नायजेरियन विचित्र कथा - ६ - आला अंगावर

Submitted by दिनेश. on 16 February, 2015 - 09:49

८ डीसेंबरचा तो दिवस... आम्हा सर्वांसाठी काळ ठरला असता. पण ...

OFFICE PLAN.jpg

हि कथा लिहिण्यापुर्वी आमच्या अगबारामधल्या ऑफिसचा प्लान समजावून घ्यावा लागेल. मेनगेटच्या बाहेर रस्ता होता. तिथे रांगेने ट्रेलर्स माल उतरवण्यासावा, आपला नंबर कधी लागतोय याची वाट बघत असत. रस्त्याच्या कडेला काही छोटी दुकाने होती. तिथून मी रोज अननस, संत्री वगैरे घेत असे. आम्ही रोज संध्याकाळी ऑफिसमधे ती फळे खात असू.

मेनगेटहून ट्रेलर आत आला कि तो सरळ वे ब्रिजवर जात असे. कच्चा माल आला तर आमच्या खात्याला त्यात काही करण्यासारखे नसे. उत्पादन झालेला माल बाहेर जाताना मात्र आम्ही इनव्हॉइस वगैरे बनवत असू. तोपर्यंत माल भरलेला ट्रेलर माझ्या ऑफिसच्या खिडकी समोर उभा राही.

माझ्या ऑफिसचे ३ विभाग होते. ए दरवाजा फक्त आमच्यासाठीच होता, म्हणजे आगंतुकांना त्या दरवाज्याने प्रवेश नसे. एरवी तो आतून बंद असे. बी दरवाजा माझ्या खात्यात येणार्या लोकांसाठी असे. मुख्य दालनात मी आणि माझा मदतनीस अंकुर बसत असू. छोट्या दालनात, मोझेस, लकि आणि अकिंटोला असे तीन मदतनीस बसत असत.
या दोन विभागात अर्धी भिंत होती व वर काच होती. माझ्याच खात्याचा आणखी एक विभाग म्हणजे कॅश ऑफिस. तिथे कॅशियर मुलगी ग्रेस बसत असे. तिच्या विभागात जायला स्वतंत्र दरवाजा होता, आणि तोही ती आतून बंद करत असे.

मोझेस, लकि आणि अकिंटोला एकामागोमाग दरवाज्याकडे तोंड करून बसत असत. त्या तिघांशीही माझा आय कॉन्टॅक्ट असे. अंकुर मला काटकोनात पण वेब्रिजकडे तोंड करून बसत असे. त्यामूळे त्याला मेन गेट दिसत नसे.

माझ्या समोर मोठी काचेची खिडकी होती. ती आम्ही क्वचितच उघडत असू (कारण सरडे आणि धूळ येत असे ).
पण मला बसल्या जागेवरून मेन गेट्चा थोडासा भाग दिसत असे..

माझ्या विभागातून ग्रेसच्या विभागात जायला बाहेरुनच जावे लागत असे. . तिथे एक कॉरीडॉर होता आणि दुसर्या बाजूला दुसरी खाती होती.

ग्रेसला माझ्याकडे काही काम असेल तर तिला तिचा विभाग बंद करून माझ्या विभागात यावे लागे. या दोन विभागांच्या मधे भिंत होती. बी दरवाज्याने येणारी मानसे माझ्या समोर न येता बाजूला येऊन ऊभी रहात . ते टाळण्यासाठी मी त्या बाजूला साईड टेबल ठेवले होते आणि त्यावर माझा प्रिंटर होता. मी स्वतः मात्र ए दरवाज्याने येत जात असे.

ग्रेसच्या आणि आमच्या विभागात जी भिंत होती. तिला लागून आमचा सर्व्हर होता. बाजूला स्कॅर्नरही होता.
ग्रेसचा विभाग चिंचोळा होता. तिथे एक खिडकी होती. त्यातून ती पेमेंट करत असे. कॅशचा मामला असल्याने तिला दाट ग्रिल होते. खिडकीला लागून तिचे टेबल, मागे अर्थात तिची लाकडी खुर्ची आणि तिच्यामागे भिंतीला लागून एक लोखंडी कपाट होते.

त्या दिवशी आमच्या कंपनीत गोदीमधून लोखंडाच्या पत्र्याच्या कॉईल्स येत होत्या. एक एम एम जाडीच्या या पत्र्याच्या कॉईल्स, एका ट्रेलरवर साधारण तीन ठेवलेल्या असत. प्रत्येकीचे वजन साधारण ६/७ टन असल्याने यापेक्षा जास्त ठेवता येत नसत.

