व्हाई शूड ‘गर्ल्स’ हॅव ऑल द फऽऽन !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 February, 2015 - 03:39

..

ऐका या शुक्रवारची कथा ..

आमच्या एमएनसी कंपनीच्या नियमानुसार फ्रायडे ड्रेसिंगचे निमित्त साधत, (यंदाच्या २६ जानेवारीला मॉलमध्ये लागलेल्या सेलचा लाभ उचलत घेतलेले भारीतले ब्राण्डेड) टी-शर्ट घालून ऑफिसला गेलेलो. ब्राईट अन उठावदार रंगाचे टी-शर्ट मला खुलून दिसत आहे हे सकाळी आरश्याने सांगितले होते. त्यामुळे फेस टू फेसवरच लाईक्स एण्ड कॉमेंटस मिळायची अपेक्षा सोबत होतीच.

मेन गेटवरचा सिक्युरटी गार्ड मोहनलाल!, गुड मॉर्निंग बोलताना त्याच्या नजरेत जे कौतुकाचे भाव ओसंडून वाहत होते, त्याने बोहणी चांगली झाली म्हणायला हरकत नव्हती. रिसेप्शनवरची सॅण्ड्रा जागेवर नव्हती, त्याची तेवढी हळहळ वाटली. पण काही वांधा नाही, लंचनंतर तिला दर्शन देऊया म्हणत मी आमच्या डिपार्टमेंटकडे वळलो. वाटेत दोन दुसर्‍या डिपार्टमेंटचे मित्र भेटले, त्यांनी लांबूनच इशार्‍याने ‘आज तर छावा दिसतोयस’ टाईप सुचवले. पुढच्या वळणावर सेक्शन मॅनेजरचे केबिन पडते. सुदैवाने ते दरवाज्यातच उभे असल्याने, दोन कौतुकाचे शब्द त्यांचेही झेलले.

इथपर्यंत सारी धमाल होती!., पण जसे आमच्या विंगमध्ये पाऊल टाकले तसे यकायक सर्वच मुली खिदळायला (हसायला) लागल्या. मी घाबरून तात्काळ उलटा वळलो, आणि पॅंट चाचपून चैन लावायला विसरलो तर नाही ना हे चेक केले. पण ती व्यवस्थित होती. बस्स माझी तर्कबुद्धी इथेच संपली. उगाच नेहमीसारखे काहीतरी पांचट कारणासाठी हसत असतील म्हणून मी देखील त्यांना उलटतोंडी हसत हसत जागेवर जाऊन बसलो. पण तरीही सर्वच जणी एकाचवेळी कश्या हसल्या हा प्रश्न होताच. ठरवून गेम तर करत नव्हत्या माझा??

दुपारपर्यंत त्यांचे अधूनमधून माझ्याकडे कटाक्ष टाकत हसणे चालूच होते. अर्थात हे कटाक्ष टाकत हसण्यामागच्या भावना ‘त्या तश्या’ नसल्याने माझे गाल काही "गुलाबी" होत नव्हते. पण ते चांगलेच झाले एकाअर्थी, कारण त्यांचे हसण्याचे कारण माझे "गुलाबी" रंगाचे टी-शर्ट हेच होते. मला हे तेव्हा समजले, जेव्हा न राहवून त्यातील एकजण म्हणाली,

"काय रे रुनम्या, तुला दुसरा रंग नाही का सापडला? हा कसला पोरींचा रंग घालून आलायस?"

"नायतर काय,... तरी नशीब दाढी थोडीफार वाढलीय, नाहीतर एकदम ‘तस्सा’ वाटला असतास... खी खी खी.." दुसरी खिदळली. यातला ‘तस्सा’ म्हणजे नेमका ‘कस्साऽऽ’ विचारत मला स्वताचीच शोभा करून घ्यायची नसल्याने मी सवयीप्रमाणे वाद न घालता यावेळी शांतच राहिलो. पण त्या बालिकांना थांबायचे नव्हतेच.

"हा हा हा,.. पिंकी पिंकी" म्हणत तिसरीने त्यांच्या कॉलेजमध्ये एकजण कसा बरेचदा पिंक रंगाचे कपडे घालायचा म्हणून त्याला "पिंकी" नावाने चिडवायचे याच्या सुरस कथा सांगू लागली.

