भाग-८ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Submitted by अनया on 14 February, 2015 - 08:30

भाग-८ आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
बागेश्वर- काठगोदाम – दिल्ली (१७ व १८ जून २०१४)

भाग-१ पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/52024
भाग-२ पुणे ते काठगोदाम http://www.maayboli.com/node/52054
भाग-३ काठगोदाम ते धाकुरी http://www.maayboli.com/node/52100
भाग-४ धाकुरी ते खाती http://www.maayboli.com/node/52128
भाग-५ द्वाली ते फुरकिया http://www.maayboli.com/node/52416
भाग-६ फुरकिया-झिरो पॉइंट-फुरकिया-द्वाली http://www.maayboli.com/node/52520
भाग-७ द्वाली ते बागेश्वर http://www.maayboli.com/node/52551

आज बसने नक्की जायचं नाही, जीपने जायचं हे नक्की होत. पण जातीच्या मोशन सिक लोकांना बस / जीप/ विमान / कार / रिक्षा सगळं सारखचं! त्यामुळे सुजाताने तिची मोशन सिकनेस न होण्यासाठीची अत्यावश्यक गोळी जीपमध्ये बसण्याआधीच घेतली आणि ती ‘म्युट मोड’ मध्ये गेली! प्रवासात ती काही खात नाही, पीत नाही, बोलत नाही, हसत नाही, काहीच करत नाही. झोपेतून जाग आलीच, तर अजून किती किलोमीटर प्रवास उरलाय, ह्याचा अर्धोन्मीलित डोळ्यांनी अंदाज तेवढा घेते.

आजही सीन तसाच होता. तिने झोपेच्या पहिल्या पायरीवर असताना बागेश्वरला देवेन सरांचा निरोप घेतला. आम्हाला पाणी, थोडा खाऊ विकत घेण्याच्या सूचना दिल्या आणि आधीच झोपेत असलेली पुन्हा झोपून गेली. बाकीची मंडळीही थकलेली होतीच, त्यामुळे ड्रायव्हरच्या शेजारचे सोडून सगळेच हळूहळू झोपले. पण ड्रायव्हरला हे सुख पाहवल नाही. त्याने मोठ्या आवाजात खास प्रवासात ऐकण्यासाठी जी गाणी निर्माण होतात, ती लावली. जागं होण्याच्या परिस्थितीत असलेली मंडळी खडबडून जागी झाली. ‘भैय्या, गाना बंद करो प्लीज, सोना है!’ ह्याला ‘ दिदी, मैभी आपके साथ सो जाउंगा, गाना सुनने दो’ असं म्हणून आमची बोलती बंद केली. एका टपरीवर चहा-कॉफीचा डोस घेऊन आम्ही जागे झालो आणि पुढे प्रवास सुरू केला. ‘बागामा जब मोर नाचे’ वगैरे स्टाईलची गाणी ऐकू लागलो.

रस्ता प्रथेप्रमाणे वळणा-वळणांचा होता. सुंदर दृश्य दिसत होती. आता पुन्हा हे सगळं कधी बघायला मिळणार, हिमालयाचं आमंत्रण कधी मिळणार? असं वाटत होतं. मुलांचे मोबाईल बागेश्वरला पूर्ण चार्ज झाले होते, त्यामुळे त्यावर गाणी ऐकणं सुरू होतं. पण नुसती आपलीच गाणी ऐकण्यात काय थ्रील? म्हणून एका कानात आपला इयरफोन, दुसऱ्या कानात दुसऱ्याच्या मोबाईलचा इयरफोन आणि त्यावर गाडीत चालू असलेली गाणी, असा प्रकार सुरू झाला. ह्यांच्या डोक्याची खिचडी कशी होत नाही? असा विचार मनात येऊनही आम्ही संयम ठेऊन त्यांना काहीही म्हटलं नाही. हिमालयाच्या सहवासात राहून आमची डोकी थोडी थंड झाली असावी.

पण गेल्या दहा-बारा दिवसात आमच्यात काहीच चकमकी उडाल्या नव्हत्या, अशी परिस्थिती नव्हती. ह्या ग्रूपमध्ये चार माता व त्यांची चार लेकरं होती. सर्व मुल अजून ‘टीन-एज’ मधली, म्हणजे ज्यांना आईवर विनाकारण चिडणे, वेडेपणा करणे ह्याचं लायसन्स मिळालेलं आहे, अश्या वयातली होती. ट्रेकभर ह्या आई-मुलांच्या जोड्यांमध्ये बरेच नमुनेदार संवाद झाले. नमुन्यादाखल त्यातले काही..

