उर्दू ग़ज़ल- काही शतकांचा प्रवास- ३

Submitted by समीर चव्हाण on 7 February, 2015 - 06:48

ही मालिका लिहायला घेतल्यानंतर मला हा प्रश्न भेडसावत होता की आपल्या यादीमध्ये अमीर खु़सरो सारखा मोठा कवी आणि अभ्यासक नाही. त्याची अनेक कारणे आहेत.
काही कारणे बहुधा त्याचे पुढील खुसरोचा शेर पाहिल्यावर स्पष्ट व्हावीत:

जब यार देखा नैनभर, दिलकी गयी चिन्ता उतर
ऐसा नही कोई अजब राखे उसे समझाय कर

वरील द्विपदी वाचल्यावर स्पष्ट होते की उर्दू गझल तेव्हा आरम्भिक अवस्थेत होती.
अमीर खुसरोचे काम गझल आणि कविता ह्या दोन्ही क्षेत्रांत फार मोठे आहे, ज्याचा किमान परिचय पुढे शक्य झाल्यास घेऊच. हे मानायला हवे की वली येण्याआधी हिंदुस्थानी भाषांत गझल, आपण आज ज्याला गझल समजतो त्या रूपात, नव्हती. नाहीतर कबीरानेही गझलच्या साच्यात लिहिलेच की. ह्याचा अर्थ असा घेतला जाऊ नये की खुसरोला गझल माहित नव्हती. मात्र इथे मुद्दा आहे उर्दू गझलेचा. वलीचे मोठेपण मानणे आजच्याच नाही तर त्या काळातल्या उर्दू साहित्यातील मोठमोठ्यांना जड गेले. एक किस्सा सांगतो त्यावरून अंदाज यावा. वलीच्या निधनाच्या वर्षाबद्दल अनेक मते आहेत. अशी आख्यायिका आहे की दिल्लीचा एक निवासी शाह गुलशन ने वलीला सल्ला दिला की तू फारसी शैली आणि त्यातील विषयवस्तू स्वीकारायला हवेत (मीर ने आपल्या निकातुश्शअरा मध्ये हे रंगवून सांगितले आहे). गंमतीचा विषय असा आहे की ह्या भेटीनंतर वली जितके वर्षे हयात असेल ते हे किस्सा सांगणा-यांना (विशेषकरून दिल्लीकरांना) उत्तमच. जेणेकरून त्यामुळे वलीच्या साहित्यिक वाट्यात फारसीचे उपकार राहतील आणि वलीचे सर्जनात्मक कलागुण कमीसुध्दा दाखवता येईल. ह्या प्रयत्नात काही उर्दू कवी वा इतिहासाकारांनी वलीला अगदी १७३५ पर्यंत जगवले. वरील आख्यायिका केवळ पुस्तकी असल्याचे दिसून येते. वली १७०८-१७०९ च्या सुमारास गेला असावा ह्याचा ठोस पुरावा इसवी सन असलेले अद्याप उपलब्ध असलेल्या वलीच्या अनेक पांडुलिपि प्रती. वली हा एक असा लौकिक कवी होता जो विद्वान माणूस (ना संत ना फकीर) असून त्याची कविता ३०० वर्षांहून अधिक काळ जनमानसात आपले स्थान बनवून आहे.

वरील भाष्याचा उत्तम संदर्भ उर्दूवरचे एक पुस्तक (उर्दू का आरम्भिक युग, शम्सुर्रहमान फा़रुकी़) एवढ्यातच हाताला लागले. त्यात उर्दू भाषेबद्दल अनेक रोचक गोष्टी आहेत. विषयांतर करून त्यातील एक-दोन गोष्टी समराइज करून सांगतो: जुन्या काळात उर्दू नावाची कोणतीही भाषा किंवा तिचा संदर्भ दिसून येत नाही (हे विधान हिंदीला लागू होत नाही, खुसरोचे काम पाहिले तर). आज आपण ज्या भाषेला उर्दू म्हणत आहोत जुन्याकाळी तिला हिन्दवी, हिन्दी, देहलवी, गुजरी, दकनी, आणि रेख्ता़ असे (काळाच्या क्रमाने) संबोधले गेले आहे. रेख्ता शब्द असलेले अनेक शेर अनेकांना माहित असतीलच. मीरचा एक प्रसिध्द शेर असा आहे:

