दरवाजा खुलाही रखना भैय्या ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 March, 2015 - 08:41

..

परवा शुक्रवारी एका मित्राच्या घरी मुक्काम होता. कॉलेजचाच मित्र, घरचे गावाला गेलेले. तो घरी एकटाच. मग काय, सोबत म्हणून मी आणि आमचा आणखी एक मित्र त्याच्या घरी जमलो. रात्र गप्पांमध्ये जागवली आणि सकाळी अर्धवट झोपेत बिछान्यातच लोळत विश्वचषक क्रिकेटचे सामने बघितले. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आणि भारत-यूएई, दोन्ही सामने लवकर संपल्याने दुपारी लवकरच मोकळे झालो. जेवण बाहेरूनच मागवलेले, ते देखील उरकून झाले. बाहेर वातावरणाचे नियम धाब्यावर बसवत पावसाची रिमझिम चालू होती. या अवेळी पावसात भिजण्याची जराही इच्छा नसल्याने रूमवरच अडकून होतो. त्यातही सोबत असलेल्या दुसर्‍या मित्राचे काहीतरी काम असल्याने तो जेवण झाल्यावर निघून गेला. उरलो आम्ही दोघेच. गप्पा तरी किती मारणार, टीव्ही तरी किती बघणार. मोबाईलमध्ये डोके खुपसणे तर रोजचेच असते. अंग आळसावले होते, पण सकाळपासून लोळत काढल्याने झोपही शक्य नव्हती. ईतक्यात समोरून एका लहान मुलाचा दंग्याचा आवाज आला, तसे मित्राने दरवाजा उघडला. पाहिले तर समोरच्या घरात लहानशी मुलगी होती. अगदी चिमुरडी. लहान मुलांची वये मला असे नुसते बघून ओळखता येत नाहीत. कारण कुठल्या वयात ती चालायबोलायला लागतात याचे कोष्टक मला ठाऊक नाही. पण तरी साधारण दोनेक वर्षांची असावी, आणि शाळेत जाण्याच्या वयाची अजून झाली नसावी. तिची आई तिला जेवण भरवत होती आणि तिचे आईला त्रास देणे चालू होते. मित्राने (बहुधा त्याच्या नेहमीच्या सवयीने) दारात उभे राहून काही नकला केल्या. समोरूनही तसेच प्रतिसाद आले. मुलगी सुद्धा एक नंबरची सॅंपल दिसत होती. माझे तिथे अनोळखी असणे विसरून मी देखील त्यांच्यात थोडाफार सामील झालो.

दहा-पंधरा मिनिटांनी तिचे खाणेपिणे उरकले आणि मलाही लहान मुलांची आवड आहे हे ओळखून माझ्या मित्राने तिला तिच्या घरातून उचलून आणले. अर्थात तिच्या आईला सांगूनच. माझाही आळसावलेला जीव बरायं हा टाईमपास म्हणत सुखावला. मित्राने तिला घरात आणताच मी दरवाजा बंद करायला म्हणून ढकलायला गेलो, तेच समोरून त्या मुलीच्या आईने मोठ्याने आवाज दिला, "दरवाजा खुलाही रखना, भैय्या.." .. मी दरवाज्याला हात घालताच मोठ्या तत्परतेने आलेला तो आवाज, जणू दरवाजा बंद करताच एक अनर्थ घडेल, जे होऊ नये यासाठी मारलेली ती हाक. नक्की का अन कश्यासाठी ते जाणवल्यावाचून राहिले नाही. पाठोपाठ मित्र देखील म्हणाला, ‘दरवाजा उघडाच राहू दे रुनम्या, तिच्या आईला बंद केलेला आवडत नाही..

लोकल ट्रेनने प्रवास करताना, प्लॅटफॉर्मवरचा टीसी जेव्हा ‘तिकीट तिकीट’ करत थांबवतो, तेव्हा एवढ्या प्रवाश्यांच्या लोंढ्यात नेमके मलाच तिकीट का विचारले, मी चेहर्‍यावरून वा पेहरावावरून विदाऊट तिकीट प्रवास करण्याची शक्यता असणारा भुरटा प्रवासी वाटतो का, अशी शंका नेहमीच माझ्या मनात येते. तशीच काहीशी अपराधीपणाची भावना त्या आईने केलेली सूचना ऐकताना झाली. भले त्या मित्राने हे ती नेहमीच सांगते आणि त्यालाही सांगते असे म्हटले तरीही..