• आई : अग, काय शोधते आहेस? लवकर अंघोळीला जा.
लेक : साबणच शोधते आहे. तू माझी सॅक आवरलीस ना, बघ आता काही सापडत नाहीये.
आई : अग, हा काय साबण, समोरच तर आहे की.
लेक : आई, प्लीज. हा फेस वॉश आहे. मला बॉडी वॉश हवाय.

• लेक : आई, वेट वाइप्स दे ग जरा.
आई : हे घे
लेक : आई, हे लहान बाळांचे आहेत. काहीही काय आणतेस? हे कशासाठी वापरतात माहिती आहे ना?
आई : अग, सगळे सारखेच असतात. आत्ता वापर आहेत ते. पुढच्या वेळेला कुठले आणायचे, ते आत्ताच सांगून ठेव. कुठल्या कंपनीचे आणायचे?
लेक : हे सोडून कुठलेही आण..प्लीज.

• आई : थंडी खूप आहे. हा जाड, गरम टी-शर्ट घाल.
लेक : पण तो ह्या काळ्या पँटवर चांगला नाही दिसणार. तो मी परत जाताना जीन्सवर घालणार आहे.
आई : तेव्हा उकाड्याने वाट लागेल.
लेक : कमॉन आई, इतकं काही उकडत नाही. आपण हिमालयात आहोत. वाळवंटात नाही.
आई : तुला काय घालायचं असेल ते घाल, नाहीतर चल तशीच.

• प्रसंग : नेहमीप्रमाणे ‘बच्चे लोग’ आमच्यापासून सुरक्षित अंतर ठेवत चालल्यामुळे आमच्या आधी कँपवर पोचले. नंतर धापा टाकत आम्ही ‘दिदी लोग’ पोचलो. येताना रस्त्यात स्ट्रॉबेरी होत्या. बऱ्याच जणांनी बऱ्याच खाल्ल्याही होत्या. आम्ही पोचल्यावर स्वागत-सरबत (welcome drink) द्यायला ‘आदमी’ आला.

आई : ये कौनसा पानी है?
आदमी : मॅडम, पीछे झरना है, वहिसे लाते है बकेटमें.
आई : अच्छा, ठीक है.
आमचं सरबत एव्हाना पिऊन झालेल असतं. हे प्रश्न विचारणारी आई, त्या सरबतात क्लोरिनचे ड्रॉप टाकून पिते. मग मुलीकडे लक्ष जातं
आई : xxx, तू नाही ना प्यायलीस ते सरबत आणि त्या उघड्यावरच्या स्ट्रॉबेरीज खाल्ल्यास का?
लेक : (खर नाही आणि खोटही नाही, असं अत्यंत स्मार्ट उत्तर)
may be!!!

लेक : स्ट्रॉबेरीज खाल्ल्या, पण आई मी त्या धुवून खाल्ल्या!!!

हळूहळू लेकीचा वाण आईला लागला आणि ‘may be’ तीही सरबत प्यायला लागली. लेक मग मोकळेपणाने सरबत प्यायला लागली. तिने स्ट्रॉबेरीज भरपूर खाल्ल्या पण धुवूनच खाल्ल्या. किती शहाणी मुलगी!!

• आई : अरे, कपडे किती पसरून ठेवले आहेस. आत्ता सॅक घ्यायला पोर्टर येतील. उठ बरं लगेच. सामान आवरून घे.
लेक : (अनर्थकारी शांतता)
आई : अरे, तुझ्याशी बोलते आहे मी. उठ आता.
लेक : थांब जरा. मला आत्ता काम आहे.
आई : काम आहे? कसलं काम? माझ्या ऑफिसच्या कामाची मेल तुला आली की काय?
लेक` : इथे नेट नाहीये. मेल कशी येईल? काहीपण बोलू नको. मी नदीकडे पाहतोय. थोड्या वेळाने आवरेन.

• आणि ह्या व्यतिरिक्त गुगल ट्रान्सलेटरलाच काय, पण त्याच्या तीर्थरूपांनाही भाषांतरीत करता येणार नाहीत, असे असंख्य ‘हं
हा ‘हं’ निरनिराळ्या सुरात, आवाजाच्या पट्टीत, पटीत, मुद्राभिनयासोबत वापरला की त्याचे अगणित अर्थ आणि परिणाम होतात!

