खुळ्यांचा बाजार

Submitted by यतिन-जाधव on 17 February, 2015 - 04:52

मुल जन्माला आल्यावर त्याच्यावर जे संस्कार होतात वा केले जातात ते त्याला आयुष्यभरासाठी असे काही चिकटतात की सोडू म्हणता सुटत नाहीत वा आपण ते बदलूही शकत नाही, अर्थात याला काही अपवाद देखील असतात पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याजोगे, लहानपणापासून त्याला प्रत्येक गोष्ट अशीच करायची, तशी करायची नाही अशा सवयी त्याच्या पालकांकडून वा कुटुंबियांकडून अगदी मुद्दाम शिकवल्या जातात, ते मुल शिकवलेल्या गोष्टी अगदी मनापासून आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असतं पण बऱ्याचदा नको सांगितलेल्या इतर गोष्टींचाही एक कुतूहल म्हणून स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न ते करून पहातं किवा समोरच्या इतर व्यक्तींचे अनुकरण करतं तेव्हा त्याच्यापुढे एक संभ्रम निर्माण होतो कि हि मोठी माणस आपल्याला शिकवतात एक आणि स्वतः मात्र वेगळीच वागतात व याच संभ्रमात ते मुल मोठं होत, आपली एक स्वतःची जगण्याची शैली निर्माण करतं आणि ही शैलीच पुढे त्याची ओळख बनते, त्या चांगल्या-वाईट शैलीवरूनच तो इतर लोकांसाठी अनेकदा चेष्टेचा, विनोदाचा विषय बनतो, अशी बरीच गमतीशीर मंडळी आपल्याला त्यांच्या खुळचटपणाचा अनुभव देतंच असतात.

मुंबईत परळ सारख्या एका मराठी लोकवस्ती असलेल्या परिसरात आमच्या जुन्या बैठ्या वाडीतून एका विकासकाच्या कृपेने आम्ही आता उंच दहा मजली इमारतीत राहायला आलो, आता प्रत्येकाला पुर्वीपेक्षा मोठी ऐसपैस जागा, घरात पाण्याचा नळ व संडास या गोष्टी मात्र नवीनच होत्या, त्यातल्या बऱ्याच कुटुंबांनी हा नवीन बदल आनंदाने आत्मसात केला पण काशिनाथ काकांसारख्या काही थोड्या कुटुंबाना या नव्या घरात अटजस्ट होणं फारच कठीण जातंय, त्यांच्याकडून सतत आपल्या जुन्या वाडीची शान तुमच्या या बिल्डीन्गीक येउची नाय असा नाराजीचा सूर निघतच असतो, त्याचं कारणदेखील तसंच आहे, त्यांना आता वर्तमानपत्राच्या निमित्ताने सहज शेजारच्या घरात डोकावून गप्पा मारता येत नाहीत, कोणाची साधी खुशाली जरी विचारायची तरी आधी बंद दारावरची बेल वाजवावी लागते, एखादी विडी जरी आणायची झाली तरी लिफ्ट वापरणं त्यांच्या डोक्याबाहेरचं असल्यामुळे त्यांना तीन माळे उतरून परत चढावे लागतात, त्यांचेच गाववाले रघुनाथकाका ते देखील काशिनाथ काकांचीच री ओढत असतात, त्यांचा प्रोब्लेम वेगळाच सकाळी उठल्यावर काळ्या तंबाखूची मशेरी लावून त्यांना ना दरवाजा उघडून दाराबाहेर थुंकता येत ना खिडकीतून खाली थुंकता येत, पूर्वी कसं सगळ मोकळं-ढाकळं, साधं टमरेल घेऊन सार्वजनिक संडासाला लाईन लावतानासुद्धा इतरांशी गप्पा होत, विचारांची देवाणघेवाण होई पण आता सगळं घरातच असल्यामुळे त्यांची फारच कुचंबना होते हे नेहमी त्यांच्या बोलण्यात जाणवतं, रामकृष्णरावांची वेगळीच व्यथा पूर्वी वाडीत असताना ताजा मावरा दारात मिळत होता सोसायटीत फेरीवाल्यांना बंदी केल्यामुळे आता चार माळे उतरून बाजारात जाऊन कोळनींशी घासघीस करूनसुद्धा महागच मासे विकत घ्यावे लागतात, अशा अनेक अडचणींवर अगदी मोठ्या मुश्किलीने मात करत मंडळी आता हळूहळू का होईना पण जुळवून घेऊ लागलीत, पण तरीही आपली जुनी सवय इतकी लगेचच बदलेल तर तो माणूस कसला.