एक काळ होता, जेव्हा माझी नोकरी करणारी आई मला आज्जीच्या, म्हणजे वडीलांच्या आईच्या भरवश्यावर सोडून जायची. अर्थात आज्जीला जे झेपेल, जमेल तेवढे ती करायचीच, पण माझा खरा सांभाळ झाला तो शेजार्‍यापाजार्‍यांकडूनच. एकेक जण अगदी आपला नंबर लावत मला घेऊन जायचे. कधी मोकळ्या पॅसेजमध्ये मी चुकून एकटाच सापडलो तर रस्त्यावर पडलेली नोट पटकन संधी मिळताच उचलावी तसे मला उचलून आपल्या घरी न्यायचे. खेळणेच नाही तर मग खाणेपिणेही त्यांच्याकडेच व्हायचे. संध्याकाळी आई कामावरून आली की पहिल्यांदा माझ्या शोधात आजूबाजुची घरे फिरायची. मग मला काय हवे नको ते बघून ती पुन्हा आपल्या कामात व्यस्त आणि मी पुन्हा आजूबाजूची घरे फिरायला मोकळा व्हायचो. त्यानंतर मग रात्री आईची घरची सारी कामे आवरली की मगच ती पुन्हा माझा ताबा घ्यायला सज्ज व्हायची.

अर्थात याने मला आईचा असलेला लळा वा प्रेमात काही फरक नाही पडला ती गोष्ट वेगळी,
पण इथे सांगायचा मुद्दा हा की दरवाजा खुला असताना माणसे जशी असायची तशीच ती बंद दरवाज्यापाठीही असायची, ती बदलायची नाहीत. आणि ती तशीच राहणार हा विश्वास सर्वांनाच होता.

अर्थात हा काळ त्यामाने जुनाच झाला, पण दहा-बारा वर्षांपूर्वीही परिस्थिती काही अशीच होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की कोणाकोणाच्या घरात असेच बिल्डींगमधील लहानथोर सर्वच वयोगटातील मुलांचे अड्डे भरायचे. तेव्हाही कोणाच्या मनात बंद दरवाजाच्या पलीकडे काही गैर प्रकार घडत असेल अशी शंका आली नव्हती. वा आलीही असल्यास ते शंका घेतले जाणारे गैर प्रकार व्यसनांपलीकडे नव्हते. त्या काळात जर आमीरचा ‘सत्यमेव जयते’ टेलिकास्ट झाला असता, तर इतर सर्व समस्यांचे एपिसोड जसेच्या तसे असते, मात्र चाईल्ड अ‍ॅब्यूजवर एखादा भाग घेणे कदाचित गरजेचे वाटले नसते, वा तसा भाग आला असता तरी आमच्याकडे कोणी तो गंभीरपणे घेतला नसता.

असो, पण कालच्या त्या प्रसंगानंतर त्या मुलीबरोबर मनासारखे खेळणे झाले नाही. आपली यात काही चूक नाही हे माहीत होते, समोरच्याचीही काही नाही हे पटत होते, यामागे फक्त समाजातील बदललेली परिस्थिती आणि मानसिकता आहे हे देखील समजत होते, पण तरीही "दरवाजा खुलाही रखना भैय्या.." नंतर माझ्यातला भैय्या तिथेच दबला....

..

हे काल रात्रीच लिहिलेले, बरेपैकी विस्कळीत, पण मनापासून लिहावेसे वाटलेले.. काल प्रकाशित करावेसे वाटले नाही, पण आज हे असेच माझ्याकडे ठेवावेसेही वाटले नाही.. इतके धागे आले आहेत याचे इथे, त्यात आणखी एखादा म्हणून पुढे जायची परवानगी आहेच.. पण एक प्रश्न जो मनात कायम रेंगाळतो, तो कालही रेंगाळला., आणि आजचे हे आधुनिक जग जगण्यासाठी पहिल्यापेक्षा सुसंस्कृत आणि सुरक्षित आहे या दाव्यातील फोलपणा कळला..