आमची जीप नैनितालच्या दिशेने वेगाने पळत होती. लहान लहान गावं – वस्त्या मागे जात होत्या. मधेच पावसाची एखादी सर येत होती. जाताना हा प्रवास बसने रखडत केला होता. जीपमध्ये आरामात बसलो होतो. देवेन सरांनी त्या जीपवाल्याला ‘नैनीतालमध्ये तीन तास थांबायचं आणि मग काठगोदामला सोडायचं’ असं बजावलं होतं. नैनितालला पोचल्यावर आम्हाला एका ठिकाणी उतरवून जीपदादा पार्किंगच्या शोधात गायब झाले.

नैनितालला पोचल्यावर आवाजांची, गर्दीची लाटच अंगावर आल्यासारखी झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे भरपूर पर्यटक फिरत होते. त्या सगळ्या उत्तम कपडे, दाग-दागिने, सौंदर्य-प्रसाधन केलेल्या लोकांमध्ये आम्ही नऊ जण उन्हाने रापलेले, थकलेले चेहरे घेऊन फिरत होतो. ‘पैसे वापरून, विकत घेऊन खाता येईल’, अशी संधी बऱ्याच दिवसांनी मिळत होती, त्यामुळे मुलांनी संधीचं सोनं केलं. पिझ्झा, मोमोज, मक्याचं कणीस, आईस्कीम, कॉफी, आलू चाट असे मिळतील ते पदार्थ खाऊन झाले. बोटिंग करून झालं. मुलींची ‘कानातले-गळ्यातले’ खरेदी झाली.

केबल-कारने जाऊन हिमालयाची शिखरे बघा, असा सल्ला आम्हाला दिला होता. पण आम्ही दुरून साजरे दिसणारे डोंगर, जवळून किती जास्त साजरे दिसतात, ते पाहून आलो होतो, त्यामुळे तिथे काही गेलो नाही. तसाही माझा अनुभव असा आहे, की ट्रेकला जाऊन आपण इतकं खरं, निर्मळ निसर्गसौंदर्य पाहून आलेलो असतो, की मन अगदी तृप्त झालेलं असतं. त्यानंतर कुठल्याही प्रकारची कृत्रिमता नकोच वाटते. मनसोक्त खाऊ-पिऊ झाल्यावर पुन्हा जीपमध्ये बसून आम्ही तासाभरातच काठगोदाम स्टेशनला पोचलो. इकडेतिकडे करण्यात दोनेक तास वेळ ढकलला. ट्रेनमध्ये स्थानापन्न होऊन दिल्लीच्या दिशेने निघालो.

वेळापत्रकाप्रमाणे आमची ट्रेन भल्या पहाटे पावणेपाचला दिल्लीत पोचणार होती. शिवाय ती ट्रेन दिल्लीपर्यंतची नव्हती, पुढे जाणारी होती. झोप लागली, तर कुठल्यातरी भलत्याच स्टेशनवर उतरायला लागून ‘जब वी मेट’ सारखा सीन होऊ नये, म्हणून आम्ही गजर लावून झोपलो होतो.

पण सहप्रवासी निरनिराळ्या ठिकाणी चढत-उतरत होते. सामानाचे आवाज, प्रवासी आणि टीसी ह्यांची विनम्र आणि हळूवार आवाजातली संभाषणे, दिवे लावणे – बंद करणे ह्या भानगडीत झोप काही लागली नाही. दिल्ली गाठेपर्यंत ट्रेनही दोनेक तास लेट झाली. कुठल्याही महानगराआधी असतील, तशीच ओंगळवाणी दृश्य खिडकीतून दिसत होती. एका शहराची घाण लोटत दुसऱ्या शहराकडे वाहून नेणाऱ्या निर्जीव नद्या, कचऱ्याने भरलेले नदीकाठ, बकाल वस्त्या, सगळीकडे रखरख, घामट-दमलेले चेहरे... तिकडे जमेल तेवढे दुर्लक्ष करत आम्ही सगळे दिल्ली स्टेशन, वेटिंग रूम, मेट्रो असे टप्पे पार करत दिल्ली विमानतळावर येऊन पोचलो.

