वाढपी

Submitted by बेफ़िकीर on 9 February, 2015 - 07:00

'गिळा' हा शब्द न उच्चारता ती आज्ञा कृतीतून सुचवण्याचे कौशल्य विकसित करणारा माणूस म्हणजे वाढपी! त्याच्या हातात मीठ, लिंबू किंवा पंचामृत असे पंगतीच्या पानातील सर्वाधिक उपेक्षित पदार्थ असोत किंवा बासुंदी, जिलेबी, श्रीखंड ह्यासारखे सर्वाधिक अपेक्षित पदार्थ असोत, त्याच्या चेहर्‍यावर कायम हातात मेलेला उंदीर असल्याचेच भाव असतात. वाढप्याच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे असे दोनच क्षण असतात. एक म्हणजे पंगतीत बसलेल्याने वाढप्याच्या हातातील पदार्थ पाहून दोन्ही हात आणि मुंडके ठामपणे नकारार्थी हलवून चेहर्‍यावर 'अती झाल्याचे' भाव आणणे! दुसरा म्हणजे मीठ किंवा फ्लॉवरचा रस्सा वाढायचे काम मिळणे, कारण त्यात भांडे नुसतेच पंगतीसमोरून द्रूतगतीने फिरवत न्यावे लागते.

अनेक वाढपी तर जेवणार्‍यांच्या फुकटखाऊ वृत्तीचा उगाचच सूड घ्यायच्या मिषाने मुद्दाम चारवेळा मीठ समोर नाचवून आणतात. दोनचारवेळा एखाद्या वाढप्याने मीठ समोर नाचवले की त्याच्यावर मीठाळ हा शिक्का बसतो आणि मग तो पक्वान्न घेऊन आला तरी लांबूनच त्याला पाहून लोक पानावर आडवा हात नकारार्थी धरून शेजारच्याशी बोलायला लागतात. वाढपी पुढे गेल्यावर कळते की त्याच्या हातात अंगूरमलई होती. मग जेवणार्‍याला वाटणारी हळहळ हा वाढप्यांच्या मर्यादीत कार्यक्षेत्रातील सर्वात रोमांचकारी विजय समजला जातो.

वाढपी कोणीही होऊ शकतो. पण प्रभावी वाढपी होण्यासाठी अनुभव घ्यावा लागतो. ह्या पदाच्या प्राप्तीसाठी प्रशिक्षण उपलब्ध नाही. प्रभावी वाढपी म्हणजे तो ज्याच्या कंत्राटदाराला हे मान्य करावेच लागते की त्याने वाढण्याचे काम मनापासून केले पण जेवणार्‍यांच्या मते तो वाढायला नसताच तरीही चालले असते. किंबहुना तेच अधिक चांगले झाले असते.

ज्याला जेव्हा जे हवे आहे त्याला तेव्हा ते न मिळू देणे हे वाढप्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. ज्याला जेव्हा जे अज्जिबात नको आहे ते त्याच्या डोळ्यांसमोर सतरांदा नाचवणे व त्याला खिजवणे हे वाढप्याचे दुसरे कर्तव्य आहे. आणि ज्याला जे मगाशी हवे होते ते आता ती वेळ पूर्ण निघून गेल्यानंतर त्याच्या पानात ओतणे किंवा त्याच्यासमोर तो पदार्थ उत्साहाने नाचवत नेणे हे वाढप्याचे तिसरे कर्तव्य आहे.

वाढपी एकमेकांशी कधीही भांडत नाहीत. कोणाला किती जड भांडे पकडायला लागले किंवा कोणाला किती फेर्‍या माराव्या लागल्या ह्यावरून त्यांच्यात वाद होत नाहीत. वाद न होण्याचे कारण असे की भांडे जितके जड तितके ते तुफान वेगाने पंगतीसमोरून न्यायचे असते. भांडे जितके हलके तितके ते जेवणार्‍याच्या चेहर्‍याच्या अगदी समीप नेऊन त्याला त्या हलक्या पदार्थाचा नॉशिआ येईपर्यंत दाखवायचे असते. दोन्ही कृतींमध्ये समान राक्षसी समाधान असल्यामुळे त्यांच्यात भांडणे होत नाहीत.

वाढप्याचे आणखी एक कसब असे की आपण वाढपी आहोत हे कोणाला ओळखताच येता कामा नये असे भाव चेहर्‍यावर ठेवायचे आणि एका कोपर्‍यात उभे राहायचे. ते भाव पाहून लोक बिचकतात व मागण्या करत नाहीत. कोणी विचारले तर हेही म्हणता येते की पब्लिकला काही नकोच आहे तर वाढू काय? ह्या प्रसंगावर उपाय म्हणून काही ठिकाणी वाढप्यांना गणवेष असतात. नवनवे शोध लागण्यामागे वाढप्यांची अशी वृत्ती असते हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही.

