उपनिषदांचा अभ्यास - भाग २

Submitted by पुरंदरे शशांक on 23 February, 2015 - 01:31

उपनिषदांचा अभ्यास - भाग २

उपनिषदे - सहा दर्शनांपैकी (षड्दर्शन) एक दर्शन. उपनिषदे म्हणजेच वेदांत किंवा उत्तरमीमांसा किंवा श्रुती. वेद-वाङ्मयातील शेवटचा भाग म्हणून याला वेदांत असे म्हटले जाते.
'आरण्यक' म्हणजे अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे किंवा वेदभागाचे पठण करावयाचे तो भाग. मुळात उपनिषदे हीच आरण्यके होत. अनेक प्राचीन उपनिषदे वर्तमान आरण्यकांचे भाग आहेत. उपनिषद म्हणजे गुरुसन्निध बसून शिकावयाची अध्यात्मविद्या. उपनिषदाचा हा व्युत्पत्यर्थ असला, तरी उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे. (मराठी विश्वकोश)
नि:शेष मनाने अनुभवी गुरुंच्या सन्निध राहून अध्यात्मविद्या शिकणे म्हणजे उपनिषद.
यावर विनोबांची खास टिप्पणी - मात्र एक लक्षात ठेवावे की हे ज्ञान गुरु शिष्याला देत नाहीत तर शिष्याच्या ठिकाणी ते ज्ञान प्रगट करण्यास मदत करतात.

उपनिषदांची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी मला जाणवलेली काही वैशिष्ट्ये (जी आपणा सर्वांनाही माहित असतीलच..) -

१] इथे थेट ज्ञानाबद्दल (सत्याबद्दल) सांगितले आहे.

२] हे ज्ञान वा सत्य स्वयंसिद्ध आहे (हे ज्ञान आहे, माहिती नाही). त्याबद्दल काही सांगणे, बोलणे हा केवळ एक प्रयत्न आहे. हे ज्ञान कदापीही शब्दात मांडता येत नाही. शब्दाच्या आधारे त्याची थोडी फार माहिती होते इतकेच. मात्र विचारांपलिकडे जाऊनच याचा अनुभव घ्यावा लागतो. हा अनुभव मन-बुद्धी-इंद्रियातीत असल्याने अनुभवी गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही. मात्र जो कोणी याचा जबरदस्त ध्यास घेइल त्यालाही हे ज्ञान गुरुंशिवायही प्राप्त करुन घेता येईलच येईल. या ज्ञानावर कोणीही कधीही मालकी दाखवू शकत नाही. सृष्टीत सर्वत्र हे ज्ञान भरून राहिले असल्याचे या आत्मनिर्भर ऋषिंचे उद्गार आपल्याला इथे दिसून येतील.

३] या ज्ञानाचे (सत्याचे) वर्णन करताना ऋषिंची जी एक अभिनिवेशरहित, सहजावस्था आहे ती केवळ ह्रदयस्पर्शी आणि आश्चर्यकारक आहे. त्यामुळे यातील सत्याचे वर्णन करणार्‍या ऋचांचा मोह जे. कृष्णमूर्तिंसारख्या तत्ववेत्यालाही पडला यात विशेष ते काय ! ( सद्गुरु, शास्त्र वगैरे न मानणारे कृष्णजी एकदा भल्या पहाटे स्नानानंतर उपनिषदातील ऋचा मोठ्याने उच्चारताना पाहून त्यांचे एक सहकारी त्यांना विचारायला लागले - तुम्ही कायम सद्गुरु, शास्त्र इ.च्या विरोधात बोलणारे, आज एकदम हे काय चालले आहे ?
त्यावर कृष्णजी हसून म्हणाले - हे सारे उच्चारतानाही मला खूप आनंद होतोय ... )

यावरुन कोणा तत्वज्ञाचे एक मार्मिक विवेचन आठवले - कालौघात उच्चारले जाणारे, लिहिले जाणारे सारेच्या सारे शब्द हे तर केवळ बुडबुड्यासारखे आहेत - बुडबुड्यासारखेच सारे शब्द निर्माण होतात आणि विरूनही जातात - पण काही काही शब्दांत मात्र एक सामर्थ्य असते - "चिरंतन सत्याचे" प्रतिबिंब त्या शब्दांतून प्रकट होत रहातेच रहाते - मात्र ही कोणाही ऐर्‍यागैर्‍याबाबत घडणारी ही गोष्ट नाही, तर जो त्या शब्दांशी काही अंशी तदाकार होईल त्याला त्या प्रतिबिंबाची झलक मिळाल्यावाचून रहाणार नाही - उपनिषदातील शब्द (विचार) हे असे विलक्षण आहेत ....