ट्रेक संपला. ट्रेक संपणार होताच. पण तरीही तो क्षण अगदी पुढे येऊन ठेपल्यावर पोटात खड्डा पडला. इथून आमच्या ग्रुपची फाटाफूट होणार होती. अश्विनी आणि तिची लेक मुंबईला आणि आम्ही उरलेले लोकं पुण्याला येणार होतो. पुणे विमानतळावरून सगळे आपापल्या घरी जाणार. वियोगाचा क्षण जवळ येत होता. आम्ही उगीचच ‘आहेत की अजून दोन तास’ अशी मनाची समजूत घालत होतो. विमानतळावरचे दोन तास अक्षरशः दोन मिनिटात संपले. अश्विनीला निरोप द्यायला सगळेच गेलो. त्या दोघी गेटमधून बाहेर पडेपर्यंत डोळे कोरडे ठेवणं अशक्य झाल्यामुळे त्या अधूनमधूनच दिसल्या. तेवढ्या वेळात अश्विनीही डोळे पुसताना दिसल्याने, डोळे अजूनच वाहायला लागले. त्यामुळे त्या दोघी बसमध्ये बसताना काही पाहता आलं नाही.

अश्विनी परदेशी राहात असली, तरी ती पुढेही सुट्टीला येईल, कदाचित आम्ही तिच्याकडे जाऊ. फोन- इंटरनेटवर संपर्क तर असतोच. बाकी सगळे तर पुण्यात राहतो. मनात येईल तेव्हा भेटू शकतो. हे सगळं बुद्धीला पटण्यासारखं आहे. बुद्धी शहाणी असते. वेड्या असतात त्या भावना. त्यांना हे कसं समजवायचं? मला तरी ते काही जमलं नाही.
हा ट्रेक एका अर्थाने आमचं सगळ्यांच माहेरपणच होतं. घरच्या- बाहेरच्या कामांची कुठलीही जबाबदारी नाही. तयार गरम-गरम जेवण, गप्पा मारायला भरपूर वेळ, सांगितलेल्या गोष्टींबरोबर न सांगितलेल्या गोष्टीही समजतील अश्या मैत्रिणी, आनंदात असलेली मुलं.... किती सुख होतं. ट्रेक ठरवण्यापासून ते ट्रेक पूर्ण होईपर्यंतच्या प्रत्येक क्षणाची आम्ही मजा घेतली. आपण ठरवताना जरी बऱ्याच शक्यता गृहीत धरत असलो, तरी कितीतरी गोष्टी चुकू शकतात. निसर्ग, रस्ते-रेल्वे-विमान वाहतूक, तब्येती, राजकीय परिस्थिती अश्या अनेक.

पण माहेरी आलेल्या लेकीचं घरी तर कौतुक होतच. पण शेजारीपाजारी, ओळखीतले सगळेही लाड-कौतुक करतात, तसे आमचे निसर्गाने आणि इतर सर्व मंडळींनी लाड केले. सगळं अगदी ठरवल्यासारख झालं. पावसाने त्रास दिला नाही. सगळ्यांच्या तब्येती छान राहिल्या. एकच ट्रेन लेट झाली, पण ते आमच्या सोयीचच झालं. बाकी काही म्हणजे काही अडचण आली नाही. अगदी स्पॉटलेस म्हणता येईल, असा ट्रेक झाला.

मोठं होऊन बरचं काही कमावल खरं. पण मोलाचं नक्की कायकाय गमावलं, ते ह्या बारा दिवसात नीट कळल. मला खरं तर नव्हतच मोठ व्हायचं. लहानच राहून ह्या मैत्रिणींबरोबर शाळेत जायचं होतं. त्यांचे हात सुटू नयेत म्हणून घट्ट पकडून ठेवायचे होते. पण काहीतरी गडबड झाली आणि आम्ही सगळेच मोठे झालो. मैत्रिणींचे हात हातातून सुटले आणि वेगळेच हातात आले. पाठीवरची दप्तराची ओझी गेली आणि त्याहून कठीण ओझी पेलून पाठ थकून गेली. हे सगळं कसं आणि कधी झालं? असा विचार मैत्रिणींचा निरोप घेताना छळत होता. रोजच्या आयुष्यातले प्रश्न काही संपणारे नसतात. एक संपेपर्यंत दुसरे दहा हजर होतात. पण ह्या सगळ्याला रखरखीला सौम्य करण्याची ताकद ह्या मजेत घालवलेल्या दिवसात असते. त्यामुळे हिमालय, मैत्रिणी, मुलं ह्या सगळ्याबरोबरच त्या मजेलाही ‘पुनरागमनाय च’ असं म्हणत नव्या उर्जेने आयुष्याला भिडायला तयार झालो!

