उपयुक्त प्रशव काढा

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2015 - 01:46

मी हा काढा करून पितो आणि घरच्यांना प्यायला देतो. ह्या काढ्याला प्रशव हे नांव मीच दिले आहे. प्रशव म्हणजे काही विशेष नाही, प्रतिकारशक्तीवर्धक!

कृती:

माणशी एक ग्लास पाणी एका पातेल्यात घेऊन ते तापवायला ठेवावे.

पाणी तापत असताना त्यात खाली गोष्टी मिसळत जाव्यातः

हिंग - चिमूटभर
हळद - दिड चमचा
चहा - माणशी अर्धा चमचा
साखर - माणशी अर्धा चमचा
मीठ - चिमूटभर
चहाचा मसाला (ऑप्शनल व असल्यास) - अर्धा चमचा
आले किसून - एक इंचभराचा आल्याचा तुकडा
सुंठ पावडर - मी काढ्यात आले किसून घातलेले असूनसुद्धा सुंठ पूड घालतो
दालचिनी पावडर - दोन चमचे
वेलदोडा पूड - अर्धा चमचा
लवंगा - माणशी एक किंवा दोन
कढीलिंब पाने - दहा (किंवा माणशी चार वगैरे)
तुळशीची पाने - दहा (किंवा माणशी चार वगैरे)
ओवा - चिमूटभर
गवती चहा - मी भरपूर घालतो, आपापल्या इच्छेनुसार घालावा.

हे सगळे मिश्रण ढवळत राहावे व उकळवत राहावे. (इच्छुकांनी त्या तापत असलेल्या मिश्रणाची वाफ इनहेल करायलाही हरकत नाही).

अगदीच उकळले की पाव कप दूध घालून थोडे सौम्य करावे व पुन्हा उकळवत ठेवावे. तसेच ढवळतही राहावे.

नंतर साय धरल्यासारखे होते व काढा उकळून वर येतो. गॅस बंद करून तो मिनिटभर झाकून ठेवावा व नंतर गाळून प्यायला द्यावा.

ह्या काढ्याची काही वैशिष्ट्ये म्हणा किंवा उपयुक्तता म्हणा:

१. सर्दीवर चांगला उपाय
२. घसा व श्वसनमार्ग मोकळे झाल्यासारखे वाटते.
३. थंडी व पावसाळ्यात केव्हाही आणि उन्हाळ्यात अगदी सकाळी किंवा अगदी निजायच्या वेळी उत्तम
४. सर्वच घटक पदार्थ इम्युनिटी वाढवणारे असल्याने (माझ्यामते) हा काढा प्रतिकारशक्ती वाढवत असावा. नक्की दावा करता येत नाही.
५. पचनसंस्थेची स्वच्छता होत असावी. (पुन्हा, तरतरीत व उत्साही वाटते हा माझा अनुभव आहे पण पचनसंस्थेची स्वच्छता होते की नाही ह्याबाबत दावा करू शकत नाही).

काही इतर बाबी:

१. करायला सोपा.
२. सर्वच्या सर्व घटक पदार्थांची उपलब्धता असायलाच हवी असे नाही. एखादा घटक पदार्थ नसला तरी काढा चांगला होऊ शकतो.
३. घटक पदार्थांचे प्रमाण हे मी फक्त विविध प्रयोग करून ठरवलेले आहे. ते तेवढेच असावे असे काही नाही.
४. ज्यांना चहा अजिबात आवडत नाही अश्यांनी चहा पावडर (/ व दूध) नाही घातले तरी चालते.

हा काढा मी उगाच चित्रविचित्र प्रयत्न करत असताना बनला व बायकोला व वडिलांना उपयुक्त वाटला त्यामुळे जरा नीट डेव्हलप केला. ह्यात कोणतेही बदल इच्छेनुसार केले जाऊ शकतीलच! पण काढा प्यायल्यावर घसा, नाक, डोळे, पोट ह्यांच्यावर काहीतरी त्वरीत चांगला परिणाम जाणवतो हा स्वानुभव आहे.

इतर गोष्टी:

मी दिवसातून हे खालील पदार्थ अगदी नक्की व कच्चे खातोचः

आले - लहानसा तुकडा
लिंबू - प्रत्येक जेवणात (/न्याहारीत) पदार्थावर पिळून
मिरची (तिखट) - एक (न्याहारी किंवा दुपारच्या जेवणासोबत किंवा दोन्हीसोबत एकेक)
लसुण - चार पाकळ्या
कांदा - एक पूर्ण
टोमॅटो - एक पूर्ण व मोठा आणि लालभडक
मुळा - नॉर्मल मुळ्याचा अर्धा किंवा एक तृतीयांश भाग

तसेच, जमतील ती फळेही खातो. आजकाल पोळी कमी करून नुसत्याच भाज्या खायचा एक प्रयोग सुरू केलेला आहे. त्यानेही बरे वाटते. हे उगीचच इथे लिहिले. किंवा असे वाटले की ह्या सर्व बाबीही प्रतिकारशक्ती वाढवतात म्हणून आपण खातो हे येथे नोंदवावे.

सकाळी ज्यांना कफ होतो, ज्यांना अनेकदा सर्दी असते, थंडी वाजते वगैरेंसाठी हा काढा चांगला आहे.

वाचकांकडे काही इतर कल्पना किंवा अनुभव असतील तर कृपया अवश्य शेअर करावेत.

धन्यवाद!

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाडगावकरांची एक कविता होती शाळेच्या पुस्तकात "कषाय पेय पतित मक्षिकेप्रत" तुरट पेयात (चहात) पडलेल्या माशीस उद्देशून .आम्रफलमौसम येईल, आम्ही असू, तू नसशील. शेवट गोड ! आहे .

मी काढा कपात ओतुन घेतल्यावर त्यात मध घातले आणि लिंबु पि़ळले. हे दोन्ही घटक उकळल्यावर कामातुन जातात म्हणुन.

काढा छान दिसतोय. मी मीठ,मिरची आणि हिंग नाही घालत. मध आणि लिंबू काढा कोमट झाला की घालते. या वर्षी वाईट थंडी आहे. त्यामुळे आलटून पालटून गवतीचहा काढा नाहितर हा दुसरा काढा असेच सुरु आहे.

Pages