आरामखुर्चीतलं पर्यटन

Submitted by स्वीट टॉकर on 18 February, 2015 - 02:16

आरामखुर्चीतलं पर्यटन ? हा कसला चावटपणा ?

‘हा कसला चावटपणा ?’ या वाक्याला बर्‍यापैकी इतिहास आहे. पुरातन काळापासून प्रत्येक नव्या कल्पनेला कोणी ना कोणी ह्याच वाक्याने प्रतिक्रिया दिलेली आहे. निदान सुरवातीला तरी.

राईट बंधूंनी पहिलं यशस्वी उड्डाण केलं त्यानंतर फक्त सहाच वर्षात वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी पहिला फ्लाइट सिम्युलेटर बनविला गेला. तो अर्थात खूपच साधा होता. त्या काळी फक्त धाडसी रक्तच उड्डाणाचे धोके पत्करायला तयार होतं आणि त्यांना उड्डाणाचा सराव जमिनीवर करण्याची कल्पनाच हास्यास्पद वाटत होती. या सुरक्षित, असाहसी यंत्रात त्यांना अजिबात रस नव्हता. सिम्युलेटरची उपेक्षा झाली. त्याला ह्याच वाक्यानी हेटाळलं गेलं होतं.

मात्र जसंजसं लोकांच्या लक्षात आलं की बर्‍याच वैमानिकांची हाडं मोडताहेत, (त्या काळी विमानांचा वेग आणि उंची दोन्ही कमी असल्यामुळे हाडमोडीपलीकडे मजल जात नव्हती) या सिम्युलेटरचा उपयोग वाढायला लागला.

गेल्या शंभर वर्षात आपल्या यांत्रिकी ज्ञानात जितकी वाढ झाली त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त वाढ इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्रात झाली. परिणामतः सिम्युलेटरची क्षमता इतकी भन्नाट झाली आहे की सर्व प्रकारची वातावरणं आणि अडीअडचणी निर्माण करून वैमानिकाला त्यांना कसं तोंड द्यायचं याचं प्रशिक्षण संपूर्ण सुरक्षिततेत देता येतं. ते ही खर्‍या उड्डाणाच्या मानाने नगण्य खर्चात. एक इंजिन बंद पडलं आहे, त्यात धुक्यामुळे रनवे नीट दिसत नाहिये, वर शॉर्ट सर्किटमुळे कॉकपिटमध्ये धूर भरायला लागला आहे. अशात विमान लँड करायचंच आहे. असं ट्रेनिंग कोणत्याही वैमानिकाला कसं मिळणार? आज मात्र अशा आणि तत्सम जीवघेण्या संकटकाळातून सहीसलामत कसं सुटायचं हे प्रशिक्षण प्रत्येक वैमानिकाला दर वर्षी मिळतं ते सिम्युलेटरमुळेच. अंतराळवीर, आण्विक उर्जाकेंद्र चालक, फॉर्म्यूला १ रेसचे ड्रायव्हर्स आणि असे असंख्य तंत्रज्ञ आज सिम्युलेटरवरच प्रशिक्षण घेत असतात. सांगायचा मुद्दा काय, तर ‘हा कसला चावटपणा ?’ हा विचार कालबाह्य झाला आहे.

विषयाला हात घालण्याआधीच विषयांतर झालं. पर्यटनाकडे वळूया.

दहा टक्के पर्यटक हॅवरसॅक खांद्यावर लावून, जंगल, वाळू, दर्‍या खोर्‍या तुडवत, स्थानिक जेवण जेवत, तंबू, डॉर्मिटरी नाहीतर रेल्वे स्टेशनवर झोपत, उन, पाऊस, वारा आणि चालून चालून बूट चावल्यामुळे पावलांना पडलेल्या घट्ट्यांशी मैत्री करत, निसर्गाचा आणि एकंदरच आयुष्याचा खरोखर आनंद लुटत भटकंती करतात. यांच्यासाठी हे ‘आरामखुर्चीतलं पर्यटन’ लागू नाही. यांनी प्रवासवर्णन लिहायचं ठरवलं तर त्यांच्याकडे हटके अनुभव असतात पण ते सहसा लिहीत नाहीत. तो त्यांचा पिंडच नाही.