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख मालिका अनया. सगळे लिहून काढल्याबद्दल धन्यवाद. Wink
तुम्ही मैत्रिणी आणि तुमची टीनेजर मुलेही भाग्यवान ! आपली आवडती साथसंगत, आणि तो हिमालयाचा परिसर हा मणिकांचन योग आयुष्यात येणे भाग्याचे. पुढील अनेक वर्ष तुम्हा सर्वांना हे टॉनिक पुरो !

हिमालय या वर्षी (तरी) मजवर प्रसन्न व्हावा आणि जायला मिळावे अशी आशा आहे.

मस्त झाली ही पण सीरीज.
अश्विनीचं उदाहरण बघता भारत्वारीत खरच जमवता येण्यासारखी वातते ही ट्रीप.

मुलांचा डायलॉग उच्च.

>>आई : xxx, तू नाही ना प्यायलीस ते सरबत आणि त्या उघड्यावरच्या स्ट्रॉबेरीज खाल्ल्यास का?
लेक : (खर नाही आणि खोटही नाही, असं अत्यंत स्मार्ट उत्तर)
may be!!! <<
माझ्या मुलीचं उत्तर नेहमीच. तिला जर उत्तर देण्यात रस नसेल व कावली असेल माझ्यावर(ती तशी बर्‍याच वेळा असते कारण टीन एज आहे ना)

मला आत्ता काम आहे.....मी नदीकडे पाहतोय. थोड्या वेळाने आवरेन. >>> Biggrin

सॉरी, ते सगळे संवाद वाचताना फार हसायला आलं आणि प्रतिसाद दिल्याशिवाय अगदी राहावलं नाही. तरी लेखमाला वाचताना २-३ वेळा मनात विचार आला होता की या आई-मुलामुलींच्या जोड्या इतक्या शहाण्या (चांगल्या अर्थानं) कशानं बरं निपजल्या आहेत Happy

आता उरलेला लेख वाचते.

लेखमाला छान आहे. लिहिण्याची शैलीही नीट सांभाळल्या गेलेली आहे लेखमालेत. हीच शैली मानससरोवराच्या मालिकेतही होतीच Happy

समारोपही आवडला.
बुद्धी शहाणी असते. वेड्या असतात त्या भावना. >> पटलं Happy

पुढच्या ट्रेक अन लेखमालेकरता खूपसार्‍या शुभेच्छा!

सगळ्यांनी जायच अगदी नक्की मनावर घ्या. फार दिवसही लागत नाहीत. मुलांच्या आणि आमच्या चालायच्या वेगात खूप फरक असल्याने भांडण कमी झाली!
BTW, काही प्रतिसाद गायब का झाले?

BTW, काही प्रतिसाद गायब का झाले?>> मी तोच विचार करत होतो. मी प्रतिसाद लिहिलेला आठवतोय. आता गायबला.

मस्त मस्त .. सुंदर शैली आहे तुझी!!

माय लेकी मधले संवाद.. Lol घरोघरी हेच सीन्स असतात ,नै?? ग्रोइंग पेन्स मधून कोण सुटलंय आजवर!!! Wink

अनया, ही सगळी लेखमालिका 'गप्पांचं पान' झाली आहे. अ‍ॅडमिनना सांगून लेखनाचा धागा करून घ्या. इथून पुढे नवीन लेखन करताना हे लक्षात ठेवा- 'नवीन लेखनाचा धागा' उघडून त्यात लेख लिहायचा Happy

आज ही सगळी मालिका वाचून काढली. फार छान लिहिलं आहे तुम्ही! तुम्ही चौघी मैत्रिणी आणि तुमची मुलं यांनी एकत्र केलेली ही मज्जा म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचा खूप मोठा ठेवा असणार आहे.
वाचून अर्थात लगेचच हा ट्रेक करावा असं वाटायला लागलं आहे!

किती वर्षांनी धागा वर आला! थँक्यू वावे
आत्ता चार दिवसांपूर्वीच एका लग्नाच्या निमित्ताने ह्या गँगमधले बरेच घटक एकत्र आले होते. तेव्हा नेहमीप्रमाणे तेव्हा किती मजा केली हा विषय आणि पुन्हा जमलं पाहिजे ट्रेकचं हा विषय गप्पांमध्ये आला होता.