ट्रेलरवर त्या साखळीने करकचून बांधलेल्या असत. शिवाय त्या जागच्या हलू नयेत म्हणून खाली लाकडी आधारही असे. अर्थातच या साखळ्या सोडवून क्रेनने त्या कॉईल्स उतरवून घ्यायला वेळ लागत असे.

तर त्या दिवशीचा शेवटचा ट्रेलर आत घेऊन आम्ही निवांत अननस खात होतो. आमच्या विभागतल्या प्रत्येकाचा त्यात वाटा असल्याने आम्ही एकत्र जमलो होतो. आम्ही दर शनिवारी सँडविच पार्टी पण करत असू. ग्रेस टोस्टर घेऊन येत असे. त्याचे पैसे आम्ही एकेक करून देत असू. त्यावेळी माझी टर्न होती. तर ते सगळे आटपून आम्ही आपापल्या जागी जाऊन बसलो.

माझ्या विभागाच्या समोर जी खिडकी होती तिच्या बाहेर मी काही फुलझाडे लावली होती. तिला लागून पायी येण्या जाण्यासाठी रुंद वाट होती आणि तिला रस्त्याच्या बाजूने लोखंडी कुंपणही होते. त्यामूळे अवजड वहाने जाण्यायेण्याच्या रस्त्यात कुणी पायी जायचा प्रश्नच नव्हता.

मी जागेवर बसल्यावर शेवटचा ट्रेलर बाहेर जाताना बघितला. पण तेवढ्यात एक आक्रितही घडले. बाहेर ऊभा असलेला एक ट्रेलर वेगात आत येताना दिसला. इतकेच नव्हे तर त्या चालत्या ट्रेलरमधून ड्रायव्हरने बाहेर उडी मारलेलीही मी बघितली. तेवढ्या क्षणार्धात मी जोरात, " अंकुर भाग " म्हणून ओरडलो .

हा ट्रेलर आता माझ्याच रोखाने येत होता हे मला स्पष्ट दिसले. अंकुर ए दरवाज्याने बाहेर पडलेलाही मी बघितला.
त्या ट्रेलरने लोखंडी बॅरिकेड तोडले. आणि खिडकीच्या कडेला भिंतीवर आदळला. त्या धक्क्याने अंकुरचे टेबल माझ्या दिशेने सरकले व मी तीन टेबलांच्या मधे अडकलो.

मी खुर्चीवर बसून राहिलो आणि दोन्ही हात चेहर्यावर आडवे घेतले. माझ्या समोरची भिंत कोसळल्याचा आवाज मी ऐकला. खिडकीच्या काचेचे तुकडे माझ्या डोक्यावर व सगळ्या अंगावर पडले.

पण शेवटच्या क्षणी त्या ट्रेलरने दिशा बदलली व तो आमच्या सर्व्हरच्या भिंतीवर आदळला. ती भिंतही त्या धक्क्याने पडली. ट्रेलर थांबला तेव्हा तो माझ्या टेबलापासून केवळ ३ फुटावर होता.

५/१० सेकंदाने धुरळा खाली पडल्यावर मी ऐकल्या त्या किंकाळ्या आणि आरडाओरडा. मी जिवंत होतो यावर माझा विश्वासच बसेना. दुसर्या बाजूने माझा ड्रायव्हर आत आला आणि त्याने मला उचलून बाहेर नेले. मला मिठी मारून तो रडू लागला.

आणि त्याच क्षणी मला आठवले कि ग्रेस आतच आहे. आम्ही सगळे तिच्या खिडकीच्या बाहेर धावलो. ती भिंत शाबूत होती. ती खिडकीच्या आत डोके खाली करून बसली होती.
ग्रेस, हाऊ आर यू ? से समथिंग ? असे आम्ही सर्वच ओरडू लागलो. ती जिवंत होती , " आय डे बाबा, आय डे स्मॉल स्मॉल " असे तिने उत्तर दिले . ( मी जिवंत आहे बाबा, मी कशीबशी जिवंत आहे. ) (मला ती बाबा म्हणत असे.)

ती जिवंत आहे याचा आम्हाला फार आनंद झाला पण तिची अवस्था बिकट होती. ती खुर्चीवर होती पण खुर्ची टेबलावर कलंडली होती. खुर्चीच्या पाठीवर लोखंडी कपाट कलंडले होते. कपाटावर भिंत कलंडली होती.
भिंत हॉलो ब्लॉक्स्ची होती. अनेक ब्लॉक्स सुटे होऊन तिच्या आजूबाजूला पडले होते. कपाटाच्या आडोश्यामूळेच ती वाचली होती. खिडकीचे गज हाताने घट्ट धरून थेवले होते तिने आणि पाठीवर कपाट आणि भिंत यांचे ओझे संभाळत ती वाकून बसली होती.