आणखी दहा टक्के पर्यटक असे असतात की ते एका चकरेत बरीच ठिकाणं बघत नाहीत. एक किंवा जास्तीत जास्त दोन. ते जाण्याआधी त्या भागाचा आणि समाजाचा व्यवस्थित अभ्यास करतात, तिथे गेल्यावर स्थानिक लोकात राहातात, स्थानिक जेवण जेवतात, स्थानिक सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात, तिथल्या भाषेचं ready reckoner त्यांच्या कडे असतं ते जास्तीत जास्त वापरून ते स्थानिक लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात आणि काही प्रमाणात यशस्वी देखील होतात. त्यांनी प्रत्येक दिवसाची आणि जागेची व्यवस्थित नोंद ठेवलेली असते. ते शरीराला वरच्यांइतकं पिळत नाहीत पण मेहनत खूप घेतात. यांच्यासाठी देखील हे ‘आरामखुर्चीतलं पर्यटन’ लागू नाही. पर्यटनाहून परत आल्यावर उत्तम प्रवासवर्णन लिहितात आणि आपल्यासारखे वाचक त्याचा आनंद घेतात.

राहिले ऐंशी टक्के पर्यटक. यात मी देखील मोडतो. सर्वप्रथम घरच्या मेंबर्सना सुट्या वेळच्या वेळी मिळतील अशी व्यवस्था करतो, ऐपतीनुसार आरामदायी आणि जलद वाहनानी इच्छित ठिकाणी पोचतो. सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देतो, तिथली माहिती थोडीफार आंतरजालावरून जमवलेली असतेच. शिवाय तिथल्या पुस्तिका, बोर्ड आणि गाईडकडून बर्‍यापैकी माहिती मिळवतो. बरेच फोटो काढतो. स्थानिक माणसाशी कामापुरता संबंध ठेवतो - टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलांचे कर्मचारी, गाईड वगैरे. (कंडक्टेड टूरमध्ये गेल्यास फक्त गाईडशी). भारतीय जेवण मिळेल अशी व्यवस्था जिकडे उपलब्ध असते त्याचा फायदा घेतो. बर्फातले खेळ, स्कूबा डायव्हिंग, हँग ग्लाईडिंग वगैरे रोमांचकारी अ‍ॅक्टिव्हिटीज असतील त्यांचा पूर्णपणे आस्वाद घेतो. चांगल्यापैकी ताजातवाना होऊन परत येतो आणि पुनश्च दैनंदिन जीवनाकडे वळतो. मिळवलेली माहिती परत आल्यानंतर महिन्याभरात विसरतो.

आता सिम्युलेटर आणि पर्यटनाचा संबंध काय? सांगतो.

सिम्युलेटर ही एक जादुई इलेक्ट्रॉनिक खोली आहे ज्यात अतिशय उपयुक्त आभास निर्माण केलेले असतात. हे आभास निर्माण करणार्‍यांचा त्या त्या विषयाचा कल्पनातीत प्रचंड अभ्यास असतो. होता होता आता सिम्युलेटर ट्रेनिंगची पातळी प्रत्यक्ष ट्रेनिंगपेक्षाही सरस झाली आहे. तंत्रज्ञांना आता सिम्युलेटर निकडीचं वाटायला लागलं आहे.

तशीच आपल्या सगळ्यांकडे एक इलेक्ट्रॉनिक खिडकी असते त्यातून आपण सगळ्या जगाचं अवलोकन करू शकतो. पण आपल्या डोळ्यांनी नव्हे. आपली नजर फारच क्षीण असते. आपण एका जाणकार माणसाच्या कडेवर बसून त्याच्याच नजरेनी बघू शकतो. कितीही खोलात, कितीही वेळा. कितीही वेळ. ती खिडकी म्हणजे टीव्ही.