गुफ्त़गू रेख्ते़ में हमसे न कर,
यह हमारी ज़बान है प्यारे

अजून एक शेर पहालः

मुसहफी़ फा़रसी को ताक़ पे रख
अब है अशआर-ए-हिन्दवी का रिवाज़

अशआर-ए-हिन्दवी = हिन्दवी भाषेतील द्विपदी

मुसहफीला उर्दू म्हणजे उर्दू भाषा अपेक्षित नसावी हे पुढील शेरावरून स्पष्ट होते:

ये रेख्ते़ का जो उर्दू है मुसहफी़ इसमें
नयी निकाली है बाते हजा़र हमने तो

इथे उर्दू शब्द पुल्लिंग म्हणून प्रयुक्त आहे. असो,
फारूकींच्या मते उर्दू हा शब्द सर्वप्रथम, १७८० सुमारास, मुसहफी़च्या शेरात आला. कसा ते पहाल:

अलबत्ता मुसहफी़ को है रेख्ते़ का दावा
यानी के है ज़बां दां उर्दू की वो ज़बां का

इथे फा़रुकी़ ह्यांच्या म्हणण्यानुसार उर्दू हा शब्द शाहजहांबाद का शहर ह्या अर्थाने आला आहे.

विषयांतर संपवून मूळ विषयाला हात घालतो. मागे म्हटल्याप्रमाणे ख्वा़जा मीर दर्द वर लिहायला हवे आहे. पण कवींच्या कालक्रमाने गेले तर सिराज अगोदर येतो. तर ह्यावेळेस सिराजउद्दीन औरंगाबादी चा परिचय करून घेऊया. सिराज चा जन्म १७१४-१७१५ तर मृत्यू १७६३ चा दिसून येतो. नावावरून स्पष्ट आहे की तो औरंगाबादचा होता. वलीनंतर उर्दू गझलेवर मोठी छाप ठेवणारा सिराज हा दक्कनचा निश्चितच सगळ्यात मोठा शायर ठरावा.
सिराज ची एक अतिशय सुंदर आणि प्रसिध्द गझल देत आहे. एक परिपूर्ण गझल कशी असावी ह्याचा अत्युत्तम नमुना.

ख़बरे-तहय्युरे-इश्क़ सन न जुनूं रहा न परी रही
न तो तू रहा न तो मैं रहा जो रही सो बे-ख़बरी रही

ख़बरे-तहय्युरे-इश्क़ सन = प्रेम के अचम्भित चेतना के साथ

शहे-बेखु़दी ने अता किया मुझे अब लिबासे-बरहनगी
न खि़रद की बखि़यागरी रही न जुनूं की पर्दा:दरी रही

शहे-बेखु़दी = बेहोशी का बादशाह, लिबासे-बरहनगी = नग्नता की पोशाक
खि़रद = बुध्दि

कभी सिम्ते-गैब से क्या हुआ कि चमन ज़हूर का जल गया
मगर एक शाखे-निहाले-ग़म जिसे दिल कहो सो हरी रही

सिम्ते-गैब = परोक्ष की तरफसे, ज़हूर = जाहीर, प्रगट
शाखे-निहाले-ग़म = दुखसे समृध्द डाल

नज़रे-तगा़फुले-यार का गिला किस ज़बां से बयां करूं
कि शराबे-सद-क़दहे-आरजू़ खु़मे-दिल में जो थी भरी रही

