अनपेक्षित - भाग २

Submitted by धनि on 12 February, 2015 - 10:12

आमची नजरानजर झाली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नजरेत चमक आली आणि तिनी जोरात हात हलवून मला हाय केले. जत्रेत हरवलेल्या मुलाला त्याचे आई-बाबा सापडल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद तिला झालेला वाटत होता. ती खाली उतरून माझ्या जवळ आली. मी नकळत हात पुढे केले. तिला मिठीत घेतले. अशी मिठी मित्र-मैत्रिणींची इकडे सामान्य असते. ती सुद्धा प्रथम खुश झाली. मग मात्र बावरून लगेच दूर झाली. मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले.

तिचे समान घेऊन गाडीकडे निघलो. प्रवास कसा झाला, विमानात काय आवडले असे प्रश्न विचारून झाले. गाडीपाशी आल्यावर समान मागे टाकले आणि तिच्यासाठी दार उघडले. ती सांगत होती कि तिला गाडी आवडली. रस्त्यावर दुतर्फा असलेली गर्दी एकदम शिस्तीत होती. पहिल्यांदाच इतके बर्फ पाहून ती हरखून गेली. पण थंडी असल्यामुळे काकाडली होती. तो पर्यंत गाडीचे हिटर गरम झाले आणि तिचे काकडणे जर कमी झाले. ती बरोबर बसली होती पण माझे लक्ष मात्र सारखे घड्याळाकडे जात होते. दुपार झाली होती आणि संध्याकाळी रेनाला भेटायचे होते.

नूरीच्या घरी तिला सोडले. नूरीनी चहा तयारच ठेवला होता. अहाहा या थंडीत गरम आले घातलेला चहा म्हणजे सुख आणि तो स्वतःला करावा नाही लागला म्हणजे स्वर्ग!! अनुष्काला नूरीचे घर आवडले आणि नूरीही. त्यांचे चांगले सूत जुळले. ती तिचे समान लगेच उघडायला लागली. मीच मग म्हणालो आता इतक्या घाईने उघडायची काही गरज नाही आता आराम कर पण झोपू नको. एकदा झोपेचे वेळापत्रक नीट झाले की काही काळजी नाही. चहा संपल्यावर तरीही तिने थोडे समान उघडलेच आणि काजू कतलीचा दाबा काढला. मग काय मी लगेच तीन - चार वाड्यांचा फडशा पडला. अहो इतक्या दिवसांनी मिठाई मिळाली की राहवत नाही. आता मात्र नूरी आणि अनुष्का दोघीही हसत होत्या. तेवढ्यात माझा फोन वाजला. रेनाचा मेसेज होता. तिला सिनेमाच्या आधी काही तरी खरेदी करायची होती. मग मी या दोघींचा निरोप घेतला आणि निघालो. अनुष्का थोडी उदास वाटली, प्रवासामुळे थकली असेल बहुदा.

रेनाबरोबर खरेदी म्हणजे काही फार गम्मत नसते पण आज चक्क तिने मला मुलांच्या विभागात नेले. दोन - तीन शर्ट काढून दिले आणि घालून पाहायला सांगितले. मला काही कळलेच नाही पण तो शर्ट माझ्यासाठीच होता. तिला घालून दाखवला तर लगेच आपल्या फोन मध्ये फोटो काढून घेतले. सिनेमाला काही फार गर्दी नव्हती. सुरु झाल्यावर थोड्याच वेळानी तिने माझा हात हातात घेतला आणि पूर्णवेळ तसाच ठेवला. मारामारी सुरु झाली आणि पडद्यावर रक्तपात दिसायला लागली की रेना मला बिलगली. आज माहौल काही तरी वेगळाच दिसत होता.