आता शेजारच्या परबकाका-काकुंचच बघा काका गिरणीतून रिटायर झालेत, काकांना लहानपणापासूनच अतिशय मोठ्याने शिंकायची सवय, त्यामुळे पूर्वी वाडीत असतांना शेजारच्या घरातली भांडी खाली कोसळत, मग रोजचं भांडण ठरलेलं, या वाईट सवयीमुळेच काकांच्या कानाच्या पडद्यावर ताण येउन आता त्यांना दोन्ही कानांनी अगदीच कमी ऐकू येतं, त्यात काकूंचा चिडखोर आणि संशयी स्वभाव यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होतंच असतात, कमी ऐकू येत असल्यामुळे एखादी साधी गोष्टसुद्धा त्यांना तीन चार वेळा परत-परत सांगावी लागते, शेवटी काकू किंचाळून मोठ्याने ओरडतात, अख्या सोसायटीला ऐकू जातं, तरीही काकांना काहीच कळलेलं नसतं, मग काकू कागद घेऊन लिहून दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण काकांना ते मान्य नसत, काका मान फिरवतात, तो त्यांना त्यांचा अपमान वाटतो, काका आदळआपट करतात व काकू अबोला धरतात, मुळात काकांना कमी ऐकू येतं हि गोष्ट ते स्वतः मान्यच करायला तयार नाहीत, उलट तुच काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुट्तेस असं म्हणून काकुंच बीपी वाढवतात आणि काकुंना तर काय संधीच हवी असते भांडायला, हे असं दिवसातून किमान पाचवेळा तरी घडतं, असा हा त्यांचा रोजचा दिनक्रम, आम्हाला मात्र आता त्याची सवय झालीय.