चार जणी आणखी कान टवकारत गोळा झाल्या, तसे मी हातातले काम सोडून तडक तिथून निघून गेलो, अन्यथा मलाही त्या दिवसापासून नको ते पिंकी वगैरे नाव पडले असते.

सकाळपासून आरश्यासमोर उभे राहताना ज्याच्यामुळे मला स्वताचेच कौतुक वाटत होते ते पिंक टी-शर्ट, आता मला ताबडतोब अंगातून भिरकावून द्यावेसे वाटत होते. ज्या दुकानातून घेतले होते त्यांची रिटर्न शिटर्न पॉलीसी तकलादू असल्याने आता ते परतही करता येणार नव्हते. थोडक्यात पैसेही फुकट गेले होते. पण त्यापेक्षाही मला एका गोष्टीचे जास्त वाईट वाटत होते, ते म्हणजे जी वस्तू मला आवडली होती आणि जी मला शोभतही होती, ती मला आता समाजमान्य नसल्याने यापुढे वापरता येणार नव्हती. आणि राहून राहून एकच प्रश्न मनात उसळत होता .. व्हाई शूड गर्ल्स,. व्हाई शूड गर्ल्स,.. व्हाई शूड गर्ल्स हॅव ऑल द फऽऽन !!!

....
...
..

आता ऐका एक जुना पुराणा कॉलेजचा किस्सा !

सबमिशनचा काळ होता. मी घरी कमी आणि हॉस्टेलवर मित्रांच्या रूमवर जास्त पडीक असायचो. खाणे-पिणे त्यांच्याच मेसवर., कधी मैत्रीखात्यात तर कधी पैसे मोजत,. तर कधी चायनीजची गाडी झिंदाबाद!. सबमिशनसाठी रात्र जागवायची असेल तर भुर्जीपाव हवाच हवा. शाकाहारी पोट्ट्यांसाठी मॅगी आणि कटींग, सोबत टायगर बिस्किटांना तोड नाही. बस्स अशीच एक रात्र!,

अशीच एक रात्र आम्ही दोन मित्रांनी हॉस्टेलच्या अभ्यासिकेत जागवली ते थेट पहाट होईपर्यंत. सकाळी कुठलेही लेक्चर नव्हते, कॉलेजला सबमिशनसाठी दुपारीच जायचे होते. पण सकाळ उजाडता उजाडता ध्यानात आले की आपल्याकडच्या ड्रॉईंग शीटस संपल्या आहेत, आणि त्या हमखास मिळायचे सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे कॉलेजचेच वस्तू भांडार. घड्याळावर एक नजर टाकली तर साडेआठ वाजले होते. नऊ वाजता कॉलेज भरते, आणि स्टोअर त्याआधीच १५-२० मिनिटे उघडते. अजून आम्ही आंघोळ केली नव्हती की तोंड धुतले नव्हते. अर्थात रात्रभर झोपलोच नसल्याने ब्रश करायचा प्रश्नच नव्हता. एक कटींग चहा ढोसला की तोंड फ्रेश!.

असो, तर कॉलेजला जाण्यासाठी आंघोळ कंपलसरी केलीच पाहिजे, असला काही आमच्या कॉलेजला नियम नव्हता, त्यामुळे ती न उरकताच जाणे चालण्यासारखे होते. प्रश्न होता तो कपड्यांचा! थंडीचा तो सीजन नव्हता किंवा मच्छरांचा हैदोस नव्हता, त्यामुळे आदली रात्र अभ्यासिकेतच जेमतेम गुडघा झाकेल इतपत तोकड्या पॅंटवर काढली होती. आताही दोघांच्या अंगावर तीच हाल्फपॅंट (आपापली) आणि टी-शर्ट होते. रूमवर कपडे बदलायला परत जायचे म्हणजे सबमिशन काळातल्या बहुमूल्य वेळेचा अपव्यय, तसेच रूमवरची पोरे झोपली असतील तर त्यांच्या झोपमोडीच्या शिव्यांचा प्रसाद!..

बस्स!, केसांवरून एक हात फिरवला अन कपडे झटकत, ड्रॉईंग शीट ठेवायचे सिलेंडराकृती नळकांडे धनुष्यबाणाच्या भात्यासारखे खांद्याला लटकवले आणि कॉलेजच्या दिशेने प्रयाण केले.