काही वेळा वाढपी हातातील पदार्थाच्या मूल्यानुसार चेहरा करतात. म्हणजे हातात चटणी असा अत्यंत दुर्मीळरीत्या दुसर्‍यांदा घेतला जाणारा पदार्थ असल्यास वाढपी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीतील मानाच्या गणपतीबरोबर गल्लीबोळातले गणपती जसा निर्विकार चेहरा करून जात राहतात तसे जातात. वाढप्याच्या हातात पुरी असली तर पंगतीचा पहिला साठ टक्के वेळ ते 'नववधू प्रिया मी बावरते' ह्या थाटात फिरतात आणि उरलेला चाळीस टक्के वेळ ते ' कैक उत्तम स्थळे चालून आली होती' अश्या थाटात चालतात. ह्याचे कारण उरलेला चाळीस टक्के वेळ हा मसालेभात किंवा ताकभात खाण्यात अधिक जात असतो.

कुरडया आणि पापड्या वाटपाची जबाबदारी ज्या वाढप्याकडे दिलेली असते त्याचे पंजे लहान असल्याची आधी खात्री करून घेण्यात येते. म्हणजे मग त्याच्या पंज्याने पानात ढकलला जाणारा कुरडया पापड्यांचा ढीग तुलनेने लहान असतो.

काही वाढपी 'मी कोणाला नकोच असतो' असा उदास चेहरा करून जेवणार्‍याकडे अजिबात न बघता सरळ चालत निघतात. टोलनाक्यावरून टोल न देता पसार होऊ पाहणार्‍या वाहनाला जसे चारसहाजणांचे टोळके आरडाओरडा करून अडवते तसे मग त्या वाढप्याला अडवले जाते व पदार्थ वाढून घेतला जातो.

पाणी वाढणारे वाढपी पाणी हवे का असे विचारतही नाहीत आणि त्यांना कोणी पाणी वाढा असे म्हणतही नाही. हा एकच पदार्थ आहे ज्यात वाढपी व जेवणारा ह्यांच्यात एकमताने काहीही ठरतही नाही किंवा मतभिन्नताही होत नाही. ग्लास अर्धा भरलेला असला तर वाढपी तो पूर्ण भरतात. तो त्याने का भरला असे जेवणार्‍याला वाटत नाही.

जेवण जेव्हा घश्याच्या दोन सेंटीमीटर खालीपर्यंत येऊन पोचते तेव्हा अचानक मठ्ठा हा पदार्थ अतीमहत्वाचा ठरतो. मट्ठा हा पदार्थ प्रामुख्याने दिलेल्या वाटीच्या बाहेर सांडण्यासाठी असून दोन चार शिंतोडे वाटीत पडले तर तो दखलपात्र गुन्हा असतो अश्या पद्धतीने मट्ठा वाढण्यात येतो. शेजारच्या अळूच्या भाजीच्या वाटीत मट्ठ्याचे काही थेंब गेले तर 'नाहीतरी पोटात जाऊन सगळे एकच होणार आहे' असा चेहरा करून वाढपी पुढे निघतो. तोवर इतके खाणे झालेले असते की वाढप्याशी भांडण काढण्याची छाती किंवा पोट उरलेले नसते.

भात, वरण व तूप हे तीन पदार्थ वाढणार्‍यांचे एक स्वतंत्र कुटुंब असते. ते त्यांच्यात दुसर्‍य अकोणालाही घेत नाहीत. जेवणार्‍याला भातावर पाहिजे तेवढे साधे वरण एका प्रयत्नात कधीही मिळू नये हा यच्चयावत वाढप्यांचा कट असतो. वरण वाढणार्‍या वाढप्याच्या प्रतीक्षेत कोरडा भात चिवडणारे असंख्य जेवणारे पाहून वाढपी जमातीला एक प्राचीन सूड उगवल्यासारखे समाधान मिळते.

वाढप्यांशी कोणी आवाज चढवून बोलायला लागले तर त्या बोलणार्‍याला तो पदार्थ इतका वाढला जातो की पश्चात्तापानेच त्याला प्रायश्चित्त मिळावे.

यजमानांनी एखाद्या पानावर पक्वान्नाचा आग्रह करण्याचा हुकूम सोडला तर वाढपी तिथे 'माझ्या बापाचे काय जाते, भरा हवे तितके' असा चेहरा करून ते पक्वान्न इतके वाढतात की यजमान पुढे आग्रह करणे बंद करतो.