तिला घरी सोडले आणि तिच्या दारापर्यंत चालत आलो. अचानक तिने "तू मला आवडतोस" म्हटले आणि माझ्या ओठांवर ओठ टेकवले. लगेच आत निघून गेली. आता मात्र मला काही सुचत नव्हते. तशाच तंद्रीत मी गाडी काढली. घरी पोहोचून आजच्या दिवसाचा विचार करत झोपलो.

रेना बरोबर असल्याला आता एक महिना होत आला होता. सुट्टी पण संपली होती पण आता काही विषय घ्यायचे नसल्यामुळे मी तसा आरामातच होतो. रेना सोबतचा वेळ तर एकदम आनंदात जात होता. दररोज भेटणे, एकत्र जेवणे, तिला आणि मला पण स्वयंपाक करायची आवड असल्यामुळे एकत्र नवीन पदार्थ करून पाहणे, तो करत असताना हसणे - खिदळणे, बर्फात चालत फिरायला जाणे आणि थंडी वाजली की एकमेकांत गुरफटून जाणे, एकमेकांच्या मिठीत सिनेमा पाहणे. बाहेरच्या जगाचा जणू विसरच पडला होता. अनुष्काचा अधून मधून फोन येत होता पण काही फार बोलणे होत नव्हते. रेनाला माझे तिच्याशी बोलणे ही आवडले नव्हते. तरीही मी काही बोलणे सोडले नव्हते. मी माझ्या जगण्यावर अत्यंत खुश होतो.

मागच्याच आठवड्यात मी म्हटले होते खूप खुश आहे. पण कधी कधी असे सगळे सुरळीत चालले असता जणू काही वादळ येते तशी धुसफूस वाढली. दोन तीन वेळा मी अनुष्काबरोबर बोलत असताना रेनानी पहिले. त्यानंतर एके दिवशी तिच्याबरोबर कॉफी पिताना नेमकी रेना तिथे आली आणि काही न बोलता नुसती निघून गेली. आता मात्र वादावादी फारच वाढली. मला काय बोलावे अन काय नको काही कळत नव्हते. आणि अचानक एके संध्याकाळी आपण वेगळे व्हावे असे रेना म्हणाली. सगळे जसे अचानक सुरु झाले होते तसे अचानक संपले.

आता मात्र माझी अवस्था वाईट झाली होती. काय करावे काही सुचत नव्हते. दिवस - रात्र मित्रांबरोबर घालवल्या. भरपूर सिनेमे पाहिले. आणि शेवटी अभ्यास आणि कामामध्ये मग्न झालो. अनुष्काशी ही काही फार बोलत नव्हतो. ती बिचारी नक्की काय घडले आहे हे न कळून पार गोंधळून गेली होती. त्यातच तिचे पहिले सत्र असल्यामुळे तिला खूप अभ्यास होता. तिचा प्रोफेसर पण खूप काम देत होता. अशातच त्याच्याबरोबर काही तरी वाद झाला. तो तिला खूप बोलला. काम करता येत नाही म्हणाला. तिथे तर तिने दाखवले आपण खूप खंबीर आहोत म्हणून. पण बाहेर आल्यावर लगेच हुंदके द्यायला लागली.

बाहेर आल्यावर कसा बसा रडत रडतच मला फोन केला. फोनवर तिचा रडका आवाज ऐकला आणि म्हणालो काय झाले ते मला सांग. सगळी कहाणी ऐकल्यावर तिला म्हटले थांब तिथे येतो लगेच. बरे झाले काही फार काम नव्हते. तिला घरी घेऊन गेलो. जर शांत ठिकाणी समजवावे म्हणून तिला सोफ्यावर बसवले. घरी कोणी नव्हते. तिला पाणी प्यायला दिले आणि शांत व्हायला सांगितले. जरा स्थिर झाल्यावर चहा टाकावा म्हणून उठलो. पाणी उकळायला ठेवले तेवढ्यात परत हुंदक्यांचा आवाज सुरु झाला. पाणी बंद करून बाहेर आलो तर अनुष्काचे रडणे पुन्हा सुरु झाले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users