरचे विहिरीत लोटून देण्याची भाषा करत.
बलात्कार / खून हे मोठे गुन्हे का आहेत, तर त्याने त्या माणसाचे न भरून येणारे नुकसान होते म्हणून. त्यामुळे इतर गुन्ह्यांचा बळीचा न्याय या गुन्ह्याला लागू होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्कूटरचे नुकसान आणि शरीराची मोडतोड या गोष्टींची तुलना होऊच शकत नाही. इट्स अ‍ॅपल टू ऑरेंज.
राहिली गोष्ट ती प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची, त्याबद्दल मात्र तुमच्याशी सहमत. समाज/ संस्था परिपक्व झालेल्या नसताना ज्या व्यक्ती काळाच्या पुढे जातात त्यांना त्याची किंमत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चुकवावी लागतेच. ज्या समाजाय लै>गिकता हा मुक्त चर्चेचा देखील विषय नाही तिथे लैंगिकतेचे थोडेसे देखील प्रदर्शन विनाशाला कारण होऊ शकते. यात बलात्कार्‍यांची हलावण करण्याचा उद्देश नाही, परंतु पुढे जाण्याच्या वेगात अश्या काही घटना घडणारच. अश्या घटनांमधील गुन्हेगारांना होणार्‍या कठोर शासनातूनच हा बदल समाजात हळूहळू स्थिरावेल.

आता अजून एका आक्षेपाचा समाचार घेतो, तो म्हणजे केवळ उत्तान कपडे घातलेल्या स्त्रियांवरच बलात्कार होत नाहीत - मी जे उदाहरण देणार आहे त्यावरून माझ्यावर स्त्रियांच्या वस्तूकरणाचा आरोप होईल, पण नाइलाज आहे... तुम्ही वर दिलेले उदाहरण, म्हणजे स्कूटरच्या डिक्कीतून पैसे चोरणे. उदाहरण घ्या, एखादा गरीब माणूस आहे, तो रोज बँकेत जातो, भरपूर पैसे दिसतात त्याला, त्याला त्या पईशांचा हेवा वाटतो, खूप इच्छा होते ते चोरण्यची, पण तिथल्या टाईट सिक्युरिटीमुळे तो हे पैसे चोरू शकत नाही. त्याला काही कारणाने रस्त्यावरून जाताना जर एखाद्या स्कूटरच्या डिक्कीत काही पैसे दिसले, तर तो ते नक्कीच चोरणार. कारण ते सॉफ्ट टारगेट आहे. सर्वसामान्य गुन्हेगार नेहमी गुन्हे सॉफ्ट टारगेटसोबतच करतो. पण त्या गुन्ह्यांची पाळेमुळे त्या टारगेटमध्ये असतीलच असे नाही. त्यामुळे जोपर्यंत गुन्हेगारी मानसिकता आहे तोपर्यंत गुन्हे हे होणारच. आपण सॉफ्ट टारगेट होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक..

चेतन तुमचे स्पष्टीकरण वाचले. इतर लोकांना जेवढी काळजी वाटते त्यापेक्षा अधिक काळजी बलात्कार होउ नये म्हणून सर्वसामान्य स्त्रिया स्वतः घेतच असतात (असे आपले माझे मत आहे). पण काही महिन्यांपूर्वी बंगलोरमध्ये घरात घुसून विवाहित महिलेवर बलात्कार झाला आणि तिच्या पतीस मारहाण झाली. म्हणजे घरात कोंडून घेउन, बरोबर पुरुष माणूस असूनसुद्धा बलात्कार होणार नाही अशी काही हमी देता येत नाही. तसेच साडी नेसलेल्या किंवा अंगभर कपडे घातलेल्या स्त्रियांवर बलात्कार कमी होतात असा काही डेटा आहे का?? मग सावध रहावे म्ह्णजे नक्की काय करावे?