‘Travel & Living’, ‘History’, ‘National Geographic’, ‘Discovery’ वगैरे चॅनेल्स आपल्याला सातासमुद्रापार घेऊन जातात. त्यांची टीम तिथे महिनेन् महिने राहिलेली असते. ते एखादं प्रेक्षणीय स्थळ असो, सप्ततारांकित हॉटेलचा सगळ्यात महागडा मजला असो नाहीतर पूर्व आफ्रिकेतल्या सिंहिणींचं सामाजिक जीवन असो. तिथली प्रत्येक गोष्ट बारकाईने अभ्यासतात. त्या त्या ठिकाणचे अधिकारी त्यांना माहिती द्यायला उत्सुक असतात. आपल्या स्वप्नांनाही जिथे प्रवेश मिळणार नाही अशा ठिकाणी त्यांचा कॅमेरा पोहोचतो. आजच्या कॅमेर्‍यांच्या आणि आपल्या टीव्हींच्या clarity बद्दल बोलायचीच जरूर नाही. उत्तम प्रतीची कॉमेंटरी आणि संपादन करून आपल्यापुढे पेश करतात. त्यांनी दिलेलं बहुआयामी आणि सखोल कव्हरेज आणि आपण स्वतः केलेलं उथळ पर्यटन यांच्या quality ची तुलनाच होऊ शकत नाही.

आयुष्य बोटीवर काढल्यामुळे मी जगभर भटक भटक भटकलो.

ह्यूस्टनला गेलो असताना नासा बघितलं.

पण साध्या पेनपासून स्पेस शटलपर्यंत अंतराळात न्यायच्या प्रत्येक वस्तूसाठी नवीन तंत्रज्ञान का विकसित करावं लागलं, चंद्रमोहीम आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन हे दोन्ही अंतराळाशीच निगडित असूनही त्यांना पूर्णपणे भिन्न तांत्रिक अडचणी का येतात, कल्पना चावलाच्या शटलला इजा झाली आहे हे आधी माहीत असतं तर काही करता आलं असतं का, वगैरे डोक्यात वळवळणार्या कित्येक किड्यांची आणि कोड्यांची उत्तरं animation सकट टीव्हीनेच मला दिली. माझ्या नासाच्या टूरमध्ये मिळू शकली नाहीत.

पिसाचा झुकता मनोरा पाहिला. तो पडतो आहे आणि मी तो हातानी धरून ठेवला आहे असे फोटो बाकीच्या टूरिस्टांप्रमाणे मीही काढले.

पण तो बांधता बांधताच झुकल्यानंतर काय केलं गेलं, दर वेळेला त्याला सरळ करायचा प्रयत्न करताना तो आणखीनच भसकन् का झुकला, तंत्रज्ञान पुरेसं विकसित झाल्यानंतर पंधरा वर्षापूर्वी त्याला थोडासा सरळ कसा केला, व्यवस्थित सरळ करता आला असता परंतु त्याचं पर्यटन-महत्व जाऊ नये म्हणून किती वाकडा ठेवला, पुढची दोनशे वर्षं तो सुरक्षित आहे असं आपण कुठल्या आधारावर म्हणू शकतो, वगैरे टीव्हीनेच मला सांगितलं आणि ते मी बघितलेल्या मनोर्‍यापेक्षा आणि मी काढलेल्या फोटोंपेक्षा खूपच जास्त interesting होतं.

पूर्व आफ्रिकेत गेलो असताना आमच्याच गाडीच्या सावलीत बसलेल्या झोपाळलेल्या सिंहिणी पाहिल्या. त्यांच्या गोंडस पिल्लांचा धुडगूसही पाहिला.

पण शिकारीसाठी दातओठ खाऊन धावणारी सिंहीण, पुढे जिवाच्या आकांतानी पळणारा झेब्रा, तिनी टाकलेली झेप, झेब्र्यानी perfect timing नी मारलेली लाथ, त्यामुळे फ्रॅक्चर झालेला तिचा खालचा जबडा, लाथ मारताना पाय घसरून पडल्यामुळे दुसर्‍या सिंहिणींकडून झेब्र्याची झालेली शिकार, काही खाता न आल्यामुळे दोन आठवड्यानी उपासमारीने त्या सिंहिणीचा झालेला मृत्यू – हे अवर्णनीय, वरकरणी क्रूर वाटणारं पण निसर्गाच्या दृष्टीनं सहजसोपं नाट्य मला टीव्हीनेच दाखवलं. तेही हाय डेफिनिशन आणि स्लो मोशनमध्ये.

