स्वयंपाक

Submitted by मोहना on 16 February, 2015 - 20:09

"आई, आज मी करते स्वयंपाक. " ऐकलं आणि पोटात गोळा आला. लेकीला स्वयंपाकाची आवड लागल्यापासून इतक्या वर्षांच्या माझ्या मेहनतीवर पाणी पडणार याची लक्षणं नजरेसमोर यायला लागली होती.
परवाच तिने तारे तोडले होते. म्हणाली,
"किती सोप्पं असतं कुकिंग." आधी आजूबाजूला पाहिलं. नवरा, मुलगा जवळपास नाहीत याची खात्री केली आणि म्हटलं,
"कुकिंग? मराठी शब्द शोध या शब्दासाठी." हल्ली हे शस्त्र फार उपयोगी पडायला लागलंय. तिचा मेंदू मराठी शब्दाच्या शोधाला निघाला आणि माझा काही काही गैरसमज तसेच रहाण्यासाठी काय करावं याच्या. नाहीतर काय, कुकिंग सोप्पं आहे ही बातमी घरात प्रसारित झाली तर संपलं सगळं. गेली कितीतरी वर्ष मी एकच पाढा म्हणतेय, माझं आयुष्य म्हणजे रांधा, वाढा, उष्टी काढा... खरं तर प्रत्येकजण स्वत:चं ताट उचलून विसळून ठेवतो त्यामुळे उष्टी बादच आणि रांधणं किती होतं हा ही प्रश्नच. पण जे मिळतंय तेही बंद होईल या भितीने नवरा आणि रोजच्या रोज बाहेरचं खायला मिळतं या आनंदात मुलगा माझ्या ’रांधा वाढा...’ चालीत सहानुभूतीचा सूर मिसळत आले आहेत. वर्षानुवर्ष. मुलगा तर जेव्हा जेव्हा एखादा पदार्थ करतो तेव्हा आज मी रांधा, वाढा, उष्टी काढा करणार असंच म्हणतो. नवरा असलं काही करायच्या फंदात पडत नाही किंवा मीच त्याला त्यात पडू देत नाही. कारण नवर्‍याने एखादा पदार्थ करायचा ठरवलं की क्रम ठरलेला असतो. मी अत्यानंदाने सोफ्यावर फतकल मारते आणि त्याने कोणता पदार्थ कसा करावा याचं मार्गदर्शन सुरु करते आणि तो माझ्या पाककृतीतली कृती वेगळी कशी करता येईल या विचारात गर्क होतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्यामुळे पदार्थाची चव नेहमीपेक्षा वेगळी लागते. म्हणजे बिघडते का असं विचारलं की त्याकडे दुर्लक्ष करुन अशा प्रयोगांनीच असंख्य शोध लागतात हे तो ठासून सांगतो. त्याला कसलातरी शोध लागून नोबेल प्राईज वगैरे मिळालं तर म्हणून मी माझी गाडी त्याच्या विचारशक्तीला खीळ घालत नेहमी पराठ्यावर आणून थांबवते.
"तू पराठे मस्त करतोस. तेच कर. "
"कसे करायचे? " आजतागायत तो हे चेष्टेने म्हणतो की त्याला हा प्रश्न खरंच पडतो ते समजलेलं नाही. पण त्याने प्रत्येक गोष्टीसाठी ’कुठेय...?’ विचारण्याआधीच एका जागी बसून मी घरात स्वयंपाकघर नावाचा एक भाग कुठे आहे, बटाटे कुठे असतात, गॅसची शेगडी कुठे असते, झालंच तर लसणीचा कांदा वापर म्हणजे आपला तो नेहमीचा कांदा नव्हे रे, लसणीचा कांदा आणि नुसता कांदा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत यावर बराच वेळ बोलते. ते झालं की लसूण, मिरची सारं कुठे सापडेल त्याची दिशा बसल्या जागेवरून बोटाने दाखवते. जिकडे बोट दाखवेन त्याच्या विरुद्ध बाजूला तोही ठरल्याप्रमाणे जातो. मग माझं कपाळावर हात मारणं, पुरुषांचा ’कॉमन सेन्स’ काढणं हे नेहमीचं काम मीही घाईघाईत उरकते. एकेक करता करता सारी सामुग्री एकत्रित झाली आहे असं वाटलं की पंजाबी मैत्रीणीने सांगितलं तसं कणकेत बेसन घालावं की घालू नये याचा खलही बराचवेळ चालतो. माझ्या आईचे पराठेच किती मस्त होतात आणि त्याची आई ते करते तरी की नाही यात अर्धा तास जातो. शेवटी भूक लागली, भूक लागली असं मुलं कोकलत आली की तुझं ना हे असंच, चला आता बाहेरच उरकू जेवण असं म्हणत कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये जाणं. ह्या नेहमीच्या क्रमाला मुलंही सरावली आणि सोकावली आहेत. ती रोजच बाबा करेल काहीतरी, बाबा करेल काहीतरी म्हणून मागे लागतात आणि स्वयंपाकघरातलं वर्चस्व ढळू द्यायचं नाही अशी माझी प्रतिज्ञा असल्याने कितीही काबाडकष्ट करावे लागले तरी मी त्याला स्वयंपाकघरात तग धरुच देत नाही. दुसरं म्हणजे खरंच त्याला नोबेल प्राईज मिळालं तर?