तुम्ही तुमचा लेख निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरण आणि त्यावरील लघुपट केंद्रस्थानी ठेवून लिहिला आहे तेव्हा " स्त्री विरुद्ध पुरुष अशी लढाई नसून चांगला विरुद्ध वाईट अशी लढाई आहे." हे म्ह्णणे कितपत योग्य आहे?

चेतन सुभाष गुगळे
तो बांगलादेशी होता कि भारतीय होता, हिंदू होता कि मुस्लिम हा मुद्दा गौण अहे. तो बलात्कारी होता हे महत्वाचे . त्याला मारण्याचं मी समर्थनच करणार .
नरकात सडत पडण्याचे , भयानक भोग भोगायचे डोहाळे लागलेल्यांना असंच पाहिजे .

<< तो बलात्कारी होता हे महत्वाचे . त्याला मारण्याचं मी समर्थनच करणार . >>
त्यावर देखील शंका व्यक्त होत आहे आता.

चेतन सुभाष गुगळे

तुमच्या उत्तराच्या प्रतिउत्तराला प्र्प्रऊ देण्याचे टाळत होतो. कारण अन्यत्र तुमचे इतर अनेक चांगले लेख वाचनात आलेले आहेत. स्त्री संबंधी विषयात पुरूष लेखकांची फसगत होण्याची शक्यता अधिक असते. तुमचा लेख अर्धवट वाचला होता कारण पुढची दिशा लक्षात आली होती. आता संपूर्ण वाचल्यानंतर त्यात काही बदल झालेला नाही यामुळे अंदाज चुकला नाही याबद्दल मनापासून वाईटच वाटले.

तुम्ही जी उदाहरणे देत आहात त्यामधे मुद्दामून दिलेले आमंत्रण असा तुमचा मुद्दा आहे. स्कुटर मधे पैसे ठेवणे आणि चोरीला आमंत्रण देणे हे उदाहरण बलात्कारासारख्या केस मधे कसे लागू पडते हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. जिथे गुन्हेगारी जास्त आहे अशा ठिकाणी एकटीने तोकडे कपडे घालून रात्रीअपरात्री जाणे अशा केसमधे हा तुमचा मुद्दा लागू होईल.

पण अशा केसेसचं परसेंटेज किती असावं याची तुम्हाला काही कल्पना आहे का ? जेव्हढे बलात्कार होतात त्यात अशा प्रकारे स्वतःहून उगीचच संकटाला निमंत्रण दिलेलं आहे अशा केसेस बहुसंख्य आहेत का ?

याबाबतीत थोडी शोधाशोध केलीत तर तुम्हाला असं आढळून येईल की बहुसंख्य बलात्कार हे चार भिंतींच्या आत होत असतात. ते ही ओळखीच्या किंबा नात्यातल्या व्यक्तीकडून. काही बाबतीत कामवालीवर मालकाकडून. म्हणजेच ओळखीत. यात त्या मुलीवरच दबाव येतो , कारण दोघेही ओळखीचे असल्याने प्रकरण मिटवण्याकडे कल असतो. बरेचदा पोलीस सुद्धा असाच सल्ला देतात असे महिला संघटनांचे म्हणणे आहे.

वास्तव असे आहे. यावर बरेच काही म्हणणे मांडता येईल, पण तुमचे काम जास्तच वाढेल याची कल्पना असल्याने आवरते घेतो.
लोभ असावा.
राग मानू नये
कृअप्या गैस नसावा
काळजी घ्यावी

आपला एक हितचिंतक

सिंधूताई सपकाळ यांचं उदाहरन दिलं गेलेलं आहे.
त्या एक आदरणिय व्यक्ती आहेत. पण त्या समाजसेविका आहेत हे लक्षात ठेवायला पाहीजे. त्यांच्या कामामुळे समाजाच्या सेवेची प्रेरणाही मिळू शकते. पण त्यांच्याकडे समाजपरीवर्तक म्हणून मी तरी पाहत नाही. समाजामधे बदल घडवून आणणारे विचार देणारे ग्रेट थिंकर या कॅटॅगरीत त्या नाहीत असं माझं मत आहे. त्यामुळे त्यांचं प्रत्येक मत मान्य असायला हवं असं काही नाही.