४] जे काही सांगितले आहे ते अगदी कमीत कमी शब्दात मांडले आहे. (जणू पूर्वीच्या तारा (टेलिग्राम) कशा असायच्या तसे अगदी मोजकेच - पण नेमके शब्द ... )

५] देवदेवतांची वर्णने, त्यांना संतुष्ट करण्यासाठी कोणकोणते यज्ञ करायचे व कुठले हविर्भाग द्यायचे याचा काहीही उल्लेख यात नाही. थोडक्यात कर्मकांडाचा इथे अजिबात उहापोह / चर्चा नाही. (खाली ज्या उपनिषदांची यादी दिलेली आहे त्याबाबत हे सारे आहे.)

६] अनेक तत्ववेत्ते ऋषि आणि त्यांचे शिष्य यांच्यातील प्रश्नोत्तरे इथे आहेत. तर कधी ब्रह्मवृंदांमधे घडलेले वाद आहेत. या वादविवादात (सभेत) बरेच जण सहभागी होत असत. मात्र कधी कधी त्यातील काही भाग हा एकांतातच चर्चा करण्यासारखा आहे (सगळ्यांसमोर चर्चा करता येत नाही) असेही दाखले आहेत.
प्रत्येक गोष्टीला काही अधिकार लागतो हे तत्व यामागे असावे. (अधिकार तैसा करु उपदेश - तुकोबा.)

७] काही उपनिषदांमधे रुपककथा आहेत तर काही उपनिषदांत निसर्गाची स्तुतिही गायलेली दिसते.

८] एखाद्या उत्तम समाजरचनेसाठी जे काही मूलभूत नियम लागतात ते उपनिषदांत आहेत -
मातृदेवो भव | पितृदेवो भव | आचार्यदेवो भव | अतिथीदेवो भव |
ऋतं च स्वाध्यायप्रवचने च । सत्यं च स्वाध्यायप्रवचने च ।
तपश्च स्वाध्यायप्रवचने च । दमश्च स्वाध्यायप्रवचने च ।
शमश्च स्वाध्यायप्रवचने च । (तैत्तिरीय उप.)
(ऋत बोलावे आणि त्याबरोबर स्वाध्याय आणि प्रवचन करावे. सत्य बोलावे, त्याबरोबर स्वाध्याय आणि प्रवचन करावे. तप करावे, त्याबरोबर स्वाध्याय आणि प्रवचन करावे. दमन करावे, त्याबरोबर स्वाध्याय आणि प्रवचन करावे. शमन करावे, त्याबरोबर स्वाध्याय आणि प्रवचन करावे.)

९] त्याकाळात उच्चारणशास्त्रालाही महत्व होते. त्याला ते ऋषि शीक्षा म्हणत असत.

१०] नुसते उच्च विचार असून चालत नाही, त्याबरोबरीने तसाच उत्तम आचारही लागतो याचे स्पष्ट उल्लेख आहेत.

११] चिंतन, मनन, ध्यान, योग, स्वाध्याय, प्रवचन याला महत्व दिलेले आहे. तसेच कर्माला कुठेही कमी लेखलेले नाहीये. ॐ काराची उपासना, महती सांगितलेली आहे कारण ब्रम्ह किंवा सत्याला ते ऋषि ॐ हे नाव देतात.

१२] उपनिषदे पुनर्जन्म मानतात.

१३] आश्चर्याची गोष्ट म्हणजे - श्वेताश्वतर उपनिषदातील हा एकमेव श्लोक सोडला तर भक्तिमहात्म्य कुठेही दिसत नाही. (निदान मला तरी आढळले नाही)
यस्य देवे परा भक्ति: यथा देवे तथा गुरौ
तस्यैते कथिता ह्यर्था: प्रकाशन्ते महात्मनः ||
(ज्याची देवाच्या ठिकाणी परम भक्ति आहे, आणि जशी देवाच्या ठिकाणी तशीच गुरुच्या ठिकाणी आहे, त्या महात्म्याला या सांगितलेल्या गोष्टी स्पष्टपणे कळतात.)

१४] "अयमात्मा ब्रह्म" यासारखी सुप्रसिद्ध चार महावाक्ये उपनिषदांत सांगितलेली आहेत.

१५] भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायांच्या शेवटी - ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु... असे म्हटलेले आहे. उपनिषदांतील बर्‍याच ऋचा गीतेत उद्धृत केलेल्या दिसतात.