नज़रे-तगा़फुले-यार = यारकी उपेक्षापूर्ण नजर, शराबे-सद-क़दहे-आरजू़ = इच्छा के सैकडो प्याले,
खु़मे-दिल = दिल का घडा़

वो अजब घडी थी मैं जिस घडी लिया दर्स नुस्खे़-इश्क़ का
कि किताब अक्ल की ताक़ में जूं धरी थी त्यूंही धरी रही

दर्स = धडा, ज्ञान, नुस्खे़-इश्क़ = प्यार का उपाय

तेरे जोशे-हैरते-हुस्न का असर इस क़दर से यहां हुआ
कि न आईनः में रही जिला न परी कूं जलवःगरी रही

जिला = चमक, परी = सुंदर स्त्री

किया खा़क आतिशे-इश्क़ ने दिले-बेनवा-ए-सिराज कूं
न ख़तर रहा न हज़र रहा मगर एक बेख़तरी रही

दिले-बेनवा-ए-सिराज = सिराज का बेनवा हृदय, बेनवा = आवाज के बिना
हज़र = भय

कदाचित तेव्हाच्या आणि बहुधा आत्ताच्या काळात ही गझल अव्वल असावी. ह्याचे एक कारण ह्या गझलेतील जी बेख़बरीची अवस्था आहे ती फारच मोहक आहे. त्यात आलेल्या प्रतिमा गुंतागुंतीच्या तर आहेतच पण ब-याचदा हे कसे आहे ह्याचे उत्तर हे तसे आहे, असे काहीसे होते.

सिराज हा एक सूफी होता, जो मोस्टलि आयसोलेशन मध्ये राहिला. सिराज चे काही विशेष शेर देऊन थांबतो:


इश्क़ और अक्ल में हुई है शर्त
हार और जीत का तमाशा है


बोलता हूं जो बुलाता है वो
तन के पिंजरे में उसका तोता हूं

मुस्कुराकर मोड लेते हो भवे
खूब अदा का हक़ अदा करते हो तुम


धूप में ग़म की अबस जी कूं जलाया अफ्सोस
उसके साए में अमां था मुझे मालूम न था

अमां = बचाव


मयकशे-ग़म को शबे-महताब है मू-ए-सफेद
मौसमे-पीरी में सामाने-जवानी कीजिए

खून-ए-दिल आसूंओ में सर्फ हुआ
गिर गई ये भरी गुलाबी सब

धन्यवाद.

समीर चव्हाण

भाग १ http://www.maayboli.com/node/52230

भाग २ http://www.maayboli.com/node/52303

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती गझलही छानच
आधी जरा किस्से सांगीतले की जरा गम्मत वाढते हे पुन्हा लक्षात आले

हे कसे आहे ह्याचे उत्तर हे तसे आहे, असे काहीसे होते.<<<< विचार करावा लागणार आहे ह्यावर पण जरा सविस्तर सांगाल का म्हणजे सोपे जाईल जरा

धन्यवाद समीरजी

हे कसे आहे ह्याचे उत्तर हे तसे आहे, असे काहीसे होते.<<<< विचार करावा लागणार आहे ह्यावर पण जरा सविस्तर सांगाल का म्हणजे सोपे जाईल जरा

विशेष काही नाही. सिराज च्या त्या गझलेतील अनेक भावना नेमक्या शब्दात पकडणे जवळपास अशक्य आहे.
उदा. किताब अक्ल की ताक़ में जूं धरी थी त्यूंही धरी रही म्हणजे काय ते ढोबळपणे सांगता येईल पण ह्या फ्रेजमधून जे कन्व्हे होतेय ते सांगायचे म्हटले तर सिराज जे म्हणतो तेच कोट करावे लागावे. ही गझल समजून घेताना मला काही अडचणी आल्या होत्या. त्या संदर्भात आणि एकूणच अनंतचे धन्यवाद.