सावधगिरी ही प्रत्येकच घटनेत बाळगावी लागते. प्रत्येक प्रकरणात ती वेगवेगळ्या प्रकारे बाळगता येते. स्थळ काळाचे भान, सामान्य ज्ञान, आंतरिक जाणीव या बाबी पुरेशा आहेत.

आंतरिक जाणीव याबाबत थोडेसे अधिक स्पष्टीकरण - अनेकदा महिला असे बोलून दाखवितात की त्यांना वाईट पुरुषाची नजर बरोबर कळते (आणि हे कित्येकदा खरेदेखील असते). तर मग त्या फसतात तरी कशा तर आतला आवाज ऐकायला आला तरी त्याकडे दूर्लक्ष करून पुढे धोका असतानाही जात राहतात.

<< याबाबतीत थोडी शोधाशोध केलीत तर तुम्हाला असं आढळून येईल की बहुसंख्य बलात्कार हे चार भिंतींच्या आत होत असतात. ते ही ओळखीच्या किंबा नात्यातल्या व्यक्तीकडून. काही बाबतीत कामवालीवर मालकाकडून. म्हणजेच ओळखीत. यात त्या मुलीवरच दबाव येतो , कारण दोघेही ओळखीचे असल्याने प्रकरण मिटवण्याकडे कल असतो. बरेचदा पोलीस सुद्धा असाच सल्ला देतात असे महिला संघटनांचे म्हणणे आहे. >>

माझ्या माहितीत अशी एक तरूण (वय वर्षे अंदाजे २० फक्त) कामवाली आहे की झाडू मारणे, फरशी पुसणे अशी कामे करतानादेखील अतिशय उत्तान कपडे घालून येते. असे कपडे परिधान करून खाली वाकून काम करणे किती चूकीचे आहे. बरे तिला असे कपडे वापरायचेच असतील (तिच्या पोशाख स्वातंत्र्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही) तर निदान तिने ज्या खोलीत पुरुष बसलेला आहे तिथे आपले काम करण्यापूर्वी त्याला खोलीबाहेर जा असे स्पष्ट सुनवावे व मगच त्या खोलीत काम करावे. माझ्यासमोर तिने घरमालक सोफ्यावर बसलेला असताना त्याला फक्त पाय वर घेण्यास सांगितले आणि तसेच खाली वाकून झाडून व फरशी पुसून घेतली. हे चूकीचे आहे. आमच्या घरात आमची कामवाली (तिचे कपडे अतिशय अदबशीर असून देखील) फरशी पुसतेवेळी जर मी किंवा आमच्या घरातील इतर पुरुष मंडळी त्या खोलीत असू तर आम्ही स्वतःच आधी तिथून बाहेर पडतो व मगच तिला तिथे काम करू देतो. खरेतर प्रत्येक पुरुषाने ही खबरदारी घ्यायला हवीच. याचप्रमाणे प्रत्येक कामवालीने देखील ही काळजी घ्यायलाच हवी. तुम्ही म्हणताय तसे कामवालीसोबत गैरवर्तन करणारा मालक अगदी पहिल्याच दिवशी गैरवर्तन करीत नाही, परंतु पहिल्या काही दिवसांतच तिला ती सावध राहिल्यास त्याच्या नजरेचा / हेतूंचा अंदाज येत राहतो. फक्त चार पैसे मिळतात म्हणून आतला आवाज नको म्हणत असताना देखील तिने ते काम करण्यात काहीच हशील नाही. मालकीण चांगली असेल तर काम सोडण्याआधी थेट मालकीणीकडेच तक्रार केल्यास अजुनच उत्तम.