बापूंच्या देशात धोती आणि पंच्यापेक्षा किंचित जास्तच कपडे परीधान करून महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करताना आम्हाला कसलाही संकोच वाटत नव्हता. उलट कमालीचे हलकेफुलके अन प्रत्येक पावलागणिक पायांवरून मोरपीस फिरवल्यासारखे वाटत होते. पण स्टोअरवाल्याने उगाचच आमची अर्धवट उघडी ढोपरे बघत एक कॉमेंट टाकली, ‘काय रे झोपेतूनच उठून आलात का? ते ही नाईट ड्रेसवर?" ..

सबमिशन काळात त्या स्टोअरवाल्याची चलती असल्याने आणि आम्हाला पुढचे काही दिवस त्याची गरज असल्याने, आम्ही फारशी हुज्जत घातली नाही. एवढेच नव्हे तर बाजूने खीखी करत आलेल्या ‘नाजूक’ आवाजांकडेही दुर्लक्ष केले. पण परतताना कॉलेज कॅंटीनमधून निघणार्‍या अण्णासस्पेशल कॉफीच्या वासाने रेंगाळलो आणि तिथेच सपशेल घात झाला.

कॅंटीनच्या पायरीवर बसून हातात कॉफीचा ग्लास पकडत, सकाळी नऊ वाजताचे, भरणारे कॉलेज अनुभवत होतो,. येणाजाणार्‍या मुला‘मुलींची लगबग न्याहाळत होतो.. अन इतक्यात एका मामांनी हटकले!.. त्यांचा आवाजाचा टोन बघता आम्हाला वाटले की यांचा गैरसमज झाला असावा, बहुतेक ते आम्हाला कॅंटीनमध्ये काम करणारे पोर्‍या समजले असावेत. अर्थात, त्यांच्याशीही असे फटकून बोलणे अपेक्षित नव्हतेच, पण तरीही असते ना एकेकाचे..

"आम्ही स्टुडंट आहोत, याच कॉलेजचे...." आम्ही त्यांना ओळख पटवून देऊ लागलो.

"ते दिसतेच आहे...." आमच्या हातातल्या वस्तूंवर एक नजर टाकत ते म्हणाले.

च्याईला मग प्रॉब्लेम काय आहे,.. असा विचार आमच्या डोक्यात आला.

"कॉलेजमध्ये हे असले कपडे घालून येतात का? घरी आहात का?......" त्यांचा प्रॉब्लेम काय होता याचा लागलीच उलगडा झाला.

हुज्जत घालून वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा, सॉरी बोलून उरलेली कॉफी एकाच घोटात संपवून तिथून सटकणे त्या परीस्थितीत योग्य ठरले असते. पण तो टोन जिव्हारी लागला होता. उत्तरासाठी मी आजूबाजुला पाहिले आणि माझे डोळे चमकले. समोरून चारेक मुलींचा ग्रूप कॅंटीनच्या दिशेने चाल करून येत होता. त्यापैकी एका मुलीने आमच्याच मापाची हाल्फ पॅंट घातली होती. आता अ‍ॅटीट्यूड दाखवत बोलायची पाळी आमची होती. दोन चुटक्या वाजवत.. मी म्हणालो, हिंमत असेल तर तिला हे सु्नवा !!

त्या मामांना हे बापजन्मात शक्य नव्हते, ना आमच्या युक्तीवादाचे त्यांच्याकडे प्रत्युत्तर होते. बदल्यात आमच्याकडे त्यांनी आयकार्डची मागणी केली. पण आम्ही त्यांना ‘जाओ पहले उस लडकी का आयकार्ड लेके आओ’ सुनावत तिथून सटकलो.

या कचाट्यात न अडकता सुखरूप अन वेळेत परत जातानाही आम्हाला एक गोष्ट समजली होती, पुढच्या वेळी इच्छा असली तरीही आम्हाला या कॉलेजमध्ये हाल्फ पॅंट आणि शॉर्टसवर फिरता येणार नाही. भले त्यात आम्ही कितीही कम्फर्टेबल फील का करत असेना, कॉलेज प्रशासनाने वा पर्यायाने समाजाने बनवलेले हे कायदेकानून आम्हाला पाळावेच लागणार होते. आणि तेव्हाही, त्या मौजमस्तीच्या वयातही, राहून राहून एकच प्रश्न मनात रेंगाळत होता ..