ऑफिसचे छत जिप्सम बोर्डचे होते. त्यामुळे वरून काही डोक्यावर पडले नव्हते ( माझ्याही )
आता तिला बाहेर कसे काढायचे हा मोठा प्रश्न होता. तिच्या खिडकीचे ग्रील बारीक होते. आधी तिला कोल्ड ड्रिंक देऊ असे मी सुवचले. त्या जाळीतून स्ट्रॉ घालून तिला ते पाजले. ती स्ट्रॉ धरायलाही तिला हात सोडता आले नाहीत.

ति खिडकी वाली भिंत कोसळली नव्हती. सहा जणानी एकाच वेली ते ग्रील कापायला सुरवात केली. गॅस कटर वापरून चालणार नव्हता. त्यांच्या मदतीला आणखी दोघे जण आले आणि १५/२० मिनिटात ते ग्रील सुटे झाले.

ते कपाट मागे केल्याशिवाय ती मोकळी झाली नसती. पण कपाटावर भिंतीचे वजन असल्याने एकट्याला ते मागे सारणे शक्य नव्हते. शिवाय ते मागे सारण्यासाठी जर दोघ तिघे त्या टेबलावर चढले असते तर ते ते टेबलच मोडले असते.

त्याही परिस्थितीत आमच्या कंपनीतले इंजिनीयर श्री तुषार गज्जर शांत राहून परिस्थिती हाताळत होते. या सर्व शक्यता त्यांच्याच डोक्यात येत होत्या.

शेवटी सहा जणांनी बाहेरून लोखंडी पाईप्स च्या सहाय्याने ते कपाट मागे ढोसून ठेवले. त्यातही त्या कपाटाचा एक भाग तूटला आणि पाईप आत गेला. पण आता ग्रेस काही इंच हलू शकत होती. तिच्या हातावरचा आणि पोटावरचा दाब कमी झाला होता. तिने पाय हलवून बघितले. ते ठिक होते. पण तरी ती खिडकीतून बाहेर येईल अशी शक्यता नव्हती.

मग तूषारने तिच्या समोरची भिंत तोडायचा निर्णय घेतला. तेही काम हळुवार पणे करायला हवे होते. पण त्यांनी स्वतःच हळू हळू ते काम केले. ती भिंत तोडल्यावर तिचे टेबल कापून काढले आणि तिला आम्ही हात धरून बाहेर ओढले.

त्या आनंदात कपाटाला टेकू दिलेल्यांनी ते टेकू तसेच टाकले आणि ते कपाट आणि मागची भिंत खाली कोसळले..

ग्रेसचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. तिला साधे खरचटलेही नव्हते. . हाताला थोडी रग लागली होती एवढेच.

माझा हात हातात घेतल्यावर तिच्या हाताला रक्त लागले. तिनेच निरखून बघितल्यावर मला कळले कि माझ्या मनगटाच्या आतल्या बाजूस ( बहुदा काचेने ) जखम झाली होती आणि माझा तळवा रक्ताने भरला होता. पण रक्त वहायचे थांबलेही होते.

आम्ही सगळे एकमेकांना मिठी मारून रडतही होतो आणि हसतही होतो.

झाले असे होते कि आज आपला आपला नंबर लागत नाही असे बघून ट्रेलरचा ड्रायव्हर जरा लांब गेला होता. आतला ट्रेलर बाहेर काढण्यासाठी जेव्हा दरवाजा उघडला, त्यावेळी क्लीनरने अतिशहाणपणा करून ट्रेलर आत घुसवायचा प्रयत्न केला.

त्याला अर्थातच ते धूड आवरले नाही. त्याचा ताबा सुटल्यावर त्याने उडी मारली आणि २०/३० टनाचे ते धूड आमच्या अंगावर आले.