--- ---

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,
तुमच्या आताच्या अविवाहीत रोल मध्ये तुम्हाला हे खटकणे साहजिक आहे.
पण आज लहान मुले सांभाळणे आणि सुरक्षित ठेवणे हा एक भयंकर प्रकार आहे. त्या आईला आणि आम्हाला सगळ्यांना माफ करा. आम्ही तुमच्या पासून सावध राहत नाही, आम्ही पोरांना "तुमच्यासारखी चांगली माणसं काही असली तरी सगळी तशी नसतील" या गार्ड वर ठेवतोय.
(हा पण खूप पॅरॅनॉईड प्रतीसाद आहे पण लिहावंसं वाटलं आणि राहवलं नाही. बरंच काही लिहिलं होतं पण काटछाट केली)

आजचे आणि कालचे यामधे फरक एवढाच आहे की आईवडिल सजग झालेत. लहान मुले आणि आईबाप यांच्यात संवाद वाढलाय इतकेच.
बाकी या सर्व गोष्टी पूर्वीही चालू होत्याच. पण मुले घाबरून सांगत नसत. वयाने मोठ्या असलेल्यांना आदराने वागवायची एक पद्धत आहे आपल्याकडे त्यामुळे मुलांनी जर असे काही सांगितले तर मोठ्या माणसांबद्दल असं बोलतोस असं म्हणत मुलालाच चोप दिला जाण्याचीही शक्यता होती.

मला त्या आईचे कौतुक वाटले. समोरचा दुखावला जात असण्याची पूर्ण शक्यता असताना स्पष्टपणे म्हटले ते. आज काल चाइल्ड एब्यूजच्या घटना एवढ्या घडत आहेत की कोणावरही विश्वास ठेवणे जमत नाही. पिंकी विराणीच्या द बिटर चॉकलेट्समधल्या कहान्या वाचून हादरायला होत. सावधानता बाळगणे हेच बेस्ट. ऋन्मेष तुम्हाला वाईट वाटणे साहजिक आहे, पण पेपरातल्या चाइल्ड एब्यूजच्या केसेस वाचल्या की सुन्न व्ह्यायला होत. चाइल्ड एब्यूजच्या केसेस या मोस्ट्ली ओळखीच्या लोकांकडून होतात . तेव्हा त्या आईच् काही चुकल अस मला वाटत नाही. पण अनुने म्हटल्याप्रमाणे तुम्ही जेव्ह्या पल्याडच्या रोलमध्ये जाल तेव्हा त्या आईची भूमिका समजेल

ऋन्मेष....

"...जणू दरवाजा बंद करताच एक अनर्थ घडेल, जे होऊ नये यासाठी मारलेली ती हाक...." ~ इथे तुम्ही एक गृहितक मांडलेले आहे ते मांडणे तुम्हाला अगत्याचे वाटले कारण तुम्ही अत्यंत निरागसपणे त्या मुलीसोबत काही वेळ खेळण्यासाठी म्हणून आत घेतले होते....जे कृत्य छानच मानले जावे. आता त्या मातेने "दरवाजा खुलाही रखना..." म्हणण्यामध्ये फार खोलवर अर्थ आहे असे अजिबात मानू नका. स्त्रियांची ती एक सहजप्रवृत्ती असते...असायलाच हवी. तुम्ही तर तिच्या दृष्टीने अनोळखी....त्यामुळे आता पोट भरल्यामुळे ते बाळ तुमच्याकडे आले असले तरी पाचेक मिनिटात जर ते कंटाळून ट्यांहा फोडू लागले तर आईला ते ऐकायला जावे असाही हेतू त्या सूचनेमागे असतो.

आमीर खानच्या "सत्यमेव जयते" च्या त्या विशेष भागात चाईल्ड अब्यूजची जी उदाहरणे दिली होती ती ऐकताना वा पाहताना सर्वांच्याच अंगावर शहारे आल्याचे दिसले होते कारण "असेही समाजात घडत असते...." ही कल्पनाही केवळ अशक्यप्राय वाटत होती.

आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या "हाय वे" मध्येही तिच्यावर लहानपणी अशाच एका वयाने जेष्ठ्य असलेल्या घरच्याच नातेवाईकाने घृणास्पद प्रकार केलेले असतात आणि तिने भीतीने ते कुणालाही सांगितलेले नसतात....चित्रपटांमुळेही पालकांच्या मनावर सावधानतेचे संस्कार होत असतील तर त्यात चुकीचे काही आहे असे समजू नये.

नीरजा आणि जाईंच्या पोस्टींना अनुमोदन!