व्हाई शूड गर्ल्स,. व्हाई शूड गर्ल्स,.. व्हाई शूड गर्ल्स हॅव ऑल द फऽऽन !!!

- ऋनम्या

Light 1 Light 1 Light 1

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हाई शूड गर्ल्स हॅव ऑल द फऽऽन !!! >>> हो ना! तु घाल रे पिंक टिशर्ट आणि एक रेड पँन्टपण घाल त्याच्यासोबत. काय हसतात त्या पोरी, जळतात मेल्या आमच्या ऋन्मेशवर Proud

मस्त लेख

<<अभिषेकदादाचा येल्लो येल्लो डर्टी फेल्लो असाच होता आणि हाल्फ वगैरे यांची खासियत आहे>> रिया अभिषेक दादाचा नाही तो सुद्धा ऋन्मेऽऽष यांचाच आहे. Happy
तो जुयेरेगा मधला आदित्य घालतो की पिंक शर्ट अन् टीशर्ट. आता फॅशन आहे ती.
पण लेख छान आहे.

कायतरी बै आयटीतल्या मुली?? गुलाबी शर्टाला हसतात? इन फॅशन आहे सध्या म्हणायचं नी जे वाट्तील ते रंग घालायचे.

निधी,
लेखाच्या प्रतिसादासाठी धन्यवाद, पण प्लीज कृपया कोणत्याही स्त्रीसदस्यआयडीच्या तोंडी माझ्यासाठी दादा शब्द घालू नका. आज एकीने म्हटले तर उद्या सर्वच म्हणतील. Happy

सस्मित,
काश!.. मी आयटीत असतो आणि माझ्या आसपासच्या मुली आयटीतल्या असत्या..
आमच्याकडे आयटी म्हणजे मेन्टेनन्स डिपार्टमेंट बस्स, त्यातही सारे टोणगेच!

रीया,
इटस ओके,
आपल्या ब्रेन हॅमरींगमुळे कधी कधी मीच स्वताचे नाव लेखाखाली अभिषेकदादा लिहून जाईल अशी भिती वाटते, तर आपली गल्लती होणे समजू शकतो.

ऋन्मेऽऽष सॉरी. अहो ते आधी "अभिषेक दादा" म्हणाल्यामूळे नंतर तुम्हाला पण दादा म्हणाले.
बदल केला आहे.
Happy

आज एकीने म्हटले तर उद्या सर्वच म्हणतील>>>>>>जाऊ दे मग तूच मला ताई म्हण.:फिदी: पण ऑन्टी मत कहना.:खोखो:

समाजमान्य नसल्याने ??
समाजासारख्या क्षुद्र गोष्टींचा तुम्ही विचार कशाला करायचा ?

अपना काम बनता..

* *** जनता !

हाहा, निधी, आपण खरेच बदल केलात Happy धन्यवाद हा पण Happy

सस्मित,
तो तुमचा अभिषेक असावा आयटीत त्यामुळे तसे वाटले असावे, Wink आम्हा गरीबांची फक्त एमएनसीच आहे.

शाहिर,
धन्यवाद, पण हा दिवे घ्या लेख आहे, माझी तुटपुंजी माबो कारकिर्द अन लिखाण पाहता (पाहिले असल्यास) आपल्याला असे वाटते का जे कृत्य गैर नाही ते करताना मी समाजाला भीत असेल?... उलट जाचक, अनावश्यक अन गैरलागू नियम तोडण्यासाठी म्हणून ईयत्ता चौथीपासून मी प्रसिद्ध आहे. (ईयत्ता चौथीला कोणता नियम मोडत मी सुरुवात केली हा वेगळ्या लेखाचा विषय आहे)
असो, वरील दोन्ही केसेसमध्ये या प्रसंगानंतर मी कसा वागलो हे मात्र सस्पेन्स ठेवतो, अन्यथा लिहिलेल्याची मजा गेली Happy

मनीमोहोर, स्पेशल थँक्स Happy

लेख मस्त खुसखुशीत.