<< वास्तव असे आहे. यावर बरेच काही म्हणणे मांडता येईल, पण तुमचे काम जास्तच वाढेल याची कल्पना असल्याने आवरते घेतो. >>

निश्चितच यावर आपण लिहू तितके कमीच. मी या लेखात काही सर्वसाधारण उदाहरणे दिली आहेत. प्रत्येक स्त्रीच्या परिस्थितीप्रमाणे तिला उचलावी लागणारी पावले, घ्यावी लागणारी काळजी वेगळी असेल पण ती घेण्याकरिता वर सांगितल्याप्रमाणे स्थळ काळाचे भान, सामान्य ज्ञान, आंतरिक जाणीव या बाबी पुरेशा आहेत.

<< राग मानू नये
कृअप्या गैस नसावा
काळजी घ्यावी

आपला एक हितचिंतक >>

राग येण्याचा प्रश्नच नाहीये. अर्थात तुम्ही हे शब्द लिहीलेत ते मात्र माझ्या मूळ लेखात असायला हवे होते असे आता मला वाटू लागले आहे कारण अनेक महिला वाचकांनी राग मानून घेतला आहे, त्यांचा गैरसमज देखील झाला आहे जेव्हा की माझ्या लेखाचा उद्देश त्यांनी काळजी घ्यावी या भावनेतून व एक हिंतचिंतक म्हणून लिहीला होता.

उत्तान कामवाली Lol
विशेष टिप्पणीचा मोह आवरावा लागत आहे.

(लगेच एखादी कथा येण्याची शक्यता आहे या शीर्षकासहीत )

<< उत्तान कामवाली
विशेष टिप्पणीचा मोह आवरावा लागत आहे. >>

मी उत्तान कपडे घातलेली असे लिहीले आहे. कृपया त्यास वेगळा रंग देऊ नये. कपडे कसे होते याचेही सविस्तर वर्णन करता येईल परंतु ते अधिकच खराब वाटेल म्हणून केवळ एक शब्दाच्या विशेषणात कपड्यांचे वर्णन केले आहे.

अहो, पत्ताच दिलेला नाही तर कपड्यास वेगळा रंग देण्याचा प्रश्नच कुठे येतो ? शिवाय मी का देऊ ? ना ओळख, ना पाळख... आणि असती तरी त्या महीलेची परवानगी नको का? असली तरी माझी तयारी नको का ?

सध्याच्या संवेदनाशील विषयावर संयत पणे कळकळीने लिहिलेला अभ्यासपुर्ण लेख ! उदाहरणे, स्पष्टीकरण विश्लेषण अतिशय चपखल ! लेख प्रदीर्घ असुन सुद्धा वाचनीय झालाय तो यामुळेच ! या विषयावर एकांगी पणे स्वत:ची मते बनवणे या कॅटेगीरीतल्या लोकांसाठी तर ही खरोखरच वैचारिक मेजवानी आहे.

सुरक्षितता मग ती कुठल्याही प्रकारची असो, त्याला प्रो-ऍक्टिव्ह मेजर घेतातच (उदा. औद्योगिक कारखाने) अपघात घडु नये म्हणुन आटोकाट प्रयत्न करतात. त्या साठी सेफ्टी विभाग हा विशेष विभाग असतो (हा विभाग असणे हे कायद्याने बन्धन्कारक आहे) या दृष्टीकोनातुन विचार केल्यास लेखकाचे म्हणणे अतिशय महत्वाचे ठरते. आपणच ठरवायचे प्रो-ऍक्टिव्ह व्हायचे की रि-ऍक्टिव्ह व्हायचे !

