फीनिक्स

Submitted by jpradnya on 9 February, 2015 - 09:58

वाट आमची दगड धोंड्यांची
सदा नागमोडी वळणारी
घरे ठिसूळ काचेची
साध्या खडयानेही निखळणारी

आकाश आमचे कोरभर
खिड़कीतून दिसणारे
क्षितिज आमचे मृगजळा सारखे
कुम्पणाआडून हसणारे

जमीन आमची वीतभर
इंचा इंचात विभागलेली
कुदळीचे घाव
छातीवर घेऊन थकलेली

पाऊस आमचा भांडभर
नळातून ठिबकणारा
सूर्य ही आमचा टीचभर
मधूनच बंद पडणारा

अश्रु आमचे दुष्काळी
गालांवरच सुकलेले
मदतीच्या नाहीच पण
पुसणाऱ्या हातांनाही मुकलेले

छप्पर पावसात गळणारं
वारा आला की उडणारं
जहाज आमच चंद्रमौळी
समुद्रात खोलवर बुडणारं

पण विश्वास आमचा दुर्दम्य
कोसळता पहाड़हि थोपवणारा
फीनिक्स प्रमाणे राखेतून उठून
अनंताकडे झेपवणारा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users