वाढपी

Submitted by बेफ़िकीर on 9 February, 2015 - 07:00

'गिळा' हा शब्द न उच्चारता ती आज्ञा कृतीतून सुचवण्याचे कौशल्य विकसित करणारा माणूस म्हणजे वाढपी! त्याच्या हातात मीठ, लिंबू किंवा पंचामृत असे पंगतीच्या पानातील सर्वाधिक उपेक्षित पदार्थ असोत किंवा बासुंदी, जिलेबी, श्रीखंड ह्यासारखे सर्वाधिक अपेक्षित पदार्थ असोत, त्याच्या चेहर्‍यावर कायम हातात मेलेला उंदीर असल्याचेच भाव असतात. वाढप्याच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे असे दोनच क्षण असतात. एक म्हणजे पंगतीत बसलेल्याने वाढप्याच्या हातातील पदार्थ पाहून दोन्ही हात आणि मुंडके ठामपणे नकारार्थी हलवून चेहर्‍यावर 'अती झाल्याचे' भाव आणणे! दुसरा म्हणजे मीठ किंवा फ्लॉवरचा रस्सा वाढायचे काम मिळणे, कारण त्यात भांडे नुसतेच पंगतीसमोरून द्रूतगतीने फिरवत न्यावे लागते.

अनेक वाढपी तर जेवणार्‍यांच्या फुकटखाऊ वृत्तीचा उगाचच सूड घ्यायच्या मिषाने मुद्दाम चारवेळा मीठ समोर नाचवून आणतात. दोनचारवेळा एखाद्या वाढप्याने मीठ समोर नाचवले की त्याच्यावर मीठाळ हा शिक्का बसतो आणि मग तो पक्वान्न घेऊन आला तरी लांबूनच त्याला पाहून लोक पानावर आडवा हात नकारार्थी धरून शेजारच्याशी बोलायला लागतात. वाढपी पुढे गेल्यावर कळते की त्याच्या हातात अंगूरमलई होती. मग जेवणार्‍याला वाटणारी हळहळ हा वाढप्यांच्या मर्यादीत कार्यक्षेत्रातील सर्वात रोमांचकारी विजय समजला जातो.

वाढपी कोणीही होऊ शकतो. पण प्रभावी वाढपी होण्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. ह्या पदाच्या प्राप्तीसाठी प्रशिक्षण उपलब्ध नाही. प्रभावी वाढपी म्हणजे तो ज्याच्या कंत्राटदाराला हे मान्य करावेच लागते की त्याने वाढण्याचे काम मनापासून केले पण जेवणार्‍यांच्या मते तो वाढायला नसताच तरीही चालले असते. किंबहुना तेच अधिक चांगले झाले असते.

ज्याला जेव्हा जे हवे आहे त्याला तेव्हा ते न मिळू देणे हे वाढप्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. ज्याला जेव्हा जे अज्जिबात नको आहे ते त्याच्या डोळ्यांसमोर सतरांदा नाचवणे व त्याला खिजवणे हे वाढप्याचे दुसरे कर्तव्य आहे. आणि ज्याला जे मगाशी हवे होते ते आता ती वेळ पूर्ण निघून गेल्यानंतर त्याच्या पानात ओतणे किंवा त्याच्यासमोर तो पदार्थ उत्साहाने नाचवत नेणे हे वाढप्याचे तिसरे कर्तव्य आहे.

वाढपी एकमेकांशी कधीही भांडत नाहीत. कोणाला किती जड भांडे पकडायला लागले किंवा कोणाला किती फेर्‍या माराव्या लागल्या ह्यावरून त्यांच्यात वाद होत नाहीत. वाद न होण्याचे कारण असे की भांडे जितके जड तितके ते तुफान वेगाने पंगतीसमोरून न्यायचे असते. भांडे जितके हलके तितके ते जेवणार्‍याच्या चेहर्‍याच्या अगदी समीप नेऊन त्याला त्या हलक्या पदार्थाचा नॉशिआ येईपर्यंत दाखवायचे असते. दोन्ही कृतींमध्ये समान राक्षसी समाधान असल्यामुळे त्यांच्यात भांडणे होत नाहीत.

वाढप्याचे आणखी एक कसब असे की आपण वाढपी आहोत हे कोणाला ओळखताच येता कामा नये असे भाव चेहर्‍यावर ठेवायचे आणि एका कोपर्‍यात उभे राहायचे. ते भाव पाहून लोक बिचकतात व मागण्या करत नाहीत. कोणी विचारले तर हेही म्हणता येते की पब्लिकला काही नकोच आहे तर वाढू काय? ह्या प्रसंगावर उपाय म्हणून काही ठिकाणी वाढप्यांना गणवेष असतात. नवनवे शोध लागण्यामागे वाढप्यांची अशी वृत्ती असते हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही.