एके दिवशी मोठ्या भांडणाचा आवाज ऐकून शेजारची वासंतीकाकू आमच्या घरी येउन माहिती काढू लागली, मुळात वासंतीकाकुला सोसायटीत बीबीसी म्हणून ओळखतात, तिला स्वतःला सगळ्या दुनीयेची खबर असते, पण उगाचच काही माहित नसल्याचा आव आणून आपल्याकडून तिला अधिक माहिती काढून मीठ मसाला लावून ती सगळीकडे पसरवायची असते, पण आता अधिक माहिती मिळू न शकल्याने काकूंच्या चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवू लागली, थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी करत काकू इथेच चिकटल्या, मी चहा घेण्याचा आग्रह करताच त्यांना फुटासच्या गोळीचा इशारा बरोबर समजला, अचानक एक महत्वाचं काम आठवल्यासारखं करून काकू निघू लागल्या, इतक्यात काकूंना शोधत नारायणकाकासुद्धा घरी आले आणि तेही गप्पांमध्ये सामील झाले, आता खरचं चहा करण्यावाचून गत्यंतर नव्हते, चहा येईपर्यंत काकुंच्या गप्पा चांगल्याच रंगत आल्या, त्यात त्यांनी कोणाचं कोणाशी लफडं, कोणी कोणाबरोबर पळून जाऊन लग्न केलं, कोणी कोणाला सोडलं, कोणाला कितवा महिना आहे, कोणी कुठल्या डॉक्टरकडे अबॉर्शन केलं पासून कोण आपल्या सुनेला छळतं पर्यंत अनेक लफडयांच ताजं बातमीपत्र सादर केलं आणि काकांनी तोपर्यंत सगळं वर्तमानपत्र वाचून काढलं, इतक्यात चहा आला पण मगमध्ये समोर आलेला चहा पाहून काकांनी नाराजीने आपली अक्कल पाजळलीच, ‘स्टीलच्या पेल्यातून हात भाजत पिलेल्या चहाची गोडी काही वेगळीच आताच्या तुमच्या मगमधल्या चहाला ती गोडी नाय’, काकांचा इशारा मी ओळखला आणि त्यांना बशी आणून दिली, काकांनी लगेच बशीत चहा ओतला आणि फ़ूर-फ़ूर आवाज करत पिऊ लागले, काकुनी रागाने डोळे मोठे करत आवाज करण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण काका मात्र चहा पिण्यात अगदी गुंग होऊन गेले होते, काकू मात्र मगमधून हळूच फुंकर मारून फुकटचा चहा मजेत पीत होत्या जसजसा चहा संपत येऊ लागला तसं तसं काकू हातातला मग आता गोलगोल ढवळून पिऊ लागल्या जेणेकरू खाली उरलेल्या बारीक चहा पावडरची पुरेपूर वसुली व्हावी, शेवटी चहाचा शेवटचा थेंब संपल्यावर काकूंनी मग खाली ठेवला, आता पुन्हा त्यांना ते मगासचं महत्वाच काम आठवलं आणि दोघेही घरी निघून गेले, या एका फेरीत त्यांनी सकाळचा चहा आणि वर्तमानपत्र अशी दोन्ही कामं उरकून घेतली होती पण असे वार लावून हक्काने दुसऱ्याच्या घरी घुसून पाउणचार वसूल करणारे काका-काकू स्वतः मात्र कोणाला ‘आता तुम्ही कधीतरी आमच्या घरी या’ असं चुकूनही कधी म्हणत नाहीत.

माणूस आपली कोणीतरी स्तुती करावी, इतरांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून किती काय काय प्रकारे समोरच्या व्यक्तीपुढे पेश होत असतो, व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, सवयी वेगळ्या, प्रत्येकजण आपला स्वतंत्र ठसा उमटवत असतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीपेक्षा काहीतरी वेगळेपण असते, काहींच्या वागण्यातून एखादा विचित्रपणा जाणवतो, तो त्या व्यक्तीला नाही तर इतरांना जाणवतो, आपल्याला अनेकदा अशी माणसं भेटतात, अगदी आपल्या अवतीभवती.

शेजारी राहणारे मालवणकर दाम्पत्य सखारामकाका आणि विमलाकाकू यांच मात्र अगदी उलट काका सरकारी नोकरीतून रिटायर झालेत, काका घरीच असल्यामुळे टीवी पाहण्याशिवाय त्यांना इतर करमणूक नाही त्यातही जेवणाचे पदार्थ बनवायला शिकवणारे कार्यक्रम तर काकांच्या विशेष पसंतीचे, ते कार्यक्रम पाहायचे आणि काकूंना तसेच पदार्थ बनवायला सांगून भंडावून सोडायचं, यावरून दोघांमध्ये सारखे वाद होत असतात, काका तसे बोलके पण काकू मात्र अबोल आतल्या गाठीची, माणूसघाणी, हाताला बरी चव असल्यामुळे काका तिला सुगरणचं समजतात, काकांना आपल्या मित्रमंडळीना चहा-फराळासाठी घरी बोलावून गप्पा मारण्यात आनंद मिळतो, पण यावरून काकूंची मात्र चिडचीड होते, काका काही ऐकत नाहीत ते नेहमी कोणाला न कोणालातरी जेवायला घरी बोलावतातच, यामागे त्यांचा आपल्या बायकोच्या हातच्या चवीची इतरांनी स्तुती करावी इतका एकच हेतू असतो,

