आपला तोच बाब्या !

Submitted by रसप on 6 March, 2015 - 01:32

२४ फेब्रुवारी २०१०.
ग्वाल्हेरला सचिन तेंडूलकरने अजून एक इतिहासाचं पान स्वत:च्या नावाने लिहून घेतलं. वनडेमधलं पहिलं द्विशतक झळकावून. त्यानंतर बरोब्बर त्याच दिवशी पाच वर्षांनंतर ख्रिस गेलने इतिहासाचं एक पान स्वत:च्या नावाने लिहून घेतलं. वनडेत द्विशतक झळकावणारा पहिला अ-भारतीय खेळाडू बनून आणि वर्ल्डकपमधील सगळ्यात मोठी वैयक्तिक धावसंख्या नोंदवून. गेली दोन वर्षं निद्रिस्त असलेला ज्वालामुखी कॅनबेराच्या मानुका ओव्हल मैदानावर उफाळला आणि झिम्बाब्वेचा प्रत्येक गोलंदाज त्या लाव्ह्यात होरपळला. गेलच्या साथीने मार्लन सॅम्युअल्सने शतक झळकावलं. पण त्या १३३ धावांसाठी त्याने १५६ चेंडू घेतले. ह्या जास्तीच्या २३ चेंडूंपैकी जर अर्ध्या चेंडूंवरही त्याने एक धाव घेऊन गेलला स्ट्राईक दिला असता तर त्याने कदाचित पावणे तीनशे धावाही कुटल्या असत्या. एका फलंदाजाने द्विशतक करूनही संघाची धावसंख्या चारशेपर्यंत पोहोचत नाही, ही खरं तर फलंदाजीची कमजोरी मानायला हवी. पण तरी गेलला सूर गवसणे ही विश्वचषकातील इतर सर्व संघांसाठी ही एक धोक्याची घंटाच आहे. ख्रिस गेल हा असा एक खेळाडू आहे की जो संघाची धावसंख्या एकहाती उंचच उंच नेऊन ठेवू शकतो. झिम्बाब्वेनंतरच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र गेल पुन्हा फेल झाला. ह्यावर विचार करायला हवा. मला असं वाटतं की गेल हा असा खेळाडू आहे जो सुमार गोलंदाजीची बेसुमार धुलाई करतो. मात्र भेदक जलदगती किंवा शिस्तबद्ध स्विंग किंवा अचूक फिरकी गोलंदाजी मात्र गेलला बांधून ठेवते. उत्कृष्ट चेंडूवर धावा जमवण्याची हातोटी त्याच्यात कमी असल्याचं नेहमीच जाणवतं. तसंच, दबावाखाली गेलने फार क्वचित चांगला खेळ दाखवला आहे. तो नेहमीच प्रथम फलंदाजी करताना जास्त आश्वासक वाटतो. भारतीय संघाने गेल्या दोन सामन्यात ज्या शिस्तीने गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केले, तेच त्यांनी आजच्या विंडीजसोबतच्या सामन्यात दाखवलं तर गेलसाठी हा सामना सोपा नसेल.

दुसरी गोष्ट. हा सामना पर्थला खेळवला जातो आहे. पर्थ म्हणजे बाउन्स आणि गती. वनडेला शोभेल म्हणून त्या खेळपट्टीला कितीही सजवलं तरी ती आपला मूळ गुणधर्म सोडणार नाहीच. त्यामुळे तेज गोलंदाज शमी-यादव आणि विंडीजचे सगळेच, ह्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी असे काही उत्सुक असतील जसा सलमान खान उघडा होण्यासाठी असतो. उसळत्या चेंडूंसमोर अमिरातीसोबतच्या सामन्यात भारतीयांची परीक्षा पाहिली गेलीच नाही. तो सामना म्हणजे पेपर फुटल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासापुरते मार्क्स दिल्यासारखा होता. पण धवन-रोहित-विराट-अजिंक्य-रैनाची आजच्या सामन्यात नक्कीच परीक्षा पाहिली जाईल. रोहित आणि विराटने अमिरातीसमोर 'रस्ते का माल सस्ते में' पाहून धावांची काही घाऊक खरेदी केली, पण आज मात्र त्यांना बाजारभाव समजू शकेल.

विराट कोहली पुन्हा एकदा खेळाव्यतिरिक्तच्या थेरांसाठी चर्चेत आलेला आहे. अजून एका विजयाने त्याचं चित्त थाऱ्यावर येवो. त्याचं वाचन वगैरे फार काही असेल असं त्याला पाहून वाटत नाही आणि मराठीचा तर त्याला निश्चितच गंधही नसावा. त्याच्यासाठी पुलंच्या अंतू बर्व्याने एक सुंदर वाक्य रत्नांग्रीच्या त्या सुप्रसिद्ध लोकोत्तर पुरुषांच्या आळीत पेरून ठेवलं आहे. 'गोठ्यात निजणारांना बैलाच्या मुताची घाण येऊन कसं चालेल ?' जर खेळाशिवाय इतरही काही क्षेत्रांत आपलं कर्तृत्व असेल, तर बातमी तर होणारच ना ? थयथयाट करणे, तमाशा करणे हा कोहलीचा स्वभावच आहे. पण लग्न झाल्यावर जबाबदारीने वागायचं असतं, तसंच कसोटी कर्णधार झाल्यावर गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या उतावळ्या नवऱ्यासारखं वागणं शोभत नसतं.

वेस्ट इंडीजच्या संघावर भारतीय क्रिकेटप्रेमींनी नेहमीच मनसोक्त प्रेम केलं आहे. त्यांनी श्रीलंकेत ट्वेंटी२० विश्वचषक जिंकला, तेव्हा मुंबई-दिल्लीत सुद्धा जल्लोष झाला होता आणि विंडीज खेळाडूंसोबत अनेकांनी घरातल्या घरात गंगनम नृत्य केलं होतं. विश्वचषकाच्या सुरुवातीला आयर्लंडने विंडीजवर मात केली तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. आजचा सामना कदाचित त्यांच्यासाठी 'करा किंवा मरा' असणार आहे. आजच्या सामन्यातल्या जयपराजयावर त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश बराच अवलंबून असणार आहे. पण म्हणून मी त्यांना जिंकण्याच्या शुभेच्छा देऊ शकत नाही ! कारण शेजारचा मुलगा कितीही लाडका असला, तरी आपला तोच बाब्या असतो ना ! एक चांगली लढत बघायला मिळो. उत्तम दर्ज्याचं क्रिकेट खेळलं जावो. कुणाच्या हरण्याचं कुणाला दु:ख नसावं, खेळ जिंकला असल्याचा आनंद असावा, असे काही आयडीयलिस्टीक विचार मनात येत आहेत. पण ह्या सगळ्याच्या मूळाशी एकच भावना आहे ती म्हणजे अजून एका भारतीय विजयाची इच्छा !

- रणजित पराडकर
....#रसप....

http://www.ranjeetparadkar.com/2015/03/blog-post_6.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण धवन-रोहित-विराट-
अजिंक्य-रैनाची आजच्या सामन्यात नक्कीच
परीक्षा पाहिली जाईल.>>>>>
सगळे नापास झाले.