सी.एम. म्हणजे कॉमन मॅन

Submitted by pkarandikar50 on 10 February, 2015 - 02:21

सी.एम. म्हणजे कॉमन मॅन

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकात ’आप’ने मिळवलेल्या यशाचे बर्णन अद्भूत आणि ऐतिहासिक असेच करावे लागेल. दिल्ली राज्यातल्या सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा भा.ज.प.ने जिंकल्या होत्या, त्याला अजून एक वर्षही झालेले नाही. आताच्या निवडणुकात मात्र भा.ज,प,चा पुरता धुव्वा उडाला आहे. (कॊंग्रेस पक्षाला भोपळाही फोडता येऊ नये हे त्या मानाने कमी आश्चर्यजनक). एक गोष्ट मान्य करायलाच हवी की दिल्लीच्या मतदारांनी विलक्षण परीपक्वता दाखवली आहे. केंद्रात बिगर कॊंग्रेस मोदी सरकार येणे ही जशी काळाची गरज होती तितकीच दिल्ली राज्यात ’आप’चे सरकार येणे हीसुद्धा काळाचीच गरज होती हे या मतदारांनी ओळखले, हे महत्वाचे.

२०१३च्या निवडणूकातली ’आप’ची चमकदार कामगिरी अनपेक्षित होती पण त्या पक्षाला तेंव्हा पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. 'नाही.. नाही.. कदापि नाही' म्हणता म्हणता, शेवटी ’आप'ने कॊंग्रेसचा बाहेर्रोन पाठींबा घेऊन सरकार बनवले खरे पण ते अल्पायुषी ठरणार हे सर्वांनाच माहीत होते. तरीही, अवघ्या ४९ दिवसात केजरीवाल राजीनामा देऊन पाय उतार झाले ते बहुतेकांना आवडले नव्हते. बरे, त्या ४९ दिवसातही केजरीवाल राज्यकर्त्या ऐवजी आंदोलकासरखेच वागले, चुकून विदूषकाचा (सर्कशीतला नव्हे, जुन्या संस्कृत नाटकातला) राजा झाला पण त्याला काही ते राजेपण झेपले नाही अशीच एक सर्वसामान्य प्रतिक्रिया होती. आता जनता पुन्हा ’आप’ला संधी देणे अशक्य असेही काहीजणांनी म्हटले होते. २०१५च्या निवडणुकीत मतदारांनी सर्वांना खोटे ठरवत, विदूषकाच्याच गळ्यात पुन्हा एकदा राजेपदाची माळ घातली आहे! यातून योग्य तो बोध केजरीवाल घेतील आणि अधिक जबाबदारीने कारभार करतील अशी आशा करू या.

काँग्रेसला पर्याय शोधण्यासाठी भारतीय जनता आतुर झाली होती, त्या सार्वत्रिक भावनेचा आणि असंतोषाचा फायदा मोदींनी अतिशय कुशलतेने उठवला. परंतु इतक्यातच आता जनता भाजपाला पर्याय शोधू लागली की काय असे दिल्लीच्या निकालांवरून वाटू लागले आहे! दिल्ली म्हणजे भारतखंड नव्हे हे खरे पण राजकारणात प्रतीकांना आणि चिन्हांना (symbols) खूप महत्व असते आणि म्हणून मोदींनी सुद्धा काही बोध घेणे आवश्यक आहे. साक्षी महाराजांसारख्या स्वपक्षीय वावदूक मंडळींच्या वक्तव्यांवर मोदी जाहीर नापसंती दाखवत नाहीत, एव्हढेच नव्हे तर त्यांना आवरही घालत नाहीत हे लक्षण काही चांगले नाही. कारण त्यालाही काही प्रतीकात्मक अर्थ असतो. मोदींना मिळालेली मते म्हणजे अत्यंतिक टोकाच्या हिंदुत्ववादाला पसंती असा होत नाही, हे निदान मोदींनी तरी ओळखायला हवे.

समाजाच्या सर्वच थरातून 'आप'ला भरघोस मतदान झाले. जात-पात, धर्म, आर्थिक वर्ग या सर्वांना ओलांडत मतदारांनी 'आप'च्या झोळीत भरभरून मते टाकली हे उघड आहे. तथपि, मुस्लीम मतदारांनी एकगट्ठा भाजपाविरोधी मतदान केले याचा काय तो अर्थ मोदींनी ओळखावा.

नीती आयोगाच्या पहिल्या बैठकीत मोदींनी केंद्र आणि राज्ये यांच्या सहकार्यावर आणि भागीदारीवर (Co-operative Federalism) भर दिला. ज्या राज्यात बिगर भाजपा सरकारे आहेत त्यांना मोदींच्या या घोषणेवर विश्वास वाटेल असे वर्तन केंद्राकडून घडायला हवे. दिल्ली निवडणुकांचे अधिकृत निकाल जाहीर होणापूर्वीच मोदींनी केजरीवालांचे अभिनंदन करावे आणि त्यांना चहापानासाठी निमंत्रित करावे हे त्यांच्या राजकीय परिप्क्वतेचे लक्षण म्हणावे लागेल. आता केजरीवालांकडूनही अशाच परिपक्वतेची अपेक्षा आहे.

आपला सी.एम. म्हणजे 'कॉमन मॅन' असावा हे दिल्लीच्या जनतेने उच्च्ररवाने सांगीतले आहे. हे लोण इथेच थांबेल असे मानण्याचे कारण नाही. उद्या ते देशभर पसरू शकते. ( तसे पाहू गेले तर मोदीची प्रतिमाही कॉमन मॅन अशीच उभी केली गेली होती आणि त्याचा फायदा त्यांना झालाच आहे.) याचा अर्थ 'आप' एका रात्रीत देशव्यापी पक्ष बनेल आणि सत्तेवर येईल असे नाही पण 'कॉमन मॅन' आपले आस्तित्व आणि आपल्या अपेक्षा अधिक ठाशीवपणे आणि आक्रमकरित्या मांडू लागेल अशी चिन्हे यातून दिसतात, हे महत्वाचे आर.के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन काहीच भाष्य करत नव्हता. आता तो मतपेटीतून बोलू लागला आहे. आपल्या लोकशाहीच्या विकृतीकरणामुळे बिभिस्त आणि चिंतातुर झालेल्यांना दिलासा मिळावा अशीच ही घटना आहे. .

-प्रभाकर (बापू) करंदीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users