ऋन्मेऽऽष, तुम्ही या प्रसंगानं कुठेतरी दुखावल्या गेलात असं जाणवतंय. तुम्ही हे खूप पर्सनली घेतलं असावं म्हणूनही तुम्हाला वाईट वाटलं असेल. रोजच्या ओळखीतल्या तुमच्या मित्राबरोबर आपलं मूल असतानाही त्या आईला दरवाजा बंद असलेला आवडत नाही तिनं तुमच्यासारख्या नवख्या व्यक्तीवर कसा आणि का विश्वास ठेवायचा?

माझ्यातली आई दरवाजे खिडक्या सताड उघडे असतानाही पोर शेजार्‍याबरोबर एकटं ठेवणार नाही. याला प्यारानॉइड लेबल लागलं तरी चालेल.

तुमचा अभिषेकही एका मुलीचा वडील आहे की तो ही असाच घाबरत असेल अनोळखी माणसाच्या हातात मुलगी सोपवायला. शेवटी पालक म्हणुन काळजी वाटणारच की.

नीरजा आणि जाईंच्या पोस्टींना अनुमोदन! >> +१.

ऋन्मेऽऽष, तुम्ही या प्रसंगानं कुठेतरी दुखावल्या गेलात असं जाणवतंय. तुम्ही हे खूप पर्सनली घेतलं असावं म्हणूनही तुम्हाला वाईट वाटलं असेल. >> हे साहजिक आहे.

आणि आजचे हे आधुनिक जग जगण्यासाठी पहिल्यापेक्षा सुसंस्कृत आणि सुरक्षित आहे या दाव्यातील फोलपणा कळला.. >> ह्यापेक्षा आजचे जग अधिक जाग्रुत आहे असे समज नि दुखावून घेण्यापेक्षा त्या आईचा धडा डोक्यात ठेव, तू पालक झालास कि फायदाच होईल.

त्या आईने जे सांगितलं ते अगदी योग्य आहे आणि ही सजगता वाढायला हवी.
वाईट वाटुन घेऊ नकोस . उलट असामी म्हणतोय तसं तु पण हे ,पालक झाल्यावर कायम लक्षात ठेव.

मला आवडला लेख.
<आपली यात काही चूक नाही हे माहीत होते, समोरच्याचीही काही नाही हे पटत होते, यामागे फक्त समाजातील बदललेली परिस्थिती आणि मानसिकता आहे हे देखील समजत होते,> हे अगदी नेमके लिहिले आहे. हा लेख अगदी त्रयस्थ भूमिकेतून लिहिता आला असता. पण तो त्या दार लावून घेणार्‍या तरुणाच्या भूमिकेतून लिहिला हे आवडले.
<आजचे हे आधुनिक जग जगण्यासाठी पहिल्यापेक्षा सुसंस्कृत आणि सुरक्षित आहे या दाव्यातील फोलपणा कळला..>

जुन्या काळातले जगही सुरक्षित आणि सुसंकृत होतेच असे नाही. आता अधिक सजग झालेय, उघडपणे लोक बोलतात हा बदल झालाय आणि तो चांगलाच आहे.

(काही लोकांसाठी : लेखामागचा लेखक बाजूला ठेवून त्यातल्या आशयावरच लक्ष आणि प्रतिसाद देणं इतकं कठीण असतं का?. दिवा नाही.)

<< तेच समोरून त्या मुलीच्या आईने मोठ्याने आवाज दिला, "दरवाजा खुलाही रखना, भैय्या.." .. मी दरवाज्याला हात घालताच मोठ्या तत्परतेने आलेला तो आवाज, जणू दरवाजा बंद करताच एक अनर्थ घडेल, जे होऊ नये यासाठी मारलेली ती हाक. नक्की का अन कश्यासाठी ते जाणवल्यावाचून राहिले नाही. >>

हे तुम्हाला स्वतःलाच समजायला हवं होतं, दुसर्‍यांच्या (तेही सर्वार्थाने परके, अनोळखी कारण आधी कधीच भेट नाही) मुलीबरोबर खेळताना आपण आपल्या खोलीचा दरवाजा लावु नयेच. शक्य असल्यास व्हरांड्यात, पटांगणात, जिथे इतर लोकांचे लक्ष जाईल अशाच ठिकाणी खेळावे. तिच्या आईला सांगावं लागलं हेच चूक आहे.