नवपरिणित दांपत्य आग्रह करण्यासाठी निघाले की त्या आधी तोच पदार्थ घेऊन चार वाढपी सगळ्यांना तो पदार्थ धाकदपटशाने वाढत सुटतात. पूरग्रस्त विभागात हेलिकॉप्टरमधून अन्नाची पुडकी फेकली जावीत तसे ते वाढपी उधळलेले असतात. नवदांपत्याकडे मग कोणी ढुंकूनही बघत नाही.

वाढपी ह्या इसमाचा कितीही राग आला तरीही तो धड व्यक्तच करता येत नाही. तसेही, दहा, बारा मिनिटांत एकदाचे पोट भरले की वाढप्याला लक्षात कोण ठेवतो?

भूक लागलेली असताना ज्याची सर्वात जास्त आठवण येते आणि पोट भरल्यावर जो सर्वात जास्त वेगाने विस्मृतीत जातो तो वाढपी! सगळ्या पंगती झाल्यावर साडे तीन, चारला सगळे वाढपी आपापले ताट घेऊन आत कुठेतरी कोंडाळे करून बसतात आणि साधेवरण भात खातात.

त्यांना कोणीही कधीही काहीही वाढत नाही.

===========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलेय.
आजही गावाकडे लग्नानंतर जेवणाची पंगत बसल्यावर असेच चित्र दिसते, त्यात जर वाढणारे, वाढपी तरुण (हे तरुण वाडीतीलच असतात) असतील आणि पंगतीत मुली बसल्या असतील तर त्यांची कृपा तिकडेच जास्त असते.

मला लेख आवडला. एकदम सुक्ष्म निरिक्षण. मला आजतागायत वाढप्यांचा फक्त राग येत राहिलेला आहे. Sad कारण ते सगळं मिक्स करतात. वाटिच्या कडेला आमटी किंवा उसळ लागलेली मला आवडत नाही. किंवा मिठात कोशिंबिर मिक्स झाली की माझं डोकं फिरतं. भाताचं खळगं केलं तरीही वरण मध्यावर न ओतता एका साईडला वाढतात मग ते वहात जाते.
वरचं सगळं वाचताना मला उगिचच पु लंचा नारायण आठवत होता. Lol

कारण ते सगळं मिक्स करतात. वाटिच्या कडेला आमटी किंवा उसळ लागलेली मला आवडत नाही.
<<
<<

पुर्वी पानाच्या पत्रावळ्यात वाढायचे तेंव्हा तर भाजी कुठे आहे आणि भात व इतर पदार्थ कुठे आहेत, हेही कळायचे नाही.

वरचं सगळं वाचताना मला उगिचच पु लंचा नारायण आठवत होता.
<<

अगदि..अगदि, आजही आमच्या इथे कुणाकडे लग्नकार्य, बारसे, वाढदिवस इतकेच काय एकाद्याचे दहाव्या-बाराव्याचे जेवण जरी असेल, तरी या वाढपी लोकांचा उत्साह जराही कमी होत नाही.

लेख आवडला.

व्वा !!! खूप आवडलं. वाढपी ह्या दुर्लक्षित प्राण्यावर इतका सखोल लेख !! काय निरीक्षण आहे !!!

मला आजतागायत वाढप्यांचा फक्त राग येत राहिलेला आहे. अरेरे कारण ते सगळं मिक्स करतात. वाटिच्या कडेला आमटी किंवा उसळ लागलेली मला आवडत नाही. किंवा मिठात कोशिंबिर मिक्स झाली की माझं डोकं फिरतं. भाताचं खळगं केलं तरीही वरण मध्यावर न ओतता एका साईडला वाढतात मग ते वहात जाते >>> अगदी अगदी!! पान नीट वाढलं तर कदाचित खाणारे जास्त खातील असा संशय येत असेल त्यांना…

लेख आवडला. वाढपी कसेही वागत असले तरीही मला पंगतच आवडते. ते ताटावर बसून सगळ्यांबरोबर गप्पा मारत, सुरुवातीला श्लोक म्हणत, इतरांना आग्रह करत जेवण्यात मजा आहे.

"अरे वाढ त्याला! अजून दोन जिलब्या वाढ" "अरे खा रे! नंतर हवं तर पान खा" असे प्रेमळ संवाद जिथे चालतात ती खरी पंगत!

कित्ती वर्षांनी हे चित्र तुमच्यामुळे डोळ्यासमोर आणता आले. धन्यवाद! बुफेमुळे आजकाल वाढपी कमी होत चालले असावेत.
पण त्यांची किव येते. त्यांनाही बिचार्‍यांना भूक लागत असेल हे सुग्रास जेवण पाहून पण आपली पोटं भरल्याशिवाय त्यांना कोण विचारणार?
तुम्ही लेख छानच लिहिला आहे. शेवटी गलबललेच पण.