असंच एकदा काकांनी मला आणि माझा मेहुणा रत्नाकर दोघांनाही अचानक एके रविवारी जेवणाचं आमंत्रण दिलं, खूप आढेवेढे घेऊनसुद्धा काकांचा आग्रह आम्ही मोडू शकलो नाही, नाईलाजाने का होईना आम्हाला जावच लागलं, काकांनी आमचं हसतमुखाने स्वागत केलं, काकूंच्या चेहऱ्यावर मात्र ‘आले मेले फुकटात गिळायला’ असाच भाव दिसत होता, जेवण तयारच होतं, काकूंनी लगेच ताट वाढायला घेतली, माशाचं जेवण बनवलं होतं, काकांनी पहिलाच घास तोंडात टाकला आणि बायकोच्या हाताच्या जेवणाची अशी काही तारीफ करू लागले कि थांबता थांबता थांबेनात, वास्तविक जेवायला बोलावलेल्या पाहुण्यांनी जेवणाची स्तुती करावी पण पाहुण्यांनी काही बोलण्याआधीच आपण स्वतःच स्तुती करून मोकळं होण्याची ही त्यांची सवय आम्हाला माहीतच होती, मग आम्हालाही उगाचच स्तुती करणे भागच होते, त्यासाठीचं तर हा सगळा अट्टाहास होता, तसं जेवण ठीक होतं, पण आम्हाला उगाच जरा जास्त तारीफ करावी लागली, तारीफ ऐकून काकूही बाहेर आल्या आणि त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जेवण बनवण्यासाठी आपण किती मेहनत घेतली, किती दूरच्या मार्केटमधून हे मासे आणले, हे मासे सगळीकडे मिळत नाहीत, फार महाग असतो हा मासा अशी माहिती पुरवली, तेव्हा आता आवडला नसला तरी तो मासा संपूर्ण संपवण्यावाचुन पर्याय नव्हता, पुन्हा एकदा तारीफ ऐकण्यासाठी आता काकू आम्हा दोघांनाही परत आग्रह करू लागल्या, ‘काय झालं आवडल नाही का जेवण’ तेव्हा ‘जेवण खुपच रुचकर होतं, मासाही अतिशय चवदार होता आणी काकू तुमच्या हाताची चव तर त्या माशाची लज्जत अधिकच वाढवून गेली’ अशी बरीच स्तुती करून आम्ही जेवण संपवलं व हात धुवून बाहेर येउन बसलो तर आता काका पुन्हा काकूंना ते फ्रीझमधलं फ्रूट-सॅलड घेऊन येण्यास सांगू लागले, आम्ही दोघांनीही पोट अगदी तुडुंब भरलंय आता आणखी काहीही नको असं सांगूनही काकू काचेच्या बाउलमधून फ्रूट-सॅलड घेऊन आल्या, काकांनी प्रथम एक बाउल उचलून खायला सुरवात केली आणि पुन्हा सवयी प्रमाणेच फ्रूट-सॅलडची अशी काही स्तुती केली, कि आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून आता मनातल्यामनात आता याची कोणत्या शब्दात स्तुती करावी याची उजळणी करू लागलो, खरतर फ्रूट-सॅलड काकूंना अजिबात जमलं नव्हत, आतल्या दुधातल्या कस्टर पावडरच्या गुठळ्या झाल्या होत्या, सफरचंदाच्या फोडी आंबट होत्या, केळ्याच्या चकत्या अगदी नरम होऊन बिलबिलीत झाल्या होत्या, द्राक्ष सुद्धा आंबट होती पण काका मात्र तारीफ करत चाटून-पुसून खात होते, आम्ही कसंबसं फ्रूट-सॅलड संपवलं आणि दोघांचे आभार मानत तिथून सटकलो.