अशा तर्‍हेने इतकी वर्ष माझं वर्चस्व मी स्वयंपाकघरात अबाधित राखलं आणि अचानक ते स्वयंपाकघर भूकंप झाल्यासारखं माझ्यासकट हादरायला लागलं. माझ्या कार्यक्षेत्रात मुलीची ढवळाढवळ सुरु झाली. एक दोनदा ठीक आहे. तेरड्याचा रंग तीन दिवस म्हणत तिच्या पाककौशल्याचा डंका मीच पिटला सोशल नेटवर्क वर भारंभार फोटो टाकून. मुलगी हाताशी आली, आज हा पदार्थ, उद्या तो. फोटोच फोटो. माझ्या जाहिरातबाजीने घरादाराला एका नवीन ’शेफ’ चा जन्म झाल्याची चाहूल लागली आणि आमचा हा छोटा आचारी रोज घटक पदार्थ आणायला हाताखालच्या माणसाला पाठवतात तशी माझी बाजारात पाठवणी करायला लागला. इतक्या वर्षांनी माझं व्यवस्थापन कौशल्य सुधारावं लागणार अशी चिन्ह दिसायला लागली. सरकारी नोकर कसे वरिष्ठ आल्यावर जागे होतात त्याप्रमाणे लेक स्वयंपाकघरात शिरल्यावर मी खडबडून जागी झाले.
"हे बघ, तू कधीतरी करतेस आणि एखादाच पदार्थ करतेस ना म्हणून तुला सोप्पं वाटतं. रोज करायला लागलीस की काही सोपंबिपं वाटत नाही."
"असं कसं? कोणत्याही गोष्टीची सवय झाली की सगळं सोपं वाटतं असं तूच तर सांगतेस. मग स्वयंपाक पण आणखी सोपा वाटायला पाहिजे." इतकं बोलल्या बोलल्या तिचा चेहरा विचारचक्र चालू झाल्यासारखा होतो. आमच्या घरात मी सोडून सर्वजण सतत विचार करत असतात. त्यांचे चेहरे विचारमग्न झाले की माझ्या छातीत कुठलं गुपित उघडं पडणार या काळजीने ’धस्स’ होतं. आताही ते तसं झालं आणि लगेचच आलेल्या अय्याऽऽऽने ते धस्स, धस्स होणं एकदम वाढलंच.
"अय्याऽऽ म्हणजे तुला सवय झालीच नाही स्वयंपाकाची?" मोठा शोध लागला होता तिला. लावा शोध नी मिळवा नोबेल प्राईज घरातल्या सगळ्यांनीच. ही मुलं तरी ना, नको तेव्हा अक्कल कशी पाजळायला शिकतात देवजाणे. त्यातून मुली अधिक. घरातल्या दोन पुरुषांनी माझं डोकं खरंच इतकं कधी खाल्लं नव्हतं. काय म्हणेन त्याला मान डोलावून मोकळे होतात. बर्‍यांचदा ती मान होकारार्थी आहे की नकारार्थी आहे तेही कळत नाही. पण ते कसं न ऐकता मान डोलावतात तसं मीही न विचार करता माझं पटलं म्हणून त्यांनी मान डोलावली आहे असंच गृहीत धरते. तर ते जाऊ दे, वेगळा, स्वतंत्र आणि मोठा विषय... मी पुन्हा लेकीकडे वळले,
"अगं मला म्हणायचं आहे की तू एखादाच पदार्थ करतेस ना म्हणून तुला सोप्पं वाटतं. मी बघ, रोज भात, भाजी, रसभाजी, आमटी, दाट वरण, पोळी, चटणी, कोशिंबीर, झालंच तर ताजं ताजं लोणचं, काहीतरी गोड... " ती नुसतीच बघत राहिली.
"काय झालं? "
"तू किती पदार्थांची नावं घेतलीस. "
"हो, मग? "
"पण एक दिवस आम्ही फक्त पोळी - भाजी खातो आणि एक दिवस फक्त आमटी - भात. तू म्हणतेस साग्रसंगीत फक्त सणासुदीला. " एव्हाना नवरोजी प्रवेश करते झालेले असतातच.
"सणासुदीला पुरणपोळी, गुळपोळी, बासुंदी, श्रीखंड असं करतात पिल्ल्या. "
"हे काय असतं? " लेकीच्या चेहर्‍यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह, नवर्‍याला खावं की गिळावं या पेचात मी. तितक्यात बच्चमजींचा प्रवेश.
"भारतात गेलो की नाही का आपण खात आजीकडे... " युद्ध हरणार असं दिसताच मी अखेरचा डाव टाकला.
"किती बोलता रे सगळी? आणि ते सुद्धा एकाचवेळी. आपण असं करु, मूळ मुद्द्याकडे वळू या. तुला स्वयंपाक करायचा आहे आज असं म्हणत होतीस ना? " लांबलचक वाक्य टाकलं की आधी काय चालू होतं ते सगळी विसरतात. मी थोडं थांबून तो परिणाम साधल्याची खात्री केली आणि म्हटलं,
"मला काय वाटतं, आज तुमच्या बाबालाच काहीतरी करु दे. " आता त्याची माझ्याकडे पहाण्याची नजर खाऊ का गिळू अशी. मुलं एकदम खूश.
"चालेल, चालेल, बाबा तूच कर. "