<< एक काळ होता, जेव्हा माझी नोकरी करणारी आई मला आज्जीच्या, म्हणजे वडीलांच्या आईच्या भरवश्यावर सोडून जायची. अर्थात आज्जीला जे झेपेल, जमेल तेवढे ती करायचीच, पण माझा खरा सांभाळ झाला तो शेजार्‍यापाजार्‍यांकडूनच. एकेक जण अगदी आपला नंबर लावत मला घेऊन जायचे. कधी मोकळ्या पॅसेजमध्ये मी चुकून एकटाच सापडलो तर रस्त्यावर पडलेली नोट पटकन संधी मिळताच उचलावी तसे मला उचलून आपल्या घरी न्यायचे. खेळणेच नाही तर मग खाणेपिणेही त्यांच्याकडेच व्हायचे. संध्याकाळी आई कामावरून आली की पहिल्यांदा माझ्या शोधात आजूबाजुची घरे फिरायची. मग मला काय हवे नको ते बघून ती पुन्हा आपल्या कामात व्यस्त आणि मी पुन्हा आजूबाजूची घरे फिरायला मोकळा व्हायचो. त्यानंतर मग रात्री आईची घरची सारी कामे आवरली की मगच ती पुन्हा माझा ताबा घ्यायला सज्ज व्हायची. >>

तो काळ आम्ही देखील अनुभवलाय, पण त्या काळात इतका मोकळेपणा होता की सर्वांच्याच घराची दारे खिडक्या उघडीच राहायची. तुम्हाला जर त्या काळचा मोकळेपणा आज हवाय तर पुन्हा तेच - तुम्ही आजच्या काळाप्रमाणे तुमच्या खोलीचे दार का लावताय?

<< लोकल ट्रेनने प्रवास करताना, प्लॅटफॉर्मवरचा टीसी जेव्हा ‘तिकीट तिकीट’ करत थांबवतो, तेव्हा एवढ्या प्रवाश्यांच्या लोंढ्यात नेमके मलाच तिकीट का विचारले, मी चेहर्‍यावरून वा पेहरावावरून विदाऊट तिकीट प्रवास करण्याची शक्यता असणारा भुरटा प्रवासी वाटतो का, अशी शंका नेहमीच माझ्या मनात येते. >>

माझा अगदी उलट अनुभव आहे, मला कधीच तिकीट तपासणीस तिकीट मागत नाही. इतकेच काय मी अनेक ठिकाणी बिनदिक्क्त प्रवेश करतो, जिथे सुरक्षा रक्षक इतरांना तपासणीकरिता अडवतो पण मला मात्र सलाम ठोकून पुढे जाऊ देतो. एकदा तर रात्री नऊच्या सुमारास मी पुण्याच्या पोलिस आयुक्तालयात शिरलो आणि थेट दुसर्‍या मजल्यावरील अधिकार्‍याला जाऊन भेटलो तेव्हा तर मोठीच खळबळ माजली कारण त्या वेळेला कोणालाच आत सोडत नाहीत मला मात्र मुख्य प्रवेशद्वारावरून पोलिसांनी अजिबात न अडवता आत सोडले. प्रत्यक्षात तिथे पोलिस आयुक्त श्री. सतीश माथूर यांना देखील परिचयपत्र दाखविल्याखेरीज आत सोडत नाहीत इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असते असे सांगण्यात आले. नंतर प्रवेशद्वारावरील पोलिसांना चौकशीकरिता वर बोलावून घेतले व स्पष्टीकरण विचारले असता त्यांना म्हणे माझा चेहरा परिचयातला [म्हणजे रोज आयुक्तालयात येणारा पोलिस अधिकार्‍यासारखा] वाटला. असो. तात्पर्य काय की, चेहरा, कपडे व एकूणच व्यक्तिमत्व यामुळे बराच फरक पडतो हे मात्र खरे.

<< तशीच काहीशी अपराधीपणाची भावना त्या आईने केलेली सूचना ऐकताना झाली. भले त्या मित्राने हे ती नेहमीच सांगते आणि त्यालाही सांगते असे म्हटले तरीही.. >>

यात एवढे त्रास करून घेण्यासारखे काहीच नाही. तुम्ही तिच्याकरिता पूर्णतः अनोळखी असताना ती नकार देखील देऊ शकत होती, पण तिने तसे न करता तुमचेही ऐकले आणि वर सावधगिरी म्हणून तुम्हाला दरवाजाही उघडा ठेवायला लावला.

