स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी!

Submitted by kulu on 20 February, 2015 - 04:39

स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801

एखदी गोष्ट सलग दोनदा केली आणि दोन्ही वेळा झक्कास वाटली तर त्या गोष्टीची चटक लागते. मार्थाचे पहिले दोन प्लॅन्स एव्हढे यशस्वी झाले की परत जायचं होतंच कुठेतरी पुन्हा! वीकांत होता. पण आदल्या दिवशी इंटरलाकेन ची मोठी ट्रीप झाली होती, आणि रविवार म्हणजे पुढच्या आठवड्याचे जेवण करुन ठेवावे लागणार होते, त्यामुळे लांब कुठे जाणे शक्य नव्हते, खरं वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि त्यामुळे माझी होणारी चुळबुळ मार्थाच्या लक्ष्यात आली. आणि "मेल्या, तु काय मला स्वस्थ म्हणुन बसु देणार नाहीस" असं म्हणत घराजवळच्याच एक छोट्याशा तळ्याकडे फेरफटका मारायच ठरल. आम्ही राहत होतो तो एरीआ म्हणजे बेल्लीकॉन, अवघं १५०० लोकवस्तीचं छोटसं खेड! बेल्लिकॉन चा अर्थ सुंदर टेकडी. आणि खरंच ते बेल्ली हिल्स वर वसलेलं होतं! आणि त्या हिल्स चढुन गेलं की वर एगेल्सी चं तळं! रस्ता घराच्या मागुनच जात होता. मी, मार्था आणि मार्थाचा बॉयफ्रेंड हंस-रुवेदी असे आम्ही तिघे बाहेर पडलो!

१. घराच्या परसातुन टिपलेले दृश्य

२. पाठीमागे सगळी शेतीच होती, आणि त्यातही पिवळी धम्मक मोहोरीची रानं

३. मार्था एव्हढी चांगली, आयुष्यात अपार दु:ख भोगलेली. घरात २६ वर्षांचा शारीरीक आणि मानसिक अपंगत्व असलेला मुलगा, अगदी त्याला आंघोळ घालण्यापसुन सगळं करायला लागयचं तिला रोज. नवर म्हणायचा तो घटस्फोटानंतर दंडाचे पैसे न देता १० वर्षांपुर्वीच फरार झालेला. तिचा ५ वर्षांपासुनच्या बॉयफ्रेंडला हंस रुवेदीला डोळ्याचा दुर्दम्य आजार, जवळ जवळ अंधच! एव्हढ सगळं असुनही मी १ वर्ष होतो तेव्हा कधी तक्रार म्हणुन केली नाही तिनं आयुष्याविषयी! जीवनावर अपार श्रद्धा!
चालताना मी मागं पडलो तर म्हातारा-म्हातारी मला चिडवत पुढंच चाललेली!

४. ही वाट दुर जाते.....!

त्यादिवशी कापुस पिंजल्यासारखे ढग वरुन लहरत होते.

आणि ही लुसलुशीत रानं

वाटेत हा बसायचा एकाकी बेंच. का माहित नाही त्या बेंच कडे बघुन मला एकदम तत्त्वज्ञान आठवलं. Uhoh असं वाटलं या पठ्ठ्याने किती जणांना रोज पाहिलं असेल, किती गुजगोष्टींचा हा साक्षीदार असेल!

मोहोरीची रानं!

आता बेल्ली हिल्स च्या पायथ्यावर आलो. आता तळ्याची वाट सुरु

वरुन दिसणारा हा नजारा

पोहोचलो बरं एगेल्सीला

तिथं काही पोरटी पोहत होती. त्याना उड्या मारण्यासाठी बांधलेलं हे तिरकुट

थोडा वेळ तिथे बसुन आम्ही घरी परतायला लागलो. मार्था हुश्शार, जाताना बेल्ली हिल्स च्या दुसर्‍या बाजुने जायचं ठरवलं तिने!
जाताना पण प्रचंड आकाराची शेतं लागत होती! आणि त्यात गायी (बैलही असु शकतील मी काही फार निरीक्षणं केली नाहीत) आणि घोडे (घोडीणी पण असतील लांबुन मला कळले नाही............... जवळ गेलो असतो तरी कळले असते की नाही काय माहीत Proud ) चरत होते.

स्वित्झर्लंड मध्ये सुखी माणसच्या सदर्‍यांची व्हरायटीच आहे!

अतिशय सुंदर ढगांचा पुंजका!

वाटेत एका शेतकर्‍याचे घर लागले, त्याचा दरवाजा. एकदम अँटीक!