मी एका दगडात दोन तीन पक्षी मारल्याच्या आनंदात नेहमीप्रमाणे त्याला मार्गदर्शन करायला सोफ्यावर फतकल मारते...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Lol
मस्त!!

माझं आयुष्य म्हणजे रांधा वाढा, उष्टी काढा...>>> यात रांधानंतर एक स्वल्पविराम टाक. नाहीतर 'रांधा' हा पदार्थ आहे असं वाटेल Wink

मस्त !

धुणी धुवा, मग झाडून काढा
रांधा, वाढा, उष्टी काढा
निवडा तांदूळ, लाटा पोळ्या
करा शेवया, घाला गं लोणचं
..

ताईबाई आता होणार लगीन तुमचं..

मस्त Happy
'स्वयंपाक कित्ती सोप्पा आणि कित्ती आनंददायक गोष्ट' हे म्हणणारे बहुधा 'स्वयंपाक' दोन महिन्यातून एकदा करताना दिसतात आणि तो झाल्यावर त्यांना ओटा आवरुन देणं, तो होण्या आधी त्यांना योग्य भांडी काढून देणं, भाज्या चिरुन देणं, तवा तापवून देणं हे सर्व "रोज स्वयंपाकाबद्दल उग्गीच तक्रारी करणार्‍या कटकट्या माणसाने" करुन द्यायचं असतं. Happy (डिसक्लेमरः स्वयंपाकाची आवड आहे आणि तो दुसर्‍या कोणी भाजी आणून दिली आणि जवळ वेळ असला तर सोप्पा आणि आनंदायक अजून वाटतो.)

मस्त!

दिनेशदा,
'रांधा, वाढा, उष्टी काढा ' नेमकं कुठून घेतलंय असा नेहमी प्रश्नं पडायचा.
आज उत्तर मिळालं.
धन्यवाद!

Pages