वेंगुर्लेकर काका अतिशय चांगली परिस्थिती असूनसुद्धा त्यांना अगदी अजागळ, दरिद्री भिकाऱ्यासारख राहाण आवडतं, त्यांच्याकडे भरपूर चांगले कपडे असूनसुद्धा विरलेले, फाटलेले, डाग पडलेले कपडे घालून ते सगळीकडे मिरवतात, जेणेकरून लोकांची सहानभूती आपल्याला मिळावी हा एकच उद्देश त्यामागे असतो, घरात एखादी नवीन वस्तू आणली की त्याचे खोके, पॅकिंगचं थर्माकोल, गिफ्ट बॉक्सचा रंगीत कागद अशा अनेक गोष्टी ते फेकून न देता आपल्या माळ्यावर नाहीतर बेडखाली जपून ठेवतात, त्यामुळे त्यांचं घर हे एखाद्या उकिरड्यासारखं वाटत, सगळ्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलेल्या हॉलमधेच रात्रीच्या झोपायच्या उषा पडलेल्या, त्या उशीखाली बामच्या बाटल्या चिंध्या कागदाचे कपटे, चोळेबोळे, वर्तमानपत्र तर उघडून, विस्कटून इकडे तिकडे पसरून ठेवलेलं, प्रत्येक वस्तूला एक योग्य जागा असते त्या वस्तूचा वापर तिथेच असतो पण काकांना अंगात मात्र कोणतीही वस्तू कुठेही ठेवण्याचा चाळा आहे, याबाबत त्यांना एकदा अद्दल घडली होती, नेहमीप्रमाणे काका जेवल्यानंतर हात-तोंड पुसायचा नॅपकिन बेसिनच्या रॉडवर न लावता मुद्दाम हॉलमध्ये पाहुणे बसण्याच्या सोफ्यावर नाहीतर डायनिंग टेबलाच्या खुर्चीच्या पाठ टेकायच्या भागावर मुद्दाम हट्टाने पसरून ठेवतात, एकदा दुपारी बेल वाजवून एक कुरियरवाला घरी आला होता, त्याने प्यायला पाणी मागितले काकांनी त्याला आत येउन खुर्चीवर बसण्यास सांगितले व पंखा लावला, पंखाच्या वाऱ्याने नॅपकिन खाली पडला, खाली पडलेला कपडा हा पायपुसणचं आहे अस समजून त्याला तो आपल्या सँडल्सना लागलेली घाण पाय घासून-घासून साफ करत होता, हे पाहून काकांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता, पण यातून बोध घेतील ते काका कसले, बरं घरच्या मंडळींनी साफसफाई केली तर त्यांना ती स्वच्छता पसंत येत नाही, त्यांना त्या उकिरड्यातच आनंद मिळतो, अशी हि त्यांची जगावेगळी आवड.

घाडीगावकर काका-काकुंकडे वेगळाच किस्सा पाहायला मिळतो, सकाळी गडी केरवारा-लादी पुसण्यासाठी येतो तेव्हा तो येण्या आधी काकांची आधी जमिनीवरचं सगळं सामान उचलण्याची लगबग सुरु होते, खाली ठेवलेली टेबल, खुर्च्या सगळ बेडवर उचलून ठेवाव लागतं, नाहीतर गडी निट कचरा काढणार नाही अशी त्यांना भीती वाटते, गडी एका कोपऱ्यात झाडू मारायला गेला की काका त्या कोपऱ्याकडचं सामान हातात उचलून एभे राहतात, दुसऱ्या बाजूला गेला कि पुन्हा तसंच, इकडे गडी कोण असा पाहणाऱ्याला संभ्रम निर्माण होतो, त्यांच्या या खुळचटपणाला सोसायटीतलेच चिन्दरकरकाका कितीतरीवेळा खो खो खो खो हसून गेलेयत, पण याचं काकांना काहीच वाटत नाही, काकूंच्या संशयी स्वभावामुळे तर काकांना सतत गड्याच्या पाठीमागे वॉचवर राहावं लागतं, कारण काकूंची तशी ऑर्डरचं असते आणि ते काकूंच्या धाकापुढे काहीच बोलू शकत नाहीत, काकूंनी मात्र त्यांना आपल्या ताटाखालचं मांजर करून ठेवलंय, भांडी घासताना देखील गड्याने कधी एखादा चमचा-वाटी चड्डीत घालून पळवली तर म्हणून काकूंची सतत त्याच्यावर कावळ्याची नजर असते, असा हा सगळा सोहळा अगदी रोज साग्र-संगीतात पार पडतो, न चुकता.