मी अजूनही दर वर्षी पर्यटनाला जातो. पुढेही जाईन. पण मला एक माहीत आहे की त्याचा उपयोग फक्त ताजेतवाने होण्यापुरताच आहे.

खरं पर्यटन मी रोज करतो. माझ्या आरामखुर्चीत ! माझ्या जादुई खिडकीसमोर !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख लिहील आहे. खुसखुशीत .खूप हसले .तरी सुधा आराम खुर्चीतल्या पर्यटनाबरोबरच तुम्ही लिहिलेल्या तिसर्या वर्गातल ( ८०% पर्यटक ) पर्यटन करायला मला स्वताला आवडत.
प्रत्यक्ष तिथे जाऊन याची देही याची डोळा बघितल्याचा आनंद जास्त वाटतो .
तुमची लेखन शैली मस्तच आहे. तुमच्या शिप वरच्या नोकरीतल्या आठवणी लिहिणार होतात. त्याच्या प्रतीक्षेत Happy

छान लेख.
जर ठरवलंच तर TV आणि internet इथुन बरच काही शिकता येतं. पूर्वी हे काम पुस्तके करत. याच गोष्टी प्रत्यक्ष जाउन शिकायच्या म्हणलं तर बराच पैसा, वेळ आणि संयम हवा.

स्वीट टॉकर,

तुम्ही सभ्य माणसाच्या नजरेतून लेख लिहिलाय! हल्ली सयामी पर्यटन सुद्धा आरामखुर्चीत बसल्याबसल्या करता येतं! Wink Proud

आ.न.,
-गा.पै.

बरोबर आहे!
इडियट बॉक्स म्हणून हिणविण्यापेक्षा, स्वत: इडियट न बनता योग्य ती चॅनेल्स लावली तर तुम्ही म्हणता ते आरामखुर्चीतले पर्यटन होतेच होते. खरोखरच तुम्ही वर सांगितल्या तशा असंख्य बाबी डिस्कव्हरि व अन्य चॅनेलवरुन बघितल्या/बघता येतात.
छान विषय, चांगला लिहिलाय.

सर्वजण,

धन्यवाद.

आपण सगळे करेक्ट वेळेला जन्माला आल्यामुळे प्रचंड नशीबवान आहोत. धावताना, बसमध्ये बसलो असताना, किंवा दिवाणखान्यात, नुसते कानाला headphones लावले की भन्नाट संगीत, अफलातून काव्य आणि लता, आशा, रफी, किशोर यांचा आवाज असं अमृत आपण पिऊ शकतो. नुसता टीव्ही सुरू केला की जगाची सफर करू शकतो. What more can anybody want in life?

सुजा - बोटीवरच्या आठवणी लिहायला सुरवात केली पण एक चूक माझ्या हातून अशी झाली की सगळ्यात अविस्मरणीय आठवण होती ती पहिली लिहिली गेली. त्यानंतर बाकीच्या लिहायला घेतल्या की त्या मानानी कमी interesting वाटतात म्हणून लिहायला उशीर होत आहे.

मस्त खुसखुशीत लेख.

या झटपट, स्वस्त आणि मस्त पर्यटनाकरिताच करिताच मी अ‍ॅनाकोंडा सिरीज्, लारा क्रॉफ्ट सिरीज्, अराऊंड द वर्ल्ड इन् एटी डेज्, द मिथ् असले इंग्रजी चित्रपट पाहतो. दोन तासांत सातासमुद्रापार जाऊन आल्याचं समाधान मिळतं.

आभासी पर्यटनाची ही कथादेखील वाचावी.

http://www.maayboli.com/node/51389

>>>> सगळ्यात अविस्मरणीय आठवण होती ती पहिली लिहिली गेली. त्यानंतर बाकीच्या लिहायला घेतल्या की त्या मानानी कमी interesting वाटतात म्हणून लिहायला उशीर होत आहे <<<<
कोणती जास्त इन्टरेस्टींग ते वाचक ठरवतील, तुम्ही कशाला ठरवताय? प्रत्येकाचा इन्टरेस्ट वेगवेगळा असू शकतो. तेव्हा हा विचार न करता आलेला अनुभव सांगावासा वाटतोय, तर लिहून सांगुन टाका. त्यात उगाच प्रतवारी नको.