१६] रुद्राध्याय (नमक व चमक), श्रीसूक्त, संध्योपासना यामधे उपनिषदातील बर्‍याच ऋचा घेतलेल्या दिसतात. गायत्री मंत्रही उपनिषदातलेच आहेत.
(सूर्यश्च मा मन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः ।
पापेभ्यो रक्षन्ताम् । यद्रात्रिया पापमकार्षम् ।
मनसा वाचा हस्ताभ्याम् । रात्रिस्तदवलुम्पतु ।
इदमहं माममृतयोनौ । सूर्ये ज्योतिषि जुहोमि स्वाहा ॥ १॥
- सूर्यनारायण, कामक्रोधादि विकार आणि त्यांचे स्वामी, काम-क्रोधादिजन्य पापांपासून मला रक्षोत. रात्री जे पाप, कायिक, वाचिक, मानसिक (मी) केले असेल, ते (पाप) रात्र नाहीसे करो. हे मी, मला अमृताच्या उत्पत्तिस्थानात, सूर्यरुपी ज्योतीत हवन करीत आहे, स्वाहा !)

१७] "सत्यमेव जयते" हे आपल्या भारत देशाचे बोध वाक्य मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे.

१८] औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह ह्याने सतराव्या शतकात फार्सी भाषेत बऱ्याच प्राचीन उपनिषदांचे भाषांतर केले. फार्सीमधून एकोणिसाव्या शतकात लॅटिनमध्ये ह्या भाषांतराचे भाषांतर झाले. जर्मन तत्त्वज्ञ शेलिंग आणि शोपेनहौअर ह्यांच्यावर त्याचा फार प्रभाव पडला. शोपेनहौअर म्हणतो, की उपनिषदे ही उच्चतम मानवी प्रज्ञेची निर्मिती आहे. पॉल डॉइसेनने जर्मन भाषेत उपनिषदांच्या तत्त्वज्ञानावर प्रबंध लिहिला आणि मॅक्स म्यूलरने 'सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट' ह्या ग्रंथमालेत प्राचीन बारा उपनिषदांचे इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले आहे. त्यानंतरचे अधिक सुधारलेले इंग्रजी भाषांतर ह्यूमचे आहे. (संदर्भ - मराठी विश्वकोश)

१९] श्री ज्ञानेश्वरमहाराज तर उपनिषदांना माऊली म्हणून गौरवताना दिसतात -
पैं अहितापासूनि काढिती | हित देऊनि वाढविती | नाहीं गा श्रुतिपरौती | माउली जगा ||४६२||ज्ञाने.अ. १६||
त्याचबरोबर श्रुती-स्मृतींचे अर्थ | आपणचि होवूनि मूर्त | आचरोनी जगा देत | वडिल जे || असे आवर्जून सांगताना दिसतात. कारण उपनिषदातले तत्वज्ञान हे जगण्याचे आहे (नुसते बोलण्याचे-ऐकण्याचे नाही) हेच माऊली स्पष्टपणे प्रतिपादन करीत आहेत.
तुकोबाही याच गोष्टीचे समर्थन करताना दिसतात -
वेदाचा तो अर्थ आह्मांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥1॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥२२५६||
उपनिषदांतील तत्वज्ञान ही केवळ अभ्यासण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची गोष्ट आहे हे बुवा त्यांच्या परखड शब्दात सांगत आहेत. ज्यांना हे सारे ग्रंथ नुसते मुखोद्गत आहेत (पण अनुभव नाही) अशी मंडळी केवळ तो शब्दभार वहात आहेत - त्यांनी त्यातील गोडी चाखणे जरुरीचे आहे हे बुवा परोपरीने (कळवळून) सांगत आहेत.

श्रीमद् दासबोध ग्रंथाच्या सुरुवातीस आपण कोणकोणते ग्रंथ संदर्भासाठी घेतले आहेत याचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात -
नाना ग्रंथांच्या समती | उपनिषदें वेदांत श्रुती |
आणि मुख्य आत्मप्रचीती | शास्त्रेंसहित ||द. १. स. १ - ओवी १५||

२०] युजे वां ब्रह्म पूर्व्यं नमोभिर्विश्लोक एतु पथ्येव सूरेः .
शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा आ ये धामानि दिव्यानि तस्थुः .. ५..
(तुमच्या प्राचीन स्तवनात (मी) अत्यंत भक्तिभावाने सामील होवो. माझा श्लोक सूर्याच्या मार्गाप्रमाणे पसरो. अमृताचे पुत्र सारे ऐकोत, जे दिव्य धामांना पोहचले आहेत.)
- श्वेताश्वतर उपनिषदातील या ऋचांना अनुसरुन स्वामी विवेकानंद श्रोत्यांना संबोधत असत - अमृतस्य पुत्रा ...