आमच्या बँकेत अनेक खातेदार पेन न आणताच येतात आणि मग दुसर्‍याला पेन मागतात. काही पक्के पुणेरी अशांना पेन न देता उलट त्याबद्दल कडक शब्दांत ऐकवितात. काही जण उदारपणे अशा पेनकिलर्सना पेन देतातही. बरेचदा हे पेनकिलर्स पेन परत न करता तसेच निघून जातात. याउलट माझ्यासारखे काही मध्यममार्गी पेन तर देतात पण त्याचे टोपण काढून स्वतःकडे ठेवतात म्हणजे पेन मागणार्‍याला दुखवायचे तर नाहीच पण तो पुन्हा पेन परत करेल इतकी सावधगिरी देखील बाळगायची.

दुसर्‍याचे ऐका; न ऐकवून त्याला दुखवू नका पण त्याचबरोबर दोन अटी व शर्ती तुमच्या सोयीच्यादेखील त्याला पाळायला लावा. यालाच तुमच्या एमेन्सीत फिफ्टी फिफ्टी / विन-विन सिच्युएशन असे काही बाही म्हणतात नाही का?

" आज काल चाइल्ड एब्यूजच्या घटना एवढ्या घडत आहेत की कोणावरही विश्वास ठेवणे जमत नाही.".... आजकालचं नाहिये ग हे. "बाकी या सर्व गोष्टी पूर्वीही चालू होत्याच." हे निधपचे म्हणणे अगदी खरे आहे.

दरवाजा खुला असतांना माणसे जशी असायची तशीच ती बंद दरवाज्यांच्या आडही असावीत ही खरच आदर्श अपेक्षा आहे पण त्या बंद दरवाज्यांच्या आड त्या माणसां सोबत जे कोणी होतं त्याला कधी विचारलं तर काळोखात दबून बसलेली किती तरी भुतं बाहेर येतिल.

आजच्या काळात निदान आवाज उठवता येतोय. त्या काळी तर मुलांना आवाजच नव्हता...सभ्य आणि सुसंस्कृत जुने जग म्हणे..

स्वानुभव आठवून थरकापलेली स्मायली कल्पा ईथे...:राग:

आजकालचं नाहिये ग हे. ">>> होय ! पण आजकाल मीडिया जागृत झाल्याने या घटना उघडकीस येतात म्हणून त्या कळतात अस म्हणायच होते जे नीरजाने म्हटले आहेच

मयेकर Happy

नीधप आणि जाई यांना अनुमोदन.

मला माझ्या शाळेतला एक मास्तर आठवला. एकदम कडक शिस्तीचा भोक्ताबिक्ता होता आणि वर्गाला लांबलचक लेक्चर द्यायचा. मात्र संधी मिळताच मुलींशी लगट करायचा. एकदा एका कोळी मुलीशी काहीतरी केलं आणि तिने बोंब ठोकली का घरी सांगितलं. ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्याचं पब्लिक आलं त्याच्या अंगावर चाल करून. त्याच्या हातात सळई खुपसली. मोडलेला हात घेऊन महिनाभर फिरत होता. शाळेने त्याला नंतर कधीही कुठल्याही सहलीवर जाऊ दिलं नाही. आजून पण बरेच कारनामे आहेत त्याचे. हे सगळं आम्हा लहान मुलांना कळायचं पण यावर पुढे काय करायचं ते माहीत नसे. हल्ली सजगता वाढलीये हे स्वागतार्ह आहे.

अशोकमामांनी त्यांच्या स्वभावास साजेसा पैलू मांडला! Happy माबोवर असे सौजन्य कमी होत चालले आहे.

-गा.पै.

मी अनु, @ खटकणे - माझे मराठी चांगले नाही, शब्दांचे नेमके अर्थ पटकन समजत नाहीत, पण माझ्या खटकण्यात तक्रार नसून वाईट वाटणे होते. नुसते स्वत:बद्दलच नाही तर आपल्या मुलीची काळजी घ्यावी लागणार्‍या आईबद्दलही वाईटच वाटले.
मी अनु, आपण पोस्टमध्ये काटछाट केली असेही लिहिलेय, जर ते मला वाईट वाटेल या कारणास्तव केले असेल तर त्याची गरज नव्हती. एक स्त्री किंवा आई कसा विचार करते हे स्वत: कल्पना करण्यापेक्षा समोरून जाणून घेतलेलेच चांगले.