अनेकदा माणसं सत्य परिस्थिती समजून न घेता स्वतःच्या मनात येईल तेच खरं असं समजून दुसऱ्यालाच नेहमी खोट्यात पाडतात आणि ऎनवेळी तोंडघशी पडतात, जशा आमच्या पहिल्या मजल्यावरच्या मिटबावकरकाकू त्यांनी एकदा समोरच्या सोसायटीमधल्या एका घरात दिवसभर खिडकी उघडी असूनसुद्धा काहीच हालचाल दिसत नसल्यामुळे त्या घरातल्या आजोबांचा खून झाला असावा, असाच आपल्या मनाचा समज करून घेऊन थेट पोलिस चौकीत फोन लावला, पोलिस येउन सगळा तपास करून गेले पण आक्षेपार्ह काहीच न आढळल्यामुळे काकूंना चांगलीच तंबी देऊन निघून गेले, आणि सगळ्या सोसायटीत काकुंच हसं झालं.

आचरेकर काकुंची गोष्टच निराळी, जगातलं सगळं आपल्यालाच कळत असा त्यांचा समज, कुठलीही गोष्ट घ्या ती त्यांना आधीच माहित असते, जरी माहित नसली तरी एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला ज्या गोष्टीत काही कळत नाही तिथे गप्प न बसता आपलं अज्ञान प्रकट करणे व समोरच्याने आपल्याला फसवायची संधी त्याला आयतीच देणे हा त्यांचा स्वभाव, त्या एखाद्या दुकानात गेल्यावर तिथल्या वस्तूची किंमत आपल्याला परवडणारी नसल्यास गप्प न बसता बापरे, बा बा बा असा सूर काढून त्या समोरच्या दुकानात हिच वस्तू अर्ध्या किमतीत मिळतेय असं पचकतात व आपण ती वस्तू खरेदी करण्याच्या लायकीचे नसल्याचं त्या दुकानदाराच्या नोकरांना जाणवून देतात, त्यामुळे हल्ली काकूंना दुरून येतांना पाहूनच दुकानातले नोकर आधीच सावध होतात.