२१] पावसस्थित परमहंस स्वामी स्वरूपानंदांनीही या उपनिषदांचे ऋण खालील प्रकारे वर्णिले आहे (संदर्भ- अमृतधारा)
'असतो मा सद्गमय' उपनिषद्वाणी दर्शवि ऋषिची
निज-उन्नतिची स्वाभाविक जी वृत्ति जीवमात्राची ||७१||

'सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म' प्रत्यय ऋषिवर्यांचा
उपनिषद्मिषें करि दुंदुभिरव शाश्वत आत्मसुखाचा ||७२||

निजानन्दनिर्भरा मुनीची वृत्ति साक्ष दे अजुनी
जरी उपनिषत्कालिं रंगली 'हाऽऽउ हाऽऽउ' म्हणुनी ||७३||
(त्या उपनिषदकालीन ऋषिंना सत्याचा जो अनुभव आला त्याचे वर्णन करताना त्यांनी जे आनंदोद्गार काढले ते 'हाऽऽउ हाऽऽउ' (म्हणजे ओहो हो सारखे) म्हणून प्रसिद्ध आहेत. )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
वैयक्तिक -
२२] ज्या महात्म्याकडून मी उपनिषदातील ऋचा, शांतिमंत्र, इ. ऐकलेले आहेत ते नुसते आठवूनही माझ्या अंगावर अजून रोमांच उभे रहातात.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकंदरीत उपनिषदे संख्येने खूप आहेत. त्यातील महत्वाची काही - ईश, केन, कठ, प्रश्न, छांदोग्य, बृहदारण्यक, मुंडक, मांडूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, श्वेताश्वतर, कौषीतकिब्राह्मण, मैत्रायण्युपनिषत्, नारायण, जाबाल, अरुणिकोपनिषत्, कैवल्य व ब्रह्मबिंदू ही अठरा प्रमुख समजली जातात. (विनोबांनी या अठरा उपनिषदांचे अनुवाद 'अष्टादशी' या पुस्तकात दिलेले आहेत)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

साम व्रतानि
महामना: स्यात् | तद् व्रतम् | (मोठ्या मनाचे व्हावे. हे व्रत आहे)

तपन्तं न निंदेत् | तद् व्रतम् | (तापणार्‍या आदित्याची निंदा करु नये. हे व्रत आहे)

वर्षन्तं न निंदेत् | तद् व्रतम् | (वर्षणार्‍या मेघांची निंदा करु नये. हे व्रत आहे)

ऋतून् न निंदेत् | तद् व्रतम् | (ऋतूंची निंदा करु नये. हे व्रत आहे)

लोकान् न निंदेत् | तद् व्रतम् | (लोकांची निंदा करु नये. हे व्रत आहे)

पशून् न निंदेत् | तद् व्रतम् | (पशूंची निंदा करु नये. हे व्रत आहे)

सर्वम् अस्मि इति उपासीत | तद् व्रतम् | तद् व्रतम् | ('मी' (च) सर्व आहे अशी उपासना करावी. हे व्रत आहे. हे व्रत आहे)
छांदोग्य उपनिषदातील या ऋचा पहा किती साध्या- सोप्या पण अर्थपूर्ण आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ - १] मराठी विश्वकोश (http://www.marathivishwakosh.in/ )
२] अष्टादशी - संपादन : विनोबा, परंधाम प्रकाशन, पवनार (वर्धा)
--------------------------------------------------------------------------------------------------------
उत्तिष्ठत् जाग्रत् - उपनिषदांचा अभ्यास - भाग १: http://www.maayboli.com/node/52366
---------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांकजी,
सुंदर विवेचन्,सुरुवात आवडली,पु भा प्र.

अनिरुद्ध

सुंदर विवेचन..

वैयक्तिक -
२२] ज्या महात्म्याकडून मी उपनिषदातील ऋचा, शांतिमंत्र, इ. ऐकलेले आहेत ते नुसते आठवूनही माझ्या अंगावर अजून रोमांच उभे रहातात.

आयूष्यात एकदा मलाही असा अनुभव यावा असे खुप वाटते.

( उच्चार शुद्धतेकडे आपण फार कमी लक्ष देत आहोत सध्या. आणि ते शुद्ध असावेत असा आग्रहही नसतो कुणाचा. )

खुप अवघड पण प्रचन्ड कुतुहल असलेला हा विषय सहजतेने सर्वसामान्यांच्या आकलनायोग्य करून सांगाताहात त्याबद्दल अनेक धन्यवाद !!!