अवांतर-
आज एकीने म्हटले तर उद्या सर्वच म्हणतील >>
अहो मग बरंच आहे ना, तुमच्या जी.एफ. ला आनंद होईल तुम्हाला स्त्रीसदस्यआयडी "दादा" म्हणत आहेत याचा..
आणि शेवटी जी.एफ. खूष तरच तुम्ही खूष ना Proud
हा.का.ना.का.

सामी,
तो लेख मी वाचलेला, कथास्पर्धेच्या वेळी मी माबोकर नसल्याने (पुढच्या वेळी असेन सावधान!) निकाल पाहून निवडक विजेते लेख वाचले होते. पण बारीकसारीक तपशील आता लक्षात नसून ते कसलेतरी एंजिनीअरच असावेत इतपतच आठवतेय.

आशूडी,
मग काही नाही, पण ढोबळमानाने एंजीनीअर कॉलेजातील शाखानिहाय सरासरी सौंदर्य / मुलींचे प्रमाण खालील प्रमाणे असते

आयटी-कॉम्प
ईलेक्ट्रॉनिक्स
प्रॉडक्शन
ईलेक्ट्रिकल
सिविल
मेकॅनिकल
..
आजकाल प्रेमप्रकरणे कॉलेज आणि ऑफिसातच जास्त जुळतात, तेव्हा आजूबाजुलाच जास्त पर्याय असणे केव्हाही चांगले.

आनंदिता,
शेवटी जी.एफ. खूष तर तुम्ही खूष ना
>>
सहमत, वर बोल्ड केलेला च वगळता Happy

डोन्ट वरी पिंकी
गर्ल्स फील सेम वे अबाउट बॉइझ टू!
हॅव फन!
Happy

रागाउ नकोस पण तुझे बरेचसे लेख आ बैल (म्हैस) मुझे मार या प्रकारचे असतात.
मी ते थरली एन्जोय करते. कीप रायटीन्ग!

सिक्युरटी गार्ड मोहनलाल!, गुड मॉर्निंग बोलताना त्याच्या नजरेत जे कौतुकाचे भाव ओसंडून वाहत होते,
>>
हे सर्व मग रिलेट झाले खुप हसले!

Lol
आम्ही college मध्ये असताना गुलाबी कपडे घालणार्या मुलांना गुलाबो नाहीतर पिंकी म्हणायचो.

चौथ्या वर्षाला असताना half pant डेपण साजरा केला होता.

हो हो प्रथम,
अर्धचड्डीदिन आमच्या कॉलेजलाही साजरा झालेला. पण तेव्हाही डेनिम डे किंवा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट डे ला जसा भरघोस प्रतिसाद सहज मिळतो तितक्या प्रमाणात हाल्फ पँटी फडफडल्या नाहीत. बरेच जणांनी संकोच बाळगण्यातच धन्यता मानली होती.

थॅन्क्स निलिमा Happy

तोकडे कपडे (इथे संदर्भ अर्धी चड्डी) व गुलाबी रंग परिधान करणे म्हणजेच मज्जा आहे असे कुणी सांगितले? आणि या दोन गोष्टी वगळता इतर अनेक गोष्टी मुले करु शकतात व मुली करू शकत नाहीत असे असता "मुलींनाच सर्व मजा करायला का मिळावी?" अशा अर्थाचा शीर्षकस्थानी असलेला प्रश्न अनावश्यक वाटत आहे.

अनेक बाबी समाजाने पुरुषांकरिता व महिलांकरिता अलिखित नियमांनी वर्ज्य ठरविल्या आहेत त्याबद्दल या दोन्ही समुदायांनी तक्रार करण्यात काहीच तथ्य नाही.