मग आम्ही या गोठ्यातुन हॉटेलात रुपांतर केलेल्या ठेकाणी जरा खाल्लं (फार भुक मला नसल्याने मी फक्त दोन almond croissants, एक नटकेक चा पीस, आणि मार्थाला खुप झाल्याने तिच्यातला एक चीज केक चा पीस, आणि एक मग कॉफी एव्हढेच घेतले! Proud )

जिथे आम्ही हे खात बसलो होतो तिथुनच वर मान करुन बघितलं

आलो बाबा घरी!

संध्याकाळी घरी येऊन इडल्या केल्या आणि मार्थाबरोबर गप्पा मारत बसलो. मस्त दिवस!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलु.. भाग्यवान आहेस खरा.. इतक्या दूर देशात जाऊन मार्था सारखे लोकं भेटणे ही किती सुंदर गोष्ट आहे..

तुझ्या पुढच्या प्रवासात ही अश्याच व्यक्तीं चा सहवास मिळो , हीच शुभेच्छा!! Happy

काय सुंदर ठिकाण आहे! चरणारे घोडे आणि रस्ता - हा फोटो खूप आवडला. Happy
अश्या देशांमध्ये प्रत्येक ठिकाण हा पिकनिक-स्पॉटच!

इतक्या दूर देशात जाऊन मार्था सारखे लोकं भेटणे ही किती सुंदर गोष्ट आहे >>> खरंच!

मस्त फोटो, पर्यटक नसलेली जागा.. खरं तर तो देशच एवढा सुंदर आहे कि वेगळे टुरिस्ट स्पॉट्स ठरवायची गरजच नाही.

मार्थाबद्दल तू जे बोलायचास, त्यावरून कल्पना केली होती तशीच आहे. हॅट्स ऑफ टू हर !

( उभे फोटो देताना. ८०० साईझचे दे, म्हणजे नीट दिसतात. )

कंसराज, ललिता-प्रीति, सायो खुप खुप आभार! Happy
बी अगदी खरं बोललात, मी भारतात जेव्हढं संगीत ऐकलं नाहे तेव्हढं तिथे असताना ऐकलं! Happy
कुलु.. भाग्यवान आहेस खरा.. इतक्या दूर देशात जाऊन मार्था सारखे लोकं भेटणे ही किती सुंदर गोष्ट आहे..>>>>>>> वर्षु अगदी खरं बोललीस! त्या बाबतीत खरंच दैव चांगलंय!
दिनेश, ओके. पुढच्या वेळेस लक्ष्यात ठेवेन. तुझा तर सगळ्यत आवडता देश तो Happy

कुलु....

आपल्या प्रत्यक्ष संवादात तू सविस्तरपणे मार्था (आणि तिचा संसार...) या विषयी मला सांगितले आहेस, त्यावेळीही ती एका मातेच्याच रुपात तुझ्याशी संवाद साधत असल्याचे चित्र मी नजरेसमोर आणले....आज त्याना फोटोत पाहिले. असेही लोक त्या देशात आहेत आणि त्यामुळे तर स्वीस आणखीनच जास्त सुंदर वाटू लागला आहे. नशीबवान आहेस तू.

....मी तुझा हेवा करतो खास एका फोटोसाठी.....शेतातील तो बेंचचा फोटो. किती विलक्षण हिरवळ आहे आणि तितकीच शांतता....आणि तो बाक जणू काही एखाद्या प्रवाशाची वाट पाहात आहे....बसावे तिथे आणि लावावी नजर त्या सुंदर निसर्गचित्राकडे....तासनतास....देहभान हरवून जाईल.

कुलु , तुझ्या या सुंदर माणसं आणि परिसर शोधत केलेल्या भ्रमंतीची क्षणचित्रं पाहाताना, त्यामागचा तुझा attitude समजून घेताना बालकवी आठवले -
सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबून घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे ..

अहाहाहाहाहाहाहाहाहा..........................

किती अप्रतिम! त्या बेंचवर बसून अंतर्मुख होत एक संध्याकाळ घालवावी.

मी तुझा हेवा करतो खास एका फोटोसाठी.....>>>>>मामा, खरं बोल्लात. इव्हन सध्या मी देखिल कधी कधी स्वतःचा हेवा करतो फोटो बघताना Happy
भारतीतई बालकवींच्या कित्ती सुंदर ओळी लिहील्यास! Happy
अंजु, रोहित, मित, चनस, मामी, नरेश, पुरंदरे काका, भुईकमळ धन्यवाद! Happy

सुंदर...>>> धन्यवाद ! आज बघितलं सृष्टी! खुपच लवकर थांक्यु म्हटल्याबद्दल सॉरी पण Proud