आजगावकर अण्णांना तर कोणत्याही बाबतीत कमीपणा मान्यच नसतो, नेहमी आपण दुसऱ्याच्या वरचढ असल्याचं दाखवण्यासाठी सतत थापा मारणे हा त्यांचा एक विलक्षण गुण, बऱ्याचदा या गुणामुळे ते अडचणीत सुद्धा येतात पण सवय काही केल्या जात नाही, कोणीही एखादी वस्तू विकत घेतली की त्यापेक्षा अधिक महाग व चांगली वस्तू नेहमीच त्यांच्याकडे घरी किव्वा गावाला तयार असते, असंच पूर्वी गावी सगळ्यांना थाप मारली कि मुलगा मुंबईला डॉक्टर आहे, त्याचं स्वतःच मोठं हॉस्पिटल आहे, प्रत्यक्षात अण्णांचा मुलगा बाबू हा एका प्रायवेट क्लिनिकमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करतो त्यांना माहितीय की प्रत्यक्ष कोण येतंय मरायला बघायला, पण झालं भलतंच, त्यांच गाव अत्यंत दुर्गम भागात असल्यामुळे गावात वैद्यकीय सुविधा वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळत नसे, तेव्हा गावच्या गावकीत सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपल्या वाडीत जर कोणाला काही गंभीर आजार झाला तर आता तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात दाखल न करता सरळ मुंबईला अण्णांच्या हॉस्पिटलमधेच रुग्णाला भरती करायचे, आपलाच माणूस असल्यामुळे स्वस्तात आणि चांगले, खात्रीचे उपचार होतील, आणि एके दिवशी गावावरून अण्णांच्या घरी फोन आला की ‘हणम्याची म्हातारी शीक झालीय, बारक्यासोबत तिला उद्या सकाळच्या एसटीने मुंबईला पाठवतो, तिला उतरून घ्या आणि बाबूच्याच हॉस्पिटलमधे तिच्यावर उपचार सुरु करा, आम्ही नंतर येतोच पैसे घेऊन’ आता अण्णांची बोबडीच वळली, आपली थाप आता उघडकीस येणार याची एक क्षण त्यांना भीती वाटली पण सहजासहजी हार मानतील ते अण्णां कसले, समोरच पडलेल्या वर्तमानपत्रातील बातमी वाचून यातून बाहेर पाडण्यासाठी त्यांनी लगेचच एक नवी थाप मारली की ‘इतक्या तातडीने येण्याची अजिबात आवश्यकता नाही, अरे आजचा पेपर वाचला नाही का? पंतप्रधानांच्या सिंगापूर दौऱ्यावरील शिष्टमंडळात वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्या बाबूची नियुक्ती झालीय, त्यामुळे तो आज सकाळीच सिंगापूरला रवाना झाला, तिथे पुढे त्याला एका कॉन्फरन्समध्ये भाग घ्यायचाय, म्हणजे पुढचे आणखी वीसेक दिवस तरी तो काही परत मुंबईत येत नाही आणि सोबत आम्ही दोघंही सिंगापूरला जातोय, म्हटलं आपण दोघ एकटे इकडे काय करणार, जरा फिरून येऊ सिंगापूर, त्यामुळे तुम्ही इतक्या तातडीने इकडे येण्याची घाई करू नका, नाहीतर उगाचच बंगल्यावरचं भलमोठ कुलूप बघून तुम्हाला परत जावं लागेल’ ही अशी थाप त्यांनी अगदी सहज आम्हा मित्रांसमोर मारली.

तळाच्या पेडणेकर काका-काकुंचे किस्से तर आता सगळ्या परळमध्ये पसरलेत, काकूंना घरी जेवण करायचा अगदी मनापासून कंटाळा, पण रोजरोज बाहेर खायला परवडायला पाहिजे, कारण काकू आहेत एक नंबरच्या चिकट, दुसऱ्याने केलेल्या जेवणालाही सतत नावं ठेवणे हि त्यांची एक वाईट खोड, जेव्हा काका-काकू हॉटेलमध्ये जेवायला जातात तेव्हा त्यांच्या वागण्याने कोणता ना कोणता नवीन किस्सा घडतोच, कधीही कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर मेनूकार्ड मधली पदार्थांची यादी वाचून एखादा पदार्थ मागवण्यापेक्षा नेहमी सर्वात कमी किमत असलेला पदार्थ मागवून त्या मोकळ्या होतात आणि आजकाल महागाई किती वाढलीय यावर चर्चा सुरु करतात, काका मात्र तो पदार्थ खातांना इतर कोणाचेही भान न राखता दरिद्र्यासारख भुरकून भुरकून निरनिराळे आवाज करत सगळं जेवण एन्जॉय करत असतात आणि शेवटी ताट वर हवेत उलटं उचलून चाटूनच साफ करतात, पण काकु मात्र नेहमीप्रमाणे जेवण न आवड्ल्याचं नाटक करून पूर्ण पोट न भरल्यामुळे त्याचा राग वेटरवर काढतात व एकाही पदार्थाला थुन्कीचीसुद्धा चव नव्हती अस अगदी त्याला आवर्जून ऐकवतात, काकूंची हि सवय माहित असल्यामुळे एकदा एका आगाऊ वेटरने काकूंची नेहमीची टेप चालू झाल्यावर लगेचच त्यांना काकांची ताट उचलून चाटून साफ करत असलेली आपल्या मोबाईलवर नुकतीच रेकॉर्ड केलेली क्लीप दाखवल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला, आणि काकू काकांना दोष देत चरफडत बाहेर पडल्या, हल्ली त्यांचा हा किस्सा सोसायटीत मोठ्या चवीने चघळला जातोय.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users