Lol खुपच मस्त निरिक्षण आहे, बेफी.. खरोखर पुलंचंच साहित्य वाचतेय, असं वाटत होतं.. विनोदाची शैली अगदी तशीच जाणवली. शेवटी सगळी लग्न कार्य आटोपून विस्मृतीत जाणारा नारायणही आठवलाच.. Happy

आपल्याकडे वाढपी हे असं करतात म्हणून बुफे ठेवला, तर लोक कधी न मिळाल्यासारखं भरपूर वाढून घेतात आणि वाढलेलं सगळं न खाता तसंच ताट ठेऊन निघून जातात... एकूण काय, लग्नकार्य म्हटलं की वाढपी नाहीतर अतिथी, दोघांपैकी एकजण सूड उगवणारंच, हे नक्की!!

वाढप्यांवर लेख? Happy

मोठ्या समारंभात ह्या पंक्तींची परंपरा अजून टिकून आहे ह्याचं आश्चर्य वाटतं मला .. कारण घरच्या पंक्तीत जशी मजा, आपुलकी असते ती अशी व्यावसायिक रीत्या अ‍ॅरेन्ज् केलेल्या पंक्तीत कशी येणार?

(कधी कधी तर वाटतं हाऽऽ उगीच पसारा असलेल्या समारंभांची तरी काय मजा .. म्हणजे मी स्वतः खूप एन्जॉय केलंय लहानपणापासून पण तरिही प्रश्न पडतो खरा ..)

लेख वाचून लग्नातल्या पंगती आठवल्या! भारी निरीक्षण आहे तुमचं बेफि! एकदा माझा भाऊ लहान असताना गावाच्या उत्सवात त्याला लाडू वाढायचं काम दिलं होतं. त्याने लाडू वाढल्यावर एका काकांनी अरे नको नको म्हटल्यावर माझ्या भावाने सरळ त्यांच्या पानातला लाडू पुन्हा काढून घेतला Lol सगळ्यांची हहपुवा!
वाढपी मंडळींनी भुकेल्या पोटी वाढायचे असते म्हणजे व्यवस्थित वाढले जाते! कदाचित भरल्या पोटी खाली जमिनीवर बसलेल्या पंगतीला वाकून वाढणे जड जात असेल असे practical कारण ही असेल Happy

बेफिकीर,

अगदी प्रत्ययकारी वर्णन आहे. जणू पंगतीला बसल्यासारखं वाटतं. Happy

लेखाच्या शेवटास पुलंचा नारायण आठवला.

आ.न.,
-गा.पै.

पुलंचा नारायण आठवला ह्या मताचा अर्थ काय आहे? >>> तुम्ही वाचली नाहीये का ती गोष्ट? लग्नसमारंभात सर्वांचं करुन कार्यक्रम संपल्यावर शेवटी थकलेल्या नारायणाकडे कोणीच लक्ष देत नाही, असा शेवट आहे तो. ह्या लेखाचा शेवटही काहीसा असाच आहे. शिवाय एकूणच लेखनशैली पुलंच्या त्या कथेशी अगदीच मिळतीजुळती वाटली.

हसावं का रडावं?>>> Proud

लेख आवडला. काही सूक्ष्म निरीक्षणे अफाट आहेत.

मला नारायण अजिबात आठवला नाही, पण पु. लं. चा "माझे खाद्यजीवन" हा लेख आठवला. ह्या लेखातल्या बारीकशा काही नोंदी त्या लेखातल्या नोंदींची, आडवळणाने आठवण करुन देतात.

पुण्यातल्या पेठेतल्या कार्यालयांमधे हतबल होऊन कोरडा वरणभात कालवणारे लोक तरळले डोळ्यापुढे. खरंच पंगतीतल्या वरणभाताचे सुयोग्य प्रपोर्शन जमून येणे हा मणिकांचन योगच. अफाट ऑब्जर्व्हेशन.

कोशिंबीर वाढणारे चमचा पानाला नुसता टेकवातात व पळत सुटतात. आणि नेमकी कोशिंबीर झकास झालेली असते. परवा एका लग्नात, एका आज्जीने कोशिंबीर वाढणार्‍या मुलाचा हात धरून ठेवला व त्याला म्हणाली, "मी आता पुरे, असे म्हणे पर्यंत वाढायची कोशिंबीर. तुम्हाला पात्राचे पैसे मिळतात ना यजमानांकडून, मग व्यवस्थित वाढायला काय होते रे? " Happy

>>>तुम्ही वाचली नाहीये का ती गोष्ट? <<<

अनेकदा वाचली आहे पण नारायण हे पात्र वेगळंच आहे. वाढपी हा एक व्यवसाय आहे. नारायणची आठवण येणे अनपेक्षित होते. असो. Happy

नवीन प्रतिसाददात्यांचे आभार

Pages