पुढे काय व्हायचे ते झाले, पण ग्रेस सकट आम्ही सर्व फेसबूक वर मित्र आहोत. ८ डिसेंबरला एकमेकांना अवश्य ग्रीट करतो.
=========================

या बरोबरच मी हि मालिका संपवतोय. हे अनुभव विचित्र होते खरे पण नायजेरियात वास्तव्य केलेल्या कुणालाही हे अनुभव येऊ शकतात.
पण म्हणून तो देश राहण्यासाठी अगदी वाईट आहे, असे मुळीच नाही. अनेक भारतीय तिथे सुखाने राहताहेत. भारतीय खाद्यपदार्थही सहज मिळतात आणि त्यात जी कमतरता रहात असेल ती एकमेकाम्शी स्नेहाची नाती निर्माण करून भरून काढतात. २० वर्षापुर्वी तिथे जोडलेली नाती मी अजूनही जपतोय. आणि माझ्या मित्रांत मी काळे गोरे असा भेद कधीच करत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्यात संपली पन Sad .. तुमचे अनुभव वाचायला मज्जा येते. प्रत्येक वेळी काही तरी नविन असत.. लिहित राहा. Happy

छान मालिका.
ऑफिसच्या ले आउट मुळे ट्रेलर अंगावर येतानाची कल्पनाच घाबरवून गेली. सगळे सुखरुप होते वाचून हुश्श झालं.

बाप रे! देवाची कृपा म्हणून वाचलात सगळे जण! त्या क्लीनरला काही शिक्षा झाली का?
छान मालिका झाली आहे! तुम्ही बरेच देशाटन केले आहे ना? आता असेच इतर देशांतले अनुभव पण येऊ द्या!

फारच भयानक अनुभव! नशिब बलवत्तर होते म्ह णून वाचलात सर्वजण! मस्त होती सर्व मालिका!

मालीका चांगली होती.

हा किस्साही विचित्र म्हणण्यापेक्षा भयानक होता.

छोटासाच पण अंगावर आणणारा अनुभव.
त्वचेचा रंग कोणताही असो संकटकाळी सगळे एकत्र येतात हेच खरं.

आभार मित्रांनो,

त्या वेळी बाहेर पडू शकलेले अंकूर वगैरे यांच्याही मनात, मी आणि ग्रेस जिवंत राहिलो असू याबद्दल शंकाच होती.
त्या ट्रेलरने आयत्यावेळी दिशा बदलली नसती, तर अर्थातच मी वाचलो नसतो.

ग्रेस खरेच हिम्मतवान. पाठीवर एवढे ओझे घेऊन ती निदान तासभर तरी राहिली होती. सुटका झाल्यावर तिने डॉक्टरकडे जायला नकार दिला व ती थेट घरी गेली.

तो क्लीनर अर्थातच पळून गेला. ( नायजेरियात अनेक ठिकाणी घनदाट जंगल, दलदल आहे. आपण त्यात शिरायचे धाडस करणार नाही, पण ते लोक शिरतात. आणि अश्या काळात तर ते हमखास त्यात आसरा घेतात. त्या जंगलातहि तगून रहायचे कौशल्य त्यांच्या अंगी असतेच. ) त्या ट्रान्सपोर्ट कंपनीने झालेले सर्व नुकसान भरून दिले.

जिज्ञासा.. मी सतत लिहितच असतो. आधीही बरेच लिहिले आहे. माझ्या लेखनात सापडेल सर्व.

छोटासाच पण अंगावर आणणारा अनुभव.
त्वचेचा रंग कोणताही असो संकटकाळी सगळे एकत्र येतात हेच खरं.>>>>>स ह म त.

बाप्रे.. भयंकर आहे किस्सा.. तू प्लान वर दिल्याने समजला पटकन..कि काय झालं असेल ..

जाको राखे साइंया... Happy

जबरी अनुभवाने संपवलीत मालिका.
प्लान देण्याची कल्पनाही आवडली,
मात्र त्यात तो प्लान समजवण्याचा पॅराग्राफ होता तो वाचताना काहीतरी अभ्यास करतोय की वाटल्याने पेशन्स संपलेला,
पण नंतर घडलेली घटना वाचताना पुन्हा प्लान वर नजर टाकली आणि चित्र डोळ्यासमोर उभे राहायला मदत झाली.

दिनेशदा,

लेखमालिका भन्नाट होती, पण हा अनुभव खुपच खतरनाक होता. काळ आला होता पण वेळ नाही!

जरी मालिका संपली असली तरी मला माहिती आहे की तुमच्या पोतडीत अनेक किस्से असतील आणि ते मायबोलीवर अधुन मधुन आम्हाला वाचायला मिळतील. Happy

परत आभार..

गमभन, किस्से आहेतच. पण जे अनुभव मला स्वतःला विसारावेसे वाटतात, ते नाही लिहिणार आता.
त्या पंजाबी मुलीचा चेहरा अजून डोळ्यासमोर आहे. इझेलाही मी विसरु शकलो नाही... आता त्या आठवणी नको वाटतात.

मी आपला, खादाडी बिदाडीवरच लिहिन !

Pages