समीर

टीप: लेखात काही बदल केलेत. विशेषकरून सुरुवातीचा भाग. खुसरोबद्दल लिहिताना न हवासा अर्थ निघत होता. तो भाग ठीक केला आहे. लोक प्रतिसाद देत नसले तरी वाचत असावेत ह्या विचाराने पुन्हापुन्हा वाचन करून बदल करीत आहे. काही आक्षेपार्ह जाणवल्यास कृपया कळवावेत.

उर्दू भाषा आणि गजल ह्या दोन्ही विषयात मी बिगरीच्याही खालच्या इयत्तेत आहे! त्यामुळे तुमची मालिका मला कळायला खूप अवघड वाटते आहे Sad अजून सोपे करून लिहिता येईल का? खूप jumpy वाटला हा लेख! म्हणजे सुरुवातीला अमीर खुस्रो मग वलीचा उल्लेख आणि मग मधेच उर्दू भाषेचा थोडासा इतिहास मग मीरचा उल्लेख आणि मग सिराजचे शेर. त्यामुळे एक सलग असा फ्लो येत नाहीये वाचताना. त्यापेक्षा छोटे भाग करून प्रत्येक हेडरखाली एक एक परिच्छेद दिल्यास कळायला सोपे जाईल! आणि शेरातल्या महत्वाच्या शब्दांचे अर्थ दिलेत तरी एकूण शेराचा एका ओळीत अर्थ दिल्यास बाकीचे शब्द संदर्भाने लावून अर्थ समजणे सोपे जाईल! कारण मला सगळ्याच शब्दांवर अडल्यासारखे वाटते काही वेळा!

खूप jumpy वाटला हा लेख! म्हणजे सुरुवातीला अमीर खुस्रो मग वलीचा उल्लेख आणि मग मधेच उर्दू भाषेचा थोडासा इतिहास मग मीरचा उल्लेख आणि मग सिराजचे शेर.

आपले बरोबर आहे. हे समजून घ्यायला हवे की मालिकेचा मूळ उद्देश्य उर्दू गझल ह्या विधेच्या पिलर्सची ओळख इतकाच आहे. तर वरील पोस्टचा उद्देश्य सिराजची ओळख (जी शेवटच्या भागात केली आहे). सोबत चघळायला काही किस्से हवेत म्हणून पहिला भाग. किस्स्यात अनेक लोक येणारच तेव्हा त्या संदर्भात jumpy असे काही नसते. आपण कृपया पहिले दोन भाग पाहाल.
राहिलं अर्थ लावण्यातल्या अडचणी, प्रत्येक शेराचा अर्थ सांगण अवघड आहे. का अवघड आहे ते वर मी स्पष्ट केले आहे. असो, आपल्या मताबद्दल धन्यवाद.

समीर

धन्यवाद समीरजी
म्हणजे काय ते ढोबळपणे सांगता येईल पण ह्या फ्रेजमधून जे कन्व्हे होतेय ते सांगायचे म्हटले तर सिराज जे म्हणतो तेच कोट करावे लागावे.<<< आता थोडे समजले आहे आपले म्हणणे
मला वाटते ह्याला तरलता म्हणतात हा विषय मूळतः भावनिकतेतून उगम पावतो पण कधी कधी कल्पकता डोके वर काढते जिथे बुद्धीचा भार जास्त पडतो . तेव्हा वाचकाला अगदी सराव असलेल्या वाचकालाही कधीकधी अर्थासाठी अडखळत- घुटमळत बसणे भाग पडते असे होता कामानये असे मलाही वाटते (काही दिवसांपूर्वी एका धाग्यावर अशी चर्चा रंगलेली त्या अनुषंगाने म्हण्नत आहे कृ गै न )

असो
जिज्ञासाजी गझलेबद्दल थोडीफार माहीती असण्ने णे गरजेचे असते जर आपल्याला गझलेच्याबाबतच्या चर्चेत रस घ्यायचा असेल तर