जाई यांच्या "त्या आईबद्दल कौतुक वाटले" या भावनेशीही सहमत. मी तरी तसा अनोळखीच, माझा मित्रही शेजारीच, पण वेळप्रसंगी नातेवाईकांशी देखील वाईटपणा घेत एका आईने आपल्या मुलीची काळजी घेणे नक्कीच कौतुकास्पद. अर्थात असा काही विचार त्याक्षणी वा हे लिहिताना माझ्या डोक्यात आला नव्हता हे देखील कबूल, पण येस्स याच्याशी सहमत.

नीधप, असामी
आधीचे पालक सजग नव्हते वा आताचे तसे झालेत असे असेलही, पण आधी असे प्रकार घडत असले तरी त्यांचे प्रमाण कमी होते. जरी ते उघड होत नव्हते वगैरे हिशोबात पकडले तरीही प्रमाण माझ्यामते कमी असावे. आजकाल हि विकृती वाढलीय त्यामुळे सजग राहण्याची गरज जास्त आहे जी कदाचित एकेकाळी तितकीशी नसावीही.
कदाचित मी चुकतही असेल, पण यावर माझ्या आईनेही, "आधीची माणसे चांगली होती" असे जनरलाईज विधान केले होते. कदाचित आईही चुकत असेल वा तिचे जग आणि अनुभव मर्यादीत असतील. आपण आणि स्वप्नांची राणी याबाबत बरोबर असाल.

अशोकमामा,
सहमत आहे, प्रत्यक्ष जन्मदात्याच्या नीच कृत्याबद्दलही जिथे बातमी वाचनात येते तिथे त्यापुढे काही उरलेच नाही. पण एक पुरुष म्हणून आपण सारेच एकाच तागडीत तोलले जातो, जे साहजिकच आहे हे समजून घेतले तरी वाईट वाटतेच. समजूतदारपणा हि देखील काही प्रतिक्षिप्त क्रिया नाही, निदान माझ्यासाठी तरी..

मयेकर, Happy

चेतनजी,
आपल्या पुर्ण प्रतिसादाशी सहमत, बदललेला काळ ओळखण्यात माझी चूक झाली, तसेच मलाही माझ्यातर्फे काळजी घ्यायला हवीच होती.

तसेच आणखी एक खरेय, मी देखील उद्या माझी मुलगी/मुलगा सहजपणे कोणाच्या हाती सोपवायला घाबरणारच, योग्य ती काळजी घेणारच, जे बिलकुल चुकीचे नाहीये.

एकेकाळी माझ्या बालपणी मला कोणाच्याही हाती सहज सोपवले जायचे, कित्येक भेटणारे जुने शेजारी याची कौतुकाने आठवण काढतात.., त्यानंतर म्हणजे दहा-एक वर्षांपूर्वी माझ्या हातीदेखील आपले मूल सोपवताना कोणत्या आईला फारसा विचार करावा लागला नाही हे अनुभवलेय. त्यांना मी छान सांभाळतो, रमतात ती माझ्याबरोबर याचेही कौतुक ऐकून झालेय.. त्यामुळे आज असे काही अनुभवणे "पर्सनली न घेताही" वाईट वाटतेच.. पण यात कुठलाही ब्लेमगेम करायचा हेतू नाहीये.. आपल्याला येणारा एखादा अनुभव जर इतरांशीही रिलेट करणारा असेल तर काही नवीन द्रुष्टीकोन समजतात, विचारांना नवीन दिशा मिळते ईतकाच हेतू.

आधीचे पालक सजग नव्हते वा आताचे तसे झालेत असे असेलही, पण आधी असे प्रकार घडत असले तरी त्यांचे प्रमाण कमी होते. जरी ते उघड होत नव्हते वगैरे हिशोबात पकडले तरीही प्रमाण माझ्यामते कमी असावे. आजकाल हि विकृती वाढलीय त्यामुळे सजग राहण्याची गरज जास्त आहे जी कदाचित एकेकाळी तितकीशी नसावीही. >> मला स्टॅट्स माहित नाही पण मी एक साधा सरळ विचार करतो कि आधी ह्याबद्दल फारशी जागरुकता नव्हती (खर तर माहिती नव्हते असे नाही पण आपल्या मुलांबाबत असे होउ शकते ह्यावर भाबडा विश्वास होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल). ह्या बद्दल कोणाचेच दुमत नाही. मग तसे असल्यावर तेंव्हा नि आता ह्यात हे प्रकार जास्त झाले कि कमी झाले ह्याबद्दल सांगणे अशक्यप्राय आहे. ते निव्वळ ठोकताळे असतील. (तुला समजेल अशा शब्दात सांगायचे तर ८० च्या दशकतली भारतीय टीम आज खेळली तर आजच्या टीमसारखे सहजपणे तीनशे चेस करेल कि नाही ह्याबद्दल आपण फक्त ठोकताळेच बांधू शकतो. त्यामूळे आजच्या टीमच्या तुलनेमधे ती सहज तीनशे चेस करतील कि नाही ही तुलना निरर्थक ठरते.) त्यामूळे आज जी माहिती आपल्या उपलब्ध आहे त्यावरून जाग्रुत राहणे हि आजची तरी गरज आहे ह्यापलीकडे ह्यावरून मी तरी काही निष्कर्ष काढणार नाही.