काही वेळा वाढपी हातातील पदार्थाच्या मूल्यानुसार चेहरा करतात. म्हणजे हातात चटणी असा अत्यंत दुर्मीळरीत्या दुसर्‍यांदा घेतला जाणारा पदार्थ असल्यास वाढपी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीतील मानाच्या गणपतीबरोबर गल्लीबोळातले गणपती जसा निर्विकार चेहरा करून जात राहतात तसे जातात. वाढप्याच्या हातात पुरी असली तर पंगतीचा पहिला साठ टक्के वेळ ते 'नववधू प्रिया मी बावरते' ह्या थाटात फिरतात आणि उरलेला चाळीस टक्के वेळ ते ' कैक उत्तम स्थळे चालून आली होती' अश्या थाटात चालतात. ह्याचे कारण उरलेला चाळीस टक्के वेळ हा मसालेभात किंवा ताकभात खाण्यात अधिक जात असतो.

कुरडया आणि पापड्या वाटपाची जबाबदारी ज्या वाढप्याकडे दिलेली असते त्याचे पंजे लहान असल्याची आधी खात्री करून घेण्यात येते. म्हणजे मग त्याच्या पंज्याने पानात ढकलला जाणारा कुरडया पापड्यांचा ढीग तुलनेने लहान असतो.

काही वाढपी 'मी कोणाला नकोच असतो' असा उदास चेहरा करून जेवणार्‍याकडे अजिबात न बघता सरळ चालत निघतात. टोलनाक्यावरून टोल न देता पसार होऊ पाहणार्‍या वाहनाला जसे चारसहाजणांचे टोळके आरडाओरडा करून अडवते तसे मग त्या वाढप्याला अडवले जाते व पदार्थ वाढून घेतला जातो.

पाणी वाढणारे वाढपी पाणी हवे का असे विचारतही नाहीत आणि त्यांना कोणी पाणी वाढा असे म्हणतही नाही. हा एकच पदार्थ आहे ज्यात वाढपी व जेवणारा ह्यांच्यात एकमताने काहीही ठरतही नाही किंवा मतभिन्नताही होत नाही. ग्लास अर्धा भरलेला असला तर वाढपी तो पूर्ण भरतात. तो त्याने का भरला असे जेवणार्‍याला वाटत नाही.

जेवण जेव्हा घश्याच्या दोन सेंटीमीटर खालीपर्यंत येऊन पोचते तेव्हा अचानक मठ्ठा हा पदार्थ अतीमहत्वाचा ठरतो. मट्ठा हा पदार्थ प्रामुख्याने दिलेल्या वाटीच्या बाहेर सांडण्यासाठी असून दोन चार शिंतोडे वाटीत पडले तर तो दखलपात्र गुन्हा असतो अश्या पद्धतीने मट्ठा वाढण्यात येतो. शेजारच्या अळूच्या भाजीच्या वाटीत मट्ठ्याचे काही थेंब गेले तर 'नाहीतरी पोटात जाऊन सगळे एकच होणार आहे' असा चेहरा करून वाढपी पुढे निघतो. तोवर इतके खाणे झालेले असते की वाढप्याशी भांडण काढण्याची छाती किंवा पोट उरलेले नसते.

भात, वरण व तूप हे तीन पदार्थ वाढणार्‍यांचे एक स्वतंत्र कुटुंब असते. ते त्यांच्यात दुसर्‍य अकोणालाही घेत नाहीत. जेवणार्‍याला भातावर पाहिजे तेवढे साधे वरण एका प्रयत्नात कधीही मिळू नये हा यच्चयावत वाढप्यांचा कट असतो. वरण वाढणार्‍या वाढप्याच्या प्रतीक्षेत कोरडा भात चिवडणारे असंख्य जेवणारे पाहून वाढपी जमातीला एक प्राचीन सूड उगवल्यासारखे समाधान मिळते.

वाढप्यांशी कोणी आवाज चढवून बोलायला लागले तर त्या बोलणार्‍याला तो पदार्थ इतका वाढला जातो की पश्चात्तापानेच त्याला प्रायश्चित्त मिळावे.

यजमानांनी एखाद्या पानावर पक्वान्नाचा आग्रह करण्याचा हुकूम सोडला तर वाढपी तिथे 'माझ्या बापाचे काय जाते, भरा हवे तितके' असा चेहरा करून ते पक्वान्न इतके वाढतात की यजमान पुढे आग्रह करणे बंद करतो.

नवपरिणित दांपत्य आग्रह करण्यासाठी निघाले की त्या आधी तोच पदार्थ घेऊन चार वाढपी सगळ्यांना तो पदार्थ धाकदपटशाने वाढत सुटतात. पूरग्रस्त विभागात हेलिकॉप्टरमधून अन्नाची पुडकी फेकली जावीत तसे ते वाढपी उधळलेले असतात. नवदांपत्याकडे मग कोणी ढुंकूनही बघत नाही.

वाढपी ह्या इसमाचा कितीही राग आला तरीही तो धड व्यक्तच करता येत नाही. तसेही, दहा, बारा मिनिटांत एकदाचे पोट भरले की वाढप्याला लक्षात कोण ठेवतो?

भूक लागलेली असताना ज्याची सर्वात जास्त आठवण येते आणि पोट भरल्यावर जो सर्वात जास्त वेगाने विस्मृतीत जातो तो वाढपी! सगळ्या पंगती झाल्यावर साडे तीन, चारला सगळे वाढपी आपापले ताट घेऊन आत कुठेतरी कोंडाळे करून बसतात आणि साधेवरण भात खातात.

