आहे तुझेच गारुड अवघ्या चराचरावर !

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 February, 2015 - 21:56

फिरवून शब्द घेते करते तुझाच वापर
जावू नकोस वेडे नुसत्याच बोलण्यावर !

इथल्या कशा-कशातच मन गुंतवू नको हे
जिथल्या तिथेच सारे सोडून जायचे तर !

घनगर्द आठवांचे नभ कोसळून गेले
डोळ्यातल्या सरींनी त्यातून घातली भर !

का छेडल्या मुकुंदा हृदयामधील तारा
जुळवून सूर नव्हते बिलकूल घ्यायचे जर !

निःसंग व्हायचे का थोड़े प्रयत्न केले ?
आहे तुझेच गारुड अवघ्या चराचरावर !

निक्षून सांग त्यांना येवू नकात दारी
वेल्हाळ आठवांनो मी सोडले जुने घर !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या कशा-कशातच मन गुंतवू नको हे
जिथल्या तिथेच सारे सोडून जायचे तर ! >> क्या बात है ...

अतिशय सुरेख गजल ... Happy

आभार सगळ्यांचे !!

काका चाल एकदम आवडली... सगळ्याच द्विपदी घेतल्यात की ... !!

धन्यवाद !!

सुप्रिया.

फिरवून शब्द घेते करते तुझाच वापर
जावू नकोस वेडे नुसत्याच बोलण्यावर !

निःसंग व्हायचे का थोड़े प्रयत्न केले ?
आहे तुझेच गारुड अवघ्या चराचरावर !

मस्त..मस्त.