मृण्मयीच्या शेवटच्या para ला काना मात्रा वेलांटी सह अनुमोदन. लेख वाचून मलाही तिने लिहीलय तेच वाटलं!

आणखी एक,
केवळ विनयभंगच नव्हे तर इतर गोष्टी देखील लहान मुलांसोबत घडू शकतात ज्या पालक पसंत करू शकत नाहीत.

मी देखील लहानपणी चाळीत राहत असताना शेजार्‍यांच्याच सहवासात असायचो. त्यांच्यापैकी एकजण मला मी अगदी दोन वर्षांचा असतानाच मला घेऊन हॉटेलात गेले आणि तिथे वडा सांबार खाऊ घातले. नंतर मला हॉटेलातील खाण्याची चटक लागली व मी आईवडीलांकडेही हॉटेलात जाण्याकरिता हट्ट करू लागलो. तसेच माझा एक चुलत भाऊ शेजार्‍यांच्याच इतका वेळ काढायचा त्यांच्यासारखेच शिव्या द्यायला शिकला. अजुन कोणी मुल शेजार्‍यांकडे जाऊन टीवी पाहण्याची वाईट सवय स्वतःस लावून बसले. अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यामुळे पालकांनी आपल्या मुलांस इतर लोकांजवळ सोपविताना फार विचार केला पाहिजे.

मी लहान (सहावीत) असताना शाळेतला एक मुलगा काही दिवस घरी यायचा दुपारी. (एकटी असायचे २ ते ६) आणि स्वतःच्या सावत्र आईबद्दल बर्‍याच दु:खाच्या गोष्टी ऐकवून फ्रीज मधले खाणे खाऊन जायचा. (तितक्यावर निभावले म्हणून आता हुश्श करते.)
यात काही धोका किंवा चुकीचे आहे असे मला वाटलेच नाही त्यामुळे पालकांना सांगितले नाही. एक आठवड्यानंतर यायचा बंद झाला. बहुतेक दुसरीकडे खाण्याची सोय झाली असावी.
त्या 'गुड ओल्ड देज' मध्ये 'असे असे होऊ शकते' अशी शंका पण येत नसे.

नीरजा आणि जाईंच्या पोस्टींना अनुमोदन!

ऋन्मेऽऽष, तुम्ही या प्रसंगानं कुठेतरी दुखावल्या गेलात असं जाणवतंय. तुम्ही हे खूप पर्सनली घेतलं असावं म्हणूनही तुम्हाला वाईट वाटलं असेल. रोजच्या ओळखीतल्या तुमच्या मित्राबरोबर आपलं मूल असतानाही त्या आईला दरवाजा बंद असलेला आवडत नाही तिनं तुमच्यासारख्या नवख्या व्यक्तीवर कसा आणि का विश्वास ठेवायचा?

माझ्यातली आई दरवाजे खिडक्या सताड उघडे असतानाही पोर शेजार्‍याबरोबर एकटं ठेवणार नाही. याला प्यारानॉइड लेबल लागलं तरी चालेल.>>>>>>>>>+१०००

मी माझ्या मुली साध्या ग्यालेरीत खेळत असता आवाज यायचे बंद झाले तर हातातले काम सोडून लगेच बाहेर येवून नेमके काय कारण घडले आहे याची शहानिशा करते. अगदी किचन पासून हाका मारायला सुरुवात होते मग हाकेला 'ओ' आलेच पाहिजे. Happy शिवाय मुलीना आधीच "ब्याड टच' बद्दल त्यांना झेपेल आणि समजेल अशा शब्दात सांगितले आहे.