मुली केस वाढवू / कापू शकतात, मुलांनी वाढवले तर समाज चांगल्या नजरेने पाहत नाही.
मुले दाढीमध्ये विविध फॅशन्स करू शकतात; मुलींना निसर्गानेच शक्य ठेवले नाही.
मुली मुलांचे कपडे (पँट/शर्ट इत्यादी) परिधान करू शकतात. मुलांनी स्कर्ट / फ्रॉक / साडी परिधान केल्यास समाज चांगल्या नजरेने पाहत नाही.
अवजड कामे, जसे की रस्त्यात एखादा दगड / पडलेले झाड यांचा अडथळा आहे तर तो मुलांनी हटवावा, बस बंद पडली आहे तर ती मुलांनी ढकलावी याउलट घरातील आदरातिथ्याची कामे (चहा, स्वैपाकपाणी, इत्यादी) मुलींनी करावीत असे सामाजिक संकेत आहेत.
एक पुरुष व महिला (दोन्ही वयाने प्रौढ) सार्वजनिक वाहनातून प्रवास करीत असतील (मग त्यांचे नाते काहीही असेल - आई मुलगा, बहीण भाऊ, वडील मुलगी, पती पत्नी किंवा नाते नसून ते मित्र मैत्रीण, किंवा इतर कारणाने परिचित असतील) अशा वेळी बसायला प्रथम महिलेला जागा दिली जाईल व नंतर पुरुषाला. याउलट घराच्या आत महिला पुरुषाला आधी कम्फर्टेबल झोन करिता (बसायला जागा, जेवण इत्यादी) प्राधान्य देईल. हे सर्वच पारंपारिक संकेत आहेत.
आजही भारतातल्या खेड्यांतून सवाष्ण बायका रंगिबेरंगी पातळ, लुगडी, साड्या परिधान करतात. पुरुष मात्र पांढर्‍या रंगाचेच पोषाख वापरत आहेत. माझे कितीतरी असे पुरुष नातेवाईक (आजोबा, मामा, मावशीचे यजमान, आत्याबाईंचे यजमान इत्यादी) आहेत ज्यांनी आयुष्यभर केवळ पांढरा सदरा, पांढरा पायजमा / धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी याखेरीज इतर रंगाचा पोषाख कधीच वापरला नाही.

तुम्ही तर केवळ गुलाबी रंगाचा पोषाख वापरता येत नाही म्हणून लेख लिहीताय.

काही पारंपारिक बाबी निदान भारतापुरत्या आता जागतिकीकरणाचे वारे लागल्याने बदलत आहेत. पुर्वी स्त्रियांनी उघडे पाय टाकणे चांगले मानले जात नसे. पाहा हमजोली चित्रपटातील गाणे - यात जितेंद्र व लीना चंदावरकर दोघे टेनिस खेळत आहेत परंतु अर्धी चड्डी परिधान करीत केवळ जितेंद्रनेच पाय उघडे टाकलेत. हे तेव्हाच्या आपल्या समाज संकेतानुसार योग्यच आहे. आता जमाना बदलला आहे. मी तर अनेक सार्वजनिक ठिकाणी जातो तिथे पाहतो की बर्‍याच महिला क्वार्टरपँट, मायक्रो स्कर्ट मध्ये वावरतात. याउलट एकदा एक मनुष्य दुपारी बॅंकेत बर्मुडा पँट घालुन आला तर त्याविषयी बॅंकेच्या व्यवस्थापकाने बोलता बोलता माझ्याकडे तक्रात केली. त्यावर मी त्याला यापेक्षा ही कमी कपड्यात कितीतरी महिला येतात त्यांची तक्रार तुम्ही का करीत नाही असे विचारले असता त्याने या बाप्याचे केसाळ पाय पाहाणे आम्हाला त्रासदायक वाटते असे सांगितले. तसेच "आकर्षक ते झाकावे" हा पुर्वीचा भारतीय समाजमान्य संकेत आता बदलला असून जागतिक संकेतानुसार "आकर्षक ते आत्मविश्वासाने उघड करावे" असा प्रचलित असल्याचे सांगितले. तेव्हा ऋन्मेऽऽष आता जमाना बदलला आहे हे आमच्या सारख्या वयस्कांनी मान्य केले ते तुमच्यासारख्या नवतरूणांना मान्य होऊ नये याचे आश्चर्य वाटते.

तरीही, काही गोष्टी अजून ज्या पुरुषांना करता येतात त्या महिलांना करता येत नाहीतच की. जसे की, सौरव गांगुलीने मैदानावर शर्ट काढून भिरकावून दिला. महिला असे काही करू शकतील काय?

तेव्हा महिला व पुरुषांना ज्या काही नैसर्गिक / सामाजिक / पारंपारिक मर्यादा आहेत त्याविषयी तक्रार करण्यात अर्थ नाहीये. फार तर काळ बदलण्याची वाट पाहावी. बदलत्या काळानुसार यात काही प्रमाणात बदल होतीलही.

Pages