त्यांना कोणीही कधीही काहीही वाढत नाही.

===========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"नारायण आठवला "म्हणजे काय ?लेखातल्या वाढपीलोकांशी काहीच साम्य नाहीये. नशीब अशोक सराफ नाही आठवला.

मला मिरजेतली ६०-७०च्या दशकातली मंगलकार्यालये आठवली आणखी एक ज्या लग्नांत आदले रात्रीचे हळदीचे जेवण आणि मुहूर्ताला दुसरे दिवशी 'गोड जेवण' असते तिथे वाढप्यांनी कितीही उत्साह दाखवला तरी पाहुण्यांच्यासाठी एक उरकणे असतं.
लेख बेफिकीर स्टाईल आवडला.

बेफिकीर,

>> वाढपी हा एक व्यवसाय आहे. नारायणची आठवण येणे अनपेक्षित होते.

एकजण उपेक्षित आहे तर दुसरा तसा नाही. पण लग्नाच्या धांदलीत दोघेही सारखेच दुर्लक्षित असतात ना. Happy अशा अर्थी नारायण आठवणं साहजिक आहे.

अतिपरिचयामुळे दुर्लक्षित राहिलेली व्यक्तिमत्वं सादर करण्यात तुमचा हातखंडा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गेली ४/५ वर्षे कुठे पंगतीला बसलेच नाही. एकतर बुफे असतो नाहीतर सरळ सरळ हॉटेल आणि वेटर्स.
एकदम नोस्टाल्जिक लेख आहे.
चान्स मिळाला तर कुठे पंगतीचे लग्न अटे.न्ड केले पाहिजे म्हणते!

______________________________________________

जेवणार्‍याला भातावर पाहिजे तेवढे साधे वरण एका प्रयत्नात कधीही मिळू नये हा यच्चयावत वाढप्यांचा कट असतो.
>> +१००,

मस्तच लिहिलंयत.

अगदी नारायण असं नाही, पण पु. लं.ची लेखनशैली आठवते वाचताना. सबंध लेख खुसखुशीत, खुमासदार आणि वाचतांना डोळ्यांसमोर ते-ते प्रसंग साकारणारा, मनोमन पटल्याची खूण देणारा आणि शेवटच्या वाक्याला डोळ्यांत टचकन पाणी उभा करणारा असा छान जुळून आलाय.

एकूणातच हल्ली क्वचितच बघण्यास मिळणार्‍या या पंगतींचा थाट काही औरच असे. आताच्या त्या जड प्लेट्स एका हातात सावरून धरत, तर दुसर्‍या हाताने उभ्या उभ्या खाणे आणि तेही ठेवणीतली भारी वस्त्रे प्रावरणे अंगावर सावरत असताना म्हणजे तारेवरची कसरत वाटते मला. कितीही रुचकर जेवण असले तरी ते कधी एकदा संपतेय व हात मोकळा होतोय असेच वाटत रहाते.

लेख खूप आवडला.

मस्त आवडले ! परंतु आजकाल वाढपीच मिळणे कठीण झाले आले. , आजच पहा ग.म. प्रकट दिनाला खुप पंगती बसतात पण एकालाही स्वत:हुन वाटत नाही की आपण एखादी पंगत वाढावी. जो तो जागा मिळवायच्या तयारीत साधे खरकटेही उचलु देत नाहीत.
हेच लग्न समारंभातले पुर्वी बरेच कुटूंबातील सदस्या स्वतः आग्रह करीत होते. आता तर बायका निव्वळ मेकअप मधेच वेळ घालवता. एखादी पंगत वाढ किंवा आग्रह कर म्हटले तर मी कशाला जाऊ.

पाणी वाढणारे वाढपी पाणी हवे का असे विचारतही नाहीत आणि त्यांना कोणी पाणी वाढा असे म्हणतही नाही. हा एकच पदार्थ आहे ज्यात वाढपी व जेवणारा ह्यांच्यात एकमताने काहीही ठरतही नाही किंवा मतभिन्नताही होत नाही. ग्लास अर्धा भरलेला असला तर वाढपी तो पूर्ण भरतात. तो त्याने का भरला असे जेवणार्‍याला वाटत नाही.>>>>> जबरी लेख. Lol अगदी पंक्ती तरळल्या डोळ्यासमोर.

बेफी ,
नारायण ची आठवण येण्याचं कारण मला असं वाटत कि , त्यात नारायण स्वतः वाढप्याचं काम करतो . ते पण पंगतीत बसलेल्या लोकांना आग्रह करत .
स्वतः श्लोक बिक म्हणतो ( शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे .. ) भक्कम भक्कम मंडळी पाहून जिलब्या वाढतो .. हे लोकांना पटकन क्लीक होत असेल .
बाकी. लेख नादखुळा !!

लेख छान.बऱ्याच दिवसांनी वर आला.
मलाही लग्न सराई, वाढणं असल्याने नारायण ची आठवण आली.
हल्ली पंगतीत बसून जेवणं दुर्मिळच.

Pages