या दृष्टीने लेखातील खालील मुद्दे फारच महत्वाचे:

>> चोरी करू नका हे सर्वांना शिकविले जाते. काही जण ते पाळतात इतर काही पाळत नाही. जे पाळत नाहीत त्यांना आपण बदलू शकत नाही तर निदान त्यांच्यापासून सावध राह्यला हवे. असा सावधगिरीचा सल्ला देणारा चोरीचा साथीदार नक्कीच नसतो.<<

>>ज्यांची बलात्कार करायची प्रवृत्ती आहे ते तो करतात. त्यांच्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारे नक्कीच त्यांचे समर्थक नसतात हे समजून न घेतल्यास संभाव्य नुकसान कुणाचे हे पुन्हा वेगळे सांगण्याची गरज नाहीये. <<

>> दुर्घटना घडून गेल्यावर त्याला जबाबदार कोण आणि त्याला शासन काय व्हावे ह्या लांबच्या गोष्टी आधी आपल्यासोबत दुर्घटना घडू नये ही खबरदारी घेणे महत्त्वाचे.<<

>> स्त्रियांचे पालक, पती त्यांना संरक्षण पुरवितात, सोबत येतात जे काही स्त्रियांना पारतंत्र्य वाटते. <<

श्री. प्रकाश घाटपांडे आणि मी-अनु यांचे प्रतिसाद उल्लेखनिय आहेत.
एक चांगला लेख व त्यावरची उद्बोधक चर्चा वाचुन समाधान वाटले.

प्रो-ऍक्टिव्ह सेफ्टी मेजरचा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद चौथा कोनाडा.

दिवंगत अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका स्मिता तळवळकर यांचा सातच्या आत घरात - वेळ नव्हे मर्यादा हा चित्रपट देखील नेमके हेच सुचवितो.

काळजी घेणे किंवा तसे सुचविणे म्हणजे विरोधक असणे नव्हे हे समजण्याकरिता अक्स चित्रपटातलं सुरुवातीचं दृश्य ज्यात धोक्याचा वास आल्याने सुरक्षा प्रमुखाच्या (अमिताभ बच्चन) सूचनेवरून मंत्र्याचा ताफा ठरलेल्या मार्गावरून पुढे न जाता माघारी फिरतो ते जरूर पहावं.

धन्यवाद, चेतन सुभाष गुगळे !
सदरचा लेख एका स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेला पाहताना सुखद धक्का बसला. अभिनंदन गुगळेसाहेब !
नेट वर ही सापडला.

Aapla JanSanvad
http://www.aaplajansanvad.com/E-papers.aspx

पुलेशु.

माझ्या माहितीत अशी एक तरूण (वय वर्षे अंदाजे २० फक्त) कामवाली आहे की झाडू मारणे, फरशी पुसणे अशी कामे करतानादेखील अतिशय उत्तान कपडे घालून येते. असे कपडे परिधान करून खाली वाकून काम करणे किती चूकीचे आहे. बरे तिला असे कपडे वापरायचेच असतील (तिच्या पोशाख स्वातंत्र्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही) तर निदान तिने ज्या खोलीत पुरुष बसलेला आहे तिथे आपले काम करण्यापूर्वी त्याला खोलीबाहेर जा असे स्पष्ट सुनवावे व मगच त्या खोलीत काम करावे. माझ्यासमोर तिने घरमालक सोफ्यावर बसलेला असताना त्याला फक्त पाय वर घेण्यास सांगितले आणि तसेच खाली वाकून झाडून व फरशी पुसून घेतली. हे चूकीचे आहे. आमच्या घरात आमची कामवाली (तिचे कपडे अतिशय अदबशीर असून देखील) फरशी पुसतेवेळी जर मी किंवा आमच्या घरातील इतर पुरुष मंडळी त्या खोलीत असू तर आम्ही स्वतःच आधी तिथून बाहेर पडतो व मगच तिला तिथे काम करू देतो >>>>>

मित्राकडील उकाबद्दलच्या आपल्या भावना पोहोचल्या. मित्राला जपा. जड अंतःकरणाने तुमच्याकडील अ.का.ला त्याच्याकडे पाठवा व त्याच्याकडील उका तुमच्याकडे ठेवा. अशाने मित्रास वाचवल्याचे समाधान तुम्हाला मिळेल. स्वतःचा बळी गेला तरी मित्रकर्तव्यापुढे बेहत्तर !

Pages